डिस्क्लेमर:
या पोस्टमधील सर्वच पात्रे काल्पनिक नसली तरी प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत आणि जे काही साधर्म्य तुम्हाला वाटत असेल ते केवळ योगायोग समजावे.
(हे असले फुसके डिस्क्लेमर देऊनच मराठी बाण्याचे आपण बारा वाजवत आहोत असे वाटते. मराठी माणसाने कसं ताठ मानेनं लिहावं. एखादा नवीन डिस्क्लेमर शोधला पाहिजे खास मराठी माणसासाठी. असो..त्यावर पुन्हा कधीतरी. )
बाकी विनोदी पोस्ट बद्दलचे डिस्क्लेमर आहेतच. आपापल्या विनोदबुद्धी नुसार ही पोस्ट समजून घ्यावी.
-------------------------------------------------------------------------------------------
तर झालं असं..... एका रविवारी नवऱ्याच्या साऊथ इंडियन मित्राच्या घरी असताना त्याच्या आईने निरागसपणे विचारलं,"रोज चपाती बनाते हो क्या?". आता हा प्रश्न हजार वेळा अनेक साऊथ इंडियन व्यक्तींनीं विचारला असल्याने मी,"हो" म्हणून सांगितलं. नाहीतर आधी मी भाकरी, भात, चकोल्या, थालीपीठ, धिरडं, डोसा आणि अजून १० पदार्थांची नावं तरी सांगायचे. पण माणसाने समोरच्याला अपेक्षित उत्तर दिलं की पुढचा त्रास कमी होतो हे मी शिकलेय. मी 'हो' म्हणल्यावर ऑंटीचे डोळे मोठे झालेच.
'बरा बाई तुला उरक असतो कामाचा' अशा टाईपचा लुक देऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला,"तो पनीर और क्या क्या बनाते हो सब्जी?"
आता हे मात्र अतीच झालं हे माझ्या नवऱ्याला कळलं होतंच. मी चिडून काही बोलणार इतक्यात तो म्हणाला,"ऑंटी आपका सांबर अच्छा था." आपलं कौतुक ऐकून ऑंटी खूष झाल्या आणि मग पुढचा तासभर दुधी, कारलं, तोंडली आणि कुठले कुठले सांबर त्यांना बनवता येतात यावर माहिती मिळाली.
गाडी बसताच मी सुरु होणार हे नवऱ्याला माहित होतंच.
"काय रे हे साऊथ इंडियन लोक? यांना कर्नाटकच्या वरचे सर्व नॉर्थ इंडियनच वाटतात. पनीर म्हणे. तू विषय बदललास म्हणून नाहीतर चांगली यादी ऐकवली असती मी.... दोडका, पावटा, घेवडा, चुका, अंबाडी, चाकवत....." माझा स्पीड बघून नवरा बिचारा शांत बसलाच.
मी पुढे बोलत राहिले,"सारखं काय 'आपलं रोज चपाती बनवता का' विचारायचं? मी म्हणते का त्यांना रोज राईस बनवता का म्हणून?".
"अगं पण ते खरंच रोज राईस खातात..." नवऱ्याने जोक मारण्याचा प्रयत्न केला.
"तू गप्प बस. मला वैताग आलाय सारखं आपलं सांगायचा की महाराष्ट्र भारताच्या पश्चिमेला येतो, उत्तरेला नाही."
"जाऊ दे ना?",नवरा.
"जाऊ दे ना काय? या असल्या मवाळ भाषेमुळेच मराठी माणूस महाराष्ट्रातूनही नाहीसा होत आहे. आणि इथे तर आपण मेले अमेरीकेत."
"आता अमेरिकेनं तुझं काय वाकडं केलंय?", नवरा.
"तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही बघ. मराठी माणसाचं अस्तित्व म्हणून काही राहिलं पाहिजे का नाही? अमेरिकेत सुद्धा तेच. बास आता पुढच्या वेळी ऑंटी मला बोलल्या तर भारताचा नकाशाच घेऊन बसणार आहे सोबत. आईशप्पथ."
