"आमच्या खेळाचे नाव आहे "विकल्प". विकल्प म्हणजे पर्याय, या खेळात तुमच्या समोर तीन पर्याय आहेत आणि तुमच्यासाठी सर्वात चांगला पर्याय आम्ही आधीच निवडलेला आहे, तो पर्याय तुम्ही ओळखायचा, बाकीचे पर्याय फक्त भुरळ घालतील पण हा एकच पर्याय तुम्हाला यशस्वी करू शकतो"
"मी परत एकदा या खेळाचे नियम सांगतो, सोपे आहेत"
१) या खेळात, तुमच्या समोर तीन माणसे आहेत, त्यांची नावे आहेत "ए", "बी" आणि "सी"
२) त्यातला एक खरे बोलतोय आणि बाकीचे दोघे खोटे बोलत आहेत.
३) जो खरे बोलतोय त्याला पैशाची सर्वात जास्त गरज आहे.
४) पण बाकीचे दोघे ही तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतील की त्यांना सर्वात जास्त पैशाची गरज आहे.
५) खऱ्या बोलणाऱ्याचे नाव एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे, ती चिट्ठी या समोरच्या छोट्या पेटीत ठेवली आहे.
६) तुम्हाला खरे बोलणारा माणूस ओळखून त्याला पैसे द्यायचे आहेत.
७) तुम्ही खर बोलणारा माणूस ओळखलात आणि त्याला तुमचे पैसे दिलेत तर तुम्ही हा खेळ जिंकाल आणि बक्षिस म्हणून आम्ही तुम्हाला, तुम्ही लावलेल्या रकमेची दुप्पट रक्कम देऊ.
८) जर तुम्ही पैसे खोटे बोलणाऱ्याकडे दिलेत, तर तुम्ही हा खेळ हराल आणि तुम्ही लावलेले पैसे ही त्या माणसाला मिळतील.
९) खेळाचा अवधी तीस मिनिटे आहे. आम्ही या खेळाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करत आहोत. आम्ही हा भाग, आमच्या "विकल्प" युट्युब चॅनेल वर अपलोड करू, तिथे आमचे दहा लाख सबस्क्रायबर्स हा खेळ पाहू शकतात. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल ते इंटरनेट वर कायम राहू शकते.
१०) आणि हो एक राह्यलंच, तुम्हाला या खेळात काही बोलता येणार नाही, हे तिघे जे काही बोलतील ते तुम्ही फक्त ऐकणार आहात, तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
एवढे सगळे बोलून "विकल्प" खेळाचा आयोजक थांबला, त्याने माझ्याकडे बघितले आणि विचारले, "तुम्ही किती पैसे लावणार आहात?"
"एक लाख इंडिअन रुपीज" मी म्हणालो.
"गुड, तुम्ही जर खेळ जिंकलात तर, तुम्हाला आमच्याकडून दोन लाख रुपये मिळतील, बेस्ट ऑफ लक, लेट द गेम बिगिन" असे म्हणून आयोजक आमच्या खोलीतून निघून गेला. त्याने खोलीचा दरवाजा लावून घेतला.
दारावर विकल्पची टॅगलाइन होती, "विकल्प - "तुमचा खरा पर्याय ओळखा"
आमच्या खोलीत चार ते सहा कॅमेरे लावले होते, नक्की सांगता येत नव्हते, काही छुपे कॅमेरे असण्याची शक्यता होती. माझ्यावर एका कॅमेऱ्याची नजर होती बाकी तिघांवर अजून तीन कॅमेरे होते, कॅमेऱ्यामध्ये प्रत्येकाची हालचाल कैद होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. आमच्या शर्टच्या कॉलरवर माइक्रफोन लावले होते.
टेबलच्या मधोमध एक लाकडी छोटी पेटी होती, त्यात एक चिठ्ठी होती, त्यात खरे बोलणाऱ्याचे नाव लिहले होते. आम्ही आता चार जण या खोलीत होतो, माझ्या आणि बाकीच्या तिघांमध्ये एक लाकडाचे टेबल होते. माझ्या समोर, टेबलच्या दुसऱ्या बाजूला, तीन खुर्च्यांवर तीन माणसे, खांद्याला खांदा लावून, शेजारी बसली होती.
मला कोणाचे नाव माहित नव्हते.
