अवचित भेटलेलं देऊळ..

Submitted by सनव on 26 September, 2017 - 16:28

रविवारी देवळात जायचं आहे..' काकांनी आधीच आम्हाला बजावून ठेवलं होतं. आम्ही फार नियमितपणे देवळात जात नाही. पण काकांनी सांगितलं होतं म्हणून सगळी गँगच निघाली. नन्तर सगळे एकत्रच जेवणारही होतो. रविवारी देवळात पोचलो, गाड्या पार्क करून देवळात प्रवेश केला. सुटीचा दिवस असल्याने भारतीय भाविकांची एकच गर्दी देवळात झाली होती. लोक खास भारतीय पोशाख करून आले होते. देवळात प्रवेश करणे व दर्शन घेणे यासाठी काही चार्ज नव्हता. पण काही स्पेशल पूजाअर्चा करायची असल्यास पैसे लागत होते. काही प्रसाद मोफत होते. काही स्पेशल प्रसाद विकत घ्यायचे होते. एकूण काहीतरी transaction चालू असल्याचे फीलिंग वातावरणात येत होते. डॉलर्स द्या, तुमच्या मागण्या देवासमोर ठेवा, काम झालं तर आणखी डॉलर्स, मिठाई, फळे अर्पण करून व्यवहार पूर्ण करा. मग पुढची मागणी घेऊन या. कोणीच केवळ देवासाठी आलेला नाही, 'देवा, मला काही नको, दोन क्षण शांतपणे तुझ्या दारात विसावा घेऊ दे' ही कोणाचीच मागणी नाही. देव म्हणजे जणू दुकानातील विक्रेताच. मी देवळातल्या मूर्तीकडे बघते. मला ते देवदेवता हताश झालेले, कोंडलेले वाटतात. लांबून नुसतं दर्शन घ्यायला आम्ही दोन चारच लोक असतो. देवाकडे मागण्या घेऊन आलेल्यांची देवाजवळ मोठी गर्दी असते.
मला लक्षात येतं की नवरा माझ्याच शेजारी उभा आहे. Lets get out of here..मी नजरेने त्याला विनवते. मला गुदमरल्याचं फीलिंग येतंय आता. 'आपण एका ग्रुपबरोबर आहोत, सगळ्यांचं झालं की निघू.' तो निवांत आहे.
माझ्यासोबतचे लोक काहीबाही मिठाई, नमकीन विकत घेत बसतात. मला त्यातही रस वाटत नाही. आपण देवळात गेलो पण पीसफुल वाटलं नाही, इरिटेट वाटलं, हेच मनात येतं. तिथून लवकर निघावं असंच वाटतं. पुढचा मुक्काम जेवायला रेस्टोरन्टमध्ये. आता मला नॉर्मल वाटतंय. मोकळा श्वास घेता येतोय असं वाटतंय. घरी आल्यावर मी तो अनुभव विसरायचा प्रयत्न करते.

नन्तर काही दिवसांनी एक संध्याकाळ. मला मुलीला शाळेतून पिक अप करायचंय. पण मध्ये थोडा वेळ आहे. टाईमपास करायचाय. मी लायब्ररीत शिरते. पुस्तकांच्या कपाटांच्या रांगांमध्ये फिरत बसते. एखादं पुस्तक अलगद शेल्फवरून काढते, चाळते, पुन्हा ठेवते. इथे फार कमी माणसं आहेत. सोबतच्या मोजक्या पुस्तकप्रेमींशी नजरानजर झाल्यावर स्मित करून मी पुढे सरकते. कुठेतरी सतराव्या शतकातील इतिहास आहे. कुठे लेटेस्ट मेडिकल रिसर्च. पुढच्या बाजूला यावर्षीच्या बेस्ट सेलर कादंबर्या. मागे दुसरीकडे पन्नासच्या दशकातील कादंबरी ज्यात तो काळ अजून जिवन्त आहे. मी तीन चार पुस्तकं जमवली आहेत. एक मला वाचायचं असलेलं, एक मला नव्याने अचानकच सापडलेलं, एक आवडत्या लेखिकेचं नाव वाचून उचललेलं. पुस्तकांची नोंद करून मी हसतमुखाने बाहेर पडते. मला पीसफुल वाटतय, फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. मला देवळात जाऊन आल्यावर जसं आयडियली वाटायला पाहिजे तसं वाटतंय. एखादं शांत देऊळ असावं, मंद तेवणाऱ्या समईच्या प्रकाशात मनातील ताणतणाव निघून जाऊन शांत प्रसन्न वाटावं तसं मला वाटतंय. लायब्ररी, पुस्तकांची दुकानं ही माझी देवळं आहेत. हे माझ्या लक्षात येतं आणि मला बरं वाटतं.

