गृहिणींचे शत्रू

Submitted by सेन्साय on 13 February, 2017 - 09:22

आपल्या घरात अडगळीच्या जागी आढळणारा आणि ज्याला पाहून ई .. ऽऽ असे तोंडातून आल्याशिवाय राहात नाही असा प्राणी म्हणजे झुरळ. हे झुरळ एक महिना अन्नाशिवाय जगू शकते. झुरळाला कितीही मारले तरी पटकन ते मरत नाही, असा अनेकदा अनुभव येतो. त्यांच्या शरीराची रचनाच अशा प्रकारची केलेली असते. एकंदर ४ हजार जाती असलेल्या झुरळांच्या फक्त तीसच जाती माणसांच्या सानिध्यात असतात. भारतातली बहुतेक सगळी झुरळे अर्धा इंच लांबीची असली तरी अमेरिकेतली झुरळे त्यापेक्षा दुप्पट लांबीची असतात. झुरळे कुठल्याही वातावरणात चिकाटीने राहू शकत असली तरी त्यांना ऊबदार वातावरण सगळ्यात जास्त आवडते. रात्रीचा अंधार वाढायला लागला, की त्यावेळचे ४ - ५ तास झुरळे सगळ्यात जास्त काम करतात. त्यामुळेच मध्यरात्री तहान लागली म्हणून आपण पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आलो, की दिवसा गायब असलेली झुरळे आपल्याला ढिगाने दिसायला लागतात. या ४ - ५ तासांच्या लगबगीच्या कामामध्ये झुरळे त्यांना जवळपास आठवडाभर पुरेल, इतके अन्न फस्त करून टाकतात आणि ती पुन्हा आपल्या लपायच्या जागी हळूच जाऊन बसतात.

झुरळे अतिशय चिवट असतात. खूप कठीण परिस्थितीमध्येसुद्धा ती तग धरू शकतात. काही झुरळे तर महिनाभर टपालाच्या तिकिटाच्या मागे असलेल्या डिंकासारख्या पदार्थावरही जगू शकतात. काही झुरळे हवाबंद स्थितीत ऑक्‍सिजन विनाच सुमारे पाऊण तास जिवंत राहू शकतात. एका प्रयोगात झुरळांना पाण्यात अर्धा तास गुदमरल्यावरही ती मेली नव्हती. घातक किरणोत्सर्जनालाही झुरळे सहजासहजी बळी पडत नाहीत. माणसांच्या तुलनेत झुरळांमध्ये किरणांच्या हल्ल्याला सामोरे जायची ताकद सहा ते पंधरा पटींनी जास्त असते. माणूस आणि इतर असंख्य प्राणी यांचे डोके धडापासून वेगळे झाले, की ते जागीच मरतात. झुरळे मात्र त्यांचे मुंडके तुटले तरी जवळपास एक महिनाभर जगू शकतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे झुरळे नाकातोंडाने श्‍वास घेत नाहीत. याशिवाय आपले डोके आणि शरीर या गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या झाल्या तर आपल्या शरीरातला रक्तपुरवठा थांबून आपला रक्तदाब झपाट्याने घसरेल. तसेच आपल्या शरीरातल्या अवयवांना रक्‍तपुरवठ्यातून होणारा ऑक्‍सिजनचा पुरवठा थांबेल. त्याशिवाय डोके म्हणजेच पर्यायाने तोंड नसल्यामुळे आपण खाऊच शकणार नाही. झुरळाच्या शरीरात रक्तदाबाची संकल्पनाच नसते. त्यामुळे डोके उडाल्याने त्याला काही फरक पडत नाही. तसेच एकदा अन्न खाल्ले, की झुरळाला ते जवळपास महिनाभर पुरते. साहजिकच डोके उडाल्यावरसुद्धा ते कित्येक दिवस जगू शकते. ह्या प्राण्याच्या व्यतिरिक्त इतर उपद्रवी कीटक म्हणजे मुंग्या व कोळी. सर्व साधारणपणे कितीही आधुनिक घर असले तरी ह्या तिघांपासून काही सहसा सुटका होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत आपण आपले घर कीटकमुक्त कसे ठेवू शकतो..? घरातील कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आजकाल अनेक आधुनिक उपाययोजना उपलब्ध आहेत; परंतु कीटकांबाबत प्रतिबंधक उपाय योजना करणेच जास्त संयुक्तिक ठरते आणि या दृष्टीने अनेक उपाय योजना करण्यासारख्या आहेत. आपले घर कीटकमुक्त ठेवायचे असेल तर खालील गोष्टी अमलात आणणे आवश्यक आहे.

