तोड पिंजरा, उड पाखरा

Submitted by आनन्दिनी on 2 May, 2017 - 09:18

गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली.
आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं. "कोण सायो?" त्या माणसाने उलट विचारलं. "इथे सायो नाही का आलीये? मुंबईहून?" आदित्यने चक्रावून  विचारलं. आता त्याला आपण चुकलोच आहोत असं वाटू लागलं. पण मग तिथे सायोची स्कूटी दिसली ती! "ओह... संयुक्ताताई.... अच्छा अच्छा... या ना, या बसा," त्या गृहस्थांनी आदित्यला एक ऑफिससारख्या खोलीत नेलं "मी बोलावून आणतो त्यांना" म्हणून ते निघून गेले.
आदित्य अवघडून बसून राहिला. सायोला आपण आलेलं मुळीच आवडणार नाहीये याची त्याला खात्रीच होती. पण आता सायो या आडजागी कशाला आली असेल ही त्याची उत्सुकताही चाळवली गेली होती. एका एस्कॉर्टला शहरापासून एवढ्या लांब या खेड्यात काय काम असेल! एस्कॉर्ट म्हणजे तरी काय, सायो ज्या एजन्सीमधून आली होती ती एस्कॉर्ट एजन्सी म्हणजे पॉश नावाखाली मुली पुरवण्याचा धंदाच होता आणि आदित्य सायोचा रेग्युलर कस्टमर झाला होता.
 'बावीस तारखेला पॅरिसचं शूट संपवून परत येईन सांगितलं होतं हिला तरी ही इकडे कुठे येऊन बसली' वैतागून त्याच्या मनात विचार आला. क्षणात स्वतःच्या विचाराचं त्यालाच हसू आलं. तो येणार म्हणून वाट बघत बसायला ती त्याची लग्नाची बायको थोडीच होती! आणि लग्नाची बायको जिला करणार होतो ती तरी कुठे थांबली! अचानक निघून गेली. झर्रकन साक्षीबरोबरचा त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला. दोन वर्षांपूर्वीची त्यांची पहिली भेट, हळुवार फुलणारं प्रेम, तिचं त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटमध्ये येऊन रहाणं, पंख लावून उडालेले दिवस आणि रातराणीसारख्या बहरलेल्या रात्री आणि मग अचानक पंख्याला लटकलेली साक्षी! ते दृश्य आठवूनही त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेतला. साक्षी मनोरुग्ण होती, तिला स्किझोफ्रेनिया होता. अश्या रोग्याला म्हणे वेगवेगळे आवाज ऐकू येत राहातात. अस्तित्वात नसलेले लोक त्यांच्याशी काही बोलतायत, काही सांगतायत असे भास होत रहातात. मग सहा महिन्यांत आपल्याला कळलं कसं नाही! नाही म्हणायला ती कधी कधी लोक तिच्याबद्दलच बोलतायत, कुजबुजतायत असं सांगायची पण माझ्यासारख्या प्रसिद्ध मॉडेलची गर्लफ्रेंड म्हटल्यावर अशी थोडी इन्सिक्युरिटी असणारच असं वाटून आपण ते कधी गंभीरपणे घेतलंच नाही.... साक्षीच्या मृत्यूला आपला हलगर्जीपणा जबाबदार आहे का हा प्रश्न त्याच्या मनात राहून राहून उठत असे. त्या धक्क्यातून, त्या दुःखातून सावरण्यासाठी आदित्यने काय नाही केलं. ड्रिंक्स, ड्रग्स आणि ड्रीमगर्ल. शेवटी ड्रीमगर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेसकडून सायो आली आणि तिच्या बरोबर आदित्यला थोडं बरं वाटू लागलं.

"आदि ....." सायोच्या हाकेने आदित्यची तंद्री भंगली, "तू इथे!" तिच्या सुरात तिची नाराजी स्पष्ट होती. "इथे का आलास? मी सुट्टी घेऊन आलेय."