माझ्या उजव्या हाताला "ए" होता, त्याच्या शर्टच्या खिशावर "A" असे स्टिकर चिटकवले होते. माझ्या समोर या दोंघांमध्ये "बी" बसला होता. त्याच्या शर्टच्या खिशावरही "B" अशा नावाचे स्टिकर लावले होते आणि माझ्या डाव्या हाताला "सी" बसला होता. तिघे जण माझ्याकडे एकटक बघत होते.
मी "डी" होतो "डी फॉर डोनर" या जुगारात मी एक लाख रुपये लावले होते, मला तीस मिनिटामध्ये हे शोधून काढायचे होते की समोरच्या तिघांमध्ये कोण खरे बोलत आहे, मी माझे एक लाख त्याला देणार, जर तो माणूस बरोबर निघाला तर मला आयोजकांनकडून दोन लाख मिळणार होते.
"विकल्प" खेळाने गेल्या दोन वर्षात युट्युबवर बरीच लोकप्रियता मिळवली होती. मी ही या खेळाचा चाहता होतो, मी प्रत्येक भाग न विसरता बघत असे, लोक ही बरेच पैसे लावत असत. एका भागात, एकाने पाच लाख रुपये लावले होते, बिचाऱ्याला खरा बोलणारा गरजू ओळखता आला नाही आणि तो हरला. गेल्या दोन वर्षात या युट्युब चॅनेलने दहा लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स कमवले होते. त्यांचे आतापर्यंत पंचवीस ते तीस भाग झाले होते, प्रत्येक भाग दहा लाखांपेक्षा जास्त लोंकानी बघितला होता.
खूप दिवस प्रयत्न केल्यावर, माझी डोनर म्हणून निवड झाली, मला डोनरच बनायचे होते, पैशासाठी खोटे बोलणे मला जमले नसते. कमीत कमी एक लाख रुपये लावण्याची अट होती, मी कसे तरी एक लाख जमवून भाग घेतला होता.
मी प्रत्येकाकडे बघितले, "ए" ला घाम फुटला होता, "बी" ने एक कानटोपी घातली होती आणि "सी" मात्र निवांत, बागेत बसल्यासारखा...
"मला कॅन्सर आहे, लास्ट स्टेज" "बी" एकदम म्हणाला, वयवर्ष साधारण पन्नास-साठ असेल. मी अंदाज केला.
"माझी केमोथेरपी ट्रीटमेंट चालू आहे" असे म्हणत त्याने डोक्यावरची कानटोपी काढली, त्याला पूर्ण टक्कल होते, त्याच्या भुवयांचे केस ही विरळ झाले होते, हा माणूस आजारी आहे की नाही हे कळायला मार्ग नव्हता पण भयानक मात्र दिसत होता. हाताच्या काड्या झाल्या होत्या, मान पुढे झुकली होती, त्याला त्या खुर्चीत ताठ बसता ही येत नव्हते, कसातरी अवघडून तो माझ्याशी बोलत होता. मला त्याची द्या आली, पण कोण जाणे तो मला खरा वाटत नव्हता.
"मला उपचारांसाठी पैशाची अतंत्य गरज आहे, नाहीतर मी मरेल" "बी" अगदी कळवळीने म्हणाला.
"कुठला कॅन्सर आहे?" मला विचारायचे होते, पण खेळाच्या नियमाप्रमाणे मला काहीच बोलता येणार नव्हते.
काही न बोलता तुम्ही कसे ठरवू शकता, की हा माणूस खरा आहे की खोटा? कुठल्या येड्याने हे नियम बनवले होते देव जाणे. मी माझ्या समोरच्या कॅमेऱ्याकडे बघितले, आमची प्रत्येक हालचाल कॅमेरे टिपत होते.
"मला ही पैशाची गरज आहे" "ए" जरा घाबरत म्हणाला. त्याला खूप घाम फुटला होता. "ए" अगदी विशीतला तरुण, शरीर यष्टीने दांडगा होता, अंगात एक मळकट शर्ट, बऱ्याच दिवसात त्याने दाढी आणि केस कापले नव्हते.
