तुम्ही म्हणाल, ‘हे काय भलतंच?’ त्याचं असं झालं, परवा सेलेरी घेतली सुपासाठी. कापून त्याचा बुडखा पाण्यात ठेवला तर मूळं फुटून घरच्याघरी सेलेरी उगवते, पुन्हा बाजारात जायला नको. पण इथे स्वयंपाकाच्या घाईत तो बुडखा ठेवायला भांडंच मिळे ना. मग काय, दिवाणखान्याच्या बाजूनी ओट्यावर काचेचा सट होता. बरेचदा बागेतल्या फुलांचा गुच्छ करून मी त्यात ठेवत असते. नेमका तो रिकामा होता. दिला चटकन सेलेरीचा बुडखा त्यात ठेवून.
दोन-चार दिवसात सेलेरीतून फुटलेली पोपटी पालवी तरारून वर आली. त्याचवेळी ‘हार्वे’ नामक वांड चक्रीवादळ टेक्ससला येऊन थडकलं आन लावली नं त्या वादळानं आमच्या परसबागेची वाट… धो धो धार थांबली. रिपरिपत्या पावसात मी बागेतल्या भाज्यांच्या रोपांचा हालहवाल घ्यायला बाहेर पडले. वाकलेली ढबू मिरची सरळ करत होते. तशी मिरची तयार झालेली होती पण तातडीने स्वयंपाकात लागणार नव्हती. म्हटलं, होऊ दे लाल मग तोडू. पण रोप सरळ करताना त्या ढबू मिरची सकट फांदी हातात आली. आता तातडीने कुठे ठेवावी ही फांदी म्हणत घरात आले आणि समोर सेलेरी ठेवलेला सट. दिली ही ही फांदी त्यात खोचून.
पावसाच्या तडाख्यानं बागेतल्या सगळ्या गुलाबाच्या फुलांचे हाल झालेले. जुन्या फुलांच्या पाकळ्या, रंग उडालेले तर उमलू पाहणाऱ्या फुलं-कळ्यांनी माना टाकलेल्या. या सगळ्यात एकच गुलाबाचे फूल तरतरून वर आलं होतं. पीचच्या आडोश्याला असल्यामुळे वादळी पावसातही आपण कसे छान दिमाखाने फुलून आहोत असं मिरवत. मला मोह आवरला नाही. मी ते अलगद थोड्या देठासह खुडलं आणि घरात आणलं. आता अर्थातच याची जागा म्हणजे फुलदाणीचा तो सट.
सेलेरी, ढबू मिरची आणि गुलाब!सटात आधीच जागा पटकवलेल्या सेलेरी आणि ढबू मिरचीनं ‘आमच्या स्थानाला धक्का न लावता या फुलाला स्वीकारू…’ अशी तयारी दाखवली आणि मग आमचे स्वीकृत सदस्य गडद राणी रंगाचे गुलाबाचे फूल त्या हिरवेपणाला साज आणत ऐटीत विराजमान झाले. आजवर पुष्परचनेत अनेक प्रकार केले होते. आज मात्र ही वेगळीच रचना घडली ती ही आपसूक. इकेबाना सूत्रातल्या ‘स्वर्ग-पृथ्वी-मानव’ संकल्पने साजेशी ‘पर्ण-पुष्प-फल’… देठातून पानं, पानांतून फूल, फुलातून फळ हा निसर्गक्रम सांगणारी, सृजनचक्रातून निराळं सौंदर्य दर्शवणारी…
http://sayalimokatejog.wordpress.com/2017/08/30/celery-mirchi-gulab/
परवा सेलेरी घेतली सुपासाठी.
परवा सेलेरी घेतली सुपासाठी.
>>>>>>>>
आज अठ्ठावीस, म्हणजे परवा आमची सॅलरी होणार आहे.. पण हे सेलेरी काय प्रकरण असते ते नाही समजले.. याचाही फोटो प्लीज
शेवटचा प्यारा आवडला ... इकेबाना सूत्रातल्या ‘स्वर्ग-पृथ्वी-मानव’ संकल्पने साजेशी.... हे सूत्र काय आहे माहीत नाही, पण वाचायला ईंटरेस्टींग वाटतेय.
Photo is available on link
ऋन्मेऽऽष - Photo is available on link provided at the end of article.
धन्यवाद!
धन्यवाद!
Pl put photo here only.
Pl put photo here only. Visiting blog is not needed but your choice.