अलिबाबाची गुहा अर्थात कोकणातील घराचा माळा

Submitted by मनीमोहोर on 20 June, 2017 - 12:48

मे महिन्यात आम्ही सगळे जणं गावाला जमलो होतो . दुपारच्या जेवणासाठी आंब्याचा रस काढायचा होता , म्हणून जाउबाईंनी मला माळ्यावर पिकत घातलेले आंबे आणायला सांगितलं . वेचणी घेऊन मी माळ्यावर गेले .

कोकणातील घरांना माळा असतोच . वर जास्तीच रोज न लागणार सामान तर ठेवता येतच पण त्या खालच्या घराला उंदीर , साप यापासून संरक्षण ही मिळतं . आमचा माळा ही इतर घरांप्रमाणे मुख्य घरावर म्हणजे ओटी, माजघर या भागावर घातला गेला आहे . माजघरातल्या थोडया भागावर मात्र माळा नाहीये . त्या भागाला माळ्यावर संरक्षक लाकडी फळ्या घातल्या आहेत . आणि त्या भागातच काचेची कौल घातली असल्याने माजघरात दुपारच्या वेळी छान सूर्यप्रकाश येतो . माजघरातूनच माळ्यावर जायला उभा लाकडी जिना आहे . त्या जिन्यावरूनच मी आंबे आणायला माळ्यावर गेले . दुपारची वेळ असल्याने माळा सुर्यप्रकाशाने भरला होता . एका कोपऱ्यात वरती खालती गवत घालून आंबे पिकत घातले होते आणि त्या पिकलेल्या आंब्यांचा सुगंध अख्यख्या माळाभर दरवळत होता . मी चांगले पिकलेले आंबे निवडून वेचणीत घातले .

त्या अढीच्या शेजारीच असलेल्या लहान मुलांचा पाळण्याने माझे लक्ष वेधून घेतले . आमचा पाळणा चांगला प्रशस्त आहे . जुन्या मराठी चित्रपटात दाखवतात तसा. वर टांगायचा . मुलं अगदी वर्षाची होई पर्यंत त्यात झोपू शकतात . वर टांगायचा असल्याने झोका पण मोठया येतात आणि त्यामुळे मुलं झोपतात पण पट्कन. घरातली एवढ्या पिढ्यातली सगळी मुलं ह्याच पाळण्यात लहानाची मोठी झाली आहेत . पूर्वी वर्षाला दोन दोन वेळा आणि कधीतरी एकाच वेळी दोन दोन बाळांना जोजवणारा हा पाळणा अलीकडे मात्र कवचितच खाली येतो आणि त्यामुळेच नवी गादी, रंगरंगोटी आणि कौतुकाचे चार शब्द असं सगळं ही घेऊन येतो बरोबर .

आता आमच्या गावात रस्ते वैगेरे बऱ्यापैकी झाले आहेत पण पूर्वी म्हणजे पु. लं च्या कथे तल्या सारखं दोन घाट्या चढायच्या आणि दोन उतरायच्या तेव्हा घर दिसायचं . अशा परिस्थितीत कोणी आजारी झालं तर त्याला रस्त्यापर्यंत नेणे म्हणजे महा कठीण काम होतं . त्यामुळे हा मेणा आहे ना पाळण्याच्या बाजूला त्यात बसवून रस्त्यापर्यंत नेले जाई. हा एक अगदी बेसिक मेणा आहे . म्युझियम मध्ये वैगेरे बघतो तसा राजेशाही वैगेरे अजिबात नाहीये . हल्ली तर ह्याची गरज ही पडत नाही कधी . पण मी कशी आजारी माणसांची सेवा केली आहे हे तो अजूनही सांगतोय.

हल्ली सौर दिवे, वीज मंडळाचे दिवे, जनरेटर वैगेरे असल्याने भुत्ये, पेट्रोमॅक्स, चिमण्या या इथे दीनवाण्या स्थितीत बसल्या तरी ही कंदील मात्र वीज मंडळाच्या कृपेने आपला आब अजून राखून आहेत . पावसाळ्यात कधी कधी तीन तीन चार चार दिवस लाईट जातात आणि मग इन्व्हरटर , सौर दिवे या सगळ्यांची ताकद संपुष्टात आल्याने कंदीलच आमचं घर उजळून टाकतात. पावसाळ्याच्या सुरवातीला अजून ही कंदीलांच तेलपाणी करून दोन चार कंदील माजघरातल्या खुंटीला टांगले जातातच.

