१ . मायावी
माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.
मी त्या अगम्य काळोखातून पुढे, अजून पुढे जात राहिलो. बरीच पावलं चालल्यावर तो आवाज कानांवर पडला. तळ नसलेल्या खोSSल विहरीतून आल्यासारखा.
“कोण आहेस तू ?” मी संयमित आवाजात विचारलं.
“तुला माहीत आहे.” प्रत्युत्तर मिळालं.
खरंच मला माहीत होतं.
“सैताना, मला इथे का आणलंस ? आयुष्यभर मी चांगले कामं केले, कधी कुणाला त्रास दिला नाही. तरीही मी इथे का ??”
सगळीकडे स्मशानशांतता पसरली. काही क्षण गेले की तास माहीत नाही पण एकदाचा तो आवाज बोलला.
“तुला कशाची अपेक्षा होती ?”
“काय माहीत, म्हणजे मृत्यूनंतर जीवन असतं यावर कधी मी विश्वास ठेवला नाही. म्हणून… एक मिनिट, म्हणूनच तर मला इथे आणलं नाही ?”
पुन्हा शांतता. मग मीच बोलू लागलो
“असं म्हणतात की तू मायावी आहेस. म्हणूनच तू नाहीयेस असा तू लोकांचा समज करून दिलाय. म्हणजे लोक पाप करतील अन तुझ्या जाळ्यात फसतील.”
“चूक. मी जगाचा असा समज करून दिलाय की माझ्या विरोधातही कुणी आहे.”
“काय !!! म्हणजे देव अस्तित्वातच नाही ???”
गुहेचा इंचन इंच थरकापून टाकणाऱ्या आवाजात प्रत्युत्तर मिळालं…
“मीच देव आहे.”
--------------------------------------------------------
२ . फोन कॉल
तो मला दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी फोन करतो. तो म्हणजे दहा वर्षांपूर्वी मेलेला माझा भाऊ.
दरवर्षी मी वाट बघते त्याच्या कॉलची. मोबाईलकडे डोळे ठेवून बसते दिवसभर. प्रत्येकवेळी तो वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतो. त्यात चार ते पाच आकडे अन काही सांकेतिक चिन्ह असतात. तो कुठून बोलतो मला कधीच कळालं नाही. आजुबाजुला कधी गाड्यांचा कोलाहल ऐकू येतो तर कधी गूढ शांतता असते. कधी मुसळधार पाऊस टपटपण्याचा आवाज येतो तर कधी घोंघावणाऱ्या वादळाचा. त्याचा आवाज मात्र स्पष्ट ऐकू येत असतो – लोखंडावर चरे ओढल्यासारखा. कुठेतरी आडोशाला उभं राहून तो बोलत असेल का ? बाहेर पडल्यावर वितळून जाईल का ?
त्याचा चेहरा मला अजूनही स्पष्ट आठवतो, त्याचं ते निरागस हास्य, बाळा म्हणून मला हाक मारणं. चिता जळण्याआधीचा त्याचा चेहरा डबडबलेल्या डोळ्यांनी मी पाहलेला. पण मी डोळे मिटले की त्याचा चैतन्याने भारलेला प्रसन्न चेहराच येतो समोर, नुकत्याच पाहलेल्या इंद्रधनुष्यासारखा… जिवंत.
फोनमधला त्याचा आवाज मात्र कोरडा, भावविरहित, जिवंतपणाचा लवलेशही नसलेला. मला माहितीये की दरवर्षी बोलायला अवघड होत चाललंय. माझ्याशी बोलायला त्याला काय त्रास सहन करावा लागेल काय माहीत. मी म्हटलं होतं त्याला की हे सगळं करण्याची आवश्यकता नाही. जगणं शिकलेय मी आता. प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.
पण तरीही तो फोन करतच राहिला… दरवर्षी न चुकता. कदाचित मलाही सवय झालीये, जवळचा असूनही अनोळखी वाटणाऱ्या आवाजाची.
