सकाळी कामावर जाताना मी रोज लोकलने प्रवास करतो. आमच्या स्टेशनवरूनच गाडी सुटते. मी नेहमी ज्या सीटवर बसतो, त्याच्या समोरच्या सीटवर खिडकीजवळ दोन प्रौढ व्यक्ती बसतात. आणि तिसऱ्या सीटवर साधारण चार वर्षाची एक गोड छोकरी, मस्तपैकी शाळेच्या कडक छोटुकल्या गणवेशात आपल्या पप्पांसोबत बसलेली असते. त्या चौघांची आधीचीच ओळख असावी. पप्पा मुलीला हाताला धरून घेऊन आले कि त्या प्रौढ व्यक्तींपैकी एकजण चॉकलेट काढून मुलीच्या हातावर प्रेमाने ठेवणार आणि ती मुलगी ते गट्टम करणार, हा रोजचा शिरस्ता.
त्यादिवशी गाडी सुटायला अवकाश होता. मी आणि त्या प्रौढ व्यक्ती सीटवर स्थापन्न झालो होतो. थोड्यावेळाने पप्पा मुलीला घेऊन आले. बघतो तर मुलीचा चेहरा नुकताच रडून हिरमुसलेला. नेहमीप्रमाणे एका प्रौढ व्यक्तीने एक चॉकलेट काढून मुलीच्या हातावर ठेवले. मुलीचे काहीतरी बिनसलेले होते. ती चॉकलेट काही खाईना. विचारलं तर काही उत्तर देईना. आता काय करायचं? सगळ्यांना चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले. तेव्हढ्यात त्या प्रौढ व्यक्तींना काही आठवलं. आणि ते मुलीला म्हणाले. "बघ तुला एक गंमत दाखवतो." असं म्हणून त्यांनी तिच्या हातातले चॉकलेट घेतलं. त्याचं वेष्टन काढलं. आतमध्ये चॉकलेट आणि प्लास्टिकचा कुठलंसं चित्र असलेला एक छोटासा तुकडा होता. त्यांनी त्या तुकड्यावर असलेलं कसलंस पातळ आवरण काढून ते मुलीला म्हणाले "जरा तुझा हात पुढे कर बघू." मुलीने मुसमुसतच उजवा हात पुढे केला. त्यांनी तो तुकडा मुलीच्या मनगटाच्या थोडासा वर हातावर ठेवला. आणि त्यावर तळहाताचा थोडासा दाब देउन दोन तीन हलक्याशा चापट्या मारल्या. मग त्यांनी तो तुकडा हळुवारपणे उचलला. आणि मग बघतो तर काय? त्या मुलीच्या हातावर एका हसणाऱ्या जोकरचे एक छानपैकी रंगीत 'टॅटू' उमटलेले होते. ते पाहताच मुलीचा उदास चेहरा लगेच खुलला. रडका चेहरा जाऊन तिथे गोड हास्य उमटले. ती पप्पांना हात पुढे करून करून 'टॅटू' दाखवू लागली. आणि ते पाहून आम्हां सर्वांच्या चेहरयावर हसू उमटले.
हे पाहून मला माझ्या लहानपणी चॉकलेटमध्ये मिळणाऱ्या 'टॅटूची' आठवण झाली. त्यावेळी हे तंत्र एवढं विकसित झालं नव्हतं. त्या टॅटूचा जो छोटा कागद मिळायचा. तो प्रथम पाण्यात भिजवायला लागायचा. मग तो ओला कागद मनगटाच्या वरच्या भागावर ठेऊन त्याला कितीतरी वेळ चापट्या मारीत आणि दाबीत बसायचे. मग बऱ्याच वेळाने तो कागद हळूच उचलला कि हातावर अस्पष्ट 'टॅटू' उमटलेला दिसायचा. ते बघूनच किती तो आम्हाला आनंद व्हायचा.
पूर्वी साखरेत घोळलेल्या बडीशेपच्या छोट्या छोट्या रंगीत गोळ्यांच्या पुडीत प्लास्टिकच्या भिंगऱ्या मिळत. भिंगरी जमिनीवर जोऱ्यात फिरवून, आपण स्वतःहि जमिनीवर लोळून भिंगरीचे निरीक्षण करणे चालायचे. आणि मग कपडे मळवले म्हणून घरच्यांची बोलणी खायची. कधी त्या पूडीत प्लास्टिकच्या शिट्ट्याही येत. मग काय! आमची स्वारी दिवसभर शिट्ट्या वाजवत घरच्यांचे डोके उठवायची.
