तेंव्हा तुमची आठवण येते

Submitted by वृन्दा१ on 6 August, 2017 - 13:54

तेंव्हा तुमची आठवण येते
जेंव्हा उन्ह निर्दयपणे भाजून काढतं
जमीन सोसते मुकाट पोळणारे वार
जीव तडफडतो पाण्याच्या एका थेंबासाठी
आतल्या काहिलीला सोसणं असह्य होतं
तेंव्हा तुमची आठवण येते

जेंव्हा लहानपणीच्या ओळखीचा आभाळातला राक्षस गडबडा लोळतो
नुसताच गडगडाट, नुसतीच हूल
न संपणारी प्रतीक्षा आणि फसवी चाहूल
आतला पाऊस आत आणि वरचा पाऊस वर गोठलेलाच राहतो
तेंव्हा तुमची आठवण येते

आता दिवाळीला पूर्वीसारखी थंडी नसते हो
तसं तर आता कशाचच काही खरं नसतं
पण थंडी आणि दिवाळी हे मनातलं समीकरण
तुटता तुटत नाही
लहानपणच्या दिवाळीचं घट्ट धरलेलं बोट
सुटता सुटत नाही
तेंव्हा तुमची आठवण येते

सकाळचा कोवळा प्रकाश
डोळ्यांना होतो नकोसा
आधीच्या दुस्वप्नांचाच
आत्म्यावर असतो ठसा
तेंव्हा तुमची आठवण येते

सकाळची दुपार होते कशीतरी
दुपारची संध्याकाळ होता होत नाही
तेंव्हा तुमची आठवण येते

दिवस मावळायला लागला की
डोळे लागतात भरायला
अंधारात पाहात राहते आरपार
थरथरणारे हात जोडायला
तेंव्हा तुमची आठवण येते

संध्याकाळची रात्र पण लवकर होत नाही
रोजचा हा छळवाद सवयीचा होत नाही
रोज रोज अडकतो छातीत नवा दगड
तेंव्हा तुमची आठवण येते

जेवण्याच्या वेळा आणि मेलेली भूक
टीव्हीच्या गोंधळातच हरवायचं खूप
तेंव्हा तुमची आठवण येते

टक्क उघडे डोळे, झोपेचा घालायचा घाट
थकलेल्या नजरेनं पाहायची उदास पहाट
तेंव्हा तुमची आठवण येते

बापरे! पुन्हा सकाळ आणि पुन्हा दिवस?
रोज नवी धडकी,रोज नवी झळ
कलेकलेनं सरतं गोळा केलेलं चंद्रबळ
तेंव्हा तुमची आठवण येते

चहाची वाफ आणि नजरेत धुकं दाटतं
तोंडात फिरतो घास काहीही नको वाटतं
गोडाची गोडी गायब
तिखटाची चवही कळत नाही
काहीही केलं तरी जीभ काही वळत नाही
तेंव्हा तुमची आठवण येते

दिवसही असे की नको इतके ताणलेले
त्यात मनाचे वाट्टेल तसे खेळ
जमतच नाही हो काहीकेल्या
भूत-वर्तमानाचा मेळ
भविष्य हा शब्द आठवतो
घशात आवंढा दाटतो
तेंव्हा तुमची आठवण येते

मनचक्षूसारखा पॉवरफूल डिजीटल केमेरा कुठला?
कुठेही कट,कुठेही पेस्ट
कुठलाही सीन आणि कुठलेही संवाद
स्वतःचेच स्वतःशी चाललेले वितंडवाद
तेंव्हा तुमची आठवण येते

कसंतरी आवरायचं, कसंतरी सावरायचं
प्रत्येक प्रश्नाला अश्रू हेच उत्तर
तेही बसून राहतात छातीवर
आपण नेहमीच निरुत्तर
तेंव्हा तुमची आठवण येते

कुठेतरी,कसातरी खेळवायचा जीव
तुमची सलणारी-टोचणारी उणीव
बाहेरचं काहीही आत पोचत नाही
त्याचं काही करावं
असंही वाटत नाही
तेंव्हा तुमची आठवण येते

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults