`ऑब्झर्व्हर इफेक्ट'विषयी तुम्ही ऐकले असेल. प्रयोगकर्त्याच्या निरीक्षण करण्याच्या कृतीचा परिणाम त्या प्रयोगावरच आणि पर्यायाने त्या निरीक्षणांवरच होतो, असा काहीसा हा इफेक्ट आहे. (बर्याचदा लोक ह्यास `हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल'शी कन्फ्युज करतात, पण तो वेगळा विषय आहे.) `थँक यू फॉर बाँबिंग' ह्या बार्बरा एडरच्या ऑस्ट्रियन चित्रपटातली पात्रेही अशीच `स्टोरी' शोधणे आणि स्वतःच `स्टोरी' होणे, ह्यातल्या अस्पष्ट रेषेवर तारेवरची कसरत करत दोलायमान अवस्थेत कधी इकडे तर कधी तिकडे अशी हिंदकळत जातात, आणि त्यांच्याबरोबरच आपल्यालाही धक्के बसत राहतात. स्वतःच्या ध्येयापासून अजिबात कॅमेरा ढळू न देणारा हा चित्रपट प्रसंगी अत्यंत डार्क वाटू शकतो, पण उत्तम उपरोधही ह्यात ठासून भरलेला आहे. कॅमेरा आणि फ्रेम्सचा उत्तम वावर, बॅकग्राऊंडला असलेल्या स्थळांचा कथेत अत्यंत कुशल वापर, व अनिष्टसूचक संगीताच्या तुकड्यांची प्लेसमेंट, ही उत्तम कथेबरोबरच ह्या चित्रपटाची बलस्थाने आहेत.
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल २०१७ ची ओपनिंग फिल्म होती `थँक यू फॉर बाँबिंग'. मी अशा फेस्टिवलला पहिल्यांदाच जात असल्याने पुढ्यात काय वाढून ठेवले आहे, असा काहीसा विचार मनात होता. त्याला अनुसरुनच साडेसातची एसटी - चुकलो, फिल्म सात वाजताच सुरू झाली. नुसता यंत्रांचाच आवाज सुरू झाला असे नाही, तर खरीखुरी चालूच झाली. नशिबाने मी उद्घाटन सोहळ्याला हजर असल्याने व इतरही बरेच लोक आधी येऊन बसत असल्याने फार त्रास झाला नाही. चित्रपटाच्या पहिल्याच दृश्याने पुढे काय वाढून ठेवले आहे, ह्याची नांदी झाली. पत्रकारांना युद्धभूमीवर काय काय सोसावे लागते, ह्यावर हा एक सरधोपट चित्रपट होऊ शकला असता, पण त्याऐवजी हा चित्रपट एकंदरीतच पत्रकारितेच्या कारखान्याचा वेध घेतो. अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्य व इतर परिस्थिती ह्यांचा आढावा घ्यायला गेलेल्या तीन टीव्ही पत्रकारांची ही कथा आहे. काही दशकांतील युद्धाचा अनुभव असलेला व त्या आठवणींनी ग्रस्त असलेला वयस्क ऑस्ट्रियन रिपोर्टर, तरूण असलेली व स्टोरीसाठी काहीही करायची जिद्द असलेली अमेरिकन मुलगी, आणि प्रौढ असलेला पण वागण्याने अजून अडनीडाच असलेला युद्धाच्या शोधातील अमेरिकन जर्नालिस्ट, ह्या तिघांचीही पाठ चित्रपट शेवटपर्यंत सोडत नाही. ह्या तिघांच्या गोष्टी जिथे एकत्र येतात, ते शेवटचे दृश्य तर जबरदस्त आहे.
