' वारस ' (विज्ञानकथा) भाग ४(शेवट)

Submitted by Vaibhav Gilankar on 10 April, 2017 - 09:38

' वारस ' (विज्ञानकथा) भाग १ http://www.maayboli.com/node/62272
' वारस ' (विज्ञानकथा) भाग २ http://www.maayboli.com/node/62275
' वारस ' (विज्ञानकथा) भाग ३ http://www.maayboli.com/node/62279

भाग चौथा व शेवटचा..

.....एक अस्पष्ट किंकाळी तेजस्विनीच्या तोंडातून बाहेर आली, पिस्तूल आपोआप समोर रोखलं गेलं कारण हाही तसलाच मोठा हॉल होता पण या हॉलमध्ये सगळी यंत्र तुटून पडली होती, त्यातून ठिणग्या येत होत्या, सर्व सामान कशी पडलं होतं, एक मोठा मिटिंग टेबल मोडून पडला होता त्याच्या आसपास १५-२० खुर्च्या तशाच अवस्थेत पडल्या होत्या, त्या सर्व मोडक्या सामानाच्या पसाऱ्यामध्ये १०० पेक्षाही जास्त माणसे अस्ताव्यस्थ अवस्थेत मरून रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि त्या सर्व प्रेतांच्या घोळक्यात मधोमध झ्यूस उभा आणि त्याने त्याच्या पंज्यात राजन देशमुखचा गळा पकडून त्याला उचलेला होता. राजनच्या तोंडातून रक्ताची मोठी धार लागलेली दिसत होती, त्याचे डोळे सताड उघडे होते यावरून त्याचे प्राण तर कधीच गेलेले असणार हे कळत होते पण तरीही झ्यूसने अगदी थंडपणे त्याच्या गळ्याला घट्टपणे आवळून धरलं होतं. तेजस्विनीची चाहूल लागल्यावर त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर तेच यांत्रिक स्मित आलं, तेजस्विनीला त्याच्या तसल्या स्मितहास्याची किळसच वाटली. झ्यूसने तेजस्विनीकडे बघतच राजनचा मृतदेह दूर त्या तुटलेल्या सामानाच्या पसाऱ्यात फेकला आणि तो परत तसाच शून्य नजरेने तेजस्विनीकडे पाहू लागला. सर्वात पहिल्या दिवशी पियानो वाजवणारा शांत झ्यूस आणि आताच एवढा नरसंहार करून शांतपणे बघणारा झ्यूस यातला फरक जमीन-अस्मानाचा होता!

तेजस्विनीने संतापून झ्यूसवर एकसाथ ५-६ गोळ्या झाडल्या पण त्याच्या टायटॅनियमने बनवलेल्या टणक शरीरावर त्याचा काही परिणाम झाला नाही. पिस्तूल झ्यूसवरच रोखून तेजस्विनीने त्याला ओरडून विचारलं, "अरे राक्षसा! हे फळ दिलंस तू तुझ्या वडिलांच्या मेहेनतीचं? तू यंत्र असूनही त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला तो याचसाठी का? आता तू मानवांचे जीवही घ्यायला लागलास? याचसाठी का त्यांनी तूला त्यांचा वारस केलं? सांग मला, का विश्वासघात केलास आमचा? का रमाकांत गायकवाडांसारख्या सज्जन माणसाचे प्राण घेतलेस? बोल लवकर!!"

झ्यूस तेजस्विनीच्या जवळ आला आणि म्हणाला,"मॅडम, आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते कृपया शांतपणे ऐकून घ्या आणि मगच तुम्ही तुमचे मत बनवा" आणि पुढे तो बोलू लागला,
"सर्व प्रथम, मी गायकवाडसाहेबांचे प्राण घेतले नाही कारण मी त्यांच्याच बाजूने होतो, हो हे खरंय, आणि तसही, त्यांचा खून कुणीही केलेला नाही, तो एक अनपेक्षित अपघात होता ज्याची मलाही कल्पना आली नव्हती, त्याच्या गाडीचे इंजिन कदाचित जास्तच गरम झाले असणार आणि तेलासोबत त्याचा कॉन्टॅक्ट झाल्यामुळेच कदाचित त्यांची गाडी हवेतच फुटली, पण आता त्याबद्दल बोलून फायदा नाही कारण मी 'प्रोजेक्ट लेगसी' पूर्ण केलंय, फक्त एक शेवटचं काम बाकी आहे ते करण्यापूर्वी तुम्हाला सर्व काही समजावून सांगावं म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलावलं. तुम्हालाही कदाचित सर्वांसारखा प्रश्न पडला असेल कि फक्त कंपनी सांभाळायची म्हणून विष्णू कुलकर्णी यांनी एवढा खर्चिक यंत्रमानव का तयार केला असावा? ती हकीकत मी सांगतो."

