बाबांचा मित्र

Submitted by सई केसकर on 23 May, 2017 - 05:09

मी अगदी लहान असल्यापासून घरात एक शब्द नेहमी ऐकू यायचा. मी शिकलेल्या पहिल्या काही शब्दांमधील तो एक होता. तो शब्द म्हणजे डायबेटीस.
माझ्या बाबांना त्यांच्या लग्नाआधीच पाच वर्षं मधुमेहाचे निदान झाले. तेव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. यावर्षी त्यांची एकसष्ठी आहे. बाबा मधुमेहाला त्यांचा मित्र म्हणतात. या वर्षी त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर तब्बल ४१ वर्ष साजरी केली. इतक्या वर्षांचा सहवास माझ्या आईला सुद्धा मिळाला नाहीये असा विनोद आम्ही नेहमी करतो. पण बाबांची गोष्ट अगदी लिहून ठेवण्यासारखी आहे.

सुरुवातीला घरात अतिशय शोकाचे वातावरण होते. एवढ्या लहान वयातच ही व्याधी आणि त्यामुळे पुढे कसे होणार अशा उलट सुलट शंका सगळ्यांच्याच मनात येत होत्या. त्यातच आई बाबांनी लग्न करायचे ठरवले असल्यामुळे या निदानाला अजून महत्व आले होते. कदाचित या वातावरणामुळे बाबांच्या मनावर परिणाम झाला असावा कारण त्यांना त्या काळात एकदोनदा शुगर वाढल्यामुळे ऍडमिट करावे लागले होते. तसे नंतर एकदाही ऍडमिट करावे लागले नाही.

आधी निदान टाईप २ चे झाले होते कारण त्या काळी टाईप १ आणि २च्या निदानासाठी लागणारे तंत्रज्ञान भारतात सहज उपलब्ध नसायचे.
मधुमेहाचे हे २ प्रकार जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील साखरेचे व्ययस्थापन आणि वापर स्वादुपिंडातील (पॅनक्रिया) बीटा सेल्स करत असतात. या पेशींमधून इन्शुलिन नावाचे संप्रेरक रक्तात मिसळले जाते. इन्शुलिनमुळे लिव्हर अतिरिक्त साखरेचे फॅट मध्ये रूपांतर करू शकते. जसा रक्ताचा पीएच आणि शरीराचे तापमान एका विशिष्ट पातळीवर ठेवावे लागते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील निरोगी शरीरामध्ये एका विशिष्ट पातळीमध्ये ठेवले जाते. हे करण्यासाठी इन्शुलिन अतिशय महत्वाचे आहे. काही काही रुग्णांमध्ये इन्शुलिन रक्तात धाडणाऱ्या या बीटा सेल्सना शरीरच उध्वस्त करून टाकते. याला ऑटोइम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात. आणि त्यामुळे इन्शुलिन तयार व्हायचेच बंद होते. याला टाईप १ डायबेटीस म्हणतात. हा अगदी लहानपणीसुद्धा होऊ शकतो.

टाईप २ शक्यतो चाळीशीच्या आसपास (किंवा तणावपूर्ण जीवनशैली असेल तर आधी ) पहिल्यांदा लक्षात येतो. आणि मराठी लोकांमध्ये याला, "अमक्या अमक्या व्यक्तीला आता शुगर निघाली" असा वाक्यप्रयोग रूढ आहे. याचीदेखील करणे काही प्रमाणात आनुवंशिक आहेत. पण कित्येक वेळा अशा प्रकारचा मधुमेह हा इन्शुलिन रेसिस्टन्समुळे झालेला असतो. आपल्या आहारातील कर्बोदकांच्या अतिसेवनामुळे, शरीराला प्रचंड इन्शुलिन बनवावे लागते. ज्या पेशींना इन्शुलिन वापरून साखर नियंत्रणात ठेवायची आहे, त्या पेशींची ते वापरायची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्शुलिनचा अभाव नसून सुद्धा रक्तातील साखर वाढायला लागते. वेळेत निदान झाले तर या प्रकारचा मधुमेह संपूर्णपणे आहारावर नियंत्रण ठेवून ताब्यात ठेवता येतो. अर्थात असे करण्यासाठी डॉक्टरचा सल्ला आवश्यक आहे.

