नवी पा.कृ. : ब्रह्माण्डाचे ऑम्लेट

Submitted by अनन्त्_यात्री on 3 August, 2017 - 01:38

लागणारा वेळ: कल्पान्तापर्यन्त
==========
लागणारे जिन्नस: पाककृतीमध्ये दिले आहेत
===========
क्रमवार पाककृती: खालीलप्रमाणे-
=============

(नका डोळयांसी वटारू | नका कानांसी टवकारू
शीर्षक योग्यची "पा.कृ."| वाटे जरी अस्थानी)

प्रथम ब्रह्माण्ड फेटावे | स्थल-काल कुपीत ठेवावे
चांदण-चुऱ्याचे लवण घालावे |चवी पुरते फेटणीत

अणु-गर्भाचे सोलीव कांदे | (बारीक चिरायचे वांधे)
फोडुनी तयांची पुष्ट दोंदे |ढकलावे फेटणीत

आदि-स्फोटाचा अग्नी पेटवा |आकाश-गंगेचा चढवा तवा
तेजोमेघांचे तेल उडवा |दोन थेंबुटे त्यावरी

फेटण त्यावरी हळू ओता | गुरुत्व-कालथ्याने परता
ऑम्लेट बनेल बोलता बोलता |कल्पांता पर्यंत

या पा.कृ. चे प्रकाश-चित्र | देखू न शकती चर्म-नेत्र
म्हणोनी तिचे रेखा-चित्र | सत्वर टाकावे कुणीतरी

Group content visibility: 
Use group defaults

चांगली आयडीया आहे. जे श्रावण पाळतात त्यांनी अंड्याच्या जागी ब्रह्मांड घाला.. शब्द पण मस्त यमकात आहेत

जन्म जन्मीच्या प्रवासात | दिसते विक्रीला हे आक्रीत
परंतु तेंव्हा आत्म्याला | भूक असते मोक्षाची

तोंपासू !! पुढच्या वेळी मनुष्य जन्म सोडताना, थोडी जास्तीची भूक ठेवणार आणि हे नक्की लक्षात ठेवून घेणार. इथे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

हो एकदम मस्त लागतं. आमच्याकडे आज्जेसासुबाई बिगबँगच्या आदल्या दिवशी नेहमी करतात. इंग्लीश सणांना इंग्लीशच रेसिपी असं त्यांचं कित्येक युगांच व्रत आहे.

आम्ही त्याबरोबर ब्लॅकहोलची चटणी लावून खातो. ही एवढी केलेली चटणी , पण कधी , कूठे, कशी गायब होते काही कळत नाही.

हे असले पदार्थ माझ्या गर्लफ्रेण्डलाही जमतात बहुधा...
एकदा मी शाहरूखच्या आठवणीत गाणे गात होतो.. त्याच्याच येस बॉस चित्रपटातील.. चाण्द तारे, तोड लाऊ..
माझ्या गर्लफ्रेण्डने ते ऐकले आणि म्हणाली, खरंच आण रुनम्या.. मी मिठाच्या पाण्यात भिजवून त्यांचे लोणचे घालते

मामी, धन्यवाद.
ब्रह्माण्ड हा फर्स्ट चॉइस ठेवा. नसेलच मिळत तर चण्याचे पीठही चालेल . :))

मामी Lol
एव्हडा ब्रम्हाण्ड घेउन ऑम्लेट काय करायचा? निदान चिकन तरी पाहिजे

ऋन्मेssष , प्रतिसादाबद्दल आभार!
तुमच्या गर्लफ्रेण्डला अजून काही पदार्थ सुचत असतील तर सांगा. बनवून देईन. माझे प्रोफेशनल "कॉस्मिक किचन" मोठ्या ऑर्डर्स नेहेमी घेते. माझ्या स्टाफ मध्ये गॅलिलिओ, न्यूटन व आईनस्टाईन वगैरे शेफ आहेत . Happy

संतोष किल्लेदार, आभार.
ब्लॅकहोलची चटणी नेहमी डार्क मॅटरच्या डब्ब्यात ठेवत जा. गायब होणार नाही. Happy

आमच्याकडे आज्जेसासुबाई बिगबँगच्या आदल्या दिवशी नेहमी करतात. इंग्लीश सणांना इंग्लीशच रेसिपी असं त्यांचं कित्येक युगांच व्रत आहे.
आम्ही त्याबरोबर ब्लॅकहोलची चटणी लावून खातो. ही एवढी केलेली चटणी , पण कधी , कूठे, कशी गायब होते काही कळत नाही. ....... Lol सॉल्लिड!

