ब्रह्मगिरी एक अविस्मरणीय अनुभव

Submitted by प्रशांत तिवारी on 26 October, 2017 - 13:35

मुळातच नोकरी करणारे म्हटले की हे plans क्वचितच सफल होतात,आणि ऐनवेळेस काही मंडळी बारगळणारी ही असतात...तसच आमच्या बाबतीतही हि योजना असफल होता-होता राहिली...भटकंती हि पुर्णांती सफल होण्यासाठी प्रत्येकाचाच उत्स्फूर्त प्रतिसाद हवा even हा अनुभव खूप जणांचा असेल तो नव्याने सांगत नाही...असो..दोन आठवड्यांच्या काथ्याकूट चर्चेनंतर, अगणित घेतलेल्या मीटिंग्स नंतर कुठेतरी जायच हे निश्चित होत बरीचशी संकेत स्थळ, आसपास असलेली ठिकाण वेळोवेळी search करून पालथी घातली आणि आमच्या अवाक्यातील ठिकाण म्हणून ब्रम्हगीरी फेरी किंवा पर्वत हे ठिकाण सगळ्यांच्या संगनमताने ठरवण्यात आल होत कारण जोडूनच सुट्टी असल्याने दुसऱ्या दिवशी शरीराला विसावाही भेटणार होता..ठरल तर..आम्ही शाळेतील ४ व २ मित्र असा सहा जनांचा आमचा चमु!
तर अशा प्रकारे जायचच या तीव्र ईच्छेने प्राथमिक माहिती काढण्यासाठी सुरुवात झाली..पहिला जो source होता तो जे आधी जाउन आलेत त्यांना त्या Trek विषयी माहिती विचारण्यात आली आणी नंतर आपले गूगलबाबा होतेच त्यात यूट्यूब वर एका group ने व्हिडियो upload केला होता तर त्यावरून आम्ही पार करु की नाही याचा अंदाज आला कारण कधीही चालायची सवय नसलेले आम्ही...तस बऱ्याच वेळा Trekking झालय पन तरीही मनात एक शंका...
रविवारचा दिवस ठरला होता आमच्यासाठी सुट्टीचा आणि एकदम योग्य दिवस. तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या आदला दिवस भरपूर गर्दी असणार ही कल्पना असल्याने मनाची तयारी करून गेलो.
सकाळी 5.30 ला निघण्याची वेळ दिलेली पण ती कुणीही पाळनार याचीही idea होतीच म्हणून भल्या पहाटे उठल्याबरोबर एकमेकांना फोनाफोनी झाली नशीब हेच कि त्यादिवशी कुणी plan चा पचका केला नाही.तरीआम्ही नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा 6 वाजता नाशिक त्र्यम्बकेश्वर ला रवाना झालो.
सकाळच रम्य वातावरण, मनात असलेली हुरहुर, ब्रम्हगीरी नाव आठउन मनात येणारी ती सात्विकता आम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ठ दिसत होती व गाडिमधे अखंड चालनार शिव स्तोत्रानी तर वातावरणात अजुन भारावलेपन आल होत. प्रत्येक जन trekking विषयी ज्याचे त्याचे अनुभव share करत होता. Group मध्ये ३ जन नवीन असल्याने त्यांच्याही trekking कथा ऐकताना मजा येत होती.सिन्नरचा आरशा सारखा झालेला नवीन रस्ता, भल्या सकाळी असलेली कमी रहदारी, या अश्या वातावरणात गाडी सुसाट वेगाने निघालेली. गाडी चालवायला आमचे विक्रांत सर असल्याने त्याच्या driving वर आमचा डोळे झाकुन विश्वास होता.
तर ठरल्याप्रमाणे तासाभरातच पहिला मुक्काम सिन्नरच "गोन्देश्वर" हेमाडपंथी पुरातन शिव मंदिर. हे १२ व्या शतकातील मंदिर म्हणून ओळखल जात जे आजतागायत आम्हाला माहित नव्हत पण काही दिवसांपूर्वी एका मित्राकडून समजलेल्या माहितीच्या आधारे प्रथम त्या मंदिरात दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. सिन्नरला प्रवेश केल्यावर पहिल्या चौकातून left ला आंबेडकर पूतळ्याच्या रस्त्याने सरळसोट सोप्पा रस्ता. गाडी थांबल्यावर अगदी दुरुनच पाहताक्षणी दिसलेल ते मंदिराच प्रवेशद्वार...आपसूकच मनातून एक शब्द आलेला वाsss! क्या बात है (आम्ही संगीतातील मंडळी दिवसभरात या वाsss! क्या बात है चा प्रयोग खुपदा करतो पण मनापासून.तो ही...) कोणार्क मंदिर(ओरिसा)ला जाण्याचा योग दोन वेळेस आला होता त्यामुळे मला तरी या मंदिरात कोणार्कची प्रतिमा दिसत होती.ज्या पर्वतावर आज चढाई करायची होती त्याची सुंदर सुरुवात गोन्देश्वरच्या दर्शनाने व्हावी यापेक्षा दूसरा दुर्मीळ योग कुठला असणार!त्या दक्षिणाभिमुख दरवाजातून प्रवेश करताना भली मोठी प्रशस्थ अशी त्या मंदिराच्या भोवतालची जागा दिसत होती.मंदिराचा कोपरानकोपरा कलाकुसरीने भरलेला दिसत होता, तेथिल खांबांवर देवी देवतांच्या मुर्त्या कोरण्यात आल्या होत्या.पण बाजूचा परिसर मात्र विपन्नावस्थेत असल्याने थोडी निराशाच पदरी आली.सगळ्या रिकाम्या परिसरात बिनकामाचे गवत वाढीस लागले होते.पण या मंदिराचे फोटो पाहिल्यास त्याची भव्यता लक्षात येईल.
थोड वर चढून मंदिराच्या मुख्य दरवाजातून मंदिरात प्रवेश केला तर ..
"मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची स्वयंभू पिंड, व मनाला भावनारी अशी शिव-शांतता होती".वेळ सकाळची पावणे सात ची असल्याने आमच्या व्यतीरिक्त कुणीही नव्हतं पण श्रावण महीना असल्याने गाभाऱ्यात ३ ते ४ पुजारयांची साग्रसंगीत पूजा चालु होती.माझ्या मनात मात्र एक शल्य बोचत होत की एवढे वर्ष संगमनेरला राहतोय पन या मंदिराची माहिती एवढ्या उशीरा मिळावी. पण ती वेळ जास्त विचार करण्याची नव्हती तर ते पवित्र शिवलिंग डोळ्यांत साठवण्याची होती.ते मंत्रोच्चार पुजाऱ्यांच्या आवाजातील तो विशिष्ठ tone, मंदिराच अप्रतिम नक्षीकाम, पूजा चालू असताना घंटिचा किनकिननारा आवाज विश्वेश्वराच अस्तित्व जाणवून देत होता.महादेवाला सर्व प्रकारची ताल वाद्य प्रिय आहेत तर अस वाटल कि काळी पाचचा तानपुरा लावून धीरगंभीर खर्जातील पखवाजाचे चौतालाचे बोल कानी पडावे.
धा धा दिंता | तीट धा दिंता | तीट कत | गदी गन |
आणि यां बोलांणी तो परिसर निनादून जावा...
आमच्यातील एक-एक जन गाभाऱ्यात जाउन मनोभावे त्या गोन्देश्वरच्या माथ्यावर आपल डोक टेकवत मनातील आंदण मागत होता.या वेळी माझ्या मनात मात्र आमच्या विद्यार्थ्यानी म्हटलेली "शिव बोला शंकर बोला", "मागे उभा मंगेश" ही गाणी हळूच तरळून गेली.हो तर मग! होतीच ती गाणी तिथल्या वातावरणाला साजेशी अशी. गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर बाजूला असलेली चार छोटी मंदिरे होती त्यांचेही थोडक्या वेळेमध्ये दर्शन घेतले.मंदिर परिसरात ८-१० फोटो, सेल्फी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो कारण परतीच्या मार्गाला लागून "गोन्देश्वर" करण अशक्यप्राय होत, येताना किती त्राण असले असते याची साऱ्याना कल्पना होती. या प्रवासातील अखेरचा गोन्देश्वराला प्रणाम करून ब्रम्हगीरीला रवाना झालो.कारण आता उशीर करून अजिबात चालणार नव्हता.ब्रम्हगीरी चा विशाल पर्वत मनाला खुनावत होता.