चॉकलेट गोळ्यांच्या पूडीतच अशा छोट्या भेटी मिळत असे नाही तर भेटींमध्येच कधी कधी चॉकलेट किंवा गोळ्या भरलेल्या असत. मला आठवतंय, त्यावेळी आईस्क्रीमच्या कुठल्याशा नविन कंपनीने एका कडक प्लास्टिकच्या छोट्या पिवळ्या रंगाच्या चेंडूतच आईस्क्रीम भरून विकायला आणले होते. माझ्याजवळ असे कितीतरी प्लास्टिकचे चेंडू जमा झाले होते. आमचा क्रिकेटचा सराव अशा प्लास्टिकच्या चेंडूवरच पक्का झालेला आहे.
तेव्हा प्लास्टिकचे स्टिकर हा प्रकार नवीनच आला होता. आता नक्की आठवत नाही, पण मला वाटते कुठल्यातरी सुपारीच्या पूडीत अगदी छोटे छोटे छान छान नक्षी असलेले स्टिकर मिळत. आम्ही ते स्टिकर मनगटी घड्याळाच्या काचेवर मधोमध लावून मिरवीत असू. अजून कशात तरी नेमप्लेटवर असायची ती प्लास्टिकची पांढरी ABCD अक्षरे मिळत. ती तर मी पुष्कळ जमा केली होती. आणि काही अक्षरे आपल्याकडे असलेल्यापैकी पुन्हा मिळाली तर ती मित्रांबरोबर अदलाबदली करायचो.
कधी कधी चॉकलेट गोळ्यांबरोबर असलेल्या भेटी ह्या वेगळ्या दिल्या जात. ह्या भेटी म्हणजे हिरो हिरोईनचे फोटो, क्रिकेटर्सचे फोटो. प्राणी, पक्षी यांच्या छोट्या प्रतिकृती असत. एकदा मला शिवाजीमहाराजांच्या मावळ्यांच्या छोट्या प्लास्टिकच्या बाहुल्या भेट म्हणून मिळाल्याचे आठवते. दिवाळीत मी त्यांना शिवाजीच्या किल्ल्याच्या रक्षणाकरीता उभे केले होते.
आता मागे वळून पहाताना असे जाणवते कि चॉकलेट गोळ्यांबरोबर मिळणाऱ्या ह्या छोट्या छोट्या भेटींनी आम्हाला बालपणी फार आनंद मिळवून दिला. चॉकलेट गोळ्या खाण्यापेक्षा त्याबरोबर भेट मिळणाऱ्या वस्तूंचेच आकर्षण अधिक असायचे. निरनिराळ्या भेटी जमा करताना मित्रांबरोबर भांडणंही केलीत. मित्रांकडच्या भेटी अजाणतेपणी ढापल्याही आहेत. तर काही आवडत्या मित्रमैत्रिणींना भेट म्हणून देऊन त्यांच्यावर जीवही लावला आहे. मानवी जीवनाचे वेगवेगळे गुणविशेष आहेत. जसे कि संग्रह करणे, वस्तूंच्या निरीक्षणातून आकलन करणे, परोपकार करणे, हेवेदावे करणे, मित्रमैत्रिणींला जीव लावणे, खेळ खेळणे. आपल्या जीवनात ह्या सर्व गुणांचे संवर्धन करण्यात बालपणी चॉकलेट गोळ्यांबरोबर मिळणाऱ्या ह्या अनमोल भेटींचा मोलाचा वाटा मला नक्कीच वाटतो.
छान लेख! आवडला! हल्लीची मुले
छान लेख!
आवडला!
हल्लीची मुले किंडरजॉयचं महागडं चॉकलेट आत असलेल्या खेळण्यासाठी घ्यायला लावतात.
बाकी चॉकलेटवरचे टॅटू मुलांना नीट लावून द्यावे लागतात वारंवार.
टिव्हीवर जाहिराती अश्या असतात की त्या प्रॉडक्ट पेक्षा फ्री गिफ्ट साठीच ती गोष्ट विकत घ्यावी.
बाकी प्लास्टीकच्या भिंगर्या, मावळे आणि ते चमकते घड्याळावर लावायचे रेडियमचे स्टिकर फार अप्रूपाचे होते.
