दंगलच्या निमित्ताने - चित्रपटात दाखवली जाणारी भ्रष्ट सरकारी यंत्रणा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2017 - 03:36

चित्रपटात भ्रष्ट सरकारी यंत्रणा आणि उदासीन किंवा माज आलेले सरकारी अधिकारी दाखवले जाणे काही नवीन नाही. विविधतेने नटलेल्या भारताची कित्येक रुपे आहेत आणि त्यातील जे रूप पडद्यावर दाखवायचे आहे ते साकारायचा पुर्ण अधिकार एखाद्या दिग्दर्शकाला आहे. पण तेच एखादा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असतो तेव्हा मात्र संबंधित व्यक्तींबद्दल चुकीचे चित्रण करणे अयोग्य आहे असे मला वाटते. मुख्यत्वे अश्या चित्रपटातून भारताची काय इमेज आपण जगासमोर ठेवतो आहे याचे भान जरूर पाहिजे. चित्रपटाचे बॅनर जेवढे मोठे तेवढे हे भान अधिक ठेवायला हवे. कारण अश्यावेळी चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि तितक्याच ताकदीचा असेल तर तो ऑस्करवारी करत जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचण्याची शक्यता असते.

दंगल चित्रपटामधील गीता फोगट आणि बबिता फोगट या बहिणी कमी अधिक फरकाने एकाच ताकदीच्या पैलवान असल्या तरी चित्रपटामध्ये गीतावरच फोकस करण्याच्या नादात तिचा अर्जुन आणि बबिताचा नकुल-सहदेव केला गेलाय असे मला वाटल्याने मी सहज दोघींचे रेकॉर्ड शोधायला घेतले.
पण याबाबत माहिती गूगाळताना मला थोडी आणखी माहीती सापडली, आणि तिने मला संभ्रमात टाकले.

चित्रपटात दाखवलेय की सरकारी कारभार फारच गोंधळाचा आहे. कोच आणि सपोर्ट स्टाफ निकृष्ट दर्जाचे वा उदासीन आहेत. आपले तेच खरे करण्याचा त्यांच्यात एक अहंकार आहे. ट्रेनिंगवर फोकस न करता त्या नावावर थोडीफार मौजमजा चालते. प्रसंगी बेशिस्तपणा खपवून घेतला जातो. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या नावाने बोंब आहे. प्रत्यक्ष कोचिंग ऐवजी बोलीबच्चन देणार्‍या वशिल्याच्या तट्टूंची वर्णी लागली आहे. अशी एकूणच दुरावस्था असल्याने आपल्याला मेडल मिळवता येत नाहीये.

पण मी कुतुहलाने चित्रपटात दाखवलेल्या २०१० कॉमनवेल्थ स्पर्धेतील कुस्ती या खेळाची पदकतालिका चेक केली तर काय आश्चर्य!

कुस्ती या प्रकारात सर्वाधिक १० सुवर्ण आणि एकूण १९ पदके मिळवत आपण सर्वात वरच्या स्थानावर होतो.
आपल्याखालोखाल कॅनडा फक्त ४ सुवर्णपदकांकसह १४ पदके मिळवत दुस‍र्‍या स्थानावर होता.

dangal 1.jpg

मग मी निव्वळ मुलींची पदके पाहिली. तर त्यातही गीता सोबत अलका आणि अनिता नावाच्या आणखी दोन मुलींनी ईतर वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते. तसेच गीताची बहीण बबिता हिने त्याच स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते. अजून एकीने रौप्य तर एकीने कांस्य अशी एकूण सहा पदके पटकावत निव्वळ महिलांमध्येही भारतच अव्वल होता.

dangal 2.jpg

अर्थात चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या सहाही महिलांचा कोच तेव्हा एकच असणार. अर्थात त्याचा या यशात नक्कीच वाटा असणार. तर मग त्यालाही या चित्रपटात व्हिलन बनवायची काय गरज होती? किंवा एकूणच स्त्री-पुरुष दोघांनीही अव्वल कामगिरी केली असूनही आपली सिस्टीमच सडकी आहे असे बोलायची खरेच काय गरज होती?

कारण सरळ आहे, बॉक्स ऑफिसवरील धंद्याचे गणित !

