फेब्रुवारी महिन्याचे दिवस होते. ३-४ महिन्यांच्या (प्रदीर्घ ) कालावधीनंतर एका कसलेल्या गिर्यारोहकासमवेत सिंहगड-राजगड-तोरणा पदयात्रेला जायची संधी चालून आल्यावर मी लागलीच होकार कळवला. एकूण ६ लोक असणार होते. सिंहगड ते राजगड ते तोरणा एका दिवसात करून पुण्यात रात्री परतायचा बेत होता! त्याप्रमाणे पहाटे ३:३० ला निघालोही.चमूशी जुजबी ओळख करून घेतली." तू सिंहगड ला नियमित आहेस ना? " असा प्रश्न मला २-३ लोकांनी विचारला. मी त्यावर "नाही" असे उत्तर दिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची काळजी दिसे. सिंहगड पायथ्याला गाडी ठेऊन, पहाटे ५ ला आम्ही चढाई सुरु केली आणि एका तासात देवटाक्यापर्यंत पोहोचलो. आता ५ मिनिटे विसावा (ब्रेक) अपेक्षित होता मात्र तो मिळाला नाही आणि लागलीच राजगडाकडे कूच करण्याचे आदेश मिळाले .कल्याण दरवाजातून उतरून हो-ना करता दिशा सापडली आणि आम्ही राजगडाकडे मार्गस्थ झालो. सूर्योदयाचे फोटो टिपण्याचा मोह होत होता, मात्र पुढे भरपूर चाल होती, त्यामुळे आम्ही लीडर च्या मागे जवळपास धावतच होतो म्हणा ना! साधारण तासाभरानंतर आमच्यात २ गट पडायला सुरुवात झली. पहिला गट वेगाने पुढे जात होता तर दुसरा गट जरा मागे पडू लागला होता. (यात मी होते. ) तसे आम्ही सगळे नजरेच्या टप्प्यात होतो. सिंहगड - राजगड ही काही सलग डोंगररांग नाही . मध्ये गुंजवण्यात उतरून डांबरी रस्त्यावरून चालावे लागतेच. सुमारे १० वाजता आम्ही दोन्ही गट परत एकत्र झालो आणि चहा साठी थांबलोही. आता गुंजवणे गावातून चोर दरवाजातून चढायचा बेत होता. रात्री न झालेली झोप आणि पहाटेपासून झालेली चाल, यामुळे पुन्हा आमच्यापैकी काहींची चाल पुन्हा मंदावू लागली आणि पुढे गेलेले पायथ्याशी थांबतीलच असे गृहीत धरून मी ही मागे रेंगाळले.
कितीही किल्ले फिरलो तरी राजगडाबद्दल प्रत्येक गडकऱ्याच्या ह्रदयात वेगळे स्थान आहे. राजगड आणि परिसरात फिरताना पावलोपावली जाणवतो तो राजांचा आभास ..सगळा इतिहास डोळ्यांसमोर दिसायला लागतो . "राजगड आत्तापर्यंत पाली दरवाजाने अमूकवेळा केला , त्या-त्या वेळी सोबत कोण होतं ,चोर दरवाजाने किती वेळा केला, तेंव्हा बरोबर कोण होतं , प्रत्येक वेळी घडलेले गमतीदार किस्से , गुंजवणे दरवाजातून तो कसा करायचा राहिलाय" याची मनात उजळणी करत मी चढत होते. भर उन्हात,लवकरच मला एक-एक पायरी कष्टप्रद वाटायला लागली. पुढे गेलेले सहकारी अद्याप का दिसत नाहीत हा ही विचार सतत होताच. खरं तर डोंगरयात्रेत प्रत्येकाचा चालायचा वेग वेगळा असतो. काही जण वेगाने पुढे जातात तर काही हळू हळू, पण तोच वेग कायम ठेवून चढतात. यात अनैसर्गिक असे काहीच नाही. घड्याळात सुमारे पावणे २ वाजले तेंव्हा मी पद्मावती च्या मंदिरात पोहोचले. इथे एक महत्वाची गोष्ट- पुढे आलेला आमचा ग्रुप कुठेही दिसला नाही! असंख्य फोन करूनही सगळे संपर्कक्षेत्राच्या बाहेर !गडावर ताक विकणाऱ्या एका महिलेकडे विचारणा केली असता, आमच्यासाठी कुठलाही निरोप ठेवला नव्हता.. मात्र ही माणसं (आम्ही वर्णन केलेली) तोरण्याच्या दिशेने निघून एक तास नक्की झाला असे सांगण्यात आले.
