तीन पैशाचा तमाशा!

Submitted by चिमण on 11 December, 2016 - 14:10

१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती! सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघणं अपरिहार्यच होतं. तमाशा बघताना असं कुठेही जाणवत नाही की आपण हे रुपांतर बघत आहोत इतकं पुलंनी ते रुपांतर चपखल आहे, आपलंसं करून टाकलं आहे. त्यामुळेच मूळ नाटकात नक्की काय होतं आणि पुलंनी रुपांतर करताना कुठे आणि कसे बदल केले हे समजून घेण्यात मला स्वारस्य होतं. पण ते नाटक बघण्याचा योग बरीच वर्ष काही आला नाही. शेवटी २०१६ सप्टेंबरमधे लंडन मधील रॉयल नॅशनल थिएटर ते सादर करणार असल्याचं समजल्यावर ती संधी दवडणं शक्यच नव्हतं. शिवाय ते नाटक बघायला लंडनला जाण्याची पण गरज नव्हती कारण त्याचं थेट प्रक्षेपण जगभरच्या २००० चित्रपटगृहांमधे होणार होतं. त्यामुळे मला ते तब्बल ३८/३९ वर्षांनी का होईना इथे ऑक्सफर्डच्या एका चित्रपटगृहामधे विनासायास बघायला मिळालं.

सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे हा तमाशा १९७८ मधे प्रथम आला आणि मला वाटतं ४/५ वर्षानंतर बंद देखील पडला. त्यामुळे बर्‍याच जणांनी त्याचं नावही ऐकलं नसण्याची शक्यता आहे म्हणून आधी त्याबद्दल थोडी माहिती दिलेली बरी पडेल! जॉन गे याने इंग्रजीतून लिहीलेल्या १८ व्या शतकातल्या 'द बेगर्स ऑपेरा'चं १९२८ मधे जर्मन भाषेत भाषांतर झालं 'Die Dreigroschenoper' म्हणजेच 'द थ्री पेनी ऑपेरा' या नावाने! १९३३ मधे नाझी सत्तेवर आल्यानंतर दिग्दर्शक ब्रेख्ट आणि संगीतकार कर्ट वेल यांना जर्मनी सोडावं लागलं पण तोपर्यंत या नाटकाची १८ भाषांमधे भाषांतरं होऊन युरोपभर १०,००० च्या वर प्रयोग पण झाले होते, इतकं ते गाजलं! 'द थ्री पेनी ऑपेरा' हे नाव देखील तसं वैशिष्ट्यपूर्णच आहे. ऑपेरा बघणे ही त्या काळी फक्त उच्चभ्रू लोकांनांच परवडणारी आणि प्रतिष्ठेचा मापदंड समजली जाणारी गोष्ट होती. आपल्याकडे गाण्यातलं काहीही न समजणारा पण 'आम्ही कधी सवाई चुकवतच नाही' असं नाक उडवून सांगणारा एक वर्ग आहे, तसंच काहीसं! म्हणूनच हा थ्री पेनी इतक्या तुच्छ किमतीचा ऑपेरा सर्वसामांन्यांचा आहे असं सुचवलं आहे. हे नाटक म्हणजे 'नाही रे' वर्गाचं 'आहे रे' वर्गावरचं एक भाष्य आहे असं म्हणता येईल.

या नाटकाबद्दल अधिक बोलण्याआधी त्याची रूपरेषा सांगतो.

याची सुरुवातही उल्लेखनीय म्हणावी लागेल. कारण सुरुवातीला नाटकाचा सूत्रधार बजावतो की इतर नाटकांमधून जशी नैतिकतेची शिकवण दिली जाते किंवा काही बोधामृत वगैरे पाजायचा प्रयत्न होतो तशी अपेक्षा या नाटकाकडून करू नका! या नाटकातून कसलीही शिकवण द्यायचा प्रयत्न केलेला नाही! नंतर 'द बेगर्स ऑपेरा' मधे होते तशी हांडेल नावाच्या एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शकाच्या ऑपेरातल्या गाण्याच्या विडंबनाने एक नांदी होते. मग एक फाटक्या कपड्यातल्या माणूस मॅकहीथ ऊर्फ मॅक नामक एका कुप्रसिद्ध गुंडाच्या कर्मकहाण्या गाण्यातून सांगतो. हा काळ व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जरासा आधीचा आहे.