"मला कळत नाहीये मी कसे सांगू" "ए" परत म्हणाला. स्वतःला थोडा सावरत दाढी वरून हात फिरवत तो म्हणाला, "मी जिथे राहतो तिथे जवळच भांडणे सुरु होती, कारण शुल्लक होते, काही गुंड उगीचच अरेरावी करत होते, पण भांडणे विकोपाला गेली आणि त्यातले काही गाव गुंड मारामारी करायला लागले, मला या भांडणात पडायचे नव्हते, लोक अनोळखी होते, मी माणुसकी म्हणून ती भांडणे सोडायला गेलो, एक गुंड आम्हाला सगळ्यांना खूप मारत होता, दिसेल त्याला मारत सुटला, त्याच्या हातात लोंखंडाची सळी होती, बरेच जण पळाले, बऱ्याच लोंकाना लागले, त्याने त्या सळी ने एका दोघांचा जीव नक्कीच घेतला असता, मी त्याच्या हातातील सळी हिसकावून घेतली, स्वरक्षणासाठी त्याच्यावर प्रहार केला, प्रतिकार केला, त्याच्या डोक्याला जबरी मार लागला आणि तिथेच तो..."
एवढे बोलून "ए" रडायला लागला. आम्ही सगळ्यांनी त्याला सावरण्याचा वेळ दिला.
"माझ्यावर खुनाचा खटला सुरु आहे, मी जामिनावर बाहेर आहे, एक साधा वकील करायला ही माझ्याकडे पैसे.."
"कशावरून?" अचानक "सी" म्हणाला, माझी नजर त्याच्याकडे गेली, "बी" ही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. "सी" अगदी आरामात होता, थ्री-फोर्थ पॅण्ट घालून, बागेत बसल्या सारखा, खुर्चीत पहुडला होता.
"कदाचित यानेच थंड डोक्याने खून केला असेल" "सी" म्हणाला, "मारामारी झालीच नसेल, नाहीतर हाच गावगुंड असू शकतो"
मला "सी" फार आगाऊ वाटला. "त्याचे जाऊ दे तुझी गोष्ट सांग ना" माझ्या अगदी तोंडावर आले होते, पण मला काहीच बोलता येत नव्हते.
पण "सी" तिथेच थांबला नाही, "सी" ने आता मोर्चा "बी" कडे वळवला, "याचे तर वय झाले आहे, बहुतेक एक-दोन वर्ष हा अजून जगेल, याला पैसे देऊन काय उपयोग?" "सी" माझ्याकडे बघत म्हणाला.
"मी मेलो तर मुलांचे काय होणार?" "बी" ला बराच राग आला होता.
"मुले? कसली मुले?" "सी" ने विचारले.
"मी अनाथ, गरजू, गरीब मुलांना मोफत शिकवतो, मी शिकवलेली बरीच मुले आज मोठ्या हुद्दावर..." बी अभिमानाने सांगत होता, मी ही त्याचे बोलणे मन लावून ऐकत होतो.
"क..शा..व..रु..न ?" सी ने अगदी लहान मुलांशी जसे बोलतात तसे विचारले.
मी उठून "सी" च्या कानाखाली लगावून देणार होतो, तो स्वतःबद्दल काही सांगत तर नव्हता आणि दुसऱ्याला नीट बोलून पण देत नव्हता, पण हेच "सी" चे धोरण होते, बाकीच्या दोघांच्या चुका काढायच्या आणि योग्य वेळी आपण कसे बरोबर आहोत हे पटवून द्यायचे. बाकीचे दोघे ही त्याच्या प्रश्नांना उत्तर देत बसणार, त्यात ते आपली ऊर्जा, वेळ वाया घालवणार आणि शेवटी "सी" हे दोघे खोटे आहेत आणि मीच खरा आहे असे दाखवणार.
मी त्रासिक नजरेने "सी" कडे बघितले, तसा तो शांत झाला.
"बी" ने बोलणे चालू ठेवले, "तुम्ही जर मला मदत केलीत तर तुम्ही आणखी दहा मुलांचे आयुष्य घडवू शकता" "बी" ने अगदी हात जोडून मला विनंती केली. "बी" पहिल्या पासूनच माझ्या कडून सहाभूतीची अपेक्षा ठेऊन होता, त्याच्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून मला सहानभूती वाटत तर होती, पण एकदम विश्वास बसत नव्हता, या खेळात फक्त डोक्यानेच विचार करा, भावनिक झालात तर फसलात.
"मला नाही वाटत याला कॅन्सर आहे, तुझे हातावरचे केस कसे गेले नाहीत?" "सी" ने परत नाक खुपसले.