ही सगळी नवीन नवीन माहिती मिळत असतानाच, बाबांची भेट डॉक्टर याद्निक यांच्याशी झाली. याद्निक सर अजूनही के. ई. एममध्ये मधुमेह
विभागाचे काम बघतात. भारतातील निष्णात डायबेटॉलॉजिस्ट पैकी ते एक आहेत आणि तेव्हा तर ते नुकतेच भारतात परत आले होते. बाबांचे सॅम्पल्स त्यांनी लंडनच्या लॅबमध्ये पाठवले आणि त्यांचा मधुमेह हा टाईप १ असल्याची महत्वाची माहिती त्यांना दिली. याद्निक सरांनी त्यांना इन्शुलिन इंजेक्शन सुरु करायचा सल्ला दिला. आणि त्यानंतर बाबांची शुगर आटोक्यात येऊ लागली. याद्निक सरांच्या सल्ल्यामुळे मधुमेहाची
क्लिनिकल मॅनेजमेंट चांगली होऊ लागली हे तर खरेच आहे. पण त्यांच्याशी बोलल्यामुळे ही व्याधी आहार आणि व्यायाम यांच्या समतोलाने चांगल्यापैकी काबूत ठेवता येऊ शकते हा आत्मविश्वास बाबांना आला.

१९८१-१९८३ च्या आसपास माझ्या बाबांचे वजनही बरेच वाढले होते. ते त्यांनी हळू हळू कमी केले. आणि मग मात्र बाबांनी कधीच मागे वळून पहिले नाही. माझ्या अगदी पहिल्या पहिल्या काही आठवणींमध्ये बाबाचे ५-६ वेळा पर्वती चढणे, हाफ मॅरेथॉन पळणे, दोरीच्या उड्या, दर रविवारी सिंहगड चढणे अशा असंख्य व्यायामाच्या आठवणी आहेत. तसेच बाबांच्या ताटात अगदी क्वचित कधीतरी भात दिसायचा. आधी सामोसे कचोऱ्या चापणाऱ्या बाबांना, हळू हळू सॅलॅड, बटाटामुक्त भाज्या वगैरे बदल नक्कीच जड गेले असणार. आणि त्याकाळी मधुमेहाबद्दल तेवढी जागरूकता नसल्याने लोकांचे भारंभार आग्रहदेखील व्हायचे. या सगळ्यातून कधी लोकांच्या ज्ञानात भर टाकून, तर कधी स्पष्टपणे नाही म्हणून त्यांना अंग काढून घेताना मी बघितले आहे. घरात गोडाचे काहीही केले तरी ते अगदी चमचाभरच खायचे किंवा खायचेच नाही असा आत्मनिग्रहदेखील बाबांमध्ये लहानपणापासून बघितला आहे. हळू हळू आई देखील या अशा आहाराची उपासक बनू लागली आणि परिणामी, आमच्या घरातच सगळ्या भाज्यांचा, डाळींचा आणि सॅलडचा समतोल असलेला स्वयंपाक होऊ लागला.

