महालक्ष्मी विरुद्ध अंबाबाई !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 June, 2017 - 15:23

महालक्ष्मी विरुद्ध अंबाबाई....
असे शीर्षक मी कालच्या क्षणापर्यंत वाचले असते तर "भारत विरुद्ध हिंदुस्तान" असे काहीतरी गंमतीने लिहिल्यासारखे वाटले असते.
पण आताच हा लॉंग विकेंड संपता संपता लोकसत्ता चाळत असताना या बातमीवर नजर पडली..

महालक्ष्मी एक्स्प्रेसचे नाव खोडून ‘अंबाबाई एक्स्प्रेस’, शिवसेनेचे कोल्हापुरात आंदोलन
http://www.loksatta.com/maharashtra-news/mahalaxmi-express-named-ambabai...

कोल्हापुरातल्या महालक्ष्मी मंदिराचा वाद आता एक्स्प्रेसपर्यंत जाऊन पोहचला आहे.
आणि आजच्या ताज्या घडामोडीनुसार,
आज संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शिवसैनिकांनी छत्रपती शाहू महाराज स्थानकात आंदोलन करत महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या इंजिनापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’ ही अक्षरे काढून टाकत, त्या ठिकाणी ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ नावाचे स्टिकर्स लावले.

नित्यनेमाने वर्तमानपत्र वाचन होत नसल्याने महालक्ष्मी मंदिराचा हा वाद माझ्या कानावर आला नव्हता. पण आता थेट एक्सप्रेसपर्यंत जाऊन पोहोचला, आंदोलनाला उग्र वळण म्हणजेच लोकांच्या गैरसोयीचे वळण मिळाले, तेव्हा हे वाचनात आले.

तर नक्की काय प्रकार आहे?

म्हणजे हे आंदोलन प्रकरण काय आहे आणि यामागे कसले राजकारण शिजतेय ते मी बातम्यांमध्ये वाचेनच. तर स्वत: काही गूगाळून यायचे नाही आणि उठसूठ उगाचवुगाच मायबोलीवर धागे काढायचे ईत्यादी टोमणे कृपया नका मारू. मला येथील जाणकारांकडून महालक्ष्मी आणि अंबाबाई या देवींमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घ्यायचे आहे. कालपर्यंत मी लक्ष्मी, महालक्ष्मी, अंबाबाई, दुर्गा, पार्वती ते सरस्वती हि सर्व एकाच आदिशक्तीची रुपे समजत होतो. त्यातही कोल्हापूरची महालक्ष्मी म्हटले की आपली मराठमोळीच फिलिंग यायची. तर आता अचानक हे नवीनच काय निघालेय जे माझ्या आजपर्यंतच्या विचारांना तडा देणारे आहे हे जाणून घ्यायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात सर्व देवीदेवतांमध्ये एकच तत्त्व नांदत असले तरी भक्तांना आपले दैवत सगुण स्वरूपात आपल्या आवडत्या रूपात पाहायला आवडते. जसे एखाद्या लहान मुलाला वेगवेगळे कपडे घालून नटवावे- सजवावे आणि आपण हरखून ते पाहात राहावे तसे आपल्या भक्तिमार्गात देवही अशी लडिवाळ रूपे घेऊन भक्तांची हौस पुरवतो .
कोल्हापुरची अंबाबाई ही मूळची शिवपत्नी अंबाच आहे. तिच्या हातात मातुर्लिंग आहे. माथ्यावर शिवलिंग आहे. ( ते थेट डोक्यावर नसून मूर्तीच्यावर थोडे उंचावर आहे .) यावर मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाच्या एका सेमिनारमध्ये एक प्रबंधही वाचला गेलेला आहे. आता शिवपत्नी अंबा ही काळाच्या ओघात विष्णुपत्नी लक्ष्मी झाली आहे .
असे बदल घडत असतात. योगेश्वर शिव हा जोगेश्वरी देवी म्हणून पुजला जातोय, महाकाल हे एका बौद्ध पंथाचे दैवत महाकाली म्हणून पुजले जातेय. मराठवाड्यातील त्रिविक्रम वामनाचे आणि बळीराजाचे देऊळ आज वेगळ्याच देवी देवतांचे म्हणून गणले जातेय , एका बुद्धविहारातली प्रतिमा आज चक्क लेण्याद्रि म्हणून अष्टविनायकात जाऊन बसली आहे. कालाय तस्मै नम: , दुसरे काय !

