Good morning म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती जेव्हा सकाळी भेटतात तेव्हा एकमेकांना नम्रपणे अभिवादन करताना बोलला जाणारा आंग्ल भाषेतील शब्द. एकमेकांशी बोलण्याकरीता काहीतरी विषय असावा म्हणून सकाळच्या उल्हासपूर्ण वातावरणाचा आपल्या अभिवादनात समावेश केला असावा. आपण जेव्हा कोणत्याही, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे जातो तेव्हा संभाषणाची सुरवात कुठून करावी हा प्रश्न पडतो. खरं तर दोघांनाही थोडेफार अवघडल्यासारखे होत असते. तेव्हा झालेली कोंडी फोडण्याकरिता एकमेकांना 'Good morning' अर्थात 'आजची सकाळ किती सुंदर आहे!!!' असं एकमेकांशी बोलून संभाषणाची सुरवात केली जाते. तसेच आपण जेव्हा कोणालाही Good morning बोलतो, तेव्हा आपण त्याला हेसुद्धा दर्शवित असतो कि माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही किंतु नाही. माझे मन स्वच्छ आहे. मी तुझ्याशी कधीही बोलायला तयार आहे. आणि मला वाटतं, Good morning बोलण्याचा हाच मोठा फायदा आहे. आपले एकमेकांशी संभाषण लगेच मनमोकळ्या आणि आनंदी वातावरणाने सुरु होते.
शाळा संपून जशी नोकरी सुरु झाली तसा ह्या Good morning शी माझा जास्त संबंध येऊ लागला. कामावरच्या सहकाऱ्यांशी आणि साहेबांशी बोलताना, बाहेरील समाजात वावरताना, सोसायटीतील लोकांत मिसळताना, कुठल्याही समारंभांंना उपस्थित राहताना, फोनवर बोलताना माझी Good morning ची देवाणघेवाण होऊ लागली. संभाषण सुरळीत आणि उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात होऊ लागले.
असेच दिवस जात होते. कधीकधी मराठी माणूस भेटला तर तो 'नमस्कार' बोलून संभाषणाला सुरवात करी. पण माझ्या तोंडून 'Good morning' च निघत असे. का कोण जाणे 'नमस्कार' बोलायला संकोच वाटत असे. तसं बघा!, ट्रेन, टेबल, स्टेशन, ऑफिस, हॉर्न हे आंग्ल शब्द मराठीत एवढे रुळलेत कि आगगाडी, मेज, फलाट, कार्यालय, कर्णा असं बोलणं आता आपल्याला शक्यही होणार नाही. अगदी आपण हे शब्द रेटून जरी बोलू लागलो, तर इतर लोक आपणांकडे कोणी परग्रहवासी असल्यासारखे पाहू लागतील. हळूहळू मला वाटू लागलं कि 'नमस्कार' बोलायला आपणाला संकोच का वाटायला हवा. हा तर आपल्या मराठी मातृभाषेतला शब्द आहे. आपण लहानपणी शाळेत असल्यापासून हा शब्द शिकत आलो आहे. मग तो व्यवहारात वापरायला संकोच का वाटायला हवा. झालं! तेव्हापासून कोणाच्याही 'Good morning' ला प्रतिसाद मी प्रयत्नपूर्वक 'नमस्कार'ने देऊ लागलो. 'नमस्कार' म्हटल्याबरोबर समोरची व्यक्ती जराशी स्तब्ध होई. पण नंतर लगेच 'नमस्कार'ने प्रत्युत्तर देई. मला ते फार आवडे.
हळूहळू मी 'नमस्कार' बोलायलाही रुळलो. मग एकदा असेच वाटले कि सकाळी सकाळी आपण लोकांना 'नमस्कार' ऐवजी 'सुप्रभात' म्हणून अभिवादन केले तर!!? 'सुप्रभात' म्हटले कि माझ्या डोळ्यापुढे तो डोंगराआडून उगवणारा सूर्य, झुळूझुळू वाहणारे ओढ्याचे पाणी, तो गाईचा गोठा आणि वासरू, नांगर खांद्यावर घेऊन जाणारा तो शेतकरी, ते वाऱ्यावर डोलणारे शेत, असं प्रसन्न वाटणारे चित्र उभे राहिले. मला तो 'सुप्रभात' शब्द खूप आवडला.
