एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती आपण लठ्ठ आहोत म्हणून आधीपासूनच आहाराविषयी जागरूक असतात. जिम मध्ये जाणाऱ्या आणि शारीरिक हालचाल करण्याऱ्या कित्येक व्यक्ती लठ्ठच असतात. त्यामुळे लठ्ठ असूनसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि आहार घेणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं कळलं की आपोआप वजन कमी करायचा सल्ला मिळतो. पण जी व्यक्ती बारीक आहे, आणि हृदयरोगी आहे किंवा जिला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत, त्यांना तोच सल्ला दिला जात नाही. त्यांना आहार बदलायचा सल्ला मिळतो. अर्थात, या सगळ्या व्याधी फक्त लठ्ठ व्यक्तींना होतात हे सतत केले जाणारे विधान फारसे बरोबर नाही. लठ्ठपणा या व्याधींना आमंत्रण देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्या लठ्ठ व्यक्ती याला बळी पडत नाहीत आणि अचानक हृदयविकार होणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येत नाही.
प्रेग्नन्सीमध्ये मला गर्भधारणेत होणारा (आणि नंतर ताब्यात येणारा) डायबेटीस झाला. माझ्या डॉक्टरनी मला व्यायाम आणि आहार या दोन्हीच्या मदतीने तो ताब्यात ठेवायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे साडे आठ महिन्यापर्यंत मी रोज ३० मिनटं पोहायचे. आणि साखर, फळं आणि कर्बोदके कमी करून मी साखर ताब्यात ठेवली. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की जर ही व्याधी कायमची पदरात पडली तर आहार किती नियमित ठेवावा लागेल. आणि माझ्या वडिलांना टाईप १ डायबेटीस असल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणून वजन कमी करण्याचा आत्ताचा प्रवास हा फारच अभ्यासपूर्ण होता.
नवव्या महिन्यापासूनच मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली. पण सतत डाएट करूनही आणि चालणे वगैरे व्यायाम करूनही काही केल्या माझं वजन कमी होत नव्हतं. म्हणून मी शरीरातील मेद साठवणाऱ्या आणि वितळवणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करायचं ठरवलं. तसं करायला लागल्यावर मला कित्येक साक्षात्कार झाले. आणि कुठल्याही जिम ची मेंबर न होता किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता मी हा प्रवास करू शकले. या मागे दोन कारणं आहेत:
१. डाएटबद्दल डाएटिशियन्स मध्येच असलेले काही समज जे आता शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे ठरलेले आहेत
२. वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व
वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.
इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.
फक्त खाण्याचा विचार केला तर शरीराच्या दोन अवस्था होतात. एक म्हणजे पोट भरलेली अवस्था आणि उपाशी अवस्था. इन्सुलिन हे मेजवानीचे संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे दुष्काळाचे संप्रेरक आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते सीसॉ सारखे असते. याचा अर्थ जेव्हा शरीरात कर्बोदकांचा प्रवेश होऊन इन्सुलिन वर जाते, तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होऊ शकत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जाऊ शकत नाही. जेव्हा खाल्लेलं अन्न पचवून इन्सुलिन चे प्रमाण कमी होते आणि शरीरात काही काळ दुष्काळ तयार होतो, तेव्हाच ग्लुकागॉन त्याचे काम करून चरबी वापरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इन्सुलिन वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा दिवसातील काही भाग उपाशी राहिलं पाहिजे.
कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही.
दर दोन तासांनी खाणं ही डाएट स्ट्रॅटेजी नापास होते यावर हल्ली बरंच संशोधन झालेलं आहे. आणि यातूनच इंटरमिटंट फास्टिंग हे हाय फाय नाव असलेलं पण भारतीयांना परिचित डाएट उदयास येत आहे. यात शरीराला रोज (किंवा आठवड्यातून काही दिवस) १६ ते २० तासांचे संपूर्ण लंघन देतात. म्हणजे दिवसभरासाठी ठरवलेली कर्बोदके आणि इतर घटक ४-८ तासात खाऊन उरलेले सगळे तास फक्त पाणी, कोरा चहा किंवा कोरी कॉफी पिणे. यामुळे शरीरात ग्लुकागॉन तयार होण्याची स्थिती तयार होते आणि फॅटचे विघटन होते. ही पद्धती आधी अवघड वाटली तरी एकदा सवय झाल्यावर कुठल्याही वातावरणात न मोडता वापरता येते. लंघन केल्यामुळे झोपेत सुधारणा होते (सुधारणा याचा अर्थ अतिझोपचे प्रमाण कमी होते). आणि मुख्य म्हणजे दोन वेळा पोटभर खाता येते. इंटरमिटंट फास्टिंग लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक आठवड्यातील दोन दिवस ५०० कॅलरीज खातात आणि इतर दिवशी तीन वेळा जेवतात (फाईव्ह टू डाएट), माझ्या सारखे काही १६ तासाचा उपास करतात (ब्रेकफास्ट किंवा डिनर न घेता).
