सकाळी शेवटी डॉकटरकडे जाऊन आले. तीन दिवस बिघडलेल्या पोटावर सर्व प्रयोग करून झाल्यावर, नाईलाजाने. अर्थात सर्व शहाण्या भारतीय नागरिकांप्रमाणे मीही दुकानातून औषध आणलं होतं आणि ज्या लोकांना मला बरं वाटत नाहीये माहित होतं त्या सर्वांनी सांगितलेले सर्व घरगुती उपचारही करून झाले होते. डॉक्टरकडे जाणे म्हणजे जणू तुमच्या या सर्व उपचारांची हारच! त्याच हरलेल्या, पडलेल्या मानेने आम्ही गेलो. सुरुवातीचे पैसे वगैरे घेण्यासारखी महत्वाची कामे झाल्यावर तपासण्यासारखी मामुली कामे करायची वाट बघत बसलो. समोर टीव्हीवर ढिगाने चौकोनी बॉक्स दिसत होते. त्यात इतके सगळे ऑप्शन होते की आजारी पडावं तर इथे अमेरिकेतच असा विचारही मनात येऊनगेला.
थोड्या वेळाने छान आवरलेली नर्स आली आणि गोड हसून चेकिंग रूममध्ये घेऊन गेली. निदान आज तिच्यासमोर माझ्या गबाळेपणाचं स्पष्टीकरण द्यायला 'मी आजारी आहे' हे कारण तरी होतं. ते मी स्वतःला पुन्हा एकदा समजावलं आणि चेकिंग रूममध्ये गेले. तिथे तिने मला प्रेमाने प्रश्न विचारले. कधीपासून पोट बिघडले आहे, किती वेळा जाऊन आला, कळ येऊन होतेय का, पातळ-चिकट, लाल काळी वगैरे टेक्शर वाले प्रश्नही तिने विचारले. ताप आहे का पाहिलं आणि बीपीही तपासलं. हे सर्व वर्णन मी सविस्तरपणे सांगताना नवऱ्याचा चेहरा कडू होऊन वाकडा झाला होता.
तर त्या नर्सने त्याला विचारलंही,"तुम्ही ठीक आहे ना?". मग कुठे जरासा तो हसला आणि म्हणाला,"हो हो".
सर्व चौकशा झाल्यावर डॉकटर येतीलच लवकर असे सांगून ती निघून गेली आणि आम्हाला जाणवलं,"बिघडलेलं पोट" या विषयावर बोलतानाही कुणी इतकं हसून आणि प्रेमानं कसं बोलू शकतं?
खरं सांगते, अशा गोष्टींची सवय नाहीये हो? हॉस्पिटल मध्ये जाऊन आजारी माणसापेक्षा बाकी लोकांची तोंड पाहून आजारी पडू असं वातावरण पाहिजे. त्याची सवय आहे. नर्सने केवळ रक्त काढताना नीट शीर तपासून जास्त त्रास न देता रक्त घेतलं तरी आनंद वाटावा याचीही आहे. पण एकतर आजारी माणूस त्यात त्याला हसायला सांगायचं आणि स्वतःही हसतमुख राहायचं? शक्यच नाही. पुढे डॉक्टरही असाच हसमुख ! मग त्याने मी जे काही करत आहे तेच सर्व करत राहा असा 'विकतचा' सल्ला दिला. शिवाय जाताना दोन-चार पाने प्रिंटआऊटही वाचायला. (मी ते वाचणार नव्हते हे सांगायला नकोच !)