"हे बघ, आता आईला मध्ये कशाला आणतेस?", नवरा.
यावर मात्र माझी तलवारच काढायची बाकी राहिली होती. घरी येऊन चरफडत ऑंटीनीच दिलेली इडली चटणी पोरांना भरवून, भरपेट खाऊन मी झोपून गेले.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आम्ही सर्व मैत्रिणी जेवायला निघत होतो. त्यात एक पंजाबी मुलगी होती. मॅडम आपल्या पंजाबी भाज्या, कल्चर आणि बऱ्याच गोष्टी सांगत होत्या.
"हमारे यहां तो रोज पराठे होते ही है नाश्तेमें. आलू, गोबी, दाल, अलग अलग टाईप के. पता नहीं तुम लोग रोज राईस कैसे खाते हो."
हेSSSSS म्हणजे माझ्या कालच्या ताज्या जखमेवरचं मीठच होतं. मग काय? सोडते काय तिला?
म्हटलं,"हम पश्चिम भारत में रहते है, साऊथ नहीं. हम भी रोज चपाती खाते है. " आता माझा टोन ऐकून,'हिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही' हे तिला कळलं होतंच. पण जेवतानासुद्धा तिला मी मराठी पदार्थांची नावं ऐकवायला सुरुवात केली. मला त्यांचे पदार्थ माहित असतील तर त्यांना का नाही? अडाणीपणाची हद्दच झाली ही.
"'पिठलं' पता है क्या तुमको?", मी विचारलं.
'पीटला'? तिने विचारलं. माझ्या पिठल्याला तिच्या त्या प्रश्नाने क्षणार्धात पिटलं होतं.
मग एकदम आठवलं,"पुरणपोळी तो तुमको पता होगा?".
ती म्हणाली,"हां, वो मीठा पराठे जैसा होता है ना? ".
'तुमचा जन्म पराठ्यांतच जायचा' हे मनातच म्हणून आणि मनातच म्हटलंय ना ही खात्री करेपर्यंत तिकडे एका कर्नाटकी मैत्रिणीने तोंड उघडलं,"अरे दॅट इज आवर ओबट्टू. वी मेक इट विथ ऑल पर्पज फ्लॉर".
चिडचिड नुसती. माझ्या पुरणपोळीचं तिने बोबट्टू केलं ना? बराच वेळ मग थालीपीठ, चकुल्या, भरलं वांगं आणि अजून काय काय सांगत बसले. तोंडाला कोरड पडली बोलून बोलून. पण महाराष्ट्राचा एखादा प्रसिद्ध पदार्थ काही यांच्या पदरात पडेना. शप्पथ सांगते, आज पुण्यात असते ना? तर चितळ्यांच्या माव्याच्या, तिळाच्या पोळ्या आणि दोन चार बाकरवाड्यापण तोंडावर मारून आले असते त्या पंजाबीणीच्या. खरंच, मराठी माणसाचं मराठीपण टिकवल्याबद्दल चितळ्यांच्या अभिमानानं ऊर भरून आला माझा.
घरी येताना गाडीत बसले की मी सुरु झाले. नवऱ्याला म्हटलं, "तुला सांगते आपण ना मराठी माणसं....". माझी गाडी तिथेच अडकलीय कळून चुकलं बिचाऱ्याला. काय करणार तोही मराठी नवरा. ऐकून घेतलं त्याने हो...
मी पुढं बोलले,"आपण मराठी माणसं ना स्वतःच्या जेवणातही कमीच पडलो बघ. आता हे साऊथ इंडियन लोकांनी कसं त्यांचं जेवण जगप्रसिद्ध केलं आहे? इडली, डोसा आणि राईस. बास तीन शब्दांत संपले. तिकडे नॉर्थला पराठा, PBM आणि CTM म्हंटले की झाले."
"PBM?", नवरा.