क्रिकेटची मॅच आणि सचिनची बॅटिंग, फेडरर व्हर्सेस नदाल रंगलेला टेनिस मुकाबला, स्टुडियोत ब्रशच्या फटकाऱ्यानी साकारलेला सूर्यास्ताचा देखावा, आवडत्या गायकांची रंगलेली मैफिल- प्रत्यक्षात किंवा कुठेही ऑडियो प्लेयरमध्ये, लाडक्या मित्रमैत्रिणींसाठी दोन तास खपून निगुतीने केलेला चवदार स्वयंपाक, बागेत खपून लावलेली झाडं, लॅबोरेटरीत तल्लीन होऊन केलेलं काम, मॅरेथॉन रनिंगचा ट्रॅक, रानावनात केलेलं हायकिंग, वृध्दाश्रमात स्वयंसेवक म्हणून केलेलं काम...देऊळ कुठेकुठे सापडून जातं...

Group content visibility: 
Use group defaults

देऊळ कुठेकुठे सापडून जातं... खरंय ,,, पण तरीही लोकं देवळात जायचे काही सोडणार नाहीत हे त्याहून खरेय Happy
छान लेख

सनवजी, छान लेख!
देऊळ कुठेकुठे सापडून जातं...>>
हो नक्कीच! पण समजून कोण घेतो?..
आणि देवाजवळ काही मागावं असं वाटलं तर मला सर्वप्रथम स्वामी विवेकानंद आठवतात, 'भक्ती, ज्ञान आणि वैराग्य' यांची मागणी करणारे...

लेख आवडला. पण त्याचं शीर्षक नाही.
खरं सांगतोय. ते शीर्षक वाचून, दुर्लक्ष करून पुढे जाणार होतो. पण गेलो नाही. गेलो असतो तर एक छान लेख वाचायचा राहिला असता.
त्यापेक्षा "देऊळ कुठेकुठे सापडून जातं" हे कितीतरी छान शीर्षक आहे. किंवा ती तुमची पंचलाईन सुरुवातीला सांगायची नसेल तर "मला सापडलेलं देऊळ" हे पण थोडं बरं वाटेल.

पण काही स्पेशल पूजाअर्चा करायची असल्यास पैसे लागत होते. काही प्रसाद मोफत होते. काही स्पेशल प्रसाद विकत घ्यायचे होते.
>>> मंदिर चालवायला पैसे लागणारच ना.. नुसत्या डोनेशन वर भटजी चा पगार, बाकी साफ सफाई वाले , सगळा मेंटेनन्स कसा होणार?

छान लेख.
च्रप्स, लेख देवळाच्या अर्थकारणावर नसून मिळणार्‍या 'पीस' वर आहे.

सर्वांचे धन्यवाद!

माने गुरुजी,मला खरंतर काय शीर्षक द्यावे कळत नव्हतं, तुम्ही सुचवलेले टायटल जास्त छान आहे! बदल करत आहे, धन्यवाद.

सॉरी पण हे आर्वजून लिहिन्यामागे काय उद्देश आहे? आम्ही बघा कसे पुस्तकात रमतो आणि बघा आमच्या आवडीनिवडी कशा क्लास्सी आहेत? Humble bragging ?

त्या अमानवी धाग्यावर कोणीतरी देवळात देणगी देऊन मनाला समाधान लाभल्याचं लिहिलंय. Who are you to judge the "transaction"?

सही!!!
शेवटचा पॅरा - फार आवडला.
__________
जसे गुरु ही व्यक्ती नसते तर गुरु हे तत्व आहे - असे म्हटले जाते, त्याच स्पिरीटमध्ये देऊळ ही जागा नसून, देऊळ हा अनुभव आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
_______________________
आपण लिहीलेला देवळांचा अनुभवच मलाही अमेरीकेत येतो. पण बरेचदा मी देवासमोर भक्तीभावाने हात जोडलेल्या लोकांच्या चेहर्‍यावरचे भाव बघत बसते. कोणी लोटांगण घालतं तर कोणी पुटपुटत असतात, काहीजणांच्या डोळ्यात पाणीदेखील पाहीले आहे. हे सर्व बघुनच मला एक प्रकारे, तन्मय वाटू लागतं Happy