श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर

Submitted by अ'निरु'द्ध on 10 June, 2017 - 16:21
lunuganga estate

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर...
(Srilanka : Lunuganga Estate, The Weekend Cottage of Architect Geofferrey Bawa)

आमची काही व्यावसायिकांची एक study tour प्रथितशय श्रीलंकन आर्किटेक्ट जेफ्री बावा यांची कामे बघण्यासाठी श्रीलंकेला गेली होती.

त्यांनी बनवलेल्या वास्तु, हॉटेल्स हे पाहिल्यानंतर पुढचा टप्पा होता त्यांचे विकांत घर (Week End Cottage) पहाण्याचा ज्याचं नावं आहे "लुनुगंगा इस्टेट".

प्रचि -०१ : तिथे जाण्यापूर्वी ह्या एका छान हॉटेलमधे आम्ही पोटपूजा केली.

प्रचि -०२ : त्यानंतर आम्ही लुनुगंगा इस्टेटच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. गाईड आधीच्या ग्रुपबरोबर आत गेला होता. त्यावेळेला इथेतिथे पहाताना दिसलेली श्रीलंकन मॉनिटर लिझार्ड

प्रचि -०३ : प्रवेशद्वाराच्या जवळच्या घरात रहाणारा तिथला एक स्थानिक आणि त्याचा मुलगा

प्रचि -०४ : प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यावर दिसणारा महोगनी वृक्ष (साधारणपणे५'०" / ५!६" उंचीच्या कुंपण भिंतीच्या संदर्भाने ह्याच्या आडव्या मुळांच्या विस्ताराचा अंदाज येऊ शकेल.)

१९१९ साली जन्मलेले जेफ्री बावा हे केवळ श्रीलंकाच नव्हे तर आशियातील अग्रेसर आणि प्रभावशाली वास्तुविशारद (Architect) म्हणून ओळखले जातात. आशियाई वास्तुकलेमधे समकालीन, कलोनिअल व एतद्देशीय (Contemporary, Colonial and Indigenous) तत्त्वांचा सुंदर मिलाफ करून त्यांनी ह्या क्षेत्रात एका नवीन चळवळीची सुरुवात केली जी नंतर जेफ्री बावा स्टाईल म्हणून प्रसिद्ध झाली.
खरं तर व्यावसायिक शिक्षणाने ते वकील. लंडन मधून वकिली शिक्षण घेऊन वकील बनल्यावर त्यांनी काही काळ वकिलीची प्रॅक्टिस केली.
ह्या व्यवसायात मन रमत नाही असं लक्षात आल्यावर एक ब्रेक किंवा तात्पुरता विराम घ्यावा म्हणून ते १९४८ साली इटलीला आणि युरोपमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्या निवांतपणाच्या काळात त्यांना ही जाणीव झाली की वकिली व्यवसाय ही त्यांची आवड नाही, त्यांचा पिंड नाही.

इटलीमधील Renaissance पद्धतीच्या बागांचा/ लँडस्केपिंगचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. हा ब्रेक संपवून श्रीलंकेला (तेव्हाचे सिलोन) आल्यावर १९४९ साली Advocate Geoffrey Bawa यांनी बेंटोटा शहरातील देद्दुवा तळ्याच्या काठची (Dedduwa) ही २५ एकरांची प्रॉपर्टी युरोपियन किंवा इटालियन पद्धतीच्या रेनिसान्स बागेमधील विकांतघर (Weekend House) बनवावे अशा उद्देशाने विकत घेतली.

विकत घेतल्यानंतर जेफ्री यांनी या प्रॉपर्टीचे नाव लुनुगंगा ठेवले.
"लुनुगंगा" म्हणजे सिंहली भाषेत " खार्या पाण्याची नदी ".

