मागच्या वर्षी भारतात जाताना एक काळजी होती,'मावशी' झाल्याची. आता यात काळजी करण्यासारखं काय ते पुढे कळेलच. पण मावशी म्हटलं की मला आमची मावशी आठवते. आई आणि मावशी या पाच भावानंतरच्या दोन मुली, त्यामुळे त्यांच्यात बरीच जवळीक होती आणि आजही आहे. दोघीही बहिणी,'आपल्याला आईने जावई कसे अगदी सारखे शोधून दिले आहेत' म्हणत अजूनही नवऱ्यांच्या गोष्टी एकमेकींना सांगत बसतात. आई धाकटी, त्यामुळे मावशींमध्ये असलेला समंजसपणा तो आम्हालाही कायम दिसत राहिला , अजूनही दिसतो.
तर आम्ही लहान असताना वर्षातून एकदाच जाणं व्हायचं आजोळी, तिथेच मावशीही जवळच राहायची त्यामुळे सर्वांना भेटून व्हायचं मावशीकडून निघताना, रिक्षा पकडायला, बसटॉपवर येताना ती रस्त्यांत कोपऱ्यावरच्या बेकरीत थांबून आमच्यासाठी नानकटाईची बिस्किटं घेऊन द्यायची. त्याकाळी ती पर्वणीच होती. अशा मावशीकडे असल्याच्या अनेक आठवणी आहेत त्यातली ही पहिली. पुढे मी कॉलेजला तिकडेच राहायला गेले आणि बरेच वेळा शनिवारी-रविवारी खूप कंटाळा आला रूमवर की मावशीकडे जायचे. मावशीच्या हातचा चहा, साबुदाण्याची खिचडी, अजून बरंच काही आवडीने खायचे. अगदी एका आंब्याच्या सीझनमध्ये माझ्यासाठी आठवणीने आंबे आणले होते आणि लपवून ठेवले होते. मी वासाने बेजार. शोधून मिळेनात. सगळ्यांनी हसून घेतलं. पण शेवटी आमरस खाऊनच रूमवर गेले.
तर हे असे अनेक लाड, हौस मावशीकडे पुरवली गेली, ज्या परिस्थितीत, जशी जमेल तशी. त्याचसोबत हक्काने रागवलीही. एकदा कॉलेजमध्ये असताना एक मुव्ही आधी पाहून आले होते. मैत्रीण विचारायला आली म्हणून पुन्हा गेले. मावशीने नाही म्हटले होते जायला पण तरी गेले. परत आल्यावर रागावलेली मावशी पाहून भीती वाटली आणि अजूनही तो प्रसंग विसरणार नाही, कारण अशा अजून २-३ वेळाच ती माझ्यावर चिडली असेल. कॅम्पस मधून नोकरी लागली तेंव्हाही किती उत्साहाने भेटायला गेले होते. प्रत्येक परीक्षेत टेन्शन आले की तिच्याकडे जाऊन बसायचे रूमवरन. तर अशी आमची मावशी लाड पुरवणारी आणि रागावणारीही, परीक्षेत धीर देणारी.
पुढे माझी मुलं झाली तेंव्हा दोन्ही बहिणी मावशा झाल्या. सानूचे खाणे-पिणे, आजारपण, लाड सर्व पुरवलं त्यांनी आधी वाटायचं तिचे इतके लाड करतात तर स्वनिकला स्वीकारतील का? पण त्यालाही भेटल्या आणि त्याला एकदम आपलंस केलं. दोघांनाही त्यांच्याकडे देऊन मी अनेकवेळा बाहेर गेले आहे. त्यांच्यासोबत पोरांना सोडून एकदम बिनधास्त व्हायला होतं. सानू ६-७ वर्षाची होईपर्यंत घरात ही दोनच मुलं, मावशी मामाकडून लाड करवून घेणारी, पण त्याचसोबत कधी त्यांचं चुकलं तर रागावणारी. आम्ही इथे असतानाही त्यांच्याची बोलणारी मावशी.
