बिनीचा किल्ला उर्फ विचित्रगड अर्थात किल्ले रोहिडा

Submitted by जिप्सी on 13 June, 2013 - 01:22

कधी कधी अचानक ठरलेला ट्रेक एक वेगळाच आनंद आणि कायमची "आठवण" ठेऊन जातो ना. असंच काहिसं आमच्या रोहिडा ट्रेकच्या वेळेस घडले. गुरूवारी दिपकने मेसेज केला कि शनिवारी कुठेतरी जायचे का? बरेच दिवस ट्रेक केला नाही. शेवटचा आमचा ट्रेक तुंग तेलबैला झाला त्याच्यानंतर या ना त्या कारणाने साधारण सहा महिने कुठलाच ट्रेक झाला नाही. तेंव्हा येत्या शनिवारी रोहिड्याचा छोटासा ट्रेक करायचा फायनल झाला. मी मुंबईहुन पुण्याला यायचे आणि तेथुन दिपकबरोबर बाईकने रोहिडा किल्ला करायचा असं ठरलं. शुक्रवारी मुंबईत रात्री अचानक पावसाने जोर धरला. ऑफिसमधुन घरी येईपर्यंत चिंब भिजलो. पाऊस तुफान कोसळत होता, शेवटी जड अंतःकरणाने दिपकला फोन केला आणि सांगितले कि असाच पाऊस रात्रभर पडत राहिला तर उद्याचे कॅन्सल!! रात्री साडेबारावाजता बाहेर बघितले तर पाऊस थोडा कमी झाला होता, लगेचच दिपकला एसएमएस केला कि उद्या येतोय रे. Happy

सकाळी सहा वाजता कुर्ल्याहुन स्वारगेटची गाडी पकडली. आदल्या दिवशी पाऊस पडुन गेल्याने वातावरण अगदी धुवून पुसुन लक्ख केल्यासारखे होते. वाशी खाडीपुलाहुन चक्क कर्नाळ्याचा सुळका अगदी स्पष्ट दिसत होता त्याचे अंगठा उंचावून केलेले ऑल दि बेस्ट स्विकारत निघालो तर पुढे प्रबळगड, कलावंतीणीचा सुळका, इर्शाळगडही धुक्यातुन मान उंचावून पहात होते. खंडाळ्याजवळ राजमाची किल्लाही अगदी स्पष्ट दिसत होता. थोडे पुढे पूर्व द्रुतगती मार्गावर लोणावळ्याच्या पुढे लोहगड-विसापूर आणि तुंग तिकोना हि जोडीही हातात हात घालुन उभी होती. या सर्वांना मनोमन वंदन करून साधारण आठ-साडे आठच्या दरम्यान वाकडला पोहचलो.
तेथुन पुढे दिपक, मी आणि गणेश असे दोन बाईकवर तिघेजण भोरच्या दिशेने निघालो. निघतानाच गणेशने सुचना केलेली कि कात्रज बोगद्याजवळ कालच अपघात झाल्याने तिथुन गाडी हळु चालवा. आरामात बाईक रायडिंगचा आनंद घेत साधारण साडेदहा-अकराच्या दरम्यान भोरला पोहचलो. रोहिड्याच्या पायथ्याशी असलेल्या बाजारवाडीचा रस्ता विचारून थोड्याच वेळात बाजारवाडीला पोहचलो. बाईक्स गावाजवळच पार्क करून गड चढण्यास सुरुवात केली. नेहमीप्रमाणेच याही आमच्या ट्रेकची सुरूवात दुपारी साडेअकरा-बाराच्या दरम्यान झाली. Happy

भोरच्या आधी काहि अंतरावर नीरा नदीचा असा वक्राकार प्रवाह पहावयास मिळतो. यालाच नेकलेस पॉईंट असेही म्हणतात.
प्रचि ०१
रोहिडा किल्ल्याविषयी (माहिती विकिपीडियाहुन साभार):
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत ३ ते ४ किल्ले आहेत. यापैकी एक रोहीड खोर्यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीडा’. रोहीडखोरे हे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसलेले आहे. या खोऱ्यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा किल्ला हे रोहीड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदि सुविधा पोहचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला विचित्रगड किंवा बिनीचा किल्ला असे देखील संबोधले जाते.

प्रचि ०२
रोहिडा किल्ला बाजारवाडी गावातुन

प्रचि ०३

प्रचि ०४

या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसर्‍या दरवाजावर असणार्र्‍या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशाहीने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून इ.स. १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला.कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीडाचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला भोरकरांकडे होता.

प्रचि ०५

प्रचि ०६

पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायया पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो. येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे. याचे पाणी बाराही महिने पुरते. येथून ५-७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे.

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
फारसी शिलालेख

प्रचि ११
मराठी शिलालेख

प्रचि १२

आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे. ह्या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी तर दुसरे किल्लेदाराचे घर आहे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर रोहिडमल्ल उर्फ भैराबाचे मंदिर लागते. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. रोहीडाचा घेर तसा लहानच आहे. किल्ल्याच्या आग्रेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहेत. गडाच्या उत्तरेकडील भागात टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे.

