कंपास पेटी

Submitted by ओबामा on 20 September, 2017 - 00:33

कंपास पेटी
**********************
आपल्या सगळ्यांच बालपण अनेक लहानसहान गोष्टींनी व्यापलेले असते, मधल्या काळात त्या गोष्टींच आपल्याला अप्रूप वाटेनास होत आणि आयुष्याच्या माध्यान्ही अचानक त्या सापडल्यानंतर मन लहान मुलासारख बागडायला लागत. त्या सर्वांमधली “कंपास पेटी” ही ह्रदयाच्या सर्वात जवळची. आपल्या बालपणातील अनेक गमतीजमती, गुपीत, भांडण या पेटीशी जोडलेली असतात. त्या रम्य दिवसातील लाखों आठवणी हळुवारपणे अलगद जपून ठेवणार्‍या या छोट्या गोष्टीला “पेटी”शिवाय दुसरा योग्य शब्द नाही. ही आपल्या शालेय जीवनातील एक अविभाज्य घटक!! शालेय जीवनात सदासर्वदा सोबत करणारी ती आपली सर्वात पहिली जवळची मैत्रीण होती. दफ्तर या माझ्या मित्राबरोबरच ती माझ्या आयुष्यात आली आणि कायमची माझी बनून राहिली. हा मित्र बदलत राहिला पण ती मात्र तशीच काळजात खोल घर करून राहिली.
आजकाल बाजारात नानाविध रंगाच्या, आकाराच्या सुबक पेट्या मिळतात. आमच्या लहानपणी कॅमलिनची पिवळ्या-केशरी रंगाची पेटी जवळजवळ सगळ्यांकडे सारखीच होती आणि तिनेच आमच्या बालपणावर राज्य केले. “एकपत्नी” व्रतासारखेच माझे “एकपेटीत्व” व्रत होतं. इयत्ता चौथीत नवीन प्राथमिक शाळेत जाताना आजोबांनी घेऊन दिलेली, लहानपणीची ती मी अजून जपून ठेवली आहे. आजोबांची एक आठवण म्हणून आणि तेव्हांपासून प्रत्येक परीक्षेत याच “कंपास” पेटीमुळे “पास” होतोय या (अंध)विश्वासामुळे तिचा कितीही रंग उडाला, पोचे आले तरी, मी तिची आणि नंतर तिने माझी साथ सोडली नाही.
खरेतर, ही अगदी आपल्या बायकोसारखी असते. नवीन असताना सतत जवळ बाळगाविशी, सर्वांसमोर मिरवाविशी वाटते, तिचा विरह जराही सहन होत नाही आणि नंतर हिची आपल्याला येवढी सवय झालेली असते की तिच्यावाचून सगळ्या ठिकाणी आपले अडते. स्वतःचे रंग उडालेले आणि कित्येत भाग झिजलेले असून देखिल प्रत्येक महत्वाच्या वेळी ही सतत सावलीसारखी आपल्या सेवेला तत्पर असते.
नवी नवरी सासरच्या घरी नांदायला येताना जसे रूखवताचे सामान मिरवत घेऊन येते ना, तशीच ही पण आपल्याबरोबर १५ सेमी ची पट्टी, कर्कटक, गुणे, कोनमापक, बिनटोकाची पेन्सिल, पांढरा शुभ्र खोडरबर आणि टोक करायचा शार्पनर इ. अनेक गोष्टींचा लवाजमा बरोबर घेऊनच येते. नंतर हळूहळू हिच्या आणि आपल्या संसारात शाईचे पेन, त्याच्या निब, शाईचा ड्रॉपर, धारदार ब्लेडस, बॉलपेन, त्याच्या वेगवेगळ्या लांबीच्या स्प्रिंगज अशा बर्‍याच गोष्टींची सतत भर पडत राहते. दरमहिन्याला पॉकेटमनीतील सुट्ट्या पैशांची चळत देखील तिच्या संसाराचे ओझे वाढवायची. यातील बर्‍याच गोष्टींची मित्रांबरोबर देवाणघेवाण चालू रहायची. पण गृहिणीला शेजारणीकडे दिलेला डबा सुखरूप परत येत नाही तोपर्यंत जशी ती बैचेन असते तसेच आपल्या वस्तू परत सुखरूप येईस्तोवर मनाची घालमेल व्हायची.