तर हे असे अनेक अनुभव आजवर आले. पोरांच्या डिलिव्हरी पासून हातपाय मोडून घेईपर्यंत. प्रत्येकवेळी, समोरचा माणूस रडत असो, टेन्शन मध्ये असो किंवा झोपेत, आपण हसत राहायचं, मुलं असतील तर त्यांच्याशी अजून.... गोड बोलायचं आणि आपलं काम करायचं. कसं करत असतील हे या नर्सेस? दोन्ही पोरांच्या डिलिव्हरी मध्ये सर्वात मोठा त्रास यांचा होता. का? तर इथे समोर आलेल्या पोराचं काय करायचं, झोपायचं कधी, जेवायचं काय असे महत्वाचे प्रश्न समोर असताना मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. असं वाटायचं की जरा ब्रेक द्याना माझ्या तोंडालाही. किती वेळ हसणार मी हे असं तोंड वासून? त्यातल्या काहीजणी इतक्या पेशन्स वाल्या होत्या. बाळाला फीड कसं करायचं पासून डायपर पर्यंत छान समजावून सांगणाऱ्या.
हे असे अनुभव आले की भारतातल्या सर्व डॉकटर व्हिजिट्स आठवतात आणि त्यात आठवते ती म्हणजे 'लक्षात राहणारी नर्स' नसणं !! शक्य होईल तितका निर्विकार, रुक्ष चेहरा, हातात दिलेलं काम चुकूनही तोंडातून ब्र न काढता करून रुममधून निघून जाणं. चुकून काही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर न देणं किंवा एका शब्दात देणं, वगैरे पाहिलं आहे. समोर माणूस २० तास उभा असला तरी त्याच्याबद्दल कणभर दया न येणाऱ्या अनेक नर्स पाहिल्या. वाटतं, त्यांना कसं जमत असेल असं निर्विकार राहणं, किंवा कणभर रागीटपणाकडेच झुकणारं वागणं? अर्थात त्यात त्यांचे शैक्षिणक, आर्थिक स्तर त्याला कारणीभूत असेल का? त्यात त्यांच्याशी अजूनच तुसडेपणाने बोलणारे डॉक्टरही पाहिलेत. त्यांच्या वागण्याने या अशा शांत राहात असतील का? माहित नाही.
अजून या कामासाठी अयोग्य असूनही नोकरी करणाऱ्या आणि चक्क रुग्णाकडे दुर्लक्ष करणारे महाभाग निराळेच. त्यांना नोकरीवर ठेवणारे बेजबाबदार डॉक्टर तर अजून डेंजर. तो जरा जास्तच गंभीर विषय आहे. असो.
मुलाच्या जन्माच्यावेळी हॅलोविन होता. तेंव्हा रात्री १२ वाजता घाबरवणारा मेकअप करुनही तितक्याच उत्साहाने मदत करणाऱ्या नर्स मी पाहिल्या आहेत. अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का?
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
रोज तेच काम करावं लागणं हा
रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. +11111111111
बाकी लेख नेहमी प्रमाणे मस्तच..
मस्तच.
मस्तच.
मस्तच
मस्तच
सरकारी हॉस्पिटलात बाळंत
सरकारी हॉस्पिटलात बाळंत व्हायचा प्रसंग मायबोलीवरील कुठल्या स्त्रीवर आला असेल असे वाटत नाही पण ज्यांच्यावर आलाय त्यांनी डिलिव्हरी टेबलावर नर्सेसकडून खाल्लेल्या शिव्या व झालेल्या अवहेलनेचे जे अनुभव सांगितलेत ते अंगावर काटा आणणारे आहेत. हे आहेत आपल्या इथल्या डॉक्टर व नर्सेसचे खरे चेहरे. लठ्ठ फी भरणाऱ्यांना अनुभवही तसेच येतात.
आपल्याकडे सर्व्हिस इंडस्ट्रीला शून्य महत्व आहे. त्यामुळे पगार कमी, त्यामुळे तिथे जाणारे बहुसंख्य लोक उदासीन असे सगळे चक्कर आहे.
भारतात एका दिवसात जितके
भारतात एका दिवसात जितके पेशंट्स तपासले जातात तितके पाश्चात्य देशांत एका महिन्यातसुद्धा तपासत नसतील असा माझा अंदाज आहे. त्यात त्यांना भरमसाठ पगार असतात. त्यामुळे जमत असेल हसतमुख रहायला.