ग्रुप मध्ये आता मी धरून ४ लोक होते. राजगड - तोरणा ही यात्रा मी याआधी २ दा केलेली. त्यामुळे "आमचा वेग लक्षात घेता ६-७ तास नक्की लागणार ..म्हणजे रात्रीचे ८- ९ , आणि नंतर आम्ही तोरणा उतरणार ! म्हणजे ११- १२ ! आमच्याकडे वाहन नाही ..आणि आत्ताचा अनुभव गृहीत धरता पुढे गेलेले थांबतील अशी आशा नाही. एक तर तोरण्यावर मुक्काम घडणार किंवा आत्ताच राजगड उतरून पुण्यास परतावे का ? " हा सगळा विचार मी निमिषार्धात केला . मात्र इतरांना हा ट्रेक पूर्ण करायचाच होता आणि मार्ग दाखवायला कोणीतरी (मी ) हवेच होते. अर्थात मलासुद्धा ही पदयात्रा पूर्ण करावी असेच वाटत होते. त्यामुळे मी पुढे जायचा निर्णय घेतला. ह्यावेळी आमच्यासमवेत आणखी दोघांनी चालायला सुरुवात केली होती: ताक विकणाऱ्या मावशी आणि एक काळा कुळकुळीत कुत्रा ! मावशींना भुतोंड्याला जायचे होते. पावणे ३ वाजत आले होते. आता पुढच्याना गाठायचा कोणताही ताण नव्हता. योग्य तो चालण्याचा वेग राखत सुखरुप तोरण्यावर पोहोचणे हाच उद्धेश होता. मनात गडपुरुषाचे स्मरण करून मी परत एकदा चालायला सुरुवात केली.
अळू दरवाज्यातून आम्ही उतरायला लागलो. मावशींनी भुतोंड्याला वळताना त्यांच्या घरी यायचा मला आग्रह केला. "आज ऱ्हावा आनी उद्या सकाळी जा निवांत यष्टीनं ". मात्र ते प्रेमाचं निमंत्रण नाकारून आम्ही पुढे निघालो. भू-भू आमच्या समवेत असणार होते. " हे नेईल तुमाला तोरण्या पोतर आणि उद्या तुम्च्यासंगंच खाली येईल" असं मावशी म्हणाल्या. काही तासांत सूर्य अस्ताला गेला... दिवसातल्या ह्या वेळेला एक वेगळेच वलय आहे. सकाळी काळोख व सूर्योदय यांमधील किंवा संध्याकाळी सूर्यास्त व काळोख यांमधील कालात दिसणारा प्रकाश तो संधिप्रकाश. अशा वेळी तुम्ही डोंगरकुशीत असाल तर भाग्यवानच! संधीप्रकाशात आमच्या मागे होता राजगड तर समोर अजूनही बराच दूर भासणारा तोरणा. याआधी तोरण्याची वारी मी अनेकदा केली होती . मात्र रात्री आणि तेही राजगडावरून पहिल्यांदाच. यानंतर कस लागणार होता. आमच्याकडे खायला काहीही नव्हते. अंथरूण-पांघरूण नव्हते . इतकंच काय माझ जॅकेटही मी कार मध्ये (उगाच ओझं नको म्हणून ) ठेऊन आले होते. सगळ्यांची हीच स्थिती होती. ट्रेक १ दिवसाचा होता ना ! मात्र माझ्याकडे एक गोष्ट होती. ती म्हणजे केरोसीनची छोटी बाटली आणि काडेपेटी. आता तुम्ही म्हणाल ह्या वस्तू कशा घेतल्या ट्रेक १ दिवसाचा असताना? पण ती माझी सवय आहे. कधी कुठे मुक्काम करायची वेळ येईल सांगता येत नाही. अशीच वेळ एकदा अहिवंत किल्ल्यावर आली पण त्याबद्दल नंतर कधीतरी.
