डिस्क्लेमर: या पोस्टमध्ये 'पोस्ट दिवाळी डीटॉक्स' बद्दल कुठलेही शॉर्टकट मिळणार नाहीत. पण दिवाळीनंतर एकदम हॉट टॉपिक असल्याने त्याचं नाव हे दिलंय. तितकेच कुणी वाचेल तर चांगलेच आहे.
तर सांगायचं कारण काय तर दिवाळी रविवारी संपली. यावेळी तर जास्तच धावपळ झाली होती. फराळ बनवणे, खाणे, छान कपडे घालून पार्टीला जाणे, फोटोशोषण करणे(माझे फोटो अन पोरांचे व नवऱ्याचे शोषण) आणि लगेच दिवाळी संपायच्या आत ते फोटो लगेच पोस्ट करणे वगैरे महत्वाची कामे तत्परतेने केल्याने सोमवारी खूपच दमायला झालं होतं. जरा कुठे ऑफिसमध्ये बसून आराम करायला मिळेल म्हटलं तर लोकांचे भराभरा प्रश्न आणि पोस्ट्स, शेयर्स दिसू लागले होते. कशाचे तर, या पोस्ट दिवाळी डीटॉक्सचे. हो त्यात आपल्या ऋजुता दिवेकरचे पोस्टही एकदम ढिगाने फॉलो आणि शेयर झाले होते. मीही दोन चार वाचून घेतले. असो.
मला पडलेला प्रश्न हा आहे की दरवेळी दिवाळी संपली किंवा न्यू इयर पार्टी झाली की लगेचच लोकांना हे असे प्रश्न का पडतात? इथेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच सर्व दुकानांत स्पोर्टच्या कपड्यांवर सूट असते, जिम मेम्बरशिप वर डिस्काऊंट असतो आणि जानेवारीत जिममध्येही खच्चून गर्दी असते. या सगळ्यांतून एकच गोष्ट दिसते ती म्हणजे सणांमध्ये खाणे, पिणे याकडे केलेलं दुर्लक्ष आणि त्यातून येणारा अपराधीपणा. त्या अपराधी भावनेतूनच बरेचसे लोक असे तत्परतेने वजन कमी करायच्या मागे लागतात. दिवाळीच्या आधी किंवा बाकी वर्षभरात का या गोष्टीकडे लक्ष दिलं जात नाही? वजन कमी करणे हे दरवेळी शॉर्ट टर्म गोल का असते?
प्रत्येकाला अचानक जाणवतं की माझं वजन वाढलंय. आपण वर्षभर आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतोय हे का कळत नाही कुणाला? बरं, या वागण्यातही एकच ध्येयअसते, वजन कमी करणे. किंवा बारीक होणे. कुणीच असं म्हणत नाही की मला 'फिट' किंवा 'सशक्त' व्हायचं आहे. एखादं काम करण्यासाठी माझी शारीरिक क्षमता वाढवायची आहे. मला जरा चालताना दम लागतो, ते कमी करायचं आहे किंवा मुलांसोबत खेळता यायला हवं इतकं फिट व्हायचं आहे? का ते सर्व सोडून आपण एका नंबरच्या आणि वजन काट्याच्या मागे लागतो. वजन कमी करणे हे ध्येय असू शकतं पण केवळ तेव्हढेच ध्येय ठेवल्याने आणि तेही थोड्याच काळापुरते ठेवल्याने, पुढच्या दिवाळीतही पुन्हा आपण तिथेच असतो.
