विवाहोत्सुक तरुणांसाठी मार्गदर्शिका, भाग :-१

Submitted by अतरंगी on 23 September, 2017 - 03:08

The following content may contain the elements that are not suitable for some audiences, viewer's discretion advised. Happy

"ए माठ्या, अरे चल की पुढे " इति आमचे इनमीन साडेतीन वर्षांचे चिरंजीव, आमच्या पुढे थांबलेल्या एका कारला....

त्याच्या नंतरचे बायकोचे तीक्ष्ण कटाक्ष आणि मुलांच्या समोर काय बोलावे आणि काय नाही हे उपदेश ऐकून त्यादिवशी आम्हाला धड चार पेग पण नीट पिता नाही आले.... त्यानंतर तीन चार दिवस बायकोने अबोला धरल्याने आम्ही तसे मनातून खुश होतो. पण अबोल्यामुळे ती आम्हाला कामे सांगत नसल्याने आणि आम्ही कोणी शंभरदा कानी कपाळी ओरडल्याशिवाय कोणतेही काम करत नसल्याने, आम्हाला भरपूर म्हणजे अगदी भरपूर वेळ होता. त्याच रिकाम्या वेळात आमच्या मनात एक अतिशय महत्वाचे सामाजिक कार्य घोळू लागले.... आमच्या सर्व विवाहोत्सुक ज्युनिअर्स साठी एक गाईड लिहिण्याचे !!!!

विद्यार्थीदशेत हॉस्टेलवर, कामासाठी बॅचलर म्हणून घराबाहेर राहिलेल्या मुलांची लग्न झाल्यावर फार पंचाईत होते. घराच्या चार भिंतीत राहिलेल्या मुली जेव्हा माप ओलांडून आपल्या घरात येतात, तेव्हा आपल्या सवयींमुळे क्षणोक्षणी आपले माप काढले जाते. अशा आमच्यासारख्या सर्व सुजाण बालकांना समाज आणि घर यांच्या साचेबद्ध निरस जीवनपद्धतीत आणण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे. ते लिहिण्यास आम्ही जातीने पुढाकार घेत आहोत. सर्व होतकरू लग्नाळू तरुणांसाठी लग्न करताना काय काय तयारी करावी लागते याचे हे रेडिमेड गाईड आम्ही मायबोलीच्या माध्यमातून जनतेस अर्पण करत आहोत.....

प्रथमतः आपल्याला आपल्या अंगात मुरलेल्या खूप बेसिक सवयींपासून सुरुवात करावी लागणार आहे...

१. बाथरूमला गेल्यावर, अंघोळ करताना दरवाजा लॉक करायचा असतो !!!!

२. आंघोळ झाल्यावर टॉवेल बेड वर किंवा खुर्चीवर न फेकता स्टँडवर वाळत घालायचा असतो.

३. बाथरूम मध्ये ड्रेनच्या डायगोनली विरुद्ध बाजूने पाणी ओतून सगळा कचरा ड्रेनवर आणण्याला बायका बाथरूम स्वच्छ करणे असे म्हणत नाहीत. बॅचलर मुलांच्या या स्किलला बायकांच्या लेखी काही महत्व नसते.

४. नुसता अंतर्वस्त्रे घालून घरात लोळायची, फिरायची हॉस्टेल ची सवय बंद करावी. हे खरे खूप अवघड आहे पण प्रयत्न करून जमू शकते.
वि.सू.१:- अंतर्वस्त्र हे एकदाच वापरून धुवायला टाकायचे असते हे अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका.
वि.सू.२:- एकच वस्त्र तीन चार दिवस वापरू नये, किंवा विकांताला धुवू या म्हणून साठवून ठेऊ नये.

५. घरात राहणाऱ्या लोकांना स्वच्छतेचा OCD असतो हे सदासर्वकाळ ध्यानांत असू द्या. ते लोक खाली जमिनीवर पडलेली गोष्ट उचलून नुसता झटकून तोंडात टाकत नाहीत. धुवून खातात किंवा फेकून देतात.

