अर्थपुरुषाचा निरर्थक खेळ

Submitted by आदित्य जाधव on 6 December, 2016 - 14:16

या माझ्या पटलावरचे मोहरे सारे हलविले कोणी ? पाऊसही धो-धो पडतो.जिथे वळचणीची जागा निर्माण झालेली होती.जागा वळचणीची होती म्हणून काय मग वळचणीचा पाऊस म्हणून त्यांस संबोधन करणे महत्वाचे आहे काय ?
वारुळातून एका पाठोपाठ निघणाऱ्या त्या मुंग्याप्रमाणे (जिवाप्रमाणे) माझ्या मेंदूतून मागोमाग बाहेर पडणाऱ्या सर्वच घटनाक्रमाला,त्या क्षणांना एकत्र साधंणे यावेळी फारच कठीण वाटतं आहे.निळ्या मांत्रिकाची जादू.त्याची संमोहिनी उतरते न उतरते तोच, अचानक कुठूनतरी निघालेला सर्प लगेच डूख धरून बसलेला दिसतो. आता कुठून आणि कशी आळवावी त्या गारुड मांत्रिकाची धून ? धून, तो गारुड मांत्रिक, निळा मांत्रिक आठवला की अचानक भीती दाटून यावी हे माझ्याही आकलना बाहेर आहे, पूर्वजन्मी काही पातक घडले असावे याची आठवण करुन करुन देणारी ही संकेत बोधकथा नसेल तरी कशावरुन ?

पानगळातुन सरपटत गेलेला एखादा प्राणी दिसत मात्र कधीच नाही,परंतु त्या सरसरत जाणाऱ्या ध्वनीचा नाद इतका गंभीर असतो की, कोणती तरी अनामिक भिती अंगातुन, हाडांमासातून धावत पळत गारठून टाकत जात असते. कोणत्या तरी एका घटनेचा क्रम एकापाठोपाठ लावू म्हणत असताना अचानकच फासे फेकले जातात. डाव एकदमच उलटा पडतो आणि परत त्यावेळी मेंदूला हात लावून बसण्याची वेळ येते.अगदी तशीच वेळ परत आलेली आहे, मोहरे हलविले जात आहेत.वळचणीचा पाऊस आणखी कोसळत आहे, घटना घडतच आहेत, सोबतच निळ्या मांत्रिकाची संमोहिनी अजूनही तशीच आहे न विसरता,

संध्याकाळी गोठ्यात गायी परतत असताना, त्यांच्या पायधुळीत
कधी-कधी निळी सावलीही दिसते हे अजून महत्वाचे. देह थकून जातो तशा वेळी मला आठवते वेळ माझ्या निर्वाणीची, या निर्वाणीच्या माझ्या घटका थांबवू शकेल का ? वाढलेला दिवस आणि रात्र छोटी झालेली ?

मानवी आकलन शक्तीच्या बाहेर गेलेल्या या घटनांचा मागोवा घेताना देह थकून जातो. तेव्हाच निर्वाणीचे वरदान मागून घ्यावे वाटते, ऐच्छिक काही कारणास्तव रचलेला हा खेळ. या खेळातील यश आणि अपयशाचे पडसाद या ही जगतात उमटत रहावे हे ही तितके गंभीर नाही काय ? अजूनही त्याच्या या खेळातल्या प्रत्येक डावाचा, प्रत्येक व्यक्तिमत्वाचा, त्याच्या वैचारिक पात्रतेचा, त्याच्या असण्याचा किंवा न असल्यामुळे होणाऱ्या प्रत्येक परिणामांचा अर्थ लावता लावता मेंदूचा पार भुगा पडला जातो. हा या खेळाचा शाप समजायचा, उःशाप समजायचा की वरदान समजायचे याचे कोडे अजूनही उलगडलेले नाही. पावसाची शिरशिरी अंगभर कापरे भरत जाते तसेच शहारे आणणारा त्याचा हा अनाकलनीय खेळ,