आणि आतासारखे चमकते स्टिकर पूर्वी इतक्या सहज नाही मिळायचे.
दुसरी एक गोळा करायची गोष्ट म्हणजे २१ बेरिज येईल अशी एस टी ची तिकीटे.
ती आम्ही अगदी हटकून गोळा करायचो.
अशी १०० तिकीटे दिली की एस टी कडून काही गिफ्ट म्हणते म्हणायचेत.
पण कुणाला गिफ्ट मिळालेले पाहिले नाही.
या माझ्या लेखाला, माबोवरील
या माझ्या लेखाला, माबोवरील जुन्या जाणत्या @ साती यांची प्रतिक्रिया लाभणे, हे मी माझे परमभाग्य समजतो. आपले फार फार आभार!!!
अरे वा.. एकदम नॉस्टेल्जिक
अरे वा.. एकदम नॉस्टेल्जिक झालं..
गोळ्या चॉकलेट्स बरोबरच गिफ्ट्स नव्हत्या मिळत.बिनाका टूथपेस्ट बरोबर प्लास्टिक चे सुबक आणी स्टर्डी प्राणी मिळत..ते जमवून मस्तंपैकी झू च तयार केला होता मी..
अरे वा.. छान लिहिता कि तुम्ही
अरे वा.. छान लिहिता कि तुम्ही सचिन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम नॉस्टेल्जिक झालं..
तुमचा विश्वास बसणार नाही पण ले'ज चिप्सच्या पाकिटात मिळणारे प्लॅस्टिकचे आणि बुमर च्युईंगसोबत मिळणारे पुठ्ठयाचे साठ (६०) एक टॅझो माझ्याकडे अजून आहेत.
आईस्क्रीम प्लॅस्टिकच्या बॉल मध्ये मिळणे आठवते. बहुतेक दिनशॉ आणि अमूलसुद्धा या बॉल मध्ये द्यायचे आईस्क्रीम..
तुम्ही म्हणताय ते पाण्यात भिजवून लावायचे टॅटू सुद्धा आठवते. बहुतेक ते हि अजूनही आहेत 15 तरी माझ्याकडे. पण त्यांच्यावर विचित्र भुतांची चित्रे असल्याने लावता येणार नाहीत ती मला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आठवणी. प्लास्टीक बॉल
छान आठवणी.
प्लास्टीक बॉल आईसक्रीम आमच्या काळातही होती.
भिंगरी शिट्टी वगैरे मात्र प्रकरण नव्हते
टॅट्टू तर हर जमानेमे असतातच, पण मला स्वत:ला टॅटूची जराही आवड नव्हती. ना आजही आहे. मी माझ्या शरीराचे देवाने दिलेलेच सौंदर्य नेहमी जपतो आणि ते शरीरावर असलेल्या दहाबारा तिळांनीच खुलते असे समजतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हल्लीचे ते किंडर जॉय फार महागडे प्रकरण आहे. बहुधा ४० रुपये सध्याचा रेट. टोटल गंडवायचे धंदे आहेत असे वाटते. यूट्यूबर त्या अंड्यांमधून काहीतरी सरप्राईज निघतात असे बरेच विडिओ आहेत. surprise eggs असे सर्च मारले की सापडतील. हे विडिओ किंडर जॉयच्या धंद्यासाठी बनवलेत की यावरून किंडरजॉयची कल्पना सुचलीय याची कल्पना नाही पण मुलेही हे विडिओ आवडीने बघतात आणि मग त्या चक्करमध्ये आईबापांना ते चॉकलेट घ्यायला लावतात. कोणीतरी त्याची मोनोपोली तोडत थोडे स्वस्तातले अंडे मार्केटमध्ये आणायला हवे.
दुसरी एक गोळा करायची गोष्ट
दुसरी एक गोळा करायची गोष्ट म्हणजे २१ बेरिज येईल अशी एस टी ची तिकीटे.
>>>>
हो हे माहीत आहे. माझेही मित्र करायचे. बेस्ट बसची तिकीटे. पण किती आकड्याची बेरीज हे आठवत नाही. कारण मी कधी ते केले नाही.
रेडीयमची मात्र आवड होती. भिंतीवरच्या घड्याळाला खोलत काट्यांना आणि एक ते बारा आकड्यांना रेडीयम लावत त्याला रात्रीचेही चमकवायचा यशस्वी प्रयत्न करून झालेला. पण प्रयत्न यशस्वी असूनही घरच्यांना माझा आगाऊपणा न रुचल्याने शिव्या पडलेल्या.