पण चित्रपटातील नायकाला / नायिकेला भारी दाखवायच्या प्रयत्नात आपण आपल्या देशातील कारभाराला पर्यायाने आपल्या देशाला हलके दाखवायची चूक तर नाही ना करत आहोत? ते देखील तसे नसताना !

जर हे असे चुकीचे आणि नकारात्मक चित्रण केले गेले तर उदयोन्मुख खेळाडूंना हुरुप कसा येणार? पुढे हे असे वाढून ठेवलेय या विचारांनी त्यांचे मनोधैर्य आधीच खच्ची नाही का होणार? या नकारात्मक विचारांचा प्रसार झाल्यास येणारी नवीन पिढी खेळांकडे वळणार कशी?

या सर्वात गंमत मला एका गोष्टीची वाटली. मागे आमीरने देशातील वाढत्या असहिष्णूतेबद्दल केलेल्या भाष्यावरून बरेच काही वादळ उठले होते. पण त्याच्या चित्रपटात त्याने जे आपल्या स्पोर्ट्स सिस्टीमवर भाष्य केले आहे, ते खरे खोटे करणारा व्हॉटसपवर एकही मेसेज फिरला नाही Happy

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वस्ति हो, आजपण घरी आहे.
पण हा धागा तसाच महत्वाचा वाटला आणि आधीच्या दंगल धाग्यात आता शेवटाला हा विषय घेण्याऐवजी वेगळ्या धाग्यात लेखाच्या स्वरुपात लोकांसमोर मांडणे गरजेचे वाटले Happy

>>> पण त्याच्या चित्रपटात त्याने जे आपल्या स्पोर्ट्स सिस्टीमवर भाष्य केले आहे, ते खरे खोटे करणारा व्हॉटसपवर एकही मेसेज फिरला नाही <<<
एका मेसेजमधे "कोच" चे नकारात्मक चित्रणाबाबत होते.

पिच्चर पाहिला नाही अजुन. पण जे काही इथे वाचलंय त्यावरुन असं काही त्या कोचबद्दल दाखवायला नको होतं. त्या कोचने घेतलेल्या आक्षेपाची लिंकही इथेच वाचली होती. हे सगळं खरं असेल तर खरंच दुर्दैवी आहे.

अवांतर - नवीन वर्षात घरुन काम करणार आहेस का?

सस्मित, मला माझ्या गुरूने सांगितलेले की जो नवीन वर्षाची सुरुवात काम करून करतो तो वर्षभर कामच करत राहतो, जो आराम करून करतो त्याचे वर्ष आरामात जाते. . बस्स म्हणूनच एकची सुट्टी आणि दोन माझ्या असे तीन दिवस आरामाची हॅट्रीक मारत वर्षाची सुरुवात केलीय Happy

अंकु, जसा चित्रपटाकडे बघण्याचा चित्रपट प्रत्येकाचा द्रुष्टीकोण वेगळा असतो तसे धाग्याकडे बघण्याचाही प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. कोणाला गरज वाटते कोणाला नाही Happy
खरे तर ही पोस्ट मी व्हॉटसअपवर फिरवायला लिहिली होती. दंगलविरोधात यंदा फारसे व्हॉटसप मेसेज न फिरल्याने मी निराश झालेलो. म्हणून म्हटले हिच संधी, आपण काहीतरी मुद्दा काढून फिरवूया. तेवढेच आपले नाव होईल. कधी तुमच्या ग्रूपवर अगदी हेच तंतोतंत फिरले तर हे आमच्या मायबोलीच्या रुनम्याने लिहिलेय असे सांगून थोडा भाव खाऊन घ्या Wink

बरंचसं पटलं. त्या कोचच्या बाबतीत असे काहीही झालेले नाही असे दिसते.
पण याचा अर्थ सगळं आलबेल आहे असं मुळीच नाही. या ऑलिंपिक मधे आपल्या धावपटूला पाणी मिळाले नाही तसेच एका कुस्तीगीराच्या बाबतीत डोपिंगचा जो दुर्दैवी वाद झाला त्याने बरंच काही चव्हाट्यावर आलेलं आहे.