सर्वप्रथम स्वयंपाकघरातील स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वयंपाकघरातील सर्व कपाटे, कप्पे साफ करणे, खरकटे, भाजीपाल्यांची देठे बंद डब्यात जमा करणे, फरशी, भिंती, ओटा ओल्या फडक्याने साफ करणे, जळमटे काढणे, अन्नपदार्थ नीट झाकून ठेवणे, आठवडय़ातून एकदा फ्रिज साफ करणे इ. गोष्टी अंतर्भूत आहेत. स्वयंपाकघरातील भिंती, जमीन, ओटय़ाखालची कपाटे यांना टाइल्स लावल्यास तसेच स्वयंपाक करावयाच्या ओटय़ास ग्रॅनाइट अथवा चांगल्या प्रतीचा कोटा लावल्यास स्वच्छता चांगली ठेवता येते. रोजचा घरातील कचरा नियमितपणे काढणे, जमा करणे व त्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट लावणे.घरातील विशेषत: स्वयंपाकघर, बाथरूम, संडास येथील सर्व भेगा, भोके नीट बुजवणे तसेच खिडक्या, दारे यांना मोठय़ा फटी असल्यास त्या बंद करणे. घराबाहेरील भिंतीवरील सर्व भेगा, भगदाडे बंद करणे, गळती थांबवणे, ड्रेनेज पाइप्स जॉइंट नीट फिक्स करणे, भिंतीवरील शेवाळे, गवत किंवा वेडय़ावाकडय़ा वाढलेल्या फांद्या कापणे, कापलेल्या झाडांची योग्य विल्हेवाट लावणे, ड्रेनेजच्या वेंट पाइप्सला नायलॉनची जाळी बसवणे इ. देखभालीच्या गोष्टी अमलात आणणे. घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पॅकिंगची नीट तपासणी करणे- विशेषत: किराणा सामानाच्या पॅकिंगमधून अनेक प्रकारच्या छोटय़ा कीटकांचा घरात नकळत प्रवेश होतो. नियमितपणे व योग्य तऱ्हेने स्वच्छता ठेवल्यास घरामध्ये कीटक प्रतिबंधक वातावरण आपण निर्माण करू शकतो हे नि:संशय!.

अशा सर्व उपाययोजना करून देखील जर घरात कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर काय करावे ?
मान्यताप्राप्त नोंदणी (लाइसेंस) असणाऱ्या अनुभवी व संबंधित विषयाचे ज्ञान असणाऱ्या पेस्ट मॅनेजमेंट करणाऱ्या व्यावसायिक संस्था अथवा व्यक्तीशी संपर्क साधा, असेच सर्वसामान्य मत असू शकते. पण अशा रासायनिक पद्धतीमुळे पैसा व वेळ वाया जातो व घातक कीटकनाशकांमुळे घरातील व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे वेगळेच! म्हणूनच आज आपण घरातल्याच काही गोष्टी वापरून उत्तम रित्या व कमी खर्चात कशी पेस्ट मेनेजमेंट करू शकतो ते आता पाहूया.

