बाबांचा मित्र

Submitted by सई केसकर on 23 May, 2017 - 05:09

मी अगदी लहान असल्यापासून घरात एक शब्द नेहमी ऐकू यायचा. मी शिकलेल्या पहिल्या काही शब्दांमधील तो एक होता. तो शब्द म्हणजे डायबेटीस.
माझ्या बाबांना त्यांच्या लग्नाआधीच पाच वर्षं मधुमेहाचे निदान झाले. तेव्हा ते फक्त वीस वर्षांचे होते. यावर्षी त्यांची एकसष्ठी आहे. बाबा मधुमेहाला त्यांचा मित्र म्हणतात. या वर्षी त्यांनी त्यांच्या मित्राबरोबर तब्बल ४१ वर्ष साजरी केली. इतक्या वर्षांचा सहवास माझ्या आईला सुद्धा मिळाला नाहीये असा विनोद आम्ही नेहमी करतो. पण बाबांची गोष्ट अगदी लिहून ठेवण्यासारखी आहे.

सुरुवातीला घरात अतिशय शोकाचे वातावरण होते. एवढ्या लहान वयातच ही व्याधी आणि त्यामुळे पुढे कसे होणार अशा उलट सुलट शंका सगळ्यांच्याच मनात येत होत्या. त्यातच आई बाबांनी लग्न करायचे ठरवले असल्यामुळे या निदानाला अजून महत्व आले होते. कदाचित या वातावरणामुळे बाबांच्या मनावर परिणाम झाला असावा कारण त्यांना त्या काळात एकदोनदा शुगर वाढल्यामुळे ऍडमिट करावे लागले होते. तसे नंतर एकदाही ऍडमिट करावे लागले नाही.

आधी निदान टाईप २ चे झाले होते कारण त्या काळी टाईप १ आणि २च्या निदानासाठी लागणारे तंत्रज्ञान भारतात सहज उपलब्ध नसायचे.
मधुमेहाचे हे २ प्रकार जाणून घेणे महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील साखरेचे व्ययस्थापन आणि वापर स्वादुपिंडातील (पॅनक्रिया) बीटा सेल्स करत असतात. या पेशींमधून इन्शुलिन नावाचे संप्रेरक रक्तात मिसळले जाते. इन्शुलिनमुळे लिव्हर अतिरिक्त साखरेचे फॅट मध्ये रूपांतर करू शकते. जसा रक्ताचा पीएच आणि शरीराचे तापमान एका विशिष्ट पातळीवर ठेवावे लागते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणदेखील निरोगी शरीरामध्ये एका विशिष्ट पातळीमध्ये ठेवले जाते. हे करण्यासाठी इन्शुलिन अतिशय महत्वाचे आहे. काही काही रुग्णांमध्ये इन्शुलिन रक्तात धाडणाऱ्या या बीटा सेल्सना शरीरच उध्वस्त करून टाकते. याला ऑटोइम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात. आणि त्यामुळे इन्शुलिन तयार व्हायचेच बंद होते. याला टाईप १ डायबेटीस म्हणतात. हा अगदी लहानपणीसुद्धा होऊ शकतो.

टाईप २ शक्यतो चाळीशीच्या आसपास (किंवा तणावपूर्ण जीवनशैली असेल तर आधी ) पहिल्यांदा लक्षात येतो. आणि मराठी लोकांमध्ये याला, "अमक्या अमक्या व्यक्तीला आता शुगर निघाली" असा वाक्यप्रयोग रूढ आहे. याचीदेखील करणे काही प्रमाणात आनुवंशिक आहेत. पण कित्येक वेळा अशा प्रकारचा मधुमेह हा इन्शुलिन रेसिस्टन्समुळे झालेला असतो. आपल्या आहारातील कर्बोदकांच्या अतिसेवनामुळे, शरीराला प्रचंड इन्शुलिन बनवावे लागते. ज्या पेशींना इन्शुलिन वापरून साखर नियंत्रणात ठेवायची आहे, त्या पेशींची ते वापरायची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्शुलिनचा अभाव नसून सुद्धा रक्तातील साखर वाढायला लागते. वेळेत निदान झाले तर या प्रकारचा मधुमेह संपूर्णपणे आहारावर नियंत्रण ठेवून ताब्यात ठेवता येतो. अर्थात असे करण्यासाठी डॉक्टरचा सल्ला आवश्यक आहे.