"पनीर बटर मसाला रे आणि चिकन टिक्का मसाला. ही नावे सांगितली की कसं नॉर्थ इंडियन पदार्थ आहेत ते कळून जातं. त्यात समोसा आहेच. पण आपल्या पदार्थाना ना काही मान-सन्मान ना आयडेंटीटी. अर्थात त्याला आपणच दोषी आहे. मी तर म्हणते मी आता डोसा आणि पनीर सर्व बंदच करणार आहे बनवायचं. "
माझ्या बोलण्यावर मागे बसलेल्या आमच्या इंग्रजाळलेल्या पोरांनी भोंगा पसरला,"That's not fair आई!!!!".
त्यांना बघून वाटलं,'आधी यांनाच सुधारलं पाहिजे'. पण सध्या दुसरा लढा लढत असल्याने ते 'आई' म्हणत आहेत यावरच समाधान मानून गप्प बसले आणि नवऱ्याशी बोलायला लागले.
म्हटलं,"मराठी माणसाला आयडेंटिटीच नाही काही. तू सांग बरं, एखाद्याला आपल्या फेमस पदार्थाचं नाव सांगायचं तर काय सांगशील? इथे कसे ते इटालियन लोकांनी पिझ्झा जगभर नेला. या अमेरिकन लोकांचं बर्गरही पोचलं भारतात. पण आपल्याकडे काय आहे? आठवतंय? आपलं उगाच थालीपीठाची रेसिपी सांगावी लागते." दुपारची माझी हिंदीमध्ये 'थापण्याची' रेसिपी सांगण्याची कसरत आठवून कसंतरी झालं परत.
माझा मराठीचा कळवळा पाहून जरा गंभीर होऊन नवऱ्याने सहभाग घेतला,"असं कसं म्हणतेस तू? आपल्याकडे असते ना सुरळीची वडी, पाणीपुरी, पावभाजी."
"हे बघ, तुझं ना भूगोलच कच्चं आहे.", मी वैतागले आणि 'हिच्याशी बोलण्यात अर्थ नाही' हे समजून नवराही. पण ऑफिसमध्ये लीडच्या रोलसाठी मला सर्वांना कसे समजून घेतले पाहिजे हे नुकतंच कळलं(कळवलं) होतं. त्यामुळे मी जरा समजुतीचा पावित्रा घेतला. नाहीतर मी सोडते का?
" अरे, पाणीपुरीला इतकं युनिव्हर्सल केलं आहे लोकांनी आणि शिवाय प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव वेगळं. त्यामुळे ती 'आपली' म्हणता येत नाही रे. नाहीतर ते बॉंगाली येतील लगेच 'आमोर पुचका' म्हणत. खांडवी, खमण आणि पावभाजी म्हणजे एकदम गुजराती. त्यावर मराठीचा ठप्पा नाहीये ना. मराठी म्हणजे कसं एकदम भारदस्त पाहिजे. नुसतं नाव घेतलं तरीआपली ओळख पटली पाहिजे."
आता नवराही विचार करू लागला किंवा मी अजून त्याच्या भूगोलाची परीक्षा घेईन असे वाटल्याने गप्प बसला असेल. घरी गेल्यावर त्याने पुरी भाजी, श्रीखंड, मिसळ, वडापाव अशी नावं घेतली. मीही मग कुठले कुठले पदार्थ खास मराठी आहेत याचा विचार करू लागले. वाटलं, आपणच आपली पब्लिसिटी करत नाही. 'नाहीतर भारतात सगळीकडे ढाबे आणि उडपी हॉटेल सारखे 'झुणका-भाकर' केंद्रही झाले असते' असं मला ठाम वाटू लागलं.