हिने परीक्षांच्या काळात गणपती, दत्त यांसारख्या खर्‍या जगातील देवांना आदराने स्थानापन्न केले तर इतर वेळी हि-मॅन, सुपरमॅन सारख्या काल्पनिक विश्वातल्या हिरोंना पण कायमच मान दिला. नंतर कधीमधी घरच्यांची नजर चुकवून माधुरी, काजोल, ऐश्वर्या सारख्या देवींनापण हिने न कुरकुर करता आपल्या संसारात प्रवेश करू दिला. हिच्या आतल्या भागात कायमच शाळेच्या वेळापत्रकाची व भारताच्या तिरंग्याची हक्काची जागा होती. बाकी आतल्या इतर प्रत्येक वस्तूची जागा व संख्या ठरलेली असायची. शाईचे पेन, दोन टोक केलेल्या नटराजच्या पेन्सिली, पांढरे म्हणावे असे एक खोडरबर, आवडत्या रंगाचे शार्पनर, पायाने किंचीत अधू झालेला कर्कटक, संख्या पुसल्याने स्वतःची उंची हरवलेली पट्टी इ. सामान भरले जायचे. सणासुदीला घर जसे पाहुण्यांनी खचाखच भरते तसेच परीक्षेच्या काळात हिच्यात अजून काही नवीन गोष्टींची भर पडायची. ओझ्याने वाकून कधीमधी कुरकूर करायची पण साथ नाही सोडायची.
शाळेतली ही जवळची मैत्रीण कॉलेजला गेल्यावर का कोणास ठाऊक एकदम नकोशी होते. खिशात एक बॉलपेन अडकवल की हिची फारशी गरज नाही भासायची. हिला फक्त प्रयोगशाळेत बरोबर नेले जायचे आणि इतरवेळी बिचारी आपली आठवण काढत घरात झुरायची.
परवा सोलापूरला (माझ्या माहेरी) घर साफ करताना अचानक जुना खजिना सापडावा तशी ही सापडली. अजूनहि तशीच देखणी आहे. तिला बघून माझ्या डोळ्यात पाणी आले, ती पण बहुधा माझ्या मायेच्या स्पर्शाने मुकपणे रडली असेल. आत अजूनही दोन टोक केलेल्या पेन्सिली, संख्या पुसट झालेली पट्टी, अधू कर्कटक आणि लाला रंगाचा शार्पनर तसाच होता. या मौल्यवान खजिन्यातील खोडरबर मात्र त्याच्या मित्रांची ताटातूट होऊन कुठेतरी हरवला होता. झाकणावरचा दत्तगुरूंचा फोटो तसाच प्रसन्न व मनःशांती देणारा भासला तर उजव्या कोपर्‍यातील स्पायडरमॅन अजूनही तसाच तरूण व डॅशिंग होता. आतल्या भागात भारताच्या तिरंग्याचे रंग अजूनही तसेच गहिरे होते आणि इयत्ता दहावीचे वेळापत्रकही अजूनही ठळक दिसत होते. ते काढून पाहिले तर अचानक त्यामागे दडवलेला “हम आपके है कौन” मधला माधुरीचा एक सुंदर फोटो सापडला. आम्हांला भुरळ पाडलेले तिचे ते लोभस हास्य अजून तसेच मनमोहक भासत होते. या सतत बदलणार्‍या आधुनिक जगात मी मात्र नक्की बदललो होतो. हट्टाने मी हिला सिंगापूरच्या सामानात भरले. सिंगापूरातील कार्यालयीन रूक्ष कामकाजातून व कुटुंबाला वेळ देऊन झाल्यावर कधी बालपणात रमावेसे वाटले तर हिचे बोट धरून त्या रम्य आठवणींच्या डोहात थोडा वेळ स्वच्छंदपणे डुंबूंन घेतो. मन हलके व ताजतवाने होते. ही मैत्रिण मनाला खूप शांतता व समाधान देते.
माझ्या प्रत्येक लेखाची पहिली वाचक आमच्या सौभाग्यवती. मी कंपासपेटीला दिलेली पहिल्या जवळच्या मैत्रिणीची उपमा वाचून ती जरा खट्टू झाली. मग तिचे सुरू झाल, नवरा हा “दप्तरा”सारखा असतो. येवढी पुस्तके वाहून सुध्दा जशी त्याला बुध्दी येत नाही तसेच एवढी वर्षे संसार करून सुध्दा नवर्‍यांच्या अकलेत काहीच वाढ होत नाही. वर त्याचं ओझं आयुष्यभर वागवाव लागतं. शेवटी हसत हसत माझे बंद करकचून आवळले गेले.......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख !!!
बालपणिच्या आठवणि ताज्या झाल्या..