या जोडीला जर (फास्टिंग स्टेट मध्ये) ४० मिनिटापर्यंत व्यायाम केला तर थोडे जास्त वजन कमी होते. पण ४० मिनटं व्यायाम करून जर डाएट केले नाही तर मात्र वजन कमी होत नाही (आणि कधी कधी वाढते). आठवडाभर असे डाएट केले आणि रविवारी डाएट वरून सुट्टी घेतली की पुढच्या आठवड्यासाठी आपण पुन्हा सज्ज होतो. ही सुट्टीदेखील गरजेची आहे. कारण आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक कधी कधी बरीचशी मनातच असते. त्यामुळे मनाला उगीच सारखं रागवून गप्प ठेवण्यात काही अर्थ नाही.
वजन कमी होणे हा लंघनाचा सगळ्यात कमी महत्वाचा फायदा आहे. मध्यम वयात होणाऱ्या डायबेटीसची (टाईप २) सुरुवात इन्सुलिन रेसिस्टन्सनी होते. जेव्हा अन्नातल्या ग्लुकोजयुक्त पदार्थांचे प्रमाण सतत जास्त असते, तेव्हा शरीरात सतत इन्सुलिन स्त्रवत राहते. आणि शरीरातील पेशींना अति इन्सुलिन असण्याची सवय होते. आणि त्यांची इन्सुलिन वापरण्याची, परिणामी ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्सुलिन असूनही रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाढायला लागते. लंघन केल्यानी किंवा कर्बोदके कमी केल्यानी पेशींची ही क्षमता पुनः पहिल्यासारखी होऊ शकते. थोडक्यात टाईप २ डायबेटीस योग्य आहारानी घालवता येतो (यासाठी दुसरी लिंक बघा).
लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते (यासाठी तिसरी लिंक बघा). गरजेपेक्षा सरासरी ३० टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील!
या विषयावरचे संशोधकांचे काही टॉक्स आणि लिंक्स मी इथे देत आहे.
१. पीटर आटिया (https://www.youtube.com/watch?v=UMhLBPPtlrY)
२.सारा हॉलबर्ग (https://www.youtube.com/watch?v=da1vvigy5tQ)
३. सान्ड्रीन थुरेट (https://www.youtube.com/watch?v=B_tjKYvEziI)
आलेल्या कॉमेंट्स मधून इथे काही मुद्दे अजून मांडावेसे वाटले
१. डायबेटिक लोकांनी फास्टिंग करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. पण कार्ब्स कमी करायला काही हरकत नाही.
२. बाळाला पाजवत असताना असली कुठलीही डाएट करू नयेत. जेव्हा बाळ इतर अन्नपदार्थ खाऊ लागेल तेव्हाच आईने आपल्या वजनाची चिंता करावी.
३. ज्यांना १६ तास न खाण्याची भीती वाटते त्यांनी प्रत्येक जेवणातले कार्ब्स कमी करून त्याची जागा सॅलेड्स आणि प्रोटीननी भरावी. जसं की २ फुलके आणि भात खाण्याऐवजी २ फुलके आणि एक पूर्ण वाटी डाळ आणि १ पूर्ण वाटी सॅलेड.
४. जेवणाच्या ताटाचा अर्धा भाग फायबरनी भरायचा (कोशिंबीर, सॅलेड) उरलेला २५% भाग प्रोटीन ने (नॉनव्हेज/डाळ/बीन्स/पनीर) आणि उरलेल्या २५% भागात कार्ब्स असावेत.