ऑस्ट्रियन रिपोर्टर साहेब इतकी युद्धे पाहून शिणले आहेत, थकले आहेत, तरीही संपादकाच्या सांगण्यावरून, कुठल्यातरी आंतरस्थ हेतूने, अफगाणिस्तानला निघाले आहेत. चित्रपटाचा घटनाक्रम कुठल्या काळातील आहे, हे स्पष्ट केलेले नाही, परंतु २०१२ मधल्या अमेरिकन सैनिकांनी कुराण जाळण्याच्या घटनेचा पडदा बॅकड्रॉप म्हणून आहे, असे म्हणायला हरकत नाही. ह्या घटनेचा वेध घेण्याच्या प्रवासाला निघताना विमानतळावर ह्या रिपोर्टरचा व्यापक भूतकाळ अचानक त्याला पुन्हा ग्रासून टाकायला आला आहे. किंबहुना आला आहे का? की, तो फक्त एक मनाचा खेळ आहे? हेच ठरत नाही. त्यावर तो रिपोर्टर काय कृती करतो? त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळते का? बरे, मिळाले तर त्याच्या बॉसेसची त्यावर काय प्रतिक्रिया असते? हे सगळे ह्या गोष्टीतून पडद्यावरच पाहणे योग्य राहील. गोष्टीत सर्वात भारी काय वाटलं असेल, तर ते म्हणजे `विमानतळ' ही एक जागा न राहता ती त्या गोष्टीतले महत्वाचे पात्र बनून जाते. विमानतळाच्या वास्तुकलेचा इतका सुंदर वापर करून घ्यायचा, म्हणजे दिग्दर्शिकेने नक्की तासनतास विमानतळावर चुकलेल्या विमानांना शिव्या मोजत घालवलेले असणार! ह्या विनोदामध्ये एक सस्पेन्स मिक्स करून थ्रिलिंग स्टोरी बनवली, हे वादातीत यश आहे. ह्याच एकाच कथेवर एक संपूर्ण चित्रपटदेखील बनवता येऊ शकेल, असे वाटले.
पुढची गोष्ट अमेरिकन तरुणीची आहे. ही कुराण जाळण्याच्या घटनेशी प्रत्यक्ष निगडित आहे. बेसवर स्टोरी येईपर्यंत वेळ घालवण्यासाठी ही मुलगी झुंबा नाच करत असते, पण तिची ती दबलेली शक्ती `स्टोरी'चा जरा सुगावा लागताच `केला पोत जरि बळेचि खालें | ज्वाळा तरी ते वरती उफाळें ' अशी उफाळून वर येते. तिची तृष्णा झुंबा क्लासमधल्या इतर मुलींपेक्षा बरीच वरची आहे. कुराण जाळण्याचा अपराध कोणी केला, ह्याविषयी अमेरिकन जनरल्स काहीही बोलायला तयार नाहीत, व मीडिया बॉसेसबरोबर संगनमत करून ते फक्त साधारण विधाने करत आहेत, हे लक्षात आल्यावर ती नेटवर्किंग करून प्रसंगी बॉसेसना फाट्यावर मारून ज्या पद्धतीने स्टोरी शोधते, ते मस्तच आहे. ह्या कथेचा शेवट मात्र बघायला आणि कल्पना करायला अत्यंत विदारक असा आहे, पण तुम्ही जर मनाला दगड बनवून शेवटपर्यंत टिकून राहिलात, तर कथेचा शेवटचा सीन दिग्दर्शिकेचा उपरोध किती उच्च दर्जाचा आहे, हे दाखवून जातो. हा शेवट धक्कादायक आहे हे खरेच, पण अजिबात न बिचकणारा कॅमेरा दिग्दर्शिकेचा तिने केलेल्या टीकेवर विश्वास दाखवतो. ताकद आणि वर्चस्व ही काय चीज असू शकते, विशेषतः अफगाणिस्तानासारख्या युद्धाच्या क्षेत्रात, हे तिने भयंकर थंडपणे दाखवले आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या `व्हिस्की टँगो फॉक्सट्रॉट'पेक्षा खूपच वेगळे असे हे स्त्रीचे चित्रण आहे. अफगाणिस्तानच्या ह्या गोष्टीत आलेल्या फ्रेम्सदेखील खूप सुंदर वाटतात.