स्टीकरचा मला खूप शौक होता.
स्टीकरचा मला खूप शौक होता. मिळतील तेवढे स्टीकर मला कमी वाटायचे. माझी स्कूलबॅग, बॉटल, पॅड, कंपास, एकूण एक वस्तूंचा एकूण एक उपलब्ध पृष्ठभाग स्टीकर्सनी रंगलेला असायचा. घरीही कुठेकुठे लावायचो आणि शिव्या खायचो. स्पेशली आज्जीच्या. तिच्या भाषेत हा एक दळभद्री प्रकार होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चांगलं लिहिलेय
चांगलं लिहिलेय
छान आठवणी, आमचेही जुने दिवस
छान आठवणी, आमचेही जुने दिवस आठवले.
तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतही किती मोठ्ठा आनंद मिळायचा, नाही?
वाढत्या वयाबरोबर अन वाढत्या स्वार्थी व्यावहारीक अक्कलेबरोबर निरागस आनंदाची ती संवेदनाच नष्ट करुन बसलोत असे वाटते.
कुठल्याशा काडेपेट्यांच्या आत
कुठल्याशा काडेपेट्यांच्या आत वॉल्ट डिस्नेची कार्टून्स असली की दुकानात दाखवुन मग त्याची पोस्टर्स मिळत. माझ्याकडे स्गळी पोस्टर्स जमा झाली होती
रामायण सिरीयल चालु असताना
रामायण सिरीयल चालु असताना मॉडर्न ब्रेडमधे मालिकेतील पात्रांचे स्टिकर्स मिळायचे ते मी माझ्या लाकडी कपाटाच्या दाराला आतुन चिकटवले होते. सुदैवाने जवळपास सगळे स्टिकर्स अजुन शाबुत आहेत, हां, फिक्कट पडलेत, पण आहेत अजुन.
मस्तच!! अगदी छान आठवणी! टॅटू
मस्तच!! अगदी छान आठवणी!
टॅटू च्या स्टीकर वरुन आठवले एक चॉकलेट मिळत असे त्यात पांधरा कागद असायचा त्याला पाणी लावून फोटॉ डेव्हलप व्हायचा एखाद्या सिनेमाच्या हिरो हिरॉईन किंवा सिनेमाचे पोस्टर अथवा क्रिकेटर ५ पैश्याचे चॉकलेट तेवढयासाठी घ्यायचे ते जरी नुसता साखरेचा गोळा असायचे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान
छान
छान ! माझे बालपण, प्लास्टिक
छान ! माझे बालपण, प्लास्टिक युगाच्याही पूर्वीचे !
अहो सचिन काळे, धन्यवाद! पण मी
अहो सचिन काळे, धन्यवाद!
पण मी जुनी आहे, 'जाणती' नाही.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
@ साती, पण मी जुनी आहे,
@ साती, पण मी जुनी आहे, 'जाणती' नाही.>>> असे म्हणणेच आपली विनयशिलता आणि मोठेपणा सिद्ध करते. आपण देत असलेल्या प्रतिक्रिया विदवत्तापूर्ण आणि वाचनीय असतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर
सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार!!! माबोवरील दिगग्ज लेखक आणि लेखिकांनी येथे येऊन माझ्यासारख्या नवलेखकाच्या लेखावर प्रतिक्रिया दिल्यात, याचे माझ्या मनावर चांगलेच दडपण आलेय. आपला असाच आशीर्वाद माझ्यावर सतत राहो. आपण केलेल्या सहकार्याकरीता सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.
लहानपणी लाँग टाॅफी नावाच्या
लहानपणी लाँग टाॅफी नावाच्या चाॅकलेटबरोबर प्लास्टिकचे प्राणी मिळायचे. माझ्याकडे खुप कलेक्शन होते त्याचे.
एका वर्ल्ड लपला ब्रिटानिया ब्रांडच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर रन्स प्रिंट केलेले असत, असे १०० रन्स जमा केले की एक पुस्तिका मिळायची त्यावर स्क्रॅच केले की बक्षिस मिळायचे. ढीगाने अशी बुकलेट जमवली पण एकही बक्षिस मिळाले नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्तच.
मस्तच.