नाटक-सिनेमा हे समाजाचं प्रातिनिधीक रूप असतं. (करण जोहर कुठल्या समाजाचं प्रतिनिधीत्व करतो असा प्रश्न मला पडायचा. पण मध्यंतरी कुणाल नय्यर ह्या बिग बँग थियरी मधल्या अभिनेत्याचं आत्मचरित्र वाचलं (हल्ली काय, पट्टेवाले सुद्धा जातात हो कालिजात! Happy ) आणी तो प्रश्न सुद्धा सुटला.) आचार्य अत्र्यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटलं होतं, की एका बाईनं मंगळसूत्र तोडलं आणी ती घराबाहेर पडली, ही एक घटना नाटक लिहायला पुरेशी आहे. त्यावर जर कुणी अशी किती बायकांनी मंगळसूत्र तोडली आहेत असा प्रश्न विचारला, तर तशी काही खानेसुमारी मी केलेली नाही. मध्यंतरी आवारा (राज कपूर चा) सिनेमा पहात असताना जाणवलं की पोलिस ह्या प्रकाराची भिती खलनायकांना वाटण्याचा तो काळ होता. अगदी १९७० च्या दशकातले / १९८० च्या पुर्वार्धातले वगैरे सिनेमे सुद्धा पोलिसांचा धाक वगैरे गोष्टी दाखवायचे. नंतर च्या काळात लोकांच्या मानसिकतेत अनुभवाने जे बदल घडत गेले, त्यामुळे पोलिस, राजकारणी हे भ्रष्ट असणं हे सिनेमात दाखवणं आणी लोकांनी सहज स्विकारणं हे घडत गेलं. आता हिरो च जर पोलिस (सरफरोष) किंवा राजकारणी (नायक) दाखवला तर लोकं त्यांची स्वच्छ प्रतिमा स्विकारतात,

बाकी दंगल एक सिनेमा आहे. त्यात काय दाखवायचं हे दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे आणी जे दाखवलय ते सुंदर दाखवलय, परिणामकारक पद्धतीनं दाखवलय हे माझं मत आहे.

दंगल एक सिनेमा आहे. त्यात काय दाखवायचं हे दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य आहे
>>>
ईथेच आपली वर लिहिलेली पोस्ट फेल जातेय.
दंगल हा सत्यघटनेवरचा चित्रपट आहे. ओरिजिनल नावांसह तसेच एनएसए पटियाला आणि राष्ट्रकुल स्पर्धा २०१० दिल्ली सारख्या ओरिजिनल डिटेलसह बनवलेला..
त्यामुळे हवे ते स्वातंत्र्य तो नाही घेऊ शकत..

समजा उद्या मी "माझे मायबोलीवरचे दिवस" म्हणून एखादी डेली सोप टिव्ही सिरीअल सुरू केली. त्यात आयडी नावेही ईथली खरीखुरी वापरली. प्रत्येकाचे त्याच्या वकूबानुसार कौतुक केले. मात्र मालिकेत रंग भरायला काही आयडींच्या तोंडी अर्वाच्य गलिच्छ भाषा टाकली, जे ते तसे कधी ईथे वावरले नव्हतेच. तर हे त्या आयडींना चालेल का?

"दंगल हा सत्यघटनेवरचा चित्रपट आहे" - सत्यघटनेची डॉक्यूमेंटरी नाही. हा फरक तर असणारच, असलाच पाहीजे. कुस्ती ह्या विषयावर डॉक्यूमेंटरी मी तरी कधीच बघायला गेलो नसतो. मनोरंजन मूल्य - एंटरटेनमेंट वॅल्यू नसेल तर ईतकं कमर्शियल सक्सेस नाही मिळणार. रील-लाईफ आणी रियल लाईफ मधला हा फरक समजावून च सिनेमा / नाटक बघायला हवं.

फेरफटका +१

>>>समजा उद्या मी "माझे मायबोलीवरचे दिवस" म्हणून एखादी डेली सोप टिव्ही सिरीअल सुरू केली.---

ही ही. आयडिया मस्तं आहे.

मूळ लेखातील एक पॉइण्ट व्हॅलिड आहे. स्पेसिफिकली त्या स्पर्धेतील कोच जर तसे नसतील तर तसे दाखवणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. सरकारी व्यवस्थेतील झारीतील शुक्राचार्य कोणी हवाच होता तर दुसरा कोणीतरी दाखवायला हवा होता.