यावर्षीही त्याचा कॉल आला, अशाच एका अनोळखी नंबरवरून
“छकुली, मी बोलतोय.”
“दादा…”
“हॅपी बर्थडे बाळा.”
“थँक्स.”
एवढंच बोलू शकले मी. खूप विचारावंसं वाटत असतं की तू कसा आहेस, काय करतोस. पण शब्दच फुटत नाहीत. आयुष्य कसं सुरू आहे हे हवेच्या झोताला कसं विचारावं.
“कशी आहेस, काय केलंस वर्षभर ?”
मग मी बोलत गेले. वर्षभर काय केलं, कुठं फिरले. त्याने कधीही न पाहिलेल्या भाचा अन भाचीच्या गोष्टी. खूपखुप बोलले मी पुढची काही मिनीटं.
तो मात्र नि:शब्द… कसलाच प्रतिसाद नाही, हुंकार नाही, चांगलं किंवा वाईट म्हणणारे कुठलेही शब्द नाहीत.
यावर्षी मला खुप अवघड असं काहीतरी सांगावं लागणार असतं.
“बाबा…”
एवढ्यावरच त्याने अर्थ लक्षात घेतलेला.
“केव्हा ?”
“चार महीने झाले.”
”आई कशीये ?”
“बरी आहे पहिल्यापेक्षा. काळ हे सर्व दुःखांवरचं औषध आहे नाही का.”
एवढंच फक्त मी सांगते. पण तिच्या चेहऱ्यावरचं तेज हरवलंय, माझ्या घरी यायला तिने नकार दिलाय, एवढ्या मोठ्या घरात ती एकटी राहते, बिनादिव्यांच्या अंधारात घरभर तिची सावली फिरते, बाबांच्या दवाखान्यालासुद्धा तिच व्यापून असते, त्यांच्या पलंगावर डोकं ठेवून तुझ्या फोटोकडे तासानतास बघत बसून असते हे कसं सांगू मी त्याला.
“तू ?” एवढंच विचारतो तो नेहमीच्या रुक्ष आवाजात
“मी ठिकेय. तुला तर माहितीये, दुःखातून मी लवकर बाहेर पडते.”
“हो.”
त्याचा आवाज पुसट होत चाललेला.
“तुला जावं लागणार आहे का ?” मी कातर स्वरात विचारते. दरवर्षी कॉल लवकर कट होतोय. थकत चाललाय तो दरवर्षी. दूर होत चाललाय क्षणाक्षणाने कणाकणाने.
“आय अॅम सॉरी.”
“असं नको म्हणू रे. आय मिस यू टू मच.”
“आय मिस यू टू छकुली.”
आणि त्याचा आवाज बंद झाला. पुढच्या एका वर्षासाठी तो मेला. अन मी कानावर मोबाईल घट्ट दाबून तशीच उभी… एकाकी.
फारच अवघड गिफ्ट आहे हे… अनमोल असलं तरीही.
अन मला माहितीये… पुढच्या वर्षी ते दोघंही कॉल करणार.
-----------------------------------------------------
३ .सल्ला
काहीबी कर भाऊ पण पृथ्वीवर फिरायले नको जाऊ. मी मागच्याच महिन्यात गेल्तो. म्हणलं स्वस्तात पडतंय त येऊ हिंडुन. ले बोगस अनुभव होता. कुठून झक मारली अन गेलो आसं झालं. येच्यापेक्षा मंगळावरचे वाळूचे ढिगारे उपसले आसते नाहीतर चंद्रावरच्या एखाद्या बारमध्ये लोळत पडलो असतो त बरं झालं आसतं. तू म्हणशील ह्यो भैताड आसं कहून बोलून राह्यला, त आईक –
सुरुवात करतो हवामानापासून. पृथ्वीचं वातावरण म्हण्जे लय डेन्जर. घडिक थंडीनं जीव जातो त घडिक गांडीले चटके बसतात. एकाचवेळी सहारा वाळवंटात ऊन, मुंबईत सल्फ्युरीक पाऊस अन गांधी शिखरावर बर्फ कोसळत आसतो (याले आधी एव्हरेस्ट शिखर म्हणत) गर्दी म्हणशील त बाप्पो… स्पेस डर्माइट्सच्या वारुळावानी. कोण्याबीन कोणाड्यात जा, पृथ्वीवरचे लोकं न्हाईतर पर्यटक हायेच. शांतता नाहीच. चुकून सापडलंच आसं ठिकाण तर कानाकोपऱ्यात चुम्माचाटी सुरू.
