वाढत्या शहरीकरणामुळे निसर्गरम्यतेच्या अनुभवापासून आपण दूर चाललो आहोत. एक छोटंसं रोपटंही आपल्या थकल्या-भागल्या मनाला ताजंतवानं करून जातं. परंतु सिमेंटच्या जंगलात ते सुख मिळणंही दुरापास्त झालं आहे. अशावेळी आपल्या घरात छोटी-छोटी रोपटं रूजवून आपलं घर हिरव्या बहरानं फुलून जाऊ दे यासाठी अल्पसा प्रयास ! निसर्गावर आपण सर्वजण खूप प्रेम करतो. हा निसर्ग घरात फुलवावा, ही पण प्रत्येकांची मनोमन इच्छा असते. दिवसेंदिवस पर्यावरण जागृतीही वाढत आहे, ही आनंदाची बाब आहे. पर्यावरण स्वच्छ असण्यासाठी बरेच जण आपलं कर्तव्य मानून काम करताना दिसतात. सध्या नव्याने आलेली लाट म्हणजे निसर्गानुकूल घरं. पर्यावरणासाठी अनुकूल, बांधकाम साहित्यापासून ते घरातल्या रोजच्या उपकरणांपर्यंत आणि निसर्गानुकूल रंगांपासून पार पर्जन्यजल-संवर्धनापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आपली राहती घरं आणि पर्यायाने आपली वसाहत, शहर अधिकाधिक निसर्गानुकूल बनवण्यात केला जातो. मात्र, अनेकदा सरकारी दबाव नाही म्हणून, तर कधी बिल्डरनी या सुविधांचा विचार केला नाही म्हणून, तर कधी सोसायटीतल्या सर्व सभासदांचा सहभाग मिळत नाही म्हणून असे निसर्गानुकूल प्रकल्प राबवता येत नाहीत. अशावेळी वाटत राहतं की आपलं घर अधिक निसर्गानुकूल करायचं तरी कसं ? मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सातारा, नासिक, ठाणे अशा नवनव्या शहरांच्या विस्ताराच्या महाराष्ट्रात हिरव्या घरांचं स्वप्न आपण पाहायचंच नाही की काय ? मुंबईच्या काही मंडळींनी येऊन यावर काही शक्कल शोधून काढली आहे आणि त्यांचा मंत्र अगदी सोपा आहे - मातीशी मैत्री करा, मजा येईल. त्यासाठी व्हरांडय़ात, गच्चीवर, जागा असल्यास बागेत जमेल तेवढी झाडं, वनस्पती, भाजीपाला लोक लावतात. समाजामध्ये वृक्ष लागवडीबरोबरच वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण होताना दिसत आहे. त्यातल्या त्यात आपल्या दैनंदिन भोजनासाठी आवश्यक असलेला भाजीपाला निर्माण करण्याची त्यांच्यातील प्रवृत्ती स्वागतार्ह आहे. समतोल आहार घेण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो. प्रथिने, जीवनसत्वे, क्षार भरपूर देणाऱ्या भाज्या, आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला आपल्या किचन गार्डनमध्ये कशा लावाव्यात, हे आज बघू.
भाजीपाला आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वनस्पतींची जिथं लागवड केली जाते त्या भागाला किचन गार्डन / परसबाग म्हटलं जातं. घरच्या बागेत, व्हरांडय़ात, बाल्कनीत, टॅरेसवर हे किचन गार्डन आपण करू शकतो. जागा भरपूर असेल तर पालेभाज्या, कंद, शेंगा, वेली, फळझाडे, भाज्या वगैरे लावता येतील. फळभाज्यांमध्ये फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, वांगी, भेंडी, ढोबळी मिर्ची लावता येतील. कंद भाज्यांमध्ये रताळी, मुळे, बटाटे, कांदे, वगैरे लावता येतील. पालेभाज्यांमध्ये मेथी, अंबाडी, चवळी, पालक, चाकवत, माठ, शेपू या भाज्या घ्याव्यात. शेंगांमध्ये गवार, मटार, चवळी, वालाच्या शेंगा परसबागेत घेता येतील. वेलीच्या भाज्यांमध्ये लाल भोपळा, दुधी, कारली, दोडके घेता येतील. हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, लसूण यापैकी जमतील तेवढय़ा जास्तीत जास्त भाज्या किचन गार्डनमध्ये लावाव्यात. आपल्याला वरील भाज्यांपैकी, जागेनुसार कोणत्या भाज्या लावायच्या ते आधी ठरवावं. भिंतीजवळ मोठी झाडं लिंबू, कढीपत्ता ही लावावीत, वेलींच्या भाज्यांसाठी मंडप करावा. ऊन्हं भरपूर येत असेल अशाच ठिकाणी फळभाज्या लावाव्यात, पण पालेभाज्या मोठय़ा झाडाच्या सावलीतही येऊ शकतात. तीन फुटांचे वाफे करावे म्हणजे दोन्हीकडून खुरपी करायला सोपं जाईल. वाफ्यातील किंवा कुंडीतील मातीची खोली एक ते दीड फूट असावी. जागा बऱ्यापैकी असेल तर विटांनी वाफे बनवावे. मातीची ढेकळं असल्यास ते पाणी देऊन विरघळू द्यावे. बारीक माती आणि खत, रेतीचं मिश्रण वाफ्यात घालावं. कमी अधिक प्रमाणात वर्षभर भाज्या येत असल्या तरी ठराविक मोसमात काही भाज्यांचं पीक चांगलं येतं. म्हणजे, कीड रोगही कमी प्रमाणात राहते.