हि प्रॉपर्टी डच काळात दालचिनी लागवड आणि ब्रिटिश काळात रबर लागवडीसाठी वापरात होती. ती फुलवताना, मनाप्रमाणे इमारती बांधताना या निर्मिती कलेच्या विषयात स्वतःला गती / आवड आहे हे त्यांना जाणवले पण आवश्यक त्या तांत्रिक आणि कलात्मक ज्ञानाचे यथायोग्य शिक्षण नाही याची जाण होऊन आणि खंत वाटून असे शिक्षण (Know How) मिळावे यासाठी त्यांनी एका वास्तुविशारदांच्या फर्ममधे शिकाऊ उमेदवार (Apprentice) म्हणून नोकरीही केली.

दोन वर्षे ही नोकरी केल्यावर आता अधिक सखोल ज्ञान पाहिजे म्हणून १९५३ साली त्यांनी वास्तूविशारद (Architect) होण्याचे ठरवले. आणि त्यासाठी लंडनला प्रयाण केले.

१९५७ साली वयाच्या ३८व्या वर्षी त्यांनी वास्तु - विशारद (Architect) म्हणून लंडनमधील Architectural Association School मधून पदवी प्राप्त केली.
आणि मग लंकेत परत आल्यावर वास्तुविशारद म्हणून व्यवसाय चालू केला.
आणि त्या व्यवसायाच्या बरोबरीनेच नंतर ४० वर्षे ह्या जमिनीमध्ये Landscaping चे आणि Architecture चे विविध प्रयोग करत ही जागा फुलवली.
या २५ एकरावर वसलेल्या रबर इस्टेटचा चित्रकलेतील एखादा Canvas सारखा वापर करून बावा यांनी बेंटोटा येथील खाऱ्यापाण्याच्या लुनुगंगा नदीवर नंदनवन (Tropical Eden) निर्माण केले.
जरी इटालियन गार्डन बनवणे त्यांच्या मनात होते तरी प्रारंभी वकिली शिक्षणासाठी आणि नंतर वास्तुकलेचं शिक्षण घेण्यासाठी बराच काळ इंग्लंडमधे (खर तर लंडन) राहिल्यामुळे या बागेवर इंग्लिश गार्डनचाही प्रभाव जागोजागी जाणवतो.

इथे आधी प्रयोग करायचे आणि त्यातले निष्कर्ष प्रत्यक्ष कामात वापरायचे यातून घडत गेला एक अजरामर आणि सर्जनशील वास्तुविशारद आणि त्यांची प्रत्येक इमारत, केलेले बांधकाम होत गेलं Iconic.
एक विशिष्ट शैली जोपासत, एक छाप पाडत आणि एका Signature Architecture कडे वाटचाल करत .

प्रचि - ०५ : लुनुगंगा इस्टेटच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर मातीची वाट/ रस्ता लागतो. या मातीच्या वाटेने पुढे आल्यावर एका बाजूला लागते गेट हाऊस तर दुसऱ्या बाजूला हलक्या चढावर हे एका जुन्या घराचे भग्नावशेष. जेफ्रींनी हे भग्नावशेष मुद्दाम तसेच ठेवले आहेत. अगदी त्यावरच्या झाडांच्या नैसर्गिक आक्रमणासह आणि फक्त add केलेत काही छोटेसे Artifacts. या घराच्या मध्यभागी दिसणाऱ्या पायऱ्यांवरून आपण तिकीट घराकडे जातो.

प्रचि - ०६: मातीच्या रस्त्याने पुढे आल्यावर लागते प्रांगण (Entrance Court). आलेल्या पाहुण्यांसाठी लाकडी खांबावर तोललेली कौलारू WAITING SPACE. डावीकडच्या पायऱ्या मुख्य घराकडे जातात तर उजवीकडे PORTICO लागतो.

प्रचि - ०७ : उजवीकडचं PORTICO. पांढऱ्या आणि बेज (Beige) रंगाचा संयत वापर आणि अतिशय साधे, Simple Glass House

प्रचि - ०८ : PORTICO मधली बैठक. Tropical झाडांनी वेढलेला सभोवताल.

प्रचि - ०९ : PORTICO मधून दिसणाऱ्या पायऱ्या, Waiting Area आणि प्रांगण.