५. हे डाएट करताना पाण्याचे प्रमाण वाढवले तर डाएट ची सवय लवकर होते. आणि कधी कधी तहानेच सिग्नल भूक लागलीये असा घेतला जातो. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यायले की भूक भूक होत नाही.
६. मी प्रोफेशनल डाएटिशिअन नाही आणि डॉक्टरदेखील नाही. हा लेख फक्त शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियांची माहिती देण्यासाठी आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो खाली दिलेल्या प्रोफेशनल डॉक्टर्सच्या संशोधनावर आधारित आहे. नुकतीच टाइम मॅगेझीनमध्ये देखील यावर चर्चा झालेली आहे ती मी इथे देते आहे.
http://time.com/4025410/meals-weight-loss/?xid=time_socialflow_facebook
माझे लेखन वाचण्यापेक्षा वाचकांनी या सर्व लिंक्स बघाव्यात. फास्टिंग बद्दल इंटरनेट आणि युट्युबवर खूप उलट सुलट माहिती दिली जाते. त्या प्रत्येक माहितीवर मी मत व्यक्त करू शकत नाही. पण मी दिलेले हे टॉक्स अधिकृत माहिती म्हणून वापरता येण्याच्या दर्जाचे आहेत.
चक्कर येण्याचे प्रमाण वाढले
चक्कर येण्याचे प्रमाण वाढले म्हणजे आधी पण कमी प्रमाणात यायच्या का?
नाहि, आधी नवत्या,
नाहि, आधी नवत्या,
डायट सुरु झाल्यवर आठेक दिवसात सूक्ष्म जाणवायचे, नंतर वीस दिवसांनी प्रमाण वाढले खुप
अशी शुगर कमी होणार्या रोगाचे
अशी शुगर कमी होणार्या रोगाचे नाव विसरलो. असे फक्त ५ ते १० टक्के लोकांना होते असे वाचले आहे. ( त्याच पुस्तकामध्ये हे डिस्क्लेमर आहे) त्यामुळे IF हे त्यांना उपयोगी नाही, हे खरे आहे. कदाचित नानाकळा, त्या १० टक्के मध्ये येतात. हे सर्व करण्याआधी फिजिशियनला विचारावे असे माझेही मत आहे.
पण हे फालतू फॅड आहे, हे नानाकळा ह्यांच्या डॉक्टरचे मत मात्र मला मान्य नाही.
हे फालतू फॅड ----- म्हणजे मी
हे फालतू फॅड ----- म्हणजे मी करत होतो माझ्या मनाने ते डायेट... काहीबाही ऐकून स्वतःला वाटेल तसे प्लान करणे, नंतर त्यात बदल करत जाणे, सेट केलेला प्लान कन्सिस्टन्टली फॉलो न करणे किंवा भलतेच अनावश्यक - अपायकारक उद्योग करणे हे चुकीचे असे डॉक्टरचे मत.
मी असेल ५-१० टक्क्यांमधे पण इतर कोणीही कितीही नॉर्मल असला तरी आपल्या फिजिशियनचा सल्ला घ्यावाच अशी मी सुचवणी करतो. वय, वजन, मेटाबॉलिजम, कोणत्याही बदलास रिअॅक्ट व्हायची शरिराची पद्धत व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते. सो बी कॉशस...
ज्यांना हे लंघन करुन फायदा झालाय त्यांचे मत मी अमान्य करत नाहीच. त्यांचे वाचून इन्स्पायर होणार्यांनी फक्त व्यक्ती तितक्या प्रकृती एवढे ध्यानात ठेवलेले बरे असे वाटते... ह्यात मी कोणतेही डिस्करेजमेंट करत नसून जे काही कराल ते समजून उमजून करावे एवढेच म्हणणे आहे...
चहा, बिना साखरेची पेये, कॉफी
चहा, बिना साखरेची पेये, कॉफी वगैरे सगळे अलाउड आहे.>>
तसाही उपासाला चहा 'चालतोच'
नानाकळा, जोवर कोणी मला माझ्या नावाने आणि स्वतःच्या सही शिक्क्यासकट एखादी गोष्ट लिहून देत नाही तोवर कोणताही सल्ला हा disclaimer सकटच वाचावा असं मला वाटतं.
