४) गुप्तहेर बबन बोंडे - तेरा  बाप चोर है

Submitted by सखा on 2 January, 2017 - 01:44

(>>>अपेक्षे प्रमाणे तिचा तोल गेला आणि बबनने तिला अलगद catch केले. बबनचा जीव  वजनाने कळवळला पण ते त्याने चेहऱ्यावर दाखवले नाही. अर्थात हा अनेक वर्षांच्या ट्रेनिंग चा परिणाम. 
बबन ला पाहून ती मुलगी त्याच्या गळ्यात हात टाकून लटकेच लाजत म्हणाली <<<)

"हाय मी स्वप्न  तर पाहत नाहीये? चक्क आंतरराष्ट्रीय गुप्तहेर मायनस १०१ यांनी माझा कॅच घेतला."
"राष्ट्रीय सौंदर्य जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे मिस…"
"किती उदात्त  विचार आहेत तुमचे ...  बनचुकी .. मिस शीला बनचुकी नुकतीच मी इथे लागले आहे"
"फळं नेहमी झाडालाच लागतात"
"हं??"
"काही नाही असु देत"
तेव्हढ्यात इंटरकोम वाजला बबनने तिला उचललेल्या अवस्थेतच फोनचे स्पीकर बटन दाबले. 
मा लाईन वर होत्या  मा म्हणाल्या:
"मिस्टर बोंडे लगट संपली असतील ताबडतोब माझ्या खोलीत या हातातले काम सोडून आत्ता"
मां चा आवाज ऐकून बबनने  अक्षरशा हातातले काम धप्पकन सोडले. विव्हळणाऱ्या बनचुकीला सॉरी म्हणत बबन मां च्या वर्तुळाकार विशाल ऑफिस मध्ये प्रवेशता झाला.
आत मध्ये  मा आणि सोबत होता एजेंट -९९९. 
बबनचे आणि एजेंट -९९९ चे अजिबात जमत नाही हे मां ला चांगलेच माहिती होते परंतु आज जी केस त्या डिस्कस करणार होत्या त्या या दोघांच्या शिवाय कुणीच करू शकणार नाही हे मां ला चांगलेच  माहिती होते. बबन ला पाहून -९९९ ने तोंड वाकडे केले, मग बबन ने देखील केले. -९९९ जीभ बाहेर काढून दाखवली मग बबन ऐकतो काय त्याने कोंबड्या सारखा कुकुड्कू असा आवाज केला. -९९९ ने नाकात बोट घालत मग कुत्र्याचा आवाज काढून गुर गुर केली बबन सुध्धा भूक्णार येवढ्यात मां म्हणाल्या "इनफ stop it, मायनस १०१ आणि मायनस ९९९ तुम्हाला मी इथे बोलावले आहे याचे कारण म्हणजे तुम्ही दोघे माझे सर्वात कर्तबगार गुप्तहेर आहात आणि एका खास मिशन वर मी तुम्हाला पाठवित आहे. दोघांना…"
मां च्या अलिशान ऑफिसात चार भिंतीला लागून मोठे पडदे होते.  अचानक एका पडद्याच्या मागे सळसळ झाली . सगळे सावध झाले. 
मायनस १०१ ने अवांतर बोलत आहोत असे भासवत पडद्या जवळ जावून खसकन पडदा ओढला. तिथे कुणीच नव्हते  पण पडदा जोरात ओढल्या मुळे  पडद्याची लोखंडी दांडीने मात्र -९९९ च्या डोक्यावर टेंगुळ निर्माण केले. बबन आपल्या जागेवर येवून बसतोना बसतो तोच दुसर्या पडद्या मागे खसपस झाली या वेळी -९९९ टेंगुळ चोळत उठला आणि अवांतर बोलत जावून पडदा खसकन ओढला तिथेहि कुणीच नाही मात्र दुसर्या दांडीने पहिल्या दांडीची री ओढली. -९९९ मुकाट्याने दुसरे टेंगुळ चोळत परत जागेवर बसणार तोच तिसर्या पडद्या मागे खसपस झाली.   
-९९९ तिसरा पडदा ओढला तो  एक काळे मांजर खस्स्कन उडी मारून -९९९ च्या अंगावर आले.  ते मांजर भलतेच खुनशी निघाले त्याने -९९९ चे नाक धरले. -९९९ जोरात बोंबलू लागला परिस्थिती गंभीर आहे हे बघून बबन मदतीस धावला.त्याने नाक धरलेल्या मांजराचे शेपूट धरून ओढायला सुरवात केली.
शेवटी एकदाचे मांजराने -९९९ चे नाक सोडले आणि खिडकीतून उडी मारून पळून गेले.
नाकाला पट्टी लावून -९९९ जेव्हा परत खुर्चीवर येवून बसला तेव्हा -९९९ म्हणाला:
"मां हे मांजर?"
"हे माझं मांजर होतं"
"पण त्यांनी माझ्यावर हल्ला…"
"मी बघत होते कि आजही तुमच्या दोघांच्या बाहू मध्ये तेच टीम वर्क आहे का?
"तो क्या देखा आपने मां?"
"माझी निवड योग्य आहे" 
बबन आणि -९९९ च्या चेहऱ्यावर हास्याचे 'शोले' पसरले.
"तर मी काय म्हणत होते.."  
"मां तुम्ही एका मिशन बद्दल सांगत होता"
अचानक मागचा दरवाजा उघडला आणि हातात चहाची किटली असलेल्या बनचुकीने पोज घेत विचारले  मॅडम अजून चहा हवा आहे का?"
मा जरी नको  म्हणाल्या तरी बबनने मात्र बनचुकीला डोळा मारत चालेल असं सांगितलं  त्या मुळे  बनचुकीने कॅटवॉक  करत लाडीक पणे बबन च्या कपात चहा ओतला आणि म्हणाली.
"जपून खूप हॉट आहे"
"ते तर पाहतोच आहे" 
"आगीशी खेळायची सवय दिसते तुम्हाला".
"लहानपणापासून"
"अय्या खरंच?"
" हो माझे ड्याडी फायर ब्रिगेड मध्ये पोष्टमन होते."