"मला कुलकर्णी सरांनी १२ डिसेंबर २०५६ला पूर्ण केलं आणि सर्वांत पहिले त्यांनी मला सांगितलं कि ते फार वेळ या जगात नसतील आणि हेही कि मी आत्तापर्यंतचा सर्वांत प्रगत यंत्रमानव आहे, माझी बुद्धी मानवांप्रमाणेच आहे, त्यात काही गुंतागुंतीच्या भावनाही आहे ज्या त्यांच्याचकडून आलेल्या आहेत तेव्हा अशा यंत्रमानवाकडे जगाचं लक्ष जाणारच आणि मला चोरण्याचाही प्रयत्न होईल पण जेव्हा कुलकर्णी सरांच्या शत्रूंना त्यांच्या अल्पायुष्याची माहिती मिळेल ते फक्त लिलावाची वाट बघतील आणि कंपनीसह मलादेखील त्यांना हस्तगत करता येईल. लिलावात सर्वांत पुढे राजन देशमुख मोठी बोली लावायला येणार हेही त्यांना ठाऊक होते कारण राजनच्या हालचालींवर त्याचं लक्ष होतं, त्याचे अनेक गैरव्यवहारांत आणि दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात होते तेव्हा त्याला तर माझ्यासारख्या यंत्राचा खूप फायदा झाला असता. हे सर्व लक्षात घेऊन कुलकर्णीसरांनी मला तीन महत्त्वाचे कामं दिले,
१) तेजस्विनी कुलकर्णीचे रक्षण करायचे, कारण कंपनी हस्तगत करण्याच्या मार्गात शत्रूला तुम्ही कदाचित अडथळा वाटण्याची शक्यता असेल आणि ते तुम्हाला काही इजा करतील.
२) कंपनीला कर्जातून बाहेर काढायचे आणि 'व्ही. अँड टि. टेकनॉलॉजिस' कंपनीला मोठी प्रतिष्टीत व आर्थिकदृष्ट्या संपन्न अशी कंपनी बनवायचे जेणेकरून तुमच्या भविष्याची सोय होईल आणि कंपनीची ख्याती जेव्हा जगभरात पोहोचेल तेव्हा साहजिकच शत्रूचे लक्ष आपल्याकडे वेधलं जाईल.
३) राजन देशमुख आणि त्याच्या कृत्यात सहभागी असणाऱ्यांना संपवायचं जेणेकरून ते पृथ्वीच्या पाठीवर परत कधीच अशांतता पसरवू शकणार नाही, मानवतेचे थोडेसे का होईना पण शत्रू जगातून कमी होतील.
मी हि तिन्ही कामं काहीही शिकण्या अगोदर पहिले माझ्या मेंदूत साठवली आणि त्यांना प्राथमिक प्राधान्य दिलं. नंतर कुलकर्णीसरांनी मला व्यवहारज्ञान, संरक्षणशास्र, इत्यादी सर्वकाही शिकवले, मी स्वतःसुद्धा जलदगतीने विकसित होत गेलो. कुलकर्णीसर वारले त्याच दिवशी तुमची माझी भेट झाली, नंतर तुमच्या घरात एक रात्र राहून तिथे माझी सुरक्षा व्यवस्था पेरली, आपण कंपनीत जाऊन प्रॉडक्शन सुरु केले आणि प्रसारमाध्यमांना तुम्ही दिलेल्या मुलाखतीमुळे मी लोकांच्या आणि राजनच्याही नजरेत आलो, मुख्य लक्ष्य तोच तर होता! नव्या रिऍक्टरच्या शोधानंतर कंपनीला कर्जातून बाहेर काढण्याचा मार्ग मोकळा झाला, राजनने स्वतःच्या स्वार्थासाठी मला एक प्रस्ताव दिला की तो कंपनीला आगाऊ ३०००० कोटी देईल आणि अजून ५ वर्षांचा काँट्रॅक्टही करेल पण त्याबदल्यात त्याच्यासोबत भागीदारी करावी लागेल.
मलाही हेच हवे होते. इथे राजनने पहिली चूक केली ती म्हणजे मी यंत्र आहे हे विसरून मला माणूस समजण्याची!