जोनाथन पीचम याचा भिकार्‍यांना शिक्षण द्यायचा धंदा आहे. तो त्यांना शिक्षण दिल्यानंतर त्यांना भीक मागण्याचा परवाना विकतो शिवाय त्यांच्या भीकेतलं ५०% कमिशन घेतो. पहिल्या अंकाची सुरुवात एका विनापरवाना होतकरू भिकार्‍याला संस्थेत प्रवेश देण्यावरून होते. याला इतर परवानाधारक भिकार्‍यांनी बडवून संस्थेच्या कार्यालयात पाठविलेले असते. त्याला भिक्षेकरी प्रशिक्षण संस्थेची माहिती दिल्यानंतर आपली मुलगी पॉली काल रात्रीपासून घरी आलेली नाही हे पीचम पतिपत्नीच्या लक्षात येतं. पॉलीने मॅकशी, अगदी त्रोटक ओळख असताना देखील, लग्न करायचं ठरवलेलं असतं. इथे पॉली आणि मॅक यांच्या लग्नाचा प्रवेश चालू होतो. लग्नासाठी आणि संसारासाठी लागणार्‍या वस्तू व खाद्यपदार्थ मॅकच्याच गॅंगने इकडून तिकडून ढापून आणलेल्या असतात. लग्नाला खुद्द पोलीस कमिशनर टायगर ब्राऊन जातीने हजर असतो. तो मॅकचा जिवलग मित्र असतो. ते दोघे पूर्वी सैन्यात बरोबर असताना त्यांची मैत्री झालेली असते. पॉली नंतर घरी येऊन तिच्या लग्नाची बातमी देते. आई वडिलांच्या रागाला भीक न घालता ती त्याच्याकडे जायचं ठरवते आणि वर पोलीस कमिशनर कसा त्याचा जानी दोस्त आहे ते पण सांगते. पीचमला अर्थातच ते पसंत पडत नाही आणि तो मॅकला फाशीवर लटकविल्याशिवाय स्वस्थ न बसण्याचं जाहीर करतो.

दुसर्‍या अंकात पॉली मॅकला बजावते की तिचा बाप त्याला तुरुंगात पाठविल्याशिवाय रहाणार नाही. मॅकला शेवटी ते पटते आणि तो लंडन सोडून जायची तयारी करतो. जाण्यापूर्वी पॉलीला त्याचा धंदा संभाळता यावा म्हणून त्याच्या काळ्या धंद्याची आणि त्याच्या सहकार्‍यांची माहिती आणि त्यांना कसं हाताळायचं हे तो तिला सांगतो. पण लंडन सोडायच्या आधी तो त्याच्या आवडत्या कुंटणखान्यात त्याच्या आधीच्या प्रेयसीला, जेनीला, भेटायला जातो. तिथे ते त्यांच्या जुन्या प्रेमाचे गोडवे गातात. पण मॅकला हे माहिती नसते की पीचमच्या बायकोने जेनीला मॅक आला की पोलिसांना खबर देण्यासाठी पैसे चारलेले आहेत. ती पोलिसांना खबर करते. मग टायगर ब्राऊनच्या हातात काही रहात नाही, तो मॅकहीथची माफी मागतो पण त्याला तुरुंगाच्या कोठडीपासून वाचवू शकत नाही. तुरुंगात त्याची अजून एक प्रेयसी ल्युसी (टायगर ब्राऊनची मुलगी) आणि पॉली एकाच वेळी येतात. तिथे त्या दोघींचं मॅक नक्की कुणावर प्रेम करतो यावर जोरदार भांडण होतं. पॉली निघून गेल्यावर ल्युसी भोवळ आल्याचं नाटक करून जेलर कडून किल्ली मिळवते आणि त्याची सुटका करते. ते पीचमला समजल्यावर तो टायगर ब्राऊनला भेटतो आणि भिकार्‍यांच्या झुंडी पाठवून राणीच्या राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा विचका करण्याची धमकी देतो.