मग काय! सकाळी सकाळी मला जोही भेटे त्याला मी 'सुप्रभात'ने अभिवादन करू लागलो. समोरासमोर असो कि फोनवर, कुठल्याही ठिकाणी माझ्या तोंडून 'सुप्रभात'च निघू लागले. आता कोणीही 'Good morning' बोलो, कि 'नमश्कार'! माझा मात्र 'सुप्रभात' ठरलेला असतो. 'सुप्रभात' म्हणताना माझ्या मनात कुठेतरी सुखावल्याची, आनंदाची भावना येते. आताशा माझ्या ऑफिसमध्ये मला पाहून सगळेच 'Good morning' ऐवजी 'सुप्रभात' स्वतःच आवर्जून म्हणतात. आणि मला खात्री आहे कि ते इतर ठिकाणीसुद्धा 'सुप्रभात'च म्हणत असतील.
असा आहे माझा 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा प्रवास.
मी १२वी ला असताना आमचे IT चे
मी १२वी ला असताना आमचे IT चे सर, आम्ही good morning म्हटलो तरी सुप्रभातच म्हणायचे....
या लेखाने त्यांची आठवण झाली......
<<<<<<<<'सुप्रभात' म्हटले कि माझ्या डोळ्यापुढे तो डोंगराआडून उगवणारा सूर्य, झुळूझुळू वाहणारे ओढ्याचे पाणी, तो गाईचा गोठा आणि वासरू, नांगर खांद्यावर घेऊन जाणारा तो शेतकरी, ते वाऱ्यावर डोलणारे शेत, असं प्रसन्न वाटणारे चित्र उभे राहिले.>>>>>>> +११११११११११११११
सचिन खूप छान.. लेख आवडला
सचिन खूप छान.. लेख आवडला ,
परंतू जर आपण कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये वावरतो आहे तर नमस्कार / सुप्रभात तितकंसं चांगल नाही वाटणार , लोकल मध्ये किंवा एका विशिष्ट परिघातल्या लोकांसमोर बोलू शकतो, तुमचा 'Good morning' पासून 'नमस्कार' ते 'सुप्रभात' पर्यंतचा प्रवास चांगला आहे, त्याबद्दल काही शंका नाही . फक्त एक वेगळा पैलू मांडला.
नमस्कार ! राम राम पण म्हणत
नमस्कार !
राम राम पण म्हणत होतात का कधी
आजकाल जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, राधे राधे, हरि ओम ई. शब्दांचा पण वापर केला जातो.
मी स्वतः नमस्कार या शब्दाचा उपयोग करतो.
दिवसाच्या कुठल्याही प्रहरी याचा वापर करता येतो. १२ वाजले का? गुड मॉर्निंगच म्हणावे का गुड आफ्टरनून म्हणावे असा कसलाही विचार करायला लागत नाही व आपण चुकीचे ठरत नाही. हा मोठा फायदा.
उत्तम विचार. मी पण माझ्या
उत्तम विचार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण माझ्या बर्याचश्या बिझनेस असोसिएटसशी फोनवर बोलतानाची सुरवात "राम राम" किंवा "नमस्ते" ने करतो. आणी त्यांना ते वावगे वाटत नाही. आणी आता तर दोन-तीन जण आहेत की तेच स्वतःहुन "रामराम / नमस्ते" ने सुरवात करतात.
सकाळी सकाळी तेवढच देवाचे नाव
सकाळी सकाळी तेवढच देवाचे नाव म्हणून राम राम म्हणायची पद्धत पडली
>>>> मी प्रयत्नपूर्वक
>>>> मी प्रयत्नपूर्वक 'नमस्कार'ने देऊ लागलो <<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी अगदी, हेच माझेबाबतीतही झाले....
आता मात्र आलेल्या/केलेल्या दूरध्वनीवरही सुरुवात "नमस्कार, लिंब्या बोलतोय" किंवा कोणी भेटले तर व्यवस्थितरित्या दोनही हात जोडून नमस्कार म्हणणे हे सहजगत्या होते, व त्याचा "अभिमानही" वाटतो.
माझी मातृभाषा समृद्ध असताना का म्हणून मी परक्या भाषेचा "आश्रय" घेऊ?
परधर्मो भयावहः इतकेच परभाषा भयावहः हे मला मान्य आहे.
लेख आवडला, पण सुप्रभात हा
लेख आवडला, पण सुप्रभात हा शब्द देखील तितकासा मराठी नाही ! ते सरळ सरळ गूड मॉर्निग चे भाषांतर आहे.