६. जेवायच्या आधी बाकी सगळे लोक हात धुतात. आणि तुम्ही पण धुवावा अशी त्यांची (अवाजवी) अपेक्षा असते. हात धुणे म्हणजे भिजवणे नाही. साबण लावून स्वच्छ धुणे.

७. सिंक मधली भांडी नुसता पाण्याने विसळून न वापरता साबणाने धुवून मग स्वच्छ कापडाने पुसून मग वापरावी. इथे स्वच्छ कापड ही सापेक्ष टर्म आहे. अंगातला बनियन, बरमुडा वगैरे स्वच्छ कापड या त्यांच्या व्याख्येत बसत नाही. त्याचे कापड ते वेगळे विकत आणतात. आणि हो महत्वाचे म्हणजे फरशी पुसण्याचे आणि भांडी पुसण्याचे कापड वेगवेगळे असते.
(वि.सू.१.:- भांडे धुताना त्याचे झाकण पण धुवायचे असते.
वि.सू.२.:- भांडे धुताना आतून व बाहेरून दोन्ही बाजूने धुवायाचे असते)

८. स्वच्छतेचा OCD असलेले लोक भाज्या, फळे धुवून खातात. धुणे म्हणजे फक्त नळाखाली धरून भिजवणे असे अपेक्षित नसून आपण GF ला फर्स्ट डेट वर नेताना जशी खसखसून आंघोळ करतो तशी ती भाजीला आणि फळांना घालायची असते.

९. मॅगी बनवणे, कांदा परतून त्यात चटणी आणि कोणतीही भाजी/अंडे घालून पावासोबत खाणे याला स्वयंपाक करणे म्हणत नाहीत. इथे आम्ही स्वतः अजून स्वयंपाक शिकत असल्याने जास्त लिहू शकत नाही.

१०. कधी काळी कोणी बायकोसमोर तिच्या नातेवाईकांनी, तिच्या मैत्रिणीच्या नवऱ्याने, तुमच्या एखाद्या मित्राने एखादा पेग ऑफर केला तर 60 किंवा 90 ml कोरा पेग एका दमात पिऊन खाली ठेवायचा नसतो. 30 ml पेग मध्ये खंडीभर पाणी, कोल्ड्रिंक्स, बर्फ घालून तोंड वाकडे तिकडे करत तो भरपूर वेळ प्यायचा असतो किंवा अर्धवट सोडायचा असतो.

इतके सर्व नियम वाचून दमला असाल. बॅचलर मुलांना इतकं वाचायची सवय नसते. त्यामुळे भाग 1 इथेच संपवत आहोत. अजून आशा खूप गोष्टी लग्न करायच्या आधी कराव्या लागतात. त्याची यादी पुढील काही भागांमध्ये येईलच. तोपर्यंत वरील यादीतील काही गोष्टी अंगवळणी पडायला सुरुवात करता आली तर पहा.

क्रमशः......

भाग २ :- https://www.maayboli.com/node/64003

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईच्या गावात !!
मग मला नाही करायचेय लग्न Lol

तरी पुढचा भाग येऊद्या Lol

Lol चांगली सुरुवात.
खरं तर ह्या वरच्या लिस्ट मधे ही अ‍ॅडीशन करता येईल.

२. आंघोळ झाल्यावर टॉवेल बेड वर किंवा खुर्चीवर न फेकता स्टँडवर वाळत घालायचा असतो...
न धुता?????

Lol भारी लिहीलय.
माठयाची सुरुवात तर टोटल लोल आहे. अगदी अगदी होत होतं सगळी कडे.

बा अतरंगी,
या पामराचा तुला साष्टांग प्रणिपात.

पण बर्‍याचश्या चांगल्या सौई मला आहेत.
फडकी वापरत होतोच वेगवेगळी.
अंतर्वस्त्रे आणि जोड खूपसारे आहेत. सो एकदम जातात धुवायला. वॉम चं संपूर्ण कंत्राट माझ्याकडे (यात कपडे प्रेस ला टाकणे आणणे आलंय. तुझेच कपडे असतात प्रेस ला, माझा एकही नाही सो तूच कर बा ते काम हे ऐकल्यानी ते काम मीच करतो).
भांड्यांकरता बै येतात सो तो ही इश्यू नै.
घरात पसारा घालायची सवय नै तर तेही ओके आहे.
सो एकंदरीत बर चालंलय...