ही सगळी नवीन नवीन माहिती मिळत असतानाच, बाबांची भेट डॉक्टर याद्निक यांच्याशी झाली. याद्निक सर अजूनही के. ई. एममध्ये मधुमेह
विभागाचे काम बघतात. भारतातील निष्णात डायबेटॉलॉजिस्ट पैकी ते एक आहेत आणि तेव्हा तर ते नुकतेच भारतात परत आले होते. बाबांचे सॅम्पल्स त्यांनी लंडनच्या लॅबमध्ये पाठवले आणि त्यांचा मधुमेह हा टाईप १ असल्याची महत्वाची माहिती त्यांना दिली. याद्निक सरांनी त्यांना इन्शुलिन इंजेक्शन सुरु करायचा सल्ला दिला. आणि त्यानंतर बाबांची शुगर आटोक्यात येऊ लागली. याद्निक सरांच्या सल्ल्यामुळे मधुमेहाची
क्लिनिकल मॅनेजमेंट चांगली होऊ लागली हे तर खरेच आहे. पण त्यांच्याशी बोलल्यामुळे ही व्याधी आहार आणि व्यायाम यांच्या समतोलाने चांगल्यापैकी काबूत ठेवता येऊ शकते हा आत्मविश्वास बाबांना आला.

१९८१-१९८३ च्या आसपास माझ्या बाबांचे वजनही बरेच वाढले होते. ते त्यांनी हळू हळू कमी केले. आणि मग मात्र बाबांनी कधीच मागे वळून पहिले नाही. माझ्या अगदी पहिल्या पहिल्या काही आठवणींमध्ये बाबाचे ५-६ वेळा पर्वती चढणे, हाफ मॅरेथॉन पळणे, दोरीच्या उड्या, दर रविवारी सिंहगड चढणे अशा असंख्य व्यायामाच्या आठवणी आहेत. तसेच बाबांच्या ताटात अगदी क्वचित कधीतरी भात दिसायचा. आधी सामोसे कचोऱ्या चापणाऱ्या बाबांना, हळू हळू सॅलॅड, बटाटामुक्त भाज्या वगैरे बदल नक्कीच जड गेले असणार. आणि त्याकाळी मधुमेहाबद्दल तेवढी जागरूकता नसल्याने लोकांचे भारंभार आग्रहदेखील व्हायचे. या सगळ्यातून कधी लोकांच्या ज्ञानात भर टाकून, तर कधी स्पष्टपणे नाही म्हणून त्यांना अंग काढून घेताना मी बघितले आहे. घरात गोडाचे काहीही केले तरी ते अगदी चमचाभरच खायचे किंवा खायचेच नाही असा आत्मनिग्रहदेखील बाबांमध्ये लहानपणापासून बघितला आहे. हळू हळू आई देखील या अशा आहाराची उपासक बनू लागली आणि परिणामी, आमच्या घरातच सगळ्या भाज्यांचा, डाळींचा आणि सॅलडचा समतोल असलेला स्वयंपाक होऊ लागला.