>>आता शिवपत्नी अंबा ही काळाच्या ओघात विष्णुपत्नी लक्ष्मी झाली आहे .<<

आय्ला हे इंटरेस्टिंग आहे. ज्याने हे संक्रमण पद्धतशीरपणे अंमलात आणलंय त्याला मानलं पाहिजे... Happy

मी ऐकलेली कथा तिरुपती बालाजी शी संबंधित आहे. महालक्ष्मी ही बालाजीची बायको. ती रुसून माहेरी म्हणजे कोल्हापुरात आली. तिचा राग काढण्यासाठी दर वर्षी बालाजी तिला शालू पाठवतो.

http://m.timesofindia.com/city/kolhapur/Tirupati-trust-offers-shalu-to-g...

शिवसेना आता मुंबईच्या बाहेरपण आक्रमक होऊ लागली आहे. शेतकरी आंदोलन आणि हे नवीनच अजब अांदोलन.

जरा मुंबईतील नालेसफाईकडे लक्ष द्या नाहीतर मुंबई पण नाही आणि उर्वरित महाराष्ट्र पण नाही अशी अवस्था व्हायची

<<म्हणजे हे आंदोलन प्रकरण काय आहे आणि यामागे कसले राजकारण शिजतेय ते मी बातम्यांमध्ये वाचेनच. >>
-------- बातम्या वाचुन झाल्यावर येथे जरुर शेअर करा... वाचकान्च्या ज्ञानात भर पडेल.

आता शिवपत्नी अंबा ही काळाच्या ओघात विष्णुपत्नी लक्ष्मी झाली आहे .

भलतीच रोचक माहिती!

अशी शैव देवतेचे वैष्णवीकरण (अथवा याउलट) झालेली आणखी काही उदाहरणे आहेत? खुद्द विठोबाचेदेखिल नंतर वैष्णवीकरण झाले असे समजले जाते.

>>तिचा राग काढण्यासाठी दर वर्षी बालाजी तिला शालू पाठवतो.>>

आणि रेल्वे तिरुपति ते कोल्हापूर ही "हरिप्रिया" इक्सप्रेस चालवते. याचं नाव बदलायचं तर इकडचे हरिप्रिया खोडून "बालांबा?" करतील व तेलंगणावाले तिकडून हरिप्रिया करतील. असा दर गुरुवार रविवार खेळ चालेल.

अहमदाबाद ते कोल्हापूर इक्सप्रेसही आहे!

'आय्ला हे इंटरेस्टिंग आहे. ज्याने हे संक्रमण पद्धतशीरपणे अंमलात आणलंय त्याला मानलं पाहिजे... '
राज, अशी संक्रमणे एकट्यादुकट्याकडून आणि तात्काळ होत नसतात. हा अत्यंत संथ असा बदल असतो. कधी मुद्दाम रेटा देऊन घडवत आणलेला तर कधी आपोआप घडलेला. बौद्ध धर्माचे प्राबल्य कमी होऊन शिलाहारपुरस्कृत शैवांचे महत्त्व वाढले तसे बौद्ध विहारादि स्थाने ओस पडू लागली. किंवा उलटदेखील घडले असेल. शैवांना महाराष्ट्रात राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याममुळे बौद्ध विहारांकडचा महाराष्ट्रातल्या लोकांचा ओढा कमी झाला असेल. पण अनेक बौद्ध स्तूप हे शिवलिंग म्हणून पुजले जाऊ लागले. गाडल्या गेलेल्या अनेक स्तूपांच्या टेकाडांवर भगवे झेंडे लागले. कुठल्याही उंच किंवा अन्कॉन्कर्ड भूभागावर आपली निशाणी फडकवायची ही मानवाची मूलप्रवृत्ती आहे. त्यातून अनेकदा निशाण फडकवणार्‍याचा हक्क, ताबा, मालकी दिसते.
कोंकणात गौरीगणपतीचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतो. गौरी ही गणपतीची आई अर्थात महादेवाची पत्नी असते. कित्येक घरांत गणपतीच्याआधी गौरीमहादेवाची पूजा होते. या उलट अनेकांकडे या गौरी 'महालक्ष्म्या' असतात.