लवकरच अंधारून आलं. आभाळात आता हळूहळू चांदण्या येऊ लागल्या होत्या. चालता येईल इतपत प्रकाश होता. मावशींनी सांगितल्याप्रमाणे भुभ्या आमची चांगलीच सोबत करत होता. रस्ता त्याच्या अगदी परिचयाचा दिसत होता .आमच्यातले एक काका ४५ चे असतील, त्यांना आता थोडे चालल्यावरही त्यांना धाप लागत होती. त्यामुळे थांबत थांबत जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आमच्याजवळचे पाणीही संपत आले होते. "हे काका पुढे कसे येणार , मी कुठे अडकले , त्या मावशींकडे मुककाम केला असता तर.. " असे नानाविध विचार आणि पुढे गेलेल्याना अगणित शिव्या आता माझ्या मनात गर्दी करायला लागल्या! सोबत किड्यांचा आवाज आणि वाढती थंडी. तुम्ही अनुभवलंय का माहित नाही पण एका विशिष्ट मर्यादेनंतर शरीराला कष्ट जाणवेनासे होतात. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही शरीराला पुढे नेऊ लागता. ती एक विशिष्ट मर्यादा मी आता ओलांडली होती.आमच्यापैकी आता कोणीच काही बोलत नव्हते . तेव्हडी ऊर्जाही बाकी नव्हती. पहाटे ३ वाजता सुरु झालेला हा दिवस कधी संपणार होता कोण जाणे !
ह्या डोंगररांगेवर, जसजसे तुम्ही बुधल्याच्या जवळ येता , तशा रौद्रभीषण दऱ्या वेडाऊ लागतात. मात्र अज्ञानात सुख असतं. सोबत्यांना अंधारात त्याची काहीच कल्पना येत नव्हती . भू भू च्या मागे मी, माझ्या मागे २ भिडू आणि सर्वात शेवटी काका .आता उद्दिष्ट मेंगाई मंदिर गाठणे हेच होतं . शेवटचा खडकाळ टप्पा (rock patch) दृष्टिक्षेपात येत होता आणि अहो आश्चर्यम, तिथे लोखंडी शिडी लावण्यात आली होती ! मला मागील दोन वाऱ्यांमधील आमची कसरत आठवली. शिडीवरुन आम्ही वर मार्गस्थ झालो. बुधला माचीचा विस्तार प्रचंड आहे. उपड्या ठेवलेल्या बुधल्यासारखा तिचा आकार आहे. बुधल्याकडून जेंव्हा आपण यतो, तेंव्हा आपला गडावर प्रवेश होतो तो कोकण दरवाजातून.