शिवाय अचानक एके दिवशी उठून १६-१६ तासांचे उपास करू नयेत. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता अनेकपटीने वाढते. मला वाटतं आधीच्या पानांवर कुठेतरी रार ने ह्याविषयी एक चांगली पोस्ट लिहिली आहे.
मला माझ्या फिजिशियनने
मला माझ्या फिजिशियनने (डायटेशियनने नव्हे ) १८०० कॅलरीज घ्याला सान्गितले आहे त्याचे कारण माझे बॉडी वेट ९७ किलो आहे. एवढे बॉडी वेटच्या शरीराच्या सर्व सिस्टीम मेन्टेन करण्यासाठी किमान १८०० कॅल ची गरज असते . त्यामुळे तेवढ्या कोणत्याही स्थितीत घेतल्याच पाहेजेत अन्यथा शरीर यण्त्र व्यवस्थित चालनार नाही. या १८०० कॅल मध्ये आंबे , आइसक्रीम भात , शेण्गदाने सर्व खाता येते पण कॅलरीजचे आउटर लिमिट साण्भाळून . बादवे १०० ग्रॅम शेंगदाण्याचे ६०० कॅल होतात म्हणजे दिवसाच्या टोटल जेवणाचे ३३ टक्के इक्विव्हॅल न्स.... ९७ किलो पेक्षा ज्यांचे वजन कमी आहे त्याना तर आणखी कमी आहार घ्यावा लागेल म्हणजे समजा एखादा/दी ६० कि आदर्श वजना ऐबजी ७० कि असेल तर १४००- १५०० कॅल सुद्धा पुरतील . मग जादा वजन कमी करण्यासाठे व्यायाम आवश्यक पण कॅल इनटेक खर्चापेक्सा कमी व्हायला हवेत
केदार शुगर कमी होण्याच्या
केदार शुगर कमी होण्याच्या डिसॉर्डरला हायपोग्लासेमिआ म्हनतात. धोकादायक स्थिती.
>>>१. डायबेटिक लोकांनी
>>>१. डायबेटिक लोकांनी फास्टिंग करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. पण कार्ब्स कमी करायला काही हरकत नाही.
२. बाळाला पाजवत असताना असली कुठलीही डाएट करू नयेत. जेव्हा बाळ इतर अन्नपदार्थ खाऊ लागेल तेव्हाच आईने आपल्या वजनाची चिंता करावी.
हे डिस्क्लेमर मी लेखाच्या शेवटी दिलेले आहे. पण ज्या लिंक्स मी या लेखाबरोबर दिल्या आहेत त्या कृपया बघाव्यात. ते सगळे लोक डॉक्टर आहेत. हे मी प्रतिसादांमध्येदेखील पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे.
"फॅड" याचा अर्थ अशी गोष्ट जिला कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही. पण या वरील लोकांनी कित्येक वर्षं चांगल्या चांगल्या जर्नल्समध्ये ओबेसिटीवर त्यांचे काम प्रसिद्ध केलेले आहे. यामध्ये NIA (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग) मधले डॉ. मार्क माथेसन यांचं व्याख्यान मी वगळले आहे कारण ते लंघनाचे वजनापेक्षा असलेले अजून मोठे फायदे सांगणारे आहे. जसे की अल्झायमर सारख्या व्याधींपासून आपले संरक्षण करणे. तेही मी इथे देत आहे.
https://www.youtube.com/watch?v=4UkZAwKoCP8&t=746s
हा लेख लिहायचा उद्देश लोकांना लंघन करायला लावणे नसून, लंघनाचे फायदे आता शास्त्रीय दृष्ट्यादेखील सिद्ध झालेले आहेत हे सांगणे होता.
लंघन किंवा कार्ब्स कमी करायचा सल्ला देणाऱ्या प्रत्येक शाश्त्रज्ञाकडे फॅड पसरवणारा म्हणून बघायचा इतिहास आहे. पण हार्वर्ड पासून ते केम्ब्रिज पर्यंत सगळ्या मोठ्या विद्यालयांमध्ये कार्ब्सच्या आणि साखरेच्या अतिरेकामुळे माणसांची प्रकृती किती आणि कशी खराब होते आहे यावर काम चालले आहे. ते इथल्या वाचकांपर्यंत (मराठीतून) पोचवायचा हा प्रयत्न आहे.
https://www.hsph.harvard.edu/nutritionsource/2015/12/16/dr-david-ludwig-...