शेवटची गोष्ट आहे ती बेदरकार प्रौढ जर्नालिस्टची. हे महाशय कधीकाळी चांगले पत्रकार असावेत. आयुष्यातली क्षणभंगुरता जाणवल्याने पार्टीबिर्टी भरपूर करत असावेत. पण कुराण जाळण्याच्या घटनेनंतर जनता, सैन्य, आणि पत्रकार रोखल्या श्वासाने पलटवाराची अपेक्षा करत आहेत, पण तो काही अजून येत नाही. त्यामुळे हा कंटाळतो, आणि स्वतःच `स्टोरी' बनायला जाऊन अफगाणिस्तानच्या वाळवंटात सापडतो. मग शेवटी त्याच्या बायकोशी होणार्या डिव्होर्सच्या पार्श्वभूमीवर त्याच्या ड्रायव्हरबरोबरची त्याची कॉमिकल भांडणे व संवाद, पुढे जाऊन होणारी ह्या एक्झिस्टंशिअल कॉमेडीची ट्रॅजेडी ... पुढे काय होते? त्याला व इतर पत्रकारांना गोष्ट मिळते का? कोण जगते? कोण मरते? हे सगळे हा चित्रपट पाहून अनुभवायलाच हवे. ह्याही गोष्टीत अफगाणिस्तानचे विलक्षण चित्रण आहे, हे सांगणे नलगे.
वरच्या तीनही गोष्टी ह्या एक्झिस्टंशिअल फिलॉसॉफीच्या (अस्तित्ववादी तत्वज्ञान?) माझ्या आवडीच्या तीन लेखकांच्या निदर्शक आहेत, असे वाटले. पहिली गोष्ट जीआं पॉल सार्त्रच्या कळपातली वाटते. दुसरी आल्बेर कामूच्या स्वप्नातली, तर तिसरी काफ्काच्या डायरीत लिहून ठेवल्यासारखी वाटते. पण ह्या तिन्ही गोष्टींना जुळवून ठेवणारे धागे विलक्षण आहेत. गोष्ट सांगण्याचे तंत्र ह्यात खूपच पुढारलेले आहे. सर्व कलाकारांची कामे चोख होतातच. पहिल्या गोष्टीत अर्विन स्टाईनहाऊसरने ताण जोपासण्याचे काम खास केले आहे. दुसर्यातल्या मेनन काहलने तरुणीची अँबिशन आणि एक्सप्रेशन्स जोरदार वठवली आहेत. तिसर्या राफाएल फॉन बर्गनने त्याची फ्रस्ट्रेशन्स आणि राग मस्त दाखवला आहे. त्याचा शर्ट फाडण्याचा सीन तर खासच आहे. त्याचबरोबर ह्या सिनेमाचे एडिटींग खास नमूद करावेसे वाटते. सिनेमा आटोपशीर ठेवण्याचे महत्वाचे काम तिथे पार पाडले गेले आहे.
वर म्हटल्याप्रमाणे पत्रकारितेच्या कारखान्यावर टाकलेला हा एक काळ्या विनोदाने नटलेला जळजळीत कटाक्ष आहे. नावातच `थँक यू फॉर स्मोकिंग' सारख्या औपरोधिक सिनेमाला सलाम ठोकणारा हा विचारप्रवण सिनेमा विलक्षण गोष्ट सांगून २४ तास आजूबाजूला चाललेल्या माध्यमांच्या कल्लोळावर अचूक भाष्य करतो, आणि ह्यातच दिग्दर्शिकेचे सारे यश सामावलेले आहे.
थँक यू फॉर रायटिंग (धिस)
थँक यू फॉर रायटिंग (धिस)
मस्तच रिव्यू.
मस्तच रिव्यू.
