HORN - (NOT) OK - PLEASE

Submitted by सचिन काळे on 17 December, 2016 - 22:16

तुम्ही लेखाचं शीर्षक पुन्हा वाचून पाहिलंत ना? अहो, वाक्य चुकलेलं नाहीए. तुम्ही बरोबरच वाचलंय. OK च्या अगोदर मी NOT टाकलाय. NOT म्हणजे नाही, नको! झालंय काय कि 'HORN OK PLEASE 'ह्या वाक्याची लोकांना एवढी सवय झालीय कि सर्वांना वाटायला लागलंय कि HORN वाजवणं OK आहे. हॉर्न वाजवायला सर्वांचीच संमती आहे. कुठेही कधीही आपल्याला हॉर्न वाजवायचा परवानाच मिळालाय. त्यावर पुन्हा पुढे PLEASE चं आर्जव लावलंय. म्हणजे अगदी हातापाया पडून "हॉर्न वाजवा हो वाजवा" असं म्हटल्याचा फिल येतोय.

हॉर्नचा इंग्रजीत अर्थ आहे, प्राण्यांचं शिंग. पूर्वीच्या काळी प्राण्यांचं पोकळ शिंग मिळवून त्यात जोरात हवा फुंकून ते वाजवलं जाई. आठवलं का? आपल्याकडे युद्धाचे रणशिंग फुंकले असा वाक्प्रचार आहे. मग कालांतराने पितळी धातूचे शिंग (बिगुल) बनवून ते फुंकून वाजवण्याची प्रथा आली. आणि आता त्याच शिंगांचे आधुनिक रूप वाहनात बसवलेय. पण नांव तेच राहिले. अहो कुठलं काय विचारता? HORN!

हॉर्न वाजवण्याचं बाळकडू आपल्या आईवडिलांनीच आपल्याला आपल्या लहानपणी पाजलेलं असतं. आठवा तो प्लास्टिकचा बिगुल नाहीतर पिपाणी, जी आपण बेंबीच्या देठापासून फुंकत फुंकत सारी गल्ली डोक्यावर घेत असू. बालपणी झालेल्या सरावामुळेच आता जो तो हॉर्न वाजवत रस्त्यांवरच्या रणांगणावर जीवनाची लढाई लढायला सज्ज झालाय.

आता हेच पहा ना! क्रॉसिंगला लाल सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत सर्व वाहनं थांबलेली असतात. आणि जसा लाल सिग्नल हिरवा होतो. जो तो हॉर्न वाजवायला सुरु करतो. जसं सर्व म्हणताहेत, "निघा! निघा! लवकर निघा! हिरवा सिग्नल पुन्हा लाल व्हायच्या अगोदर पुढे सटका." आणि चुकून त्यात जरका काही कारणाने एखाद्याने गाडी उचलायला थोडा जरी जास्त वेळ लावला, तर मागचे सर्व हॉर्नचा आरडा ओरडा करून रस्त्याला रणांगणाचे स्वरूप आणतात. तर कधी रिकामी रिक्षा असलेला रिक्षाचालक रस्त्याने चालणाऱ्या प्रत्येक पादचाऱ्याच्या मागून पीss पीss असा हॉर्न मारून त्यांच्यात आपला भावी पाशींजर शोधत आपल्या पोटापाण्याची लढाई लढत असतो.

अजून एक गंमत सांगतो. ज्या गोष्टी माणसांनी आपल्या तोंडाने बोलायच्या असतात त्याकरता लोकं आजकाल हॉर्नच्या गोंगाटाचा कसा वापर करायला लागलेत ते पहा!

मुलांना शाळेत पोहचवणारे ते रिक्षावाले काका! बिल्डिंगच्या खाली आले, कि रिक्षाचा पीss पीss हॉर्न वाजवून बाळाच्या आईला जणू ओरडून सांगत असतात. "आणा!आणा! बाळाला लवकर खाली आणा. शाळेत जायला उशीर होतोय. एखादा हिरो आपल्या मित्र नाहीतर मैत्रिणीला बिल्डिंगच्या खाली येऊन जोरजोराने हॉर्न वाजवून सांगत असतो "ए! चल आटप लवकर. पिक्चरला जायला उशीर होतोय आपल्याला" तर कधी पिकनिकला जाणारे तयार होऊन गाडीत बसलेले अर्धे जण बाकीच्यांना हॉर्न वाजवून, जोरजोरात ओरडून सांगत असतात "ए आटपा रे लवकर! आमचा पिकनिकचा मूड घालवू नका" रस्त्याने चालणाऱ्या एखाद्या कॉलेज कन्यकेच्या मागून येऊन एखादा मोटरसायकलस्वार कॉलेजकुमार मुद्दाम हॉर्न वाजवून तिचे लक्ष वेधायचा प्रयत्न करून जणू म्हणत असतो "अगं सुंदरी! तुझ्या नजरेच्या फक्त एका कटाक्षाला मी आसुसलोय गं!"