असे लेख डिस्क्लेमर शिवाय लिहायचे धाडस करणारे कमी असतील. पण काही काही लोक त्यांची सगळी विशी आणि तिशी साखर, कर्बोदके यांचा अतिरेक आणि कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करता घालवतात, त्यांना त्यांच्या आहार विहाराबद्दल असे डिस्क्लेमर मिळते का?
कोकाकोलाच्या बाटलीवर त्याचे अतिसेवन शरीरास घातक आहे असे लिहिलेले नसते. त्यामुळे २ आणि ३ वर्षांची पोरं मॅकडोनाल्ड मध्ये मजेत बर्गर आणि कोक पिताना दिसतात.
अन्नाच्या काही तासांसाठी करायच्या त्यागाबद्दल वाचूनदेखील जर त्यावर इतका उहापोह होऊ शकतो, तर अन्नाच्या अतिरेकाबद्दल असा का होत नाही? कित्येक जीवनशैलीशी निगडित असलेले आजार, जसे की बीपी, डायबेटीस हे मिताहाराने पूर्णपणे टाळले जाऊ शकतात. तसेच डायबेटीस टाईप २ होण्याआधी कित्येक लोक कितीतरी वर्षं इन्सुलिन रेसिस्टन्ट असतात. आणि इन्सुलिन रेसिस्टन्स मध्ये शरीरात इन्सुलिनची कमतरता नसून त्याचा अतिस्राव असतो. पण या इन्सुलिनला आपल्या पेशी प्रतिसाद द्यायच्या बंद होतात. ही स्थिती आहारात बदल केल्याने पुर्वव्रत होऊ शकते. पण आपण डॉक्टरच्या दारी जेव्हा जातो तेव्हा शुगर प्रमाणाबाहेर वाढायला आधीच सुरुवात झालेली असते.
आपलं अन्न (आणि त्याचे योग्य सेवन) हे आपले सर्वात पहिले औषध असायला पाहिजे.
सईताई, तुम्ही डिसक्लेमर
सईताई, तुम्ही डिसक्लेमर व्यवस्थित दिलेला आहे ह्याबद्दल खरंच धन्यवाद!
माझा काळजी घ्या सांगण्याचा उद्देश एवढाच की मी त्या अनुभवातून गेलोय तर इतरांनी कॉशस राहुन निर्णय घ्यावेत.
मी आणी माझी पत्नी तुमचा लेख वाचून, इन्स्पायर होऊन, परत एकदा नीट आखून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने लंघन करणार आहोत. तेव्हा अनुभव देऊच.
सई, एक कड्डक सॅल्यूट!
सई, एक कड्डक सॅल्यूट!
माझाही स्टेप-बाय-स्टेप प्रयत्न चालू आहे, संध्याकाळी लवकर जेवून किमान १४ तास फास्टिंग होईल असं करायचा. एकदम जमणार नाही कारण मधल्या काळात तब्येत पुरेशी ढासळून झालेली आहे. असो. दॅट इज डिफरंट स्टोरी!
पण तुझा संपूर्ण लेख आणि सगळेच प्रतिसाद काहीही खाताना आठवतात आणि सतत सावध करतात हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नको ते खाणं टाळलं जाणं नक्कीच सुरू झालंय. थँक्स अ लॉट!
सई सुंदर लिहीत आहेस!!
सई सुंदर लिहीत आहेस!!
या विषयावर मार्क मॅटसन यांचा
या विषयावर मार्क मॅटसन यांचा एक टॉक ऐकण्यात आला, ज्यात ते फास्टिंगचा ओबेसिटी आणि न्यूरोलॉजिकल आजारांवरचा परिणाम याबद्दल विस्तृत माहिती देतात.