मधुमेहाबद्दल होणाऱ्या नवीन संशोधनाचा तसेच बाजारात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा बाबा अतिशय बारकाईने अभ्यास करायचे. त्यात येणाऱ्या प्रत्येक मोजमापाच्या साधनाचे ते 'अर्ली ऍडॉप्टर' होते. ग्लुकोमीटर जेव्हा महाग होते, तेव्हा ते घरीच फास्टिंग युरीन टेस्ट करायचे. आणि जेव्हा ग्लुकोमीटर परवडण्याच्या किमतीत आला, तेव्हा तो घेणारे आमच्या परिवारातील ते पहिले सदस्य होते. माझ्या दोन्ही काकांना आणि आजी आजोबांनादेखील मधुमेह होता. पण बाबांची नेहमी "तू किती शुगर तपासतोस" यावरून आमच्या घरात थट्टा व्हायची. पण खाण्यापिण्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा मी मोजमापावर करणार हा त्यांचा अगदी आधीपासूनचा बाणा होता. कुठूनतरी घामाघूम होऊन धापा टाकत बाबा यायचे आणि लगेच ग्लुकोमीटर मध्ये स्ट्रीप घालायचे. त्यांचा सगळा दिवस फास्टिंग किती आणि पीपी किती या दोन आकड्यांच्या आजूबाजूला रचलेला असायचा. आकडा काय म्हणतोय यावर ते पुढे काय खाणार हे ठरायचे. आणि दुपारच्या तपासणीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी काय खायचे हे ठरायचे. हे असे आयुष्य इतर लोकांनाच अवघड आणि कटकटीचे वाटायचे. पण बाबांना हे मोजमाप करण्यात कोणताही खेद, चिडचिड, होताना मी पाहिले नाही. कधी दुसरे कसे आमरस खातात किंवा गुलाबजाम खातात म्हणून बाबांना खट्टू होतानादेखील मी पाहिले नाही. "मी हे खाऊ शकत नाही, कारण ते माझ्या मित्राला आवडणार नाही", हे त्यांचे कुठल्याही आग्रहाला हसतमुखाने दिलेले उत्तर असायचे. याचा अर्थ ते हे पदार्थ कधीच खायचे नाहीत असाही नाही. एखाद्या दिवशी हौसेनी पुरणपोळी, श्रीखंड खायची मुभा ते स्वतःला द्यायचे. पण ते कधीतरीच असायचे. आणि त्या आधी व्यायाम करून पूर्वतयारीदेखील असायची. नंतर पुन्हा साखर मोजून पुढचे जेवणसुद्धा मोजून मापून घेतलेले असायचे.

या सगळ्याचा काय उपयोग झाला? एवढं मन मारून जगण्याला काय अर्थ आहे? हे सगळे प्रश्न बाबांच्या बाबतीत अनेकवेळा उपस्थित व्हायचे. पण चाळीस वर्ष मधुमेहाशी लढा देऊन आजही रोज २० किमी सायकलिंग आणि त्यानंतर पोहायला जाणाऱ्या माझ्या बाबांनी काय मिळवलं हे त्यांचे फिट शरीर आणि ओसंडणारा उत्साहच सांगू शकेल. हा आजार वरवर नुसता "रोजच्या गोळीचा" आजार वाटला तरी त्याचे दूरगामी परिणाम भयंकर असतात. कितीतरी लोकांना आपल्याला मधुमेह आहे, हे एखादी छोटीशी जखम चिघळून बरी होतच नाहीये इतक्या साध्या कारणाने कळते. पण अनियंत्रित मधुमेहाची जखम चिघळणे हे कधी कधी एम्युटेशन होण्यापर्यंत रौद्र रूप धारण करू शकते. अनियंत्रित रक्तशर्करेमुळे कित्येकवेळा डायबेटिक न्यूरोपॅथीला तोंड द्यावे लागते. खूप वर्षं डायबेटिक असलेल्या लोकांच्या नर्व्ह कमी संवेदनशील होऊ लागतात आणि त्यामुळे डोळ्यांचे, आणि इतर बऱ्याच अवयवांचे आजार होण्याची संभावना असते. मधुमेहाची चाळीशी उलटली असली तरी अशा कुठल्याही व्याधींनी बाबांना ग्रासलेले नाही. आणि हे करणे किती अवघड आहे, हे ज्यांच्या घरात या आजाराचे रुग्ण आहेत तेच समजू शकतात. शरीरातील काही काही सिस्टम्सना इतक्या प्रदीर्घ मधुमेहामुळे नुकसान होणे अपरिहार्य आहे. तसे मध्ये त्यांना किडनीचे थोडे दुखणे झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा आहार बदलला. सॅलड वाढवली आणि कर्बोदके एकाच जेवणात, तेही अगदी कमी अशी ठेवली. आणि पुन्हा त्यांच्या साखरेचे प्रमाण नियंत्रणाखाली आणले.

हा आजार अनुवांशिक असल्यामुळे, तो मला व्हायची शक्यता आहे. बाबांच्या परिवारात या आजारानी चांगली घट्ट आणि दूर दूर पर्यंत मुळे रोवलेली आहेत. इतकी की माझ्या पिढीचे सदस्यदेखील बाबांचा सल्ला घ्यायला येतात. पूर्वी बाबांच्या आईला आणि मावशीला, "काय हे आपल्या नशिबी आलं" असं बोलून चुकचुकताना मी ऐकले आहे. पण बाबांनी मला त्यांची गुणसूत्रं दिली असली तरी त्यांच्याशी चार हात कसे करायचे हे स्वतःच्या गुणधर्मानी दाखवूनही दिले आहे. आणि त्यांच्या या प्रवासात आहाराबद्दल, व्यायामाबद्दल जेवढे काही मला समजले त्यापेक्षा जास्त, एखादी समस्या सोडवताना, दूरदर्शी असणे किती महत्वाचे आहे हे कळले.