पण भारताची इमेज वगैरे तसे मला काही वाटत नाही. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधला भारताचा परफॉर्मन्स पाहता याउल्ट दाखवले तर ते हास्यास्पद दिसेल.

आपल्या इथली वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार हि काही नविन व लपुन राहीलेली गोष्ट नाही....

आपले खेळाडु स्पर्धेत पदक मिळवीतात ते त्यांच्या वैयक्तीक कामगीरी मुळे, त्यामधे सिस्टीम म्ह्णुन त्याचा कोणताच लाभ (जेवढा मिळायला हवा, जो आपण भरलेल्या टॅक्स मधुन त्याना सॅन्क्शन झालेला असतो तो.. )
त्याना होताना दिसत नाही... जसे

- योग्य मार्गदर्शन
- योग्य ट्रेनिंग
- योग्य साधन सुविधा... आणि खुप काही...!!!

उगाच जगासमोर आपली काय इमेज होइल म्ह्णुन डोळेझाक करने व नसलेले दाखवणे पण योग्य आहे का ?

बाळ ऋ, थोडक्यात आणि खरे सांगायचे झाले तर वाहवत जाऊ नकोस....

महावीर फोगट आणि फोगट बहिणी यांच्याबद्दल पूर्ण आदर आणि कौतुक बाळगून हे लिहू इच्छितो, की कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक ही अतिप्रचंड अशी कामगिरी नाही. राष्ट्रकुल देशात अॉस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि कॅनडा सोडले तर एकही दिग्गज असा म्हणता येईल असा देश नाही. अशा स्पर्धेत आपण नेहमीच चांगली कामगिरी केली आहे.

कुस्तीतले दादा देश म्हणतात असे इराण, रशिया, जपान, बल्गेरिया, चीन, युक्रेन यासारखा एकही देश राष्ट्रकुलमध्ये नाहीये. त्यामुळे तिथली कामगिरी ही थोडक्यातच बघावी अशी आहे. भारत ७०-८०च्या दशकात सहाव्या सातव्या स्थानावर असे, नंतर २००३ आणि ०६ मध्ये चौथे आणि आपण यजमान असलेल्या वेळी २०१० ला दुसरे. पूुन्हा २०१४ ला पाचवे.

ऑलिम्पिकला १९५२ खाशाबा जाधव यांच्यानंतर डायरेक्ट २००८ सुशील कुमार (कांस्य) आणि २०१२ ला रौप्य. योगेश्वरला कांस्य आणि आत्ता साक्षी मलिकला कांस्य. इतक्या वर्षात फक्त एक रौप्य आणि चार कांस्य. आपला पारंपारिक खेळ म्हणवतो त्यात. वर्ल्ड चँपियन स्पर्धेत आपण सध्या ४१ व्या स्थानावर आहोत.

जर हे असे चुकीचे आणि नकारात्मक चित्रण केले गेले तर उदयोन्मुख खेळाडूंना हुरुप कसा येणार? पुढे हे असे वाढून ठेवलेय या विचारांनी त्यांचे मनोधैर्य आधीच खच्ची नाही का होणार? या नकारात्मक विचारांचा प्रसार झाल्यास येणारी नवीन पिढी खेळांकडे वळणार कशी? >>>>

खेळाडूंना तु गुगल करून घेतलेल्या माहीतीपेक्षा बरीच जास्त माहीती असते, स्थानिक पातळीपासूनचे राजकारण त्यांना माहीती असते. त्यामुळे चित्रपटाचा निगेटीव्ह परिणाम नक्कीच होणार नाही. उलट झालाच तर जास्त पालक आपल्या मुलींना कुस्ती खेळायला परवानगी देतील असे वाटते.

फेरफटका, तुम्ही मनोरंजक मूल्य वाढवायला हिरोचा शक्तीमान करा, दैवी शक्तीचे चमत्कार टाका, अशक्य योगायोग दाखवा, मैदानाबाहेर चीअरगर्ल्स नाचवा, त्यात हवे तर सनी लिओनलाही दाखवा...
पण तुम्ही एखाद्या कॅरेक्टरला व्हिलन कसे करू शकता? व्हिलन हवाच असता तर एखादे सत्यघटनेबाहेरचे कॅरेक्टर घुसवा. समोरच्या देशाने काहीतरी कटकारस्थान केले आहे असे दाखवा. ज्या कोचने महिलांना सहा पदके त्यातही तीन सुवर्णपदके मिळवून दिलीत त्याबद्दल आणि पुर्ण चित्रपटभर एकंदरीतच सिस्टीमची बदनामी कशी करू शकता?