अहो! मला वाटतं, अशा हॉर्न वाजवून बोलणाऱ्या लोकांना नक्की वाटत असेल कि ह्या हॉर्नला बोलता आलं असतं तर किती बरं झालं असतं. कमीतकमी पीss पीss पोंss पोंss असा हॉर्नचा विचित्र आवाज तर नसते काढत बसायला लागले असते.

जगात शौकीन लोकं पुष्कळ दिसतात. त्यामध्ये नवनवीन प्रकारच्या हॉर्नचा शौक करणारेही दिसून येतात. त्यात पहिल्या प्रकारचे शौकीन येतात, ज्यांना वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीने दिलेला हॉर्नचा आवाज पसंत नसतो. पुळचट आवाज वाटतो त्यांना तो! मग काय! नेतात वाहन कारागिराकडे आणि वाढवून आणतात त्याचा आवाज. आणि बोंबलत फिरतात, दणकट आवाज काढत गावभर.

दुसऱ्या प्रकारचे तेे शौकीन असतात, ज्यांना वेगवेगळे आवाज काढणारे हॉर्न आवडतात. उदाहरणार्थ डुक्कर हॉर्न, गाढव हॉर्न, पिपाणी हॉर्न. कोणी बेसावध असताना मागून असा हॉर्न वाजवला तर तो जागच्या जागी फूटभर उडालाच पाहिजे. त्यातल्या त्यात आवाजाची रेंज वाढत जाणारे हॉर्न, म्युसिकल हॉर्न ऐकायला थोडंफार सहनेबल आहेत. पण हायवेवरच्या काही ट्रकड्रायव्हरने लावलेले प्रेशर हॉर्न! बापरे बाप! आवाजाने आपला कान फुटला नाही तरी बधिर नक्की होणार ह्याची पक्की ग्यारंटी मी लिहून देतो.

आणि ते रिव्हर्स हॉर्न! अरारा! आणि त्यातली ती किंचाळणारी गाणी! सगळ्यात फेमस गाणं म्हणजे, मेरा मन डोssले, मेरा तन डोssले! वाहनांच्या पुढच्या हॉर्नचा त्रास काय कमी होता जो मागच्या बाजूला अजून एक लाऊन ठेवला. रात्री बेरात्री बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडया लावणाऱ्यांचे रिव्हर्स हॉर्नचे आवाज, नाहीतर पहाटे दोन तीन वाजता कॉलसेंटरमध्ये काम करणार्यांना सोडायला आलेल्या गाड्यांच्या रिव्हर्स हॉर्नचे आवाज, सोसायटीत आपल्या बिछान्यात गाढ झोपलेल्या लोकांच्या झोपेचं पार खोबरं करून टाकतात बुवा हे लोक!

काही वर्षांपूर्वी कोणा एका विद्यार्थ्याने एक प्रिपेड पद्धतीचा हॉर्न बनवला होता. आपण जसं मोबाईलमध्ये जेवढ्या रुपयांचा टॉकटाईम टाकतो तेवढाच वेळ आपणांस बोलता येते. तसंच त्या हॉर्नमध्ये जेवढ्या रुपयांचा आपण रिचार्ज करू, तेवढाच वेळ तो हॉर्न वाजू शकत होता. त्यावेळी तो प्रयोग काळाच्या पुढे होता. मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी करणे शक्य नव्हते. पण आता जरका अशा प्रीपेड हॉर्नचं उत्पादन केले आणि सरकारने तो सर्वांना आपल्या वाहनावर लावण्याची सक्ती केली, तर आपले जास्त पैसे खर्च होतील ह्या भीतीने लोकं हॉर्नचा सांभाळून वापर करतील आणि लोकांच्या विनाकारण हॉर्न वाजवण्याच्या सवयींवर आपोआप नियंत्रण येईल.

मला ट्रॅव्हलस् बसचा असा एक ड्रायव्हर माहित आहे, ज्याला एकदा 'No honking zone' मध्ये हॉर्न वाजवला म्हणून पोलिसाने पकडले होते. तेव्हा त्याने शपथ घेतली होती कि मी कधीही शहरात प्रवेश केल्यावर हॉर्न वाजवणार नाही. आणि आजपर्यंत तो आपण घेतलेली शपथ पाळत आलेला आहे. विशेष म्हणजे, शहरात हॉर्न वाजवत नसल्याने त्याचे आजपर्यंत काहीही बिघडलेले नाही.