तिसर्‍या अंकात जेनी पीचमकडे तिचे पैसे मागायला येते, ते सौ. पीचम द्यायचे नाकारते. श्री. पंचम जेनीला बांधून आणि तिचे हाल करून मॅकचा ठावठिकाणा काढून घेतो. नंतर टायगर ब्राऊन पीचम आणि त्याच्या भिकार्‍यांना मिरवणुकीच्या आधीच अटक करण्यासाठी येतो. तेव्हा त्याला भिकारी अगोदरच मिरवणुकीच्या रस्त्यावर उभे आहेत आणि फक्त पीचमच त्यांना थांबवू शकतो हे समजतं आणि तो हवालदील होतो. मॅकला पकडून त्याला फाशी देणे हा एकमेव पर्याय त्याच्यापुढे शिल्लक रहातो. पुढच्या प्रवेशात मॅक परत तुरुंगात आलेला दिसतो पण जेलरला पैसे चारून सुटका करून घेण्याचा मेटाकुटीचा प्रयत्न करत असतो. लवकरच त्याला समजतं की पॉली किंवा त्याचे सहकारी यापैकी कुणीही तितकी रक्कम उभी करू शकत नाही किंवा त्यांना ती करण्याची इच्छा नाही आणि तो नाईलाजाने मरायला तयार होतो. मॅक सगळ्यांकडे गाण्यातून क्षमा याचना करतो. आता तो फाशी जाणार इतक्यात पुन्हा एकदा सूत्रधार उगवतो आणि म्हणतो की आम्हाला असा दु:खी शेवट करायला आवडत नाही. आम्हाला लोकांना रडवून पैसे कमवायचे नाहीत. मग रहस्यमयरित्या एक दूत राणीचा निरोप घेऊन येतो आणि सांगतो की मॅकला खुद्द राणीने माफी दिलेली आहे, इतकंच नाही तर त्याच्या भविष्याची तजवीज देखील केली गेलेली आहे. इथे नाटक संपते.

ऑपेराचं मराठीत आणण्यासाठी कोणता नाट्यप्रकार सोयीचा ठरेल? मला तरी ऑपेराच्या जवळचे मराठीत दोनच नाट्यप्रकार आहेत असं वाटतं. एक संगीतनाटक आणि दुसरा तमाशा! तमाशाच्या लवचिकतेमुळे पुलंनी तमाशा स्विकारला असावा. त्यामुळे मूळ संकल्पने पासून ते थोडे दूर गेले. ऑपेरा प्रतिष्ठित लोकांसाठीच असायचा, पण तमाशा मुख्यतः सर्वसामान्य लोकच बघत असत, ती प्रतिष्ठित लोकांनी बघायची गोष्ट नव्हती. शिवाय तमाशा म्हंटल्यामुळे प्रथेनुसार त्यात त्यांना गण गवळण हेही घालावं लागलं. अर्थात त्या दोन्ही गोष्टी लवकर आवरल्या आहेत म्हणा!

इथे मूळ नाटकातली इंग्रजीत भाषांतरित केलेली गाणी ऐकलित तर समजेल की पात्रांचा वेगळेपणा गाण्यातून तितकासा जाणवत नाही. सर्व पात्रं साधारणपणे एकाच शैलीची गाणी म्हणतात. मूळ नाटकातील गाणी ही जॅझ आणि जर्मन नृत्यसंगीताच्या शैलीवरची आहेत. पुलंनी मात्र गाणार्‍या पात्रांचा वेगळेपणा त्यांच्या गाण्यातून सुद्धा कसा दिसेल हे पाहिलं आहे. भिक्षेकरी प्रशिक्षण संस्था चालविणारे पंचपात्रे दांपत्य (पीचम) हे आधी संगितनाटकात अभिनय करणारं दाखवलं आहे त्यामुळे त्यांची गाणी तशा प्रकारची आहेत. मालन (पॉली) व लालन (ल्युसी) यांची गाणी भावगीत/सुगम संगित यात मोडणारी आहेत. तसेच रंगू तळेगावकर (जेनी) या वेश्येला लावणीशैली तर अंकुश नागावकर (मॅक) व त्याच्या गुंडांकरिता कोळीगीत वगैरे लोकसंगीताचीही तरतूद होती.