त्याच दिवसापासून मला त्याची सारी काळीकृत्य काळात गेली. मी त्याच्यासमोर अगदी माणसासारखाच वागत होतो आणि तोही बेफिकीर होऊन माझ्यासमोर त्याचे गुप्त व्यवहार उघडे करत होता, तो मला जणू त्याची पर्सनल डायरी समजून मला त्याच्या सगळ्या गुप्त भेटी, त्याचे प्रोजेक्ट्स यांची माहिती द्यायचा. मला त्यातून हे कळले कि त्याची २००जणांची टीम होती जी देशात बाहेरून हत्यारं आणायची.
त्याचा आणखी विश्वास संपादन करावा म्हणून मी आपल्या कंपनीचाच नफ्याचे पैसे वापरून हे भलेमोठे वेअर हाऊस बांधायला घेतले. मी बनवलेल्या खास यंत्रांच्या जलदगतीने फक्त एका वर्षात वेअर हाऊस बनून तयार झाले आणि ते बनवून मी पूर्ण वेअर हाऊस माझ्या नव्या संगणक कार्यप्रणालीवर नियंत्रित ठेवले. राजनने एकदा मला सांगितले होते कि त्याचा सर्वात मूल्यवान माल परदेशातून इकडे येणार आहे तेव्हा मी त्याला त्याचा सगळा बेकायदेशीर माल इथे हलवण्याचा सल्ला दिला, माल हलवण्यासाठी आपलीच काही यंत्र मी त्याला वापरायला दिली. आता त्याचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला होता. इथे राजनने दुसरी चूक केली ती म्हणजे, मला पूर्णपणे निर्बुद्ध यंत्र समजण्याची!

सगळा माल मागच्याच महिन्यात इथे जमा झाला, येथील प्रत्येक सर्किट हे माझ्याच सिस्टिमवर चालते पण मी हि सिस्टिम बनवताना त्यात एक 'बग' (bug) बसवला होता जो सरळ माझ्या नव्या रिऍक्टरशी जोडलेला आहे तो बग जर मी ओव्हरलोड केला तर तो सरळ माझ्या रिऍक्टरमधली 'फिजन रिऍक्शन' (fission reaction) अनियंत्रित (unstable) करेल आणि एक महाशक्तिशाली विस्फोट होईल. किरणोत्सर्ग शहरात न पसरू देण्यासाठी माझे शेकडो मायक्रोरोबोट्स वेअर हाऊसबाहेर उडत आहेत ते सर्व किरणोत्सारी लहरी शोषून घेतील आणि आपोआप नष्ट होतील. आता या वेअर हाऊसचे या हॉलला जोडून असलेले असेच सात हॉल राजनच्या मालाने भरलेले आहेत प्रत्येक हॉलमध्ये आपल्याच कंपनीमध्ये मी स्वतः तयार केलेला एक एक झ्यूस रोबोट उभा आहे ज्याच्यामध्येही मी तो बग लावला आहे. मी संकेत दिल्यावर प्रत्येक रोबोट आपापला बग ओव्हरलोड करेल आणि राजन देशमुख आणि त्याच्या कृत्यांचं अस्तित्व खऱ्या अर्थाने संपेल. मी राजनसह या सर्वांना इथे मारण्यासाठीच बोलावलं होतं. मानवाला इजा पोहोचवण्यावर किंवा न पोहोचवण्यावर मला काहीच बंधनं नाहीत, मी या सर्वांना अर्ध्या तासाच्या आत मारलं, राजन देशमुखला मात्र मी वेदनादायक मृत्यू दिला. आता विस्फोट झाल्यावर या सर्वांचं इथे दहन होईल तेव्हा माझी विनंती आहे तुम्हाला मॅडम, कि तुम्ही आता येथून सुरक्षित ठिकाणी जावं." एवढं सांगून झ्यूस थांबला.

