पारिजात... मनातला

Submitted by मनीमोहोर on 26 June, 2017 - 10:36

पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी .

पारिजातकाची अगदी पहिली आठवण खुप लहानपणीची आहे . वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही खूप घरं बदलली . त्या पैकी एका घराच्या अंगणातच खूप मोठं परिजातकाचं झाडं होतं . श्रावण महिन्यात ते बहरलं आणि रोज अंगणात फुलांचा सडा पडू लागला . आमची आजी देवभोळी होती . तिने प्राजक्ताचा लक्ष शंकराला वहाण्याचा संकल्प केला . पहाटेच्या वेळी फुले वेचणे, त्यांचे दहा दहाचे वाटे करून ती मोजणे, वहीत त्याची नोंद ठेवणे ही सगळी कामं आम्हा मुलांकडे . उजाडतानाच ती आणि तिच्या बरोबर आम्ही ही देवळात जात असु. शंकराच्या काळ्या भोर पिंडीवर ती केशरी पांढरी नाजूक फुले फार शोभून दिसत असतं. एवढा बहरलेला प्राजक्त दारात आणि फुल वेचणारी उत्साही सेना घरात... तिचा संकल्प बघता बघता पुरा झाला . आमची आजी म्हणजे खरी गोष्टीवेल्हाळ . पुराणातल्या गोष्टींचा तिच्याकडे स्टॉक ही भरपूर होता . तिनेच आम्हाला हे फुल कसं स्वर्गात होत, श्रीकृष्णाने ते कसं पृथ्वीवर आणलं आणि ती फुले का पडती शेजारीची गोष्ट.. असं सगळं रंगवून रंगवून सांगितल्याचं आज ही आठवतंय .

पाच पाकळ्यांच केशरी देठाचं हे नाजूक फुलं लहानपणी आवडत होतं कारण ते स्वर्गातून आलं होतं म्हणून . तसंच ‘टप टप पडती अंगावरती प्रजकाची फुले’ ही कविता ही त्यातल्या गेयते मुळे म्हणायला आवडायची . पण जस जशी मोठी होत गेले, मराठी साहित्य वाचू लागले तस तशी हे फूल साहित्यिकांच आणि प्रेमीजनांच ही आवडतं आहे हे समजू लागलं आणि मग ते आणखीनच आवडायला लागलं. जसं .. रमाबाईंच्या हातातली न कोमेजलेली प्राजक्ताची फुलं बघून ‘स्वामी’ मधलं माधवरावांनी त्यांचं केलेलं कौतुक किंवा ‘आहे मनोहर तरी ‘ मध्ये सुनीता बाईंवर पु. ल. नी झाड हलवून केलेला प्राजक्ताचा वर्षाव.. … हे आजही तेवढाच आनंद देतात . ‘उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे’ ही गझल मात्र हुरहूर लावल्या शिवाय रहात नाही .

दिवस पळत होते . माझं लग्न झालं आणि मी मुंबईला आले. ते ही गिरगावात . तिथे कुठली झाडं आणि कुठली फुलं ? सगळा मोलाचाच मामला . प्राजक्ताची फुलं खूप नाजूक असतात म्हणून फुलवाल्यांकडे ती मिळणार नाहीत त्यामुळे हा श्रावण आपल्याला प्राजक्ता शिवायच काढायचा आहे अशी मी माझ्या मनाची समजूत घातली . मात्र माझ्या मंगळागौरीच्या दिवशी यजमानानी सकाळीच बनाम हॉल लेन मधल्या वसईवाल्यांकडून माझ्यासाठी प्राजक्ताची फुलं विकत आणली . मी अगदी हरखून गेले . त्यावेळी काय वाटलं हे सांगणं शब्दातीत आहे . ती फुलं ओंजळीत घेऊन मी खोलवर श्वास घेत तो वास मनात साठवून घेतला . नजरेतूनच त्यांना थँक यू म्हणाले . त्यात प्रेम, आपुलकी, माया, विश्वास सगळंच होतं . ह्या नाजूक फुलांमुळे लग्नानंतरच्या नव्या दिवसातलं आमचं नवं नातं मात्र चांगलंच दृढ झालं . माझी मंगळागौर त्या फुलांनी सजली आणि माझं मन भरून आलं.