छान रीव्ह्यु
छान रीव्ह्यु
मस्त परिचय.. सिनेमाची कथा
मस्त परिचय.. सिनेमाची कथा उलगडू न देता त्यातील सौंदर्यस्थळे टिपणे अवघड असते. ते छान जमलंय!
वा. मस्त परिचय.
वा. मस्त परिचय.
सुंदर परिचय. आता मिळवून
सुंदर परिचय. आता मिळवून बघायला हवा.
एकदम मस्त लिहीलं आहेस.
एकदम मस्त लिहीलं आहेस.
थँक्स फॉर कमेंटींग एव्हरीवन!
थँक्स फॉर कमेंटींग एव्हरीवन!
जिज्ञासा, स्पेशल थँक्स. स्टोरीटेलिंग हे दिग्दर्शकाचे काम आहे, ते परिचय करून देणार्याने करू नये, असे मला वाटते, व त्यासाठी माझा प्रयत्न असतो.
मस्त लिहिलंयस. :)
मस्त लिहिलंयस.
सुंदर लिहिलंय.
सुंदर लिहिलंय.
सुंदर परिचय, पहायला हवा आता.
सुंदर परिचय, पहायला हवा आता.
मस्त लिहिल आहेस.
मस्त लिहिल आहेस.
>>. सिनेमाची कथा उलगडू न देता त्यातील सौंदर्यस्थळे टिपणे अवघड असते. ते छान जमलंय!>> +१
ट्रेलर बघितलं आणि विमानतळाचा वापर जो काही दिसला तो खूपच आवडला. मूव्हिन्ग वॉकवे / कन्व्हेअर बेल्ट वर आधी अंतर ठेवुन मग अचानक चेहेर्यावरचे हावभाव बदलून ब्रिस्कली चालायला सुरुवात. इमिग्रेशन (?)ची लाईन... त्यात परत अंतर. काय आणि का होतय हे अर्थात समजलं नाही, पण काही तरी भारी असेल असं वाटलं.
अपडेट: ट्रेलर बघून विषय आणि त्यावर लेखकाची साधारण कशी भूमिका असेल (हे तू लिहिलं नाहीयेस त्याचा आदर ठेवून इथे नक्की काय ते लिहित नाही) याचा ढोबळ अंदाज येतो. म्हणजे कोणाच्या बाजुने फिल्म असेल आणि कोणाला आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं असेल ते कळतं. वरची ओळख वाचून ते धूसर जाणवलं तरी कळत नाही. मला ही तुझी ओळख जास्त आवड्ली.
पण ट्रेलर जास्त उत्तेजित करतय.. प्रेक्षक जास्त येण्यासाठी वापरलेली क्लुप्ती असावी.
छानच !
छानच !
पिफच्या माझ्या दोन्ही
पिफच्या माझ्या दोन्ही अनुभवांमध्ये मला उद्घाटनाचे चित्रपट बाकीच्या चित्रपटांपेक्षा फिके वाटले होते. हा रिव्ह्यू मस्तच आहे. कदाचित यंदा तसं वाटलं नसतं.
चांगला सिनेपरिचय !
चांगला सिनेपरिचय !
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
पराग, पुढची परीक्षणे वाचून कदाचित तसेच काही वाटूही शकेल. बट धिस वॉज वन ऑफ द बेटर वन्स.
जरा डीप रिव्यू आहे. पिक्चर
जरा डीप रिव्यू आहे. पिक्चर पाहून लिहीतो. कामू वगैरेंचा सदर्भ जरा जड आहे, बाकी परिचय आवडला.
सुंदर परिचय, पहायला हवा आता.
सुंदर परिचय, पहायला हवा आता. >> +1
Kuthe baghata yeil?
मस्तच लिहिलंंय! आवडलंं.
मस्तच लिहिलंंय! आवडलंं.
(ट्रेलर बघायची आयडिया एकदम आवडलेली आहे.)