प्रचि - १० : पोर्टिको मधून पुढे गेल्यावर स्वतंत्र इमारतीतील जेफ्री बावा यांची Garden Room - कम - अभ्यासिका. इथे बावा यांची बागकामाची हत्यारेही ठेवलेली असत आणि इथून ते त्यांची व्यावसायिक कामेही पहात.

प्रचि - ११: लाकडी खांबावर तोललेल्या लाकडी छप्पराची अभ्यासिकेकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावरची CANOPY.

प्रचि - १२ : अभ्यासिकेतून दिसणारा WAITING AREA आणि त्यावरील ग्लास हाऊसची इमारत.

प्रचि - १३ : अभ्यासिकेसमोरील RED COURT आणि बावांचा स्टुडिओ. हा स्टुडिओ मात्र उतारावर आहे. त्याच्या आत्ताच्या स्थितीवरून कोणालाही ही कल्पना करता येणार नाही की हा स्टुडिओ म्हणजे जुन्या प्रॉपर्टीमधील उतारावरील कोंबडी पालनाची शेड आणि गायींचा गोठा असेल.

प्रचि - १४ : Red Court मधून दिसणारा मुख्य घराचा मागचा भाग.

त्यांच्या फावल्या वेळात जेफ्रिंनी इथे येऊन या जागेच्या एकेक भागाचा अवकाश, इथल्या जमिनीची प्रत्येक पातळी (Contour) एखाद्या शिल्पकाराप्रमाणे पाहून, अनुभवून घडवली आहे ज्यातून बनली एक विस्तीर्ण बागांची, लहानमोठ्या तळ्यांची, वेगवेगळ्या टेरेसेसची, Sculptures ची आणि जागोजागी पेरलेल्या इमारतींची एक एकत्रित संरचना जिने त्यांना दिला एक अनुनुभूत आनंद..... घडतानाही आणि घडल्यानंतरही......
आणि तोच आनंद या जागेतून फिरताना आपल्यालाही मिळत राहतो....जागोजागी..

प्रचि - १५ : उतारावरचा स्टुडिओ – ०१

प्रचि - १६ : उतारावरचा स्टुडिओ – ०२

प्रचि - १७ : या घराजवळून दिसणारा छोटयाशा तळ्याचा (Butterfly Pool) भाग (Water Garden) आणि छाया प्रकाशाचा खेळ.

प्रचि १८ : उतारावरचा स्टुडिओ – ०३ (लगतचे तसेच राखलेले फणसाचे झाड)

प्रचि १९: स्टुडिओचा सभोवताल…

प्रचि २०: बांधकामाच्या खांबाला खेटून असलेला फणस…

ह्या संपूर्ण प्रॉपर्टीची विशेषता म्हणजे इथले प्रत्येक ठिकाण अनुभवण्यासाठी, तिथे शांत, निवांत होण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी बसण्याची, विसाव्याची एखादी छानशी जागा आहे. आणि ह्या landscape चे, Artifacts चे, स्ट्रक्चर्सचे वैशिष्ट्य असे कि प्रत्येक ठिकाणी एक वेगळेपणा वाटेल, एक खासियत जाणवेल. परंतु हे सर्व एका मूलभूत Theme मधे, संकल्पनेमध्ये विणलेले, अगदी Harmoniously. कुठेही त्या वेगळेपणाला धक्का लागू न देता.

प्रचि २१: पुन्हा एकदा छाया प्रकाश...

प्रचि २२: तळ्याच्या (Butterfly Pool) कडेने आणि पलीकडून जाणारी पाऊलवाट (Broad walk)

प्रचि २३: पाऊलवाटेवरचा (Broad walk) लाकडी पूल आणि ब्लॅक पॅव्हेलियन स्कल्प्चर...