वाहनांना हॉर्न असूच नये असे माझे काही म्हणणे नाही. वाहनांना हॉर्न जरूर असावा. सर्वांच्याच सुरक्षिततेच्या दृष्टीने तो जरुरीच आहे. पण तो वाजवताना काहीतरी तारतम्य निश्चितच बाळगले जावे. हॉर्नचा कमीतकमी वापर होईल हे बघितले जावे, जेणेकरून ध्वनीप्रदूषण आटोक्यात राहील. हॉर्न वाजवण्याची गरज भासेल तेव्हा आपल्या वाहनाचा वेग कमी करून हॉर्न वाजवणे टाळता येईल. अहो, आपल्या वाहनाचाच आवाज एवढा येत असतो कि पादचाऱ्याला अगोदरच माहित असते कि आपले वाहन मागून येत आहे. ध्वनीप्रदूषण आटोक्यात ठेऊन, लहान बालके, गरोदर स्त्रिया, आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक यांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे हे आपल्यासारख्या सुबुद्ध नागरिकांचे कर्तव्यच नाही का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याचदा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन हॉर्न वाजवतात. तुझ्या मागे मी आहे नाहीतर गपकन वळशील हे सांगणारा संदेश हा हा असुरक्षिततेतुन येतो. काही माणसे ही गोंगाटप्रिय असतात त्यांना हॉर्न ही सुविधा नसुन त्यांचा अधिकारच वाटतो. तो वाजवला नाही तर आपले अस्तित्व कोलमडून पडेल याच भय वाटत.

आमचे सर सांगायचे अणुबॉम्ब प्रत्येक देशाजवळ असणे गरजेचे आहे, पण त्याचा वापर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे...........तसेच ते लॉग टेबलबद्दल सांगायचे.........आणि तेच हॉर्नबद्दल सुद्धा लागू पडते.

बर्‍याचदा प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन हॉर्न वाजवतात. तुझ्या मागे मी आहे नाहीतर गपकन वळशील हे सांगणारा संदेश हा हा असुरक्षिततेतुन येतो. >>>> अगदी. मी १००% याच कारणासाठी हॉर्न वाजवते.
मुर्ख बायकर्स रस्त्यावर सैरावैरा गाड्या चालवत असतात, त्यांना 'मी मागे आहे' हे सांगण्यासाठी किंवा 'ए गाढवा' हे म्हणण्यासाठी हॉर्न वाजवला जातो. Angry

त्यांना 'मी मागे आहे' हे सांगण्यासाठी किंवा 'ए गाढवा' हे म्हणण्यासाठी हॉर्न वाजवला जातो. >>> Biggrin

माझं पण मत हेच आहे की वाहनांना हॉर्न नसला तरीही चालेल. फक्त अगदी अतिशय तिरके वळण असेल तरच या वळणावरून मी येतेय इतकं सांगण्यापुरतं हॉर्न ची गरज भासू शकते/भासते.

गेल्या काही दिवसात माझ्याही टु व्हिलर चा हॉर्न नव्हता वाजत. माझं काही अडलं नाही.
त्याच दरम्यान मी सोसायटीच्या पार्किंग मधुन बाहेर निघाले होते, पुढे एक घोळका चालला होता, त्यात म्हातारे, लहान मुलं इ सगळे होते, मी त्यांच्यामागून हळू हळू गेले, हॉर्न तर तसाही वाजत नव्हता. शेवटी घोळक्यातल्या एका बाईचे लक्ष गेले तिने पाहिलं आणि सगळ्यांना बाजूला व्हायला सांगितलं, आणि मला उद्देशून म्हणाली अगं हॉर्न वाजवायचा की... मी काही बोलले नाही. फक्त हसले.

हॉर्न वाजवून आपल्यासाठी जागा निर्माण करून घेणं हे इतकं सवयीचं झालंय की तो आपल्याला आपला हक्क वाटतो.

हि समस्या भारतातील काहीच शहरांपुरती आहे का ? मुंबईत आणि इथे अंगोलातही माझे घर अगदी हमरस्त्याच्या शेजारी आहे. क्वचितच हॉर्न कानावर पड्तो !