...तेजस्विनीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते, हातातलं पिस्तूल कधीच खाली गळून पडलं होत. तिने पळत जाऊन झ्यूसला मिठी मारली, तिला आता त्याच्याजागी एखादा यंत्रमानव नाही तर तिचा विष्णूच दिसत होता, तिच्या भावनांचा बांध आता फुटला होता. ती रडतच म्हणाली, "मला माफ कर रे माझ्या बाळा, खरंच माझी चूक झाली; अरे जिवंत माणसं आपल्या सग्यासोयऱ्यांची इच्छा पूर्ण करताना संकोचतात, टाळाटाळ करतात पण तू यंत्र असूनदेखील स्वतःच्या निर्मात्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मानवासारखा झटलास. तुझा निरोप कसा घेऊ मी? पण एका मुलाला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा तर पूर्ण करू द्यायलाच हवी. जा बाळा झ्यूस, कर तुझे काम पूर्ण." तेजस्विनीने एकदा झ्यूसच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, झ्यूसने यावेळेस मात्र आपल्या चेहऱ्यावर एक वेगळं चमकदार हास्य आणलं, तेजस्विनीला त्या स्मितहास्यामध्ये एका निरागस, कर्तव्यदक्ष मुलाचा चेहरा दिसत होता. ती झ्यूसचा निरोप घेऊन जवळच्याच एका इमरजन्सी डोअरमधून बाहेर पडली, गाडीत बसली आणि तिने उड्डाण घेतल्यावर काही वेळाने एक मोठ्ठा आवाज चोहीकडे पसरला... तेजस्विनीने कंपनीच्या दिशेला वेगाने उड्डाण घेतलं होत, फक्त तिलाच माहित होते कि हि एका नव्या पर्वाची सुरुवात आहे जिथे आपण फक्त मानवांकडूनच नव्हे तर यंत्रमानवांकडूनही माणूसकीची अपेक्षा ठेऊ शकतो, झ्यूसने नरसंहार मानवविरुद्ध नाही तर मानवहितार्थ भावनेने केला होता.....

तेजस्विनी कंपनीत आली होती. आत्तापर्यंत पूर्ण शहरात त्या विस्फोटाची बातमी पसरली होती. आज तेजस्विनीला कंपनीत कोणताही संगणक अडवत नव्हता. ती लिफ्टने झ्यूसने बांधलेल्या नव्या यंत्रमानव निर्मिती विभागात आली, त्या विभागाचे नाव होते 'फ्युचर मेकर' (future maker) अर्थात 'भविष्य निर्मिती करणारे'. याच विभागात झ्यूसने ते बाकीचे झ्यूस रोबोट बनवले होते. तिने पाहिलं, तिथे एक अपूर्ण राहिलेला झ्यूस रोबोट होता. आता तेजस्विनीला माहित होतं कि काय करायचे आहे...

