भोज्या :- भाग १

Submitted by अतरंगी on 5 November, 2017 - 06:46

मोबाईलच्या मेसेज टोन मुळे जाग आली तेव्हा त्या महाकाय वाळवंटातल्या एकुलत्या एक रन वे वर कंपनीची फ्लाईट जस्ट लँड झाली होती. बायकोला पोचल्याचा मेसेज करायला डेटा चालू केला तर ऑफिसच्या ईमेल आयडी वर लागोपाठ 2 ईमेल आले. स्टीफनने पाठवलेला हँड ओव्हर नोट्स आणि त्यावर टीम लिडरचा out of office चा सिस्टम जनरेटेड ईमेल.

स्टीफन, माझा रोमेनियन कलीग. आमचा कामाचा एरिया एकच. दर 45 दिवसांनी आम्ही घरी जाताना एकमेकांनाच hand over देऊन जायचो. कंपनी पॉलिसी प्रमाणे शक्यतो प्रत्येक हँड ओव्हरला कमीत कमी एक ते दोन दिवसांचा ओव्हर लॅप असतो.स्टीफनने मला हँड ओव्हर नोटस ईमेल करायचे कारण न कळल्यामुळे बायकोला मेसेज करायचं सोडून आधी तो ईमेल उघडला. त्याच्या बायकोला ऍडमिट केल्यामुळे तो त्याची आजची कामं मला असाईन करून स्पेशल परवानगी घेऊन ओव्हर लॅप न करता निघून गेला होता.

अर्जंट कामा मध्ये तीन ऑइल वेल आज चेक करायची आणि टीम लीडर ट्रेनिंग साठी HQ ला गेल्यामुळे डॉक्युमेंट रिव्ह्यू करायची या नोटस हायलाईट केल्या होत्या. ईमेल नुस्ता वाचून पण वैताग आला. एक तर तीन फ्लाईट मध्ये तुकड्या तुकड्यात झोपल्याने झोप झालेली नव्हती. त्यात नेहमी प्रमाणे ऑफिसला जाऊन हजेरी लावून टंगळमंगळ करून रूम वर येऊन झोपण्याऐवजी 30 ते 35 किमी वाळवंटात जाऊन तीन इंस्पेक्शन्स करून यायचं होतं.

रूम वर सामान टाकून ऑफिसला जाऊन टेबलवर पडलेली रुटीन हँड ओव्हर चेकलिस्ट सही केली आणि टीम लीडरच्या इनबॉक्स मध्ये टाकून मी घाई घाईत गाडीची चावी घेऊन बाहेर पडलो. आमच्या इमर्जन्सी रेडिओ पैकी एक पण जागेवर नव्हता म्हणून इसिड्रोच्या ऑफिस मध्ये डोकावलो तर तोही नव्हता. बोर्डवर त्याच्या नावासमोर Sabkha 10 ची एंट्री केलेली होती.

Sabkha 10, आमच्या विशाल वाळवंटातील टोटल 98 सबखा मधील सर्वात लांबची, मी जाणार होतो त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला.... या असल्या छोट्या छोट्या सबखा मधून बांधलेल्या असंख्य छोट्या मोट्या ऑइल वेल, तिथून ऑइल वाहून नेणाऱ्या पाईप लाईन्स रुटीनने चेक करणे, जर काही इश्यूज असतील तर मेंटेनन्स ला कळविणे, त्यांनी काम केले की ते परत जाऊन चेक करणे आणि सगळ्या तेल विहिरी, पाईपलाईन्स सुस्थितीत राहतील हे बघणे हे आमचे Asset Integrity चे काम.

मेन रोड सोडून वाळवंटात घुसण्याआधी सवयीने एकदा मेसेज वर नजर टाकली आणि मोबाईल फ्लाईट मोड वर टाकून दिला. उगाच त्या वाळवंटात नसलेली रेंज शोधण्यात मोबाईल बरीच बॅटरी खातो.

साईट वर पोचल्यावर गाडीत पेंगत बसलेल्या यासीन ला उठवलं.
"Habibi, welcome back ! How was ur vacation? Hws your son? Where are sweets?"