-९९९ च्या कपात उकळता चहा ओतताना मात्र बनचुकी नेम चुकून त्याच्या पेंट वर नको तिथे ओतली बर ओतला तर ओतला चांगला दोन कप ओतला . झिरपायला वेळ लागल्याने साधारण पणे घटने नंतर वीस सेकंदाने -९९९ ने गुरा सारखे बोंबलत बनचुकीच्या कानफटात लावली. तशी बनचुकीने  त्याला उलट लगावली. दोघे एकमेकांच्या अंगावर तुटून पडले. -९९९ ने तिच्या झिंझ्या ओढताच  बनचुकीचे विग त्याच्या हातात आले आणि धक्काबुक्कीत दोन सफरचंद कुठून तरी खाली पडल्याचे सर्वाना स्पष्ट दिसले.
"ओह माय गॉड शी इज अ पुरुष हं." मां जोरात ओरडल्या. बनचुकी उत्कृष्ट मुष्टियोद्धा होता हे मानले पाहिजे टायसन लाजेल या गतीने त्याने -९९९  ला नॉक आवूट केले. आता त्याने आपला मोर्चा  -१०१ कडे वळवला दोघांनी एकमेकांना लेफ्ट राईट ठोसे मारले.  मारामारी करताना चुकून बनचुकी चा पाय एका सफरचंदा वर पडला आणि पाय घसरून तो स्लो मोशन मध्ये डोक्यावर पडला आणि तिथेच बेशुध्द झाला.  
थोड्या वेळातच पोलिस येवून बनचुकी आणि -९९९ ला स्ट्रेचरवर टाकून घेवून गेले.  जाताना बनचुकीच्या हातावरचा  टॅटू  "तेरा  बाप चोर है" हा बबन आणि मां ने स्पष्ट वाचला. 
फोरेन्सिकच्या लोकांनी पुरावा म्हणून दोन्ही सफरचंदे आणि विग जप्त केली हे वेगळे सांगायला नको.
मां चे ऑफिस काही काळासाठी सील झाल्या मुळे बबन सोबतची पुढची मिटिंग मां नी भरगर्दीच्या मीना बाजारात चालताना घ्यायचे ठरवले. वाकिंग मिटिंग मुळे व्यायाम आणि बोलणे दोन्ही होते असे नुकतेच त्या एका स्विस वर्कशॉप मध्ये शिकल्या होत्या. बबनने मां ला आवडतात म्हणून चालताना खाण्यासाठी केळी आणली होती त्या बघून मां खुष झाल्या. त्या गर्दीच्या रस्त्यावर साधारणपणे चार चार केळी खावून आणि मागे सालावर दोनचार माणसे परस्पर घसरून पडल्यावर बबन म्हणाला: 
"हा नक्कीच परकीय हेर असला पाहिजे"
ट्रकचा कर्कश्य पोंग्यामुळे मां न निट ऐकू आले नाही त्या ओरडून म्हणाल्या. 
"नुकत्याच हाती आलेल्या…"  
पण त्यांचे  बोलणे  रिक्षाच्या  पिक पिक  पिय्या पकाक का पिय्या  पोंग्यामुळे बबनला अजिबात ऐकू आले नाही.
त्या पुढे मां आणि बबन ला एकमेकांचे बोलणे जवळपास दहा मिनिटे रेल्वे ची धडधड, लग्नाची मिरवणूक, रस्ता खोदकाम, सेलफोन वर मोठ्यांनी बोलणारे पादचारी, वाहनांचे होर्न, मोर्चा, सायरन चे आवाज या मुळे अजिबात ऐकू आले नाही. शेवटी मां आणि बबनने बाजू बाजूला उभे राहून एकमेकांना sms करून मिटिंग सुरु केली.