मधुमेहाबद्दल होणाऱ्या नवीन संशोधनाचा तसेच बाजारात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा बाबा अतिशय बारकाईने अभ्यास करायचे. त्यात येणाऱ्या प्रत्येक मोजमापाच्या साधनाचे ते 'अर्ली ऍडॉप्टर' होते. ग्लुकोमीटर जेव्हा महाग होते, तेव्हा ते घरीच फास्टिंग युरीन टेस्ट करायचे. आणि जेव्हा ग्लुकोमीटर परवडण्याच्या किमतीत आला, तेव्हा तो घेणारे आमच्या परिवारातील ते पहिले सदस्य होते. माझ्या दोन्ही काकांना आणि आजी आजोबांनादेखील मधुमेह होता. पण बाबांची नेहमी "तू किती शुगर तपासतोस" यावरून आमच्या घरात थट्टा व्हायची. पण खाण्यापिण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा मी मोजमापावर करणार हा त्यांचा अगदी आधीपासूनचा बाणा होता. कुठूनतरी घामाघूम होऊन धापा टाकत बाबा यायचे आणि लगेच ग्लुकोमीटर मध्ये स्ट्रीप घालायचे. त्यांचा सगळा दिवस फास्टिंग किती आणि पीपी किती या दोन आकड्यांच्या आजूबाजूला रचलेला असायचा. आकडा काय म्हणतोय यावर ते पुढे काय खाणार हे ठरायचे. आणि दुपारच्या तपासणीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी काय खायचे हे ठरायचे. हे असे आयुष्य इतर लोकांनाच अवघड आणि कटकटीचे वाटायचे. पण बाबांना हे मोजमाप करण्यात कोणताही खेद, चिडचिड, होताना मी पाहिले नाही. कधी दुसरे कसे आमरस खातात किंवा गुलाबजाम खातात म्हणून बाबांना खट्टू होतानादेखील मी पाहिले नाही. "मी हे खाऊ शकत नाही, कारण ते माझ्या मित्राला आवडणार नाही", हे त्यांचे कुठल्याही आग्रहाला हसतमुखाने दिलेले उत्तर असायचे. याचा अर्थ ते हे पदार्थ कधीच खायचे नाहीत असाही नाही. एखाद्या दिवशी हौसेनी पुरणपोळी, श्रीखंड खायची मुभा ते स्वतःला द्यायचे. पण ते कधीतरीच असायचे. आणि त्या आधी व्यायाम करून पूर्वतयारीदेखील असायची. नंतर पुन्हा साखर मोजून पुढचे जेवणसुद्धा मोजून मापून घेतलेले असायचे.

या सगळ्याचा काय उपयोग झाला? एवढं मन मारून जगण्याला काय अर्थ आहे? हे सगळे प्रश्न बाबांच्या बाबतीत अनेकवेळा उपस्थित व्हायचे. पण चाळीस वर्ष मधुमेहाशी लढा देऊन आजही रोज २० किमी सायकलिंग आणि त्यानंतर पोहायला जाणाऱ्या माझ्या बाबांनी काय मिळवलं हे त्यांचे फिट शरीर आणि ओसंडणारा उत्साहच सांगू शकेल. हा आजार वरवर नुसता "रोजच्या गोळीचा" आजार वाटला तरी त्याचे दूरगामी परिणाम भयंकर असतात. कितीतरी लोकांना आपल्याला मधुमेह आहे, हे एखादी छोटीशी जखम चिघळून बरी होतच नाहीये इतक्या साध्या कारणाने कळते. पण अनियंत्रित मधुमेहाची जखम चिघळणे हे कधी कधी एम्युटेशन होण्यापर्यंत रौद्र रूप धारण करू शकते. अनियंत्रित रक्तशर्करेमुळे कित्येकवेळा डायबेटिक न्यूरोपॅथीला तोंड द्यावे लागते. खूप वर्षं डायबेटिक असलेल्या लोकांच्या नर्व्ह कमी संवेदनशील होऊ लागतात आणि त्यामुळे डोळ्यांचे, आणि इतर बऱ्याच अवयवांचे आजार होण्याची संभावना असते. मधुमेहाची चाळीशी उलटली असली तरी अशा कुठल्याही व्याधींनी बाबांना ग्रासलेले नाही. आणि हे करणे किती अवघड आहे, हे ज्यांच्या घरात या आजाराचे रुग्ण आहेत तेच समजू शकतात. शरीरातील काही काही सिस्टम्सना इतक्या प्रदीर्घ मधुमेहामुळे नुकसान होणे अपरिहार्य आहे. तसे मध्ये त्यांना किडनीचे थोडे दुखणे झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा आहार बदलला. सॅलड वाढवली आणि कर्बोदके एकाच जेवणात, तेही अगदी कमी अशी ठेवली. आणि पुन्हा त्यांच्या साखरेचे प्रमाण नियंत्रणाखाली आणले.