यासीनने नेहमीच्या सवयी नुसार प्रश्नांची सरबत्ती चालू केली. त्याची उत्तरं देता देता आणि बाकी गप्पांच्या नादात तिन्ही ऑइल वेल चे काम हातावेगळे झाले सुद्धा.

"Listen, i need a favor man. I have one more well ready for inspection in sabkha 67. Its only CP testing. I have requested for inspection tomorrow and I know u r tired but Pls pls finish it today. If we finish it today, there wont be any Sabkha inspection for next three days. "

उद्या परत इतक्या लांब येण्यापेक्षा आजच जाता जाता ते काम संपवणे मला जास्त सोयीस्कर होते.

"Ok let's go"

"Do you really need me to come. Can you pls finish on your way back? I have do house keeping and take these ppl back before 4. I'm leaving for rotation tonight. You know!"

दुसरं कोणी असतं तरी मी त्याला सहज उडवून लावलं असतं पण यासीन आपला खास दोस्त होता. काम संपल्यावर वर पण बऱ्याच वेळेस खेळायला, स्विमिंगला, जेवायला आम्ही सोबत असायचो.

चला दोस्तीखात्यामुळे आजच्या वैतागात अजून 25 ते 30 km वाढले!

हे एक एवढं इंस्पेक्शन संपवून घरी जाऊन झोपू या म्हणत मी परत वाळवंटात गाडी पिडदायला सुरुवात केली. मला त्यावेळेस माहीत नव्हतं ते शेड्युल मध्ये नसलेले काम अंगावर घेणं मला किती महागात पडणार आहे.

87 वरून 67 ला जायला दोन रूट होते. जुन्या रूट वर सारखी वाळू येऊन गाड्या अडकायच्या म्हणून तो जुना रूट बंद करून मागच्याच वर्षी नवीन रूट चालू केला होता. आम्ही बऱ्याचदा जुुुनाच रूट वापरायचो कारण नवीन रूट जरा लॉंगकट होता. तिकडून जायला जास्तच वेळ लागला असता आणि मग घरी जाऊन झोपायला अजूनच उशीर झाला असता म्हणून मी जुन्याच रूट कडे गाडी वळवली.

जुन्या रूट वर आल्यावर माझा मुडच एकदम फ्रेश झाला. बरेच दिवस वापरात नसल्याने रोडच्या दोन्ही बाजूला मस्त सँड ड्युन्स दिसत होत्या, त्यात मावळतीला आलेला सूर्य आणि सोबत मेहेदी हसनच्या गझल्स. अहाहा ! च्यायला अशा ठिकाणी बायकोला घेऊन जाऊन टेंट लावून बार्बेक्यू करायला पाहिजे....

"Oh shit !!!"

समोरून speed limit तोडून येणारा वॉटर टँकर अवघ्या काही इंचानी मला चुकवून निघून गेला आणि त्याला चुकवायच्या नादात मी रोड सोडून दोनचार वेळा गाडीत वर खाली आपटून बाजूला येऊन थांबलो. या रूट वर कोण येणार म्हणून मी अगदी बिनधास्त गाडी पिदडत होतो, पण तो सुद्धा माझ्यासारखाच नवीन सोडून जुन्या रूट वरून निघाला होता. त्याला कचकचीत दोन शिव्या घालून गाडीला एक्सीलेटर दिला पण चारी बाजूला नुसता वाळूचा धुरळा उधळून गाडी जागच्या जागीच. च्यायला बोंबला, गाडी फसली वाटतं. खाली उतरून बघितलं तर गाडी च्या मधोमध वाळूचा उंचवटा आणि सगळी चाके बेअरली वाळूला टच होत असलेली बघून कपाळाला हात मारण्याशिवाय काही पर्याय नव्हता. गाडीतले सगळे ट्रान्समिशनचे विविध पर्याय वापरून रिव्हर्स फॉरवर्ड करून सुद्धा आजूबाजूला वाळूचा ढग करून गाडी जागच्या जागीच !