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

वातावरणात एक प्रकारचा गारव असल्याने किल्ला चढताना दमछाक झाली नाही. एका वेळेसच ऊन, पाऊस, आभाळ आणि आकाश असे विलक्षण दृष्य किल्ल्यावरुन दिसत होते. किल्ल्याचा घेरा जास्त नसल्याने दिड-दोन तासात किल्ला व्यवस्थित पाहुन होतो. आम्ही साधारण साडेचार वाजता गड उतरलो. माझ्या आतेभावाचे घर भोरला असल्याने त्याच्याचकडे मस्तपैकी जेवलो आणि साधारण साडेपाच सहाच्या दरम्यान पुण्याकडे निघालो. संपूर्ण प्रवासात पाऊस आम्हाला फक्त दोनदाच भेटला एक सुरूवातीला गड चढताना आणि गड पूर्ण उतरून बाजारवाडी गावात आल्यावर. शहाण्या मुलासारखे त्याने मला मस्तपैकी फोटो काढु दिले. Proud

भोर ते खेडशिवापुरपर्यंत ट्राफिक नसल्याने प्रवास छान झाला. पुढे खेडशिवापुरपासुन जे घाणेरडे ट्राफिक सुरू झाले ते कात्रजच्या बोगद्यापर्यंत. बाईक असल्याने कशीतरी वाट काढत आम्ही थोड्याच वेळात कात्रज बोगद्यापर्यंत आलो नाहीतर २-३ तास ट्राफिकमध्ये वाया गेले असते. पुढे बोगद्यातच काहि ठिकाणी barricades लावल्या होत्या. पण कशासाठी त्याचा काहि अंदाज येत नव्हता. रस्त्याच्या काही भागात सुकी माती टाकलेली दिसत होती. बोगद्यातच काही माणसं उभी होती आणि हात हलवून हळु चाला म्हणुन सांगत ओरडत होती. आम्हाला वाटल पुढे अपघात झाला असेल किंवा ऑईल सांडल असेल. थोडं पुढे गेल्यावर काही पॅचवर चिक्कार चिखल साचलेला दिसला आणि नेमकं तिथेच गाडया स्लीप होत होत्या. आमच्यापुढेच गणेशची बाईक होती. तिथे उभे असलेल्या माणसांपैकी एकाने अचानक पुढे येऊन गणेशला हाताने थांबण्याचा (हळु चालवण्याचा) इशारा केला, त्याने बाईकला ब्रेक मारला आणि त्याची बाईक स्लीप झाली. मागुन आमच्या बाईकनेही त्याला वाचवण्यासाठी ब्रेक मारला तर आमची बाईकही स्लीप झाली. Sad गणेशच्या पायाला थोडं लागलं. दिपकला जास्त लागल नाही पण त्याच्या बाईकचा आरसा मात्र फुटला. इथे मी चिखलात लोळलेलो, माझ्या पायाला, हाताला आणि मानेला मुका मार लागला, चेहर्‍यावर, हनुवटीवर खरचटलं होत आणि त्यामुळे चेहरा सुजलेला, चष्म्याचेही नुकसान झाले. Sad आमचे कपडे, हातपाय सगळे चिखलाने भरलेले (त्याही परिस्थिती नायक मधला अनिल कपूरची आठवला :फिदी:). एक एक्टिवा तर चक्क ३६० डिग्रीमध्ये फिरली. त्या माणसाने गाडी तशीच टाकुन लगेच बाजुला झाला कारण मागुन बस येत होती. असे एकामागोमाग एक गाड्या (अगदी ४ व्हिलरही) नेमक्या त्याच पॅचवर स्लीप होत होत्या. लोक त्या चिखलात पडत होते. तिकडे उभे असलेल्या लोकांच्या चेहर्‍यावरही , "हा घसरलात/पडलात ना, आता या एका बाजुला" असा हावभाव होते. आयुष्यात पहिल्यांदाच ४ व्हिलर गाड्या अशा फिरताना बघत होतो. Happy आणि हे सगळं त्या कात्रज बोगद्याच्या मधोमध घडत होते. आम्ही पटकन त्या बोगद्याच्या बाहेर आलो.

