इंटरमिटन्ट फास्टिंग/ अनुसूचित लंघन

Submitted by सई केसकर on 26 September, 2016 - 06:55

एप्रिल २०१६ पासून मी १० किलो वजन कमी केले. वजनाशी माझं जन्मो जन्मी चे (कटू) नातं आहे. आणि प्रसूती नंतर बायकांना दिवस रात्र भेडसावणारा हा एक महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याबद्दल लिहून कदाचित बाकीच्यांना मदत होईल असं वाटल . गेल्या दहा वर्षांत सतत व्यायाम आणि त्या वेळी जो योग्य आहार सांगितला जायचा, तो घेऊन मी वजन वाढीशी लढा देत होते. पण गर्भधारणे पूर्वीचा हा सगळा लढा माझ्या मनात फक्त माझ्या दिसण्याबद्दल होता. त्यामुळे त्याचे गांभीर्य मला फारसे कळले नव्हते. इथे आधी हे सांगायला हवं की कित्येक लठ्ठ व्यक्ती कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी न होता अतिशय चांगले आरोग्य जगत असतात. कित्येक लठ्ठ व्यक्ती आपण लठ्ठ आहोत म्हणून आधीपासूनच आहाराविषयी जागरूक असतात. जिम मध्ये जाणाऱ्या आणि शारीरिक हालचाल करण्याऱ्या कित्येक व्यक्ती लठ्ठच असतात. त्यामुळे लठ्ठ असूनसुद्धा चांगल्या प्रकारचा व्यायाम आणि आहार घेणाऱ्या कितीतरी व्यक्ती आपल्या आजूबाजूला दिसतात. एखाद्या लठ्ठ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे असं कळलं की आपोआप वजन कमी करायचा सल्ला मिळतो. पण जी व्यक्ती बारीक आहे, आणि हृदयरोगी आहे किंवा जिला उच्च रक्तदाब, मधुमेह अशा व्याधी आहेत, त्यांना तोच सल्ला दिला जात नाही. त्यांना आहार बदलायचा सल्ला मिळतो. अर्थात, या सगळ्या व्याधी फक्त लठ्ठ व्यक्तींना होतात हे सतत केले जाणारे विधान फारसे बरोबर नाही. लठ्ठपणा या व्याधींना आमंत्रण देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्या लठ्ठ व्यक्ती याला बळी पडत नाहीत आणि अचानक हृदयविकार होणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येत नाही.

प्रेग्नन्सीमध्ये मला गर्भधारणेत होणारा (आणि नंतर ताब्यात येणारा) डायबेटीस झाला. माझ्या डॉक्टरनी मला व्यायाम आणि आहार या दोन्हीच्या मदतीने तो ताब्यात ठेवायचा सल्ला दिला. त्याप्रमाणे साडे आठ महिन्यापर्यंत मी रोज ३० मिनटं पोहायचे. आणि साखर, फळं आणि कर्बोदके कमी करून मी साखर ताब्यात ठेवली. हे सगळं करत असताना असं लक्षात आलं की जर ही व्याधी कायमची पदरात पडली तर आहार किती नियमित ठेवावा लागेल. आणि माझ्या वडिलांना टाईप १ डायबेटीस असल्यामुळे ती शक्यता नाकारता येण्यासारखी नव्हती. म्हणून वजन कमी करण्याचा आत्ताचा प्रवास हा फारच अभ्यासपूर्ण होता.

नवव्या महिन्यापासूनच मी ऋजुता दिवेकर इत्यादी लोकांची पुस्तकं वाचू लागले आणि माझा मुलगा झाल्यावर सहा महिन्यांनी ते सगळे सल्ले अमलात आणू लागले. पण बाळ असल्यामुळे मला पूर्वीसारखा दोन दोन तास व्यायाम करता यायचा नाही आणि घरातून बाहेरदेखील पडता यायचं नाही. ऋजुता दिवेकरचं 'ज्ञान' वाचून एक तर तिच्या अभ्यासाबद्दल शंका आली, आणि तिचं डाएट फक्त २४ तास हातात प्लेट आणून द्यायला नोकर (नाहीतर खानसामे) असणारे लोकच पाळू शकतात याची खात्री पटली. पण सतत डाएट करूनही आणि चालणे वगैरे व्यायाम करूनही काही केल्या माझं वजन कमी होत नव्हतं. म्हणून मी शरीरातील मेद साठवणाऱ्या आणि वितळवणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करायचं ठरवलं. तसं करायला लागल्यावर मला कित्येक साक्षात्कार झाले. आणि कुठल्याही जिम ची मेंबर न होता किंवा डाएटिशियनचा सल्ला न घेता मी हा प्रवास करू शकले. या मागे दोन कारणं आहेत:

१. डाएटबद्दल डाएटिशियन्स मध्येच असलेले काही समज जे आता शास्त्रीय दृष्ट्या चुकीचे ठरलेले आहेत
२. वजन कमी करण्यासाठी व्यायामाला दिलेलं अतिमहत्व

वजन कसं कमी होतं हे जाणून घेण्यासाठी शरीरातील एका महत्वाच्या अवयवाबद्दल थोडी माहिती असली पाहिजे. ते म्हणजे पॅनक्रिया अर्थात स्वादुपिंड. या ग्रंथीला आपण शरीरातील "फूड डिस्ट्रिब्युशन मॅनेजर" असं म्हणू शकतो. आपण खाल्लेल्या अन्नातील ग्लुकोज आपल्या शरीराच्या कानाकोपऱ्यात नेण्याचे काम इथे तयार होणाऱ्या संप्रेरकांमुळे होत असते. स्वादुपिंडात अल्फा, बीटा, डेल्टा, गामा आणि इप्सिलॉन अशी नावे असलेल्या पेशी असतात. त्यातून वेगवेगळी संप्रेरके सोडली जातात. आणि कुठलं संप्रेरक कधी येईल हे मात्र आपण खाल्लेले अन्न ठरवते. यातील दोन महत्वाची संप्रेरके आहेत इन्सुलिन आणि ग्लुकागॉन.

इन्सुलिन (ज्याची कमतरता किंवा अभाव यात डायबेटीस २ आणि १ होतात) रक्तातील ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचे काम करते. इन्सुलिनचे हे एकच कार्य सामान्य लोकांना माहिती असते. पण इन्सुलिनचे दुसरे कार्य म्हणजे लिव्हर ला अतिरिक्त ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फॅट या रूपात साठवून ठेवायचे आदेश देणे. ग्लुकागॉन याच्या बरोब्बर उलट काम करतं. जेव्हा रक्तातील ग्लुकोज कमी होतं तेव्हा ग्लुकागॉन साठवलेल्या ग्लायकोजेनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करतं. आणि ग्लायकोजेन संपल्यावर ग्लुकोनियोजेनेसिस या प्रक्रियेतून कर्बोदके नसलेल्या पदार्थातून ग्लुकोज निर्मिती करतं. आणि फॅटचे किटोसिसनी केटोन मध्ये रूपांतर करतं. ग्लुकोज आणि कीटोन या दोन्ही इंधनांवर आपलं शरीर चालू शकतं.

फक्त खाण्याचा विचार केला तर शरीराच्या दोन अवस्था होतात. एक म्हणजे पोट भरलेली अवस्था आणि उपाशी अवस्था. इन्सुलिन हे मेजवानीचे संप्रेरक आहे तर ग्लुकागॉन हे दुष्काळाचे संप्रेरक आहे. या दोघांचे एकमेकांशी असलेले नाते सीसॉ सारखे असते. याचा अर्थ जेव्हा शरीरात कर्बोदकांचा प्रवेश होऊन इन्सुलिन वर जाते, तेव्हा ग्लुकागॉन सिक्रीट होऊ शकत नाही आणि परिणामी साठवलेलं ग्लायकोजेन, फॅट वापरलं जाऊ शकत नाही. जेव्हा खाल्लेलं अन्न पचवून इन्सुलिन चे प्रमाण कमी होते आणि शरीरात काही काळ दुष्काळ तयार होतो, तेव्हाच ग्लुकागॉन त्याचे काम करून चरबी वापरू शकते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर इन्सुलिन वाढवणारे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत किंवा दिवसातील काही भाग उपाशी राहिलं पाहिजे.

कुठलंही यशस्वी डाएट (वेट वॉचर्स, ऍटकिन, केटोजेनीक) कर्बोदकांचे प्रमाण कमी करूनच यशस्वी झालेले असते. कारण कर्बोदकांना इन्सुलिनचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळतो. त्यामुळे जेवणात ब्रेड, पास्ता, पोळी, भात, साखर याचे प्रमाण जितके जास्त तितके जास्त इन्सुलिन बनते. आणि दिवसातून जितक्यावेळा यांचे सेवन केले जाईल तितक्या वेळा इन्सुलिनची मात्रा वर जाईल. यातच दर दोन तासाने थोडं थोडं खाण्याच्या पद्धतीचा पराभव लिहिला आहे. जेव्हा आपण कुठल्याही व्यावसायिक मदतीविना डाएट करतो तेव्हा नकळत हळू हळू प्रत्येक छोट्या जेवणात कर्बोदकांचे प्रमाण वाढू लागते. आणि ऋजुता दिवेकर प्रणालीने दिवसातून ७-८ वेळा खाल्लं तर जास्त कर्बोदके खाल्ली जातात. त्यात हाताशी मदतीला कोणी नसेल तर मोठ्या मोठ्या चुका होतात. परिणामी वजन कमी होत नाही.