छान आठवणी,जुने दिवस
छान आठवणी,जुने दिवस आठवले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
माझ्या लहानपणी लॉटरी नावाचा अजब प्रकरण होते. आपण पैसे देउन दुकानदाराला १ ते १०० मधला आकडा सान्गायचा..मग तो त्याच्याकडे असलेल्या यादित बघुन त्या आकड्यासमोर असलेले गिफ्ट द्यायचा.प्लास्टिकचे स्टिकर,भिंगऱ्या,हिरो हिरोईनचे फोटो, क्रिकेटर्सचे फोटो अशा गिफ्ट आणी एक गोळी मिळायची.
कधी कधी नुसतीच गोळी (
यादी अर्थातच गुप्त ठेवली जायची
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
छान लिहिलेय. तुम्ही मोजके आणि
छान लिहिलेय. तुम्ही मोजके आणि आटोपशीर लिहीता त्यामुळे वाचायला आवडते.
सर्व नवीन प्रतिसादकर्त्यांचे
सर्व नवीन प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार!!!
पियु यांनी टॅझो आणि टॅटू, तसेच गिरीकंद यांनी स्टिकर अजून जपून ठेवल्याचे वाचून तोंडून सहज निघाले, वाह् !! क्या बात है!!!.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आम्ही लहानपणी सोरट खेळायचो.
आम्ही लहानपणी सोरट खेळायचो. चाराणे देवुन स्टीकर मिळायचे. आत जे लिहिले असेल ते मिळायचे (गोळी, शिट्टी, चिंगम असे काहीबाही).
एका वर्ल्ड लपला ब्रिटानिया ब्रांडच्या सगळ्या प्रोडक्ट्सवर रन्स प्रिंट केलेले असत, असे १०० रन्स जमा केले की एक पुस्तिका मिळायची त्यावर स्क्रॅच केले की बक्षिस मिळायचे. ढीगाने अशी बुकलेट जमवली पण एकही बक्षिस मिळाले नाही - मला मिळालेला सिझन बॉल. खुप आनंद झालेला.
मस्त लेख, मस्त
मस्त लेख, मस्त आठवणी.
कोलगेट पेस्टच्या बॉक्समध्ये एक छोटे प्लॅस्टिकचे पण थ्रीडी असलेले असे प्राणी मिळत. माझ्याकडे एक हिरव्या रंगाचा मासा होता असं आठवतंय.
आत बॉलबेअरिंगची गोळी घातलेल्या कॅपसुल्स मिळायच्या. त्या तळहातावर घेऊन त्यांचा नाच बघायला मजा येत असे.
>>>>> माझ्या लहानपणी लॉटरी नावाचा अजब प्रकरण होते. आपण पैसे देउन दुकानदाराला १ ते १०० मधला आकडा सान्गायचा..मग तो त्याच्याकडे असलेल्या यादित बघुन त्या आकड्यासमोर असलेले गिफ्ट द्यायचा.प्लास्टिकचे स्टिकर,भिंगऱ्या,हिरो हिरोईनचे फोटो, क्रिकेटर्सचे फोटो अशा गिफ्ट आणी एक गोळी मिळायची.
कधी कधी नुसतीच गोळी >>>> त्याला सोरट असं नाव होतं.
खुप मस्त लिहिला आहे लेख. खरच
खुप मस्त लिहिला आहे लेख. खरच एकदम नॉस्टेल्जिक झाले.
स्टीकर्स, थ्री डी चित्र, हातावर नाचणारी कॅप्सुल, आइसक्रिम भरलेले वेगवेगळे रंगाचे बॉल्स..... सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. माझ्या आणि माझ्या भावाच्या स्टडी टेबल्स, वॉर्ड रोब्जची प्रत्येक पट्टी स्टिकर्सने भरली होती. शिवाय फ्रीज पण. तेव्हा मॅग्नेट स्टिकर्स कमीच होते. पण या कधीच न निघणार्या स्टीकर्सने भरलेला एक भला मोठ्ठा फ्रिज आता पर्यंत होता. (त्याचा मुळ उपयोग संपल्यावर बंगल्याच्या एन्ट्रन्सजवळ डाव्या हाताला झुडुपामधे चप्पल ठेवायला वापरला जात होता, :फिदी:) त्यामुळे माहेरी गेलं की आत शिरतानाच बचपन की यादे एकदम ताज्या व्हायच्या.
रिनोवेशनमधे फ्रीज फेकला गेला, पण आज तुमच्या लेखाने परत मस्त वाटलं.