मी कोकणात आमच्या घरी पहिल्यांदा गेले ती पावसाळ्यात आणि ते ही दिवेलागणीच्या वेळी . मी खळ्यात पाऊल टाकलं आणि पारिजातकाच्या सुगंधाने माझं स्वागत केलं . त्या नवख्या वातावरणात नि अनोळखी माणसात मला माझा जिवा भावाचा सखा मिळाल्या सारखं वाटलं आणि मी निश्चिन्त झाले . थोड्या वेळाने पुतण्याने ‘काकू, ही घे तुला’ असं म्हणून जेव्हा फुलं माझ्या हातात दिली तेव्हा तर परकेपणा नाहीसाच झाला. आमच्या पूर्वजांनी दूर दृष्टीने हे झाड पुढच्या खळ्यातच लावले आहे . त्यामुळे पाव्हण्याचे आपोआपच सुगंधी स्वागत होऊन पाव्हणा खुश होतो . रात्रीच्या वेळी तर ओटीवर ही पारिजातकाचा सुवास भरून राहतो.

पुढे ही आयुष्यात वेळोवेळी प्राजक्त भेटतच राहिला . वाघा बॉर्डर बघायला गेले होते . दोन्ही बाजूने असलेले लष्करी गणवेशातले जवान , त्यांचे टॉक टॉक वाजणारे बूट, त्यांचं चाललेलं संचलन, त्यांचे कडक सॅल्युट, जोरदार आवाजातल्या घोषणा, आणि एकंदरच सगळा कोरडा लष्करी कारभार ... मन अगदी उदास होऊन गेलं होतं . तशातच अचानक एका फुललेल्या प्राजक्ताने माझं लक्ष वेधून घेतलं आणि ती फुलं पाहून उदासी कुठच्या कुठे पळाली . तीच गोष्ट जालियनवाला बाग इथली . जिथे इंग्रजांनी बेछूट पणे गोळीबार करत शेकडो निरपरराध भारतीयांची हत्या करून अमानुषतेचा एक नवा इतिहास रचला तिथला हा प्राजक्त शांतीचा संदेश तर देत नसेल ? ह्या दोन्ही ठिकाणी ज्याने प्राजक्त लावला त्याच्या रसिकपणाला मी मनोमन दाद दिली . असो. प्राजक्ताची कलमी झाडं मी पहिल्यांदा बघितली शेगावच्या आनंद विहार मध्ये. मावळतीच्या प्रकाशात असंख्य कळ्या अंगा खांद्यावर मिरवणारी ती छोटी छोटी झाडं फार सुंदर दिसत होती.