दर दोन तासांनी खाणं ही डाएट स्ट्रॅटेजी नापास होते यावर हल्ली बरंच संशोधन झालेलं आहे. आणि यातूनच इंटरमिटंट फास्टिंग हे हाय फाय नाव असलेलं पण भारतीयांना परिचित डाएट उदयास येत आहे. यात शरीराला रोज (किंवा आठवड्यातून काही दिवस) १६ ते २० तासांचे संपूर्ण लंघन देतात. म्हणजे दिवसभरासाठी ठरवलेली कर्बोदके आणि इतर घटक ४-८ तासात खाऊन उरलेले सगळे तास फक्त पाणी, कोरा चहा किंवा कोरी कॉफी पिणे. यामुळे शरीरात ग्लुकागॉन तयार होण्याची स्थिती तयार होते आणि फॅटचे विघटन होते. ही पद्धती आधी अवघड वाटली तरी एकदा सवय झाल्यावर कुठल्याही वातावरणात न मोडता वापरता येते. लंघन केल्यामुळे झोपेत सुधारणा होते (सुधारणा याचा अर्थ अतिझोपचे प्रमाण कमी होते). आणि मुख्य म्हणजे दोन वेळा पोटभर खाता येते. इंटरमिटंट फास्टिंग लोक वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक आठवड्यातील दोन दिवस ५०० कॅलरीज खातात आणि इतर दिवशी तीन वेळा जेवतात (फाईव्ह टू डाएट), माझ्या सारखे काही १६ तासाचा उपास करतात (ब्रेकफास्ट किंवा डिनर न घेता).

या जोडीला जर (फास्टिंग स्टेट मध्ये) ४० मिनिटापर्यंत व्यायाम केला तर थोडे जास्त वजन कमी होते. पण ४० मिनटं व्यायाम करून जर डाएट केले नाही तर मात्र वजन कमी होत नाही (आणि कधी कधी वाढते). आठवडाभर असे डाएट केले आणि रविवारी डाएट वरून सुट्टी घेतली की पुढच्या आठवड्यासाठी आपण पुन्हा सज्ज होतो. ही सुट्टीदेखील गरजेची आहे. कारण आपल्यासारख्या सुखवस्तू लोकांसाठी भूक कधी कधी बरीचशी मनातच असते. त्यामुळे मनाला उगीच सारखं रागवून गप्प ठेवण्यात काही अर्थ नाही. Happy

वजन कमी होणे हा लंघनाचा सगळ्यात कमी महत्वाचा फायदा आहे. मध्यम वयात होणाऱ्या डायबेटीसची (टाईप २) सुरुवात इन्सुलिन रेसिस्टन्सनी होते. जेव्हा अन्नातल्या ग्लुकोजयुक्त पदार्थांचे प्रमाण सतत जास्त असते, तेव्हा शरीरात सतत इन्सुलिन स्त्रवत राहते. आणि शरीरातील पेशींना अति इन्सुलिन असण्याची सवय होते. आणि त्यांची इन्सुलिन वापरण्याची, परिणामी ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे इन्सुलिन असूनही रक्तातील ग्लुकोज चे प्रमाण वाढायला लागते. लंघन केल्यानी किंवा कर्बोदके कमी केल्यानी पेशींची ही क्षमता पुनः पहिल्यासारखी होऊ शकते. थोडक्यात टाईप २ डायबेटीस योग्य आहारानी घालवता येतो (यासाठी दुसरी लिंक बघा).

लंघन केल्यानी मज्जासंस्था बळकट आणि दीर्घायुषी होते. अल्झायमर्स सारखा आजार लंघनाने दूर ठेवायला मदत होऊ शकते (यासाठी तिसरी लिंक बघा). गरजेपेक्षा सरासरी ३० टक्के कमी खाल्ल्याने मज्जासंस्था मजबूत राहते याचे पुरावे आता संशोधनातून दिसू लागले आहेत. पण आप्ल्या सगळ्यांच्या आयुष्यात दिवसातून एकदाच जेवणारे, नव्वदी ओलांडलेले खुटखुटीत आजोबा नाहीतर आजी असतात. आणि तल्लख बुद्धी, तीक्ष्ण स्मरणशक्ती, आणि उत्साही असण्यासाठी ते प्रसिद्ध असतात. अशा लोकांच्या आहारात डोकावून पाहिलं तर आपल्याला अजून कितीतरी गुरुकिल्ल्या मिळतील!