हा मुद्दा कदाचित बरोबर होता, पण मला कॅन्सर बद्दल जास्त माहिती नव्हती, मी लगेच "बी" च्या हातांकडे बघितले, "बी" ही थोडा बावचळला, "बी" ला पटकन प्रतिउत्तर द्यायला जमले नाही.
"तुम्ही आमचे सोडा, स्वतःबद्दल सांगा" "ए" म्हणाला, अखेर "ए" ला सूर गवसला. मला हेच "सी" ला विचारायचे होते.
"मला एक लाख नकोत मला.." "सी" म्हणाला.
"मग घरी जा ना" "बी" चवताळून "सी" ला म्हणाला, "सी" ही थोडा गडबडला, त्याची लय विस्कळीत झाली. मला हसू आले.
माझ्याकडे बघत "सी" ही थोडा हसला आणि म्हणाला, "सर मला माहितेय तुम्ही पैसे कमवायला आला आहात, मला पण पैशाची गरज आहे, मला एक लाख नका देऊ, अर्धेच द्या, पन्नास हजार, तुम्हाला एकूण दिड लाख जास्त मिळतील"
"सी" अगदी पक्का व्यावसायिक वाटत होता. तो असा करार करू पाहत होता ज्यात दोघांचा फायदा होता, कोणी दुसरा असता तर लगेच फसला असता.
"आणि हो चिठ्ठीत माझेच नाव आहे" "सी" मागे खुर्चीत रेलून बसत म्हणाला.
" क..शा..व..रु..न ?" "ए" ने "सी" च्या तर्हेने त्याला विचारले, आम्ही सगळे त्याच्यावर हसलो. "ए" ची विनोदबुद्धी जागृत होती, खून केलेल्या माणसाने असे विनोद करणे कदाचित बाकीच्या दर्शकांना आवडले नसावे.
"सी" कुत्सित हसला, त्याने खिशातून एक कागद काढला आणि माझ्यापुढे सरकावला. त्याच्या या वागण्याने तो ऑडिशन देत आहे असे वाटत होते, काय माहित कदाचित हा भाग युट्युबवर बघून कोणी निर्माता त्याला एखादा रोल ही ऑफर करेल.
"मला आलेल्या ई-मेल ची प्रिंट, यात स्पष्ट लिहले आहे की, या खेळात मी सर्वात जास्त गरजू आहे आणि माझे नाव चिठ्ठीत आहे" "सी" अता खुर्चीतून उठला, खुर्ची मागे सरकवली आणि दोघांच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याचा आत्मविश्वास भलताच वाढला होता.
मी ई-मेल ची प्रिंट वाचली, तो ई-मेल आयोजकाकडून आला होता. त्यात "सी" म्हणतोय तशा सर्व बाबी होत्या.
मी सर्व कॅमेऱ्याकडे बघितले, अशी ई-मेल दाखवणे नियम बाह्य तर नाही ना? खेळ इथेच संपला का? मी जिंकलो का? "सी" ने आमचा खेळच रद्द केला का? मी खोलीच्या दाराकडे बघितले. आयोजक आत येईल अशी अपेक्षा होती.
माझी चलबिचल बघून, उभा असलेला "सी" म्हणाला, "सर त्यांच्याकडे काय बघताय?, त्यांनीच मला मेल पाठवला होता. या गेम मध्ये हीच सर्वात मोठी त्रुटी आहे, आज मी सगळ्या जगाला दाखवतो, मी जिंकलो आहे, येस्स...मला एक लाख मिळायलाच हवे" "सी" एखाद्या नाटकातला सवांद म्हणावा तसे म्हणाला, जर याचे नाव चिठ्ठीत आहे, तर दोन लाख रुपये मिळवण्यासाठी मला "सी" चे नाव लिहणे गरजेचे होते.
मी परत कॅमेऱ्याकडे बघितले, मला आता काही कळत नव्हते, या गेम मध्ये कोण खरे बोलतोय आणि कोण खोटे बोलतोय हे ओळखायचे नसते, तर चिठ्ठीत कोणाचे नाव हे ओळखायचे असते आणि याचा आपण फक्त अंदाज करू शकतो. त्यावरच हा खेळ जिंकू शकतो. इथे सरळ दिसत होते, की "सी" चे नाव चिठ्ठीत आहे.
