१९ जानेवारी २००५. मध्यरात्र उलटून गेलीय. रात्रीचे दोन वाजलेले. जुहू परिसरातल्या इमारतीतले दिवे मालवलेले होते, रस्त्याला किंचित पेंग येत होती. तिथल्याच पाम बीचवरील रिव्हीएरा ह्या बहुमजली इमारतीतील चौथ्या मजल्यावरील पश्चिमेकडील फ्लॅटमध्ये मात्र लाईट्स चालू होत्या. या फ्लॅटमधील लाईटस मागील पंधराएक वर्षात रात्री क्वचितच बंद व्हायच्या... फ्लॅटच्या दर्शनी हॉलमध्येच 'तिने' आपला बिस्तरा लावला होता. तिच्या समोरच्या भिंतीवर दोन मोठे पोट्रेट होते. उजव्या दिशेला कोपरयातील मेजावर एक कोरा कॅनव्हास होता. या भिंतीलगत आतल्या खोलीत जाण्याची एक चौकट होती, तिच्या डाव्या हाताला एक छोटीशी बेडरूम होती. जिचे दार मागील बऱ्याच महिन्यात तिने उघडलेले नसावे. हॉलच्या पुढची खोली किचन आणि स्टोअररूमची होती. त्या शेजारी एक व्हरांडावजा खोली होती. घरात बरेच किरकोळ सामान अस्ताव्यस्त पडलेले होते....त्या घरात मागील कित्येक रात्री तिला कसली म्हणून झोप नव्हतीच ! त्या दिवशीही तिला झोप आलेली नव्हती. एकाएकी तिला तिच्या परिचयाचा 'तो' आवाज आला आणि ती सावध झाली. आपली भांबावून गेलेली नजर तिने बेडवर असलेल्या दोन्ही चाकूकडे टाकली तरी तिचे समाधान झाले नाही. तिच्या कानावर पडणारा धाड धाड आवाज वाढत गेला. सहा सव्वा सहा फुट उंचीचा, हिप्पी हेअर स्टाईल मधला गोरा पान मध्यमवयीन माणूस हातात काठी घेऊन वेगाने जिना चढून तिच्या फ्लॅटच्या दिशेने धावत वरती येत होता. पायरयावर आपटणारया त्या व्यक्तीच्या पावलांच्या आवाजाने ती बेजार झाली होती. मध्येच फ्लॅटच्या दाराकडे पाहत ती काहीतरी पुटपुटत होती. अखेर तो धावत येणारा माणूस तिच्या दारावर येऊन आदळला. ती सावध होऊन दाराकडे बघत राहिली. काही वेळ तसाच गेला. तिच्या समोरील टेबलावर असणारे घड्याळ बंद पडले आहे की काय असे तिला वाटू लागले. तिच्या तोंडातून अस्पष्ट आवाज येत होते. ती कुणाची तरी नावं घेत होती. ती मध्येच दातओठ खात होती. मध्येच डोळे मिटत होती. मुठी आवळत होती. दाराबाहेरच्या माणसाचा आवाज आता बंद झाल्यावर काही वेळ निरव शांततेत गेला आणि तिच्या समोरील भिंत आता हलल्यासारखी वाटू लागली. ती भिंत फोडून किंचित टक्कल पडलेला, कुरळ्या केसाचा एक चाळीशीचा पोक्त पुरुष रडक्या चेहऱयाने बाहेर आला. खरं तर हे असं रोज चालायचं ! भिंतीतून बाहेर आलेला तो पुरुष उदास चेहऱ्याने तिचे हात हातात घेऊन बसायचा. तिच्या पुढ्यात बसून रडायचा. त्या सरशी तिचे डोळे पाणावत असत. असाच काही वेळ गेला की तिच्या डाव्या बाजूला असणारया खोलीत सहा साडेसहा फुट उंचीचा अँग्लोइंडियन वाटणारा गोरापान दाढीवाला आतून दार बडवण्यास सुरुवात करे. त्याच्या आवाजाची कंपने कमी जास्त होत असतानाच तिच्या किचनमधून तिला कुणीतरी मणिपुरी वाटणारा बसक्या नाकाचा गव्हाळ वर्णाचा किंचित बुटका माणूस आत बोलावत असल्यागत वाटे. हे सर्व आवाज बंद झाले की आतल्या बेडरूममध्ये