दि. २४ एप्रिल २०६१:
तेजस्विनीने आता कंपनीचा ताबा घेतला आहे. ती व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळते आहे. 'व्ही. अँड टी. टेक' कंपनीच्या इमारतीसमोर दोन पुतळे उभारले आहेत, एक विष्णू कुलकर्णीचा; ज्याच्या खाली लिहिले आहे, "एक असाधारण निर्माता ज्याने एक अनोखा वारस दिला" आणि एक झ्यूसचा; ज्याच्या खाली लिहिले आहे, "एक अनोखा वारस ज्याने आपल्या असाधारण निर्मात्याचे स्वप्न पूर्ण केले"
तेजस्विनी 'फ्युचर मेकर' विभागात आली, झ्यूसने आणि विष्णूने मागे ठेवलेल्या रेकॉर्डस्चा अभ्यास करून एल. बी. इनफिनिटी २ (L.B.- ∞ २) बनवण्याचा आणि त्याला त्या अपूर्ण झ्यूसच्या शरीरामध्ये टाकण्याचा तिचा प्रयत्न चालू होता. तिने तो एल.बी.- ∞ २ झ्यूसच्या शरीरात टाकला तर होता पण त्याच्याकडून काहीही प्रतिसाद मिळत नव्हता आणि आज तर २४७वी झ्यूस रोबोट चाचणी अपयशी ठरली. गेले दीड वर्षं तेजस्विनी त्याला सुरु करण्याचा प्रयत्न करते आहे पण तो अजून सुरु झाला नव्हता.
तेजस्विनी त्या 'निर्जीव' झ्युसजवळ आली आणि हताशपणे म्हणाली, "तुला अजून बरीच काम करायची आहेत" असे म्हणून ती वळली आणि 'फ्युचर मेकरच्या' बाहेर जाणार इतक्यात मागून आवाज आला,

"आज्ञा द्या मॅडम!"

तेव्हा तेजस्विनीच्या चेहऱ्यावर एवढ्या वर्षांनी एक समाधानी हास्य पसरलं...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार माझ्या लेखक, वाचक मित्रांनो!
या कथेनंतर आता मला परीक्षेमुळे एक महिना तरी लिखाण करता येणार नाही, परीक्षा संपल्यानंतर 'वारस' या कथेचा, त्याच पात्रांसोबत नवीन भाग (sequel), नवीन शीर्षकासह लिहिण्यास घेणार आहे आणि तो प्रकाशित करण्याआधी 'वारस' कथेवर आधारित छोट्या छोट्या जोड कथा (spin-off) लिहून प्रकाशित करण्याचा विचार आहे. उदा. 'वारस' या कथेतील घटनेमुळे त्या जगातील बाकी काही निवडक पात्रांवर कसा व काय परिणाम झाला हे त्यातून सांगण्यात येईल. spin-off हा प्रकार आपण हॉलिवूड मध्ये आधीही पहिला आहे आणि आताही पाहतो आहेच(उदा. fantastic flying beasts & where to find them हा harry potter चा spin off आहे तसेच rogue one हा प्रसिद्ध star wars चा spin off आहे) तोच प्रयत्न मराठी कथांमध्येही करण्याचा विचार आहे. तेव्हा तोपर्यंत वाट पाहावी, धन्यवाद!

शेवट एकदमच अनपेक्षित होता. कथा खुप आवडली. तुमची exam संपली की लगेच sequel सुरु करा. माझी पण exam चालू आहे पण मायबोलीवर आल्यावर एकदम relax वाटत

बच्चन श्रीदेवीचा इक्नलाब सिनेमा होता. असाच शेवट होता

उत्तम विज्ञानकथांवर मी प्रचंड प्रेम करतो पण मराठीत फारशा लिहल्या जात नाहीत. त्यामुळे विज्ञानकथा हे शिर्षक पाहून उत्सुकता वाढली होती. १ ते ४ भाग सलग वाचले. कथा आवडली. लिहत राहा.

SpinOff आणि sequel साठी शुभेच्छा.

सर्वांना खूप खूप धन्यवाद! तुमच्यामुळे माझा आत्मविश्वास अजून वाढला आहे! मी ही कथा लिहून झाल्यानंतर प्रथम माझ्या बाबांना वाचण्यास दिली होती; तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रिया होती, "Really fantastic story I've ever read!"
खरंच, तेव्हा जो आनंद झाला होता तसाच आज होतो आहे. तुमच्यासाठी अजून लिहीत जाईलच! खूप खूप आभार!

सुरेख कथा आणी विशेष म्हणजे इतक्या कमी वेळात पुर्ण कथा वाचायला मिळाली त्याबद्दल आभार. तुमचे पुढील लि़खाण वाचायला नक्कीच आवडेल मला.

तुमचेही खूप आभार, माझी परीक्षा झाल्यावर लवकरच मी या कथेशी संबंधित असणाऱ्या एक-दोन छोट्या जोड कथा (स्पिन ऑफ) प्रकाशित करेन.