श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १

Submitted by आनन्दिनी on 13 April, 2017 - 05:03

श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ

हरिः ॐ

अध्याय १, भाग १.

मंगलाचरण

॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगरुभ्यो नम: ॥
श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्गुरुसाईनाथाय नम: ॥
प्रथम कार्यारंभस्थिती । व्हावी निर्विन्घ परिसमाप्ती ।
इष्टदेवतानुग्रहप्राप्ती । शिष्ट करिती मंगलें ॥१॥
मंगलाचरणाचें कारण । सर्व विन्घांचें निवारण ।
इष्टार्थसिद्धि प्रयोजन । अभिवंदन सकलांचें ॥२॥

श्रीगणेशाला वंदन असो. श्री सरस्वती मातेला वंदन असो. कुलदेवतेला वंदन असो. श्रीरामचंद्र आणि माता सीतेला वंदन असो. श्रीसद्गुरु साईनाथांना वंदन असो. कार्य सुरु करताना, ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून शिष्ट म्हणजेच जाणते लोक हे इष्टदेवतेचे मंगल आशीर्वाद प्राप्त करून घेतात. ॥१॥

सर्व विघ्नांचे निवारण व्हावे, इष्ट अशी सिद्धी म्हणजेच सुयोग्य फलप्राप्ती व्हावी म्हणून सर्वांना अभिवादन केले जाते. ॥२॥

प्रथम वंदूं गणपती । वक्रतुंड हेरंब मूर्तीं ।
चतुर्दश विद्यांचा अधिपती । मंगलाकृती गजमुख ॥३॥
पोटीं चतुर्दशा भुवनें मावती । म्हणोनि गा तुज लंबोदर म्हणती
परशु सतेज धरिसी हस्तीं । विन्घोच्छित्त्यर्थ भक्तांच्या ॥४॥
हे विन्घविघातोपशमना । गणनाथा गजानना ।
प्रसाद पूर्ण करीं मद्वचना । साष्टांग वंदना करितों मी ॥५॥
तूं भक्तांचा साह्यकारी । विन्घें रुळती तुझ्या तोडरीं ।
तूं सन्मुख पाहसी जरी । दरिद्र दूरी पळेल ॥६॥

कार्यारंभी प्रथम गणपतीला वंदन असो. वक्रतुंड (सोंडेमुळे ज्याचं तोंड वक्र दिसतं अशा), हेरंब (दीनांचा पालक) असणार्या , चौदा विद्यांचा अधिपती (*तळटीप १)   असणार्या मंगलमूर्ती, गजमुख असणार्या गणपतीला वंदन ॥३॥

तुझ्या पोटामध्ये चौदा भुवने (*तळटीप २) मावतात म्हणून तुला लंबोदर (लंब आहे उदर ज्याचे) म्हणतात. भक्तांची विघ्ने नाहीशी करण्यासाठी तू हातात हा दिव्य परशू धारण केला आहेस ॥४॥

अशा अडथळे आणि संकटांचं  निवारण करणार्या , गणांच्या अधिपती, माझ्या वचनांना तू प्रासादिक करावेस म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार करतो ॥५॥

तू भक्तांना साह्य करणारा आहेस. विघ्नांना तुझ्या चरणांतील तोडरांपाशीच थांबावं लागतं. तू जर माझ्याकडे पाहिलंस तर माझ्या वाचेचं , भाषेचं आणि ज्ञानाचं दारिद्र्य नाहीसं होईल (आणि हे लेखन माझ्याकडून घडेल) ॥६॥

तू भवार्णवाची पोत । अज्ञानतमा ज्ञानज्योत ।
तूं तुझ्या ऋद्धिसिद्धींसहित । पाहें उल्लसित मजकडे ॥७॥
जयजयाजी मूषकवहना । विन्घकानन-निकृंतना ।
गिरिजानंदना मंगलवदना । अभिवंदना करितों मी ॥८॥
लाधो अविन्घ परिसमाप्ती । म्हणोनि हेचि शिष्टाचारयुक्ती ।
इष्टदेवता-नमस्कृती । मंगलप्राप्त्यर्थ आदरिली ॥९॥