पुढच्या काही आठवड्यात ऑफिसमध्ये पॉटलक करायचं ठरलं आणि मी विसरून गेलेल्या मुद्द्याने पुन्हा डोकं वर काढलं. बिचारा नवरा आताशी कुठं 'सुटलो' असा विचार करत असणार. पोरांनाही मी नाईलाजाने इडली आणि पालक पनीर करून दिलं होतं एकदा. त्यामुळे पोरंही बिचारी खुश होती. असं निवळलेलं वातावरण असताना हे 'पॉटलक' निघालं होतं. तुम्हाला सांगते, डोकं फुटायची वेळ आली विचार करून. आपल्या राज्याची संस्कृती दाखवणारा एखादा पदार्थ कसा बनवायचा? खूप राग आला त्यावेळी 'मराठी लोकांचा'. एक साधी रेसिपी तुम्ही जगाला देऊ शकला नाही? काय हे? म्हणे अटकेपार झेंडा रोवला.
बरं त्यात इथे मदतीला कुणी नाही, त्यामुळे ती पुरणपोळी करणं म्हणजे पुढचे पाच दिवस घरच्यांची उपासमार. शिवाय आपल्याला आली पण पाहिजे ना? नाहीतर 'आ बैल मुझे मार' व्हायचं. यात बाकीही बऱ्याच अटीही होत्याच. त्यादिवशी ऑफिसला पटकन करून नेता आलं पाहिजे, गरम करायला किंवा वाढायला, डब्यातून न्यायला सोपं पाहिजे. शिवाय अमेरिकेत त्यातलं सर्व साहित्य मिळायला हवं. डोळ्यासमोर त्या पंजाबीणीचे सामोसे तरळत होते आणि तिकडे इडल्या.
एका संध्याकाळी नवरा म्हणाला,"एक काम कर वडा-पाव नाहीतर मिसळपाव बनव. चांगली आयडिया आहे की नाही?" त्याच्या कल्पनेवर मीही खूष झाले. पण यात एकच गडबड होती ती म्हणजे 'पावाची'.
"आपले मराठमोळे मावळे काय पाव बनवायला बेकरीमध्ये थोडीच गेले होते? ", माझ्या या युक्तिवादावर नवऱ्याने फक्त घर सोडून जायचं बाकी राहिलं होतं.
मी म्हटलं तसं नवऱ्याला,"अरे तू विचार कर ना? ते समोसे बेकरीतुन थोडीच आणत असतील पंजाबी लोक? एकदम घरगुती पदार्थ पाहिजे. ऑथेंटिक."
"आपण तर बुवा बेकरीतूनच आणतो समोसे", नवऱ्याने परत टाकला होता.
नेहमीप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष करुन मी पुन्हा विचार करायला लागले. रात्री वरण फोडणी टाकताना त्याच्यात हिरव्या मिरच्या घालत होते आणि एकदम आठवलं,"ठेचा". तो आर्किमिडीज पण इतका ओरडला नसेल तितक्या जोरात नवऱ्याला हाक मारली मी.
"अरे, मिळाली मिळाली रेसिपी मिळाली." मी ओरडले. त्यानेही 'सुटलो' चा निःश्वास टाकत आनंद व्यक्त केला.
दुसऱ्याच दिवशी मग इंडियन स्टोअर मध्ये जाऊन मी अर्धा किलो मिरच्या आणल्या, होय अर्धा किलो. किती डॉलर झाले ते विचारू नका. आणि तेही एकदम तिखट 'थाई चिली'. इथल्या त्या अमेरीकन मोठ्या, कमी तिखट असलेल्या नाही हं. पिशवीतल्या इतक्या मिरच्या बघून पोरं घाबरली होती. आधीच वरणातल्या मिरच्यांनी त्यांना पिडलं होतं त्यात इतक्या मिरच्या. शिवाय आपली आई 'मराठीपण' संचारल्यावर कशी असते ते त्यांना चांगलंच ठाऊक होतं. एकदा झणझणीत मिरचीचं पिठलं त्यांना खाऊ घातलं होतं मी. मग काय सोडते काय?