हे फक्त शक्तीप्रदर्शनाचे निमित्त शोधणे आहे.
>>>>
सहमत आहे, म्हणून राजकारण पार्ट मध्ये जास्त रस नाही. त्यांचे चालू दे आपले. अश्या उपक्रमांतून बेरोजगारांना रोजगार मिळतो.

अश्या गोष्टी इग्नोर करा....
....फरक कळूनपण काय करणार ?
>>>>>
ज्ञान वाढवने ईतकाच हेतू. आता संस्कृतचा तरी काय कुठे वापर करतोय, पण शाळेत तीन वर्षे शिकलोच ना Happy
तसेच हे,
गणपतीला दुर्गे दुर्घट भारी तुज विन संसारी अशी दुर्गा देवीची आरती असते, तर नवरात्रीला जय अंबे मात की आरती असते ... म्हणजे अंबादेवी गुजराती आणि दुर्गा मराठी हे ढोबळमानाने माझे समज होते.
तसेच महालक्ष्मी म्हणजे विष्णूपत्नी लक्ष्मीच. फक्त एक साधा गणपती असतो, तर एक नवसाचा राजा गणपती असतो. तसे लक्ष्मीचे महालक्ष्मी केले एवढेच माझे ज्ञान मर्यादीत होते.
आता मात्र यातली अंबादेवी गुजराती समजली तर शिवसेना कशी तिच्यामागे उभी हे जरा मला बाऊन्सर जाऊ लागले, आणि महालक्ष्मी कशी अमहाराष्ट्रीय झाली हे देखील गोंधळून टाकू लागले.
त्या शंकानिवारणाला धागा काढला, आणि आतापर्यंत समाधानकारक माहिती मिळाली.

वैष्णवीकरण हा प्रकार ईंटरेस्टींग आहे.
वैष्णवीकरण झाले त्या विरोधात एक गट उभा राहिला. ईस्लामीकरण झाले असते तर मोठा गट उभा राहिला असता.
जरी सबका मालिक एक असला तरी वर हीरा यांनी म्हटल्याप्रमाणे, "भक्तांना आपले दैवत सगुण स्वरूपात आपल्या आवडत्या रूपात पाहायला आवडते" हेच खरे. मी नास्तिक आहे म्हणून मला या विश्वाचा निर्माता यापैकी कुठल्याही एका रुपात बांधलेला बघायला आवडत नाही. माझ्यासाठी तो निराकार आहे. कल्पनेच्या बाहेर आहे.

मला येथील जाणकारांकडून महालक्ष्मी आणि अंबाबाई या देवींमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घ्यायचे आहे.>> कशाला? तू तर नास्तिक आहेस ना?

तसेही ज्या समस्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या सोडून, नाव बदलण्यासाठी आंदोलने करत बसणे.. बरे जम्ते या लोकांना!!! (नाव बदलून नक्की काय साध्य होणार देव जाणे!!)

मला येथील जाणकारांकडून महालक्ष्मी आणि अंबाबाई या देवींमध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घ्यायचे आहे.>> कशाला? तू तर नास्तिक आहेस ना?

@सोनाली Lol

कशाला? तू तर नास्तिक आहेस ना? >>> हो. म्हणून काय झाले. मी पुरुष सुद्धा आहे. पण तरी मला शॅम्पू आणि कंडीशनरमधील फरक माहीत आहे, तसेच आहे हे Happy

जोक्स द अपार्ट, उद्या ती महालक्ष्मी एक्स्प्रेस या आंदोलनात जाळली तर त्यात आस्तिक नास्तिक सारेच मरणार नाहीत का?