प्रचि २४: ब्लॅक पॅव्हेलियन (Sitting Area and Concrete Sculpture)

प्रचि २५: वॉटर गार्डन मधून दिसणारा स्टुडिओ -०१ (झाडांच्या, पानांच्या, इमारतीच्या मागून येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे एक वेगळीच अनुभूती देणारा)

प्रचि २६:वॉटर गार्डन मधून दिसणारा स्टुडिओ -०२ (थोडं पुढे गेल्यावर सूर्यकिरण दिसेनासे झाले की दिसणारी नेहमीची हिरवाई)

ह्या वातावरणामध्ये रहाणं, इथे विहरणं , इथे शांत होणं, इथे अलिप्त होणं ...... आणि तरीही रसरसून जगणं (कि म्हणूनच रसरसून जगणं....)
हा त्यांचा इथल्या जगण्याचा स्थायीभाव होता.
इथे आपल्यातील काहीतरी जाणवणं..... आणि आपल्यातील काहीतरी उमलणं आणि त्या उमलण्यामधूनच एक नवनिर्मिती साकार करणं, आधी स्वतःसाठी आणि मग जगासाठी..... हे सारं घडलं.
आणि या मानसिक प्रक्रियेनं आणि नंतर निर्मितीच्या प्रक्रियेनं त्यांना स्वतःला खूप खूप समाधान दिलं….. आणि जगालाही.

प्रचि २७ : वॉटर गेट आणि लेपर्ड स्कल्प्चर (खरं तर हा जवळून वेगळा दिसतो. पण लांबून, या लँड्स्केपमधून, गवतामधून डोकावल्याचा हा फील मला जाणवला आणि मग तो टिपण्याचा मोह आवरता आला नाही).

लुनुगंगा म्हणजे शहरी अरण्य, विविध आकाराच्या आणि पोताच्या उष्ण कटिबंधीय झाडांची मांडणी, एका हिरव्या निसर्गाची दुसऱ्या हिरव्या निसर्गावर केलेली निर्मिती आणि विविध झाडांमुळे त्यांच्या पाना, फांद्यांमुळे सतत बदलत्या राहणाऱ्या छाया- प्रकाशाचा खेळ.
• लुनुगंगा म्हणजे घरात असलेली झाडं किंवा झाडांभोवती असलेलं घर
• लुनुगंगा म्हणजे झाडाझुडपांपासून वेगळी न करता येणारी घरं.
• लुनुगंगा म्हणजे डोक्यावर छप्पर नसणाऱ्या आणि थेट आकाश दाखविणाऱ्या बाथरूम्स
• लुनुगंगा म्हणजे संपूर्ण सभोवताल (Surrounding) घरामधे सामावण्याचा प्रयत्न

प्रचि २८ : पुन्हा छाया प्रकाश -०१

प्रचि २९ : पुन्हा छाया प्रकाश -०२ (आणि इस्टेटमधली भातशेती)

प्रचि ३० : पुन्हा छाया प्रकाश -०३

प्रचि ३१: एक बालपर्यटक (थोडासा कंटाळलेला)

बाहेरच्या जगातल्या त्रासांना, विवंचनांना तिथेच बाहेर मज्जाव करणारी आणि सदैव रसरशीत असलेली हि निसर्ग आणि वास्तू कलाकृती आपल्या मनाला एक सुखद थंडावा देते, आंतरिक शांती देते आणि तीही या कलाकृतीचे निर्माते वास्तुविशारद जेफ्री बावा मरण पावून आज १४ वर्षे झाली असली तरीही.....
या जागेमधल्या झाडाझुडपांच्या भागातून, मोकळ्या जागांतून, तळ्यांच्या आजूबाजूने मुक्तपणे फिरताना, खरं तर विहरताना आपल्या नजरेसमोरचे विविध देखावे, जसंजसं पुढे जाऊ तसे तसे त्यांचे बदलणारे कोन, जमिनीच्या पातळ्या बदलत रहातात, आणि जे स्वप्न, जी कलाकृती या सर्जनशील निसर्गप्रेमी कलाकाराने त्याच्या मनात पाहिली, जोपासली, घडवली तीच आपल्याही डोळ्यांना दाखवतात.

प्रचि ३२ : Water Gate & Leopard Sculpture (देद्दुवा तळ्यात बोटीने जलपर्यटनासाठी जाण्यासाठी हा एक छोटासा धक्का आणि पाण्यात उतरणाऱ्या पायऱ्या) (बावांकडे या तळ्यातील २ खाजगी बेटांचीही मालकी होती.)