विडालपर्णास (catnip) ,गवती चहा (Cymbopogon) ह्या विशिष्ट वनस्पती बाल्कनी तसेच खिडक्यांमध्ये कुंडीतून लावल्यास त्याचा दर्प झुरळांना तसेच डासानाही दूर ठेवण्यास मदत करतो. जंगली पुदिना (Ageratum conyzoides) हि वनस्पती अनेक प्रकारच्या कीटकांची प्रजनन क्षमता संपुष्टात आणते व त्यामुळे कालांतराने कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो. Clovite हे खास करून घोड्यांसाठी वापरण्यात येणारे जीवनसत्व कुठल्याही पशु वैद्यकीय दुकानात उपलब्ध असते आणि ह्याचा वापर झुरळांना पळवून लावण्यापेक्षा कायमसाठी संपवण्यासाठी अधिक परिणाम कारक दिसून येतो. बरणीच्या तोंडाशी झाकणाला ह्याची थोडी पावडर लावली असता झुरळे ती आवडीने खातात व दुसर्या दिवशी मरून जातात. ह्याच प्रकारे borax चा सुद्धा वापर करता येतो. कडूनिंब हि वनस्पती कीटकांच्या हार्मोन्स मध्ये बदल घडवून आणते व त्यांचे प्रजनन थांबवते. निंबोळीची पेंड जी शेतकी मालाच्या दुकानात उपलब्ध असते त्याचा वापर ह्यासाठी करतात. Diatomaceous Earth ह्याच्या वापराने मुंग्या हमखास मरतात. सूक्ष्म समुद्री शैवालापासून बनलेली हि पावडर कुठल्याही हार्डवेअर दुकानात उपलब्ध असते. महागडी कीटक नाशकांचे स्प्रे विकत घेण्यापेक्षा निव्वळ साबणाचे पाणी स्प्रे सारखे झुरळांच्या अंगावर फवारले असता एक मिनटात असे कीटक मरून जातात. अशा पद्धतीत ह्यां कीटकांचा त्वचेद्वारे चालणारा श्वासोश्वास थांबवला जातो. Maclura pomifera म्हणजेच hedge apple ह्या युरोपीय वनस्पतीच्या फळाचा वास अनेक कीटकांच्या तीव्र नावडीचा विषय असतो परिणामी ह्याच्या वापरानेही झुरळ व तत्सम कीटक दूर पळवून लावता येतात. हे फळ उपलब्ध नसले तरी आपले लिंबू सुद्धा हेच कार्य अतिशय प्रभावीपणे करते. मिंट, लवंग तेल कोरफड तसेच निलगिरी तेल अशा अनेक साधन सामुग्री आपल्या घरातच आपल्या शत्रुंचा नायनाट करायला उपलब्ध असतात.

चला तर मग लागूया कामाला..... आपले घर सुदर स्वच्छ करणे हीच प्रत्येकाने आपल्याकडून आपल्या घरातील गृहिणींसाठी भेट देवूया.

अम्बज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेख. खूप अुपयोगी!
धन्यवाद.

मी अेवढ्यातच Spot herbal cockroach gel वापरली. ती थोडीशी ठिकठिकाणी चिटकावी लागते. त्याने तीन चार दिवसात झुरळ गायब झाले.

धन्यवाद मानव पृथ्वीकर !! ...पुढे कधी पुन्हा त्रास उद्भवला तर जमल्यास नैसर्गिक उपाय वापरून नक्की पहा.

चांगली माहिती .
झुरळा एक फायदा पण असतो , अशी ही बनवाबनवी मध्ये दाखवलाय . Proud

अंबज्ञ नक्कीच.
हे हर्बल जेल सुरक्षित नसते का? त्यावर सेफ फॉर ह्युमन असे काहीसे लिहिले होते. वास वगैरे नाही अगदी चिमुटभर चिटकवावे लागते म्हणुन आणले.

काही महिन्यातच आम्ही नविन घरी राहयला जाअु, तिथे तुम्ही सांगितलेले सगळे अुपाय करायला (कुंड्यात रोपे/ गवती चहा लावणे) वाव आहे.

लवंग तेल / निलगिरी तेल घरी आहे. त्यांचा वापर नक्की कसा करावा?

महाग असतेच हो. करंगळीच्या पेरा अेवढ्या बाटलीला ३० / ३५ रुपये लवंग तेलाला.
पण यांचा स्प्रे मारायचा असतो? दोन थेंब जास्त झाले की झोंबतात.

घराची स्वच्छता या गृपमध्ये बरेच उपयुक्त धागे आहेत.
त्याच विभागातल्या घराची बाह्य व अंतर्गत स्वच्छता कशी ठेवावी या धाग्यावर बरेच उपायही दिलेले आहेत...

मी गोदरेज चे हर्बल पेस्ट कंट्रोल केले होते, कॉन्ट्रॅक्ट संपून ही अनेक महिने झाले पण अजूनी नव्याने झुरळे झाली नाहियेत.

बेसिकली झुरळ अन मुंग्याचा किचन मधील प्रादुर्भाव आपल्याच थोड्याश्या हलगर्जिपणामुळे होत असतो. सर्व खाद्यान्न नीट बंदोबस्त करून ठेवले तर ही मंडळी आपल्या पाहुणचाराने उपाशी राहून कंटाळून जाणारच Happy