या विषयावरचे संशोधकांचे काही टॉक्स आणि लिंक्स मी इथे देत आहे.
१. पीटर आटिया (https://www.youtube.com/watch?v=UMhLBPPtlrY)
२.सारा हॉलबर्ग (https://www.youtube.com/watch?v=da1vvigy5tQ)
३. सान्ड्रीन थुरेट (https://www.youtube.com/watch?v=B_tjKYvEziI)

आलेल्या कॉमेंट्स मधून इथे काही मुद्दे अजून मांडावेसे वाटले

१. डायबेटिक लोकांनी फास्टिंग करण्याआधी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. पण कार्ब्स कमी करायला काही हरकत नाही.
२. बाळाला पाजवत असताना असली कुठलीही डाएट करू नयेत. जेव्हा बाळ इतर अन्नपदार्थ खाऊ लागेल तेव्हाच आईने आपल्या वजनाची चिंता करावी.
३. ज्यांना १६ तास न खाण्याची भीती वाटते त्यांनी प्रत्येक जेवणातले कार्ब्स कमी करून त्याची जागा सॅलेड्स आणि प्रोटीननी भरावी. जसं की २ फुलके आणि भात खाण्याऐवजी २ फुलके आणि एक पूर्ण वाटी डाळ आणि १ पूर्ण वाटी सॅलेड.
४. जेवणाच्या ताटाचा अर्धा भाग फायबरनी भरायचा (कोशिंबीर, सॅलेड) उरलेला २५% भाग प्रोटीन ने (नॉनव्हेज/डाळ/बीन्स/पनीर) आणि उरलेल्या २५% भागात कार्ब्स असावेत.
५. हे डाएट करताना पाण्याचे प्रमाण वाढवले तर डाएट ची सवय लवकर होते. आणि कधी कधी तहानेच सिग्नल भूक लागलीये असा घेतला जातो. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्यायले की भूक भूक होत नाही.
६. मी प्रोफेशनल डाएटिशिअन नाही आणि डॉक्टरदेखील नाही. हा लेख फक्त शरीराच्या जीवरासायनिक प्रक्रियांची माहिती देण्यासाठी आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो खाली दिलेल्या प्रोफेशनल डॉक्टर्सच्या संशोधनावर आधारित आहे. नुकतीच टाइम मॅगेझीनमध्ये देखील यावर चर्चा झालेली आहे ती मी इथे देते आहे.

http://time.com/4025410/meals-weight-loss/?xid=time_socialflow_facebook

माझे लेखन वाचण्यापेक्षा वाचकांनी या सर्व लिंक्स बघाव्यात. फास्टिंग बद्दल इंटरनेट आणि युट्युबवर खूप उलट सुलट माहिती दिली जाते. त्या प्रत्येक माहितीवर मी मत व्यक्त करू शकत नाही. पण मी दिलेले हे टॉक्स अधिकृत माहिती म्हणून वापरता येण्याच्या दर्जाचे आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा - भारतातले बरेच जण भारतीय जेवण करतात. रोजच्या रोज सेलड खाणारे कमी असतात. बेगल वगैरे पण कमी.
पण काहीजणांना पुरी भाजी खाताना बघितलय :p

इथे बरेच लोक "कॅलरी" हा शब्द वापरत आहेत, पण जेंव्हा कोणी २००० कॅलरी प्रतिदिन असे म्हणतो, तेंव्हा ते खरे तर २००० किलोकॅलरी असे असायला पाहिजे

टोचा बरोबर.
खाण्या / जाळण्याच्या बाबतीत आता १kcal = कॅलरी हे समीकरण झालंय.

I follow diet below. Can you tell me how many calories I am taking approx.
Morning - 6.00 AM one cup tea with 2 marie biscuits
7.20 AM - One bowl Museli Cornflakes (no added sugar) with Milk (no sugar or honey) OR egg white with brown bread
10.30 AM - One cup tea (some time)
12.00 PM - 2 chapatti with Dal and vegies + small portion of Salad or Dahi
3.30 PM- One apple or kiwi
6.00 or 6.30 PM - one cup tea with 2 marie biscuits
8.30 or 9.00 PM - Dinner - 2 chapatti with Dal and vegies + small portion of Salad or Dahi

Tea & Biscuits are my weak point and I am trying to get over it. Rice I eat may be 2/3 times in a month. On weekends the change is breakfast. I eat pohe / upma or Idli. On weekends sometime we eat outside.

बापरे! मी थोडेदिवस गायब होते त्यामुळे एकदम ४० कॉमेंट!

डायबेटिक लोकांनी शक्यतो साखर खाऊच नये. त्यामुळे त्या बरोबर फॅट वगैरे डिस्कशन नकोच!