पृथ्वीवरच्या वाहतुकीची त बातच करू नको. अजूनही लोकं त्या भंगार मेट्रोनं अन एयर टॅक्सीनं प्रवास करतात. राजे संभाजी स्पेसस्टेशनवर उतरलो अन सगळे टॅक्सीवाले झॉंबीच्या टोळीसारखे आंगावर धावून आले. NRE म्हण्जे नॉन रिटनींग अर्थीलीयन दिसले की हे काही सोडत नाही.
“कुठं जायचंय बॉस ? युरोप की आफ्रिका ?” एकजण तोंडातला मावा थुकत बोलला. “
“चल भिडू, अंदर बैठ.” दुसऱ्यानं डायरेक हातच धरला.
काय ही भाषा, काय पद्धत. असं वाटत होतं मी बाविसाव्या शतकात आलो. बार्गेनिंग करून कसंबसं बसलो एका टॅक्सीत त झाले त्याचे प्रश्न सुरू. आवडली का आमची पृथ्वी, तुमचे पूर्वज विदर्भातले का, कुठंकुठं फिरणार ब्ला ब्ला ब्ला. शेवटी कटाळून धमकावलं की बकबक बंद कर न्हाइतर रोबोट ड्रायव्हर आसलेली गाडी पाहीन. यावर त्यो खळखळून हासला.
“बॉस इथं रोबोट – फिबोट गाडी चालवत नाहीत. लय वळवळ करत होते लोखंडतोंडे. आमच्या संघटनेनं हाकलून लावलं त्यांना. चुकून आलाच एखादा तर आम्ही त्याचा फ्युजच काढून घेतो.”
“अरेरे. सो बार्बारीयन.”
“चिल मार भावा. आम्ही असंच जगत आलोय.”
बरोबर हाये, आसेच जगत आले अन मरतात बीन लवकर... कॅन्सर, डायबेटीक्स अन आशाच चित्रविचित्र नावाच्या रोगायनं. खातात काय त चिकन बर्गर, नुडल्स अन वडापाव. शी ! कसाबसा ट्रायडन राईस खाऊन अन न्यूट्रिनाइन पिऊन दिवस काढले. तिथलचं काही खाल्लं म्हण्जे आतडे सडलेच म्हणून समजा.
वापस येतांना त लेच मोठी भानगड झाली. स्पेसस्टेशनवर एवढी कडक सुरक्षा आसूनबीन कोणतरी मह्यावालं पाकीट चोरलं. पैसे त सोड तेच्यात इंटरग्यालक्सी पासपोर्ट होता, दोनतीन मोबाईल होते. पुरी वाट लागली भाऊ. कन्प्लेन्ट नोँदवायले गेलो पोलीस स्टेशनवर त हवालदार मले आतच सोडंना. वरतून आसे काही प्रश्न विचारले की जसंकाही मीच चोर हाये. पुरा खोपडा आउट झाला. थातुरमातुर उत्तरं देऊन घुसलो आत त इन्स्पेक्टरचे नखरे सुरू. दोन दिवस चकरा मारल्या तरी फायदा नाही. तिसऱ्या दिवशी योगायोगानं महा मित्र अॅस्ट्रोनाट विनय भेटला. त्यानं आधी रोबोट हवालदाराच्या अन नंतर इन्स्पेक्टरच्या हातात नोटा सरकवल्या. मग काय सांगता न्याराच जलवा झाला. दोन तासात पाकीट हातात भेटलं !!