मी भारतात जितक्या वेळा रक्ततपासणी केली आहे तितक्या वेळा शीर शोधून एका झटक्यात रक्त काढणार्या बायका असतात. पाश्चात्य देशांत नर्सिंगची तीन वर्षाची डीग्री घेणार्या बायकांनासुद्धा ४ वेळा सुई टोचल्याशिवाय रक्त काढता येत नाही. पुष्कळ वेळा शीर मिळत नाही म्हणून मी घरी येऊन पुन्हा १-२ दिवसांनी रक्त द्यायला गेले आहे. असे भारतात कधीही होत नाही. साध्या साध्या रोगांचे डायग्नॉसिस करायला पाश्चात्य देशांत डॉक्टर्स पुस्तके उघडतात नाहीतर गुगल करतात. कित्येक वेळा रोगी आपलाआपण बरा होतो आणि काहीही डायग्नॉसिस होत नाही.
पाश्चात्य देशांत सिस्टीम वाईट आहे असे म्हणणे नाही पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. उगाच तुलना करण्यात काहीच अर्थ नाही.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मध्यरात्री तीन वाजता आलेली नर्सही छान बोलत राहते. >>+१
शीर शोधून एका झटक्यात रक्त काढणार्या बायका असतात.>>>भारतात एका दिवसात जितके पेशंट्स तपासले जातात तितके पाश्चात्य देशांत एका महिन्यातसुद्धा तपासत नसतील... म्हणून त्याचा भरपूर सराव होऊन त्यांना एका झटक्यात रक्त काढणे जमत असेल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणून त्याचा भरपूर सराव होऊन
म्हणून त्याचा भरपूर सराव होऊन त्यांना एका झटक्यात रक्त काढणे जमत असेल. >> Exactly.
सॉरी पण हे आर्वजून
सॉरी पण हे आर्वजून लिहिन्यामागे काय उद्देश आहे? आम्ही बघा कसे भारी अमेरिकेत राहतो आणि आम्हाला कशी छान सेवा मिळते? Humble bragging ?
आय मिन कमॉन, दोन देशांची तुलना कशाला? परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. First world, third world , फरक असणारच. आपली सर्व सिस्टीम वेगळी आहे, शिक्षण व्यवस्थेपासून ते ओव्हर पॉप्युलेशन पर्यंत प्रॉब्लेम आहे. पण काही चांगले doctors , nurses भारतात आहेत. शिवाय स्वस्त आहे, इथल्या कोपे पेक्षा कमी पैशात बिल येतं.
साध्या साध्या रोगांचे
साध्या साध्या रोगांचे डायग्नॉसिस करायला पाश्चात्य देशांत डॉक्टर्स पुस्तके उघडतात नाहीतर गुगल करतात. कित्येक वेळा रोगी आपलाआपण बरा होतो आणि काहीही डायग्नॉसिस होत नाही. >> अगदी खरयं सुमुक्ता. गेले २ वर्ष माझा उजवा डोळा लाल होतो. म्हणजे सतत नाही पण मधेच कधीतरी अचानक. मी ३ वेगवेगळे डॉक्टर ट्राय केले. पण कोणीही माझ्या डोळयाला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांगितले नाहीये. ते जी औषध देतात त्यामुळे तात्पुरते बरे वाटते. पण काही महिन्यांनी परत डोळा लाल होतो.
आम्ही बघा कसे भारी अमेरिकेत
आम्ही बघा कसे भारी अमेरिकेत राहतो आणि आम्हाला कशी छान सेवा मिळते? >> असे कुठे म्हटले आहे?
आणि फरक हा आहेच कि, म्हणुनच लेखिका म्हणते.......अशा वेळी कितीही नाही म्हटलं तरी तुलना होणं साहजिकच आहे. रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे.
दोन्हीकडे नर्सचे अनुभव घेतलेत
दोन्हीकडे नर्सचे अनुभव घेतलेत. एक डिलीव्हरी भारतात एक अमेरिकेत. तुम्ही म्हणता तसा फरक निश्चितच आहे.
पण वर उल्लेखल्याप्रमाणे पगाराचा फरक, कामाचे तास, नर्सच्या कामाचा कमी समजला जाणारा दर्जा (निदान भारतात तरी) हे सगळे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.
