बर्गर आणि वडापाव.

Submitted by सचिन काळे on 19 May, 2017 - 00:50

ती : "का रे बोलावलंस मला या बागेत? असं काय महत्वाचं सांगायचं आहे म्हणालास? फोनवर बोलता आलं नसतं का आपल्याला? संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी बॉस काही मला सोडायला तयार होत नव्हता. एक अर्जंट लेटर टाईप करूनच जा म्हणत होता. शेवटी आले मी त्याला आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे असं सांगून. त्यालाही माहीत आहे ना, आईच्या कॅन्सरचं! जा म्हणाला."

तो : "अगं हो! हो! जरा दम खाशील की नाही? बस की जरा या बेंचवर. बघ समोरच्या झोपाळ्यावर कशी लहान बाळं खेळताहेत. आणि ते बघ ती मुलगी फुलपाखराच्या मागे पळतेय. अरे! अरे! बघ कशी धपकन् पडली ना ती!!"

ती : "अरेरे! लक्ष कुठे असतं कोण जाणे त्यांच्या आयांचं? हो सरक त्या बाजूला. हुश्श! दमले रे बाबा! बसच्या गर्दीतला प्रवास अगदी नकोसा होतो. तुम्हां आयटीवाल्यांचं बरंय रे! ऑफिसला आणायला, सोडायला तुम्हा लोकांना कॅब असते. आणि कॅब आली नाही तर तुला ऑफिसला पोहोचवायला तुझ्या घरची गाडी आहेच की. मला माझ्या वडिलांचे आश्चर्य वाटतं, मिलमधून रिटायर होईपर्यंत ते सायकलवरूनच जात येत होते. घे! ह्या पुडीतला एक वडापाव खा. येताना त्या नेहमीच्या गाडीवाल्याकडून घेतलाय."

तो : "नको मला. कितीवेळा सांगितलंय रस्त्यावरचं मी काही खात नाही."

ती : "नको तर नको. माहितेय मला. डॉक्टर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ना तू! तुला रस्त्यावरचा वडापाव कसा चालणार. आपलं लग्न झाल्यावरसुद्धा मी गाडीवरचा वडापाव खायचं सोडणार नाही हं! आधीच सांगून ठेवते. मला नाही आवडत बाई तो बर्गर बिर्गर. अरे हो! तू तुझ्या मम्मीपप्पांना आपल्या लग्नाचं विचारणार होतास ना, काय झालं त्याचं?"

तो : "हो, तेच सांगायला मी तुला इथे बोलावलं होतं. तर तुझं आपलं कधीचं वडापावपुराणच चाललंय."

ती : "बरं बाबा! सांग. अरे, परवा मला आपल्या मम्मीपप्पांना भेटवायला घेऊन गेला होता तेव्हा काय भांबावला होतास रे तू. आणि माझा ड्रेस तुझ्या मम्मीला आवडला नाही वाटतं? किती वेळ निरखून बघत होत्या त्या माझ्या ड्रेसकडे. तेव्हढाच तर एक भारीवाला ड्रेस आहे माझ्याकडे."

तो : "अगं पण इस्त्री तरी करून घालायचा होता."

ती : "इस्त्री बिघडलीय. ह्या पगाराला नवीन घेणारच होते. आणि हो! तुझ्या आईच्या हातचे पराठे आवडले हं मला. मस्तं झाले होते."

तो : "हो! पराठ्याबरोबरचं लोणचं तू जसं चटकमटक करून खात होतीस, त्यावरून समजत होतंच की."

ती : "अपना तो बाबा वोह स्टाईलीच है. अरे! चहापण बशीत घेऊन फुरक्या मारून प्यायल्याशिवाय मला गोड लागतच नाही. आणि हो! माझ्या आईचा इलाज तुमच्या ओळखीने स्वस्तात कुठे होतो का बघा, असे मी विचारल्याबरोबर तुझ्या मम्मीपप्पांचा चेहरा किती गोरामोरा झाला होता!"

तो : "अगं पहिल्याच भेटीत असं विचारायचं असतं का कधी?"

ती : "अस्सं होय! मग कधी विचारायचं असतं? आपलं लग्न झाल्यावर का? अरे हो!! ते राहिलंच की? तू सांगणार होतास ना! काय म्हणाले मम्मीपप्पा आपल्या लग्न करण्याविषयी? पण थांब! नको सांगू. मलाच तुला काहीतरी सांगायचंय."

तो : "मला सांगायचंय? काय!!!?"

ती : "मला आठवतंय तो दिवस जेव्हा आपली पहिली भेट झाली होती. एका संध्याकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे सर्व बसेस बंद पडल्या होत्या."

तो : "आणि मी माझ्या कारमध्ये चार जणांना लिफ्ट दिली होती. त्या चौघांमध्ये तूसुद्धा होतीस."

