इडली, डोसा म्हटलं की बरोबर ‘सांबार’ आलंच! चेन्नईला राहून तर मी पक्की दक्षिणात्य सांबारची चाहती बनलेय. गोडं वरण, फोडणीचं वरण, आमटी यावर पोसलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांना, अस्सल तिकडच्या लोकांसारखं सांबार आणि ते ही दरवेळी बिनचूक घरीच करता आलं तर वेगळं काय हवं?
सुगरण आईच्या पोटी जन्म घेऊनही सुरुवातीला माझं पाककला ज्ञान यथातथाच होतं. घरापासून दूर राहायला लागल्यावर स्वयंपाकासाठी रमाबाई रानडेंना जशी पाककलेची पुस्तके कामी आली तसंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. नोकरीनिमित्त बाहेर राहू लागल्यानंतर मायाजालावरच्या अनेक पाककृतींच्या संकेतस्थळांनी आणि चलचित्रांनी चोख माहिती पुरवली ते ही थेट स्वयंपाक घरात येऊन. ते वाचून, बघून करता करता विविध मसाले, वेगवेगळ्या भाज्या, त्यातल्या प्रत्येकाच्या विशिष्ठ चवी, त्यांच्यातला मिलाफ (हार्मनी) – विसंगती असं एक एक हळूहळू ध्यानात येऊ लागलं. सरावाने माझे हे पाककला प्रयोग खाणाऱ्यालाही सुखाचे वाटू लागलेत!
माझं शिक्षण अभियांत्रिकीचं. नवनवीन पदार्थ शिकताना, करून बघताना माझा आतला अभियांत्रिकही जागा असतो. आपल्या स्वयंपाक घरात पूर्वापार इतके वेगवेगळे मसाले तयार असतात. उदाहरणार्थ गरम मसाला असो, गोडा वा काळा मसाला, मालवणी मसाला, पावभाजी मसाला, रसम मसाला, सांबर मसाला… आणि असे कैक. तरतऱ्हेचे मसाले तयार असले की दरवेळी मूलभूत लवंग, दालचिनी, तमालपत्र, मिरी, शहाजिरे, वेलची, दगडफूल, जायपत्री आदींपासून तयारी करायला लागत नाही. हे तयार मसाले बघताना मला संगणकीय भाषांमध्ये Object Oriented Programming (OOP) संकल्पना (जी साधारण १९७० च्या दशकापासून आली ती) यायला इतका का उशीर लागला असा एक विनाकारण प्रश्न पडतो… Abstraction, Encapsulation, Inheritance, Re-usability सोप्या भाषेत शिकावणारी आपल्या रोजच्या स्वयंपाक घरातली ही ‘मसालेदार’… आपलं ‘मासलेदार’ उदाहरणे! असो… तर मूळ मुद्दा असा की स्वयंपाकाचा प्रयोग हा माझ्यासाठी संगणकीय आज्ञावली (program) लिहिण्याइतकाच आव्हानात्मक आणि आनंदी अनुभव असतो. त्या जोडीला आजच्या धावत्या युगाला अनुसरून माझ्यातला इंजिनिअर प्रत्येक पाककृतीची ‘झटपट आवृत्ती’ काढण्यात गर्क असतो. तर अशीच एक माझी सांबारची पाककृती तुम्हाला सांगतेय.
अनेकविध प्रयोगातून मला लक्षात आलंय की सांबाराला सुंदर चव देऊ करणाऱ्या दोन मुख्य भाज्या आहेत. त्या म्हणजे दुधी भोपळा किंवा कोहळा. सांबाराला फळभाज्या घालताना दोन्हीपैकी एक हवीच हवी. या दोन्ही भाज्या एकत्र मात्र एकमेकींच्या चवीला थोड्याफार मारक ठरतात म्हणून शक्यतो दोन्हीपैकी एक घ्यावी. याबरोबर सांबारला अव्वल स्वाद देणारा शेवगा! शेवग्याच्या शेंगा नसतील तर शेवग्याची पाने, ती ही स्वादपूर्णता आणतात. या जोडीला कांदा, टोमॅटो. त्यानंतर आवडीनुसार कोणत्याही इतर फळभाज्या घालू शकतो जसं गाजर, परवल, वांगं, दोडका क्वचित झुकिनी वा एखादी भेंडी. याखेरीज इडली वर्गीय दाक्षिणात्य पदार्थ हमखास रूचकर बनवण्याचं गुपित म्हणजे ‘गन पावडर’ जिला ‘इडली पोडी’ ही म्हटलं जातं. पद्धतीप्रमाणे तूर डाळीचं सांबार केलं जात असलं तरी कोणाला पथ्यपाणी असल्यास अर्धी तूर, अर्धी मूग डाळ किंवा अर्धी मूग, अर्धी मसूर डाळ असं वापरूनही सांबार चविष्ट बनू शकतं. इतकंच काय डावभर नारळाचं दूध असेल तर सांबार एकदम फक्कड!
