नाटक

Submitted by दत्तात्रय साळुंके on 14 August, 2017 - 03:11

नाटक

झुंजुमुंजु होता, होता घंटा पाखरू वाजवी
सुत्रधार जगताचा सारा संसार जागवी

मित्र योजितो प्रकाश रंगमच उजळला
एक नवा कोरा खेळ रोज रोजच रंगला

नाटकभर तो ताऱ्यांच्या बेटातच वसतो
अंतराळातूनही संवाद पात्राशी साधतो

असा नाटककार हा भलता गोष्टीवेल्हाळ
नऊ रसाची रसवंती नाटक हे मधाळ

........रुणझुणता घुंगरु होइ लावणी घायाळ
.......कुठे वीरश्री दामटते शौर्याचे घोडदळ

.......करुणेत असते जग जिंकण्याचे बळ
.......कुठे गूढता लपून देतसे मेंदूला पीळ

........कधी गडगडतो अनाहुत हास्य कल्लोळ
....... कधी भीती भयानक गिळी जगण्याचे बळ

.........रौद्ररुप भिभत्सेचे उडे मणी थरकाप
.........शांत मनामधे साकारे ईश्वराचे रुप

खेळ रंगविला असा ऊनसावलीचा मेळ
परमार्थी ध्यान नाही कसा आनंद निर्भेळ ?

नात्यांचे रेशम कोश स्वता:भोवती विणले
गाठी सोडता सोडता जीव आतच शिणले

कधी कोणी यावे, जावे वेळापत्रक ठरले
सारे गुळाचे मुंगळे मन ढेपेतच रमले

तो पाऱ्यासारखा निसरडा कशातही राहे
नाना देही नाना रुपे खेळ आपुलाच पाहे

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर..अप्रतिम!
......ह्या जागी काय अभिप्रेत आहे? नवरसांचं वर्णन?.. Happy

>>> कधी कोणी यावे, जावे वेळापत्रक ठरले
सारे गुळाचे मुंगळे मन ढेपेतच रमले
तो पाऱ्यासारखा निसरडा कशातही राहे
नाना देही नाना रुपे खेळ आपुलाच पाहे<<< सुरेख.

अक्षय , राहुल प्रतिसादा साठी धन्यवाद .
नऊ रसाच्या वर्णना आधी मी म्हटले आहे

असा नाटककार हा भलता गोष्टीवेल्हाळ
नऊ रसाची रसवंती नाटक हे मधाळ

हे मधाळ नाटक मधाळ कशाने झाले हे सांगणे गरजेचे आहे . हे रस कोणते हे सांगणे रसिकांसाठी गरजेचे वाटते . अगदीच ताका पुरते रामायण सांगणे अप्रस्तुत वाटते .

Back to top