हळूहळू आम्ही मंदिराकडे निघालो. गडावर आज कोणी मुक्कामाला असेल हि शक्यता विरळाच होती. एके काळी इथे कोणी मुक्काम करायला धजावतही नसे.. ह्याला कारण ब्रह्मपिशाच्च असल्याची वंदता ! आणि माझ्याप्रमाणेच माझ्या सहकाऱ्यांनीही ह्याबद्दल ऐकले होते! मंदिराचे दार बाहेरून कडी घालून बंद होते पाठीवरच्या पिशव्या खाली ठेवल्या आणि काही क्षणातच जाणवलं - आमच्यातला एक प्रचंड घाबरलेला होता. कदाचित सगळेच भ्यालो असू पण चेहऱयावर ते दिसत नसेल. आणि भीती संसर्गजन्य असते. त्यामुळे मी पटकन कामाची विभागणी केली. आमच पहिल काम होतं ते म्हणजे खोकड टाक्यातून प्यायला पाणी आणणं आणि दुसरं म्हणजे शेकोटी साठी थोड्या काटक्या जमवणं. केरोसीन आणि काडेपेटी बाळगल्याबद्दल मी स्वतः:ला असंख्य वेळा शाबासकी दिली . तोरण्यावर कायम भणाणतं वारं असतं. काकांना तिथेच थांबायला सांगून आम्ही तिघे बाहेर पडलो. भुभ्या लगेचच पाठीमागे आला . दुर्दैवानं आमच्याकडे त्याच्यासाठी काहीही खाऊ नव्हता. पाणी आणि सरपण घेऊन काही मिनिटांतच आम्ही मंदिरात परतलो. काका अतिशय दमल्यासारखे वाटत होते. शेकोटी पेटवल्यनंतर सगळ्याच्याच जीवात जीव आला. मात्र भुकेची जाणीव त्रस्त करत होती. उद्या गड उतरल्यावर काय काय खायचं याची आम्ही यादी केली. आमच्याबरोबर भुभ्याही ऐकत बसला होता. गार फरशीवर शेकोटीच्याभोवती आम्ही निद्रेच्या अधीन झालो. मध्येच मला जाग आली तेंव्हा पाहिलं तर भुभ्या माझ्या उशालाच होता. मी उठल्याचं बघून त्यानेही डोळे किलकले करून माझ्याकडे पहिलं. ह्या मुक्या प्राण्याने आमची चांगलीच सोबत केली होती. तो एक प्रकारे आमचा नेता च झाला होता म्हणा ना ! गो. नी. दांच्या १० दिवस १० दुर्ग मध्ये अशाच एका भू-भू चे वर्णन आलं आहे.
फटफटू लागताच मी सर्वाना हाकारलं. शरीराचा प्रत्येक अवयव आपली जाणिव करून देत होता. मात्र गड उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. अजूनही बाहेर गार वारं होत. ६ च्या सुमारास आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. ८ :१५ ला आम्ही वेल्ह्यात पोहोचलो . डोंगरयात्रा पूर्ण केल्याबद्दल एकमेकांचं अभिनंदन केलं आणि आधी भूभ्या साठी खाऊची ची ऑर्डर दिली ! पुण्यात परतल्यावर कळलं - पुढे गेलेल्या चमूने १५ तासात हि यात्रा पूर्ण करून पुण्यात परतण्याचा 'विक्रम' केला होता !
छान, एसआरटी पूर्ण केल्याबद्दल
छान, एसआरटी पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन...
पण काही गोष्टी खटकल्या. पुढच्या ग्रुपने एकत्र जात आहोत तर किमान संपर्कात राहणे आवश्यक होते, किमान त्यांनी निरोप तरी ठेवायला हवा होता. काहीच पर्वा नसल्यासारखे पुढे निघून विक्रम करायचा होता तर तेवढ्याच लोकांनी जायचे होते, बाकीच्यांना घेण्याची गरजच नव्हती.
तुमच्या बरोबरीच्या काकांना जर तब्येतीचा त्रास होऊ लागला असता तर अवघड प्रसंग उद्भवला असता. बरोबर खाणे नाही पाणी नाही आणि राजगड तोरणा सारखी दमदार चाल हे अतिशय अयोग्य नियोजन होते.
जरी मान्य केले सगळे कसलेले ट्रेकर होते आणि अनेकदा ही वाट केलेली आहे, तरी वेळ सांगून येत नाही. शेकड्याने ट्रेक करणारेही अतिआत्मविश्वासाच्या नादात प्राण गमावून बसल्याच्या घटना आहेत. त्यामुळे या पुढे काळजी घ्याल अशी अपेक्षा आहे.