आम्ही सध्या राहतोय त्या सोसायटीत नवीन झाडं लावायचं ठरलं. मी साहजिकच प्राजक्त सुचवलं आणि खरोखरच आमच्याच दारात प्राजक्ताच रोप लावलं गेलं . झाड दिसामासानी वाढू लागलं . रोज त्याला कौतुकाने न्याहाळणे हा माझा छंदच झाला . थोड्याच दिवसात झाड तरारल. . साधारण दीड वर्षातच त्याला पहिली फुलं आली. मला कोण कौतुक त्याच ! संध्याकाळी घरी येताना चार अर्धोन्मीलित कळ्या घेऊन येणं आणि त्या देवाला वहाणे हा नित्य नेमच झाला . परंतु थोड्याच दिवसात झाड मोठं झाल्याने त्याच्या कळ्यांपर्यंत हात पोचेनासा झाला . पण त्यामुळे एक फायदा झालाय . गॅलरीतून आता झाड अधिक चांगल्या तऱ्हेने बघता येत . ग्रीष्मात झडमडलेलं झाड वसंताची चाहूल लागली की हिरवगार होतं आणि वर्षा ऋतूत फुलांनी बहरतं . सकाळी खाली फुलांचा इतका सडा पडतो की चालणं ही मुश्किल होऊन जातं . दररोज सकाळचा पहिला चहा मी प्राजक्ता बरोबर जिवा भावाच्या गोष्टी करतच घेते . ते चार क्षण फक्त आमच्या दोघांचेच ! सुट्टीच्या दिवशी सकाळी फुलं वेचून आणते आणि मग त्यांचे हार करताना परत एकदा बालपणात फिरून येते . जेव्हा माझ्या मुलीची मंगळागौर ही याच्याच फुलांनी नी पत्रीने सजली तेव्हा अगदी सार्थक झाल्या सारख वाटलं.

प्राजक्त आमच्या दारात उभा आहे पण एक हुरहूर मनात कायम होती . त्याच्या झाडावरच्या फुलांचा मनाजोगता फोटो मला काढता येत नव्हता . रात्री फोटो नीट यायचा नाही आणि सकाळी फुलं सगळी गळून जात झाडावरून . पण लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाने ती माझी इच्छा पूर्ण केली . आम्ही लेण्याद्री चढायला सुरुवात केली अगदी भल्या पहाटे . जेमतेम दिसायला लागलं होतं . थोड्या पायऱ्या चढले आणि अचानक समोर प्राजक्त उभा ! तो ही फुलांचं वैभव आपल्या अंगावर मिरवत ! कलम असल्यामुळे झाड ही जास्त उंच नव्हतं . नीट निरखता येत होतं . पहाटेच्या प्रकाशात आकाशातल्या चांदण्याचं जणू झाडावर अवतरल्याचा भास होत होता . मोकळ्या वातावरणात तो नेहमीचाच प्राजक्त किती वेगळा भासत होता . मी त्याचे फोटो काढले . अगदी झाडावरच्या फुलांचे .. खूप हरखून गेले होते अचानक अशी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली म्हणून . खाली पडलेली थोडी फुलं मी वेचून घेतली आणि त्याच आनंदात लेण्याद्री कधी चढले ते कळलं पण नाही . हातातली फुल गजाननाच्या चरणी अर्पण केली. मनोभावे नमस्कार केला ... माझ्या पूजेची सांगता झाली .

तर अशा माझ्या आठवणी .. दरवर्षी पावसाच्या आगमना बरोबर ही आठवणींची कुपि उघडली जाते आणि मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते ...

हा फोटो
IMG_20170626_195519.jpg

Group content visibility: 
Use group defaults

खुप सुंदर वर्णन!
फोटो पण भारीय..
आमच्या अंगणात आहे पारिजात..रोज सकाळी फुलांचा सुंदर सडा पडतो. Happy

खूप छान लेख.
माझेही आवडते फूल झाड.
आमच्याही कोकणातल्या घराच्या अंगणात ह्याचे मोठे थोरले झाड आहे.
सहसा हा वर्षभर फुलत नाही पण पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर एका सोसायटीच्या आवारात हा वर्षभर फुलतो आणि रोज ऐन रस्त्यावर फुलांचा सडा पाडतो. धावायला जातो तेव्हा माझी सकाळ वर्षभर सुगंधी करतो. फुलांना पायदळी तुडवले जाऊ नये म्हणून माझ्याकडून खास प्रयत्न केले जातात तेव्हा आश्चर्य वाटणार्‍या माझ्या बरोबरच्या धावपटूंनाही ह्याचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण कसे झाले याची गोष्ट सांगून झाल्ये. त्यांचे म्हणणे पण ही फुले आधीच खाली पडलेली आहेत, कचर्‍यातच जायची तूडवून गेले तर बिघडले कुठे? म्हणणे तसे बरोबर आहे मेंदूला पटतेही पण मनाला नाही.