खुप छान लिहलं आहे. खरचं ही कंपास खुप साथ करायची. आम्ही काही मैत्रीणी कंपासला छान वास यावा म्हणून त्यात उदबत्ती ठेवायचो.

खरच, खूप आठवणी जाग्या झाल्या तुमचा लेख वाचून...माझ्या कम्पास पेटीच्या झाकणामध्ये आतून ६ दिवसन्चे वेळा-पत्रक
छान लिहून लावलेले असायचे आणि सगळ्या वस्तून्च्या खाली एक कागद असायचा, त्यात ५ रू. ची नोट जपून ठेवलेली असायची... त्या वेळेस ५ रू. मध्ये खूप खाऊ, आणि काय मिळू शकायचे...

@ निर्झरा -- धन्यवाद. खरोखरीच खूप सुंगधी कंपास पेटी आणि तशाच सुंगधी आठवणी असणार तुमच्या!

किती छान लिहिलय! अगदी नॉस्टॅलजिक झाल!
लहानपणी या कप्प्याकप्प्याच्या कॅमलिन कम्पासचे केवढे कौतुक.
पण माझी कॅमेलिन कम्पास घ्यायचे स्वप्न ते स्वप्नच राहिले. एक तर त्या वेळी ती ३५-४० रुपयाला होती, म्हणजे आमच्या दृष्टीने महागच. दर वेळि स्टोअरमधे घ्याय्ला गेले कि आशाळभुतपणे हि कम्पास बघाय्चे. आणि शेवटी १०-१५ रु वाली अमिताभ / कुठल्या हिरोचे चित्र असलेली कम्पास घेउन परताय्चे.
असो. तरीही काय काय आठवणी आहेत तिच्याही! कम्पास उघडली कि झाकणाच्या आतील बाजुस छान अक्षरात स्केच पेन वै. ने सजवलेले टाइम टेबल असाय्चे. शार्पनर असले तरी बाबान्चे वापरलेले दाढीचे ब्लेड, सेफ्टी पिन, झालच तर अभ्रक, ५रु चे नाणे, सुटे पैसे सगळ्यात खालच्या कागदाखाली असाय्चेच. सेन्टेड खोडरबरमुळे एक टिपिकल वास असाय्चा कम्पासमधे. Happy कम्पास रचुन ठेवणे म्हणजे रिकामपणीचा उद्योग असाय्चा.

मस्त लिहले आहे.
मागच्या महिन्यात मुलीला कॅमेलिन चा कंपास घेउन दिला तेव्हा बालपणीचा काळ आठवला. अत्ता D-Mart मध्ये ७५ रुपयात मिळते. माझ्या लहानपणी जे साहित्य होते तेच अत्ता पण आहे फक्त १ मेकॅनिकल पेन्सिल फ्री मध्ये देत आहेत.

@ अग्निपंख , @ मेघा, @ मी_आर्या & @ साहिल शहा --- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती...रादर आहे.

मी एक अगरबत्ती तोडून कम्पासमध्ये ठेवायचो... आणि कधीही काही घाण वास आला, तर माझी ती पेटी मदत करायची..

छान लेख Happy

माझी कंपासपेटी माझे पैश्यांचे पाकीट होती. त्यात झाकणाच्या आतल्या बाजूला त्याच आकाराचा एक जाडजूड कागद तीन बाजूंनी चिकटवून मी एक कप्पा केलेला. आणि त्या कप्प्यात दहा रुपयांपासून अगदी शंभर रुपयांपर्यंत नोटा असायच्या. आणि ती कंपासपेटी अशीच कुठेही बाकावर पडलेली असायची. सर्वांना माहीत होते त्यात मी पैसे ठेवतो, पण कधी ही त्यातील एक साधा पैसा चोरीला गेला नाही. असे वर्गमित्र मिळणे नाही Happy

एक कंपासपेटीची वाईट आठवण म्हणजे, राष्ट्रगीत चालू असताना मागच्या बाकावरच्या मुलाने माझ्या बाकावर त्याची कंपासपेटी उभी ठेवली. आणि भारतमाता की जय बोलून मी खाली बसताच ती नको तिथे घुसली. मी कळवळतच जमिनीवर आडवा झालो. मला ईतके लागेल याची कल्पना त्यालाही बिचार्‍याला नव्हती.

एकदम नॉस्टॅलजिक ....
आमच्या लहानपणी कॅमलिनची पिवळ्या-केशरी रंगाची पेटी जवळजवळ सगळ्यांकडे सारखीच होती आणि तिनेच आमच्या बालपणावर राज्य केले >> माहित नाही का पण आमच्या शाळेत ओमेगा खुप फेमस होती, पण नायिका बदलली म्हणून काय झाले, लव्ह स्टोरी सारखीच Happy
आपल्या लहान पणी मोबाईल नव्हते म्हणून आपण या रम्य आठवणी बाळगून आहोत..

@ ऋन्मेऽऽष :- धन्यवाद. लईच बाका प्रसंग म्हणायचा. नशीब त्याला कर्कटक नाही गावला... नाहीतर काही खरे नव्हते.

@ manish.rajguru:- तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण नायिका बदलली म्हणून काय झाले, लव्ह स्टोरी सारखीच >>>> +१.
त्या छोट्या पेटीत आपले विश्व सामावलेले असायचे आणि म्हणूनच आपल्या जिव्हाळ्याची होती.