तर थोडक्यात आशी गोट हाय. आपले पूर्वज हुशार म्हणून पृथ्वी सोडून पळाले अन दुसऱ्या ग्रहायवर वस्त्या केल्या.
महा सल्ला आईक, आजुन थोडे पैसे टाक अन शनीवर फिरुन ये.
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
तिन्ही कथा आवडल्या.
तिन्ही कथा आवडल्या.
मीच देव आहे ....... सुंदर
मीच देव आहे ....... सुंदर कथा...
पहिली सोलिड है
पहिली सोलिड है
यातली एकही आवडली नाही...
यातली एकही आवडली नाही...
विनय - तुम्हाला माझे प्रतिसाद आवडत नसतील तर प्लिज सांगा हं !
मी वाटलं ते प्रामाणिकपणे लिहितेय... कधी कधी गरज नसते अशा प्रतिसादांची
दुसरी - काश खरंच असं झालं तर
तीनही आवडल्या.
तीनही आवडल्या.
पहिली जास्त.
शेवटची वाचताना मजा आली.
खरच दुसर्या कथेसारख झाल तर
खरच दुसर्या कथेसारख झाल तर खुप चांगल होईल
पहिली कथा, मस्त !
पहिली कथा, मस्त !
मस्त आहेत कथा .
मस्त आहेत कथा .
आवडल्या, देवाची जरा जास्तच
आवडल्या, देवाची जरा जास्तच आवडली..
तिन्ही आवडल्या अस नाही म्हणता
तिन्ही आवडल्या अस नाही म्हणता येणार..! कारण पहीली कळाली नाही... दुसरी मधले शेवटी पुढच्या वर्षी दोघेही कॉल करतील असे लिहिले आहे. पण तिला तर फक्त तिचा भाऊ च फोन करतो ना..! कृपया थोड समजवाल का..?
@खुशालराव, आता तिचा भाऊ अन्
@खुशालराव, आता तिचा भाऊ अन् वडिल असे दोघ् फोन करतील पुढच्या वर्षी. खरं तर तिला कोणीच फोन करत नाही, सगळा तिच्या मनाचा खेळ आहे असं मला वाटतं.
विजयजी तिन्ही कथा छान, मी सकाळ पासून बघत होते कधी कथुकल्या येतायत याची.
तीनही कथा आवडल्या. रिया,
तीनही कथा आवडल्या. रिया, दुसरी वाचताना अचानक तुझी आठवण आली, तूच लिहिलिस असं वाटलं क्षणभर. तिसरी लै भैताड़ आवडली... इंडिया रॉक्स...
वाचतोय या कथुकल्या... छान
वाचतोय या कथुकल्या... छान आहेत.
काही कळल्या, काही नाही कळल्या ...
काही पटल्या सारख्या वाटल्या, तर काहि नाहि पटल्या...
पण ते सोडा...
हा कथाप्रकार आहे छान.. थोडक्यात पण वाचकास बराच काळ विचार करीत बसवणारा...
धन्यवाद..! किट्टु २१..! अस
धन्यवाद..! किट्टु २१..! अस आहे तर....! पहिली बद्दल आणखीही प्रश्न आहेच..
मस्तय आहेत यावेळच्या कथा..
मस्तय आहेत यावेळच्या कथा..
एकेक कल्पना भनाटच असतात आपल्या
@खुशालराव
@खुशालराव
पहिलीबद्दल थोडं सांगतो :
>> सुष्ट शक्ती असली म्हणजे दृष्ट असायलाच हवी असा आपला समज आहे. अर्थात तो योग्यही असावा कारण जगातल्या सर्व धर्मग्रंथांनी आणि विद्वानांनी तसं सांगितलंय.