सकाळी ७.३० ला सिन्नर सोडून नाशिक साठीच्या प्रवासाला लागलो.. अजूनही ते मंदिर, पिंड डोळ्यासमोरून जात नव्हते. आता रस्त्यात रहदारी दिसत होती आता गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता नाशिकचा रस्ता नेहमीचा असल्याने किती वेंळ लागेल याचा exact अंदाज येत होता...एक दोन जणांनी तर insta आणि whatsapp वर गोन्देश्वराचे फोटोही अपडेट केले होते. तंत्रज्ञानाने आपल्याला हि त्याच्या सोबत धावायला भाग पाडले होते...त्र्यम्बकेश्वर जवळच श्री हनुमानाच जन्मस्थान “अंजनेरी” हिआहे पण एका दिवसात दोन्ही होणार नाही हे पुरत जाणून होतो तेवढ्या वेळेत नाशिक रोड कधी आले समजलच नाही.एव्हाना गाडीतील गाणीही बंद केली होती आणी शोध सुरु होता छानशा हॉटेलचा कारण या सगळ्यात पोटामध्ये भुकेचा डोंब कधी उसळला कळलच नाही.आता “पेटपूजा” कारणही गरजेच होत.मेन नाशिक, गडकरी चौक, पार झाल होत...मजल दरमजल करत नाशिक संपून त्र्यम्बकेश्वर चा हमरस्ता सुरु झालेला पण मनाजोगत हॉटेल भेटेचना.त्र्यम्बकेश्वर अवघ १२ की.मी.असतानाच रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटेखानी पण टुमदार हॉटेल भेटल(हो घर छोटेखानी, टुमदार असत माहितीये पण माझा नवीन लीहायचा प्रयत्न म्हणून हॉटेलही टुमदार आहे समजून घ्या:-)
सहसा आपला समज असतो एखाद्या हॉटेलला कुणी चिटपखारुही नसेल तर आपली सहसा जायची इच्छा होत नाही पण आम्ही ते ठिकाण पाहून गाडी तिथेच थांबवायचा निर्णय घेतला...सकाळची पावने नऊ ची वेळ त्या हॉटेल मध्ये एक ५०-५५ वय असलेल जोडप ही बसलेल होत.आता हॉटेल चांगल की नाही हे निकष ठरवायच्या आपणच शोधून काढलेल्या काही पद्धति त्यातील काही पुढिेलप्रमाने... जी मंडळी खातायेत त्यांच्या ताटातुन गरम वाफा, पदार्थाला घमघमाट येतोय का?,सर्व हॉटेल full भरूनही आपल्याला बसायला टेबल मिळेल का व स्वछता पुरेशी आहे का?कुठे कांदा लिंबू दिसतोय का?(आपल्या संगमनेरला प्रत्येक हॉटेलला ही प्रथा असल्याने जगात सगळीकडे हेच असेल असा आपला गोड समज)बहुतेक हा शेवटचा मुद्दा असावा वेटर ने पाच ही हाताची बोटे पाण्याच्या ग्लास मध्ये बुचकळून नाही आणली तर हॉटेल उत्तम आहे समजावे.
तर कुठे होतो मी...हो ते ५०-५५ वयाच जोडप...तर हॉटेल कस आहे हे पाहण्यासाठी आमच्यातील एक सर आत जाउन आले ते आल्यावर त्यांनी जे सांगितले त्यातील दोन्ही प्रतिक्रिया माझ्या निकशाषी जुळणाऱ्या होत्या.गरम वाफा आणी कांदा लिंबू. तर ठरल सकाळची न्याहारी इथेच करायची पटापट गाडितन उतरून आत एंट्री केली. ७-८ जण एकत्र बसतील असा एक टेबल होता मी विचार केला आपन येणार म्हणून लावला असणार.आमच्यातील एकाने गरम काय? असा प्रतीसवाल हॉटेल मालकास केला. खरतर गरम वाफा पाहुनच आम्ही इथे entry मारली होती हे त्याला माहित नसाव (मारली हा संगमनेरी शब्द).तर भजे, मिसळ-पाव, वडा-रस्सा या पदार्थांची नाव सांगितली.
हि नाव ऐकताच बाकी काय आहे खायला हे विचारायची गरजच नव्हती. संगमनेर मध्ये डिसेन्ट मिसळ डोळ्यात पाणी आणणारी म्हणून प्रसिद्ध आहे. तर या दुकानातील मिसळ कशी असेल याची फारशी कल्पना नव्हती तर कुणी मिसळ तर कुणी वडा रस्सा ऑर्डर केला. ५ च मिनिटामध्ये सर्व टेबलवर हजर होत एक्दम quick सर्व्हिस...वा ssss पाहिल्यावर समजलं कि हा काळ्या रस्स्यामधला सारा प्रकार होता..त्याच्या नुसत्या वासानेच मनात तिखट गुदगुल्या झाल्या "त्या मिसळ वर भुरभुरलेला छोटा कांदा,छोट्या डिश मध्ये कोपऱ्यात पडलेली छोटी लिंबाची फोड,थोडीशी कोथींबीर ची झालर पोह्यावर पसरवतात अगदी तशीच, गरमागरम वाफ आणि त्याचा येणार घमघमाट मन तृप्त करत होता ते ही खायच्या आधी ..मग काय सर्व जण तुटून पडले ताव मारण्यासाठी प्रत्येकाची खायची पद्धत निराळी होती कुणी छोटे छोटे घास आत टाकून चटणी सारख तर कुणी अर्धा पाव त्यात भातासारखा चुरून वरून भरपूर रस्सा घेऊन खाणारे...तर तो रस्सा बोटांना लागणार नाही हि काळजी घेऊन दोन्ही चमच्याची कसरत करून खाणारे ...आता मात्र त्यातील झणझणीत पणा सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता कुणाला घाम तर कुणाचे तिखट लागल्यावर येणारे सुस्कारे, तोंडाचा चंबू होऊन येणारे हुश्श-बीश्श..त्यात जास्तीच्या लिंबुची ऑर्डर कधीच गेलेली...खिशात लपलेले रुमाल आता बाहेर डोक काढून आमच्यावर फिदीफिदी हसतायेत काय अस वाटत होत...एव्हाना आम्हाला ही आता खात्री पटली आम्ही एक्दम योग्य ठिकाणी आलो होतो..भन्नाट,तर्रीबाज, चाबूक,कडक हि सारी विशेषणे कमी पडली होती...तर सगळ्यांचं आवरत आल होत २-३ पावामध्ये सार्वजन गारद झाले होते...त्या आधीच कुणीतरी कट चहा हि सांगितला होता., त्यशिवाय या साऱ्या खाण्याला काहीच अर्थ राहिला नसता..त्यात पावसाळी वातावरण म्हटल कि फक्क्ड आल्याचा, वाफाळलेला चहा हा आलाच...व या तिखट मिसळ नंतर त्या चहा चा पहिला घोट जिभेला होताच जे चरचर झाल्याची felling येते ती अप्रतिम आणि तुफान कि आपोआप डोळे मिटले जातात तो पहिला घोट पूर्णपणे जिभेला समजण्यासाठी...तर अश्या प्रकारे आम्ही मिसळ पुराण संपवून शेवटच्या डेस्टिनेशन कडे निघालो. जे कि त्यासाठीच हा सारा अट्टहास चालवला होता.