पण जब्बार पटेलांनी ही सांगितिक बैठक अधिक विस्तृत केली आणि आणखी रंगत, लज्जत, व विविधता आणली. रंगू तळेगावकरचं त्यांनी पुलंच्या संमतीने झीनत तळेगावकर असं धर्मांतर केलं. त्यामुळे गझल, ठुमरी, कव्वाली सारखे गायनप्रकार उपलब्ध झाले. पुलंनी तमाशातल्या सूत्रधाराला मूळ नाटकापेक्षा जास्त वाव दिला गेला आहे. पण हा नुसता बोलणारा सूत्रधार आहे, अर्थात मूळ नाटकातही तो गात नाहीच! पण जब्बार पटेलांनी दोन परिपाश्र्वक, पुलंच्या संहितेत नसलेले, घातले. (याच संकल्पनेचा वापर पुढे जब्बार पटेलांनी 'जैत रे जैत' मधे पण केला) तमाशातल्या पुढच्या प्रसंगाची गाण्यातून वातावरण निर्मिती करायची हे यांचं काम! रवींद्र साठे आणि मेलडी मेकर्स फेम अन्वर कुरेशी हे ते काम चोख पार पाडायचे! त्यांना गझल, पॉप, कोकणी तसंच हिंदी गाण्यांसारखी गाणी अशी विविध प्रकारची सुंदर गाणी मिळाली. पण हे बदल काहीच नव्हेत असा अफलातून बदल त्यांनी अंकुश नागावकरच्या (मॅक) गायनशैलीत केला. तो म्हणजे कोळीगीतांऐवजी पाश्चिमात्य संगीतातील अत्यंत लोकप्रिय पॉप/जॅझ संगीताचा वापर! त्यामुळे नाट्यमंचावर तबला पेटी व फार फार तर सारंगी यापेक्षा इतर कुठलीही वाद्यं न पाहिलेल्या प्रेक्षकांना प्रथमच गिटार, ड्रमसेट, अ‍ॅकॉर्डियन, व्हायोलिन, आणि सॅक्सोफोन सारख्या वाद्यांनी भरलेला वाद्यवृंद बघायला मिळाला. पण नुसती वाद्यं आणून ही नाविन्यपूर्ण कल्पना साकार झाली नसती. त्यासाठी थेट तशा शैलीच्या चाली बांधणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते भारतीय शास्त्रीय संगीतात आयुष्य घालविलेल्या संगीतकारांचं काम नव्हतं. पण हा बदल करण्याआधी जब्बार पटेलांच्या डोळ्यासमोर नंदू भेंडे असणार त्याशिवाय त्यांनी तसा विचार केला नसता! नंदू भेंडे याने तमाशात येण्याआधी मुंबईतलं इंग्रजी रंगभूमीवरील ‘जिझस ख्राईस्ट सुपरस्टार’ हे अलेक पदमसींच संगीत नाटक गाजवलं होतं. त्याने पुलंनी अंकुशसाठी लिहीलेल्या गाण्यांना जबरदस्त चाली तर लावल्याच पण त्याही पुढे जाऊन जिथे नुसते संवाद होते त्याचीही गाणी केली आणि अंकुशच्या भूमिकेतून म्हंटली.

तीन पैशाचा तमाशा लंडन ऐवजी मुंबईत होतो आणि आपल्याकडे राणीबिणी भानगड नसल्यामुळे राज्याभिषेकाच्या मिरवणुकीऐवजी राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीचा उल्लेख होतो. शेवटी येणार्‍या राणीचा दूताला फाटा देऊन मिष्किल पुलंनी तिथे साक्षात विष्णू म्हणजेच नारायण (जेलरचं पण नाव नारायणच असतं) अवतरवला आहे. अंकुशच्या गळ्यातून फाशीचा दोर काढल्यावर अंकुश त्याला विचारतो.. 'देवा! मी कसे तुझे उपकार फेडू'. त्यावर नारायण त्याला 'सावकाश! हप्त्याहप्त्याने दे!' असं सूचक उत्तर देतो. जायच्या आधी नारायण खड्या आवाजात म्हणतो..'आता अंधार करा रे! मला अंतर्धान पाऊ द्या!'.

कथानकात आणखीही काही बदल आहेत. लालन (ल्युसी) ही टायगर भंडारेची (टायगर ब्राऊन) मुलगी दाखवलेली नाही. तसंच पंचपात्रे झीनतचा छळ करून अंकुशच्या ठावठिकाण्याची माहिती काढताना दाखविलेला नाही.