कुणाला उपग्रहांच्या कोशिंबिरीची क्रुती माहित असल्यास टाकणेचे करावे.

एवढं सारे शिजवेल त्या गॅस शेगड़ीचा लाइटर नक्कीच धूमकेतु असणार !
आवडले तुमचे कॉस्मिक किचन आणि ऑमलेट Happy
चव फक्त श्रावण संपल्यावर घेवू

-मामी, उपग्रहांच्या कोशिंबिरीची कच्ची तयारी चालू केलीय. Happy
-मॅगी, आभार !

-अंबज्ञ, कॉस्मिक किचन आणि ऑमलेटची कृती आवडल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद!
-चव घेण्यासाठी नक्की बोलावीन
-धूमकेतूचा लायटर तितकासा भरोसेमन्द नसल्याने आदिस्फोटाची सेल्फ इग्नायटिंग शेगडी वापरली. Happy

तुमच्या गर्लफ्रेण्डला अजून काही पदार्थ सुचत असतील तर सांगा. बनवून देईन. माझे प्रोफेशनल "कॉस्मिक किचन" मोठ्या ऑर्डर्स नेहेमी घेते. माझ्या स्टाफ मध्ये गॅलिलिओ, न्यूटन व आईनस्टाईन वगैरे शेफ आहेत . Happy
>>>>>>

माझ्या लग्नाचे कॅटरींग तुम्हीच करा की मग राव... तसेही आमच्या पत्रिकेत ग्रहांची दशा वाईट आहे. त्यामुळे आम्ही ठरवलेय, लग्न अंतराळातच करून सुर्याभोवती सात फेरे घेताना लगे हात ग्रहांची दिशाही ठिक करून यावी. फक्त तिथे जेवण कोण पुरवणार याचेच टेंशन होते. पन आता तुम्ही ती जबाबदारी घेत असाल तर घरून लग्नाला परवानगी मिळायलाही हरकत नाही. मेनू वगैरे काय ते मी पामर तुम्हाला काय सांगणार. मी तर पृथ्वी ग्रहावरच्या भारत देशातील मुंबई शहरात दक्षिण दिशेला एका छोट्याश्या घरात राहणारा सूक्ष्म जीव आहे. त्यामुळे तुमचे तुम्हीच काय ते ठरवा. फक्त माझ्या गर्लफ्रेंडला लग्नाच्या जेवणात एक चाट काऊंटरही हवा आहे. तर तेवढे अलका सॉरी उलका चाट जमवता आली तर बघा.. म्हणजे अशी ताजी ताजी उलका अवकाशातून येउन हातातल्या प्लेटवर आदळली तर मजा येईल. रुमाली रोटीच्या काऊंटरला जशी बघ्यांची गर्दी जमते तसे व्हायला हवे. आणि हो, ते मिनरल वाटर तुम्ही द्यालच, पण सोबत ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा तुम्हीच अरेंज केलेत तर बरे पडेल. किंवा त्यापेक्षा अवकाशातला एखादा परीसरच ऑक्सिजनयुक्त करता येईल का? पण सूर्याच्या जवळ असू तर एसी ऑक्सिजन हवा, ते तेवढे बघा.. नाहीतर राहूद्या, सुर्यापासून लांबच बरे, लायटींगला शो येईल.. बाकी अपेक्षा कळवतो गर्लफ्रेंडला विचारून.. पण हे ठरले तर Happy

ऋन्मेऽऽष, आमच्या "कॉस्मिक किचन" ला तुमच्याकडून मिळालेल्या "एक्स्प्रेशन ऑफ इन्टरेस्ट" बद्दल धन्यवाद!
घरून लग्नाला परवानगी मिळाली की लगेच लग्नाची तारीख कळवा. मग व्हेन्यू व मेन्यू बद्दल सविस्तर बोलता येईल Happy