आपण नमस्कार करतो ( एकमेकांना ) तो ही अर्धवट केल्यासारखा वाटतो. थायलंड मधे, दोन्ही हात व्यवस्थित जुळवून, अंगठ्याने आपल्या कपाळाला स्पर्श करुन, किंचीत झुकून नमस्कार केला जातो. त्यात नेमका भाव दिसतो असे मला वाटते ( इंडोनेशिया आणि श्री लंका मधेही अशी पद्धत आहे )
गेल्या भारतभेटीत मला अनेक ठिकाणी ( सुपर्मार्केट मधे वगैरे ) अशी नमस्कार करायची पद्धत दिसली. चांगली गोष्ट आहे ही !
लेख वाचल्याबद्दल आणि
लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपणां सर्वांना धन्यवाद! आपण देत असलेल्या प्रोत्साहनामुळेच माझ्यासारख्यांना दोन शब्द लिहिण्याचा हुरूप येतो. आपले पुनः एकवार आभार!
लेख आवडला, पण सुप्रभात हा
लेख आवडला, पण सुप्रभात हा शब्द देखील तितकासा मराठी नाही ! ते सरळ सरळ गूड मॉर्निग चे भाषांतर आहे.
>> 'सुप्रभातम' संस्कृत शब्द आहे. तुम्ही ते सुब्बालक्ष्मींचे 'तव सुप्रभातम' ऐकले असेलच.
आपण नमस्कार करतो ( एकमेकांना ) तो ही अर्धवट केल्यासारखा वाटतो. थायलंड मधे, दोन्ही हात व्यवस्थित जुळवून, अंगठ्याने आपल्या कपाळाला स्पर्श करुन, किंचीत झुकून नमस्कार केला जातो. त्यात नेमका भाव दिसतो असे मला वाटते ( इंडोनेशिया आणि श्री लंका मधेही अशी पद्धत आहे )
>> छान आहे हि पद्धत सुद्धा. भारतात आपण कधीकधी चेहेर्याकडे बघून संभाषणाला सुरुवात केली तर छातीपाशी हात जोडलेले चटकन लक्षात देखील येत नाहीत.
गेल्या भारतभेटीत मला अनेक ठिकाणी ( सुपर्मार्केट मधे वगैरे ) अशी नमस्कार करायची पद्धत दिसली. चांगली गोष्ट आहे ही !
>> हो का? मी तरी अजून पाहिले नाही.
सचिनजी.. लेख छान आहे.
(No subject)
हो पियू, सुप्रभातम.. मी अनेक
हो पियू, सुप्रभातम.. मी अनेक वर्षे ऐकतोय. पण तो शब्द मराठीत रुढ नव्हता.
तो व्यकटेश्वराला उद्देशून म्हंटलेला आहे ना ? तामिळ लोक, वण्णक्कम, एन्ना स्वामी, एन्ना समाचारा ? सापडामा ?
वगैरे बोलताना ऐकलेत.
सकाळी पहिल्यांदा भेटल्यावर, पहिल्यांदा काय बोलायचे, याची गावोगावची रित निराळी आहे.
काय, कसं काय ? / राम राम / मग काय, निवांत ? / कुनीकडं ? / बरा असा मा ... असे बरेच आहेत.
समोरचा माणूस बघून पुडी
समोरचा माणूस बघून पुडी बांधायची.
ऑफिसला कामानिमित्त गोर्यांशी बोलणे होते तिथे गूड मॉर्निंग नून ईवनिंगनेच काम होते.
बाहेर एखाद्या तरुणीला भेटले तर हाय हेल्लोनेच प्रकरण पुढे जाते.
घरी कोणी चाळीशीच्या पुढचे पाहुणे आले खास करून विवाहीत तर छातीशी हात जोडून नमस्कार.
बायका तिशीच्या पुढच्या असतील, विवाहीत असतील तर नमस्कार.
हा स्त्री-पुरुष भेद एवढ्यासाठीच की आपल्याकडे असा पटकन एखाद्या परपुरुषाने हायहेल्लो केलेले, किंवा हात मिळवायला पुढे केलेला प्रत्येकीला रुचेलच असे नसते.
हायफंडू सर्कलमध्ये हग करणे तसेच गालाला गाल लावणे जितक्या सहज चालते ते बघून कौतुक वाटते.