ती : "हो! शेवटचं मला घराजवळ सोडताना मी तुला चहा पिण्याकरीता घरी चलण्याचा आग्रह केला होता."

तो : "आणि मग मी फक्त तुला भेटण्याकरिता काहीना काही निमित्त काढून वरचेवर तुझ्या घरी येत रहायलो."

ती : "हळूहळू आपण एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो हे समजलंच नाही. आणि एक दिवस तू मला लग्नाची मागणी घातली. आणि मीसुद्धा भावनेच्या भरात तुला हो म्हटलं."

तो : "भावनेच्या भरात!!? म्हणजे म्हणायचं काय आहे तुला?"

ती : "परवा आपल्या मम्मीपप्पांना भेटवायला तू मला घेऊन गेलास. तुझं ते मोठं घर पाहून तर मी प्रथम हबकूनच गेले. तुझ्या घरातल्या महागातल्या वस्तू, तुमचं श्रीमंती राहणीमान, तुमच्या चालीरीती हे सर्व माझ्या कल्पने पलीकडले होते. त्यात तुझ्या मम्मीपप्पांचं माझ्या बरोबरीचं कोरडं वागणं, माझ्या मनाला कुठेतरी टोचलं रे!! नाहिरे!! मी तुमच्या बरोबरीची नाहीए!! आपल्या लग्नानंतर मी तुमच्या घरात सामावू शकणार नाही. आणि म्हणूनच खूप विचार करून मी एक निर्णय घेतलाय."

तो : "कोणता?"

ती : "तुझ्याशी लग्न न करण्याचा!!!"

तो : "काय म्हणतेस!!!!?"

ती : "हो! तुझ्या मम्मीपप्पांनी आपल्या लग्नाला दिलेला नकार मला ऐकवणार नाही. म्हणून मी तुला त्याआधीच सांगतेय. मला विसरून जा. आणि जमलं तर मला माफ कर. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही."

तो : "होय! तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. परवा तू घरी येऊन गेल्यावर मम्मीपप्पांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली. आणि आपले लग्न होणे कदापि शक्य नाही असं मला ठाम शब्दात सांगितलं. आता मम्मीपप्पांचे मन मोडणे मला तर शक्य नाही. म्हणून लग्नाचा नकार तुला कसा कळवायचा याचीच मला चिंता पडली होती. बरं झालं तूच आपल्या लग्नाला नकार दिलास. माझ्या मनावरचं किती मोठं ओझं उतरवलंस तू."

ती : "काय!!!!? खरं म्हणतोयस का तू हे?"

तो : "अगदी खरं!"

ती : "मग मी जाऊ म्हणतोस आता?"

तो : "जातेस तर जा!"

ती : "आपल्यातले संबंध संपले असं समजू का मी?"

तो : "असंच समज. पण ते तुझं रडू थांबव पाहू आता. हा घे रुमाल. डोळे पूस. नाहीतर आपल्याला बघणाऱ्या लोकांना काही तरी भलताच संशय यायचा."

ती : "बरं मी जाते."

तो : "ठीक आहे. पण मम्मीपप्पांनी आपल्या लग्नाला नकार दिल्यानंतर काय घडले ते तर ऐकून जा."

ती : "काय घडले?"

तो : "मी मम्मीपप्पांची फार विनवणी केली. मी त्यांना सांगितलं, की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी लग्न करेन तर तुझ्याशीच. नाहीतर आजन्म अविवाहित राहीन. तरी ते ऐकेना. मग मी त्यांच्याशी अबोला धरला. अन्नपाणी सोडले. आणि मग काय झाले सांगू?"

ती : "काय?"

तो : "आज सकाळी त्यांनी मला बोलाविले. मला म्हणाले, तू आमचा एकुलता एक मुलगा आहे. तुला दुःखी झालेले पाहून आम्हाला राहवत नाहीए. आणि म्हणून आम्ही तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहोत."

ती : "काय!!!?"

तो : "हो! पण एका अटीवर. तुझ्या होणाऱ्या बायकोने आपल्या राहणीमानाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आणि आम्हीसुद्धा तिच्या राहणीमानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. तिने एक पायरी वर चढावी, आम्हीसुद्धा एक पायरी खाली उतरू. मग! तू माझ्याकरीता एवढं तर करशील ना?"

ती : "हो! करेन ना मी. तुझे मम्मीपप्पा माझ्याकरीता एवढी तडजोड करत आहेत, तर मी का नाही करणार? पण आपल्या लग्नाला मम्मीपप्पा तयार झालेत, हे तू मला अगोदरच का नाही सांगितलंस? जातेस तर जा म्हणून उगाच रडवलंस ना मला?"

तो : "मग तुसुद्धा मला सोडून जायचं म्हणत होतीस ते!! मनात म्हटलं जरा तुझीपण गंमत करावी. मला माफ कर. मग सांग ना! करशील ना माझ्याशी लग्न?"

