Submitted by संतोष वाटपाडे on 29 March, 2017 - 05:09
टिचभर पोटासाठी मित्रा दिली सुळावर मान कशाला
दोन भुकेच्या प्रहरांसाठी जन्माचे नुकसान कशाला...
मान्य मला की जात आपली शूर वीर बलदंड वगैरे
पण या गर्वापायी दुसर्या जातींचा अपमान कशाला...
शाप भुकेचा दिलाच तर मनगटात तितकी शक्तिही दे
अश्वत्थाम्यागत झुरणारे फसवे जीवनदान कशाला...
ईश्वर देतो अन मी लिहितो कविता गजला गद्य उतारे
मी तर केवळ माध्यम आहे मग माझा सन्मान कशाला...
चक्रव्यूह भेदणे समजले पण सुटकेचा मार्ग न कळला
अभिमन्यूला नडले शेवट असले अर्धे ज्ञान कशाला....
मनाप्रमाणे कला असावी..कलेप्रमाणे जीवन नाही
तिचा नाद लागून सुखांची जीवनभर धुळधान कशाला...
द्यायचीच तर ठिणगी दे वा सुर्य टाक या झोळीमध्ये
वाती विझलेल्या दिवटीला अंधाराचे दान कशाला....
-- संतोष वाटपाडे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतीम !
अप्रतीम !
अतिशय आवडली
अतिशय आवडली
अत्यंत सुंदर !!!
अत्यंत सुंदर !!!
सुंदर
सुंदर