सगळ्यांत आनंदाची गोष्ट म्हणजे त्या ठेच्याला कष्टही कमी होते. एकदा मिरच्या परतून ठेवल्या की झालं. पोळ्या-बिळया लाटायची गरज नव्हती. 'आपल्या पुरणपोळीला आपण केवळ आळशीपणामुळे डावलत आहे' अशी थोडी मनात लाज वाटली स्वतःचीच पण आधी लगीन कोंढाण्याचं होतं.. पोळ्या काय सणाला केल्याच असत्या. घरी येऊन उत्साहाने मिरच्या निवडल्या. तेलात भरपूर लसूण, जिरे, मिरच्या आणि कोथिंबीर घालून परतून घेतलं. वाह..... काय ठसका उठला होता म्हणून सांगू. खोकणाऱ्या पोरांनी फक्त इमर्जन्सीसाठी '९११' कॉल लावायचं बाकी ठेवलं होतं. पण मी माघारी हटणार नव्हते. एखादा आलाच पोलीस विचारायला तर त्यालाही त्याच मिरच्यांची धुरी दिली असती मी. नाद नाय करायचा.
आता परतलेले सर्व मिश्रण, मिरच्या ठेचणे हेच काम बाकी राहिलं होतं. खलबत्यात त्या घातल्या आणि पहिल्या बुक्क्यालाच एक मिरची फटकन फुटून डोळ्यात उडाली. झाला ना घोळ. नेहमी.... मी हे अशी उत्साहाच्या भरात उद्योग करते. नळाखाली जाऊन भराभरा थंड पाणी डोळ्यांवर मारून घेतलं. डोळे लाल झालेच होते पण नशीब उघडले तरी. आता एक मावळा घायाळ झाल्यावर दुसऱ्याला पुढाकार घेणं भागच होतं. नवरा मेकॅनिक इंजिनियर असल्याने जरा हुशार होता. माझी अवस्था बघून त्याने सेफ्टी गॉगल घातले आणि (बहुदा मनातल्या मनात मला शिव्या देत) मिरच्या चांगल्याच ठेचल्या. मी एका डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवून ललिता पवार स्टाईलमध्ये लक्ष ठेवून होतेच. हातात ग्लोव्हज घालून सगळा ठेचा एकत्र करून नवऱ्यानेच एका डब्यात काढला. मी म्हटलं त्याला,"काय तू असा सेफ्टी गॉगल आणि ग्लोव्हज घालणारा मराठी माणूस?" पण माझ्या ललिता पवार पेक्षा तो बराच म्हणायचा. सगळा ठेचा डब्यांत पाहून मला एकदम टेन्शन आलं ना? अर्ध्या किलो मिरच्यांचा इतकुसाच ठेचा झाला होता. माझं त्यापेक्षाही छोटं झालेलं तोंड पाहून त्रासलेल्या नवऱ्याने भरभरून मिठी मारली आणि दामटून झोपवलंही.
जाम टेन्शन मला त्या पॉटलकचं. आमच्या दाक्षिण्यात्य मैत्रिणीने ह्या भल्या मोठ्या डब्यांत इडली आणि सांबर आणलं होतं, कुणी छोले, कुणी पनीर (तेच आपलं PBM हो), पंजाबी मॅडमनी सामोसे आणलेच होते आणि शिवाय कचोरीही. 'भलतीच दाखवायची हौस' असा मेसेजही मी माझ्या नवऱ्याला केला. या सगळ्यांत एका कोपऱ्यात माझा ठेच्याचा डबा बिचारा दबून बसला होता. माझा चेहराही पडलाच होता. लोकांना आपल्या मराठी प्रांताची माहिती देण्यासाठी तो पुरेसा वाटत नव्हता. जेवायच्या वेळी सगळ्या टाईपचे राईस आणि बाकी लोकांचे पदार्थ घेऊन प्लेट तुटायची वेळ आली. एका कोपऱ्यात ठेचाही घेतला. सर्व घेऊन जेवायला बसलो आणि मॅडमनी विचारले,"सामोसा खाया क्या? कैसा बना है?". सामोशाच्या तोबरा भरूनच मी मान हलवली. काय बोलणार ना? तिने पुढे विचारलं,"तुमने क्या बनाया है?".
मी माझ्या ताटातल्या एका कोपऱ्यातला थोडासा ठेचा तिला दाखवला. तिने एकदम भाजीसारखा उचलला. तरी मी म्हटलं तिला,"अरे वो तिखा है बहोत".