सुमुक्ता, आपली पोस्ट सुद्धा
सुमुक्ता, आपली पोस्ट सुद्धा खरी असेल तर तिलाही हेडरमध्ये घ्यायला हवे. कारण लेख वाचून मला श्या यार कुठे मी भारतात जन्म घेतला असे झाले होते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जोक्स द अपार्ट, माझ्याईतक्या लहान वयात डॉक्टरचे जास्तीत जास्त अनुभव घेणारा मायबोलीवर दुसरा कोणी नसावा. असे मला आपले उगाच वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला आजवर बहुतांश अनुभव चांगलेच आले आहेत. काही अनुभव सरकारी हॉस्पिटलमधील आहेत. ते संमिश्र आहेत. अर्थात मला अमेरीकेचे अनुभव नसल्याने तुलना करू शकत नाही. पण जास्त फी आकारणी आणि कामाचा लोड कमी ही कारणे पटण्यासारखी असल्याने सर्विस चांगली असू शकतेच.
मात्र ते तुम्हाला पैसे घेऊन सर्विस द्यायला बसले आहेत म्हणून हे छान अनुभव येत आहेत. पण ओवरऑल अमेरीकन माणसांचे अनुभव मला फार वाईट आले आहेत. अमेरीकन असल्याचा फार अहंकार आणि एटीट्यूड जाणवतो त्यांच्या वागण्याबोलण्यात.
मॉरल ऑफ द स्टोरी - माणसाचा खरा स्वभाव त्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्यांशी, नोकर चाकर वेटर यांच्याशी वागताना समजतो.
संदर्भ - मुन्नाभाई
सॉरी, पण मलाही हे सरसकटीकरण
सॉरी, पण मलाही हे सरसकटीकरण वाटलं. माझी सख्खी आत्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स होती. तिची धडाडी, कामातले नैपुण्य, ग्रामीण भागात सरकारी नोकरी करताना केलेले कष्ट , कामात अजिबात म्हणजे अजिबात पाट्या न टाकण्याची वृत्ती हे मी स्वतः जवळून पाहिले आहे. अनेक अवघड बाळंतपणे तिने केली आहेत. तिने जिथे जिथे काम केले तिथे तिथे तिची आठवण काढणारी माणसं आहेत.
मान्य आहे, की सगळ्या नर्सेस अशा नसतात, किंबहुना अशा नर्सेस कमी असतात. पण असतात, नक्की असतात.
खाजगी रुग्णालयांपैकी इथल्या कोलंबिया एशियातल्या नर्सेसचा माझा तरी अनुभव नक्कीच खूप छान आहे.
सुमुक्ता, वावे +१
सुमुक्ता, वावे +१
अमेरिका/युरोप/जपान/ऑसी/न्युझी या प्रगत श्रीमंत देशात डॉक्टर व त्यांच्या हाताखालील व्यावसायिकांवर असलेला कामाचा ताण व भारतासारख्या देशात असलेला ताण याचा जरा तरी विचार करा. भारतात माल-प्रॅक्टिस आहे यात दुमत नाही. पण ती भारतात प्रत्येक क्षेत्रात आहे. त्याचेही कारण रिसोर्सेस आणि मागणी यांचे व्यस्त प्रमाण.
तेव्हा ही तुलना करणे अयोग्य आहे. भारतातली व्यवस्था सुधारण्यास अनेक बाबतीत वाव आहे. पण तो अश्या तुलना केल्याने होणार नाही.
अमेरिका या धनाढ्य देशात गरीबांना मरायला टेकल्याशिवाय वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. भारतातले प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका व मग जिल्हा स्तरावरील सिविल इस्पितळे यांचे जाळे (+ इ.एस.आय. व लष्करी/निमलष्करी वैद्यकीय संस्था) गोरगरीबांना जी सोय देते त्याची तुलना जवळजवळ अशक्य.
टण्या + 1000... पेरफेक्त
टण्या + 1000... पेरफेक्त प्रतिसाद !!