त्याची लिंक : https://www.ihmc.us/stemtalk/episode007/
त्याच टॉकमधून सचिदानंद पांडा यांच्या कामाबद्दल माहिती मिळाली. सॉल्क इन्स्टिट्यूटमध्ये ते "टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग" या विषयावर काम करत आहेत. त्यांच्या कामातून असं सिद्ध होतंय की जर ठराविक वेळात पूर्ण लंघन करायचे असेल तर दिवसभर (वजन कमी करण्यासाठी) कमी खाण्याची गरज नाही. नेहमीचा आहार घेऊन फक्त लंघनाच्या वेळा पाळल्या तरी वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
त्याची लिंक: http://well.blogs.nytimes.com/2015/01/15/a-12-hour-window-for-a-healthy-...
एक आठवड्या पासून लंघन सुरु
एक आठवड्या पासून लंघन सुरु केले आहे. पहिले दोन दिवस १४ तास, पुढले दोन दिवस १५ तास आणि मग १६ तास. आठवडाभर लंघन केलंय तेव्हा रविवारी त्याला सुट्टी द्यावी असे अद्याप तरी वाटले नाही. काल वजनाची नोंद करुन ठेवलीय. बघु या आता.
https://www
https://www.scientificamerican.com/article/the-hunger-gains-extreme-calo...
अजुन एक लिन्क!
@मानव, ऑल द बेस्ट!!
मी कमीत कमी १२ तास लंघन सुरु
मी कमीत कमी १२ तास लंघन सुरु केलंय. १२ तास नक्कीच. त्याच्यावर कधी साडेबारा कधी तेरा तास ही होतायेत. रात्री जेवण्याच्या वेळेनुसार.
आठवड्यात फरक वाटतोय खरा. टायर्स जरा शिथिल वाटत आहेत.
>>टायर्स जरा शिथिल वाटत आहेत.
>>टायर्स जरा शिथिल वाटत आहेत.
वजनाची सुद्धा नोंद ठेवा! आठवड्यातून एकदा सकाळी उपाशी पोटी वजन करा. आणि शक्यतो एकच वार ठरवून त्याच दिवशी दर आठवड्याला करा.
ओके.
ओके.
सई, मला वजन कमी करायचं नाहीये. फक्त पोट राहिलंय दुसर्यावेळच्या सिझेरींग नंतर.
आधी इतर काही छोटे छोटे डायट केले. तर पोटावर परीणाम शुन्य पण गाल बसलेले डोळे थकलेले लग्गेच दिसणार.
लंघनामुळे रात्रभर आणि सकाळी कामात वेळ गेल्यामुळे भुकेची जाणीव होत नाही आणि मग मी ऑफिसात पोचल्यावर १० वाजता ब्रेफा करते. रात्रीचं जेवण साडेआठ नौला केलेलं असतं. पण ब्रेफा करतेच. स्किप करत नाही. त्यामुळे उपाशी रहात नाही आणि १२-१३ तासांचा फास्टिंग विंडो पण राखला जातोय. आणि हेल्दी ईटिंग जमवतेय.
हा धागा दोन वर्षांपूर्वी
हा धागा दोन वर्षांपूर्वी वाचनात आला,
तेव्हा छे, हे 16 तास उपास वगैरे काही जमायचे नाही म्हणून उडवून लावले,
सोबत," हवे तर अर्धातास जास्त व्यायाम करेन, पण खाण्या पिण्यात बंधने सहन करणार नाही " हा माज होताच.
त्यामुळे 2 वर्ष इकडे येणाऱ्या पोस्ट्स कडे "आ" वासून पाहणे इतकेच केले.
शेवटी वजनाने नव्वदी पार केल्यावर काहीतरी करायलाच हवे अशी आणीबाणीची परिस्थिती आली,
Jan 2018 पासून सिरिअसली धावायला सुरवात केली(त्यात पण एका मायबोलीकराचाच हात होता :)) मे 2018 पासून माझ्या कडे वजनाचा रेकॉर्ड आहे, म्हणून फक्त तोच कालावधी घेतो आहे
मे 2018 ते ऑगस्ट 2018 मध्ये माझे 4 kg वजन कमी झाले.
ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये वजन कमी होणे थांबले.
या काळात केवळ व्यायामावर भर होता, खाण्याची कुठलीही बंधने पाळत नव्हतो ( साखर न खाणे सोडून)
वजन पुढे कमी होत नाही म्हणून धावायचा उत्साह पण कमी होत होता,
दरम्यात सई चा IF वर फॉलो अप धागा आला, दीक्षितांच्या थिअरी ने अजून चर्चा वाचली.मग शेवटी करून पाहूया काय होतंय म्हणत IF सुरू केले.
