कुणालातरी थँक्यू म्हणायचे आहे

Submitted by मधुरा मकरंद on 13 November, 2016 - 05:17

आज बराच निवांत वेळ आहे. असा मोकळा वेळ नेहमी नेहमी मिळत नाही म्हणून असेल एक वेगळीच भावना होत आहे. कुणालातरी थँक्यू म्हणण्याची.

किती तरी जण असतात, ज्यांच्यामुळे रोजचा दिवस सुकर जातो. कामे पटापट होतात. रोजच्या आयुष्यात सोपेपणा येतो. त्या सगळ्यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात.

प्रत्येक वस्तू साठी जागा प्रत्येक वस्तू जाग्यावर अशी शिस्त लावणारे माझे बाबा. माझ्या घरात, माझ्या कामाच्या ठिकाणी, प्रवासात सगळीकडेच ही शिस्त कामास आली. उगाच शोधाशोध करून वेळ वाया घालवत नाही.
रविवारी संध्याकाळी पुढील आठवड्याचे कपडे धुवून इस्त्री करून ठेवण्याची सवय देखील बाबांचीच. त्यांचेच अनुकरण मी करते. मला कधीच आज काय घालू असा प्रश्न पडत नाही. वेळाच्या वेळी कामे करून वेळेची आणि कष्टांची बचत करायला शिकवले म्हणून बाबांचे आभार.

काडी काडी जमवून घर बांधता येते किंवा थेंबे थेंबे तळे साचे याचे प्रत्यक्ष धडे देणारी माझी आई! तिने मला फक्त काटकसरच नाही तर बचत तीही वेळेत करायची शिकवली. आम्ही तीन भावंडे, पण प्रत्येकाच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी गुंतवणूक तिने वेळीच केली होती. आज माझ्या मुलाच्या संगोपनात हे तिचे संस्कार फार मोलाचे ठरतात.

स्वयंपाक करताना एक पदार्थ झाला कि लगेच ओटा साफ करून घ्यायचा. मगच दुसऱ्या कामाला सुरवात. यामुळे कधी ओटा फारच चिकट झाला, साफ करायला फार साबण, पाणी, वेळ लागतो असे होत नाही. इतक्या छान सोप्या सल्ल्याबद्दल काकूंचे आभार.

महिन्याचे वाण सामान! महिना संपत आला की मोठ्या डब्यातील जिन्नस लहात डब्यात / बरणीत काढायची सवय सासूबाईंची. मोठा डबा घासून धुवून वाळवून लख्ख करून ठेवायचा. सुरवातीला फार राग यायचा या गोष्टीचा. पण आता समजते नवीन सामान घरी आले कि लगेच डबे भरले जातात. उगाच पसारा राहत नाही. पुन्हा एकदा जगण्यातला सोपेपणा ....

नोकरी करताना नेहमी काहीतरी नवीन शिक, कुठल्याही कामाला नाही म्हणू नकोस असा प्रेमळ सल्ला देणारा जयंत दादा. कुठलेही नवीन काम करताना त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

"रोजचे ऑफिसचे कपडे दुसऱ्याच दिवशी धुवून टाकत जा, बघ आठवड्याच्या शेवटी कधी तुला तुझया कपड्यांचा ढीग उपसावा लागणार नाही" असे सांगणारी माझी मैत्रीण विमल. विमलचे मनापासून आभार गेल्या १२-१३ वर्षांत मला कधीच ढीग उपसावा लागला नाही.

नेहमी पुस्तके, पेपर वाचणारी माझी मैत्रीण शुभा. काय वाचले, कसे वाचले याची चर्चा करणे फार आवडीचे. तिच्याशी गप्पा मारताना आपसूकच माझी वाचनाचीआवड वाढली. सोबती म्हणून पुस्तके निवडायला शिकवल्या बद्दल या सोबतिणीचे आभार.

कधी कधी असे काही प्रसंग येतात, काही घटना घडतात, कधी सुखाच्या... कधी दु:खाच्या .... अशा सगळ्या प्रसंगी मला साथ दिली त्या माझ्या चार मैत्रिणींनी. खरंच त्या माझ्या प्राणवायू आहेत. इतक्या जिवाभावाच्या मैत्रिणी दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार.