ऑपेरातले संवाद मला इतके विनोदी वाटले नाहीत. जर्मन लोकांची विनोदबुद्धी सुमार असते अशा सर्वसाधारण समजाला धक्का न देण्याचं काम त्यांनी चोख पार पाडलंय. पुलंचे संवाद प्रचंड विनोदी आहेत, पुलंनी रुपांतर केलंय म्हंटल्यावर वेगळं काही होणं अपेक्षित नव्हतंच म्हणा!

पुलंचा सूत्रधार नैतिक शिकवण वगैरे बोलत नाही पण हे तीन पैसे कशाबद्दल लागणार आहेत ते तो सांगतो. तमाशाचं शीर्षक गीत चालू असतानाच तो म्हणतो एक पैशाचं गाणं होईल, एका पैशाचा नाच होईल आणि तिसरा पैसा लाच म्हणून घेतला जाईल. या शीर्षक गीताची चाल थोडी हिंदी गाण्यांसारखी आहे. शीर्षक गीताचे शब्द असे आहेत..
तीन पैशाचा तमाशा, आणलाय आपल्या भेटिला
इकडून तिकडून करून गोळा, नट अन नटी धरून भेटिला
आणलाssssss
आपल्या आपल्या आपल्या भेटीला!

यातलं 'तीन पैशाचा तमाशा' हे जवळ जवळ 'ओ माय लव्ह' या गाण्याच्या चालीसारखंच आहे आणि 'आपल्या आपल्या आपल्या' हे 'देखो देखो देखो देखो अ‍ॅन इव्हिनिंग इन पॅरिस' मधल्या देखो देखो सारख आहे.

खाली तमाशातली काही गाणी मला आठवतील तेव्हढी लिहीली आहेत.

अंकुश त्याच्या झीनत बरोबर घालवलेल्या त्याच्या आयुष्याचं वर्णन या पॉप धर्तीवरच्या गीताने करतो.
एक चिमुकली होती खोली, इवली केविलवाणी
त्या खोलीतील मी होतो राजा आणि ती होती माझी राणी
ओठावरती होती गाणी, होता इष्कबहार
नव्हती चिंता, होती एकच कशी टळेल दुपार
झीनतची अन माझी आमची प्रीत पुराणी
त्याची ऐका आता कहाणी, आमची प्रीत पुराणी

लढवुनी डोके सांगितले मी तिजला काय विकावे
निसर्गनिर्मित भांडवलावर चार घास कमवावे
त्या घासातील दोन तिचे अन दोन तिने मज द्यावे
बदल्यापोटी दुष्टापासून मी तिजला रक्षावे
झीनतची अन माझी आमची प्रीत पुराणी
त्याची ऐका आता कहाणी, आमची प्रीत पुराणी
(पुढची कडवी आता आठवत नाहीत. हे गाणं अगदी त्रोटक प्रमाणात इथे ऐकू शकाल. पण हे प्रत्यक्ष तमाशातल्या गाण्याचं रेकॉर्डिंग वाटत नाही. नंतर केलं आहे असं वाटतंय.)

गाणारे सूत्रधार पसायदानाचं हे विडंबन म्हणतात.
आता पैशात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज ज्ञावे । कसाईदान हें ॥

ते सुर्‍यांचे गंजणे सांडो, नित्य चाकुंची धार वाढो |
भोती परस्पर जडो | वैर जीवांचे ||

कसाई राहोत संतुष्ट | त्यांना लाभोत गाई पुष्ट |
अधिकातला अधिक भ्रष्ट | त्याते सत्ता मिळो सदा ||

अंकुश मुंबई सोडून निघून जायच्या आधी मालनला त्याच्या सहकार्‍यांची आणि त्यांच्याशी कसं वागायचं हे या जॅझ प्रकारातल्या गाण्यातून सांगतो. या गाण्याच्या सुरुवातीच्या कॉर्डस डेव्ह ब्रबेकच्या 'टेक फाईव्ह' या गाण्याच्या सुरुवातीच्या कॉर्डस सारख्या आहेत.
हरामखोर! सगळे हरामखोर!
हरामखोर! सगळे साले हरामखोर!
हा छक्क्या चारसोबीस याचा भरोसाच नाय
परभारी माल विकतो रोख पैसा द्यायचा नाय
तीन आठवड्याचा टायम दे, नाय सुधरला तर लटकू दे
भंडारे सायबाला निरोप दे
सायबाला सांगून काढून टाक त्याचा जोर
हरामखोर! सगळे हरामखोर!
हरामखोर! सगळे साले हरामखोर!