"मै खाती हूँ रे" म्हणत तिने तो तोंडात टाकला. मी बघतंच बसले. आमच्या अक्ख्या जन्मात कधी कुणी इतका ठेचा तोंडात टाकला नव्हता. पुढच्या क्षणाला अख्ख्या फ्लोअरला ऐकू जाईल अशी किंकाळी ऐकू आली आणि माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. इडलीच्या घासाबरोबर ते पट्कन लपवलं मी. मग पंजाबी आणि तिकडे साऊथ इंडियन मैत्रीण दोघीही पाणी घ्यायला पळाल्या. त्यांच्या भराभरा पडणाऱ्या भारदस्त पावलांनी फ्लोअर दणाणून गेला. 'क्या हुआ?' असं म्हणायचीही संधी त्यांनी मला दिली नव्हती. घटाघटा १-२ बाटल्या पाणी त्यांनी ढोसलं आणि डोळे पुसत टेबलवर येऊन त्या बसल्या. इतक्यात त्या सर्व प्रकाराची बातमी पसरली होती. मागे राहिलेल्या ठेच्याला आता सेलेब्रिटीचं रुप आलं होतं. सर्वानी एकमेकाला धोक्याची सूचना देत कणभर का होईना चव घेण्यापुरता ठेचा ताटात घेतला होता. हा हा म्हणता, गुगलवर १०००-२००० सर्च तरी आले असतील 'ठेचा' वर. त्या पंजाबीणीच्या अहंकाराला माझ्या ठेच्याने चांगलंच ठेचलं होतं. मी आपली हा सगळा प्रकार ठेचा तोंडी लावत पाहून घेतला.
घरी जाताना चाटून पुसून खाल्लेला तो डबा दाखवून सर्व प्रसंग नवऱ्याला सांगितला. म्हटलं, "आयुष्यात विसरणार नाहीत मी कुठली आहे ते....". धारातीर्थी पडलेल्या मैत्रिणी आणि मराठी ठेच्याने अमेरिकेत मराठ्यांचं गाजवलेलं नाव यासर्वांनी जाम खूष झाले मी. माझा मराठी बाण कसा बरोबर बसला होता. एक गड सर केला होता. आता फक्त त्या 'आँटी' बाकी होत्या.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
मस्त लिहलयं !
मस्त लिहलयं !
<तिने एकदम भाजीसारखा उचलला. तरी मी म्हटलं तिला,"अरे वो तिखा है बहोत"."मै खाती हूँ रे" म्हणत तिने तो तोंडात टाकला. मी बघतंच बसले. आमच्या अक्ख्या जन्मात कधी कुणी इतका ठेचा तोंडात टाकला नव्हता. पुढच्या क्षणाला अख्ख्या फ्लोअरला ऐकू जाईल अशी किंकाळी ऐकू आली आणि माझ्या चेहऱ्यावर हसू पसरलं. > खूप हसले यासाठी !
मस्तच गं..आत्ता पाहिला...
मस्तच गं..आत्ता पाहिला... थोपूवर वाचुन कमेंट दिलीए मी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
त्या दिवशी मित्राकडे गेली होती तेव्हा खुप दिवसांनी ठेचा केलेला मी..
मित्राने केलेली भाजी कमीच तिखट असेल...मुळात मी खाते तेवढ तिखट कुणीच खात नाही हे बर्याच वर्षात लक्षात आलय माझ्या..म्हणुन कशाला उगा टिपी करते अस ऐकुनही बनवला.. मी नाही खाणारे अस बोलुन जेवताना मात्र वाडगं चाटून पुसुन साफ झालेलं
ठेचा एन्हान्स युवर जेवण
मस्तच विद्या.
मस्तच विद्या.
भारी लिहिलय.