रोज ठराविक ट्रेन, त्यातला महिलांचा डबा आणि त्यातली ठराविक जागा तीही मैत्रिणींबरोबर शेअर केलेली. पण एखाद दिवस असा येतो कुठलीच मैत्रीण येत नाही. मग समोरच्या कोपऱ्यात बसलेली नेहमीची "ती". अबोल वाटणारी ती आज माझ्यापाशी हसून बोलत आहे. सव्वा तासाचा प्रवास एका क्षणात संपला. त्या अनामिक "तिला"ही धन्यवाद.

अजून कितीतरी आहेत ज्यांच्यामुळे आयुष्य सुकर आहे. पाऊस, थंडी याची तमा न बाळगता रविवारीसुद्धा सकाळी सहा वाजता दूध घेऊन येणारा, साडेसात पर्यंत रोजचे वर्तमानपत्र देणारा, त्या मागोमाग येणारी सफाई कामगार बाई, रोजच्या रोज येणारी भाजीवाली, संध्याकाळी येणारा इस्त्रीवाला आणि आठवड्याला येणारा रद्दीवाला. काहीवेळा तर यांच्याशी मूकसंवादच असतो. पेपरवाल्या मुलाचा मला चेहराही माहित नाही. पण हे सगळे आहेत म्हणून मी बिनधास्त आहे.

माणूस जन्मजात गुणांनी घडतो तसाच निरीक्षणातून, अनुकरणातून घडतो. ज्यांच्या मुळे मी घडले आणि ज्यांच्यामुळे माझे आयुष्य सुकर आणि सुखकर आहे त्या सगळ्यांचे आभार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उद्या माझ्या पप्पांचा वाढदिवस...
मला प्रत्येक वेळी सपोर्ट करणार्या पप्पांना धन्यवाद

इतक्या सगळ्यांना ‘थँक यू ‘ म्हणावेसे वाटतेय ही खूपच छान मनाची स्थिती आहे, नाही?

माझ्या आईने तेव्हा स्वयंपाक घरातल्या कामात थोडी कडकच शिस्त लावल्याने आज सुध्दा शिस्त बद्ध राहता येत आहे …. आणि त्यामुळे गलथानपणा सहनच होत नाही! (तिला ‘धन्यवाद’). बाबांनी मी केलेल्या प्रत्येक चांगल्या कामाचे कौतुक केले..(‘ त्यांना धन्यवाद’)
भाजी वाली दारावर भाजी आणून देते, कामवाली वेळेत स्वच्छ काम करून जाते, इस्त्रीवाला घरपोच इस्त्रीचे कपडे आणून देतो, केव्हाही जाऊन शेजारणीशी गप्पा मारता येतात, ..सगळ्यांना धन्यवाद..
आणि तुमच्या लेखासारखे, बऱ्याच मायबोलीकरामुळे छान वाचण्याचा आनंद मिळतो… तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद! Happy

छान लेख, आवडला... लेखाबद्दल थॅन्क्यू Happy

एक सॉरी म्हणायचा लेख यावरून सुचलाय, पण आता सोमवार पहाटेचे सव्वा वाजल्याने शुभरात्री करतो.

छान लिहिलंय. वस्तु जागच्या जागी ठेवणे, रोजचे कपडे धुणे अशा साध्या वाटणार्‍या गोष्टीपण आपल्या आयुष्यात एक शिस्त आणतात.

खूप सुंदर आणि भावनिक
लिहिणार्यांना पण thank you......!!!!

तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद!

अजून बरेच जणांना धन्यवाद द्यायचे आहेत.
मनापासून धन्यवाद त्या सॉफ्टवेअर प्रोग्रामरनां ज्यांनी copy paste चा शोध लावला.
आणि...
सध्या हजार पाचशेच्या नोटाबंदीमुळे कामाचा ताण सहन करणार्‍या सर्व बँक कर्मचार्‍यांना आभार.