सगळ्यांची पोटे तडस लागोस्तर तुडुंब भरली होती.अवघ १२ कि.मी अंतर बाकी होत. दुरूनच अंजनेरी व रस्त्याच्या कडेला ब्रम्हगिरी ची रांग दिसायला सुरुवात झाली होती.ते ब्रम्हगिरी च रौद्र रूप डोळ्यात साठवायला नजर हि कमी पडत होती. मनात विचार आला याच्या वर आपल्याला जायचंय? नाही म्हणायला थोडी धडकी भरलीच ..आता बऱ्यापैकी गर्दीच्या इलाक्यात प्रवेश झाला होता बऱ्याचशा आमच्या सारख्या हौशी गाड्या, जागोजागी असणारे उभे असणारे पोलीस, तुरळक साधूंचं होणार दर्शन, छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकान उघडण्याची लगबग ...एकंदरीत ते वातावरण आमचा ऊत्साह वाढवण्यास पुरेसा होता.
जवळपास ९.३० च्या पुढे आमचा त्र्यम्बकेश्वर मध्ये प्रवेश झाला होता...
ज्या ठिकाणी पार्किंग ची व्यवस्था होतीय तिथेच सुरक्षित गाडी पार्क करायचा विचार झाला. प्रत्येकानी सोबत जेवण घेतलेली एक सॅक, पाणी बॉटल्स, गॉगल्स आणि किरकोळ साहित्य असा लवाजमा घेऊन आम्ही एकाला रस्ता विचारत वाटेला लागलो होतो. त्या सॅक चा काय गोंधळ झाला तो पुढील काही वेळात तुम्हाला येईल. थोडं पूढे गेल्यावर त्र्यम्बकेश्वरच मंदिर होत तिथे बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण आत जाऊन दर्शनाचा विचार झाला असता तर पुढे जाण्यास उशीर होणार होता. तर छान गप्पा मारत सफर सुरु झाला होता. खूप वर्षाने आलो असल्याने झालेला खूप सारा बदल डोळ्यास दिसत होत होता. जाताना कुशावर्ताचे दर्शन घेऊन चालायला सुरुवात केली . त्या निमुळत्या रस्त्याच्या कडेला प्रसादाची दुकान सजली होती, तर कुठे धूप, अगरबत्ती चा दरवळ सुटला होता, मधेच शंकराचं माहात्म्य सांगणार सिडीच्या दुकानातील संगीत कानी पडत होत. तर कुठे एखाद कुत्र पायात घुटमळत होत, कुठूनसा कानात मंदिरातील मंत्र पुष्पांजलीचा आवाज कानी येत होता, तर काही मंडळी धोतर,वस्त्रे खरेदी करायच्या लगबगीत होती कारण नारायण नागबळी , कालसर्प विधी सर्व प्रकारच्या पूजा या ठिकाणी होत असल्याने नेहमीच हा भाग गजबजलेला असतो तसेच नानाविध पद्धतीने रेवड्या, खडीसाखर, या साऱ्यांची कलात्मक रीतीने मांडणी केली होती.लहानपणी हि सर्व मांडणी पाहूनच तो प्रसाद घ्यायचा मोह व्हायचा पण वाढत्या वयाबरोबर आवडी निवडी बदलतात तसंच काहीस वाटतं होत. जुने झालेले वाडे,त्यांच्या वरचे नक्षीकाम, त्यांची कौलारीं छपरे लक्ष वेधून घेत होती तेथील धार्मिक वातावरणाची साक्ष देण्यास पुरेशी होती...आता काहीसा चालताना चढ लागत होता .हळूहळू तो परिसर मागे पडून मूळ रस्त्याला लागलो होतो.
रविवार असूनही आमच्या सोबत बरीचशी अनोळखी माणसे ब्रम्ह्गीरीसाठी आली होती.सर्वप्रथम जातानाच "अक्षय जलकुंड" पाहण्यास मिळालं .गौतम ऋषी आणि अहिल्या देवी यांची या मागची कथा हि प्रसिद्ध आहे.असं म्हटलं जात कि हे कुंड कधीही रिकामं होत नाही बारा महिने यात पाणी असत.अश्या काही गोष्टी माणसाला निसर्गाच्या या चमत्कारावर विश्वास ठेवण्यास भाग पडतात. तिथे विज्ञानही साथ देत नाही. त्या ठिकाणचं चं दर्शन घेऊन चढाला लागलो होतो. थोडं पुढे गेल्यावर एका ताईंनी त्यांच्याकडे असलेली फुटाणे व शेंगदाण्याची पाकीट विकत घ्यायचा आग्रह केला, त्यांना का? असं विचारले असता वर माथ्यावर बरीचशी माकडे आमची वाट पाहत होती हे समजलं. तर त्यांच्या साठी नाही पण आम्हाला ते काही करू नये म्हणून हे घेणं भागच होत.
आता खऱ्या अर्थाने आमची चढाई सुरु झाली होती तब्बल १०.३० वाजता... तसा आमच्या नियोजनापेक्षा हा बराच उशीर झाला होता.पण तरी ते चालणार होत. अक्षय जलकुंड पाहत पहात पायथ्याला पोहोचताच भली मोठी उंच होत गेलेली पायऱ्यांची रांग आम्हाला दिसली अस वाटल किती आम्हाला चिडवतीये कि मला पार करून तुम्हाला वर जायचंय...पण आम्हीही कमी नव्हतो ते पाहून आमच्याही मनाची तयारी झाली होती... पण ते उसण आणलेलं अवसान जास्त वेळ टिकणार नाही ते आम्हाला जरा वेळातच समजणार होत ...दोन तीन पायऱ्या पोहोचताच वर हिरव्या रंगाच्या पाटीवर पर्वताचा नकाशा होता.आमच्या पैकी एक दोघांनी पटकन फोटो काढून घेतले कारण वर याची मदत होणार होती.सगळे जण सोबत जाऊ अस ठरल होतच पण काही जन उत्साहाच्या अविर्भावात आम्ही पट्टीचे गिर्यारोही आहोत असा आव आणून आम्हाला खुपदा ओव्हरटेक करू पाहत होती...पण त्या पायऱ्यांची रचना अशी होती कि एक पायरी चढली कि दुसऱ्या पायरीसाठी एक सेकंद वेळ मिळायचा तर ते बर वाटत होत पण जसजस ते पार होऊ लागल तसा पायऱ्यांचा जमिनीशी असलेला सपाट पना जाऊन जास्तीचा चढ पायांना जाणवत होता जस कि त्या पायऱ्यांना खालून कुणीतरी टेकू लावलाय व पर्वतावर पोहोचण्यास मदत करताय.