अमेरिका या धनाढ्य देशात
अमेरिका या धनाढ्य देशात गरीबांना मरायला टेकल्याशिवाय वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. भारतातले प्राथमिक आरोग्य केंद्रे, तालुका व मग जिल्हा स्तरावरील सिविल इस्पितळे यांचे जाळे (+ इ.एस.आय. व लष्करी/निमलष्करी वैद्यकीय संस्था) गोरगरीबांना जी सोय देते त्याची तुलना जवळजवळ अशक्य.>>>> +१
इथल्या नर्सेस चा अनुभव कितीही चान्गला असला तरी त्यासाठी घेतली जाणारी फी , महिन्याला भरत असलेला प्रिमियम बघितला तर ही सुविधा न मिळाली तरच नवल!
भारतातल्य आरोग्यसेवेची तुलना इथे करणे म्हणजे कम्पेरिन्ग अॅपल टु ऑरेन्जेस
आपल्याईथे गोरगरीबांना काय
आपल्याईथे गोरगरीबांना काय सुविधा मिळतात नक्की?
मागे ते गोरखपूर ऑक्सिजन कांड झाले आणि तीस चाळीस मुले दगावली त्यानंतर दर चार दिवसाने त्या धाग्यावर तश्याच कैक बातम्या आल्या आहेत.
अमेरीकेत यापेक्षा काही वाईट घडते का गोरगरीबांबाबत?
प्राजक्ता बरोबर बोललात...
प्राजक्ता बरोबर बोललात... अँपल आणि ओरंज कॅम्पेयर केलाय इथे..
जितका जास्त पैसे तितकी जास्त सुविधा..
हे म्हणजे 5 स्टार हॉटेल मधला अनुभव घेऊन, आमच्या इथल्या लॉज मध्ये असे का नाहीत... 5 स्टार वली रेसेप्शनिस्ट किती हसतमुख, लॉज मध्ये का रागीट रेसेप्शनिस्ट
हा प्रकार आहे.
रुन्मेश +१
रुन्मेश +१
गरीबांना मरायला टेकल्याशिवाय वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. >> हे प्रचंड ब्लँकेट आणि अतिरंजित विधान आहे.
हॉस्पिटल मधल्या डॉ. आणि नर्सेसचे कामाचे तास (ग्रेज अॅनेटॉमी बघुन आणि डॉ गवांदे यांची पुस्तके वाचुन) कमी असतील असं वाटत नाही. भारतातही नर्सेसना सलग दोन दिवस काम आणि मग चार दिवसाचा वीक असलं काही ऐकलं आहे. बाकी हा धागा म्हणजे जनरलायझेशनची हद्द आहे. सुमुक्ता ब्लड वर्क करयला शीर न मिळणे हे असं जनरलायझेशन करुन सांगतायत की ऑपरेशन टेबलवरुन पेशंटही परत येत असतील असं वाटावं.
भारतात असताना थोडा घसा लाल दिसला, कान नुसता दुखतोय सांगितलं तरी अॅन्टीबायोटिक किती वेळा घशाखाली घातलय आणि परदेशात सर्दी पडसे ताप एक आठवडा रहात नाही तो पर्यंत आपण डॉ कडे का जात नाही यावर विचार करा.
बाकी उडदा माजी काळे गोरे.
कमेंटची आकडेवारी बघूनच कळले
कमेंटची आकडेवारी बघूनच कळले होते की कुठेतरी आग लागली आहे.
असो, गंमत करतेय.
मी सहसा वादात न पडण्याचा प्रयत्न करते, कारण दिवसाच्या शेवटी लिखाण करून किंवा वाचून त्याचा त्रास कुणाला व्हावा किंवा करून घ्यावा असं वाटत नाही. पण इथे काही मुद्दे जरूर मांडायचे आहेत.
