कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग १: निघू निघू म्हणता म्हणता....

Submitted by आनंदयात्री on 21 March, 2017 - 05:42

काही काही प्रवास अटळ असतातच, पण ते घडण्याच्या वेळाही ठराविकच आणि त्याच असतात. बोटा-ब्राह्मणवाडा-कोतूळ-राजूर-भंडारदरा हा रस्ता मी जितक्यावेळा (कारच्या चाकांखाली) तुडवलाय, त्यातल्या फक्त एकदाच तो दिवसाउजेडी केलाय. बाकी सगळ्या वेळी रात्री एक ते तीन हीच वेळ ह्या प्रवासाबद्दल नियतीने माझ्यासाठी राखून ठेवली आहे. बोटा सोडलं की धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याशेजारून जाणारा रस्ता, मग ब्राह्मणवाड्यानंतरचा पाडाळणे आणि भोजदरी गावांना जोडणारा घाट, कोतूळ गावातले एकेकाळचे जगात वाईट आणि आता कमालीचे तुळतुळीत रस्ते, मग राजूरच्या अलिकडचा आणखी एक घाट, घाट संपल्यानंतर एका मंदिराला ऑलमोस्ट खेटून वळणारा अरूंद रस्ता हे सगळं आता पाठ झालंय. दरवर्षी जायंट स्विंगला नेणारा आणि आणणारा हाच तो रस्ता. मागच्या आठवड्यात गेलो तेव्हा मात्र यापैकी बराच रस्ता खूप सुधारल्याचं जाणवलं. राजूर गेलं आणि घोटी रस्त्याने बारी गाव पार केलं. उतार उतरून वासळी फाट्यावरून गाडी आंबेवाडीकडे वळवली तेव्हा आसमंत थंडगार पडला होता. तशी थंडी बोटापासूनच सुरू झाली होती. कारमध्ये होतो म्हणून आम्ही सुरक्षित होतो. संजय आणि रोहित बाईकवरून येत होते, त्यांची मात्र हालत खराब झाली होती. त्यात रोहित एक दिवस आधी तापाने आजारी होता हेही कळलं. संजयने 'मी बाईकवर येणार नाही' हा निश्चय याहीवेळी मोडला होता. (ट्रेकरलोक्स इतके उपद्व्याप का करतात हा तुमच्या मनातला प्रश्न! - पोचला मला. पण त्याला उत्तर नाही. )

आंबेवाडीच्या पुढे तीन किमीवर पांडुरंगच्या झापापाशी पोचलो तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते. शुद्ध पक्षातल्या त्रयोदशीचा चंद्र आकाशात केव्हाच आला होता. त्याच्या प्रकाशात कुलंग-मदन-अलंगच्या रांगेची किनार दिसत होती. अरूण सरांच्या प्लॅननुसार आम्ही झापापाशी पोचल्या पोचल्याच सामान घेऊन कुलंगच्या दिशेने चढायला सुरूवात करणार होतो. ह्यामुळे दुसर्‍या दिवशीची चढाई कमी झाली असती. पण पुण्याहून आधीच २०० किमी ड्राईव्ह करून आलो होतो, आणि मुंबईहून आलेले सगळे ताडपत्री अंथरून त्यावर केव्हाच स्लीपींग बॅगमध्ये विलीन झाले होते. त्यामुळे अरूण सरांनीही मग 'दोन-एकतास झोपून सहा वाजता उठून चालायला लागू' असं सांगितल्यावर आम्हीही झोपेच्या वाटेने निघालो. मार्चमध्येही हवेत गारठा होता. त्यात मला थंडी हे प्रकरण मुळीच झेपत नसल्यामुळे माझी थडथड सुरू व्हायच्या बेतात होती. बाहेर झोपण्यापेक्षा मी गाडीतच झोपणं पसंत केलं. जी काही दोन-तीन तास झोप झाली, त्यात रात्रभर 'इन्ना सोणा रब ने बनाया' हीच एक ओळ सारखी मनात वाजत होती. त्याचं कारण आजपर्यंत कळलेलं नाहीये. मीच मग त्या ओळीतलं 'सोणा' हे 'सोना-झोपणे' या अर्थी असेल, म्हणजे एवढीच झोप रबने नशिबात ठेवली असेल अशी समजूत करून घेतली.