शेर, अधेली, कुडव, पायली, मापट, चिपट अशी वजनाची माप आता त्यांचा काहीच उपयोग नसल्याने इथे सध्या आराम करताहेत . आणि त्यांच्याच पंगतीला हा जुन्या काळचा अगडबंब तराजू ही येऊन बसला आहे . दळण दळण्याची जाती, त्यांचे खुंटे, मुसळ वगैरे इथे नीट जपून ठेवले आहे कारण शुभ कार्यात घाणा भरताना अजून ही यांचे पूजन केले जाते . ही जातीण म्हणजे छोटं जातं माझ्या तिथल्या एका सासूबाईंची जिवंत आठवणच आहे . त्या अगदी रोज दुपारी ह्यावर जसा एखाद्याने नेम करावा तसं थोडं तरी काही तरी दळण दळत असत . पुढे अगदीच झेपेनास झालं तेव्हाच ते बंद झालं .

लग्ना कार्यातच लागणारी मोठी मोठी पातेली, पराती, कळश्या, हांडे, लाकडी डाव, बुंदी पाडायचा मोठा झारा, लोणचं कालवण्यासाठी आणि बोडण भरताना वापरली जाणारी लाकडी काथवट, तांब्याची पिंप अशा सगळ्या गोष्टी एकमेकाच्या गळयात गळे घालून बसल्या आहेत . लहान मुलांना याचा उपयोग ही होतो बर का . मे महिन्यात घरी भरपूर बाळ गोपाळ मंडळी जमलेली असतात . खेळताना काही कुरबुरी झाल्या, कोणीतरी रुसलं रागावल की इथली मोठी मोठी पिंप ही रुसलेल्या मुलाची लपून बसण्याची अगदी आवडती जागा आहे . पिढ्यान पिढ्या हे चालत आलं आहे . आणि मोठयाना ही याचे पिढीजात ज्ञान आहे . पिंपात बसल्याने सगळी कडून मळलेलं , रडल्याने गाल काळपट झालेल्या चेहऱ्यावर आपल्याला शोधून कसं काढलं म्हणून थोडे रुसवे भाव असणार ते लेकरू जेव्हा आईच्या कडेवरून खाली येत तेव्हा आम्हा सगळ्यांनाच हसू अनावर झालेलं असत. पण परत पापड मोडेल म्हणून आम्ही सगळयाच दाबून ठेवतो आमचं हसू.

आमच्या कडे फार पूर्वी म्हणजे सन 40-45 च्या सुमारास मासिक ज्ञान प्रकाशचे अंक येत असत . ते नीट बाईंड करून एका ट्रँकेत ठेवले आहेत . मी घरी गेले की आवर्जून ते चाळते , त्यांच्यावरून हात फिरवते . जुन्या काळच्या बाळबोध कथा वाचायला , त्यावेळचे सामाजिक संदर्भ जाणून घ्यायला नेहमीच मजा येते . आणि हो त्यातल्या जाहिराती फार मनोरंजक वाटतात . जसे काळ्याभोर केसांसाठी नेहमी अमुक अमुक कलप वापरा .. किंमत अडीच आणे फक्त किंवा बाळंत काढा नं 3 मिळण्याचे खात्रीलायक ठिकाण म्हणजे ... किंवा फोटो काढायचाय .. अमुक अमुक फोटो स्टुडिओ वैगेरे वैगरे ..

दिवस भरलेली आमची भाटी जड पावलांनी जिना चढत माळ्यावर ये जा करू लागली की मग तिच्यासाठी माळ्यावर सोय केली जाते . एक वेचणी मध्ये आधी गवत मग त्यावर एक दोन जुन्या साड्या घालून तिच्यासाठी मऊ सर बिछाना तयार केला की ती पण निश्चिन्त होते . यथावकाश मग माळ्यावरच तिची पिल्ल जन्म घेतात . काही दिवस हीचा मुक्काम माळ्यावरच असतो . दूध भात सगळं माळ्यावरच . घरातल्या मुलांच्या माळ्यावरच्या फेऱ्या ही पिल्लं बघायला म्हणून आपसूकच वाढतात . हळू हळू , जागा बदलत बदलत ते लोकरीचे गोळे मोठे होतात आणि घरभर खेळायला लागतात.