सरकारी दवाखाने, गरजूना किंवा बाकी मोफत मिळत असलेल्या सुविधा मी पाहिलेल्या नाहीयेत, त्या केवळ बातम्यांतच पाहिल्यात. यावरून 'हिला काय माहित गरीब लोकांचे हाल' वगैरे कमेंट करू शकते कुणीही. त्यावर मी काही बोलू शकत नाही. मी ज्या अनुभवांबद्दल बोलत आहे त्यात खाजगी आणि मोठी हॉस्पिटल आणि छोटे खाजगी दवाखाने आहेत.
गेल्या वर्षी ४-५ आठवडे वडिलांचे आजारपण झाले, जहांगीरला वेगळी रुम घेऊन त्यांची सर्व सोय केली होती. पैसे कमी मोजले नाहीत, डॉक्तरांचा अनुभवही चांगलाच. एकूण सर्व उत्तम झाले, हेही छानच. पण तिथे नर्स बाबतीत महिन्याभरात कुठलाही चांगला लक्षात राहण्याजोगा अनुभव आला नाही.
२०१३-२०१५ दोन वर्षांत दर दीड ते दोन महिन्यांत मुलाला पेडियाट्रिशियन कडे न्यायची वेळ यायची. दीड वर्षाचा होता, त्याला बालदमा सुरु झाला. दोन वर्षांत डॉकटरने शक्य होईल तसे औषधे लिहून दिलीच, पण तिथे इतक्या वेळा जाऊनही नर्स किंवा रिसेप्शनिस्टने पैसे घेणे किंवा चेकअप करणे या पलीकडे काही केले नाही. तिथे मला वाटत नाही दिवसाला सरकारी दवाखान्यासारखे भरमसाठ पेशन्ट्स असतील. अगदी एलोपॅथी नाही म्हणून आयुर्वेदिक डॉकटरकडे वर्षभर औषधे झाली. तिथेही तेच. हे झाले नेहमीचे.
मुलगा आजारी असताना, दीनानाथला रात्री १२ वाजता घेऊन गेलो तर चार लोकांनी त्याला धरून इंजेक्शन दिले. मी त्याना किती म्हणाले की मी धरते त्याला, तुम्ही द्या, ऐकले नाही. तेच हाल त्याला ताप असताना. दोघांनी जोरात धरून त्याला जोरात पंखा लावून जोरजोरात थंड पाण्याने अंग पुसले. त्यात दयामाया नाहीच. हे सर्व मुलगा दीड वर्षाचा असताना. हे सर्व लिहितानाही ते प्रसंग आठवून अंगावर काटा येत आहे. मुलीचा डेन्टिस असो किंवा साधा सर्दी तापासाठी गेलेला फिजिशियन किंवा ऑर्थोपिडिक, कुठेही या वेगळा अनुभव नाही.
यासर्वांमधे कुठे सरकारी हॉस्पिटलची तुलना नाहीये. सर्व ठिकाणी भरपूर पैसे खर्च केले. उपचारांबद्दल इथे काही बोलायचे नाहीये मला. पण अनेक त्रासांतून जाताना कुठेही नर्सकडून मदत, किंवा सहानभूती किंवा एक ओळखीचं हसू देखील मिळालं नाही.
हे सर्व लिहायची इच्छा नव्हती कारण तो अतिशय त्रासदायक काळ होता. पण इथले मेसेज वाचून लिहिणं गरजेचं वाटलं. मी जे लिहिलेत ते अनुभव ते सर्वसाधारण मतं नसून स्वतःचे अगदी नजीकच्या काळातील अनुभव आहेत.
विद्या.
कोणताही लेख असो ..आजकाल तुमचे
कोणताही लेख असो ..आजकाल तुमचे म्हणणे कसे चुकीचे आहे किंवा तुम्ही जे सांगता त्यापेक्षा जग कसे वेगळे आहे, हे सांगण्यातच लोकांना रस असतो असे दिसते.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
एखादा लेख लिहायचा आणि तो का लिहिला, आपल्याला काय सांगायचे आहे, आपले असे मत कश्यामुळे झाले याचे स्पष्टीकरण द्यायचे. लोकांना तेही पटले नाही तर त्यावर चर्चा :-|
प्रत्येक वेळी असे होणार असेल तर येथे जे काही चांगले लेखनाचे धागे येतात तेही बंद होतील
दोघांनी जोरात धरून त्याला
दोघांनी जोरात धरून त्याला जोरात पंखा लावून जोरजोरात थंड पाण्याने अंग पुसले. त्यात दयामाया नाहीच. हे सर्व मुलगा दीड वर्षाचा असताना.