तू भव-अर्णव (संसार सागर) पार करून नेणारी नाव आहेस. अज्ञानाचा अंधःकार नाहीसा करणारी ज्ञानाची ज्योतही तूच आहेस. तू तुझ्या ऋद्धिसिद्धींसह माझ्याकडे उल्हासाने पहा. (ऋद्धिसिद्धी या गणेशाच्या पत्नी आणि 'लाभ' आणि 'क्षेम' यांच्या माता आहेत) ॥७॥

मूषक हे ज्याचे वाहन आहे त्या गणेशाचा जयजयकार. विघ्नरूपी अरण्याचा विध्वंस करणार्या, पर्वतकन्या पार्वतीच्या लाडक्या पुत्रा, मंगलदात्या तुला मी अभिवादन करतो ॥८॥

कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून शिष्टाचाराप्रमाणे इष्टदेवतांना नमस्कार केला जातो. तीच पद्धत मीसुद्धा मांगल्याच्या हेतूने आचरली आहे॥९॥ 

हा साईच गजानन गणपती | हा साईच घेऊनि परशू हातीं |
करोनि विघ्न विच्छित्ती | निज व्युत्पत्ती करू का ॥१०॥
हाचि भालचंद्र गजानन | हाचि एकदंत गजकर्ण |
हाचि विकट भग्न रदन | हा विघ्नकानन विच्छेदक ॥११॥
हे सर्व मंगलमांगल्या | लंबोदरा गणराया |
अभेदरूपा साई सदया | निजसुखनिलया नेईं गा ॥१२॥

हा साईनाथच गणपती आहे. परशू हातात घेऊन विघ्नांचा र्हास करणारा, स्वतःची व्युत्पत्ती (उगम/ कथा) स्वतःच करणारा आहे॥१०॥

कपाळावर चंद्रकोर धारण करणारा गणपती, हा साईच आहे. एकदंत गजकर्ण असा हा गणपती, साईच आहे. विकट (प्रचंड) भग्न रदन (ज्याचा दात भग्न झाला आहे - तुटला आहे) असा गणेश, साईच आहे. संकटरूपी अरण्याचा नाश करणारा गणपती हा साईच आहे ॥११॥

हे सर्व मंगल घडवून आणणार्या लंबोदर गणनायका, तू आणि साईनाथ यांत काहीही भेद नाही. जेथे आत्मसुख मिळेल अशा ठिकाणी तू मला घेऊन जा. ॥१२॥

भावार्थ- नेहमी केल्या जाणार्या या गणेशवंदनेतसुद्धा हेमाडपंतांचे सद्भक्त असणे उठून दिसून येते. त्यांनी केवळ गणपतीला वंदन केले नाही तर गणपतीमध्येच त्यांनी त्यांच्या सद्गुरू साईनाथांना पाहिले. हिंदू धर्मात आपल्या अनेक वेगवेगळ्या देवता, त्यांचे वेगवेगळे सण , साजरे सर्व काही केले जाते पण मग त्यामध्ये  कधीकधी "आपली निष्ठा नक्की कुठे आहे? मग बाकीच्या गोष्टी मानायला हव्यातच का ? बाकीच्या देवांना नमस्कार करायलाच हवा का? न केला तर काही होईल का? केला तरी त्यात 'तो' भाव येतो का?" असे अनेक प्रश्न मनात येतात.

हेमाडपंतांनी या मंगलाचरणात त्याचं किती सोप्पं उत्तर दिलं आहे. गणपतीला, सरस्वतीला, विष्णूला सर्वाना त्यांनी नमस्कार केला आहे आणि प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक दैवतामध्ये त्यांना साईच दिसला आहे. 'सर्वांभूती भगवंत' ही पुढची गोष्ट झाली. सर्व देवतांमध्ये तरी आपण आपल्या सद्गुरूना पाहतो का? की आपल्या मनात अजूनही त्यांच्याबद्दल वेगवेगळेपणाची भावना आहे हे आपलं आपण तपासून घ्यायला हवं.