आपण अप्रत्यक्ष कार्ब्स बरेच खातो. डेयरी, बीन्स, फळं. यामुळे डायबेटिक लोकांनी तरी सुक्रोज खाऊ नये वेगळं. कारण हे सगळे पदार्थ तुमची साखर वाढवत असतातच. त्यात पोळी भाकरी भातसुद्धा कमीत कमी खाल्ला तर अजून फायदा होईल.

मला पर्सनली बॅलन्स आवडतो. त्यामुळे लो कार्ब हाय फॅट डाएट कितीही आकर्षक वाटलं तरी माझ्याच्यानी ते होणार नाही.

पण मला असं वाटतं, की टाईप २ डायबेटिक लोकांनी आधी आहार जितका लो कार्ब करता येईल तितका करावा आणि मग ताशा आहाराला लागतील एवढीच औषधं घ्यावीत. कारण आजूबाजूला बघून मला असं जाणवतं की बरेच डायबेटिक लोक गोळी हे हवं ते खाता यावं यासाठीचा उपाय म्हणून घेतात. आहार हे पाहिलं औषध असावे. Happy

नानबा Lol जोक्स अपार्ट मला वाटतं आपल्या इथल्या पोळ्या आणि भात हे हेल्ती समजून जास्त खालले जातात आणि ह्या दोन्ही गोष्टींमुळे लोकांना पुढे लोकांना टाईप २ डायबिटीसला सामोरं जावं लागतं. मी एक दोन ठिकाणी वाचलं आहे त्या प्रमाणे गव्हाचं पीठ वाटतं तितकं फार हेल्ती वगैरे नाहीये. मैद्या पेक्षा चांगलं असलं तरी गव्हाची पार पावडर केल्यामुळे ते पटकन डायजेस्ट होतं. पटकन डायजेस्ट म्हणजे वेगाने रक्तात साखर सोडतं ह्या अर्थाने. ह्या उलट ब्राऊन राईस किंवा ओट्स थोडे बरे पडतात कारण ते आत बॉडी मध्ये ब्रेकडाऊन व्हायला वेळ लावतात आणि त्यातली साखर हळू हळू सोडली जाते. पोळ्या तशा इतक्या वाईट नाहीत पण अगदी हेल्ती आहेत समजून दुपारी ४ आणि रात्री ४ अशा खाऊ नये असं म्हणतोय मी.
सहसा आपल्या डायट मधल्या ज्या गोष्टी आपणा नेहमी खातो त्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे कारण तेच कधी कधी गनिमी कावा करतात आपल्यावर.

काल डायबेटीस विषयी एक टेड टॉक ऐकलं. It was very striking. त्या अमेरिकन बाई पण हेच सांगत होत्या की डायबेटिस म्हणजे एक प्रकारचा carbohydrate intolerance समजला गेला पाहिजे. एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी असली की आपण ती जशी कटाक्षाने टाळू तसेच कार्ब्स पण टाळले पाहिजे. म्हणजे गोळ्या घ्यायची गरज कमी होत जाईल.

सई, साखरे बरोबर फॅट हे डिस्कशन चालु नाहिये तर कोणत्याही पदार्थातले नकोसे कार्बोहायड्रेट्स बरोबर 'हेल्दी' फॅट खाणे ही चर्चा चालु आहे,

लेख चांगला लिहिलाय. धन्यवाद.

वैद्यबुवा, वरच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मी कार्ब्स कमी केले आहेत. बेतानेच खाते. फळे, भाज्या, मांस व्यवस्थित खाते. मल्टीवायटामिन्सही घेते. तरी हेमोग्लोबिन आयर्न कमी झाले आहे. ताणतणाव आहेच. थोडे दिवस मनसोक्त आवडिचे पदार्थ खाईन म्हणते. बघु काय फरक पडतो. रात्रि जेवत नव्हते एक महिना. वजनासाठी नव्हे तर काही व्यक्तिगत कारणामुळे. माझ्या बाबतीत तरी उपवास, लंघन, लो कार्ब्स यांचा चांगला परिणाम दिसला नाही.