आमच्या बायकांचा लाडका आवडता माळा म्हणजे आमच्या स्वयंपाकघरातला माळा . आता तो नाहीये पण अजूनही आम्ही सगळ्या जमलो की त्याची आठवण काढतोच आम्ही . हा माळा फार उंच नव्हता , माळ्याच्या तोंडावर स्टूल वैगेरे काही न घेता ही वस्तू ठेवता काढता येत असत . मागच्या वस्तू काढायला मात्र माळ्यावर चढावे लागत असे . भिंतीत असलेल्या दोन कोनाड्यात पाय ठेवले की तिसरा पाय डायरेक्ट माळ्यावरच . तसा हा उंच होता. चांगलं उभं रहाता येत असे . इथे दुशीकडे फळ्या मारून घेतल्या होत्या आणि त्यावर जास्तीचे पोळपाट, विळ्या, कुकर, पुरी प्रेस, मोदकपात्र, इडलीपात्र, ओव्हन, दुधाच्या कासंड्या, दह्याचे चिनी मातीचे जास्तीचे सट, ताकाच्या बरण्या, वाडवणी, खुटारे, साबण, असं सगळं ठेवलेलं असे . मे महिन्यात पाव्हणे आणि कामांची धांदल वाढली की घाई घाईत कुठली ही वस्तू त्या माळ्यावर ढकलली जाई . माळ्याचा पार बोजवारा उडे . माझ्या एका सासूबाईंना ते अगदी बघवत नसे. मग त्या कोणाला तरी माळ्यावर चढवत आणि माळा बेणुन घेत तेव्हा त्यांच्या जीवाला चैन मिळत असे .

आमचा माळा म्हणजे कायमच नीट नेटका असतो असं मात्र मुळीच नाहीये . आत्ता नकोय ना.. दे ढकलून माळ्यावर असं होतंच . दर वर्ष सहा महिन्यांनी माळा बेणला जातो. काही वस्तू कालौघात टाकून दिल्या जातात. काही वस्तू निर्णय न झाल्यामुळे परत आपल्या जागेवर जाऊन बसतात आणि काही वस्तू मात्र मौल्यवान आणि म्हणूनच कालातीत असतात . त्या आमच्या कुटुंबाचा एक प्रकारचा ठेवाच आहेत आणि माळयावरच्या त्या जुन्या वस्तू म्हणजे आमच्या कुटूंबाचा एक चालता बोलता इतिहासच आहे .

हा बघा जुन्या दिव्याचा फोटो . Ditmar ही एक अशा प्रकारचे दिवे बनवणारी प्रसिद्ध कम्पनी आहे आणि हे दिवे आता विंटेज दिवे झाल्याने यांच्या किमती अफाट आहेत .

IMG_20170623_161444.jpg

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लिहिलंय.
माळा म्हणजे काळ आलेल्या वस्तूंची जागा असं आजी म्हणते.
पण काळ म्हणजे अलिबाबाची गुहाच की...

पिढ्यान पिढ्या हे चालत आलं आहे . आणि मोठयाने ही याचे पिढीजात ज्ञान आहे . पिंपात बसल्याने सगळी कडून मळलेलं , रडल्याने गाल काळपट झालेल्या चेहऱ्यावर आपल्याला शोधून कसं काढलं म्हणून थोडे रुसवे भाव असणार ते लेकरू जेव्हा आईच्या कडेवरून खाली येत तेव्हा आम्हा सगळ्यांनाच हसू अनावर झालेलं असत. पण परत पापड मोडेल म्हणून आम्ही सगळयाच दाबून ठेवतो आमचं हसू.>>>
मस्तच लिहिलंय
माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला तुमचा माळा. पूर्वीही वाचलय तुमच्या घराबद्दल. अगदी चित्र उभे करता तुम्ही.