चेन्नईला ट्रेनिंगला असताना आम्हाला शिकवणाऱ्या एका ‘गुलते’ शिक्षकाने… (हा आम्हा चेन्नईस्थित मराठी लोकांचा सांकेतिक शब्द)… त्या ‘तेलगू’ शिक्षकाने, “तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही पण खरंच तुम्हाला म्हणून सांगतो”, असं म्हणत, “सांबारामुळे बुद्धी वाढते”, असं बोलून आख्ख्या वर्गात हशा पिकविला होता! त्यातला विनोद बाजूला ठेवत केवळ आहारशास्त्राच्या चष्म्यातून पाहता सांबार त्याच्या पौष्टिकतेची निस्संदेह ग्वाही देते हे मात्र तितकंच खरं. शेवटी सांबार, सांबार म्हणजे काय? शिजलेली डाळ, त्यात भाज्या, चिंच, मसाले आणि फोडणीचं भंजन… असं गरमागरम सांबार (खास करून अमेरिकेच्या) थंडीत पिण्याचा आनंद वेगळाच असतो. अर्थात थंडी हेच केवळ निमित्त न पुरता वर्षभरात मी कधीही सांबार प्यायला तयार असते. त्यासाठी इडली डोस्याचं पीठ फुगवत बसण्याची खटाटोप बाजूला ठेवून कधी कधी मी नुसता सांबार भातही मन लावून ओरपते.
असं ही म्हटलं जातं की, सांबाराचा उगम तंजावरस्थित मराठ्यांच्या पाकगृहात झाला! शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी(एकोजी) राजे त्यांचे प्रथम पुत्र शाहूजी यांनी आमटी करताना तूर डाळीबरोबर कोकमाअभावी चिंच वापरण्याचा प्रयोग केला आणि डाळ, भाज्या, चिंच आणि मसाले यातून चविष्ट सांबारचा जन्म झाला. आजचं सांबरचं रूप म्हणजे डाळीतून प्रथिने, फळभाज्यांतून जीवनसत्व-तंतू (फायबर) आणि चव-स्वादासाठी चिंच, मीठ, मसाला, वरून घातलेली कोथिंबीर आणि त्या चवीला साज चढवणारी हिंग, कढीपाला फोडणी!
मराठी स्वयंपाक घरातल्या आमटीला स्मरून उगम पावलेलं हे सांबार दाक्षिणात्य लोकांचा हातखंडा होऊन बसलेलं आहे. त्याची माझ्या पाककला प्रयोगातून साकारलेली ही आणखी एक आवृत्ती म्हणजेच माझी – झटपट ‘सांबारावृत्ती’!!
साहित्य
१. तूर डाळ – १ वाटी, पाणी – २ वाटी
(पथ्य असल्यास अर्धी तूर, अर्धी मूग डाळ किंवा अर्धी मूग, अर्धी मसूर डाळ)
२. भाज्या (चिरून फोडी) – साधारण १ ते २ वाटी
दुधी भोपळा किंवा कोहळा, असल्यास शेवगा शेंगा किंवा शेवगा पाने, कांदा, टोमॅटो.
इतर ऐच्छिक फळभाज्या आवडी-उपलब्धतेनुसार (गाजर, परवल, वांगं, दोडका, झुकिनी, भेंडी)
आलं लसूण (बारीक चिरून) – २ चमचे
३. मसाले
हळद (अर्धा चमचा), लाल तिखट (१ चमचा), सांबार मसाला (२ चमचे), सुंठ पूड (१ चमचा), गन पावडर / इडली पोडी (१ चमचा)
४. फोडणी
बारीक मोहरी (१ चमचा), जिरे (अर्धा चमचा), हिंग (पाव चमचा), कढीपाला
५. इतर
चिंचेचा कोळ (१ चमचा), चवीप्रमाणे मीठ (साधारण २-३ चमचे), कोथिंबीर
ऐच्छिक – नारळाचे दूध (पाव वाटी), बारीक गुळाचा खडा
कृती
१. डाळ धुवून घ्यावी. कुकरमध्ये डाळ, डाळीच्या दुप्पट पाणी, चिरलेल्या भाज्या, आलं लसूण घालून मऊ शिजवून घ्यावं.
२. कूकर झाला की शिजलेली डाळ भाज्या घोटून घ्याव्या. त्यात मसाले टाकून वरून फोडणी द्यावी.
(शेवगा शेंगा असतील तर कूकर झाल्यावर त्या वरचेवर अलगद काढून घेऊन डाळ घोटावी. शेवगा पाने घालणार असल्यास फोडणीच्यानंतर सांबर उकळताना कोथिंबिरीबरोबर घालू शकतो.
भाज्यांच्या फोडी मोठ्या ठेवाव्या म्हणजे डाळ घोटताना फोडी गाळ होत नाहीत.)
३. आवडीप्रमाणे चिंच कोळ, असल्यास पाव वाटी नारळाचे दूध, हवा असल्यास बारीक गुळाचा खडा, चवीप्रमाणे मीठ घालून हलवून घ्यावे.