पोळ्या तशा इतक्या वाईट नाहीत पण अगदी हेल्ती आहेत समजून दुपारी ४ आणि रात्री ४ अशा खाऊ नये असं म्हणतोय मी.
>>
खरं आहे. खरतर आपल्या इथे पिकणारी लोकल धान्य खायला पाहिजेत. त्या त्या रुतुमानाकरता सिजनल लोकल अन्न योग्य असतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसाने धान्य खायचं तर नाचणी वरइ राजगिरा असं खाल्लं पाहिजे.
शरीरालाही योग्य आणि पाणी प्रश्नही सुटेल आपला.

https://www.youtube.com/watch?v=fL5-9ZxamXc

वैद्य बुवा, तुमच्या गव्हाच्या टिप्पणीवर थोडा अजून प्रकाश टाकणारा हा टॉक आहे. टीम नोक्स हे साऊथ आफ्रिकेतील यशस्वी स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी जाहीर रित्या त्यांनी आधीच्या काळात दिलेल्या कार्ब्स खाण्याच्या सल्ल्यांबद्दल माफी मागितली. गव्हातील ग्लूटेन आणि त्याचा आतड्यावर होणारा विपरीत परिणाम यावरदेखील सध्या बरेच संशोधन चालू आहे. पण भारतीय लोकांनी लगेच घाबरून पोळी बंद करायचे कारण नाही. मला असं वाटतं कि अन्नाचे दुष्परिणाम जेव्हा सगळंच अन्न इंडस्ट्रियल प्रोसेस्ड असतं तेव्हा जास्त होतात. IMHO, भारतात अजून तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी घरी करायचे स्वातंत्र्य आहे. जसे की गव्हाच्या पिठात कोंडा किती असावा हे आपण आपले आपले गहू आणून ठरवू शकतो. तसेच दूध-दही-साय-लोणी या सगळ्याची व्यवस्था आपण घरीच करू शकतो. त्यामुळे बाहेरची बिस्कीट, ब्रेड, हॉटेलात जाणे, हे सगळं जर नियंत्रणात ठेवलं आणि हूं म्हणून पोळी-भात खायचं बंद केलं तर काही अवघड नाही.

ज्यांना असले टॉक्स, लिंक्स आणि माहिती वाचण्यात रस आहे त्यांनी मला फेसबुकवर ऍड करा. saee keskar.
हा माझा सध्याचा सगळ्यात आवडता छंद आहे.

धन्यवाद सई. बघतोच आहे आत्ता विडियो ब्रेक मध्ये.
मला खरं तुम्हाला विशेष धन्यवाद द्यायचे आहेत कारण your article could not have come at a more opportune moment than this in my life. एका लिमिट नंतर कधीच कमी न होणारं वजन आणि त्याही पेक्षा फॅमिली हिस्ट्री मधल्या डायबिटीस मुळे प्रत्येक वर्षी वाढत जाणारी माझी रिस्क ह्याला मला काहीच उत्तर सापडत नव्हतं. Please accept my sincere thanks as you may have practically prevented me from getting diabetes or if not that, at the least, extended the time period before I get hit with it. _/\_ Happy

धन्यवाद कसले! इट इज माय प्लेजर. ही सगळी माहिती आपल्या आजूबाजूलाच असते. तरी आपण भरमसाठ पैसे भरून जिम आणि हायफाय डाएट्सच्या मागे लागतो. आणि कुठलाही मार्ग निवडला तरी शेवटी आपल्यालाच शिस्त नाही म्हणून तो फसतो. त्यामुळे मला मिळालेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत विनामूल्य पोहोचावी हा माझा कायम प्रयत्न असतो. कुणालाही काही प्रश्न किंवा या बद्दल अधिक माहिती असल्यास मला मेल जरूर करा. saeekeskar@gmail.com.

सई, डॉ. नोक्स यांचं भाषण फार उत्तम आहे. The data are really convincing. काही ना काही कारणाने तू दिलेल्या लिंक्स पहायच्या राहून जात होत्या. आता सगळ्या लिंक्स बघते आणि महत्वाचे म्हणजे ह्या सार्‍याची अंमलबजावणी करायला सुरुवात करते.

गेल्या काही दिवसात माबोकरांचे या डाएटबद्दल आलेले चांगले प्रतिसाद बघून मी आणि माझ्या एका मित्रानी फेसबुकवर खास या पद्धतीच्या डाएट बद्दल चर्चा करायला एक ग्रुप सुरु केला आहे. यात भारतीय डाएट लक्षात घेऊन त्या योग्य रेसिपीदेखील शेअर करता येतील. कारण बऱ्याच लोकांना भारतीय पदार्थ आणि तेही शाकाहारी, या डाएट मध्ये कसे बसवता येतील हा प्रश्न असतो. इथे असे बरेच लोक आहेत जे यामध्ये आमची मदत करू शकतील. ज्यांना यात रस आहे त्यांनी हा ग्रुप जॉईन करावा.
https://www.facebook.com/groups/1713710528948403/