खरतर ट्रेकिंग विषयी ज्या गोष्ठी ऐकिवात होत्या त्या आता आठऊ लागल्या होत्या कि trekking हे नेहमीच प्रेरणादायी आणि धाडसाच हि असत..अस नाही कि इतर जातायेत म्हणून आपल्याला जायचय, मजा करायचीये, स्वतःला याची आवड आहे का ? तत्पूर्वी असा सवाल प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.प्रत्येक गोष्ठ करताना त्याबद्दल नितांत आदर असला कि खूपशा गोष्ठी मार्गी लागतात. इथे प्रत्येक पावलागणिक स्वतःला पुढे ढकलाव लागत, तेथील वातावरणाशी जुळून घ्यावे लागते आणि अति आत्मविश्वास हि खुपदा महागात पडू शकतो कधी पावल थांबतात पण स्वतःच स्वतःला तू करू शकतो , थोड राहिलय, हे म्हणून पुढे सरकाव लागत.कधी निसर्गाची साथ भेटते तर कधी नाही. यात तुम्हाला थोडही बेजबाबदार आणि आळशी राहून चालत नाही. यात तुमचा एक चुकीचा आणि घाईत घेतलेला निर्णय धोक्यात आणू शकतो..
पण त्या दिवशी निसर्ग आमच्यावर मेहेरबान असणार अस भासत होत कारणही तस होत भर पावसाळ्यात आम्ही आलो होतो पण पावसाचा एक टिपूसही दिसत नव्हता. मनातून वाटत होत हलकासा पावसाचा शिडकावा येऊन भिजत याव पण तस काही झालच नाही पण जसजस वर जात होतो चढाई अजून कठीण होत होती आणि पायऱ्याही निमुळत्या होत गेल्या अशात भर पावसात आम्हाला गाठल असत तर वर पोहोचण अजून जिकरीच होणार होत.आमच्यातील काही जण मधेच थांबून ५ मिनिट विश्रांती घेत होती एव्हाना शरीरातून घामाच्या धारा निथळू लागला होत्या आणि हृदयात चालणारी स्पंदने हि ठळकपणे आमची आम्हाला ऐकू येत होती. आपली हि उडालेली भंबेरी नंतर हि अनुभवता यावी म्हणून या अवस्थेतही इच्छा नसताना सेल्फ़ि काढत होतो. मघा म्हटल्याप्रमाने पाठीवरच्या sack जास्तच जड वाटू लागल्या होत्या.काही जाणाऱ्या लोकांनी सल्लाही दिला वर भरपूर माकड आहेत सोबत काही घेऊन जाऊ नका पण आम्ही हो म्हणून मनातून दुर्लक्ष करत होतो कारण वर जायला अजून किती वेळ याचा कुणालाच अंदाज नव्हता आणि खाण्यापिण्याच्या साऱ्या वस्तू सॅक मध्ये होत्या तर ते सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्यायाच नव्हता. तरीही आमच्यातले हट्टेकट्टे काही जड सॅक आनंदाने स्वताच्या पाठीवर घेत होते. आता कुठे पाण्याच्या बाटल्या बाहेर निघत होत्या व पाणी पिताना शर्टवर ते सांडतय याच हि कुणाला भान नव्हत. जाताना कडेला बसलेली लोक शरबत, काकड्या, चहा घेण्याचा आग्रह करत होती पण तूर्तास तरी थांबून ते खाण्याचा विचार आमच्या मनात नव्हता.
आमच्या आधी वर जाऊन येणाऱ्या लोकांना आम्ही आशेने विचारत होतो अजून किती लांब आहे.कारण पायात गोळे यायला सुरुवात झाली होती.व पावलेही मंद गतीने चालत होती. एकमेकांना चालण्याच बळ देऊन आगेकूच करत होतो. इतक्या वेळात आमच्यातील एक दोघ खरच थकून गेले होते, हा हि निर्णय झाला होता २ जण खाली थांबतील बाकी वर जाऊन येतील पण म्हणतात कुणीतरी प्रेरित करणार असेल तर हनुमानासारख १२ हत्तींच हि बळ येत थोडी विश्रांती घेऊन सर्वजण नव्या जोमाने परत चढायला लागले.सभोवतालचा परिसर जास्तच रम्य होताना दिसत होता कुठे वर डाव्या बाजूला पाण्याचे छोटे खळाळणारे छोटे धबधबे तर उंचून डोंगर कपारीतूनअंगावर पडणारे पाण्याचे तुषार खाली येऊन आमच्या स्वागतासाठी येत होते तर आमच्यासारखि काही कट्ट्यांवर थकून-भागून आलेली मंडळी फतकल मारून बसली होती...कुणी वेळ काढण्यासाठी काकडीचे बकणे तोंडात भरत होती, तर कुणी शेंगांची टरफल काढण्यात दंग होती...आता आम्हालाही शरबताचे ग्लास पोटात रिते करायची घाई झाली होते कारण एवढ चालून आणि घाम येऊन शरीरातील पाणी नक्कीच कमी झाल होत नंतर शरबत पिल्यावर कुठूनशी अद्भुत शक्ती संचारावी तसे आम्ही ताजेतवाने झालो होतो.पण अश्या वेळेस पोट भरून पाणी पिणेही योग्य नाही.
आमच्या अंदाजाप्रमाणे ५० % चढाई पार झाली होती मध्येच सपाट रस्ता येऊन परत पायऱ्या जास्त वर जात होत्या व सर्व शक्ती ते चढण्यात खर्च होत होती.
खालून वर पर्वतावर नजर फिरवली असता मुंग्यासारखे लोक एका कपारीतून वर जातायेत हे चित्र दिसत होत आम्हालाही तिथूनच जायचं होत.हे मुंग्यांसारखे लोक पाहून त्या पर्वताची भव्यता लक्षात येत होती.कुणीतरी एका केकचा अर्धा भाग कट करावा तसा एका बाजुला तो अर्धा पर्वत दिसत होता आणि खोल दरी व मध्ये तयार केलेला वर होत गेलेला निमुळता रस्ता ज्यात रस्ता एकच पण मध्ये लोखंडी पाइपची रोलिंग जाणाऱ्यांसाठी व येणाऱ्यांसाठी ठेवलेली होती. हा विचार चालू असताना पुढे पुढे सरकत होतो.थोड अंतरावर पुढे जाताना उजव्या साईडला सुंदर छोटासा पाण्याचा झरा खळाळत उंचावरून खाली येत होता तर त्यात सगळयांनी आपले चेहरे थंड पाण्याने स्वच्छ धूऊन घेतले व तो गारवा अनुभवून त्या कपारीच्या टोकाला चालते झालो.