 "हो, मी फक्त तुला भेटायला आलोय, सायो. दोन दिवसांनी पुन्हा महिनाभर बाहेर जातोय शूटसाठी." आदित्य ओशाळलेल्या सुरात म्हणाला. "बरं चल" म्हणत सायो आदित्यबरोबर बाहेर पडली. हरिहरला थांबण्याचा इशारा करून ते दोघे पायीच निघाले. ते आदिवासी लोकांचं छोटंसं खेडं होतं. चालत चालत ते दोघे वस्तीपासून थोडे लांब एका डोंगराजवळ आले. समोर एक छोटासा ओढा वहात होता. एका मोठ्या खडकावर सायो बसली. आदित्य तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचा हात हातात घेत त्याने विचारलं, "तुझं नाव संयुक्ता आहे? आज मी सायो विचारलं तर त्यांना कळलंच नाही".

सायोने मान हलवली. "हो, माझं नाव संयुक्ताच आहे ... होतं" शून्यात बघत तिने उत्तर दिलं.
"इथे नेहेमी येतेस? हे तुझं गाव आहे?"
"अंहं, नाही.... इथे अनाथालय आहे. या भागात बरीच बाळं, जास्त करून मुली टाकून दिल्या जातात. या अनाथालयात त्यांना सांभाळतात. त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतात."
"तू काय करतेस इथे येऊन?" आदित्य चकित झाला होता. सायोसारखी मुलगी असं काही करत असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
 "मी त्यांना होईल ती मदत करते. शहरातून मी त्यांच्यासाठी पुस्तकं, कॉम्प्युटर , कपडे मला जे परवडेल ते घेऊन येते. त्यांना इंग्लिश शिकवते. कॉम्प्युटर  वापरायला शिकवते, त्यांच्याबरोबर गप्पा मारते. काय जमेल ते करते. इथे मी त्यांच्यासाठी येत नाही. इथे मला सायो सोडून संयुक्ता होता येतं. म्हणून मी येते"
"तू करत्येस हे सगळं चांगलंच आहे पण तरीही शेवटी आपलं स्वतःचं दुःख आपल्यापाशी रहातंच ना?" आदित्यने अगतिक होऊन विचारलं.
 "आदि, माझं पूर्ण नाव संयुक्ता पुंडलिक पाध्ये आहे. पुजार्याची मुलगी. घरच्यांबरोबर शहर बघायला आले, हात सुटला आणि मी चुकले. भलत्या लोकांच्या हातात सापडले आणि संयुक्ताची सायो झाले. माझे वडील मंदिरात कीर्तन करायचे. तेव्हा अर्थ कळत नव्हता, फक्त शब्द लक्षात राहिले. ते सांगायचे घटाकाश आणि मठाकाश, घड्यातलं आकाश म्हणजे पोकळी आणि मठातलं आकाश म्हणजे बाहेरचं अवकाश, आपल्याला वाटतं हे वेगळं आणि ते वेगळं, पण दोन्ही पोकळीच, दोन्ही एकच. दोन्ही एकमेकांशी जुळलेलंच आहे. मीसुद्धा या मुलांशी त्यांच्या सुखदुःखांशी जुळलेलीच आहे. ह्यांच्यासाठी काही करताना मी माझ्याच जखमेवर फुंकर घालत्येय असं वाटतं."

 "इतक्या कठीण परिस्थितीतही तू तुझा मार्ग शोधलास. मला मात्र अजूनही ते जमत नाहीये. पैसा प्रसिद्धी सगळं असूनही या निराशेच्या, दुःखाच्या पिंजर्यात अडकून गेलोय मी." आदित्य हताश होऊन उद्गारला.
"तूसुद्धा तुझा मार्ग शोध ना आदि..... तुला स्वतःची ओळख आहे. ब्रँड इमेज आहे, पैसा आहे. एक साक्षी मनाच्या रोगाने गेली पण अश्या कित्ती साक्षी अजून जिवंत आहेत. त्यांच्यासाठी काही कर ना" सायोने  त्याचा हात घट्ट धरून सांगितलं.