ह्या लेखाकरता खूप खूप धन्यवाद सई! एकूण ५ किलो वजन कमी झालय. ३ वेळचे अपवाद वगळता मस्त कंट्रोल होतय. आज मोह होत होता खूप पण टाळला. चालणं आणि डाएट दोन्ही केलं तर २०० ग्रेम वजन कमी होतय दिवसाला.
पूर्वी उठवायचच नाही. दिवस आळसात जायचा मधेमधे. आता स्वत:हून लवकर जाग येते. एकदोनदा ४ वाजता उठूनही दिवसभर एनर्जी टिकली. this is so unlike me!
२ तासानं खाणं हे माझ्याकरता disaster diet होतं.
intermittent fasting मुळे मला स्वत:त खूप फरक जाणवतोय.
आधी आरशात स्वत:कडे बघायला नको होत होतं - थकलेला चेहरा - डोळे. आता पुन्हा चेहऱ्यावरची तुकतुकी - डोळ्यात फ्रेशनेस जाणवतोय.
मी सध्या ९-५ मधे जेव्हा खाते त्यात काय खायचं ह्यावर कंट्रोल न ठेवता फक्त वेळांवर कंट्रोल ठेवतेय. चालणं होतं त्या दिवशी २०० ग्रेम वजन कमी होतचय. with thyroid it was very difficult earlier.
एकच तक्रार म्हणजे संध्याकाळी चालू शकत नाही - त्या दिवशी energy फार डाऊन होते ८ पर्यन्त. आणि खावसंही वाटतं.
any remedies?

रविवारी या लेखाची आठवण झाली होती. पण विचार केला लिहावं नको कारण बरेच दिवस त्यावर काही अपडेट नव्हते. पण कमेंट पाहून इच्छा झाली.

रविवारी दुपारी एकांकडे भरपूर जेवण झाले. म्हणजे दोन्ही वेळचे मिळून एकत्र. एरवी रात्री उशिरा थोडे खाल्ले असते. पण हा लेख डोक्यात आला आणि खायची खरंच गरज नाहीये हे जाणवले. रात्री थोडे दूध घेतले फक्त. एकदम छान वाटले. Happy
थँक्स सई.
विद्या.

आज सावकाशीने सगळे वाचले. सई, धन्यवाद! इतर माहितीपूर्ण प्रतिसादकर्त्यांचेही आभार! हे जमेल असे वाटतेय. सध्या बाहेरचे खाणेपिणे बंद, व्यायाम , पोर्शन कंट्रोल वगैरे करुन माझा बीएमआय २३ च्या काठावर आहे. बिपी नॉर्मल आहे. परंतू डायबेटिसची फॅमिली हिस्ट्री आहे. त्या व्याधीला शक्य तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे.
ग्रूप्साठी रिक्वेस्ट पाठवलेय.

सई तुमचा अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद!! मलासुद्धा जेस्टेशनल डायबिटीस झाला होता (आता शुगर नॉर्मल आहे). मी सद्ध्या माझे बाळंतपणानंतर वाढलेले वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहे!! आणि तेवढ्यात हा लेख वाचला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंटरमिटन्ट फास्टिंग करून पाहिन!!

चांगला जमत आहे हा अप्रोच. माझी आधीची पोस्ट २७ ऑक्टोबरची आहे, त्या नंतर विकेंड वगळता, जवळ जवळ सगळ्याच विकेडेज ना मला जमलय (८/१६: सोळा तास लंघन आणि ८ तासाच्या विंडो मध्ये ३ वेळा खाणे) बर्‍यापैकी. खुपच फास्ट वजन कमी होत आहे आणि एक दोन मुद्दे जरा महत्वाचे वाटले म्हणून शेअर करत आहे.

फार व्यायाम झेपत नाहीये ह्या अप्रोच मध्ये. आधीचा जो खुप जास्त विगरस व्यायाम करायचो तो करणे निव्वळ अशक्य झालेय कारण शरिरात एक्सेस (अतिरिक्त) कॅलरीज नसतातच. सकाळी थोडं फारच चालणं/पळणं, नंतर दुपारी वेट्सचा व्यायाम ज्यात परत अगदी थोडं कार्डियो (इलिप्टिकल वगैरे).
परवा जरा चुकून जास्त व्यायाम केला गेला आणि संध्याकाळी प्रचंड भूक लागली आणि त्याही पेक्षा खुपच थकायला झालं. आता इथून पुढे परत आधीच्या, कमी व्यायामाच्या फॉर्मॅट कडे वळणार. ह्यात प्रॉबलेम फक्त हाच की कार्डियोचा व्यायाम, जो हार्ट करता, कोलेस्टेरॉल करता अत्यंत उपयोगाचा आहे तो मिळत नाही पण ठीक आहे. एकदा बॉडी फॅट (वजन म्हणणार नाही, कारण ते तितकंसं अ‍ॅक्युरेट measure नाही) आटोक्यात आलं की थोडा आहार वाढवून कार्डियो पण वाढवणार आहे.