प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ . जगदीश हिरेमठ यांचा दर गुरुवारी सकाळी आकाशवाणीवर कार्यक्रम असतो. "एका श्वासाचे अंतर" असे त्या कार्यक्रमाचे नाव आहे. परवाच्या त्यांच्या सदरात त्यांनी एक पटणारी गोष्ट सांगितली. पन्नाशी ओलांडल्यावर होणाऱ्या आजारांपासून बचाव हा तीस ते पन्नास या वयात करायचा असतो. या काळात आहार, व्यायाम आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली तर पन्नाशीनंतर होणारे कितीतरी आजार होत नाहीत. पण वास्तवात तीस ते पन्नास या वयात आपण पारिवारिक जबाबदाऱ्या, आर्थिक स्थैर्य आणि प्रगती, आणि करता येईल तेवढी मजा करण्यात इतके व्यस्त असतो की आपल्याला असे काही आजार होऊ शकतात याची जाणीवही आपल्याला होत नाही. पण नुसता गुडघा दुखावला आणि काही दिवस चालायला त्रास झाला तरी लक्षात येते की शरीर चांगले चालते आहे, हे नेहमी गृहीतच धरले जाते, जोपर्यंत ते चांगले चालेनासे होते तोपर्यंत. तो कार्यक्रम ऐकल्यानंतर बाबांचे पुन्हा एकदा कौतुक वाटले. कारण तीस ते पन्नास हा काळ बाबांनी हिरेमठ सरांचे वाक्य जगण्यातच घालवला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई, मस्त लेख...
तुझ्या बाबांना सॅल्युट...
माझ्या घरच्या मधुमेही पेशंट्स ना नक्की वाचायला देइन हा लेख.
सध्या आमच्या कडे डॉ.प्रमोद त्रिपाठी यांच्या रुपाने मधुमेह वाल्यांना खुप मोठा दिलासा मिळाला आहे..
त्यांचे सुचवलेलं वेगन डाएट आणि त्यांनी सुचवलेली लाईफस्टाईल आम्ही शक्य तितकी फॉलो करायला सुरुवात केली आहे.आणि त्याचे छान परिणाम सुद्धा दिसुन येत आहेत .
तुझ्या बाबांना पुढच्या आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..

स्मिता श्रीपाद, तुम्ही डॉ. त्रिपाठींचा कुठला प्रोग्राम केला त्याचा अनुभव शेअर कराल का?

>>सध्या आमच्या कडे डॉ.प्रमोद त्रिपाठी यांच्या रुपाने मधुमेह वाल्यांना खुप मोठा दिलासा मिळाला आहे..
त्यांचे सुचवलेलं वेगन डाएट आणि त्यांनी सुचवलेली लाईफस्टाईल आम्ही शक्य तितकी फॉलो करायला सुरुवात केली आहे.आणि त्याचे छान परिणाम सुद्धा दिसुन येत आहेत .

बाबांनीसुद्धा केला होता तो प्रोग्रॅम.
सातत्याने फॉलो करणं जरी अवघड असलं तरी स्मूदी हा कॉन्सेप्ट फारच चांगला आहे आणि त्याचा खूप फायदा आई बाबांना झाला.
फक्त आता किडनी सांभाळावी लागणार आहे त्यामुळे पालेभाज्यातून येणारे क्षार वर्ज्य आहेत. म्हणून आता बाबावेगळ्या मार्गाने फॉलो करताहेत.
मला सुद्धा रोज स्मूदी पिण्याचा आग्रह होतो. पण अजून सकाळी उठल्या उठल्या हिरवेगार द्रव्य पिण्याइतकी सात्विकता माझ्यात आली नसावी.

सुंदर प्रेरणादायी लेख !
पन्नाशी ओलांडल्यावर होणाऱ्या आजारांपासून बचाव हा तीस ते पन्नास या वयात करायचा असतो >>>>> आवर्जुन लक्षात ठेवणार !