आता समजून येत होत मुंग्यांसारख्या लोकात आपलीही गणना होणार आहे.अंगात त्राण नसून हि हे सर्व पाहताना अंगावर शहारे आल्यावाचून राहत नव्हत.हा छोटा मार्ग निर्माण करण नक्कीच सोप्प काम नव्हत त्या काळी. हळुवारपणे आपला तोल सावरत लोखंडी रोलिंग ला पकडून एक एक पाय जपून ठेवत सर्वात अवघड मार्ग सुरु झाला होता.सगळच अगदी थरारक वाटत होत. खाली आम्ही जेथून वर आलो होती ती जागा एखाद्या कणा सारखी भासत होती. यावरून अंदाज आला होता बऱ्यापैकी आम्ही वर आलोय.आमच्या सोबत ३ वर्षाच्या लहानग्यापासून ते ७५ वर्षांच्या आजींपर्यंत सर्वजन होते त्यांचा उत्साह हा आम्हाला नक्कीच लाजवण्यासारखा होता.

पर्वताच्या त्या कपारीतून वाट अजून वर जात होती काही ठिकाणी थोड्या पावसामुळे पायऱ्या हि निसरड्या झाल्या होत्या त्यावरून सर्व शक्ती पणाला लाऊन वर जाण जिकरीच होणार होत.दोन्ही कपारीच्या भिंती पूर्णपणे शेवाळून गेल्या होत्या.. कुठून काही पाण्याचे थेंब अंगावर येत होते व हा त्रास कमी व्हावा म्हणून काही जन “ हर हर महादेव “, बम बम बोले चा नारा करत होते.या ठिकाणी खाली बसून विश्रांती घेण्याचीही सोय नव्हती. कुठेतरी पक्की पायरी तुटून अर्धी पायरी असल्याने त्यावरून जपून जाव लागत होत. सार वजन त्या रोलिंग वर देऊन थोड तिरक चालल्याने श्रम कमी लागत होते.मध्येच एखाद्या तुटलेल्या रोलींगला एकत्र बांधनारी कुजलेली तात्पुरती सुतळीही दिसत होती.. बापरे! हे असं पण आहे तर असा विचार करून जास्त रोलिंगवर अवलंबून न राहता बराचसा भार स्वतःवर दिला, तर कुठे त्या वाटेतील दगडी सुळके आsss वासून उभे होते.जवळपास अर्धा तास सारा हा थरार अनुभवत होतो. खरच सलाम होता त्यांच्या कार्याला ज्यांनी या दगडातून पायऱ्या आणि वाट चक्क कोरून काढली होती ती हि आभाळाएवढ्या उंचीवर कसल्याही आधुनिक तंत्रा शिवाय...आताशा जरा confidence हि आला होता पण वर पाहिलं तर आता माकडांची वर्दळ सुरु झाली होती. जाताना तेथील एका भिंतीमध्ये बजरंगबलीची स्थापना केलेली ५ फुटांची केशरी शेंदुरामध्ये मढवलेली मुर्तीही होति...आणि त्यात त्यांच्या मावळ्यांना (माकडाना) काही फुटांवरून चुकवून जाण म्हणजे मोठं दिव्य करण्यासारखंच होत ठिकठिकाणी ती आमच्या स्वागताला आहेत असा आमचा गोड समज लवकरच दूर झाला. एखाद्या कठड्यावर निवांत बसून त्याचं खायचं काम चालू होत काही तर चक्क माणसांची खिसे तपासणी करायलाही कमी करत नव्हती. खालून मिळालेल्या सूचनेप्रमाणे आमच्या हातात आम्ही काहीच नव्हत घेतल.पण सॅक मात्र पाठीवर होती.
पण खालून येताना आम्हाला घाबरवण्यात आल होत कि ती खिशात हाथ घालतात कदाचित ते खरंही असेल पण त्या दिवशी त्यांनाही आमच्या खोड्या काढण्याचा कंटाळा आला असावा. किती झाल तरी पूर्वजच आपले कसलाच त्रास न देता त्यांच्या राज्यातून जायची परवानगी आम्हाला मिळाली होती.पण त्यांच्या समोर आम्हाला आमच्या मोबाइल मधून क्लीकक्लीक करायची हिम्मत नाही झाली.होणार तरी कशी साक्षात बजरंगबलीचे अवतार होते ते..ज्या ठिकाणावून जात होतो तिथे उन्हाचा लवलेशही नव्हता.आता आमची स्थिती अशी होती कि एक पाऊलही उचलायचं त्राण अंगात नव्हतं.तर अधूनमधून २-३ ठीकाणी सपाट रस्ता, छोट हॉटेल आल कि मोठा stop होऊन परत चालायला सुरुवात व्हायाची पण हळूहळू आता पर्वत जवळ आल्याची लक्षणे जाणवत होती. वर जाताना पायऱ्यांचा ओलसर पणाही कमी झालेला दिसत होता...वर जाताना सूर्याची कवडसे येऊन त्या अंधाऱ्या पायऱ्यांमध्ये जीव आला होता...वरून माणसांच्या आनंदी कुजबुजण्याची चाहूल लागली होती बहुतेक आमच्या आधी गेलेले जरा विसावा घेत असावे...हो! आम्ही आमच्या इच्छितस्थळाच्या अगदी जवळपास होतो. जस अंधाऱ्या खोलीतून बाहेर आल्यावर निसर्गाचा हळुवार प्रकाश हि काही काळ त्रासदायक वाटतो तसेच काहीस झालं होत...आता पायऱ्यांची जागा संपवून पठारी भाग दिसत होता वर छोटासा डोंगर आणि वर ब्रह्मगिरीची चादर जमिनीवर अंथरलेली पाहावयास मिळणार होती...२- २.३० तासाच्या चढाई नंतर गड पार केल्याचा आनंद मिळणार होता.. वाssss पण तो आनंद शब्दात वर्णन करण्यासारखा नव्हताच...होता तो फक्त अनुभवण्याचा. हा शेवटचा टप्पा म्हणून सगळ्यांनी एका ठिकाणी बसायचा निर्णय घेतला होता व थोड्याच वेळात फोटोग्राफी ला सुरुवात झाली होती...एवढ्या वेळ मोबाईल खिशात राहून ते हि बिचारे गुदमरले असावे. पाण्याच्या बॉटल्स काढून प्रत्येक जण जिभेची तृष्णा शांत करण्यासाठी गटागटा पाणी पिण्यात मग्न होता.आणि म्हणता म्हणता एकाने फोटोसाठी घेतलेली पोझ सारेच कॉपी करू लागले कारण इतका थकवा आल्यानंतर नट-नट्यासारखी पोझ देणं अर्थातच शक्य नव्हतं. त्या होतो मध्ये येणारी हिरवाई प्रवासाचा सगळं शिण दूर करू पाहत होती.