प्रचि ३३: भातशेती मधून दिसणारे मुख्य घर आणि शेतीच्या कडेला लोटस पॉन्ड...

प्रचि ३४:

प्रचि ३५: Sculpture of Horned Hindu PAN

प्रचि ३६:

प्रचि ३७: एक "विसावा"

प्रचि ३८: रोमन शिल्प -०१

प्रचि ३९: अजून एक "विसावा" (The Yellow Pavilion)

प्रचि ४०: तेच रोमन शिल्प. मागे देद्दुवा तलाव

प्रचि ४१: मुख्य घर (समोर Frangipani: चाफा)

प्रचि ४२:मुख्य घर - जवळून (बावांचे राहण्याचे हे प्रमुख निवास स्थान)

प्रचि ४३: रोमन शिल्प -०२

प्रचि ४४: फ्रॅंजीपनी

१९४७ साली फुलवायला घेतलेल्या ह्या कलाकृतीचे फुलवणे बावांच्या १९९८ मधल्या मोठ्या आजारपणापर्यंत सतत चालू राहिले.
नंतरही २००३ पर्यंत आजारी असताना Wheel Chair वर बसून त्यांनी ह्या निर्मिती प्रक्रियेमध्ये खंड पडू दिला नाही. २००३ साली झालेल्या त्यांच्या मृत्यू नंतर ह्या मालमत्तेचा वारसा त्यांच्या लुनुगंगा ट्रस्ट कडे आला.

प्रचि ४५: सुरुवातीला मातीच्या वाटेने येताना लागलेले गेट हाऊस...

सिनॅमोन टेकडी आणि बावा यांचे घर यात सलग भासणारे दोन उतार आहेत.
पण प्रत्यक्षात हे दोन उतार मिळतात तिथून एक वरकरणी लपवण्यात आलेला म्हणा किंवा झाकलेला म्हणा रस्ता अन्य एका प्रॉपर्टीकडे जातो. बावा यांच्या सहाय्यकांसाठी बांधलेल्या घराच्याबाजूने जाणारा एक Covered Passage आहे त्याच्या खिडकीतून हा रस्ता दिसतो, आणि लक्षात येत कि हा घराचं Extension भासणारा पॅसेज आहे, तो वस्तुतः या दोन रस्त्यांवरून जाणारा आणि दोन्ही टेकड्या जोडणारा पूल आहे.

प्रचि ४६ : टेकडीचे सौम्य उतार चढाव. दोन्ही उतार मिळतात तिथल्या झुडुपांमध्ये रस्ता आहे. दूर चढावावरची टेकडी म्हणजे Cinnamon Hill.

प्रचि ४७: गेट हाऊस आणि झुडुपांचा Close Up

प्रचि ४८ : घराचा पॅसेज/ व्हरांडा नव्हे, दोन टेकड्या जोडणारा पूल (Bridge). (आणि डावी-उजवीकडच्या खिडक्या, ज्यांना Ha -Ha Windows म्हटलं आहे, ज्यातून खालून जाणारा रस्ता दिसतो)

प्रचि ४८ (अ) : Ha-Ha Window मधून दिसणारा दोन उतारांमधला लपलेला रस्ता आणि दोन्ही बाजूंची झुडुपं (हे प्र .चि . आंतरजालावरून साभार)

प्रचि ४९: पुलापलीकडे...

प्रचि ५० : पलीकडल्या सिनेमॉंन टेकडीवरचा विसावा

बावा यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्य संस्कार त्यांना अतिशय प्रिय असणाऱ्या या सिनॅमोन टेकडीवर करण्यात आला आणि त्यांची रक्षा ही तिथेच पुरली गेली.

प्रचि ५१ : सिनेमॉंन टेकडीवरून दिसणारी देद्दुवा तळ्याची दुसरी बाजू. झाडाखालच्या याच कलशाखाली बावा यांची रक्षा पुरली आहे.