बरं या खाण्यात किंवा झटकन वजन कमी करून घेण्याच्या प्लॅनमधेही लोकांचे इतके गैरसमज असतात. मी तर इतक्या वेळा इतक्या लोकांकडून ऐकलं आहे आणि तेही कुत्सितपणे,"मला नाही बाबा ते भाजीपाला खायला जमत" किंवा "मला अजिबात उपाशी राहायला जमत नाही". म्हणजे वजन कमी करण्यासाठी सॅलड खावं लागतं किंवा उपाशी राहावं लागतं हा अगदी सर्वसामान्य गैरसमज आहे. उलट जर आपण झटकन वजन कमी करण्याच्या नादाला लागलो नाही आणि रोजच्या जेवणात सर्व पदार्थांचा आणि योग्य प्रमाणात समावेश केला तर ते जास्त योग्य आहे. किती लोक Carb, Protein, fiber या सर्व बाबींचा जेवणात समावेश आहे की नाही पाहतात? आपल्याला दिवसांत किती protein लागतं आणि त्यातील किती आपल्या जेवणातून मिळतं हे किती लोकांनी पाहिलेलं असतं? उपाशी राहणे किंवा सॅलड खाणे या पेक्षा नीट विचार करून असा चौफेर आहार ठरवणे आणि तो बनवणे हे अधिक कष्टाचं काम आहे. आणि ते फक्त स्वतःसाठीच नाही तर आपल्या पूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त आहे.
आपलं शरीर जितकं काम करतं त्यापेक्षा जास्त खाल्लं की वजन वाढणारच हे नक्की. तात्पुरत्या डाएट प्लॅनने ते बदलणार नाहीये. रोज शरीराला थोडा का होईना व्यायाम पाहिजेच. साधं जिना चढून जाणे किंवा एखादी गोष्ट घ्यायला पटकन उठणे किंवा निदान अर्धा तास तरी व्यायाम करणे या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. आळसावलेलं शरीर असेल तर ते या छोट्या गोष्टींतही त्रास देतं. त्या आळसातून बाहेर पडून स्वतःला वळण लावणे हे जास्त महत्वाचं आहे. चार दिवस व्यायाम केला नाही तर अस्वस्थ वाटलं की समजायचं की कुठल्याही डाएटची गरज नाहीये. अनेकदा माझ्या सासूबाई किंवा सासरे जरा जास्त जेवण झालं सकाळी की रात्री सरळ जेवण टाळतात. का तर सवय नाही. रोजच्या ठराविक आहाराची सवय पडली की थोडं जास्त खाल्लं तर शरीरच आपल्याला सांगेल थांबायला. दिनचर्येत असा बदल होणं जास्त योग्य आहे. नाहीतर कधी ना कधी आपलं शरीर साथ देणं सोडणारच आहे.
मी अनेकवेळा अनेक लोकांना विचारते किंवा म्हणते की व्यायाम करा, सुरुवात करा आणि नियमित करा. तेव्हा मला अनेक कारणं ऐकायला मिळतात. कारण 'व्यायाम करणे म्हणजे केवळ जिममध्ये जाणे' हाही गैरसमज आहे. रोज घरातच योगासने करणे, पोटाचे, पाठीचे, पायाचे व्यायाम करणे हे सहजपणे होऊ शकते. त्याचबरोबर बाहेर निदान ३० मिनिटे जास्त वेगाने चालणेही चांगला व्यायाम आहे. तसाच जिना चढणेही. या सर्व वेगवेगळ्या व्यायामाचा एकत्र परिणाम पाहिला तर नक्कीच फरक जाणवेल. आणि मुख्य म्हणजे 'जिममध्ये जायलाच जमत नाही' हे कारण दिलं जाणार नाही.
अजून एक गैरसमज म्हणजे 'मी घरची इतकी कामे करते वजन कमी होत नाही'. मी नेहमी पाहिलं आहे की मी जेंव्हा घरून ऑफिसचं काम करते तेव्हा माझं चालणं अतिशय कमी होतं आणि ऑफिसमध्ये जाते तेंव्हा नाही म्हटलं तरी १-२ किमी सहज चाललं जातं. तात्पर्य काय की घरात राहून स्वयंपाक करणे किंवा अजून काही कामं केली तरी तेव्हढा व्यायाम शरीराला पुरेसा नाहीये. त्यात अतिशय मर्यादित हालचाल होते आणि तीही शरीराच्या सर्व अवयवांची होत नाही. त्यामुळे घरातली कितीही कामे केली तरी जरा चार पावलं धावलं तर तुम्हाला दम लागणारच कारण हृदयाला तेव्हढ्या वेगाची सवयच राहात नाही. त्यामुळे बाकीची कामे असली तरी आवर्जून वेळ काढून पूर्ण शरीराचे व्यायाम केलेच पाहिजेत. असो.