>> पूर्वीही वाचलय तुमच्या घराबद्दल. अगदी चित्र उभे करता तुम्ही.
+१
तुम्ही थेट कोकणातल्या घरात घेऊन जाता.

>> पण त्या खालच्या घराला उंदीर , साप यापासून संरक्षण ही मिळतं
ह्यामागे काय लॉजिक आहे?

"बेणणे" हाही शब्द पहिल्यांदाच ऐकला.

वाह, सुंदर.

सासरी माळा पण नाहीये, माडी पण नाहीये. उंच आहे माळा करण्यासारखं पण केला नाहीये. माहेरी माडीचं घर आहे कोकणांत. आजीला वाचनाची आवड असल्याने भरपूर पुस्तकं माडीवरच्या ट्रंकेत असायची आणि मिठातले आवळे. ह्या दोन गोष्टी माझ्या प्रिय, आवळे खात पुस्तक वाचणं दुपारच्या वेळी ही माझी आठवण. तिथे अशीच मोठी भांडी क्वचित लागणारी ठेवलेली असत. ह्या लेखामुळे माहेरचं कोकण आठवलं Happy .

सुरेख लिहीलंय ममो, अगदी डोळ्यासमोर आला माळा.

आमच्याकडे माडी आहे, माडीवर तुम्ही म्हटल्याप्रमाणेच सगळं आहे पण माझी मुख्य आठवण म्हणजे लाल मातीच्या मडक्यांना लाकडी झाकण लावून ठेवलेले मीठ लावलेल्या चिंचेचे गोळे!
लहानपणी लपाछपी खेळताना न सापडणारा भिडू हमखास माडीवर चोरून चिंच चाटत बसलेला सापडायचा Happy

सशल, कोकणात बऱ्याचदा उंदीर आणि साप कौलांच्या फटीतून आत घुसतात, माळा नसेल तर ते सरळ छतावरून घरात पडतात. माळ्यावरून बऱ्याचदा आपल्या नकळत येऊन निघूनही जातात.

खूप खूप धन्यवाद सगळ्याना प्रतिसादासाठी .

सशल , मेग ने लिहीलय तेच आहे कारण . माळा म्हणजे संरक्षक फळी बनतो साप, उंदीर, पाली, सुरवंट यांच्या साठी.
बेणणे म्हणजे आपण कपाट वैगेरे लावतो म्हणजे rearrange करतो त्याअर्थी वापरतात आमच्याकडे कोकणात .

फोटो दाखवण्यासारखं माळ्यावर काही नाही हो

नेहमी प्रमाणेच मस्त लेख. असा माळा कायम नारायण धारपांच्या कथांमध्ये अस्तो. त्यात रात्री दोन लाल डोळे लुक लुकतात वगैरे .

मने, काय सुंदर लिहीलस ग! सुरेख वर्णन. कोकणात घेऊन गेलीस.
लहानपणी आम्ही रहात असलेल्या घराचा माळा डोळ्यासमोर आला.
भाड्यांचे वर्णन मस्तच. (बंदी पाडायचा मोठा झारा, >>>>>.इथे एक उकार देणार का?:) )
आमच्याकडेही इथे अजूनही एक कंदील आहे. 'चिमण्या' मात्र नवीन आलेल्या लोकांनी दूर देशी पाठवल्या. Sad
'चिमण्या, कंदिलाच्या उल्लेखाने कोकणातली "दिवेलागणी" आठवली. राखेने पुसून स्वच्छ केलेल्या काचा, नीट करून ठेवलेल्या वाती, दिवे लावल्यावर , नंतर शुभंकरोति, रामरक्षा, पाढे, आणि मग डोळे मिटत मिटत केलेला गृहपाठ. Happy काय सुंदर दिवस होते ते. Happy

चनस , सायुरी, अमा आणि शोभा खूप खूप आभार .

शोभा प्रतिसाद खूप आवडला . थँक यू ग , करते तिथे बुंदी ... दोन दोन वेळा तपासलं तरी काही तरी राहून जातच .