आज जेफ्री बावा यांची आर्किटेक्चरल स्टाईल ही आर्किटेक्चरची एक Signature शैली बनली आहे. ही बांधकामे/ Structures रूढार्थाने दिमाखदार नाहीत. त्यामध्ये विनाकारण मिरवल्याची भावनाही नाही तर आजूबाजूच्या परिस्थितीसह उत्कृष्टपणे, कल्पकतेने आणि त्याही पेक्षा भोवतालचा निसर्ग, आजूबाजूचे वातावरण जास्त सहजतेने सामावून घेऊन त्या परिस्थितीसह उभरून येणारा / व्यक्त होणारा एक आंतरीक दिमाख आहे; ज्याचे अनेकांना अनुकरण करावेसे वाटते, तसा मोह होतो.
त्यांच्या त्या प्रसिद्ध शैलीचं बीज ह्या इथल्या जमिनीत केलेल्या विविध यशस्वी आणि अयशस्वी प्रयोगांमधून रुजलेलं होतं.
सुरुवातीला केवळ पर्यटकांच्या फिरण्यासाठी असलेली हि कलाकृती आता गेल्या ५ वर्षांपासून राहण्यासाठीही मिळतेय...
पण हे आम्हाला कळलं ते भारतात परत आल्यानंतर....
केवळ कलती दुपार इथे घालवल्यानंतर या वास्तूत निदान १ संपूर्ण दिवस (रात्रीसह) राहून हळूहळू कमी होणाऱ्या सूर्यप्रकाशात ह्या लुनुगंगाचे बदलते स्वरूप, लुनुगंगामधला सूर्यास्त, त्यानंतरच्या संधिप्रकाशात दिसणारं लुनुगंगा , त्यामधला निसर्ग, धूसर काळोखात संध्याकाळची हळूहळू होणारी रात्र, लुनुगंगामधल्या ज्या घरात रहातोय त्या घराचे पिवळसर प्रकाशात उजळत जाणारे अंतरंग, लुनुगंगामधील फटफटणारी पहाट आणि लुनुगंगामधली प्रसन्न कोवळी सकाळ हे सारं सारं पहाण्याची, अनुभवण्याची संधी आम्ही गमावली याची आजही खंत वाटते….
पण ह्याबाबत माझी आशा अजूनही अमर आहे..... श्रीलंका जवळच आहे..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरु, फोटो तुमची सौन्दर्य दृष्टी दाखवताहेत. कुठला फोटो जास्त आवडला हे सांगणे कठीण आहे. सगळे एकसो एक आहेत.

अशी घरे पहिली की आपण किती बोरिंग जागी राहतो याची सखेद जाणीव होते आणि जिथे राहतोय त्या जागेला इंटरेस्टिंग बनवणे आपल्याला जमत नाहीय याचे दुःख वाटत राहते.

ते पूल प्रकरण अजिबात कळले नाही.... प्रत्यक्षच पाहावे लागेल Happy Happy

नुसते एवढेच फिरला नसालच. बाकी फोटोही येऊ द्या.

@ साधना <<<< ते पूल प्रकरण अजिबात कळले नाही.... प्रत्यक्षच पाहावे लागेल >>>>

प्रचि 46 मधे आपल्याकडून मध्यापर्यंत उतरत जाणारा एक उतार (टेकडी) आहे. आणि नंतर मग वर चढत जाणारा चढ (दुसरी टेकडी {सिनॅमोन हिल}) आहे..
ह्या दोन्ही उतारांच्या मधे काही झुडुपं दिसतात... ही झुडुपं दोन्ही उतारांच्या दोनही बाजूला आहेत.... ज्यामधून रस्ता जातो. (टेकडीवरुन रस्त्यावर कोणी जाउ नये, रादर पडु नये म्हणून हे झुडपांचं कुंपण)
प्रचि 47 मधे ह्या झुडपांचा Close Up दिलाय.. त्याच चित्रात गेट हाउस आणि त्याचा व्हरांडा दिसतो.
हा व्हरांडा दोन टेकड्यांना जोडतो म्हणून पूलाच (Bridge) काम करतो.
(तो दोन टोकं सोडली तर मधे अधांतरी आहे)
(प्रचि 48 पहा.... व्हरांडा/पॅसेज आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूच्या Ha-Ha Windows)
आणि ह्या व्हरांड्या खालून रस्ता जातो, Continue होतो.. (प्रचि 48 अ मधे उजव्या बाजूची Ha-Ha Window, त्यातून खालून जाणारा रस्ता आणि दोन्ही बाजूची कुंपणसद्रुश्य झुडुपं दिसतील)....