वेलींच्या भाज्या सर्वसाधारणपणे पावसाळ्यात लावतात. फळभाज्या हिवाळ्यात चांगल्या येतात. सर्व भाज्यांची प्रथम रोपं तयार करून घ्यावी लागतात. रोपं प्रथम कुंडय़ांमध्ये तयार करून घ्यावी. पावसापासून रोपांचं संरक्षण होईल, अशा ठिकाणी ठेवावी. बी पेरताना हातात चमचाभर कोरडी बारीक माती घेऊन त्यात बी घोळून ते पेरावं. रोपं तयार व्हायला एक महिना वेळ लागतो. पाच-सहा इंचाची रोपं झाल्यावर वाफ्यात लावावी. फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी ही रोपं एक ते दीड फूटांच्या अंतरावर लावावी. रोपं आठ दहा इंच वाढली की, शेणखत भरपूर घालावं. वांग्याची रोपं अध्ये मध्ये कापत राहिल्यास व खत दिल्यास वर्षभर वांगी येत राहतात.
एकाच प्रकारच्या भाज्या एकाच वाफ्यात / कुंडीत दरवर्षी लावू नये. पालेभाज्यांना खत वगैरे लागत नाही. त्या वर्षभर चांगल्या येऊ शकतात. भाजी खुडून घेतली तर ती बऱ्याच दिवस मिळू शकते. कंदभाज्या माती-खत मिश्रण करून लावाव्यात. कांद्यांची रोपं सहा इंच उंचीची झाल्यावर ओळीनं वाफ्यात लावावी. बटाटे ओळीत लावावेत. रताळय़ाची वेल जमिनीवर पसरू द्यावी. घरामागं जागा नसेल तर खोक्यात, कुंडय़ात पालक, मेथी, अंबाडी, चवळी या प्रकारच्या भाजीपाला लावता येतात. अनेक ठिकाणी जागे अभावी आता जमिनीचे कमीत कमी क्षेत्रफळ वापरून उभ्या तराफ्यावर वगैरे vertical garden concept वापरून भाजीपाला पिकवतात. परसबागेतील भाज्यांचे किडीपासून नुकसान होते. या कीडीच्या नियंत्रणासाठी सेंद्रिय कीटकनाशकानं (निमार्क इत्यादी) फवारणी करावी कारण रासायनिक फवारणी आरोग्यासाठी अतिशय घातक असते. दररोज भाज्या खाण्यासाठी लागतात. परसबागेत नेहमी झेंडू, पुदिना, लसून, कांदा ही सापळा पीकं घ्यावीत. त्यामुळे सूत्रकृमींचं नियंत्रण होतं आणि कीडी पिकांपासून लांब राहतात. याप्रकारे जर आपण पालेभाज्या, फळभाज्या लावल्या व त्याचं संगोपन केलं तर दैनंदिन भोजनासाठी आवश्यक असलेला भाजीपाला घरीच तयार करू शकतो. या बागेच्या छंदातून आरोग्याचं रक्षण आपण करू शकतो. वेळ सत्कारणी लागल्याचा आनंदही मिळतो. या किचन गार्डनसाठी दैनंदिन प्रयत्नांची खूप आवश्यकता असते. मनापासून इच्छा असली आणि मेहनत घेतली की, आपल्याला आवश्यक असलेला भाजीपाला आपल्या बागेत सहज घेता येतो. थोडी कल्पकता, सातत्य आणि चिकाटीने आपण स्वत: काम करायला घेतलं की घरातली बाग आपण सहज साकारू शकतो. एक विरंगुळा म्हणून, आनंद म्हणून आपलं घर हिरवं करायला सुरुवात करा, म्हणजे मग तुमचं घरंच तुम्हाला प्रेरणा देत राहील. पाहा तर करून. कारण शेवटी आपण स्वत: आंबा चाखल्याशिवाय त्याची गोडी कशी कळणार; खरं ना?
http://d16u920cdkkea2.cloudfront.net/wp-content/uploads/2015/09/terrace-...
अम्बज्ञ
छान लेख. आणखी सविस्तर म्हणजे
छान लेख. आणखी सविस्तर म्हणजे एकेका भाजीविषयी पण अवश्य लिहित रहा.
आवडले लिखाण!
आवडले लिखाण!