खूप च भारी लिहिलंय....सेफ्टी
खूप च भारी लिहिलंय....सेफ्टी गॉगल, आरोळी, आळशीपणा पुरणपोळी सगळ्याला खूप हसले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
खुपच खतरनाक लेख ! आता आंटीना
खुपच खतरनाक लेख ! आता आंटीना पण खायला घाला .. मराठी बाणा ।मराठी ठेचा ।
मस्त एक्दम
मस्त एक्दम
मस्तच लिहिलंय!
मस्तच लिहिलंय!
अरे वा बरेच कमेन्ट्स दिस्त
अरे वा बरेच कमेन्ट्स दिस्त आहेत.
धन्य्वाद. :ड
तोंडाला पाणी सुटले!!!
तोंडाला पाणी सुटले!!!
मस्त लिहलयं
मस्त लिहलयं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ठेचा मस्त साधलाय!
ठेचा मस्त साधलाय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठेच्याचे आफ्टर ईफेक्ट्स पण
मस्त
मस्त
>>खूप राग आला त्यावेळी 'मराठी
>>खूप राग आला त्यावेळी 'मराठी लोकांचा'. एक साधी रेसिपी तुम्ही जगाला देऊ शकला नाही? काय हे? म्हणे अटकेपार झेंडा रोवला. <<
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मस्त लिहिलंय. आवडलं.
मस्त लिहिलंय. आवडलं.
ठेच्याच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं.
माझी आजी चुल्हीवर तव्यावर
माझी आजी चुल्हीवर तव्यावर तांब्याने मिरच्या ठेचुण ठेचा बनायची. जबरदस्त लागायचा.
चांगला ठसका दाखवलात.
चांगला ठसका दाखवलात. खुसखुशीत लिहीलत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
इथपर्यंत ठसका लागला. काही
इथपर्यंत ठसका लागला. काही ठिकाणी तर फुटले अगदी
खुमासदार!
खुमासदार!
मेले हसून हसून
मेले हसून हसून![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मस्त लिहिले आहे!!
मस्त लिहिले आहे!!
सर्वांचे मनापासून आभार. अशा
विद्या.
मस्त लिहिलयंं ! आवडले.
मस्त लिहिलयंं ! आवडले.
छान लिहिलेय
छान लिहिलेय![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मराठी लोकांच्या एकाच पदार्थाचं इतरांना कौतुक असल्याचं बघितलंय. तो पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. दुसरा वडापाव.
साउथमध्ये घरोघरी सकाळी दोस्याच्या पीठाचा रगडा सुरु होतो तसं मराठी लोकांकडे रोज च्या रोज वडे तळायला घेतात असं वाटतं की काय काही लोकांना कुणास ठाऊक
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मराठी लोकं मध्यमवर्गीय लोकांचे बरेच प्रमुख पदार्थ लो बजेट असल्याने आपल्याला ते जगासमोर सादर करायला कमीपणा वाटतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.
जर हा धागा केवळ विनोदी सदरात मोडणार असेल तर यावर स्वतंत्र आणि सिरीअस चर्चा व्हायला हवी.
भारी लिहिलंय
भारी लिहिलंय![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मराठी लोकं मध्यमवर्गीय लोकांचे बरेच प्रमुख पदार्थ लो बजेट असल्याने आपल्याला ते जगासमोर सादर करायला कमीपणा वाटतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.
जर हा धागा केवळ विनोदी सदरात मोडणार असेल तर यावर स्वतंत्र आणि सिरीअस चर्चा व्हायला हवी.
मस्त !
मस्त !
( पावभाजी गुजराथी नाही, पक्की मुंबईची.. हिप्पी लोकांच्या सोयीसाठी निर्माण झालेली. )
मराठी लोकं मध्यमवर्गीय
मराठी लोकं मध्यमवर्गीय लोकांचे बरेच प्रमुख पदार्थ लो बजेट असल्याने आपल्याला ते जगासमोर सादर करायला कमीपणा वाटतो असे मला प्रामाणिकपणे वाटते.>>>
इडल्या काय हाय बजेट वाटल्या काय?? आपल्या थालिपीठाच्या निम्मा खर्च आणि वेळ लागत असेल!
Pages