एकूण काय, अनेक गैरसमजुतीतून बाहेर येऊन आपल्याला नक्की काय करायला हवं याचा विचार केला पाहिजे . माझं म्हणणं इतकंच की हे असे दिवाळी किंवा न्यू इयर नंतर येणाऱ्या अपराधीपणापेक्षा, आपल्या दिनचर्येत किंवा रोजच्या खाण्याच्या सवयीत बदल करून घेणे आवश्यक आहे. आणि तो केला तर दोन चार दिवस जरासं जास्त खाल्लं तर काही फरक पडणार नाहीये. जोवर हे लक्षात येत नाही तोवर पोस्ट दिवाळी डीटॉक्स चालूच राहणार. आता दिवाळीच्या निमित्ताने सुरुवात करणार असेल कुणी तर काहीच हरकत नाही, पण ती सुरुवात असावी, पुढच्या कायमस्वरूपी सकारात्मक बदलांची.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
रोजच्या ठराविक आहाराची सवय
रोजच्या ठराविक आहाराची सवय पडली की थोडं जास्त खाल्लं तर शरीरच आपल्याला सांगेल थांबायला. दिनचर्येत असा बदल होणं जास्त योग्य आहे. नाहीतर कधी ना कधी आपलं शरीर साथ देणं सोडणारच आहे.
हे अगदी खरं आहे. बर्याच वेळा आपलं शरीर आपल्याला अनेक सूचना करत असत, परंतू आपल्याला त्या सूचना लक्षात येत नाहीत. जेव्हा शरीर साथ देणं सोडत त्या वेळेस आपण जागे होतो आणि मग उगाच जिम, डाएट, उपवास अश्या गोष्टींच्या मागे लागतो. हे सगळ करताना पेशन्स असणं खुप महत्वाच आहे. आपल्याला लगेच रिझल्ट हवे असतात. ते दिसले नाही की या सगळ्या गोष्टी आपण पाळणं सोडून देतो आणि पुन्हा 'मी हे केलं पण काहीच उपयोग झाला नाही' हे म्हणायला मोकळे होतो. यात अजून एक जाणवणारी गोष्ट म्हणजे वजन कमी कण्यासाठी आपणं एकाच वेळी सगळे प्रकार करू पाहतो. या मूळे एक ना धड.... अशी परिस्थिती होते.
जर खाण्यावर थोडसं बंधन ठेवल तरं उगाच नंतर वजन कमी करण्याच्या मागे पळाव लागणार नाही.
डिटॉक्सचा संबंध फक्त वजनाशी
डिटॉक्सचा संबंध फक्त वजनाशी नाहीए.
काहीतरी डिटॉक्स च्या टीप्स
काहीतरी डिटॉक्स च्या टीप्स असतील म्हणुन वाचायला आले. निराशा झाली.
(दिवाळीत भरपुर खादाडी करुन गिल्ट आलेली मी )
छान लिहिले आहे!! पटले
छान लिहिले आहे!! पटले
कुणीच असं म्हणत नाही की मला 'फिट' किंवा 'सशक्त' व्हायचं आहे. >> +१
, आपल्या दिनचर्येत किंवा रोजच्या खाण्याच्या सवयीत बदल करून घेणे आवश्यक आहे. आणि तो केला तर दोन चार दिवस जरासं जास्त खाल्लं तर काही फरक पडणार नाहीये. >>> +१
'फोटोशोषण करणे' हा वाक्प्रचार
'फोटोशोषण करणे' हा वाक्प्रचार भारी आहे!!!