प्रदूषणाचे म्हणाल तर रस्त्यावर मध्यभागी चालणाऱ्या बायकांसाठी किंवा कानाला इअर फोन लावून चालणाऱ्या कॉलेज कन्यकांसाठी आपण कर्णा न वाजवता जर ब्रेक लावला तर करण्याने होणाऱ्या ध्वनी प्रदूषणापेक्षा गाडी चे पेट्रोल जास्त जाळून अधिक प्रदूषण होईल.
बाकी उगाच कर्णा वाजवत जाणारे लोक उच्छाद आणतात हि वस्तुस्थिती.

काही काही वेळा कर्कश्श हॉर्न वाजवणार्‍या लोकांच्या कानाखाली तेवढ्याच कर्कश्श ओरडून एक खेचावी असे वाटते, आणि त्याहीपुढे जाऊन शूट अ‍ॅट साईट असा कायदा असावा की काय असे वाटते. Angry

हि समस्या भारतातील काहीच शहरांपुरती आहे का ? नाही शाघाई शहर पण कारण नसताना हॉर्न वाजवण्यासाठी प्रसिध्द होते. तिथे पण वन वे मध्ये विरुध्ध दिशेने गाडी वरुन हॉर्न वाजवत जात होत्या. ( जश्या पिंपरी चिंचवड मध्ये मुम्बई पुणे हायवे च्या साईड रोड वर उलट्या दिशेने गाड्या हॉर्न वाजवत जातात ) .
२००७ मध्ये शाघाई मुन्सीपाल्टीने शहरात कारणाशिवाय हॉर्न वाजवल्यास दंड केल्यापासुन कमी झाले आहे. २०१३ पासुन त्यानी ही पेनल्टी उपनगरात पण लागु केली आहे.

लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपणां सर्वांना धन्यवाद! आपण देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्यासारख्यांना दोन शब्द लिहिण्याचा हुरूप येतो. आपले पुनः एकवार आभार!

सचिन काळे हा लेख वर्त॑मानपत्रात आला पाहिजे असे वाटते.

गेले तीन वर्ष हॉर्न न वाजवता गाडी चालवत आहे. कुठेही काही अडत नाही. हॉर्न वाजवला काय, नाही वाजवला काय, लोक काय हटत नाहीत. गाढवांना हॉर्न वाजल्यावर काय करावं हे कळतं पण माणसं ढिम्म असतात.

पहिल्यावर्षी हॉर्न नादुरुस्त झाला, दुरुस्त करायला पैसेच नव्हते म्हणून ठेवला तसाच. नंतर सवय झाली हॉर्नलेसची! Happy हॉर्ण वाजवण्याची उबळ येणे हा प्रकार जसा कमी होत गेला तसा रस्त्यावरचा अवेरनेस वाढला व.मानसिक शांतीही प्राप्त झाली. Happy

तर मंडळी, नविन वर्षासाठी "हॉर्नशिवाय एक महिना" असा संकल्प सोडा आणि फायदे तोटे सांगा.

@ प्रकाश घाटपांडे, सचिन काळे हा लेख वर्त॑मानपत्रात आला पाहिजे असे वाटते.>>> होय, मलाही वाटते. विनाकारण हॉर्न वाजवणे, हॉर्नचा गैरवापर करणे आणि त्यामुळे ध्वनीप्रदूषण होऊन इतर लोक वेठीस धरले जाणे हा आजचा ज्वलंत सामाजिक प्रश्न बनलेला आहे. आणि याची नोंद विविध प्रसारमाध्यमाद्वारे सर्वांनी घ्यावयास हवी असे वाटते.

रेडिओ मिरचीने चालु केला होता ना एक उपक्रम ' don't be horny' Wink त्याचा उल्लेख हवाच इथे या धाग्यावर.

हॉर्नची गरज नाही हे ठिक, योग्य तिथे किंचितच वाजवावा हे ठिक, पण बर्‍याच वेळा मी घाबरुनच हॉर्न वाजवते. वाट्टेल तसे गाड्या चालवणारे आणि चालणारेही प्राण कंठाशी आणतात. अचानक उंच डिव्हायडरवरुन तुम्हाला न दिसता अचानक कारसमोर उडी मारणारे कोणी समोर आलं की कर्कश्य हॉर्न वाजवला जातोच. त्यात भीती आणि शिवी दोन्ही असतं. पण म्हणुन मी हॉर्न वाजवण्याचं समर्थन करत नाही. कधी कधी ती प्र्तिक्षिप्त क्रिया असते एवढच म्हणायचं होतं.