साईनाथांचा मनुष्यदेह, त्यांचं सर्वांमध्ये उठणं बसणं, हसणं, चिडणं हे सारं डोळ्यांनी पाहूनही हेमाडपंतांनी त्यांच्या दिव्यत्त्वावर , देवत्वावर कुठेही शंका घेतली नाही म्हणून तर त्यांना गणपतीमध्ये सुद्धा बाबाच दिसतात.

रामाचे परमभक्त रामदास स्वामीसुद्धा आरती शंकराची असो की हनुमंताची, शेवटी स्वतःचा उल्लेख दास रामाचा असाच करतात. किती सुंदर निर्विकल्प स्थिती!

आपल्या सद्गुरूंची अशी नितळ छबी आपल्या डोळ्यांत, मनात अखंड वसेल तेव्हा आपण कुठेही केलेला नमस्कार थेट त्यांच्या चरणांशी जाऊन पोहोचेल. सद्गुरूंची छबी आपल्या डोळयांत निरंतर वसावी म्हणून आपण काय करावं? उत्तर सांगायला सोपं पण पाळायला कठीण..... अधिकाधिक भक्ती आणि अधिकाधिक सेवा

इति श्रीसद्गरु चरणार्पणमस्तु
हरिः ॐ. श्रीराम. अंबज्ञ.

आनन्दिनी

*तळटीप १- चौदा विद्या - म्हणजे  चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, सहा शास्त्रे - छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष, शिक्षा, कल्प आणि न्याय, मीमांसा , पुराण आणि धर्म.

* तळटीप २- चौदा भुवने - ७ लोक - भूलोक, भुवर्लोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. आणि ७ पाताळें – अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

च्रप्स मनापासून धन्यवाद.

समई तुमची फक्त कठीण ओव्यांबद्दलची सूचना वाचली . पण प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी कठीण वाटत असतील ना? म्हणून प्रत्येक ओवीचा शब्दार्थ देण्याचा प्रयास आहे. आकडे घातले आहेत. त्यामुळे तुम्ही सोप्या ओव्या गाळून पुढे जाऊ शकाल अशी अशा करते.

अमा प्रतिक्रियेबद्दल आभार .

वाचकांचा वेगळा अनुभव असेल किंवा तुम्हाला एखाद्या ओवीचा वेगळा अर्थ वाटत असेल तर अवश्य सांगा कारण मीसुद्धा शिकतेच आहे.

हरिओम श्रीराम अंबज्ञ विठ्ठल,
कुठलीही परीक्षा कशासाठी असते? एखाद्या विषयातील तुमचं प्राविण्य प्रमाणित करण्यासाठी.

"We are judged by faith not by performance."
म्हणजेच साइचरित्रावरील परीक्षा ही ज्ञानाची परीक्षा नसून आपल्यासाठी नवविधा भक्ति जाणून त्याची अनुभूती मिळविण्याचा मार्ग आहे.

Lekh chan ahe.
"आपल्या सद्गुरूंची अशी नितळ छबी आपल्या डोळ्यांत, मनात अखंड वसेल तेव्हा आपण कुठेही केलेला नमस्कार थेट त्यांच्या चरणांशी जाऊन पोहोचेल. सद्गुरूंची छबी आपल्या डोळयांत निरंतर वसावी म्हणून आपण काय करावं? उत्तर सांगायला सोपं पण पाळायला कठीण..... अधिकाधिक भक्ती आणि अधिकाधिक सेवा.." he ekdam patalay.

पहाटे ४ वाजलेले आहेत. एक अप्रतिम सिनेमा पाहीला. Very Soulful meaning
माबोवरती आले व हा लेख वाचला. इतकं प्रसन्न वाटलं. आज (आत्ता) नक्की साईचरित्रातील एक अध्याय वाचेन.
लेख आवडला.