गणेश चतुर्थी (sept 2nd वीक) पासून IF सुरू केले , तेव्हा पासून आज पर्यंत माझे 6 kg वजन कमी झाले .
या कालावधीत IF बरोबरच रोज साधारण दीड तास व्यायाम (resiatance ट्रेनिंग, धावणे, सायकल या पैकी काहीतरी) चालू आहे.
बिग थँक्स टू you सई.
विषय मांडणे, त्याचा फॉलो अप ठेवणे, आणि त्याला पूरक आजूबाजूच्या गोष्टी परत परत मांडणे यामुळे ते सगळे सिंक इन होण्यास पूरक ठरते.
कीप अप the गुड वर्क
@ सिम्बा
@ सिम्बा
अरे वाह! अभिनंदन!!
आता मलाच इथल्या लोकांकडून इन्स्पायर व्हायची गरज आहे. गेले काही महिने माझं आयएफ नीट होत नाहीये. वजन स्टेबल आहे पण माझे गोल्स अजून अचिव्ह झाले नाहीत. मायबोली आयएफ असा काही व्हॅट्सऍप ग्रुप काढता आला तर छान होईल. मग आपण अकाउंटंबिलिटी साठी तो ग्रुप वापरू शकू. मी फेसबुकवर एक ग्रुप केला होता पण तो माझ्या मनाप्रमाणे चालला नाही. सो सध्या इन्कटिव्ह आहे. मी सध्या रोज १००० मी पोहायला सुरुवात केली आहे. मला पळण्यापेक्षा आणि जिमपेक्षा पोहणे आणि योगा जास्त प्रिय आहे. आता फक्त या जोडीला व्यवस्थित आयएफ सुरु केले की परत मी माझ्या गोल्स कडे वाटचाल करू शकीन.
>>>बिग थँक्स टू you सई.
विषय मांडणे, त्याचा फॉलो अप ठेवणे, आणि त्याला पूरक आजूबाजूच्या गोष्टी परत परत मांडणे यामुळे ते सगळे सिंक इन होण्यास पूरक ठरते.
कीप अप the गुड वर्क
थँक्यू!! माझा पण उत्साह वाढला या प्रतिसादामुळे.
मी आय एफ + दिक्षित गेले ८
मी आय एफ + दिक्षित गेले ८ महिने करत आहे. मला ही प्रणाली आचरणात आणायला सुदैवाने काहीच त्रास होत नाही.
सुरुवातीला सहा महिने प्रतिमाह एक किलो प्रमाणे वजन कमी झाले. आता वजन कमी होण्याचे प्रमाण (Plateau ?) कमी झाले आहे. व्यायाम चालू आहे. बहुतेक दुध घातलेला चहा आणि शनिवार रविवारचे कार्यक्रम ( ) जबाबदार असावेत.
पोट कमी झाले आहे. कपड्यांचा एक साईझ कमी झाला आहे. पण अजून कोणी बारीक झालास का असे स्वतःहून म्हणत नाही. विचारल तर मात्र म्हणतात.
आता आठवडाभर सगळ झुगारून देउन मेटॅबॉलिस्म रिसेट करून Plateau जातो का बघायचा विचार आहे.
सतत कमी कॅलरीज घेतल्याने starving response होत असावा अशी माझी शंका आहे. बघू काय होते ते.
मला पण करावसं वाटतय... पण
मला पण करावसं वाटतय... पण tension येतयं
सई तुमचे लेख खरंच खूप
सई तुमचे लेख खरंच खूप अभ्यासपूर्ण असतात.. मी पण 2 महिनांपासून IF करत आहे. Slowly कमी होतं आहे वजन. Fb वर एक IF women ग्रुप join केला आहे. तिथे तर 3 महिन्यात 30-40 lb कमी करणारे पण आहेत.. कस काय अचिव्ह करतात काय माहिती.... IF is रिअली गुड फॉर ओव्हरऑल health....
बाकी अमेरिकेत लो फॅट मिल्क वापरावे की नाही? माझ्या डॉक्टर ने तर लो फॅट च वापरा सांगितले.... but इंटरनेटवर बरेच नेगेटिव्ह पॉईंट्स दिसले लो फॅट बद्दल...