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधला भारताचा परफॉर्मन्स पाहता याउल्ट दाखवले तर ते हास्यास्पद दिसेल.
>>>>>
फारेण्ड, या पर्टीक्युलर राष्ट्रकुल कुस्तीमध्ये वर मी आकडे दिले आहेत. सर्वाधिक मेडल्स आपले आहेत. हा परफॉर्मन्स वाईट म्हटलं तर चांगले काय झाले?

आशुचॅम्प यांनी उल्लेखलेल्याप्रमाणे ऑलिंपिकमधील परफॉर्मन्सच्या अनुषंगाने असे म्हणायचे आहे का?
ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणारे जगभरातले देश आणि राष्ट्रकुलचे सदस्य देश यातला फरक मलाही ठाऊक आहे.
पण चित्रपटात जे गोल्ड मेडलचे कौतुक दाखवलेय, आणि मेडलिस्ट पेड पे नही उगते वगैरे डायलॉग आहेत ते, आणि एकूणच चित्रपट राष्ट्रकुल स्पर्धेलाच प्रमाण मानून बनवला आहे ना.

खेळाडूंना तु गुगल करून घेतलेल्या माहीतीपेक्षा बरीच जास्त माहीती असते,
>>>>>
कल्पना तेव्हा येते जेव्हा ते त्या खेळात उतरतात, मी खेळाकडे वळण्याच्या निर्णयावर फरक नाही का पडणार असे म्हणतोय. यात पालकही असाच विचार करतील की खेळाला या देशात भविष्य खडतरच आहे. तर आपले शिक्षणच बरे.

बाकी आपली सिस्टीम गुणगाण गावेत अशी नाहीये याची मलाही कल्पना आहे. पण जिथे ती चांगली आहे तिथेही तिला चांगले न म्हणने चुकीचे आहे.

आता मी अर्धवट झोपेत आहे, उद्या आणखी लिहितो Happy

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधला भारताचा परफॉर्मन्स पाहता याउल्ट दाखवले तर ते हास्यास्पद दिसेल.
>>>>>
फारेण्ड, या पर्टीक्युलर राष्ट्रकुल कुस्तीमध्ये वर मी आकडे दिले आहेत. सर्वाधिक मेडल्स आपले आहेत. हा परफॉर्मन्स वाईट म्हटलं तर चांगले काय झाले? >>> नाही मी 'इन जनरल' म्हणतोय. इथे राष्ट्रकुल स्पर्धेत तसे दाखवायला नको होते याच्याशी मी सहमत आहे. पण इन जनरल ते लोक खूप स्वच्छ व प्रोफेशनल दाखवले तर ते हास्यास्पद दिसेल. कारण पब्लिक इमेजही तशी नाही, अनेक बातम्याही तेच सांगतात.

"मी खेळाकडे वळण्याच्या निर्णयावर फरक नाही का पडणार असे म्हणतोय. यात पालकही असाच विचार करतील की खेळाला या देशात भविष्य खडतरच आहे. तर आपले शिक्षणच बरे." - सिनेमा बघून असे लाईफ डिफायनिंग निर्णय नाही घेत कुणी / किंबहूना घेऊ नये.

"पुर्ण चित्रपटभर एकंदरीतच सिस्टीमची बदनामी कशी करू शकता?" - संपूर्ण चित्रपटात सिस्टीम ची बदनामी आहे असं माझं तरी बघताना इंप्रेशन नाही झालं. संपूर्ण सिनेमा बघताना फोगट ची पॅशन, मुलींची मेहनत आणी कुस्ती विषयी नवीन माहिती हा प्रभाव होता. त्यातून भारतातल्या ब्यूरोक्रसी ची बदनामी अशी एखादा सिनेमा पाहून नाही होणार. त्यासाठी पहिल्यांदा विदाऊट-गियर ची गाडी चालवण्याचं लायसन्स काढलं, नंतर सिग्नल ला उभं असताना, ट्रॅफीक पोलिसाने पकडलं, नोकरी-व्यवसायाचे परवाने काढले तेव्हाचे बक्कळ अनुभव गाठीशी आहेत.