>>>>>>
हा प्रकार मी देखील पाहिला आहे. अगदी वर्णन केले तसेच. मलाही ते झेपले नाही. तेव्हाही दोघे जण होते. एक स्त्री एक पुरुष. मी त्यानंतर पुरुषाला बोललोही, जरा सावकाश करा रे, जीव घ्याल का पोराचा. तसे तो म्हणाला, नेहमीचे आहे हे आमच्यासाठी. तापात थंड पाण्याने पुसून पंख्याखाली धरले की पोरं अशी तडफडणारच. त्यांना घट्टच धरावे लागते. त्याक्षणाला मला तरी पटले ते. माझ्यासारखा हळव्या स्वभावाच्याला असे करणे जमलेच नसते.
ईथे मला मुन्नाभाई आठवतो. हसतखेळत चल लेट जा मामू बोलणारा मुन्नाभाई आवडतो, तर इमोशन्स कण्ट्रोलमध्ये ठेवता नाही आले तर उद्या माझ्या मुलीचे ऑपरेशन करताना माझा हात थरथरेल असे सांगणारा डॉ अस्थाना सुद्धा आपल्या जागी योग्य वाटतो.
छान
छान
रोज तेच काम करावं लागणं हा
रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे >>> +111
ग्रामीण भाग याबाबतीत खुपच मिश्किल मुळातच कमी लोकसंख्या असल्याने दवाखानेही दोन ते तीन असतात. तिथे काम करणार्या नर्सही अमुक तमुक ची बहिण,लेक, असते. त्यामुळे दवाखान्यात गेल कि चुकुन शेजार्याच्या घरात गेल्यासारख वाटत. पारावरच्या गप्पा चालाव्यात अशी नर्स निवांत गप्पा मारत बसलेली असते. नंबर लाबुनही काही उपयोग नसतो. एखाद्याला तालुक्याच्या गावाला जायची घाई असते तो मधेच शिरतो. ज्यावेळी नर्सला तुमची दया येईल त्याचवेळी तुम्हाला आत सोडले जाते. त्यातुन नर्स बरोबर तुमचे काही वाद असतील तर तुमच्या आधी तिन चार नंबर सहज जाणार. आत गेल्यानंतर डॉक्टरही जुजबी चौकशी करुन ठरलेल्या सात ( सात म्हणजे सातच एक चढ नाही कि कमी नाही) गोळ्या देणार मेडिकल ची चिठ्ठी देणार त्यात जर चार गोळया दिल्या असतील तर त्यापैकी आपण दोनच घेणार एकुण सगळा सावळा गोंधळ पण पेशंट हमखास बरा होतोच. समजा जर मान, पाठ दुखत असेल तर तीच नर्स बाहेर आल्यावर हळुच सांगते नौशाद भाईंना दाखवा पायाळु आहेत .नौशाद भाई तीन ते चार वेळा पाठिवरुन मानेवरुन त्यांचा पायाळु पाय फिरवुन दुखणे कमी करतात. समजा लहान मुलांची मान दुखावली असेल आणि डोक्टरी उपाय कमी पडत असतील तर त्याच नर्सच्या आजीला निरोप धाडला जातो. मग ती आजी आणी गावातील एक समवयस्क आजी या दोघी मैत्रीणी मिळुन त्या बाळाला एका साडीवरुन चेंडुसारखे वर खाली करतात त्या बाळाला साडीत गुंडाळुन एका ठराविक पद्धतीने फिरवतात.पाहणार्याला हा अघोरी प्रकार वाटतो पण ते लहान मुल मोठ मोठ्याने खिदळत असते. चार दिवस जे मुल सतत रडत असते अगदी मलुल झालेले असते ते अगदी फ्रेश होते
( मी यातील कोणत्याही गोष्टिचे समर्थन करत नाही)
सुमुक्ता ब्लड वर्क करयला शीर
सुमुक्ता ब्लड वर्क करयला शीर न मिळणे हे असं जनरलायझेशन करुन सांगतायत की ऑपरेशन टेबलवरुन पेशंटही परत येत असतील असं वाटावं.>>>> अमितव असे जनरलायझेशन मी अजिबातच केलेले नाही. तुम्ही "ऑपरेशन टेबलवरुन पेशंटही परत येत असतील" असा अर्थ काढला असेल किंवा तुम्हाला असे वाटले असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. विद्याने लेखात रक्त तपासणीचा उल्लेख केला तेव्हा मी माझा अनुभव सांगितला.