बरोब्बर सहा वाजता अरूण सरांनी काचेवर टकटक करायला सुरूवात केली. (देवा! जरा झोपू देत नाहीत). जायंट स्विंगच्या वेळी तर बरोब्बर साडेपाचला हाका मारायला सुरूवात करतात. कुणी उठलं नाही, तर मग टेंटच्या झिप उघडून ठेवतात. (घ्या, डिसेंबरातल्या पहाटेचा वारा खात झोपा!) पण हा माणूस सह्याद्रीत आडवाटांचे ट्रेक करण्यासाठीच जन्माला आला आहे. त्यांच्यासाठी हे थंडी-पाऊस वगैरे निसर्गाचे खेळ किरकोळ आहेत. तर ते असो. मी तरी पंधरा मिनिटे झोपून घेतलं. माझी सरांबरोबरची आयुष्यातली ही पहिलीच expedition होती. त्यामुळे मी काय क्रिकेट टीममध्ये पहिल्यांदाच सिलेक्शन झालेल्या होतकरू खेळाडूसारखा होतो. बाकीचे बरेच जण सरावलेले होते.

उजाडलं तेव्हा कुलंगचा माथा काळसर ढगात बुडाला होता. ते बघून माझ्याही मनावर शंकेचे काळे ढग जमा झाले. थंडी झेपत नाही, त्यात आता पाऊसही! वेधशाळेने दोनच दिवसांपूर्वी 'पुण्यात येत्या तीन-चार दिवसात गडगडाटी पाऊस पडेल' असा अंदाज दिला होता. पण पावसाचे ढग कुलंगच्या प्रदेशातून येतील हे काही सांगितलं नव्हतं! 'वेधशाळेची कार्यपद्धत अजून आधुनिक करायची गरज आहे' असा एक प्रातःस्मरणीय विचार डोक्यात शिरताच मग प्रसन्न वाटून गेलं. मीही पावसाची शंका बोलून दाखवताच रोहितने "बाबा! ('बाबा' हे 'येड्या भो***' अशा अर्थी घ्यायचं) इथल्या भागातल्या गारा खाल्यात! पावसाचं नाव काढू नकोस!" असं सुनावलं. घ्या! आता थंडी-पाऊस पुरेसे नव्हते की काय, म्हणून गारा! मी शेवटी तो विचारच झटकून टाकला. मग गरमागरम चहा तयार झाला. त्यासोबत कुणी कुणी काय काय आणलं होतं, ते खाऊन झालं. मी उकडलेली अंडी नेली होती, ती वाटून टाकली. (तेवढंच ५०-१०० ग्रॅम वजन कमी झालं आणि सकाळी सकाळी प्रोटिन्सही मिळाली).

मग सॅक भरायला सुरूवात झाली. क्लाईंबिंगसाठी आणलेलं सगळं हार्डवेअर, equipment, बेसकँपचं सगळं सामान ताडपत्रीवर अंथरण्यात आलं. ते इतकं जास्त दिसत होतं, की हे एवढं वर न्यायचं आहे हे मला आधी खरंच वाटलं नाही. मग सूरजने परिस्थितीचा ताबा घेतला. त्याचे सॅक भरण्याचे बेसिक-अ‍ॅडव्हान्स सगळे कोर्सेस झालेले असावेत. त्याने हुकूम सोडला - "प्रत्येकाने आपापल्या सॅक दाखवा. त्यात हे सामान कसं बसवायचं ते मी सांगतो". मी 'हीच ती वेळ, हाच तो क्षण' साधून माझी सॅ़क त्याच्याकडून भरून घेतली. हा आनंद क्षणभरच टिकला. कारण आता सॅकच्या वरच्या भागात बरीच जागा रिकामी झाली होती. त्यामध्ये सूरजने बरंच काय काय भरलं. सॅकची extended जागाही वापरून झाली. माझी सॅक पूर्ण भरल्यावर जमिनीपासून माझ्या कंबरेपर्यंत येते ह्याचा साक्षात्कार त्या दिवशी मला झाला. असेच काही साक्षात्कार इतरांनाही झाले असावेत. पूर्ण भरून झालेली सॅक मोठ्या डौलात मातीत उभी होती. ही आपल्याला पाठीवर घेऊन चालायचं आहे, हे जाणवताच माझा डौल मावळला. आंबेवाडी सोडलं तर थेट कुलंगच्या माथ्यावर पाणी आहे. ही चढाई 'सह्याद्रीतली सर्वात मोठी चढाई' आहे असं घाबरवणारं काहीतरी मी नेटवर वाचलं होतं. त्यामुळे तब्बल साडेचार लिटर पाणी घेऊन निघालो होतो. एवढं ओझं मी आजपर्यंत क्वचित घेतलं असेल. त्यात कारमधून ट्रेकला जाणे सुरू झाल्यापासून तर सॅक भरण्याचं कौशल्य तर विसरूनच गेलो होतो आणि आळशीपणाच वाढला होता.