हा आजार अनुवांशिक असल्यामुळे, तो मला व्हायची शक्यता आहे. बाबांच्या परिवारात या आजारानी चांगली घट्ट आणि दूर दूर पर्यंत मुळे रोवलेली आहेत. इतकी की माझ्या पिढीचे सदस्यदेखील बाबांचा सल्ला घ्यायला येतात. पूर्वी बाबांच्या आईला आणि मावशीला, "काय हे आपल्या नशिबी आलं" असं बोलून चुकचुकताना मी ऐकले आहे. पण बाबांनी मला त्यांची गुणसूत्रं दिली असली तरी त्यांच्याशी चार हात कसे करायचे हे स्वतःच्या गुणधर्मानी दाखवूनही दिले आहे. आणि त्यांच्या या प्रवासात आहाराबद्दल, व्यायामाबद्दल जेवढे काही मला समजले त्यापेक्षा जास्त, एखादी समस्या सोडवताना, दूरदर्शी असणे किती महत्वाचे आहे हे कळले.

प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ . जगदीश हिरेमठ यांचा दर गुरुवारी सकाळी आकाशवाणीवर कार्यक्रम असतो. "एका श्वासाचे अंतर" असे त्या कार्यक्रमाचे नाव आहे. परवाच्या त्यांच्या सदरात त्यांनी एक पटणारी गोष्ट सांगितली. पन्नाशी ओलांडल्यावर होणाऱ्या आजारांपासून बचाव हा तीस ते पन्नास या वयात करायचा असतो. या काळात आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर पन्नाशीनंतर होणारे कितीतरी आजार होत नाहीत. पण वास्तवात तीस ते पन्नास या वयात आपण पारिवारिक जबाबदाऱ्या, आर्थिक स्थैर्य आणि प्रगती, आणि करता येईल तेवढी मजा करण्यात इतके व्यस्त असतो की आपल्याला असे काही आजार होऊ शकतात याची जाणीवही आपल्याला होत नाही. पण नुसता गुडघा दुखावला आणि काही दिवस चालायला त्रास झाला तरी लक्षात येते की शरीर चांगले चालते आहे, हे नेहमी गृहीतच धरले जाते, जोपर्यंत ते चांगले चालेनासे होते तोपर्यंत. तो कार्यक्रम ऐकल्यानंतर बाबांचे पुन्हा एकदा कौतुक वाटले. कारण तीस ते पन्नास हा काळ बाबांनी हिरेमठ सरांचे वाक्य जगण्यातच घालवला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट !
लेखही नेहमीसारखा छान. माहितीत भर टाकणारा आणि इन्स्पिरेशनल आहे.

बाकी अमुक तमुक पथ्य पाळणे म्हणजे मन मारून जगणे हा विचार हास्यास्पद आहे.
असा विचार करणार्‍यांचा विचार करू नये हे एवढे आपले आपल्याला समजले की सोपे होत असावे.

छान लिहिलंयस.
'आपलं आरोग्य ही पूर्णतया डॉक्टर/औषधं यांची जबाबदारी आहे' इथपासून 'डॉक्टर लुटायला बसलेले असतात आणि औषधं घ्यायला मला काय धाड भरली आहे!' या दोन टोकांवर राहणारीच मंडळी अनेकदा दिसतात मागच्या पिढ्यांत. त्या पार्श्वभूमीवर तुझ्या वडिलांचं उदाहरण खरंच प्रेरणादायी आहे.

सुंदर लेख.
इतकं काटेकोरपणे मोजणे, ते ही गेल्या पिढीत... सहीच. त्यांना शुभेच्छा.

छान लिहिलंयस सई.
तुझं लिखाण वाचून तुझ्या बाबांना छान मित्र मिळालाय असंच म्हणावं वाटतंय.
खूप शुभेच्छा त्यांना, अतिशय प्रेरणादायी आहे हे मैत्री बंधन Happy

सुंदर लेख! तुमच्या बाबांचे मनापासून कौतुक .एवढी वर्षे निग्रह पाळणे खरंच कसोटीच काम आहे . पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा .

पन्नाशी ओलांडल्यावर होणाऱ्या आजारांपासून बचाव हा तीस ते पन्नास या वयात करायचा असतो>>>>> फारच मर्मग्राही वाक्य .नेहमी लक्षात ठेवेन Happy

सुंदर लेख! तुमच्या बाबांचे मनापासून कौतुक .एवढी वर्षे निग्रह पाळणे खरंच कसोटीच काम आहे . पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा .>>>> +१.

सुंदर लेख सई! तुझ्या वडिलांचे उदाहरण नक्कीच प्रेरणादयी आहे. माझे बाबा, आजोबा, काका यांनी अशाच प्रकारे ह्या मित्राशी दोस्ती केली होती.
त्यामुळे तुझ्या लेखातील प्रत्येक वाक्याला रिलेट होता आले. तुझे लेख फारच छान असतात. जमेल तितके आय एफ पाळायला सुरवात केली आहे.

अतिशय प्रेरणादायी लेख !
खाण्याबाबत कधीतरी तोल जातो ( मनोनिग्रह कमी पडतो) किंवा जाईल असे वाटते तेव्हा नक्कीच तुझ्या बाबांची आठवण होणार.

तुझ्या बाबांचे खूप कौतुक वाटते ! त्यांनी हे सगळे एक जीवन पद्धती ( lifestyle ) म्हणून अवलंबिले आहे.
>> आता तुझी फिटनेस्/वेट लॉस याबद्दलची कळकळ/पॅशन जास्ती समजते मला. + १

सुंदर लेख सई. तुझ्या बाबांचे आणि त्यांना साथ देणाऱ्या तुझ्या आईचे कौतुक वाटले. माझ्या आजीला टाईप टू डायबिटीस होता.
तिला ५० नन्तर झाला पण निदान झाल्यापासून पुढची अनेक वर्षं तिने अशीच काटेकोर मॅनेजमेंट केली आणि ८०+ हॅपनिंग आयुष्य जगली. मारीचीच बिस्किटं खाणं, आर्टिफिशियल शुगरचे क्यूब्ज stock मध्ये ठेवणं, भात, स्वीट्स आवडत असूनही कमी खाणं , वेळेवर गोळ्या, नियमित डॉक व्हिजिट्स- सगळं आठवलं हा लेख वाचून.

सुरेख लेख सई.

पण बाबांनी मला त्यांची गुणसूत्रं दिली असली तरी त्यांच्याशी चार हात कसे करायचे हे स्वतःच्या गुणधर्मानी दाखवूनही दिले आहे. >> परफेक्ट!

@मी अनु
>>>माझ्या आणि नवर्‍याच्या वडिलांचा मृत्यू क्रॉनिक डायबिटीस ने झाल्याने या सर्व स्टेज पाहिल्या आहेत.

आमच्याही घरात काही आकस्मिक मृत्यू झालेले आहेत. अगदी तरुण वयात आणि काही ऍम्प्युटेशन्स. काही स्ट्रोक्स आणि काही हार्टफेल्स. हे सगळे पेशंट डायबेटिक होते.
मीदेखील अगदी १६-१७ वर्षांची असल्यापासून रोज नॉर्मल माणसाला "अघोरी" वाटेल असा व्यायाम करते (पण माझ्या काही परदेशी मित्र मैत्रिणींना तो नॉर्मल वाटतो, इथे कल्चरचा फरक आहे). मला कित्येक वेळा अगदी कॅज्युअली मी "ऑब्सेस्ड" आहे असे ऐकवण्यात येते. तसेच खाण्याच्या बाबतीत सुद्धा.
पण प्रत्येक वेळेसच माझी ही मानसिकता कुठून आली आहे आणि मी वजनाच्या बाबतीत इतकी का जागरूक आहे हे सगळ्यांना सांगता येत नाही. किंवा त्याचा फारसा फायदा नसतो. कितीतरी जणांना स्त्रियांनी वजन कमी ठेवायसाठी व्यायाम आणि डाएट केले म्हणजे त्या फक्त "फिगर" साठी करतात असे वाटते. तसे असण्यात सुद्धा काहीही वाईट नाही. पण त्यालाही उगीच नकारात्मक टोन दिला जातो.