ती : "हो रे राजा! मी तुझ्याकरिता काहीही करायला तयार आहे?"

तो : "आणि मीसुद्धा तुझ्याकरिता काहीही करायला तयार आहे? अगदी रस्त्यावरच्या गाडीचा वडापावही खाऊन दाखवेन. हा! हा! हा!"

ती : " आणि मीसुद्धा बर्गर खात जाईन. हा! हा! हा!"

माझा ब्लॉग :
http://sachinkale763.blogspot.in

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाव ..काय मस्त संभाषण लिहिलयं ... खूप आवडलं Happy
तीची चहा पिण्याची स्टाईल वाचून मला मी चहा पितेय असच वाटलं Lol

आवडली

सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार.

कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता. आपण गोड मानून घेतल्याबद्दल धन्यवाद. Happy

@ आबासाहेब, कंसराज, कथा वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!

छान लिहिलंय ..

बाकी भारतात ज्या दर्जाचा बर्गर मिळतो त्यापेक्षा वडापावच छान वाटतो.
एकाच गाडीवर रोज खाल्ला तरी वडापावचा कण्टाळा येत नाही.
एकच बर्गरचा चार दिवसात येऊ शकतो.

अजिबात पटली नाहीये.
डॉक्टर आईवडिलांचया एकुलत्या एक मुलाला वडापाव आवडत नाही आणि फक्त बर्गरच खातात हे जनर्लायझेशन कायच्या काय वाटलं.
मुलीचं कॅरेक्टर पटलेलं नाही.
एकच चांगला ड्रेस? बरं ते ही ठीकाय. पण जर त्याच्या घरी जायचं आहे तर दुसरा बरा नवीन ड्रेस घ्यायचा ना. बर. तेही नाही तर तो जुना ड्रेस पण इस्त्री न करता घालायचा. आपण कुठे जातोय कसं जातोय हे कळायला हवं.
आणि बशीत घेऊन फुरक्या मारून पिणं जस्ट टू मच.
मला तर वाटतं विद्या भूतकरच्या त्या एका स्टोरी सारखं ह्या दोघांनीही दुरच रहावं एकमेकांपासुन. लग्न नाही केलं तर बरं.
टेक इट ईजी. Lol Lol

@ सस्मित, आपणांस कथा अजिबात पटलेली नाही, हे समजले. आपल्या मतांचा मी आदर करतो. तरी मी आपण उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर काही भाष्य करू इच्छितो.

डॉक्टर आईवडिलांचया एकुलत्या एक मुलाला वडापाव आवडत नाही आणि फक्त बर्गरच खातात हे जनर्लायझेशन कायच्या काय वाटलं. पुढील संवाद पहा <<<डॉक्टर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा ना तू! तुला रस्त्यावरचा वडापाव कसा चालणार. >>> स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून मुलगा रस्त्यावरचा वडापाव खात नाही.

एकच चांगला ड्रेस? बरं ते ही ठीकाय. पण जर त्याच्या घरी जायचं आहे तर दुसरा बरा नवीन ड्रेस घ्यायचा ना. बर. तेही नाही तर तो जुना ड्रेस पण इस्त्री न करता घालायचा. आपण कुठे जातोय कसं जातोय हे कळायला हवं. पुढील संवाद पहा. <<< तेव्हढाच तर एक भारीवाला ड्रेस आहे माझ्याकडे."
तो : "अगं पण इस्त्री तरी करून घालायचा होता."
ती : "इस्त्री बिघडलीय. ह्या पगाराला नवीन घेणारच होते. >>> ड्रेस तिच्या दृष्टीने भारीवालाच घातला होता हो!!! फक्त बिगर इस्त्रीचा. इस्त्री बिघडली होती ना! गरीब आहे बिचारी. पगाराला नवीन इस्त्री घेणारच होती ती.

आपण कुठे जातोय कसं जातोय हे कळायला हवं.>>> गरीब आहे माझी नायिका. सर्व जमतं, पण पैशाचं सोंग कसं आणणार?

आणि बशीत घेऊन फुरक्या मारून पिणं जस्ट टू मच.>>> पुढील संवाद पहा. <<<< ती : "अपना तो बाबा वोह स्टाईलीच है. >>>> स्टायलिश नायिका आहे माझी! मला तर आवडली बाबा!!!

मला तर वाटतं विद्या भूतकरच्या त्या एका स्टोरी सारखं ह्या दोघांनीही दुरच रहावं एकमेकांपासुन. लग्न नाही केलं तर बरं.>>> Lol

माझी ही पहिलीच प्रेमकथा आहे, आणि मी माझ्या कथेच्या प्रेमात पडलोय. प्लिज नाराज नका करू हो मला!!!

टेक इट ईजी Lol