मी सगळ्यात पहिल्यांदी
मी सगळ्यात पहिल्यांदी फेसबुकवरच "गुड मॉर्निंग" म्हणायला सुरवात केली आणि मग व्हाट्स अप वर आले तर गुड मॉर्निंग च उदंड पीक .गुड मॉर्निंग ची जागा अधून मधून सुप्रभातनेही घेतली . कधी कधी शुभ सकाळ . सकाळ सकाळी गुड मॉर्निग च्या पाट्या ग्रुप वर नाहीतर पर्सनल कॉन्टॅक्स वर टाकायच्या कि कस बरं वाटत पण समोरासमोर गुडमॉर्निंग क्वचितच . ऑफिस मध्ये गेल्या गेल्या मस्टर वर साईन करताना " आली का एकदाची ? " अशीच बॉस ची नजर असायची . तिथे गुडमॉर्निंग वगैरे काही नसायचं
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
छान विषय आहे.
छान विषय आहे.
आमच्या नात्यात एक कर्नल होते. त्यांना गुड मॉर्निंगला उत्तर दिले नाही तर राग येई. मग ते क्लास घेत असत. गुड मॉर्निंग हे अभिवादन सुद्धा आहे, शुभेच्छाही आहेत आणि एक संस्कार देखील आहे. समोरच्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करून त्याला दिवसाच्या सुरूवातीच्या शुभेच्छा देणे हा फक्त उपचार नाही. आजच्या दिवसाची सुरूवात दोघांच्यात शुभेच्छांनी व्हावी. आम्ही लहान असल्याने त्यांना उत्तर देत असू. पण मोठी माणसे अनेकदा सांगूनही त्यांना प्रत्त्युत्तर देत नसत. फौजेत तशी सक्ती करता येते पण सामान्य लोकांवर सक्ती नाही करता येत.
एखाद्याने अशा शुभेच्छा देत राहणे आणि त्याला प्रत्त्युत्तर न देणे हे नक्कीच खटकण्यासारखे आहे. पण टोकाला जाऊ नये. भारतीय समाजातले नमस्कार, रामराम म्हटले तरी चालू शकते. पण अनेकदा लोकांना याची जाणिव नसते. त्यामुळे अपेक्षा ठेवू नयेत. तीन वेळा आपण शुभेच्छा द्याव्यात. समोरचा प्रतिसाद देत नसेल तर पुन्हा त्याला शुभेच्छा देऊ नयेत. संबंध चांगले ठेवावेत. शुभेच्छांचा हेतू तोच असतो. त्या न दिल्याने संबंध बिघडू नयेत.
एखादा शुभेच्छा तर देत नाही पण त्याला शुभेच्छा देणे बंद केल्यावर चीड्चीड व्यक्त करत असेल , स्वत; शुभेच्छा न देता आपल्यावरच आगपाखड करत असेल तर दोघातले नाते हे असमान तत्त्वावर आहे असा त्याचा अर्थ होतो. अशांना न बोलता देखील समजावून सांगता येते.
रामराम, नमस्कार, खुदा हाफीज, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभप्रभात, शुभसकाळ अशा शुभेच्छा देणे ही चांगली सवय आहे. ती थोपूही नये आणि अपेक्षाही ठेवू नयेत. ज्यांना नाही आवडत त्यांना शुभेच्छाही देऊ नयेत. त्याच्या बाकीच्या चांगल्या गोष्टी पहाव्यात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कर्नलसाहेबांसारखे लेक्चरही देऊ नये.
मी तर कधीच सुप्रभात सुप्रभात
मी तर कधीच सुप्रभात सुप्रभात म्हणत नाही. कारण तुमची सुप्रभात आमच्यासाठी कुप्रभात असते. दिवस उगवला की अंग भाजायला लागतं. मग मी काय म्हणायचं ?
पा आ, तुम्ही सुप्रपोळी म्हणा.
पा आ, तुम्ही सुप्रपोळी म्हणा. भात नको. तसंही सकाळचं ऊन तुमचं सर्व अंग पोळी.
ज्यांचं अंग भाजतं त्यांना
ज्यांचं अंग भाजतं त्यांना सुप्रभात म्हणण्याची अजिबात सक्ती नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आत्म्याचं सुप्रभात अपेक्षित पण नाही
शालेय जीवनातील इतक्या
शालेय जीवनातील इतक्या दिवसांची शिक्षकांना नमस्ते म्हणण्याची ती सवय, पण नंतर मात्र नमस्ते म्हणणे इतके सहज वाटत नाही, कारणही हेच की दुसरे कसा प्रतिसाद देतील.