१५ मिनिट झाल्यावर तो छोटा डोंगर पार करून जायचा निर्णय घेऊन जो तो त्याच सार सामान सांभाळत पायवाटेने स्वतःची काळजी घेत वर सरकत होता.मध्येच पायवाटेत खाली छोटी पांढरी फुले आमच्या वाटेत उभी राहवून जणू आमच्या साठी स्वागतच ताट घेऊन उभी होती. जी कि आपल्या भागात आपल्याला कधीच दिसत नाही.कशी दिसणार? स्वर्गीय आनंद ज्या-त्या ठिकाणीच मिळतो.तेथील लालसर मातीचा हलकासा सुंगंध मन मोहून घेण्यास पुरेसा होता. कडेला फळे , फुले, विकणाऱ्यांची गर्दी वाढत होती. जस गावात शिरल्यावर लाईटचे खांब आपण गावात प्रवेश केलाय हे सांगतात तसच काहीस विक्रेत्यांच...जवळपास दुपारचे १२ वाजले होते पण इतक्या वर हि चढाई करून आल्याचा थोडाही थकवा मनाला शिवत नव्हता.हवेतील गारवा मनाला आल्हाददायक करणारा होता.आणि १० पावलावर वर जाऊन त्या मोकळ्या अश्या पठारावर पोहोचलो होतो. "ब्रम्हगिरी”.
या क्षणाला पं. भीमसेनजींच्या २ ओळी मनात येऊन गेल्या आणि त्या खूप जवळच्या हि वाटल्या...
“ भाग गेला, क्षीण गेला,
अवघा झाला आनंद,
आता कोठे धावे मन “
ज्या ठिकाणी साक्षात महादेवांचा पदस्पर्श होऊन पावन झालेली भूमी म्हणून तिचा उल्लेख आजही केला जातो ते "ब्रम्हगिरी ".वर पाऊल ठेवताच मध्ये विशालकाय पर्वत आणि त्याच्या चहूबाजूंनी वेढलेल्या त्र्यम्बक च्या पर्वतरांगा व ज्या पठारावर आम्ही नुकतेच उभे ठाकले होतो त्या ब्रम्हगिरीने त्याच्या अंगावर निसर्गाचा हिरवा शालू ल्यायला आहे इतकं सुंदर ते रुपडं दिसत होत.आजूबाजूला दुपारच्या प्रहरी हि बरीच गर्दी होती.वर निळशार आकाश आणि खाली हिरवाईने दाटलेला फक्त निसर्ग नि निसर्ग...आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता."आभाळ ठेंगणं होणे " हि म्हण आज प्रत्यक्षात अनुभवत होतो काही अंतर चालून गेल्यावर त्या माथ्याच्या हिरव्या शालूवर अंग टाकायचा मोह आम्हाला खरच आवरला नाही साऱ्या सॅक बाजूला टाकून तिथेच आडवे झालो..त्या मोकळ्या आभाळाखाली आणि अंथरून म्हणून धरणीमातेचा होणारा स्पर्श यामुळे कुठल्याश्या नवीन जगात प्रवेश केल्याची अनुभूती होत होती.वर येताना घामाच्या धारांमध्ये जी अंघोळ झाली होती इथे आल्यावर या ठिकाणची मंद वाऱ्याची झुळूक सुखावून टाकणारी होती हा क्षणाचा विरोधाभास अनुभवण्यासाठी जी पायपीट झाली होती ती सार्थकी लागली होती...काही वेळातच सर्व जण Normal होऊन काही जण त्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आसपास फिरून ते मनोहर रूप अनुभवत होते..हळूहळू पुन्हा एकदा फोटोसाठीच्या पोझ देण्यास सुरुवात झाली आता मात्र आयुष्यात आठवल्या नसतील तितक्या करामती तिथे सुचत होत्या.ज्या पठारावर आम्ही होतो त्याच्या डाव्या बाजूला खाली जाऊन ब्रम्हगिरी च मंदिर होत त्या ठिकाणी जायचं अजून बाकी होत. खाली जाण्याचा सगळा रस्ता उतरणीचा असल्यामुळे त्यामुळे खूप जपून चालाव लागणार होत . एकमेकांच्या आधाराने तो रस्ता उतरण्यास सुरुवात केली होती...पण घसरण असल्याने एक पाय जमिनीवर स्थिर करून दुसरा टाकावा लागत होता.खाली जाताना बऱ्यापैकी गर्दी दिसत होती.तर मंदिरात प्रवेश न करता सरळ गोदावरीच्या उगमस्थानाजवळ गेलो.बऱ्याच दुकानांची रेलचेल होती.आपण आज एका चढाईत गारद झालो होतो पण हि दुकानदार मंडळी कस करत असतील या विचाराने अंगावर काटा आला..असो..एक महादवाचं मंदिर होत तर एक चक्रधर स्वामींचं व शेजारीच औदूंबरच झाड होत.यामागे एक आख्यायिका प्रसिद्ध आहे गौतम ऋषी आणि अहिल्या देवींनी गो हत्येचं पातक धुण्यासाठी या वृक्षाखाली भगवान महादेवाची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतलं होत. व त्यांच्या जटांमधून गंगेच्या रूपात गोदावरीचा उगम झाला. तेथील स्थानिक पुजारी गोदावरीचे पाणी काढून आपल्या हस्ते पूजाही जरून घेतात.आणि या ठिकाणी हि माकडांचा वावर कमी नव्हता. वर येताना जेवढा नव्हता तेवढा सारा इथे होता.
आता ज्या आकर्षणापोटी या ठिकाणी आलो होतो ते ठिकाण म्हणजे शिवजींनी त्यांच्या जटा आपटल्या ते ठिकाण पर्वताच्या अगदी उजव्या बाजूला हे ब्रम्हगिरी मंदिर सोडल्यावर सरळ पुढे. तसा हा रस्ता सरळ होता त्यामुळे अगदी आरामात माकडांच्या करामती पाहून चालत होतो. त्यांची छोटी छोटी पिल्ल ही त्या पर्वताच्या कडेला बिनधास्त वावरत होती.. त्या मंदिराचं बाहेरच बांधकाम अलीकडंच असावं असं जाणवत होत पण आत नक्की कस असेल याची उत्सुकता काही स्वस्थ बसू देत नव्हती. या ठिकाणी जास्त रांगा नव्हत्या तर लगेच आत जायची संधी मिळाली. आत प्रवेश केल्यावर थोड्या असलेल्या गर्दी मुळे पाहता नाही आलं पण जवळच एक हातभर पाण्याने भरलेले दोन गोल मोठे खड्डे होते ज्या ठिकाणी शिवजी बसले त्या ठिकाणी त्यांच्या गुडघ्यामुळे तो तयार झाला होता.यावरूनच त्यांच्या विराट रूपाची कल्पना आली होती तर तिथे एक आजीबाई होत्या कदाचित पूजेचं काम करत असाव्यात.थोडं पुढे गेल्यावर ते ठिकाण नजरेस पडलं.जे ते पाहता होतो आम्ही सर्व, ३ ते ४ फूट रुंदी आणि आडव्या बाजूला ५ ते ६ फूट लांब त्या खुणा दगडावर झाल्या होत्या.डोळे त्या एकाच ठिकाणी स्थिरावले होते, त्या शिव जटांच मनोभावे दर्शन घेतले...मनात विचारमंथने वेगानी फिरत होती...मनातील हे प्रश्न उलगडण्यासाठी तिथे कुणीच नव्हतं हे कस शक्य आहे, कधी, केव्हा? त्या कमी वेळेत जमतील तितके फोटो काढून घेतले व मंदिरा बाहेर आलो .एखादी गोष्ठ आपल्या आकलनाच्या पलीकडे असली कि मनातील विचारांची वादळे शमवण कठीण होऊन बसत...हीच स्थिती या ठिकाणी आम्ही अनुभवत होतो...