मी घडाळ्याकडे बघितले, शेवटची आठ ते दहा मिनिटे बाकी होती, बाकीच्या तिघांची आपापसात भांडणे सुरु झाली होती, "ए" आणि "बी" खुर्चीतून उठले, "सी" बरोबर वाद घालायला लागले. "बी" ला आयोजकांचा राग आला होता, तो मोठ्याने हे बोलून दाखवत होता. "ए" परत रडणार अशी चिन्हे दिसत होती.
माझे डोके दुखायला लागले, शेवटी कसेबसे, मी पेन हातात घेऊन कागदावर एक नाव खरडले, त्या कागदाची घडी करून समोरच्या छोट्या पेटीत ठेऊन दिली. माझा निर्णय झाला होता. माझी ही कृती बघून तिघांचे भांडण थांबले.
ते तिघे येऊन आपापल्या खुर्चीवर बसले.
खेळाचा अवधी संपला होता, आयोजक परत खोलीत आला, त्याने प्रत्येकाकडे बघितले, काही न बोलता त्याने ती लाकडाची पेटी उघडली, तो म्हणाला "आम्ही सर्वात जास्त गरजू माणूस आधीच निवडला होता, त्याचे नाव या चिठ्ठीत.."
"सर पटकन निर्णय सांगा" मी न राहवून म्हटलो, बाकीच्या तिघांनी 'हो' म्हणत, मला पाठींबा दिला.
"आम्ही "ए" ला गरजू ठरवले होते, "ए" वर फौजदारी कोर्टमध्ये केस चालू आहे आणि ते जामिनावर बाहेर आहेत, आमच्या टीमने ही सर्व माहिती शोधून काढून, खात्री करून घेतली होती"
आयोजकाने चिठ्ठीतले नाव कॅमेऱ्यामध्ये दाखवले.
मी बाकीच्या दोघांकडे बघितले, "सी" गालातल्या गालात हसत होता, "बी" आयोजकाकडे रागाने बघत होता आणि "ए" दुसऱ्या चिठ्ठीतले नाव ऐकण्यासाठी आतुर झाला होता.
माझ्याकडे बघत आयोजक म्हणाला, "आणि तुम्ही पैसे दिले आहेत..." त्याने दुसरी चिठ्ठी उघडली, तो नाव बघून स्वतःशीच हसला आणि चिठ्ठी कॅमेऱ्या समोर धरून,
तो जोरात ओरडला..."ए"
आयोजकाला आनंद झाला की नाही मला माहित नाही, पण मला खूप आनंद झाला, मी येस्स्स ओरडत खुर्चीतच उडी मारली, "ए" कडे पहिले, तो वर बघत देवाचे आभार मानत होता, ते होताच तो माझ्याकडे आला, माझ्या पाया पडायला लागला, पण मी तसे होऊ दिले नाही, आम्ही कडकडून मिठी मारली.
"मला वाटले तुम्ही मला पैसे द्याल" "सी" आमचे अभिनंदन करत म्हणाला.
"सर तुम्ही जरा जास्तच ओव्हर ऍक्टिंग केलीत" मी "सी" ला म्हणालो, माझ्या या विनोदावर सगळे हसले.
"अजून किती लोंकाना आमच्या नावाने खोट्या इमेल्स पाठवत होतात?" आयोजक हसत म्हणाला.
"पण अता नाही पाठवता येणार" "सी" हसत म्हणाला, सगळे आनंदी होते, पण या सगळ्यात "बी" तिथेच शांतपणे उभा होता.
"पण मला खरंच कॅन्सर आहे" "बी" अगदी रडकुंडीला येत म्हणाला, पण त्याला सगळ्यांचा राग आला होता, ते स्पष्ट दिसत होते.
एकदम सगळे शांत झाले. मी खांदे उडवले.
आयोजकाने "बी" च्या खांद्यावर हात ठेवला, "आम्हाला हे माहित होते, पण टीमच्या निर्णयानुसार हे आम्हाला जास्त गरजू वाटले " "ए" कडे हात दाखवत आयोजक म्हणाला. "शेवटी हा एक खेळ आहे, कोणी एक हरणार, कोणी एक जिंकणार..." पण आयोजकाचे हे सांत्वन "बी" साठी पुरेसे नव्हते. तो चिडून घुसमसत, खोलीबाहेर गेला, त्याने माझे अभिनंदन ही केले नाही.