>>>व्यायाम चालू आहे. बहुतेक
>>>व्यायाम चालू आहे. बहुतेक दुध घातलेला चहा आणि शनिवार रविवारचे कार्यक्रम ( Happy ) जबाबदार असावेत
विकेंड खूप महागात पडतात. विकेंडला थोडे खाल्ले प्यायले की पुन्हा वजन आधीएवढे व्हायला गुरुवार उजाडतो. मी आता विकेंडला जास्त काटेकोरपणे डाएट करणार आहे. माझादेखील प्लॅटू आहे.
>>बाकी अमेरिकेत लो फॅट मिल्क वापरावे की नाही? माझ्या डॉक्टर ने तर लो फॅट च वापरा सांगितले.... but इंटरनेटवर बरेच नेगेटिव्ह पॉईंट्स दिसले लो फॅट बद्दल...
फुल फॅटमुळे सॅटायटी लवकर येते. त्यामुळे कमी खाल्ले जाते. दुधापेक्षा फुल फॅट दही जास्त चांगले.
आमच आयेफ + दीक्षित + व्यायाम
आमच आयेफ + दीक्षित + व्यायाम चालू आहे. शरीर सुडौल दिसू लागले. वैद्यकिय चाचण्यात खूपच फायदा दिसून आला. पण प्लॅटू आलाय तो गेलेला नाही. वजन कमी होतेय पण कूर्मगतीने. थोडेसे जरी जास्त खाल्ले गेले की मूळ पदावर येते. शरीराला किती कॅलरी जरूरी आहेत याचा एखादा विश्वसनीय तक्ता आहे काय कुणाकडे. मी १६०० ते २४०० येवढी रेंज वाचलीय. खरे काय?.
मला IF चालू करुन ३ महिने झाले
मला IF चालू करुन ३ महिने झाले आहेत. त्यामुळे मर्यादित अनुभव आहे. मी (वजन कमी होण्याचा वेग कमी झाल्यावर) ८-१० दिवसातून एकदा fasting window २०-२२ तास केली त्याचा उपयोग झाला..
>>>शरीराला किती कॅलरी जरूरी
>>>शरीराला किती कॅलरी जरूरी आहेत याचा एखादा विश्वसनीय तक्ता आहे काय कुणाकडे. मी १६०० ते २४०० येवढी रेंज वाचलीय. खरे काय?.
कॅलरी मोजू नका. त्यापेक्षा कॅर्बोहायड्रेट मोजा. दिवसाला 100 ग्राम च्या आसपास कार्बोहायड्रेट खा आणि उरलेलं प्रोटीन, फॅट फायबर पोत भरेपर्यंत खा.
(वजन कमी होण्याचा वेग कमी
(वजन कमी होण्याचा वेग कमी झाल्यावर) ८-१० दिवसातून एकदा fasting window २०-२२ तास केली त्याचा उपयोग झाला..
दिवसातून एकदाच जेवणे सुध्दा फायद्याचे ठरते. Omad. अर्थात one meal a day.
मला सध्या नीट आयएफ करायची फार गरज आहे
कॅलरी मोजू नका. त्यापेक्षा
कॅलरी मोजू नका. त्यापेक्षा कॅर्बोहायड्रेट मोजा. दिवसाला 100 ग्राम च्या आसपास कार्बोहायड्रेट खा आणि उरलेलं प्रोटीन, फॅट फायबर पोत भरेपर्यंत खा. >> भागवत पंथाला लागायचे म्हणा अन काय Just kidding
मी IF try केलेलं पण 10 दिवस
मी IF try केलेलं पण 10 दिवस करू शकले मग गणपती आले आणि सगळं control गेलं. साखर almost सोडलेली मी. 3kg कमी झाले. आणि परत वाढले नाहीत. पण सोबत ACV घेत होती रोज त्याचा पण सहभाग असावा यात. ACV with mother चा खूप उपयोग होतो.
आता परत IF start करायचं आहे.
बापरे ACV कसं घ्यायला जमतंय?
बापरे ACV कसं घ्यायला जमतंय?
मला बिलकुल आवडत नाही. नाहीच घेऊ शकत मी. भयंकर असतं.
Pages