रंगगर्भ...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 24 February, 2017 - 06:08

सावळ त्याचा रंग घनासम ।
गोरी मी संगमरवरी ।
बाह्याकारी तो आकर्षक
मी साधीशी व्रजनारी ।।
त्याचे कुंतल काळे कुरळे
माझी लांब सरळ वेणी ।
कुंदकळ्या हास्यातुन माझ्या
त्याच्या मोत्यांच्या श्रेणी।
माझ्या डोळा भाव भाबडा
गहन डोह त्याच्या डोळा ।
मी चवथीची कोर, चंद्र तो
उधळी सोळा सर्व कळा ।
कदंब तो तर सदाहरितसा
मी जल यमुनेचे काळे ।
तो माझी ओढणी कुसुंबी
मी त्याचे अंबर पिवळे ।।
त्याचे माझे नाजुक नाते
निळे जांभळे मोरपिशी ।
रंगगर्भ श्रीरंग तसा तो
आणिक मी रंगार्त अशी ।।
मिटून डोळे मुक्त वाजवी
कृष्णसखा जेव्हा वंशी ।
विरघळते त्याच्यात पूर्ण मी
अलगद, नकळत अत्तरशी ।।

-चैतन्य

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद मंडळी.
@ कावेरि
>>सावळ>>>सावळा अस आहे का???
हो, अर्थ तोच. सावळकांती असाही शब्द वापरात आहे. त्यातला फक्त 'सावळ' घेतला Happy

छान

छान