आवश्यकतेनुसार पाणी वाढवावे, वरून चिरलेली कोथिंबीर घालावी आणि उकळी आणावी.
अस्सल दाक्षिणात्य चवीचं ‘झटपट सांबार’ तयार!
(पाककलेची छायाचित्रे (फोटो) साठी खालील लिंक बघू शकता!)
http://sayalimokatejog.wordpress.com/2017/09/26/sambaaraavrutti/
सांबार काकडी आणि सांबार कांदे
सांबार काकडी आणि सांबार कांदे घालून च सांबार छान होते.
लेख आनि रेसिपी असेल तर पुर्ण
लेख आनि रेसिपी असेल तर पुर्ण तरी करा.
इथे फक्त लिंक देऊन मग तुमच्या ब्लॉग वर जाऊन संपुर्ण लेख वाचणे अपेक्षित आहे का ????
अनुमोदन अंकु,
अनुमोदन अंकु,
सायली तुमच्या आधीचा लेख / पाकृ पण अपुर्ण वाटतोय, लिंक नको , लेख पुर्ण करा
पूर्ण लेख इथेच लिहा की.
पूर्ण लेख इथेच लिहा की. सांबार येते आम्हास.. तुम्ही कसे करता ते लिहा. ब्लॉग नाही बघणार.
OOPS चा रिलेट भारी केलाय... 1
OOPS चा रिलेट भारी केलाय... 1 नंबर एक्साम्पल वाटलं मला... मस्तच..
सांबारात आले लसूण नव्हते ऐकले
सांबारात आले लसूण नव्हते ऐकले कधी.
सांबार पावडर ची पण रेसिपी यात इन्क्लुड केली तर बरे होईल. कारण हे मसाले / पावडरी केरळी, तमिळ वगैरे बरेच वेगळे असतात. त्याने चवीत खूप फरक पडतो.
मस्त आहे रेसिपी आणि कृती
मस्त आहे रेसिपी आणि कृती खालचा फोटो. त्यात डाव्या हाताची हिरवीगार पानं (कढीपत्त्याचं बारकं वर्जन वाटणारी) कसली आहेत? शेवगा का?
मी जनरली दुधी, शेवग्याच्या शेंगा वगैरे एकच भाजी घालते सांबारात.
शेवग्याची पानं आहेत असे दिसते
शेवग्याची पानं आहेत असे दिसते. घालून बघायला हवे नेक्स्ट टाइम. मिळतात आपल्याकडे.
सायलीमोकाटेजोग ,
सायलीमोकाटेजोग ,
तुमच्या ब्लॉगची लिंक खाली देण्यास हरकत नाही . पण केवळ तुमच्या ब्लॉगची जाहिरात करणे हा तुमच्या लेखनाचा उद्देश नसावा अशी अपेक्षा आहे. असे लेखन मायबोलीच्या धोरणात बसत नसल्याने काढून टाकले जाईल. तुम्ही पूर्ण पाककृती इथे लिहणे इथे अपेक्षित आहे.
webmaster - Thank you for
webmaster - Thank you for your comment! Yesterday it was my first attempt to post on Maayboli and was little confused how it works. I have updated the article with full content.
माझ्या ब्लॉगची जाहिरात करण्याचा हेतू नाही. आवश्यक असल्यास फोटो बघण्यासाठी खाली लिंक देत आहे. लवकरच सराईत मायबोलीकर होईन.
maitreyee - कुठलाही सांबार
maitreyee - कुठलाही सांबार मसाला वापरला तरी चालेल. मसाल्याइतकीच भाज्यांना चव असते ते समजून तो मिलाफ घडवला की पदार्थ सुंदर होतो!
सायो, maitreyee - बरोबर ही
सायो, maitreyee - बरोबर ही शेवग्याची पाने आहेत फोडणी दिलेल्या फोटोत डावीकडे.
सुन्दर लिहिलंय.
सुन्दर लिहिलंय.
साम्बार आवडतंच. पण लेखन पण मस्तच एकदम रसभरीत.
दक्षिणा - धन्यवाद! सांबार ही
दक्षिणा - धन्यवाद! सांबार ही करून पाहा नक्की!
झंपी - काकडीही नक्कीच घालू
झंपी - काकडीही नक्कीच घालू शकता आणि या पाककृतीने ही नक्की करून पाहा.
गन पावडर / इडली पोडी (१ चमचा)
गन पावडर / इडली पोडी (१ चमचा)
हे काय आहे? कूठे सापडेल??
पन्तश्री - गन पॉवडरच्या
पन्तश्री - गन पॉवडरच्या पाककृतीची लिंक माझ्या ब्लॉग वर टाकली आहे. http://sayalimokatejog.wordpress.com/2017/09/26/sambaaraavrutti/
हे बरे केले. करून बघेन आता.
हे बरे केले. करून बघेन आता.
maitreyee - नक्की आणि सांगा
maitreyee - नक्की आणि सांगा कसं झालं!