अर्थात सिग्नलला एका जागेवर उभं राहुन उग्गीच हॉर्न वाजवणार्यांना मात्र फटके द्यायला हवेत.

Horn not ok.jpg

संजय साळुंखे! एक शोफर, जे गेली सोळा वर्षे हॉर्न न वाजविता वाहन चालवितात. आणि इतर लोकांनाही हॉर्न न वाजविण्याचं आवाहन करतात.

http://awaaz.org/driving-me-crazy-the-chauffeur-who-always-drives-silent...

ऋ कडे क्लास लावलास कि काय ? Lol

बाकि, पुण्यात हॉर्न वाजवू नये या मताला मी फारशी भीक घालत नाही. जिथे लोकांना रस्ता हा वाहनांसाठी असतो याची फिकीर नसते, माझा जीव तुमच्या भरोसे या थाटात मोबाईलवर बोलत गपकन वळणारे लोक असतात, आपल्या बाजूच्या वाहनांकडे न पाहता विरुद्ध बाजूच्या वाहनांकडे पाहत रस्ता ओलांडण्यासाठी अचानक रस्त्यावर लोक येतात तिथे हॉर्न अति आवश्यक आहे.

शिवाय रस्त्यात दोन गाड्यांवर थांबून गप्पा मारणारे, घोळक्याने चालणारे यांना आपण नेमके काय करतोय हे चांगलेच माहीत असते. अशांना हॉर्न देणे गरजेचे असते. तो अधिकार नसून "समजत नाही का हा रस्ता आहे " हे सांगणे असते आणि हॉर्नची ही भाषा अस्सल पुणेकराला चांगली कळत असल्याने तो ही दोन्ही हातांची बोटे विरुद्ध दिशेला प्रश्नार्थक वेंगाडून, चेह-यावर "काय पावटेगिरी आहे " म्हणून खांदे उडवतो.

काही महारथी तर हॉर्न दिल्यावर आत बसलेली बाई कोण आहे, दिसायला बरी आहे हे न्याहाळून मगच बाजूला होत असतात. अशांना हॉर्न दिल्यावर अजिबात राग येत नाही.

शेवटी काय... व्यक्ती तितक्या प्रकृती.

मी देखील गेल्या काही महिन्यांपासून जाणीवपूर्वक हॉर्नचा वापर टाळतो आहे, परंतु मागचे वाहनचालक कधीकधी विनाकारण हॉर्न वाजवून चीड आणतात. अनेकदा माझ्यासमोर बस उभी असते (जी माझ्यामागे रांगेत असणाऱ्या किमान ३-४ जणांना तरी सहज दिसत असेल, तरीही हॉर्न वाजवत बसतात, जणू काही यांचे हॉर्न वाजवणे ऐकून बसमध्ये चढणारे/ उतरणारे धावपळ करणार आहेत! असो.

काही गाड्यांच्या मागील काचेवर मी एक विशिष्ट प्रकारची चौकोनी (साधारण १ फूट x १ फूट) आकाराची काच बसवलेली बघितली आहे. ज्यामुळे आपल्या पुढे किती traffic आहे हे मागील वाहनचालकाला 'त्या' काचेत दिसते. (ते पाहून त्याने हॉर्न वाजवू नये, ही माफक अपेक्षा!) त्या काचेला काय म्हणतात ते कोणी सांगेल का???

@ सचिन काळे, च्रप्स, नुसता लेख वर आला म्हणून समाधान नका मानू. मी एक प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर द्या!!!

राती अपराती जे रिवर्स हॉर्न वाजीवतात त्यांना रातभर एका बंद खोलीत कोंडून हॉरन्सचे आवाज ऐकवन्याची शिक्षा द्यावी.

@ च्रप्स, नाही, तो Display नव्हता. तशी technology आत्ताकुठे (गेल्या २ वर्षात) samsung कंपनीने आपल्या ट्रकसाठी वापरली आहे, Argentina मध्ये.
https://www.youtube.com/watch?v=E1h_XCaL_f0

काही महिन्यांपूर्वी बाजारात मोबाईलवरील चित्रपट मोठ्या आकारात (आणि काहीसा 3D इफेक्टमध्ये) पाहण्यासाठी एक काच स्टॅण्डसह आली होती (किंमत ६०-१०० रु.), साधारण त्याप्रकारची होती ती काच ज्याबद्दल मी म्हणतो आहे.

@ mr. pandit, काकेपांदा, मेघा प्रतिसादाकरिता आपले आभार.

(घाबरत घाबरत आभार लिहितोय. विक्षिप्त_मुलगा दम भरतात Uhoh )

Pages

Back to top