हाच तो सहा जणांचा चमू
आल्या पावली वर त्या पर्वतावर जाऊन सोबत एकत्र बसून आणलेल्या जेवणार यथेच्छ ताव मारला आणि काही वेळ तिथेच विश्रांतीहि. परतीची वेळ जवळ आली होती त्या ठिकाणाऊन खाली जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. मनात आता कसलीही घालमेल नव्हती ना कि कसली विचारांची तंद्री...अशी काही ठिकाण पाहिली कि विज्ञाना ला खरं मानावं कि प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला याचा संभ्रम होतो पण मला नाही वाटत कि निसर्ग आणि विज्ञान दोन्ही गोष्टी compare करण्यासारख्या आहेत कारण मानव किती जरी प्रगती करत असला तरी या सृष्टीतील अनेक कोडी निसर्गाने मानवाला न उलगडण्यासाठीच ठेवली असावी. या साऱ्या विचारचक्रात असताना त्या साऱ्या प्रश्नांना राम भरोसे सोडलं होत.पण जे काही अनुभवलं ते अद्भुत आणि अनाकलनीय होत.पण मनात मात्र एक न भंग पावणारी शांतता होती महादेवाच्या साधनेसारखी...कसल्या तरी दृढतेची निश्चिती देणारी..तेथून निघताना परत अश्याच एखाद्या ठिकानी भेट देण्याच वचन देत आम्ही सर्व मार्गस्थ झालो...एक नवीन उत्साह मनात घेऊन आणि पुढील १ वर्ष पुरेल एवढी सकारात्मत्क उर्जा घेऊन..
लेखन- प्रशांत श.तिवारी
(खालील लिंक चा उद्देश्य माझ्या ब्लॉग ची जाहिरात नसून लेख वाचून या सुंदर जागेवर जाण्याची इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी काही निवडक फोटो)
http://marathinetizen.blogspot.in/2017/08/blog-post_23.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. मस्त अनुभव! एक पैराग्राफ डबल झाला आहे. >>> २ जण खाली थांबतील बाकी वर जाऊन येतील पण म्हणतात कुणीतरी प्रेरित करणार असेल तर हनुमानासारख १२ हत्तींच हि बळ येत थोडी विश्रांती घेऊन सर्वजण नव्या जोमाने परत चढायला लागले<<<<
फोटोज इथेच देत जावेत ही विनंती.
पुलेशु.