वाह!

हॅट्स ऑफ! काय सौंदर्यदृष्टी आहे या बावांची, खूपच सुरेख प्रॉपर्टी..
धन्यवाद निरु एवढी छान प्रचि देऊन सैर घडवून आणल्याबद्दल ..

खुपच सुंदर!
अश्या निसर्गाच्या सानिध्यातच वास्तव्य हवे!

सुंदर आहे. जवळच्या निसर्गाला अनुसरून बनवलेले घर मस्त वाटते. उगीच त्या निसर्गाला तोडून काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न न केल्याने अतिशय उठून दिसते.

जेफ्री बावा यांनी खूपच सुंदर बांधलं / विकसीत केलं आहे हे सगळं. अगदी अप्रतिम Happy

पण निरु तुमचं विशेष कौतुक. कारण तुम्ही ज्या प्रकारे हे सगळं वर्णन केलंय आणि इतके सुंदर फोटो काढले आहेत त्याला तोड नाही.

परत एकदा आभार.

मसाईमारा, बुलबुल आणि आता हे, सगळी वर्णनं एक सो एक आहेत.

असेच छान छान लिहित रहा Happy

खूप सुंदर माहितीपूर्ण लेखन. प्रत्यक्षाची प्रचिती देणारी प्रकाशचित्रं .... आम्ही बेन्टोटाला दोन दिवस राहिलो होतो. पण ह्या प्रॉपर्टी बद्दल काहीच माहित नव्हतं. दैव दुर्विलास... कमनशीब वगैरे वगैरे... दुसरं काय?

जेफ्री बावा यांनी खूपच सुंदर बांधलं / विकसीत केलं आहे हे सगळं. अगदी अप्रतिम Happy
पण निरु तुमचं विशेष कौतुक. कारण तुम्ही ज्या प्रकारे हे सगळं वर्णन केलंय आणि इतके सुंदर फोटो काढले आहेत त्याला तोड नाही.>>>>> + 99999

खुप छान ओळख आणि माहिती निरु..
आवडला धागा..
मला का तर कोकणातल्या घरांची आठवण झाली पण हे मात्र प्लॅन्ड आहे हे कळतयं.. नेटक आणि रेखीव छान.. खुप खुप सुंदर..

@ भागवत .....
प्रतिसादाबद्दल आभार....

शशांकजी, प्रतिसादाबद्दल आभार...
@ टीना, श्रीलंका बर्‍याच अंशी आपले कोकण, केरळ किंवा Costal South India सारखीच आहे.... (स्थानिक माणसं मात्र कोकणी पेक्षा दक्षिण भारतीयांशी जास्त साधर्म्य असलेली)
दक्षिण भारत आहेही श्रीलंकेला जवळ.
वातावरण सारखे, हवामान, पाउसपाणी सारखे...... मग झाडही सारखी आणि मग जी जी घरं वातावरणाशी अनुरूप आहेत तीही दोन्हीकडे सारखीच....
बहुसंख्यांना हिंदीही अगदी छान येत असतं...
आणि हेलही ओळखीचा तोच... दक्षिण भारतीय.... Happy

<<<मला का तर कोकणातल्या घरांची आठवण झाली पण हे मात्र प्लॅन्ड आहे हे कळतयं.. >>>
@ टीना, हे खर तर प्लॅन्ड अनप्लॅन्ड आहे.
जसं हल्ली आपण Learn To Unlearn म्हणतो नं, तसं...

Pages