"तुम्ही मनोरंजक मूल्य वाढवायला हिरोचा शक्तीमान करा, दैवी शक्तीचे चमत्कार टाका, अशक्य योगायोग दाखवा, मैदानाबाहेर चीअरगर्ल्स नाचवा, त्यात हवे तर सनी लिओनलाही दाखवा...
पण तुम्ही एखाद्या कॅरेक्टरला व्हिलन कसे करू शकता?' - चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यात त्याने काय दाखवावं, काय नाही हा सर्वस्वी त्याचा प्रश्न आहे. निर्माता करोडो रूपये खर्च करतो, त्यामुळे त्याचा ROI सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. चित्रपटात जे दाखवलय ते आवडलं का हा प्रश्न एक प्रेक्षक म्हणून माझ्यापुढे असतो आणी ह्या चित्रपटापुरतं त्याचं उत्तर होकारार्थी आहे.

>>ट्रेनिंगवर फोकस न करता त्या नावावर थोडीफार मौजमजा चालते. प्रसंगी बेशिस्तपणा खपवून घेतला जातो. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या नावाने बोंब आहे. प्रत्यक्ष कोचिंग ऐवजी बोलीबच्चन देणार्‍या वशिल्याच्या तट्टूंची वर्णी लागली आहे. अशी एकूणच दुरावस्था असल्याने आपल्याला मेडल मिळवता येत नाहीये.>> पिक्चर बघणं, खायला, फिरायला बाहेर जाणं ही मौजमजा दाखवली आहे त्याबद्दलच बोलतोयस ना? ट्रेनिंग मिस करून गीता फोगट बाहेर गेलेली दाखवली नाहीये. दोघी बहिणी वडिलांबरोबर ट्रेनिंग करतात आणि एकदा प्रॅक्टिसला उशीर होऊन पकडल्या जातात आणि त्याचा परिणाम दाखवला आहे ना चित्रपटात? ते खपवून घेतलंय असं काही दिसलं नाही.
वशिल्याच्या तट्टूंची वर्णी वगैरेही दाखवलंय का? मला डुलकी लागली असावी तेव्हा नेमकी.

आशुचँप +१

ऋन्मेष
दंगलच्या धाग्यावर तुझ्या आरोपांना उत्तर देण्याची इच्छा नव्हती. तो धागा काळजीपूर्वक वाचला असतास तर आकडेवारी न पाहता गीताच्या कोचची कामगिरी पहायला हवी असे मी लिहील्याचे तुला दिसले असते. त्यामुळे ती शेवटची कमेण्ट तू टाळली असतीस. अर्थात तुला धागा पेटवायची सवय असल्याने तू काहीही लिहू शकतोस ज्याकदे दुर्लक्ष करणे योग्य ठरते. तिथेच फोगट कुटुंबातच तीन कॉमनवेल्थची सुवर्णपदके आणि राष्ट्रीय अजिंक्यपदके येणे हा योगायोग नसावा असेही लिहीलेले आहे. ( संदर्भ १)
माझ्यासाठी इतकेच पुरेसे होते. कारण भारतीय क्रीडा क्षेत्राबद्दल आजच नाही तर पूर्वीपासून बरं सुद्धा बोललं जात नाही. सिनेमात सुरूवातीच्या सीनमधेच खेळाडुंना काय दिलं जातं यावर सूचक भाष्य आहे. त्यातून सिनेमा कुठल्या दिशेने जाणार याचा अंदाज येतो.