फासावर जायच्या आधी अंकुश या गाण्याने सगळ्यांची क्षमा याचना करतो.
माफ करा! माफ करा!
माफ करा! माफ करा!
हे जेलर वॉर्डर यांनी छळलं मला भारी
माझ्या वाटची ढापली त्यांनी अर्धी भाकरी
कायद्याच्या गप्पा मारून त्यावर जगणारी
हलकट साली सापाची अवलाद आहे खरी
सत्यानाश होऊ दे त्यांचा, सत्यानाशssss!
पण जाऊ दे साला, मारो गोली
त्यांना माफ करा!
माफ करा! माफ करा!
माफ करा! माफ करा!

पीचमच्या 'मॉर्निंग साँग' सारखं पंचपात्रे त्याच्या भिकार्‍यांना ही भूपाळी गाऊन उठवतो. पण पुलंची भूपाळी ऐकताना केव्हाही जास्त हसू येतं.
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!
नेमुन दिधल्या नाक्यावरती भिक्षा मागत सुटा!
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

आssss! देवद्वारी असेल जमली भक्तांची दाटी
अडवा त्यांना वाटेवरती पुढे करुन वाटी
अहो आंधळे दिवस उगवला
दिसते, डोळे मिटा
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

नयनीssss आणा
केविलवाणा श्वानासम भाव, भावssss
नयनीssss आणा!
ध्येय आपुले फोडित जाणे पाझर हृदयाला
अदय जनाना सदय करावे हा आपुला बाणा
नयनीssss आणा

दिसला जर का कुणी दयाळु
दिसला जर का कुणी दयाळु
पुरता त्याला लुटा
भिकाsssरी जनहो आता उठा! भिकाsssरी जनहो आता उठा!

ऑपेरातल्या 'व्हॉट कीप्स अ मॅन अलाईव्ह' या गाण्याचे हे सुंदर रुपांतर...
माणूस जगतो कशावरी? माणूस जगतो कशावरी?
दीड वितीच्या खळगीला या देवाने नच बूड दिले
जाळ भुकेचा पेटतसे निज देहाचे हे धूड दिले
या जाळाल विझणे ठाउक फक्त एकदा चितेवरी
माणूस जगतो कशावरी?

विनोदी संवाद आणि गाण्यातली वैविध्य यामुळे मला तरी पुलंचं रुपांतर ऑपेरापेक्षा सरस वाटलं.

तळटीपः दुर्देवाने मला आता गाण्यांचे सर्व शब्द आठवत नाहीयेत. आणि त्याहून मोठं दुर्देव म्हणजे तीन पैशाच्या तमाशाबद्दल फार काही माहिती नेटवरही उपलब्ध नाही. कुठेही तमाशाच्या गाण्यांचं रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. थ्री पेनी ऑपेराचे प्रयोग अजूनही होतात, त्यातली गाणी अजूनही ऐकली जातात, जगभरातले ऑर्केस्ट्रा त्यातल्या गाण्यांचे प्रोग्रॅम करतात. या पार्श्वभूमिवर आपल्या इथे झालेली उपेक्षा फारच खटकते!

-- समाप्त --

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच लेख. मी हा नाट्यप्रयोग पाहिला आहे. थिएटर अ‍ॅकेडमीच्या संस्थेच्या संग्रहात हे संगीत असू शकेल. त्यांनी डिजिटाइज केले पाहिजे. आता त्यातला उपरोध जास्तच चपखल बसतो.

जुन्या नाटकांचे काही मोजकेच प्रयोग नाट्यप्रेमींसाठी व्हावेत असे खुप वाटते. म्हणजे आधीच्या पिढीतील दर्जेदार कलाकृतींचा आस्वाद आताच्या नाट्यरसिकांना घेता येईल. मध्यंतरी सुनील बर्वेने काही नाटकांचे मोजकेच प्रयोग नाट्यरसिकांसाठी केले होते.
खूप छान लेख. तुलनात्मक परिचय आवडला.>>>>> +१००

छान अभ्यासपूर्ण लेख.
तीन पैशाचा तमाशा ही सर्व अन्गानी विषेशत्व असलेली नाट्यक्रुती. लेखन ,अभिनय ; सन्गीत आणि सादरीकरण.