२. आंघोळ झाल्यावर टॉवेल बेड वर किंवा खुर्चीवर न फेकता स्टँडवर वाळत घालायचा असतो...
न धुता?????
>>>>>>>>>>>

टॉवेल कश्याला धुवायचा असतो रोज? कधीतरीच धुतो ना...
जर कोणीतरी आंघोळीच्या जागी टॉवेलच गरम पाण्यात भिजवून अंग पुसत असेल तर गोष्ट वेगळी..
अन्यथा आंघोळ जेवढी स्वच्छ कराल तेवढे टॉवेल धुवायची गरज कमी..

पण ओला टॉवेल बेडवरच फेकला जातो हे खरेय. बहुतेक आपण मुलगे लोक पॅण्ट चढवतो आणि टॉवेल काढतो. झिप लावायची शिल्लक असते. ती दोन हातांनी लावावी लागते आणि ती न लावता टॉवेलची दांडी शोधत फिरणे रिस्की असते म्हणून आपण जवळच्या बेड वा खुर्चीवर भिरकावून देतो. दुर्दैवाने तो सकाळच्या घाईत तसाच राहतो आणि बायकांच्या शिव्या खातो.
मी आईच्या खातो Happy

टॉवेल कश्याला धुवायचा असतो रोज?>>>>

Exactly. मला तर ही कमेंट वाचून एका मुलाने ही केली आहे याच्यावर विश्वासच बसला नाही!!!!

हॉस्टेल मधला टॉवेल फक्त 3 केस मध्ये धुतला जातो.

१. घरी गेल्यावर आईने पाहिला तर...
२. Gf रूम वर राहायला येणार असेल आणि ती आपलाच टॉवेल वापरायचा चान्स असेल तर Wink
3. चुकून फरशी पुसताना वापरला गेला तर परत अंग पुसायला वापरायच्या आधी....

नुसते छान छान म्हणून चालणार नाही, भर घाला.>>>>>+१

या सामाजिक कार्यात फुल ना फुलांची पाकळी म्हणून तुमचे योग्य दान द्या. सायली ने सुरुवात केली आहे.

(सायलीचा प्रतिसाद वाचल्यावर मनोगत:- अति करतात हे OCD झालेले लोक. तोंड पुसायला वेगळा आणि हात पुसायला वेगळं फडकं म्हणे. ज्या हाताने तोंड धुतले तेच हात पुसलेले फडके तोंड पुसायला चालत नाही???? काय एक एक नखरे! उद्या पाय पुसायला वेगळा, हात पुसायला वेगळा, बाकी अंग पुसायला वेगळा, चेहरा आणि केस पुसायला वेगळा वेगळा टॉवेल पण पाहिजे म्हणतील !!! )

योकू:- आदर्श नवऱ्याची स्पर्धा घेतली तर तुला उत्तेजनार्थ बक्षीस तरी नक्कीच मिळेल....

हॉस्टेलमध्ये मी आंघोळही एक दिवसा आड करत असल्याने निम्मे दिवसच वापरला जायचा. त्यातही टॉवेल गुंडाळलेल्या अवस्थेतच अर्धा तास रूमभर फिरणे होत असल्याने अंग पुसायची गरज पडायची नाही. असेच सुकून जायचे.

टॉवेल कश्याला धुवायचा असतो रोज?>>>>
Exactly. मला तर ही कमेंट वाचून एका मुलाने ही केली आहे याच्यावर विश्वासच बसला नाही!!!!
हॉस्टेल मधला टॉवेल फक्त 3 केस मध्ये धुतला जातो.
१. घरी गेल्यावर आईने पाहिला तर...
२. Gf रूम वर राहायला येणार असेल आणि ती आपलाच टॉवेल वापरायचा चान्स असेल तर Wink
3. चुकून फरशी पुसताना वापरला गेला तर परत अंग पुसायला वापरायच्या आधी....
नवीन Submitted by अतरंगी on 24 September, 2017 - 13:22
>>>>
गफ्रे हाॅस्टेल रूमवर रहायला येऊ शकते?

Pages

Back to top