हरियाणा आणि पंजाब मधे कुस्तीचे कल्चर निर्माण झालेले आहे. (संदर्भ २ व ३ )
पूर्वी महाराष्ट्र हे राज्य त्यासाठी प्रसिद्ध होते. हरियाणामधे अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे निर्माण झाले आहेत आणि ते नाव कमावून आहेत. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक मल्ल जात असतात. हे आखाडे खाजगी आहेत. खेल अकादमी अर्धसरकारी आहे. जी पदके मिळतात ती या आखाड्यांच्या प्रशिक्षकांमुळे असे बोलले जाते. त्याचबरोबर या आख्ड्यातही राजकारण शिरलेले आहे हे डोपिंगच्या घटनेमुळे बोलले जाऊ लागले आहे. महाराष्ट्रातल्या एका कुस्तीगीराचे सिलेक्शन झाले हे सहन न झाल्याने डोपिंग टेस्टच्या आधी त्याच्या खाण्यात काहीतरी मिसळले गेले ज्यामुळे तो बाद झाला. आरोपात तथ्य असल्याचे जाणवल्याने त्या खेळाडूला संधी दिली गेली असेही म्हटले जाते तर डोपिंगमधे बाद होऊनही संधी दिली गेली याचा अर्थ काय असेही बोलले जाते. काहीही असो, ऑलिंपिक मधे या प्रकरणातून देशाची लाज गेली हे तुला माहीत नाही असे दिसतेय.

यापेक्षा जास्त या प्रकरणावर लिहीण्याची किंवा वेळ घालवण्याची माझी तयारी नाही. त्यामुळे कोचने जरी प्रत्यक्षात गीताच्या वडिलांना कोंडून ठेवले नसले तरीही प्रत्यक्षात या कोचमुळेच सुवर्णपदके मिळाली आहेत का हे मला तरी नाही सांगता येणार. सिनेमाच्या आधी किती जणांना गीता फोगट, महावीरसिंह फोगट ही नावे माहीत होती ? त्या जिद्दीची माहिती होती ? सिनेमा न पाहताच किती ऋन्मेषला कुस्तीबद्दल धागे काढावेसे वाटत होते ? हे सिनेमाचे यश आहे. एका महावीरसिंगच्या जिद्दीची कहाणी आणि मुलींना दिलेल्या सन्मानाची ही कहाणी आहे हे महत्वाचे आहे. त्यात सिनेमा यशस्वी झालेला आहे.

त्या दृष्टीने फेरफटका यांचा प्रतिसाद बोलका आहे.
बाकी ज्या गोष्टी सिद्ध करणे शक्य नाही त्याबद्दल तू काढणार असणा-या खुसपटांबद्दल आधीच पास.

संदर्भ :

१. http://www.huffingtonpost.in/rudraneil-sengupta/the-story-of-these-six-w...
२. http://timesofindia.indiatimes.com/home/sunday-times/all-that-matters/Wh...
३. http://www.livemint.com/Sports/NsXGRuUsw0lgK5zEjZYMvN/Haryanas-sports-po...

सपना छान लिहिलंय, परफेक्त अगदी, पण बाळ शांत बसत नाही, त्याला प्रत्येक ठिकाणी स्वतःच पावशेर ठेवायचा असतोच आणि त्या साठी त्याच्या कडे मुद्दा असण्याचीही गरज नसते. बघाच आता

अंकु, जसा चित्रपटाकडे बघण्याचा चित्रपट प्रत्येकाचा द्रुष्टीकोण वेगळा असतो तसे धाग्याकडे बघण्याचाही प्रत्येकाचा दृष्टीकोण वेगळा असतो. कोणाला गरज वाटते कोणाला नाही स्मित
खरे तर ही पोस्ट मी व्हॉटसअपवर फिरवायला लिहिली होती. दंगलविरोधात यंदा फारसे व्हॉटसप मेसेज न फिरल्याने मी निराश झालेलो. म्हणून म्हटले हिच संधी, आपण काहीतरी मुद्दा काढून फिरवूया. तेवढेच आपले नाव होईल. कधी तुमच्या ग्रूपवर अगदी हेच तंतोतंत फिरले तर हे आमच्या मायबोलीच्या रुनम्याने लिहिलेय असे सांगून थोडा भाव खाऊन घ्या >>>>
हे राम,, एवढा मोठ एक्सप्लेनेशन का ????? Sad
मला गरज वाटते मी धागा काढला.बस्स एवढच लिहायच की रे.

सपना. फेरफटका तुमचे प्रतिसाद आवडले आणि पटले.

चित्रपट आणि डॉक्यूमेंट्री ह्यात फरक असतो. चित्रपटात थोडीफार सिनेमॅटीक लिबर्टी घेतली जाते आणि त्याच भावनेने आपण चित्रपट पहायचा असतो. चित्रपट पहिल्यानंतर कोच इव्हिल आहे असे कोणाला वाटले असेल तर ते थोडे हास्यास्पदच आहे

Pages