एकेका भाजीविषयी पण अवश्य लिहित रहा. >> +१
धन्यवाद हर्पेन आणि दिनेश.
धन्यवाद हर्पेन आणि दिनेश. अधिक सविस्तर आणि वर्गवारी नुसार नक्की लिहीन. माबो वरील हा माझा पहिलाच प्रयास आहे त्यामुळे सध्या मी एक शिकाऊ मेम्बर - पोस्टण्यासाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगली माहिती.
चांगली माहिती.
छान लिहिले आहे. म्हणजे अगदी
छान लिहिले आहे. म्हणजे अगदी बेसिक गोष्टीही. मला भाज्या लावायला खुप आवडते पण ईथे जेमतेम पाच महिने धड उन असते, त्यामुळे मेहनत नको वाटते. दुसरं म्हणजे मला गांडुळांचा फोबिया आहे. अगदी ग्लोव्हज घातले तरी टेन्शन येते. बॅकयार्डमध्ये जरा खणले की ढिगाने गांडुळे दिसतात. म्हणुन मी कुंडीतच लावते भाज्या नाहीतर विकतची माती वापरते. पण मातीत रमायला खुप आवडते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लेख, अुपयुक्त माहिती.
छान लेख, अुपयुक्त माहिती.
माबो वरील हा माझा पहिलाच
माबो वरील हा माझा पहिलाच प्रयास आहे >>>
मायबोलीवर स्वागत असो अंबज्ञ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच लिहिलयं...अजुन लेख येऊ
छानच लिहिलयं...अजुन लेख येऊ द्या..
आमच्या गावची माती इतकी सुपिक
आमच्या गावची माती इतकी सुपिक आहे की ती कुंडीत भरून बिया रोवल्या की नुसते पाणी घातले आणि खत /कीटकनाशके काही वापरले नाही तरी सगळ्या भाज्या येतात.
पण आमच्या गावचे वानर इतके आगाऊ आहेत की सगळ्या भाज्यांचा चट्टामट्टा करतात.
आतापर्यंत टोमॅटो/गाजर/कढीपत्ता/काकडी/दोडकं असं सगळं वानरांना खाऊ घालून झालं आहे.
तेव्हा आता फक्त फुलझाडं लावते.
कढीपत्ता खातात माकडं?
कढीपत्ता खातात माकडं?
माकडं खातात की नाही माहित
माकडं खातात की नाही माहित नाही, वानर खातात कढीपत्ता!
खात नाहीत पण सातीनं खाऊ
खात नाहीत पण सातीनं खाऊ घातल्यावर काय बिशाद वानरा माकडांची की नाही म्हणतील![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
साती पुढच्या खेपेस येताना माती घेऊन ये थोडी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
डॉक्टरांच्या घरातलं सगळं
डॉक्टरांच्या घरातलं सगळं पौष्टिक, खायला पाहिजे हे त्यांना पण ठावं आहे म्हणजे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
डॉक्टरांच्या घरातलं सगळं
साती, हैद्राबाद गटगला येताना पण घेऊन या पोतंभर माती.
छान माहिती!
छान माहिती!
@चैत्राली आणि राया व मानव
@चैत्राली आणि राया व मानव प्रतिसादाबद्दल धन्यवाद
@टीना अजून एक पोस्ट केलीय गृहिणींचे शत्रू आणि एक कविता सुद्धा पोस्टलीय. @साती तुम्हालासुद्धा झाडाझुडपांबद्दल विशेष आवड आहे हे वाचून आंनद झाला. बाकी वानरांचा त्रास अनेक ठिकाणी होत असल्याने त्यामुळे बऱ्याच अंशी कोकणात फळबागा भाजीपाला लागवड धोक्यात आहेत. ही माकडे एवढी वस्ताद असतात कि नारळाच्या झाडावर चढून माडी साठी लावलेली मडकी सुद्धा तोंड लावून आतली माडी पळवतात. सध्याचा तुमचा निर्णयाचे मात्र कौतुक नक्कीच करावेसे वाटते की गार्डनिंग करायचं मात्र तुम्ही सोडून न देता फुलझाडे लावण्याचा उत्तम सुवर्णमध्य साधलाय. @मंजूताई प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आणि तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार कि माझ्यासारख्या लेखनात रांगणाऱ्या बाळाला तुम्ही सर्व जुन्या जाणत्या कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या माबो च्या परिवारात सहज सामावून घेतलं. हीच कदाचित खासियत असावी माबोची कि इकडे कोणालाच कधी प्रत्यक्ष ओळख नसली तरी नवखेपणा जाणवत नाही एकदा का लॉग इन च्या दारातून आत आले की ह्या घरातील सर्व सदस्य एक संपूर्ण परिवार आहे हेच मला मनाला फार भावले.
माकडं खरंच खुप त्रासदायक आहेत
माकडं खरंच खुप त्रासदायक आहेत. आमच्याही बागेत नासधुस करतात. चिकु, पेरु, आंबे खातात. अगदी अननसही नेतात.