माझा महाविद्यालयातला सहाध्यायी मित्र मिलिन्द मुळीक , "तीन पैशाचा तमाशा" च्या शेवटच्या काही प्रयोगात गिटारिस्ट म्हणून सहभागी झाला होता ! त्यामुळे हे नाटक खूप जवळून अनुभवले आहे.

हे नाटक ३-४ वेळा भारावलेल्या डोळ्यानी पाहिले आणि वेधक कानानी अईकले आहे. त्यामुळे आमचा पु. ल. देशपान्डेन्बद्दलचा आदर गगना एवढा झाला .

तीन पैशाचा तमाशा चे सन्गीत माझ्या आठवणीप्रमाणे तीन जणान्नी केले होते , भास्कर चन्दावरकर , आनन्द मोडक , आणि नन्दू भेन्डे.

लेखात राहून गेलेले महत्वाचे उल्लेख म्हणजे "पूर्णपात्रे" हे पात्र सादर करणारे चन्द्रकान्त काळे ; आणि "झीनत" साकारणार्या माधुरी पुरन्दरे यान्च्या नावचे. त्यान्चे गायन आणी अभिनय अतिशय दर्जेदार !

लेखाबद्दल धन्यवाद.

सर्वांना धन्यवाद!

अमा, थिएटर अ‍ॅकॅडमी मधे या गाण्यांचे रेकॉर्डिंग नाहिये. मी चौकशी केली होती.

पशुपत, माधुरी पुरंदरे आणि चंद्रकांत काळे यांचं गायन व अभिनय दर्जेदार होतं यात काही शंका नाही. माझा जिवलग मित्र उमेश देशपांडे जेलर व विष्णू यांची भूमिका करायचा आणि हमखास भरपूर हशा आणि टाळ्या मिळवायचा. यांचे उल्लेख मी मुद्दाम टाळले कारण मी अभिनय व गायन यांची तुलना करत नाहीये इथे. गायन व अभिनय दोन्ही नाटकात अप्रतिमच आहे. Happy

चिमण , मलाही तुलना करायची नहिये हो कुणाचिच, मला इतकच म्हणायच होत कि तीन पैशाचा तमाशा म्हन्टल कि नन्दु भेन्डे आणि रविन्द्र साठे यान्च्या बरोबर प्रकर्शाने आठवतात चन्द्रकान्त काळे आणि मधुरी पुरन्दरे !
उमेश देशपांडे यान्चा यान्चा जेलर आणि नरायण ही लक्शात आहे. मधे बोलताना थाम्बून तो सुदर्शन चक्राला दुसर्या हताच्या बोटानी गर्र्कन फिरवायचा .. प्रत्येक प्र्योगाला त्याने या लकबीला हमखास टाळ्या घेतलेल्या आठवतात.

छान लिहिलंयत!

आम्हाला 'पुलंच साहित्य' असा प्रोजेक्ट होता. त्यावेळी नाटकांच्या यादीत हे नाव होते. पण त्याबद्दल जास्त माहिती कुठेच मिळाली नव्हती.

छान लेख.. पण या नाटकावर टीकाही झाल्याचे आठवतेय. माझे बघायचे राहिलेच होते. इथे सविस्तर वाचून छान वाटले.

सर्वाना धन्यवाद!

निधी, हा लेख जरा उशीराच लिहीला म्हणजे मी! Happy

दिनेश, हो या नाटकावर खूप टीका झाली. त्यावेळेला पुल म्हणाले होते की .. ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेरावर त्यावेळेला जशी आणि ज्या प्रकारची टीका झाली तशीच याही नाटकावर झाल्याचा मला आनंद होतो आहे.

खुप लहानपणी हे नाटक बघितले आहे त्यामुळे जास्त काही आठवत नाहीये, पण अंकुश आमचा लई हुशार असे गाणे किंवा गाण्याची ओळ होती हे आठवत आहे.

बाकी लिखाण नेहमीप्रमाणेच छान.

निधी, हा लेख जरा उशीराच लिहीला म्हणजे मी! >> जरा नाही.. चांगला 7-8 वर्षे उशीरा लिहिलात. माझे 10 मार्कस् तरी गेले तुमच्यामुळे. Wink Light 1

निधी, तू फार मार्कांच्या मागे आहेस! १० वर्षांनी का होईना थोडी ज्ञानात भर पडली ते बघ Wink

धन्यवाद, ललिता आणि स्मिता! Happy