>>>> मात्र माझ्याकडे एक गोष्ट
>>>> मात्र माझ्याकडे एक गोष्ट होती. ती म्हणजे केरोसीनची छोटी बाटली आणि काडेपेटी. <<<<<
व्वा, मस्त कल्पना आहे ही..... मी पण ठेवत जाईन आता
पण एकंदरीतच सिंहगड राजगड तोरणा एका दिवसात म्हणजे अति आहे......
ते विक्रम वगैरे ठीक आहे, अगदी पूर्वीचे हरकारी/संदेशवहनाचे प्रात्यक्षिक म्हणून वगैरे ठीक,
पण ट्रेकिंगला जायचे, अन तो निसर्ग डोळ्यातही साठवुन न घेता केवळ पायाखालचे बघत तरातरा चालत्/धावडत सुटायचे यात काही मजा नाही बोवा....
नशिब तुम्हाला तुमच्या संगतीस अजुन दोनचार मिळाले. नाहीतर अशा विक्रमादित्यांची संगत टाळलेलीच बरी.... त्यांचे त्यांना करुदेत विक्रम.....
फेब्रुवारी, अन कपडे नाहीत पुरेसे म्हणजे थंडीचा त्रास झालाच असेल...
तरीही तुम्ही शेवटपर्यंत गेलात, मधेच राजगडलाच ट्रेक सोडून दिला नाही ही कौतुकाची गोष्ट आहे.
आशुचॅम्पच्या पोस्टमधिल मतितार्थाशी पुर्णपणे सहमत.
फोटोसहित इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद
एक छोटी सुधारणा....
एक छोटी सुधारणा....
>>>>> दुसरा गट जरा मागे पडू लागला होता. (यात मी होते. ) तसे आम्ही सगळे नजरेच्या टप्प्यात होतो. <<<<
पहिला परिच्छेद, अंदाजे बारावी ओळ, कंसातील शब्द "यात मी होते" ऐवजी "यात मी होतो" असे हवे आहे ना?
लिंबूजींशी , सहमत .. या
लिंबूजींशी , सहमत .. या प्रकारात नुसते पळत अमूक अमूक वेळेत ट्रेक पूर्ण करून काय साध्य होते ते कळत नाही.
त्यापेक्षा चालण्याचा आनंद घेत जाणे मलाही पटते.
डोंगरयात्री, तुमच्या धाडसाचे कौतूक आणि ट्रेक पूर्ण केल्याबदद्दल अभिनन्दन.
एक सुचवावेसे वाटते कि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अनोळखी लोकांबरोबर , ते सुद्धा अशा अवघड ट्रेकला गेलात हे खरे तर धाडसच आहे. तुमच्या वर्णनामधून दिसते कि त्या लोकांचा हेतू आणी ध्येय तुम्हाला माहित होते. सिंहगड चढल्यावर ते क्षणभरही थांबले नाहित , इथेच तुम्हाला इशारा मिळाला होता. तुम्ही तेव्हाच तुमचा मार्ग आणि पुढचा प्लान निश्चित करायला हवा होता. म्हणजे तुमची पुढची परवड (परवड झाली असे तुमच्या लेखनातून दिसते) टळली असती.
पाण्याविना , सवय नसेल तर जास्ती परिश्रमाने पटापट dehydration होण्याची शक्यता असते. तेव्हा असे अपूर्ण तयारीने ट्रेक करणे धोकादायक आहे.
तुमचे कौतूक आहेच पण पुरेशी
तुमचे कौतूक आहेच पण पुरेशी साधने, आणि अन्न नसताना पुढे जाणे योग्य नव्हते.
आपल्याला काय साध्य करायचे असते, ठराविक तासात तो पुर्ण करणे कि त्या
परीसराचा आस्वाद घेणे. कदाचित त्या मावशींच्या घरी यापेक्षा चांगला अनुभव आला असता.
मस्तच ..
मस्तच ..
मलापण बोलावत जा कि अश्या ट्रेक ला...
भारीच ....
हे वाचून मला आमचा राजगड -
हे वाचून मला आमचा राजगड - तोरणा - रायगड आठवला...... ते ३ दिवस भारावलेलेच होते......