धन्यवाद राहुल जी पण तीन दिवसांपूर्वीच या कुटुंबात आलोय व मायबोलीच्या टेक्निकल दुव्यांशी जास्त ओळख नसल्याने फोटो चा ऑप्शन नाही सापडला व लॅपटॉप चा चार्जेर उपलब्ध नसल्याने सगळी काम मोबाईलवरकच चालुये...पुढच्या लेखात नक्की काळजी घेईल...!!!

छान लिहिलेय. लेखातच फोटो दिले असते तर मजा आली असती.
ज्या हॉटेलमध्ये नाश्ता केला त्याचे नाव दिले असते तर बरे झाले असते.

धन्यवाद राहुलजी लिंक दिल्याबद्दल... खरंतर हा माझा पहिलाच लेख आणि इथे जाण्या अगोदर मी यावर लिहिणार अशी यत्किंचितही कल्पना नव्हती मला...पण ईथुनपुढे छोट्या गोष्टीची नोंदही ठेवत जाईल... आणि धन्यवाद जागुजी मिसळीच्या कौतुकबद्दल...
एक छोटी खूणसांगू शकतो त्या हॉटेलबद्दल...त्याच्या अगदी उजव्या बाजूस जोडून एक लग्नाचं मंगल कार्यालय आहे आसपास ना कोणती बिल्डिंग ना कोणती इमारत.. नासिक च्या पुढे व Trambyakeshwrchya अलीकडे १०-१२ की.मी....धन्यवाद...

खूप सुंदर लेख, जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

साधारण ५-६ वर्षांपूर्वी आम्ही ही गेलो होतो, म्हणजे तसे मम्मी पप्पा दर महिन्याला जातात त्र्यंबकला, अन बरेचदा आम्ही सुद्धा, खूप छान अन प्रसन्न वाटते तिथे.
पण ब्राह्मगिरीला एकदाच गेलोय, म्हणजे गंगाद्वारला गेलो असता तिथे अजून एक कुटुंब भेटले ते तिकडे जाणार होते, आमच्याकडे पण खूप वेळ होता तर आंम्हीही गेलो त्यांच्यासोबत.
गंगाद्वार पासून सकाळी ७-७.३० च्या दरम्यान निघूनसुद्धा अख्खा दिवस गेला तिकडे जाऊन यायला.

माकडां विषयी तर न बोललेले बरे, आम्ही एक guide केला होता माकडे हकायला, आमच्या सगळयांच्या बॅग्स, पिशव्या सगळे त्यानेच घेतले होते, अगदी गंगाद्वारपासून , ब्रह्मगिरी दर्शन करून खाली उतरेपर्यंत त्याची खूप मदत झाली.

तो होता म्हणून मम्मी अन त्या दुसऱ्या कुटुंबातील मावशी ने माकडांना खाऊ दिला.

खूप मजा आली होती, पण पाय दोन दिवस सुजले होते

धन्यवाद VB तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल पण आम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर गेलेलो त्याची एक फेरी ही आहे ती पुढच्या वर्षी करण्याचा विचार आहे... तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही पण एवढ्या उंचीवर असलेला हा धर्तीवरचा स्वर्गच म्हणावा लागेल... धन्यवाद!!!

माणसांनीच माकडांना खाऊ द्यायची सवय केल्याने माकडे त्रास देतात. फळे आणि झाडाची कोवळी पाने हे माकडांचे नैसर्गिक अन्न आहे. पण माणसांनी आधी कौतुक म्हणून चणे, शेंगदाणे खायला द्यायला सुरुवात केली आणि मग त्यांना सवयच लागली.