या अशा चिखलाने माखलेल्या अवस्थेत मी मुंबईला घरी जाणे शक्यच नव्हते (नाहीतर भटकंती कायमची बंद झाली असती Sad ) म्हणुन पिंपरीला असलेल्या मित्राला प्रसादला फोन करून त्याच्याकडे रहायल येतो म्हणुन सांगितले.
आता प्रश्न असा होता कि घरी काय सांगायचे? लगेच कारणं तयार झाली. Happy
गणेश - घरी बायकोला सांगणार कि गड उतरताना पाऊस चिक्कार झाल्याने कपडे सगळे चिखलाने भरले.
दिपक - वाकडला घरी जाऊन दुसर्‍या दिवशी मुंबईला परतनार असल्याने कपड्याचा प्रश्न नव्हता. पण गाडीच्या फुटलेल्या काचेचं काय? तर खाली मुलं क्रिकेट खेळताना त्यांनी काच फोडली. Happy
जिप्सी - गड उतरताना पाय घसरून तोंडावर पडलो आणि चेहरा खरचटला, चष्मा फुटला. Happy

रात्री प्रसादकडे थांबलो. चिखलाचे कपडे धुवून काढले (घरी समजु नये म्हणुन Happy ). बर्‍याच दिवसांनी प्रसादला भेटलो, मस्तपैकी गप्पा मारल्या, जेवलो आणि झोपलो. दुसर्‍या दिवशी वाकडहुन निघालो आणि दुपारी अडीचला मुंबईत पोहचलो.

अशा प्रकारे या वर्षीच्या पावसाळी भटकंतीची सुरूवात झाली. Happy

(प्रचि दिपकच्या मोबाईलमधुन)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ नंबर.... ट्रेक ची सुरुवात तर मस्तच झाली.... फोटो आणि वर्णन छानच....
तुझी पोझ कॉपी करु दिल्या बद्दल धन्यवाद!!! Wink

यामाहा-FZ-S Wow..माझी आवडती bike... though I got Honda-Dazzler Happy
एकुणच प्रवासवर्णन आणि प्राची सुरेख ! वाचुन मजा आली. आता लव्करच ऱोहिडा गठायला हवा नाहितर विचित्र वटेल Wink

रोहिडा मला यायचे होते... पण. असो.

वृत्तांत मस्तच.. प्रचि १२ तील अँगल आवडला.

जमल्यास आता भटकंतीला स्वल्पविराम द्यावा. Happy

तो १ ला १२ वा आणि १६ वा प्रचि भाव खाऊन जाता आहे.
बाकी प्रचि आणि लेखही सुंदर Happy
जमल्यास आता भटकंतीला स्वल्पविराम द्यावा. Happy >> १+ काळजी घेरे Happy

फोटो मस्तच आहेत.
.... बाईक्स स्लिप होउनही कुणालाही फार लागले नाही हे त्यातल्या त्यात बरे म्हणायचे .... काळजी घ्या रे सगळेच -
आता कान उपटायला घरचेच माणूस असणार - त्यामुळे सूचनांचा भडिमार ऐकून घ्यायची तयारी ठेव - जिप्स्या ....

mastach photos ani varnan nefmipramane.

trekking la jatana bike padlyashivay trek successfull hot nahi Happy parampara chalu rahile mhanje.

Aso kalaji ghe.

लेखन आणि फोटो आवडले ..
वर्णन छान आहे..

लहान मुले ( १२-१३ वर्षांची )/ फॅमिली सोबत जाता येण्या एवढा सोपा आहे की अवघड आहे ?

या गडावर टवाळ टोळकी असतात का ? काही गडांवर असल्या टोळक्याचा फार त्रास होतो , म्हणोन विचारले..

इतके सुंदर प्रचि आणि लेख... पण फुटेज शेवटाच्या कात्रज भोगद्यांन खाल्लं!!
.. पहिल्याच चढाईला धडपडलात नां.. आता आख्खो शिजन सेफ नि बेस जातलो..इडापिडा गेली! Happy

.. हां आणखी एक!! माझे दुर्गभ्रमण नांवाचा एक ग्रुप इथे आहे. तू त्यांत कां सामिल होत नाहीस? Happy ..

माझे दुर्गभ्रमण मध्ये हा लेख न आल्याबद्दल णिशेध.

जिप्सि,
एकदम झकास्स.
मी सुद्धा भोरचिच (हिर्डोशि) आहे. गावची भेट घडवल्याबद्द्ल धन्यवाद.

keep it up.

पहिल्याच चढाईला धडपडलात नां.. आता आख्खो शिजन सेफ नि बेस जातलो..इडापिडा गेली!>>>>हे मस्त आहे, हेम Happy

माझे दुर्गभ्रमण नांवाचा एक ग्रुप इथे आहे. तू त्यांत कां सामिल होत नाहीस? ..>>>>>मी आहे त्या गृपमध्ये सामिल, पण माझ्या वृतांतात लेख कमी आणि प्रचिच जास्त असल्याने तो प्रचि विभागात असतो (फोटो वृतांत) . Happy

प्रसिक, जान्हवी धन्यवाद Happy

कात्रज च्या बोगद्यातला चिखल त्या yz राठोड आणी त्याच्या सारख्यांमुळे झाला आहे.. नवीन कात्रजच्या बोगद्याला धोका आहे (पडण्याचा) असा रिपोर्ट असल्यामुळे जरा कारवाई झाली त्याच्यावर... नाहीतर ती ही झाली नसती....