हळू हळू कार्ब्स जसे कमी करतोय तसं लक्षात येतं की सिंपल कार्ब्स जास्त खालले की काही वेळा नंतर लगेच भूक लागल्याचे फिलींग येतं. त्या मानानी प्रोटीन आणि फॅट असलेल्या गोष्टी खालल्या की तसं होत नाही. ह्यात आता लफडं असं आहे की हाय प्रोटिन/फॅट गोष्टी खाताना त्यात सॅच्युरेटेड फॅट पण असतं विच लीड्स टु हाय कोलेस्टेरॉल. सो त्याचा पण योग्य बॅलन्स साधावा लागतो. शेंगदाणे, बदाम प्रचंड आवडतात पण मग जास्त खालले गेले की दुसर्‍या प्रॉबलेम (कॉलेस्टेरॉल्)ला ते हातभार लावतात. ते मॅनेज करायला आता शिकत आहे.

एकूण ७. ५ किलो घटलं वजन. २५ महिन्यात अंदाजे. पण गेले 8- १० दिवस plateau आलाय. चाललं गेलं नाही ह्या दिवसात हा देखील एक मुद्दा आहे. आणि ३ लग्न वा तत्सम कार्यक्रमही झाले. त्याचाही परिणाम असेल कदाचित.
आता जानेवारी मिड पर्यंत आनंद आहे एकंदरीत!
तरीही १६ तास फास्टिंग जमू शकतं.

माझा पण अपडेट.
एकंदरित ऑक्टोबर पासून आत्ता पर्यंत जवळ जवळ १५ पाऊंड ~ ७ किलो वजन कमी झालं इंटरमिटंट फास्टिंग आणि लो कार्ब अप्रोच मुळे. आता सध्या जरा प्लॅटो आलाय किंवा वजन कमी व्हायचा वेग तरी खुप मंदावला आहे.
बॉडी फॅट साधारण २०-२२% वर असेल. मला १२-१५ % वर पोहोचायचं आहे पण त्या करता थोडं अजून क्रियेटिव व्हावं लागेल. डायट आणि व्यायामामध्ये काही योग्य बदल केले तर होऊ शकतं.
खरं ते फॅट लेवल येइल तेव्हा येइल पण पुष्कळ वर्षांपासून एक प्लॅटो होता तो दूर झाला हे सरवात महत्वाचं.

माझंही अडकलय वजन. पण आता माझे एकूण १४ किलो कमी झाले आहे. प्रेग्नन्सीमध्ये वाढलेले सगळे वजन कमी झाले.
प्लॅटू बऱ्याच वेळा येतो माझा. त्यासाठी माझ्याकडे काही उपाय आहेत.
१. थोडासा व्यायाम वाढवणे. जेव्हा माझा प्लॅटू येतो तेव्हा मी सायकलिंग बरोबर ६०-१०० सूर्यनमस्कार सुरु करते. माझं असं ऑब्झरव्हेशन आहे की व्यायाम जास्त केला की खाताना जास्त विचार होतो. व्यायाम नसेल त्या दिवशी ताबा सुटण्याची जास्त शक्यता असते
२. कधी कधी मी एका जेवणाला फक्त सलाड खाते. छोटा पोळीचा डबा भरून पचडी, गाजराची कोशिंबीर, वेस्टर्न सॅलड, बीट+बीन्स+एग सॅलड असं खाते. त्यामुळे पोटही भरतं आणि फ्रेश वाटतं.
३. प्लॅटू मध्ये सुद्धा न चुकता रोज वजन करते. कारण प्लॅटू आला की "पिटी इटिंग" चा धोका वाढतो.

मी जिमला न जाता कुठले कुठले व्यायाम वजन कमी करायसाठी उपयुक्त आहेत या वर एक लेख लिहायचा विचार करते आहे.
या धाग्यावरच्या लोकांना वाचायला आवडेल का?

मी जिमला न जाता कुठले कुठले व्यायाम वजन कमी करायसाठी उपयुक्त आहेत या वर एक लेख लिहायचा विचार करते आहे.
या धाग्यावरच्या लोकांना वाचायला आवडेल का?>>>>>>>> सई, प्लीज लिहा.

मी नेहमी हा धागा वरचे प्रतिसाद वाचते.
जिमला न जाता कुठले कुठले व्यायाम वजन कमी करायसाठी (खासकरुन पोटाचा घेर) उपयुक्त आहेत ते वाचायला आवडेल.

वजन कमी करणे हा एक भाग झाला. ... त्याच बरोबर फिटनेस वाढवणे हे अत्यंत महत्वाचे .

वैद्यबुवांची पोस्ट वाचून काळजी वाटू लागले आहे ...

Pages