माझ्या प्रतिक्रियेखाली मी असेही म्हटले आहे की "पाश्चात्य देशांत सिस्टीम वाईट आहे असे म्हणणे नाही पण प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. उगाच तुलना करण्यात काहीच अर्थ नाही." पण त्याकडे तुम्ही संपूर्ण दुर्लक्ष केलेत.
माझ्या मुलाचा जन्म यु.के. मध्ये झाला आहे आणि मला येथील हॉस्पिटल्सचा खूप चांगला अनुभव आहे. पण माझ्या काही मित्र-मैत्रिणींना वाईट अनुभव येथेही आले आहेत. प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. उगाच तुलना करण्यात काहीच अर्थ नाही!!
हॉस्पिटल मधल्या डॉ. आणि नर्सेसचे कामाचे तास (ग्रेज अॅनेटॉमी बघुन आणि डॉ गवांदे यांची पुस्तके वाचुन) कमी असतील असं वाटत नाही. >>> कामचे तास कमी नसतात पण त्या तासांत भारतात वैद्यकीय सेवा देणारे लोक किती पेशंट्स तपासतात आणि पाश्चात्य देशांत वैद्यकीय सेवा देणारे लोक किती पेशंट्स तपासतात ह्यावरून सुद्धा कामाच्या ताणाचे प्रमाण कळेल!!!
छान आहे लेख.
छान आहे लेख.
रोज तेच काम करावं लागणं हा ज्याच्या त्याच्या नोकरीचा अनिवार्य भाग आहे. पण ते आपण कशारितीने करतो यालाच महत्व आहे. नाही का? >> मला वाटतं की हा या लेखाचा मुख्य मुद्दा आहे . आणि भारतात तरी हा attitude फक्त वैद्यकीयच नाही तर सर्वच क्षेत्रात फार कमी आहे. कारणे काही ही असोत , कस्टमर हा केंद्रस्थानी कधी ही नसतो . तो एक सर्वात दुर्लक्षित घटक असतो . साधा रिक्षावाला सुद्धा आपण काही सांगितलं तर त्यावर हो की नाही काही म्हणत नाही . जर कुठे जरा जरी चांगला अनुभव आला तर ती मोठी घटना असते आपल्यासाठी.
अपेक्षित प्रतिसाद!
अपेक्षित प्रतिसाद!
लेख आवडला आणि पटला
लेख आवडला.
लेख आवडला.
४ महिन्यांपूर्वी पुण्याहून
४ महिन्यांपूर्वी पुण्याहून कैलिफोर्निया ला आलो, इथे आल्यावर शाळेत जाण्याआधी English proficiency test झाली मुलांची. वय वर्षे ५ असलेल्या माझ्या मुलाची चाचणी झाल्यावर feedback देताना सांगितले की त्याला आलं सगळे फक्त एक उत्तर चुकीचे दिले,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Q. What does a nurse do?
A. She gives appointments.
त्याला अजून एक दोनदा विचारलं, तो म्हणाला माझ्या डौक्टर कडे नर्स हेच करते!
कुरूडी
कुरूडी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुझा प्रतिसाद सगळ्यात भारी आहे.
Pages