सगळ्यांच्या सॅक भरेपर्यंत साडेआठ केव्हाच वाजून गेले. इकडे ताडपत्रीवर अंथरलेलं सगळं सामान कुणाच्या ना कुणाच्या सॅकमध्ये गुडूप झालं होतं. हे सगळं करण्यात वेळ चालला होता. एरवी जायंट स्विंगच्या वेळी वेळेबाबत कमालीचे दक्ष असणारे अरूण सर ह्यावेळी काहीच बोलत नव्हते. मला कळेना की आजच्या दिवसाचा प्लॅन नक्की काय आहे? मी तसं एकदोनदा विचारूनही पाहिलं. पण कुणी काय खबर लागू दिली नाही. (त्यांनाही प्लॅन माहित नसेल, दुसरं काय!) आणि मुख्य म्हणजे ही मोहीम होती, कमर्शिअल ट्रेक नव्हता. आजपर्यंत कुणीही सर न केलेली कुलंगच्या पूर्वेकडची सहाशे फूट उंच भिंत (कडा) चढून जाण्याचं ध्येय होतं. त्याला क्लाईंबर्सच्या भाषेत virgin wall किंवा cliff म्हणतात. (काय परफेक्ट शब्द आहे ना!) पूर्ण जमली नाही तर जितकी जमेल तितकी चढून सुरक्षितपणे खाली येण्याला प्राधान्य होतं. 'मला विजयाचा हट्ट धरण्यापेक्षा वेळ बघून माघार घेण्यातलं समाधानही तितकंच आवडतं' - इति अरूण सर. ह्यातले सगळे सहभागी लोक्स चांगले ट्रेकर्स आणि उत्तम दमाचे होते. त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडेफार पुढेमागे चालणारच होते. अखेर, आंबेवाडीतल्या चंदरला - आमच्या वाटाड्याला, घेऊन सगळी पलटण निघाली तेव्हा साडेनऊ वाजले होते. रात्रीच चढून जाणारे आम्ही 'निघू निघू' म्हणता म्हणता अखेर सकाळी उन्हात चढणार होतो. पण झापापासून निघून पुन्हा झापापर्यंत येण्याच्या पुढच्या एकोणचाळीस तासामध्ये जे काही भाग्यात अनुभवायला मिळालं त्याचं वर्णन 'अवर्णनीय' या एकाच शब्दात करता येईल. जी वॉल चढायची होती, त्या वॉलच्या खाली एक खिंड होती, त्या खिंडीपासून चढाईला सुरूवात होणार होती. पण आपण चढून नेमकं कुठे जायचं आहे आणि आज रात्रीचा मुक्काम कुठे करायचा आहे, हे अरूण सर सोडून कोणालाच माहित नव्हतं.

(क्रमशः)
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2017/03/blog-post_16.html)

कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग २: करायला गेलो वॉल, झाला कुलंग!
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ३: नातवंडांनाही सांगेन अशी गोष्ट
कुलंग प्रस्तरारोहण मोहीम - भाग ४ (अंतिम): फोटो आणि उपसंहार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरीच !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत Happy

Back to top