गेल्या वर्षी मी मावशी झाले, मोठी मावशी. मी अमेरिकेत असल्याने बाळाला भेटायच्या वेळेपर्यंत ते एक वर्षाचं झालं. आम्ही दोघीही सुट्टीला भारतात गेल्यावर भेट होणार होती. वाटलं, आपल्या मावशीने जे प्रेम दिलं, माझ्या मुलांना त्यांच्या मावशांनी जे प्रेम दिलंय तसं आपल्याला देता येईल का? विशेषत: स्वतःची मुले असल्यावर त्याची तुलना त्यांच्याशी होईल का असे अनेक प्रश्न मनात होते. त्या मुलाचे मनसोक्त लाड करता येतील का असे वाटत होते. की आपल्या मुलांसारखे त्यालाही वळण लावण्याचा प्रयत्न करू? असे अनेक विचार करत आमची भेट झाली.
बाबू,म्हणजे भाचा आजारी पडला होता भारतात येताना त्यामुळे तो कुणालाच हात लावू देत नव्हता आणि आईला तर सोडतही नव्हता. पण मी गेले आणि त्याला घेतलं तर एकदम लगेच माझ्याकडे आला. आणि पुढचे दोन दिवस मला चिकटून राहिला. सर्वजण आश्चर्यचकित झाले कसा काय माझ्याकडे गेला म्हणून. मीही छोट्या बहिणीला चिडवत राहिले की बघ तुझ्याकडे येत नाहीये पण माझ्याकडे आलाय. मग पुढे त्याला झोपवायचा प्रयत्न करणे, किंवा त्याला नुसते हातात धरून बसणे, त्याला बरं वाटावं म्हणून काही उपाय करणे किंवा खेळवणे यात मनातल्या सर्व शंका पळून गेल्या होत्या. त्यानंतर प्रत्येकवेळी भेटल्यावर तितक्याच लाडाने तो माझ्याकडे आला, राहिला आणि मलाही त्याला धरून बसावसं वाटत राहिलं. एक दिवस बहीण त्याला घरी सोडून बाहेरही जाऊन आली.
हे सगळं इतक्या सहजपणे झालं. जमेल की नाही अशा अनेक शंका मनात घेऊन बसले होते त्या किती सहजपणे दूर झाल्या. मी माझ्या मावशीच्या भूमिकेत नकळत शिरून गेले होते स्वतःलाही न जाणवता. भारतात असताना सर्वजण समोर असताना ही नाती सहजपणे अनुभवता येतात. पण हे असे वेगवेगळ्या देशात असताना अशी प्रेमाची नाती इतक्या दूर असतात, मग त्यात आपल्या मनात शंका येणं मला स्वाभाविक वाटतं. पण शेवटी मावशी ती मावशीच असते. तिचं प्रेम बहुतेक आईसारखंच आपोआप येत असावं.
विद्या भुतकर.
हो गं खरंच विद्या!!
हो गं खरंच विद्या!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी पण बहिणीची मुलगी, कॅनडात जन्म झाला. इथे आली तेव्हा ११ महिण्यांची होती.
असे वाटले, घरातली हि पहिलीच मुलगी..आता माणसे ओळखते. हात लावू देईल का? आपण मारे तिच्यासाठी काय काय घेतोय!
पण बघीतल्या बघितल्या माझ्या कडेवर आली, नंतर मेकअप केलेल्या स्वतःच्या आईला न ओळखल्याने, आई म्हणून मलाच चिटकली
मस्तं!
मस्तं!
आमच्या मुलांना पण आईइतकीच माऊ म्हणजे मावशी आवडते.
आत्यापेक्षा मावशी अधिक लाडाची आणि जवळची असते हे खरंय.
विनिता, शेवटचं वाक्य भारी आहे तुमच्या पोस्टमध्ये.
विनिता, शेवटचं वाक्य भारी आहे
विनिता, शेवटचं वाक्य भारी आहे तुमच्या पोस्टमध्ये. >>> हो नं साती, मला पण आधी कळेना की हि आई समोर असून मला का सोडेना![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
छान लेख आहे. विनीता सारखाच
छान लेख आहे. विनीता सारखाच माझाही अनुभव आहे.. बहिणीचा मुलगा ८-९ महिन्याचा असेल.. मी त्यांच्याकडे गेले तेव्हा ती दवाखान्यात गेली होती.. तो बाईजवळ होता, तर काय आश्चर्य लगेच माझ्याजवळ आला.. बाई म्हणे, " तो लगेच कुणाकडे जात नाही", मग काही वेळाने बहिण आली तर एकदा माझ्या तोंडाक्डे पाही, अन एकदा तिच्या,, मग फायनली आईकडे झेपावला..