खूप सुंदर लेख लिहीलाय.
माझ्या आणि नवर्‍याच्या वडिलांचा मृत्यू क्रॉनिक डायबिटीस ने झाल्याने या सर्व स्टेज पाहिल्या आहेत.
हे सर्व मॉनिटरिंग हसत खेळत करणारा पेशंट खरंच विरळा.

खुपच छान लेख आहे.
इतकी वर्षे मधुमेहाचा इतक्या खुबीने सामना करणाऱ्या तुमच्या बाबांना सलाम __/\__
खरंच फार कठीण तपश्चर्या आहे ही..
माझ्याही घरात मधुमेही आहेत..त्यांना या लेखाचा नक्कीच फायदा होईल.

खूपच छान आणि उपयुक्त लेख सई! बाबांचे अभिनंदन! त्यांचा मनोनिग्रह पण तुझ्यात आला असणार म्हणून तू आयएफ इतकं छान पाळते आहेस Happy
घरातल्या बऱ्याच सदस्यांना ह्या लेखाचा फायदा होईल तेंव्हा लिंक शेअर करते आहे.

स्मिता श्रीपाद, तुम्ही डॉ. त्रिपाठींचा कुठला प्रोग्राम केला त्याचा अनुभव शेअर कराल का? >>

मी स्वतः केला नाहिये हा प्रोग्राम. माझा नवरा व सासु सासरे यांनी केला...
"TRANSCENDENTAL RESIDENTIAL PROGRAM"
हा ७ दिवसांचा रेसिडेंशिअल प्रोग्राम आहे.यात व्यायाम, त्यांच्या आहार पद्धती,अनेक प्रकारचे सेशन्स जसं की मेडीटेशन्,काही टीम अ‍ॅक्टीवीटीज्,कुकींग,पिकनिकस ई ई असतात.
माझ्या नवर्याला गेल्या वर्षी अचानक बॉर्डर लेवल ला शुगर निघाली आणि आम्ही खुप घाबरलो.पण आमच्या सुदैवाने आम्हाला या कोर्स बद्दल कळलं आणि सगळं चित्रच बदललं.
नवरा कोर्स वरुन आल्यावर खुपच बदलला होता.म्हणजे लहान वयात शुगर निघाली म्हणुन अचानक निराश झालेला माझा नवरा कोर्स करुन आल्यावर कोणीतरी वेगळाच माणुस बनुन आला होता :-)त्याच्यातल्या कॉन्फिडन्स ने साखरेवर मात केली आणि १ महिन्यापूर्वी सुरु केलेली त्याची शुगर ची गोळी अक्शरशः ४ दिवसात बंद झाली.
आम्ही शक्य होईल तितकं वेगन डाएट पाळायचा प्रयत्न करतो.अगदी १००% नाही तरी ८५-९०% झालं तरी खुप होतं.
बाकी याची अजुन माहिती इथे मिळेल तुम्हाला
http://www.freedomfromdiabetes.org/How-it-Works

सातत्याने फॉलो करणं जरी अवघड असलं तरी स्मूदी हा कॉन्सेप्ट फारच चांगला आहे आणि त्याचा खूप फायदा आई बाबांना झाला.>> आठवड्यातले ७ पैकी ५ .५ दिवस आम्ही हे सगळे नक्की पाळतो.शनिवार दुपार ते रवीवार संध्याकाळ कमी जास्त प्रमाणात काही गोष्टी नाही पाळल्या जात पण सोमवार पासुन परत सुरु.

मला सुद्धा रोज स्मूदी पिण्याचा आग्रह होतो. पण अजून सकाळी उठल्या उठल्या हिरवेगार द्रव्य पिण्याइतकी सात्विकता माझ्यात आली नसावी.>>
हा हा हा Happy

चांगला लेख सई! तुमच्या बाबांचे अभिनंदन. इतकी चांगली पण अवघड जीवनशैली न कुरकुरता अवलंबली त्यांनी.

छान लेख.
पन्नाशी ओलांडल्यावर होणाऱ्या आजारांपासून बचाव हा तीस ते पन्नास या वयात करायचा असतो >>> +१

सुंदर लिहिलयस बाबांच्या मित्राबद्दल आणि बाबा त्याच्याशी कसं जमवून घेतात याबद्दल पण.
आता तुझी फिटनेस्/वेट लॉस याबद्दलची कळकळ/पॅशन जास्ती समजते मला.
काकांना खूप शुभेच्छा.

Pages