एक मात्र नक्की आहे. तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर पहिले औषध आपले अन्न असायला हवे. आणि किती खाणं "नॉर्मल" आहे याचे सामान्य माणसांचे ठोकताळे अगदीच सापेक्ष असतात. पण एक गोष्ट लक्षात आली आहे की सुखवस्तू कुटुंबांमध्ये आणि ज्यांना डिप्रेशन वगैरे नाहीये अशा लोकांनी त्यांना जेवढे लागते (असे त्यांना वाटते) त्यापेक्षा कमी खाल्ल्याने कोणताही अपाय होत नाही. जास्त खाण्याने होणारे आजार जास्त बघायला मिळतात आणि त्यावर जास्त काम देखील होत असते.

तसेच आपण लठ्ठ आहोत म्हणून आपण कुपोषित नाही. किंवा आपण बारीक आहोत म्हणून आपण कुपोषित आहोत हे ठोकताळे सुद्धा बऱ्याच वेळेस चूकच ठरतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती ऍनिमिक असतात आणि कित्येक काटकुळ्या व्यक्ती संपूर्णपणे हेल्दी असतात. आपण आपल्या जेवणात योग्य पोषण मूल्ये घेतोय की नाही यावर आपली तब्येत अवलंबून असते.

@ जिज्ञासा
>>>खूपच छान आणि उपयुक्त लेख सई! बाबांचे अभिनंदन! त्यांचा मनोनिग्रह पण तुझ्यात आला असणार म्हणून तू आयएफ इतकं छान पाळते आहेस

हो! मी देखील खूप वर्षं याबाबतीत "अंधारात" घालवली. पण नशिबाने मी फार लवकर सुरुवात केली असल्याने तिशी यायच्या आधीच माझ्या हातात हे सगळे टूल्स आले होते. Happy

@ऋन्मेष

>>>बाकी अमुक तमुक पथ्य पाळणे म्हणजे मन मारून जगणे हा विचार हास्यास्पद आहे.
असा विचार करणार्‍यांचा विचार करू नये हे एवढे आपले आपल्याला समजले की सोपे होत असावे.

अर्थात! धन्यवाद. Happy

@स्वाती

>>'आपलं आरोग्य ही पूर्णतया डॉक्टर/औषधं यांची जबाबदारी आहे' इथपासून 'डॉक्टर लुटायला बसलेले असतात आणि औषधं घ्यायला मला काय धाड भरली आहे!' या दोन टोकांवर राहणारीच मंडळी अनेकदा दिसतात मागच्या पिढ्यांत.

हा हा. अगदी अगदी. माझी आजी आंबे, पुरणपोळी, खीर वगैरे खाताना नेहमी एक डायलॉग मारायची. "गोड नाहीये विशेष". तेव्हा माझे बाबा तिला म्हणायचे की असं म्हणल्यानी तुझी साखर कमी वाढणार नाहीये. खातीयेस त्याला नावं न ठेवता खा नाहीतर खाऊ नकोस!

@शुम्पी
>> आता तुझी फिटनेस्/वेट लॉस याबद्दलची कळकळ/पॅशन जास्ती समजते मला. + १
असे समजून घेणारे कमी असतात. Happy

अभिप्रायाबद्दल सगळ्यांचे आभार.

सई छान लेख. थँकफुली आमच्या घरात मधुमेह नाही पण हृदयरोग आहे त्यामुळे काळजी घेतली जाते, आता अजून जास्त घेईन.
आता तुझी फिटनेस्/वेट लॉस याबद्दलची कळकळ/पॅशन जास्ती समजते मला. >>>+ १

Pages