पण समजा तसं नसलं तर ? वाईट शक्ती आहेत ही देवाचीच भुलवणी असेल तर ? मग सगळ्याच धार्मिक संकल्पना बदलतील.
मेल्यानंतर सर्वांना एकाच ठिकाणी जावं लागेल,
( अर्थात तिथे पाप पुण्यानुसार प्रत्येकाला वेगवेगळी ट्रिटमेंट मिळू शकते)
कथानायकाला आधी असं वाटतं की आपण नरकात आलो आणि आपल्याशी बोलणारा आवाज सैतानाचा आहे, मग प्रश्न पडतो की मी तर पुण्य केलं मग इथे का आलो. शेवटी कळतं की सगळेच इथे येतात.
मृत्यूनंतरच्या जीवनावर आधारीत एक लेख लिहत होतो त्याचा अभ्यास करतांना ही कल्पना सुचली.
प्रतिसादाबद्दल सर्व मित्र
प्रतिसादाबद्दल सर्व मित्र मैत्रिणींचे आभार
हा कथाप्रकार आहे छान..
हा कथाप्रकार आहे छान.. थोडक्यात पण वाचकास बराच काळ विचार करीत बसवणारा.
>> बरोबर आहे. पोळीत जेवढे पुड जास्त तेवढी ती चांगली तसंच लघुकथांमध्ये अर्थाचे पदर आणि आशयघनता असायला हवी. (अर्थात विनोदी वगैरे कथा याला अपवाद आहेत.)
म्हणून लिहायलाही कठीण.
खरच दुसर्या कथेसारख झाल तर
खरच दुसर्या कथेसारख झाल तर खुप चांगल होईल
>> Amen
विनय - तुम्हाला माझे प्रतिसाद
विनय - तुम्हाला माझे प्रतिसाद आवडत नसतील तर प्लिज सांगा हं !
>> छे छे. No Problem from my side. बिनधास्त कमेन्टा
धन्यवाद..! समजाऊन सांगितल्या
धन्यवाद..! समजाऊन सांगितल्या नंतर परत वाचल्या. आवडल्या..!
बाबांना जाउन ४ महिने झालेत
बाबांना जाउन ४ महिने झालेत म्हणजे ह्याच वेळी त्यांचाही फोन हवा ना?
सगळा तिच्या मनाचा खेळ आहे असं मला वाटतं. < हे जास्त पटल
बाबांना जाउन ४ महिने झालेत
धन्यवाद खुशालराव
बाबांना जाउन ४ महिने झालेत
बाबांना जाउन ४ महिने झालेत म्हणजे ह्याच वेळी त्यांचाही फोन हवा ना?
>> मृत्यूनंतरच्या पहिल्या श्राद्धापर्यंत आत्मा स्वर्गात/नरकात सेटल झालेला नसतो असा समज आहे.
मृत्यूनंतर जी पहिली अक्षय्य तृतीया येते त्याला नैवद्य दाखवता येत नाही ते यामुळेच.
सेटल झाल्यानंतरच आत्म्याला फोन कॉल करण्याची परवानगी मिळेल असा विचार आहे.
हा झाला एक दृष्टीकोन.
हा तिच्या मनाचा खेळ असू शकतो ही झाली दुसरी बाजू. ही शक्यतापण नाकारता येत नाही.
मस्त! तीनही कथा आवडल्या.
मस्त! तीनही कथा आवडल्या.
पहिली कथा भाषांतर आहेhttps:/
पहिली कथा भाषांतर आहे
https://www.scoopwhoop.com/world/short-scary-stories-reddit/#.z4uztuycq
क्रमांक 11
विनयजी तुम्ही एकच साईट वरच्या कथा भाषांतर करून वेगवेगळ्या कथुकल्यांमध्ये मायबोली वर अपलोड करता का?
करत असाल तर तसे नमूद करावे नाहीतर कथाबिजाचे क्रेडिट कुणाला द्यायचे याबद्दल गोंधळ होऊ शकतो...