खरोखर अतिशय चित्रदर्शी वर्णन....
आख्खा लेखच अप्रतिम....
पण तरीही विशेष आवडलेल.... <<< पिंपात बसल्याने सगळी कडून मळलेलं , रडल्याने गाल काळपट झालेल्या चेहऱ्यावर आपल्याला शोधून कसं काढलं म्हणून थोडे रुसवे भाव असणार ते लेकरू जेव्हा आईच्या कडेवरून खाली येत तेव्हा आम्हा सगळ्यांनाच हसू अनावर झालेलं असत. पण परत पापड मोडेल म्हणून आम्ही सगळयाच दाबून ठेवतो आमचं हसू.>>>

मॅगी यांचा <<<< लहानपणी लपाछपी खेळताना न सापडणारा भिडू हमखास माडीवर चोरून चिंच चाटत बसलेला सापडायचा >>> हा प्रतिसादही आवडला....

आणि अमा <<<< असा माळा कायम नारायण धारपांच्या कथांमध्ये अस्तो. त्यात रात्री दोन लाल डोळे लुक लुकतात वगैरे . >>> हेही एकदम परफेक्ट...

मनीमोहोर, आणखी एका नाॅस्टॅल्जिक करणार्‍या लेखासाठी पुन्हा धन्यवाद...
(मला गांव नसल्याने मी फक्त जुन्या वाचनासाठी नाॅस्टॅल्जिक होतो..)

ममो, नेहेमीप्रमाणेच मस्त लिखाण. + १११

पिंपात बसल्याने सगळी कडून मळलेलं , रडल्याने गाल काळपट झालेल्या चेहऱ्यावर आपल्याला शोधून कसं काढलं म्हणून थोडे रुसवे भाव असणार ते लेकरू जेव्हा आईच्या कडेवरून खाली येत तेव्हा आम्हा सगळ्यांनाच हसू अनावर झालेलं असत. पण परत पापड मोडेल म्हणून आम्ही सगळयाच दाबून ठेवतो आमचं हसू >>> किती गोड Happy

मुळातच कोकण आवडीचं त्यात तुम्ही इतक मस्त लिहिता की ते प्रेम वाढतच जात Happy

>>फोटो दाखवण्यासारखं माळ्यावर काही नाही हो>>

असं कसं?
केरळवाल्यांच्या एका कुठलाशा कार्यक्रमात जुनी भांडी,वस्तू दाखवून पाककृती दाखवतात. ते मोठाले पितळी कुकर, रव्या,हांडे, इडलीपात्रे,घंगाळे,तांबे, बंब .
काहीच नाही? परत जाउन छान फोटो काढून आणा पाहू.
मालगुंडला आहे एक प्रदर्शन.

वाह! वाचताना मामाचा माळा डोळ्या समोर आला...

नाॅस्टॅल्जिक करणार्‍या लेखासाठी पुन्हा धन्यवाद.. > +१

ते मोठाले पितळी कुकर, रव्या,हांडे, इडलीपात्रे,घंगाळे,तांबे, बंब .
काहीच नाही? परत जाउन छान फोटो काढून आणा पाहू.>>>>>> +१.
लेखात वर्णन केलेल्या माळ्याचा फोटो बघायचा आहे. तो आम्हाला हवाच. (ह. क. बा. Happy )
वर्णन इतकं सुरेख करतेस ना, की अगदी तो प्रसंग डोळ्यासमोर उभा रहातो. ते रडलेलं मळलेलं, आईच्या कडेवरचं बाळं अगदी आईसकट डोळ्यासमोर आलं. Happy

सुरेख लिहिलंय!

खूप वर्षांनी 'बेणणे' शब्स ऐकला/वाचला. आमच्याकडे घरमालकांचं आगर बेणायला आजी गडी बोलवायची ते आठवलं. पावसाळ्याआधी आणि पाऊस ओसरल्यावर असं किमान दोनदा आगर बेणायला लागायचं.

बाकी खूप गोष्टी रिलेट झाल्या. आणि तसंही कोकणाबद्दल तुम्ही जे लिहिता ते इतकं सहज आणि जेन्युइन असतं की छान वाटतं.

प्रज्ञा बरोबर आहे, रत्नागिरी जिल्ह्यात बेणणे म्हणजे फक्त तण उपटणे. पावसाळा संपल्यावर आगर बेणायला बायका बोलावतात आमच्याकडे. Rearrange असाही अर्थ आहे हे मलाही आत्ताच कळले.

Pages