थोडक्यात काय तर: "-९९९ जायबंदी झाल्याने -101 बबनने एकट्याने चोरलेला अणुबॉम्ब परत मिळवण्यासाठी प्राणपणाला लावावे. मिशन साठी लागणारी खास वेपन्स त्याला उद्या मिळतील तरी त्याने गुप्तहेर संशोधन विभागात उद्या दहा वाजता मां ला भेटावे. येताना आजच्या सारखीच केळी आणण्यास विसरू नये."    
ताजी केळी  खावून झाल्यावर मां बबन ला घेवून एका जुन्या चर्चच्या खाली तळघरा मध्ये मोठ्या बेमालूमपणे  बनवलेल्या lab मध्ये घेवून आल्या. विविध प्रकारची आधुनिक शस्त्रे बनविण्याचे काम तिथे चालू होते. lab चे प्रमुख  डॉ.सक्षम यांनी त्यांचे स्वागत केले. बबनला त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरी आणि प्रियांका सोबतच्या अफ़ेअर बद्दल मोठ्या जिव्हाळयाने चौकशी केली. बबनने देखील पुढच्या ट्रीपला प्रियांकाला सोबत त्यांच्या घरी येवून त्यांच्या कुटुंबीयासह जेवण घेण्याचे वचन दिले.
मग डॉक्टर त्यांना घेवून आतील दालना मध्ये गेले त्यांनी एक सेलफोन बबनच्या हातात दिला या फोनची खुबी अशी होती कि यात शेव्हर देखील होते. 
ते पुढे म्हणाले कि अरे हो अजून एक गम्मत दाखवतो मग त्यांनी त्या फोन मध्ये आपली शिळ रेकॉर्ड केली आणि तो फोन लांब फेकला आणि दोनदा तीच शीळ  वाजवली तसा तो फोन एखाद्या बॉम्ब सारखा फुटून सर्वत्र धूर झाला.         
पुढच्या टेबलवर एक छानसा गॉगल होता बबन ने घालून पहिला आणि काढणार तोच डॉक्टर म्हणाले उजव्या काडीला फक्त बोटाच्या चिमटीत धर आणि काय आश्चर्य बबन ला भिंतीच्या पलीकडचे आरपार दिसू लागले. डॉक्टर म्हणाले बॉडी हिट सेन्सिटिव्ह क्ष-ray गॉगल. या  दिसायला डोकेदुखीच्या गोळ्या आहेत परंतु पाण्यात टाकताच हजारोचा जमाव काबूत आणण्या इतका  अश्रू धूर होतो. शेवटी डॉक्टरनी एक टूथपिक दाखवली ते म्हणाले कि हि टूथपिक तुझ्या बोटाचे ठसे ओळखण्या साठी प्रोग्राम केली आहे. हि तू कोणाला टोचल्यास ती व्यक्ती दहातास बेशुध्द पडेल. बी केअर फुल. बबन म्हणाला सर आय मस्ट से आय एम इम्प्रेस्ड!
(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Oh my god! Simply great...मांजराचा प्रसंग फार फार आवडला, अगदी दिसत होता घडतांना Biggrin

Back to top