त्या "सतीचा" दुर्दैवाची फेरा तिच्या पुढच्या जन्मांतही चुकलेला नव्हता, निळकंठाशी तिची ओळख होते काय, लग्न होते काय, अर्धांगिनी असताना तिचे कर्म करता करता तिला मरण येते. हाल-हाल करून तिला मारले जात असताना तिच्या सोबत पुत्र नसतो, पिता नसतो की पती ही नसतो. मागील जन्माचे भोग भोगता किंवा त्याची उतराई करता करता नियती परत आपला डाव मांडून बसते. त्यातलीच ही दुर्दैवी सती, या घटनेचा मागोवा घेता ही घटना लगेच दुसऱ्या घटनेशी हात मिळवून बसते, तेव्हा परत नजर येतो निःशस्त्र,हतबल,थकलेला अभिमन्यू, परंतु त्याच्या पूर्वजन्मी अशी काय पातकीपणाची घटना घडलेली माझ्यातरी ऐकिवात नाही. तरी त्याच्या वाट्याला असे भयानक मरण यावे याचा तरी काय बोध घ्यावा ?

इच्छा मरणाचे दान ही लाभत नाही मरणही येत नाही. मोठा झालेला दिवस आणि छोटी झालेली रात्र यांचा मध्य गाठता येईल का ? याची अजूनही वाट पाहतोय. विंचवाचा दंश अंगभर दाह पसरवत जातो.त्याचप्रमाणे अधूनमधून दंश करत सुटणारे हे छोटे छोटे क्षण त्याचे पडसाद मनाला घायाळ करत सुटतात. या वळचणीच्या जागेचा शोध आता लावलाच पाहिजे. त्याच्या आश्रयस्थानास असणाऱ्या सूर, असुर, दैवी कल्पनांवर घाव घालून त्याचा बिमोड केलाच पाहिजे, प्रत्येकास इच्छामरण दिले पाहिजे,प्रत्येकास मनाजोगे जगता यायला पाहिजे.एवढीच तर मानवाची सुप्त इच्छा असते.त्या निळ्या मांत्रिकाची धून, त्या गारुडाची संमोहिनी हतबल व्हायला हवी तेव्हाच कुठे भाव कल्पनेचा बंध तुटून पडेल आणि सुटून जाईल वळचणीच्या पावसाचे आणि त्यापासून निर्माण होणाऱ्या त्या पावसातल्या त्यांच्या सहोदर क्षणांचे निरर्थक कोडे, माझ्या गतजन्मीचा कोणी हालहवाला देत असेल तर माझ्या या जन्मीच्या क्षणांची एकसंध माळ निर्माण करून मला माझ्या इच्छेप्रमाणे जगण्याचे कोणी वरदान देईल काय ? मानवाच्या इच्छा-अपेक्षा मनात खूप दडलेल्या असतात. त्यातलीच एक इच्छा उचंबळून वरवर येते. त्याच्याच जात्यातला हा खेळ असतो.अशीच एक सुप्त इच्छा मी मागतो,

मला त्या निळ्या मांत्रिकाची धून, त्या गारुडाची संमोहिनी देऊन श्रेष्ठत्व बहाल कराल तर हे उलटे-सुलटे पडणारे नियतीचे फासे, वेदना संवेदना देणारे हे क्षण याची क्रमवार जुळवणी करून हा खेळ प्रत्यक्ष माझ्या मर्जीनुसार चालावा.
उलटं सूलट पडणारे हे फासे त्याचे मोहरे केवळ माझ्याच मनाप्रमाणे चालते बोलते व्हावे इतकीच माझी माफक इच्छा आहे,

@आदित्य अ. जाधव,उमरगा
०९४०४४००००४

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा! मला वाटलं डिमॉनेटायझेशनवर मोदीद्वेष्ट्यांकडून अजून एक धागा निघाला.

लेखनशैली खूप हटके वाटली. दोनदा वरवर वाचले. संध्याकाळी एकदा पुन्हा नीट वाचेन.

>>>>अरे देवा! मला वाटलं डिमॉनेटायझेशनवर मोदीद्वेष्ट्यांकडून अजून एक धागा निघाला.<<<<

मामी, तज्ञ हा सोपा शब्द उपलब्ध असताना हा एवढा मोठा शब्द कशाला?

हो

हो

इथे खरंच कमेंट्स रिपीट होत आहे...
मला वाटतंय एकतर सिस्टिम प्रॉब्लेम नाहीतर मग तुमचा प्रॉब्लेम(प्रतिसाद संख्या वाढविणे) दोन्ही पैकी एक nakki

Pages