सुंदर लेख.

प्राजक्ताच्या फुलांच्या अशाच आठवणी आहेत. आमच्या अंगणात प्राजक्ताचे मोठे झाड होते. खुप फुले यायची त्याला. श्रावणात असेच दररोज सकाळी पुजेकरता गोळा करायचो आम्ही. शाळेत जाताना वाटेवर एक अजून झाड होते. त्याची फुले आमच्या घरच्या फुलांपेक्षा टपोरी असायची. सुंदर दिसायची ती सड्यासारखी पडलेली आणि आम्ही बाजूने सायकल वर जाताना.

किती सुरेख..... अगदी प्राजक्ताच्या फुलासारखंच नाजूक अन सुगंधीही....

आवडला लेख. माझ्याही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. मोठे झाड होते आंगणात. सकाळी उठलो की पहीले फुले गोळा करायला पळायचो.

मस्त लिहिलयस ममो..
हरवेळी तुझ्या लेखाला वेगळी कमेंट काय द्यावी हा प्रश्न पडतो मला बघ.. छान छान मस्त मस्त म्हणुन झालं..
माझ्या घरीसुद्धा आहे मोठ्ठ पारिजातकाचं झाडं.. जवळ्जवळ १० १५ फुट उंच आहे चांगल.. आता छान पालवी फुटलीए त्याला.. Happy

वाहवा अप्रतिम, दरवळला प्राजक्ताचा सुगंध.

लहानपणी चाळीत होतं प्राजक्ताचं झाड, पहाटे फुलं गोळा करायचो रोज. आता रहाते त्या सोसायटीत स्वागतालाच गेटजवळ आहे प्राजक्त Happy .

मने, छान लिहीलसं.
कोकणात आमच्याही दारात पारिजात होता. त्याची फुले हळूवार हाताने गोळा करून आम्ही हार करायचो. पांढरे-केशरी हार सुंदर दिसायचे. सुगंध तर सगळीकडे दरवळत असायचा.
तेव्हाच आम्ही "लांज्याला" जाऊन "पारिजात बहरला" की "बहरला पारिजात" हे नाटक पाहिलं. नाव नेमकं आठवत नाही. (त्यात चंदू डेग्वेकरांनी भूमिका केली होती).
इथेही सोसायटीच्या दारातच पारिजात आहे. मस्त सुगंधी वाटतं ऑफिसला येताना. पण पळता पळता फुलांवर पाय पडू नये म्हणून फार सतर्क रहावं लागतं.

आभार सगळ्यांचे प्रतिसादा बद्दल .
हार्पेंन , नवल आहे बारमास बहर असतो म्हणजे .
किती ही म्हटलं तरी फुलं पायदळी तुडवायला मला पण आवडत . मनाला पटत नाही ते .

मनीमोहोर,प्राजक्ताच्या फुलांइतक्याच निर्मळ व पवित्र भावना तुझ्या शब्दातून माझ्यापर्यंत पोहोचल्या गं!मी इकडे खूप दूर परदेशात तिकडच्या आषाढ व श्रावण यांच्या आठवणीने व्याकूळ असताना तू प्राजक्ताचं बहरलेलं झाड हलवून सडाच पाडलास माझ्य मनाच्या अंगणात.तुझ्या शब्दातून तो अनोखा सुगंधही पोहोचला इतक्या दूरवर.खूप छान लिहीतेस .माझा आजचा दिवस साजरा केलास .लिहीत रहा.