>> हा अत्यंत संथ असा बदल असतो.<<

पण हा बदल खरंच पटण्याजोगा आहे का? म्हणजे तुम्ही-आम्ही पटवुन घेणं एकवेळ सोडा, पण ज्यांच्या बायकांचा प्रश्न आहे त्या देवांचं काय? Happy

पण हा बदल खरंच पटण्याजोगा आहे का? म्हणजे तुम्ही-आम्ही पटवुन घेणं एकवेळ सोडा, पण ज्यांच्या बायकांचा प्रश्न आहे त्या देवांचं काय? ...
खर्रच कि राव!!! Lol

हातात शस्त्र असणारी दुर्गा/अम्बा( शक्तिरूप देवी) यांचे उत्सव नवरात्रात,अश्विनात.
कमळातली, हातातून नाणी सोडणारी महालक्ष्मी हिचे उत्सव मार्गशीर्ष महिन्यांत।हिच्यासाठी भगवति/लिलावतिस्तोत्र वाचतात.
वरज्रेश्वरी वगैरे देवींचे उत्सव चैत्रात.

लक्ष्मीचे पूजन अमावस्येला संध्याकाळी सूर्यचंद्र नसताना.

पण तरी मला शॅम्पू आणि कंडीशनरमधील फरक माहीत आहे, तसेच आहे हे >>>> काहिही... पुरुष शॅम्पू आणि कंडीशनर वापरत नाहीत का. कायच्या काय लॉजिक

हातात शस्त्र असणारी दुर्गा/अम्बा( शक्तिरूप देवी) यांचे उत्सव नवरात्रात,अश्विनात.
कमळातली, हातातून नाणी सोडणारी महालक्ष्मी हिचे उत्सव मार्गशीर्ष महिन्यांत।हिच्यासाठी भगवति/लिलावतिस्तोत्र वाचतात.

छान माहीती.
याचा अर्थ,
आदिमाया-आदिशक्ति म्हणजे पार्वती..??

हीरा,
कोल्हापुरात स्थानीक जनतेत या देवस्थानाचे नाव, अंबाबाई असे सर्रास प्रचलीत आहे की महालक्ष्मी?
मला सुद्धा या बातमीने आश्चर्य वाटले. तुम्ही दिलेली माहिती आमच्यासाठी नवीनच आहे.

१. जर कोल्हापुरची अंबाबाई असे कोल्हापुरात प्रचलीत असेल तर तसे ते (त्याच देवळाबद्दल) उर्वरीत महाराष्ट्रात का नाही?
२. जर नसेल, तर शिवसेनेने ईतिहासाचा अभ्यास करुन वगैरे अचानक हे पाउल उचलले आहे का?

५१ शक्तीपीठ हे शिवपत्नीचे(च) आसतात ना?
https://en.wikipedia.org/wiki/Shakti_Peetha इथे दिल्यापमाणे कोल्पापुरची महालक्षी या ५१ पैकी १८ महाशक्तीपीठात येते.

अशाप्रकारच्या माहितीसाठी कोणती चांगली पुस्तके सुचवाल?

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी तुळजाभवानी आणि महालक्ष्मी यांच्यावर पुस्तकं लिहिली आहेत. ती वाचल्यास बर्‍याच प्रश्नांची उत्तरं मिळतील.

कोणाकडे कोल्हापुरातल्या देवीचा फोटो असल्यास पाहा. हातांत काय आहे?
दुर्गे दुर्घट -- रक्षणकर्ती अंबे तुजवाचून~~

रक्षणाचे काम लक्ष्मी कशी करेल?
तुळजाभवानी कडून तरवार घेतली तर ती कोण असेल?
राजकीय पक्षांच्या मताशी आपल्याला देणंघेणं नाही.

कोल्हापूरची अंबाबाई असेच म्हणतात.

गणपतीत येतात त्यांना मात्र आम्ही लक्ष्मी म्हणतो.

हीरा आणि राज यांचे प्रतिसाद आवडले.