नातीगोती- भाग १

Submitted by अज्ञातवासी on 13 August, 2017 - 04:16

"पप्पा!"
"बोल!"
"अंह असा रिप्लाय नाही द्यायचा, वन वर्ड मध्ये."
पप्पा खळखळून हसला. क्वचित पप्पा असा हसायचा.
"बोल माझी माऊ."
"पप्पा वीस वर्षाची आहे मी, माऊ काय म्हणतोय?"
"तू माझी खाऊ माऊ आहेस. बोल ना काय झालंय?"
सर्वात आधी मी माझ्या पप्पाविषयी सांगते. माझा पप्पा सहा फूट उंच आहे. लांब नाक, गोरा रंग, दणकट बांधा आणि पाणीदार डोळे. पप्पा नेहमी शांत असतो. जास्त काही नाही बोलत. पण एक सांगू? त्याने आयुष्यात मला कधीही इथे नको जाऊ, हे नको करू असं सांगितलं नाही. इतकी मोकळीक माझ्या कुठल्याही मैत्रिणीला नव्हती. मात्र काही गोष्टींविषयी पप्पा थोडं वेगळं वागायचा. उदा. माझे सगळे गॉगल ओव्हल शेपचे होते. पप्पा चॉईस दुसरा काय?
"पप्पा तुला मी विश्लेषविषयी सांगितलं होतं ना?"
"हो माऊ. मलाही तो चांगला वाटला."
'आमचा ब्रेकअप झालाय."
"पप्पा थोडा हलला खरा, पण त्याचा शांत चेहरा तसाच होता."
"कारण सांगशील माऊ.'
"तो आधी खूप समजूतदार होता रे, पण आता त्याला जिथेतीथे मी हवी असते.मलाही काही स्वतंत्र आयुष्य आहे का नाही? मेसेजला रिप्लाय नाही दिला तर लगेच रडगाणं चालू होतं त्याच. कंटाळलीय मी त्याला."
"माऊ आधी शांत हो."
तेवढ्यात ममा तिथे आली. ममा म्हणजे आमच्या घरातील बॉस. पपा कधी तिला विरोध करायचा नाही. मग ती चुकीची का असेना. मला आयुष्यात कधी पप्पा तिच्याशी भांडल्याच आठवत नाही.
"आजचा स्वयंपाक छान होता."
पप्पा फक्त हसला.
"तू गोड पदार्थ चांगले बनवतोस हं."
"तू गोड आहेस म्हणून तुला सगळं गोड वाटतं."
माझा पप्पा कधीकधी असं बोलून ममा ला सरप्राईज द्यायचा.
"पुरे." ममा हसली.
दोन्ही कायम आपापल्या कोशात राहत असत. प्रेम होतं, नव्हतं असं नाही. पण दोन्हीही एक मर्यादेत राहून प्रेम करत होते.
"माऊ. मला झोप येतेय ग."
"अरे आज तू दिवसभर झोपूनच आहेस." ममा म्हणाली.
"आज खरच झोप येतेय."
"बरं झोप. मी आणि माऊ गप्पा मारते."
ममा चक्क मला माऊ म्हणाली.
"नाही मलाही झोपायचंय," ममाच्या तोफखाण्यासमोर उभं राहण्याआधी मीही पळ काढला.
"माऊ सॉरी ग. झोप येतेय खूप. उद्या बोलू?" पप्पा म्हणाला.
"नको. कधीच नको बोलू माझ्याशी," आणि मी रागावून निघून गेले.
रात्रभर मला झोप येत नव्हती. पप्पाला त्याच्या माऊची चिंता वाटत नसावी? मी तळमळत होते बिछान्यावर. पप्पा तू असा कसा रे निष्ठुर?
तेवढ्यात जिन्यावरून पावलांचा आवाज झाला. कुणीतरी वर येत होतं. मी घाईघाईने पांघरूण घेऊन झोपायचं नाटक केलं.
पप्पाच होता तो. आला असेल माफी मागायला. पण मी त्याला नाही माफ करणार. आज पप्पा रडला तरी चालेल, पण त्याला मी माफ नाही करणार!
पप्पाचा कंठ दाटून आला होता.
"माऊ असं नाही म्हणायचं ग. काहीवेळा आपलीच जीभ आपल्याला तथास्तु म्हणते. आणि त्या व्यक्तीशी नाही बोलता येत कधीच आयुष्यात!"
मी मनातल्या मनात हसत होते. पप्पा तू माझ्याशी बोलल्याशिवाय नाही राहू शकत कधी! उद्या बघ मी कशी तुला त्रास देते बघ. तुला रडवून सोडेन मी.
मी झोपायचं नाटक चालू ठेवलं. पप्पा खाली गेला.
आज सकाळी मी उशिरा उठले. रात्री उशिरापर्यंत जागायचा परिणाम. विश्लेषचे १५ मेसेज. बस झालंय. त्याची मी चांगलीच वाट लावणार आहे आता.
"सायली पप्पाला बोलवं." ममा ब्रेकफास्ट लावता लावता म्हणाली.
"अजून उठला नाही?"
"झोपू दे कधीतरी त्याला. नाहीतर चार वाजताच उठून बसतो तो."
मी पप्पाला बोलवायला गेले. तो गाढ झोपला होता.
मी त्याच्याशी बोलणार नव्हते, पण त्याला उठवण भाग होतं.
मी जोरजोरात त्याला हलवायला सुरुवात केली.
पप्पाचं अंग थंडगार लागत होतं.
"पप्पा उठ. नाटक नको करुस!"
"उठ ना रे. बस झालंय आता!"
हा गोंधळ ऐकून ममा आली.
"काय झालंय?"
"हा उठत नाही बघ."
"मोहन, उठ. उठ पटकन. ब्रेकफास्ट थंड होतोय."
"मोहन..मोहन.."
"आर्या डॉक्टरकाकांना बोलवं...फास्ट..."
मी अक्षरशः पळाले. आणि डॉक्टरकाकाला फोन लावला.
पंधरा मिनिटात डॉक्टरकाका हजर झाले.
डॉक्टरकाकांनी पप्पाची नाडी तपासली. छातीवर दाब देऊन बघितला.
"....सॉरी...ही इज नो मोर..."
मी कोसळले...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Thanks sayuri

ज्या दिवशी मायबोली सोडून जाईन, त्या दिवशी नक्की ही कथा पूर्ण करून जाईन.
पण प्लिज पुन्हा वर काढू नका. आणि किल्ली हे पाप नाही फेडणार मी
Happy