मावशी अन आईत काहीतरी धागा आहे,, ते बंध जाणवतात मुलांना अगदी..
किती छान लिहिलय!! आमच्याकडेही
किती छान लिहिलय!! आमच्याकडेही माऊच !! माझी जरा वेगळी परिस्थिती होती. माझ्या भाचीवर माझा प्रचंड जीव. मला वाटायचे की मी माझ्या बाळावर तरी इतकं प्रेम करू शकेल का :-प , अर्थात आई ती आईच, पण अजूनही माझ्यासाठी ती माझी मोठी मुलगीच आहे / राहील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आई डोक्यावर पदर घेवून वावरत
आई डोक्यावर पदर घेवून वावरत असली की सगळ्या चिल्यापिल्यांची मजा येते.
आई समजून कोणालाही चिकटतात, तोंड दिसले की कावरेबावरे होतात.
मस्तच...छान लिहिल आहेस..
मस्तच...छान लिहिल आहेस..
खुप जिव्हाळ्याचा आहे मावशी म्हणजे माझ्यासाठी...
का तर मला शीर्षकामधे निगेशन जाणवले..म्हणजे आई ती आईच आणि मावशी ती मावशीच असे..
लिहित राहा..
विद्या खूप छान लिहिलंय ....
विद्या खूप छान लिहिलंय .....नेहमीप्रमाणेच ..
नव्हे आहेच ...अगदी झाल्या दिवसापासून माझ्या कुशीत राहिलाय तो so खूप स्ट्रॉंग attachment आहे आमची ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला वाटायचे की मी माझ्या बाळावर तरी इतकं प्रेम करू शकेल का :-प , अर्थात आई ती आईच, पण अजूनही माझ्यासाठी ती माझी मोठी मुलगीच आहे / राहील >>> खरंय .......मी सुद्धा हे मावशी पण एन्जॉय करतीये...माझा भाचा मला माझा मुलगाच वाटतो
सर्वांचेच अनुभव किती छान.
सर्वांचेच अनुभव किती छान. धन्यवाद.
जवळच्या मैत्रिणीच्या मुलांचेही असेच होते. त्यांनाही खुप लळा लागतो.
विद्या.
विद्या खूप छान लिहिलंय ....
विद्या खूप छान लिहिलंय .....नेहमीप्रमाणेच ..>>>> सहमत.
मस्त!
मस्त!
माझ्या मावशीची आणि भाचरेमंडळींची सुद्धा खूप आठवण झाली. छान लिहिले आहे.
माझी मावशी आम्हाला खूप खूप
माझी मावशी आम्हाला खूप खूप आवडायची माझ्या आईपेक्षा मोठी पण आई आजारी असताना तिने तिची खूप सेवा केली पण छोट्याश्या आजाराने अचानक फेब २०१४ ला वारली तिच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी २०१५ ला माझी आई वारली. दोघी बहिणी सोबत राहिल्या सुखदुःखाच्या वाटेकरी बनल्या (माझी मावशी बाल परित्यक्ता, माझ्या आईने तिला मुंबईला आणले. तीने गोदरेज कंपनीत नोकरी केली होती कंपनी बंद झाली आणि हिचे खूप हाल झाले). आणि वारल्याही एका वर्ष्याच्या फरकाने.
:O=
:O=
माझ्या दोन्ही मुलींना
माझ्या दोन्ही मुलींना जन्मल्यावर पहिल्यांदा हातात घेतलं ते माझ्या धाकटया बहिणीने। तिचा त्यांच्यावर आणि त्यांचा तिच्यावर खूप जीव आहे। आणि तिने सांगितल्यावर ऐकतात पण सगळं तिचं मुली। छान वाटतं मला खूप।
सर्वाम्चेच अनुभव किती छान आणि
सर्वाम्चेच अनुभव किती छान आणि त्यात दिसणारी आपुलकीही.
धन्यवाद.