मला त्याच आठवड्यात दोन लाखांचा चेक मिळाला, पैसे बँकेत जमा झाले. विकल्पच्या या भागाला युट्युब वर भरपूर लाईक्स मिळाले, हा भाग सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त लोंकानी बघितला.
पुढे जाऊन, "ए" ने चांगला वकील केला, त्याने कोर्टात केस ही जिंकली, निर्दोष म्हणून त्याची मुक्तता ही झाली. त्याने मला फोन करून माझे आभार मानले.
आज ही लोक मला विचारात तुम्ही कसे ओळखले की "ए" च खरे बोलतोय, मी काहीतरी सांगून वेळ मारून नेतो. मनोमन देवाचे आभार ही मानतो, कारण आयोजकांनी ही "ए" लाच सर्वात गरजू ठरवले होते, पण जरी तो सर्वात गरजू नसता, तरी मी त्यालाच पैसे देणार होतो, कारण या खेळात तुमच्याकडे तीन पर्याय असतात, ए, बी आणि सी.
पण माझ्याकडे फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे "ए".
मी "ए" ला बघताक्षणी ओळखले होते, अगदी पहिल्यापासून, माझ्यासाठी तोच सर्वोउत्तम पर्याय होता. एक चांगले झाले की "ए" ने मला कधी ओळखले नाही कारण त्या दिवशी मारामारीत तो मध्ये पडला नसता तर त्या गुंडाने सळी मारून माझा जीव घेतला असता.
-चैतन्य रासकर
chaitanyaras@gmail.com
छान
छान
मस्त.
मस्त.
ओह! मस्तच.
ओह! मस्तच.
मस्त आहे कथा आणि छान
मस्त आहे कथा आणि छान फुलवलीयेत.
छानचं.......
छानचं.......
मस्त कथा !
मस्त कथा !
मस्त आहे कथा
मस्त आहे कथा
मस्त जमलीय कथा . आवडलीच.
मस्त जमलीय कथा . आवडलीच.
छान
छान
सही मस्त आणि कल्पक आहे.. एकदम
सही मस्त आणि कल्पक आहे.. एकदम हटके.. मजा आली
जबरदस्त !!! _/\_
जबरदस्त !!!
_/\_
ही पण कथा जबरी जमली आहे.
ही पण कथा जबरी जमली आहे. मस्त!!
छान आहे.
छान आहे.
छान कथा!
छान कथा!
@अंकु @Swara@1 @सस्मित @मामी
@अंकु @Swara@1 @सस्मित @मामी @तृष्णा @चैत्राली उदेग @जाई. @मनीमोहोर @नँक्स @ऋन्मेऽऽष @जव्हेरगंज @फेरफटका @पराग @स्वाती२
सगळ्यांना धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियांमुळे लिहण्याचे बळ वाढते
मस्तय. शेवट जबरदस्त.
मस्तय.
शेवट जबरदस्त.
अरे सहीच
अरे सहीच
कथेचा शेवट तुम्ही निवडलेल्या
कथेचा शेवट तुम्ही निवडलेल्या पर्यायाच समर्थन करते....!! अप्रतिम लेखन...!!!
@मयुरी चवाथे-शिंदे, @urmilas,
@मयुरी चवाथे-शिंदे, @urmilas, @Abdul Hamid
धन्यवाद
एक्दम आवडली !!। शेवट पर्यन्त
एक्दम आवडली !!।
शेवट पर्यन्त खिळवून ठेवणारी !!
nice
nice
मस्त कथा आणि ट्विस्टही!
मस्त कथा आणि ट्विस्टही!
आवडली
आवडली
मस्त , आवडली कथा.
मस्त , आवडली कथा.
मस्त
मस्त
@स्वप्नाली, @anilchembur,
@स्वप्नाली, @anilchembur, @rmd, @चैत्रगंधा, @प्राजक्ता_शिरीन, @नियती
धन्यवाद
भारी!
भारी!
मस्त लिहिली आहे. शेवटचा
मस्त लिहिली आहे. शेवटचा ट्विस्ट क्लासिक आहे.
@राया, @स्वीट टॉकर धन्यवाद
@राया, @स्वीट टॉकर
धन्यवाद
मस्त शेवट
मस्त शेवट
Pages