छान लिहीले आहे. आवडले. लहानपणी जेथे राहात होतो तेथे ही जवळ हे झाड असल्याने त्याचा सडा वगैरे पाहिलेला आहे. ते सगळे आठवले. "टप टप पडती..." कविता, तसेच "वाटे", "खळ्यात" वगैरे शब्द बर्‍याच दिवसांनी वाचले Happy

हे फूल आणि त्याचा कॅरिज्मा च असा आहे की नुसता उल्लेख झाला तरी मन प्रसन्न होतं. मनीमोहोर, नेहेमीप्रमाणे सुंदर लिहीले आहे.

मला अनेक वर्षं झाली प्राजक्ताने बहरेलेलं झाड किंवा सडा बघून. त्या फुलांचं मोहक रूप मनात कायम कोरलेलं आहे पण कितीही केलं तरी त्याचा सुवास आठवत नाहीये. आता तो सुवास परत अनुभवेपर्यंत स्वस्थता मिळणार नाही. मला स्वतःला प्राजक्त हे नाव जास्त आवडतं पारिजात पेक्षा.
वर सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ह्या गाण्यातल्या "उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे" ह्या ओळीचा उल्लेख आहे ( "अजूनही" नाही "अबोल" असा शब्द आहे ना त्या ओळीत? ). ती उपमा किती सुंदर आणि चपखल आहे कथेला! "स्वरांचा अबोल प्राजक्त" Happy

मीरा, सुंदर प्रतिसाद . प्रतिसाद देणे ही एक कला आहे आणि ती तुला उत्तमच साधली आहे . इतक्या सुंदर प्रतिसादासाठी धन्यवाद .

फारएन्ड , धन्यवाद प्रतिसादासाठी .

सशल , इतक्या बारकाईने वाचून चूक शोधून काढणे , ती करेक्ट करणे आणि त्यावर इतकं सुंदर लिहिणे ... कमाल आहे तुझी . खूप छान वाटलं कोणी इतकं रस घेऊन वाचतेय म्हणून . करते तिथे अबोल . खूप खूप आभार सांगितलंस म्हणून .

परदेशात आपल्याकडे दिसणारी एवढी फुलं असतात .. अनंत, मोगरा,झेंडू, शेवंती , जास्वंद वैगेरे .. पण प्राजक्त नाही का धरत तिकडे ?

हार्पेंन , नवल आहे बारमास बहर असतो म्हणजे . >>>

ममो- बहर म्हणजे अगदी लाखो नाही पण भर उन्हाळ्यातपण पाच पन्नास फुले रस्त्यावर पडलेली असतात. मला अगदी त्या सोसायटीमधे जाऊन विचारावेसे वाटते की तुम्ही ह्या झाडाला खास खत / पाणी वगैरे काही देता का म्हणून पण अनोळखी सोसायटीत आणि भल्या पहाटे कसे जायचे म्हणून नाही विचारले Happy

लोकांना जस गांव असत तस रुढार्थाने आम्हाला गांव नाही. त्यामुळे शहरात रहात असलो तरी संधी मिळाल्यावर आमच्या शहरापासून फार जवळ नाही, फार लांब नाही अशा ठिकाणी एक जुनं घर अंगणासह मिळत होतं ते घेतलं.
तिथेही घराच्या एका बाजूला आधी लावला तो प्राजक्त आणि दुसर्‍या बाजूला बकुळीचं झाड..

मनीमोहोर, खूप छान लिहीलं आहे. माझंही हे खूप आवडतं फूल.
इथे अमेरिकेत त्याचं दर्शन तसं दुरापास्तंच. पण गावातल्याच एका मैत्रीणीकडे आहे. त्याला फुलंही येतात. ती फुलं बघायला मिळणं हा एक सोहळाच वाटतो मला.

हार्पेन , ठीक आहे मग . तेवढी प्राजक्ताची फुलं .. म्हणजे घरच्या पूजे पुरती तर आमच्या कडे कोकणात ही नेहमी असतात.

निरु वा एका बाजूला प्राजक्त एका बाजूला बकुळ . माझी दोन्ही आवडती .

शुगोल, दुर्मिळ असलं की त्याची मजा अजून वाढते .