चला राजे ! घ्या फावडं आणि लागा कामाला. नसती कटकट च्या मारी... गाडीचं मागचं दार उघडून नेहमीच्या जागी शोव्हेल घ्यायला हात घातला. हायला !!!! शोव्हेल कुठं गायबला ??? दुसरीकडं कुठं ठेवलाय की काय म्हणत सगळी गाडी पालथी घातली पण शोव्हेल काय सापडेना. बोंबला आता बिना शोव्हेल चा मी हे धूड नक्की काढणार कसं आणि ते पण या भयानक उन्हाळ्यात ?

हताश आणि घामाघूम होऊन मी गाडीचा ac फुल्ल करून सीट रिकलाईन करून आता काय करायचं विचार करत पडलो. विचार करता करता कधी डुलकी लागली देव जाणे. जरा जाग आली तेव्हा सगळी कडे अंधार झालेला होता.

मी गाडी चालू ठेऊन तसाच डोळे बंद करून सीट वर आडवा पडून राहिलो. काय करावं काही सुचत नव्हतं.

मोबाईलला रेंज नाही, रेडिओ आणला नाही, चहू बाजूला वाळवंट, मध्ये अडकलेली गाडी. रेस्क्यू येई पर्यंत करणार काय ???

पण... पण... wait a minute... रेस्क्यू येईल कसा काय ? त्यांना कळविणार कोण? कळवलं तरी मी इथे आहे हे कसे कळेल?

स्टीफन काल रात्री घरी गेला. बार्ट, माझा टीम लीडर ट्रेनिंग साठी गेलाय तो कधी येणार माहीत नाही.इसिड्रो, माझा बडी सिस्टीम मधला बडी, याला मी सबखा 67 ला आलोय हे माहितीच नाही. यासीन आज संध्याकाळच्या फ्लाईटने रोटेशन साठी घरी जाणार. मी येताना बोर्ड वर फक्त सबखा 87 ची एंट्री केली आहे. जी इथून अंदाजे 12 किमी तरी असेल. मी मिसिंग असल्याची खबर यासीन ला कळून त्याने 67 चा रूट चेक करा सांगितल्याशिवाय कोणाला कळणार की मी इथे आहे.

आयचा घो.

आता मात्र माझी तंतरली.
जिवंत राहायचं असेल तर काहीतरी हालचाल करणं भाग होतं. आधी गाडीतला इमर्जन्सी बॉक्स बाहेर काढला.
सगळ्या गोष्टी एक एक करून चेक करायला सुरुवात केली. दोन स्निकर्स, पाण्याच्या अर्ध्या लिटरच्या 6 बाटल्या, मेडिकल किट, ग्लुकोजचा एक बॉक्स, कंपास, शिट्टी, स्विस नाईफ, टॉर्च, त्याचे सेल, आरसा, सुक्यामेव्याचे एक पाकीट.

हुश्श
हे एवढं सगळं मला तीन ते चार दिवस ऍक्टिव्ह ठेवायला पुरेसं होतं. कधी काळी केलेल्या डेसर्ट सर्व्हायव्हल ट्रेनिंगची रिविजन करायची वेळ आली होती.... जास्त हालचाल न करता पडून राह्यलो तर आठवडा भर तग धरू शकेन बहुतेक. किट बघून जरा उत्साह आला आणि ड्रायव्हर सीट वर बसल्यावर तोच भयानक रीतीने परत मावळायला सुरुवात झाली कारण पेट्रोलचा काटा 1/4th शिल्लक असल्याचा दाखवत होता. मी साईटवर येताना नेहमी टॅंक फुल्ल करायचो जो मी घाई घाईत आज केला नव्हता. पेट्रोल संपल्यावर बिना एसीची गाडी भट्टी सारखी गरम होईल. मी पॅक केलेले किट हिवाळ्यात एक वेळ पुरलं असतं. पण या उन्हाळ्यात बिना एसी मध्ये ते मला फारतर दोन किंवा तीन दिवस हिट स्ट्रोक पासून लांब ठेवेल. आणि तेवढ्या वेळात जर रेस्क्यू करायला कोणी आलंच नाही तर ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे! खतरनाक!
तुमचा स्वतःचा अनुभव आहे का?
उत्सुकता वाढली. पुढचा भाग लिहा लवकर.