अंधार पडू लागला तसे ते दोघे परत उठून अनाथालयाकडे आले. "गाडी आणि हरिहरला तुझ्यासाठी ठेऊन जाऊ?" आदित्यने विचारलं. "तू स्कूटी वरून गेलास तर उद्या पेपरमध्ये न्यूज येईल, मी येईन आपली आपण." सायोने हसत सांगितलं.

दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे आदित्य शूटसाठी निघून गेला. पण जेव्हा महिन्याभराने तो सायोला परत भेटला तोपर्यंत त्याने बरंच काही केलं होतं. त्याच्या हातात एक एन्व्हलप होतं. ते त्यांने संयुक्ताला दिलं. तिने उघडून बघितलं तर आत एक बँकेचं कार्ड, पासबुक, पासपोर्ट अश्या गोष्टी आणि काही पैसे होते. 
"तुझ्या एजन्सीशी बोललोय मी. त्यांचा अकाउंट सेटल झालाय. तू हवं तिथे जाऊ शकतेस. हवं ते करू शकतेस. यू आर फ्री. या बँक अकाउंटमधे तुला वर्ष दोन वर्ष सहज पुरतील इतके पैसे आहेत". संयुक्ता थक्क झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, "हे सगळं मी कसं घेऊ? मी परतफेड कशी करणार?" तिने हुंदके देत विचारलं.
आदि हळुवारपणे म्हणाला, "फुकट नाहीये हे, पहिल्यांदी कोणी मला दिशा दाखवली आहे, फक्त सांगून नाही, कृतीतून! गुरुदक्षिणा आहे ही".
"तुला मी तुझ्याकडे राहायला हवंय?" संयुक्ताने विचारलं. तिच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा तेही बरंच होतं पण शेवटी ती एक प्रकारची लाचारी , गुलामगिरी झालीच असती.
"मला खूप आवडेल तू माझ्याबरोबर राहिलीस तर. पण मला माहितीये तुझा आनंद त्यात नाहीये. इथे राहिलीस तर 'सायो'च होऊन अडकशील. तू संयुक्ता आहेस, तुझ्या आकाशात भरारी घे. अगदी मोकळेपणाने. मागे वळूनसुद्धा पाहू नकोस आणि थांबू तर जराही नकोस कारण थांबलीस तर मी तुला धरूनच ठेवीन आणि कधीच जाऊ देणार नाही....." आपल्या हातांनी संयुक्ताने त्याचे डोळे पुसले आणि त्याचा निरोप घेऊन ती निघाली.
सहा महिने झाले होते. संयुक्ताने आता स्वतःला त्या अनाथालयासाठी, तिथल्या मुलांसाठी वाहून घेतलं होतं. एक दिवस ती मुलांना जेवण वाढत होती तेवढ्यात तिथे काम करणारी मालती धावत तिला सांगायला आली. "ताई तुमचे ते शहरातले पाहुणे टीव्ही वर आहेत." संयुक्ता धावत टीव्ही असलेल्या खोलीत आली. ती जनहितार्थ पद्धतीची जाहिरात होती. संयुक्ता पोहोचेपर्यंत अर्धी जाहिरात आधीच झाली होती. आता आदित्यचा तोच देखणा चेहरा स्क्रीनवर होता. तो सांगत होता, "शरीरासारखंच मनही कधी आजारी पडतं. मनाचे रोग ओळखा , त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोला, उपचार घ्या. मनोविकारांबद्दलच्या मार्गदर्शनासाठी या नंबरवर विनामूल्य संपर्क करा - संयुक्ता फौंडेशन" डबडबलेल्या डोळ्यांनी संयुक्त पहातच राहिली. दोघांनीही पिंजरे तोडले होते. पाखरांनी भरारी घेतली होती.

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Group content visibility: 
Use group defaults

आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार

आनन्दिनी

सुरेख !!!

आनन्दिनि..

"मनोविकारांबद्दलच्या मार्गदर्शनासाठी या नंबरवर विनामूल्य संपर्क करा - संयुक्ता फौंडेशन" डबडबलेल्या डोळ्यांनी संयुक्त पहातच राहिली. दोघांनीही पिंजरे तोडले होते. पाखरांनी भरारी घेतली होती."

वाचताना खरच डोळे भरुन आले .....