शांतपणे ध्यानस्थ बसलेला, किंचित उतारवयाकडे झुकू लागलेला एक तेजस्वी लांब केसांचा पुरुष तिला हळूवार साद घालत असे. आता फ्लॅटच्या दाराबाहेरचा आवाज, भिंतीतून बाहेर येणारा तो पुरुष, बंद खोलीतून येणारा आवाज, किचनमधील हाका अन आतल्या बेडरूममधून येणारा आवाज यांचा जणू सारेगमाचा खेळ सुरु होई. एक बंद की एक चालू असे होता होता कधी कधी हे सगळे पंचसूर एकदम तिच्या कानात शिसं ओतावं तसे घुसत, तिथून तिच्या मेंदूच्या ठिकरया उडवीत सारया शरीरात दौडत असत. हे असं मागील खूप वर्षापासून चालू होतं. पण १९ तारखेच्या रात्री सुरु झालेलं हे सादनाट्य पहाटे तिच्या मेंदूत काळजात इतक्या वेगात धावू लागले की तिला कोणता आवाज कुठून येतोय तेच कळत नव्हते. काही वेळानंतर तिचे डोके फुटायची वेळ आली..तिचे श्वास मंद होऊ लागले. डोळ्याची बुब्बुळे वर जाऊ लागली. अखेर आवाज करणारी ती सर्व माणसे तिच्या भोवती येऊन उभी राहिली, ते सर्व जण श्वास रोखून एक टक तिच्याकडे बघत राहिले. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक अनामिक उदासीनता होती, अगतिकता होती... काही क्षणात तिचे श्वास थांबायला अन २० तारखेचा दिवस उजाडायला एकच गाठ पडली ....
२० जानेवारी २००५ - मागील सहा सात दिवसापासून दिवसातल्या चोवीस तासापैकी तेवीस तास ती हॉलमधील बेडवर पडून असायची. सकाळी एकदोन मिनिटात दाराबाहेर ठेवलेले दुध-पेपर घेताना दार किलकिले करून ते आत घेतले की तिचा बाह्य जगाशी संबंध उरत नसे. १९ तारखेच्या दिवशी तिने पोटात काहीच घेतले नव्हते. एकआदल्या दिवशी वाटीभर भात अन दोनेक चमचे अल्कोहोल तिने घेतले होते. मागील चारेक महिन्यापासून तिचा डावा पाय नुसता लसलसला होता. गँगरीन झालं होतं तिच्या पायात. स्वतःच्या हाताने ड्रेसिंग बँडेजचे काम ती करे. काही महिन्यापूर्वी तिने व्हीलचेअर मागवून घेतली होती. बेडवरून व्हीलचेअरवर आणि चेअरवरून बेडवर इतकीच तिची हालचाल सीमित झाली होती. व्हीलचेअरच्या एका हँडलवरदेखील एक चाकू पडून असे. हॉलमधील टेबलावर ड्रेसिंगच्या साहित्याबरोबरच मोठा स्कालपेल लोळत पडलेला असे. तिथेच बरीच औषधेही पडून होती. दोन तीन दिवसापूर्वी तिने घेतलेल्या चहाचा ओशट कप बेसिनमध्ये पडून होता, खरे तर ती अशी नव्हती. फार पंक्चुअल होती ती एकेकाळी, अपटुडेट काम चालायचे तिचे. आता मात्र जागोजागी पसारा पडलेला होता. सदैव बंद असणारे भक्कम दरवाजे, बंद खिडक्यांचे आतले पडदे लोटलेले असायचे अन लाईटस चालू असत. असा तिचा अजब कारभार होता. जेंव्हा तिने अखेरचा श्वास घेतला तेंव्हा त्या आधी कितीतरी दिवस तिने अंघोळसुद्धा केलेली नव्हती ! पूर्वी ती अशी नव्हती, तिच्याकडे बघून अनेकांनी सौंदर्याच्या व्याख्या लिहिल्या होत्या. गेल्या काही दिवसात तिने केससुद्धा विंचरले नव्हते. जवळपास एक आठवडयापासून अंगावर असणारं आकाशी रंगाचं जीर्ण झालेलं टॉप अन फिकट पिवळसर कॉटन शॉर्ट तिच्या अंगावर होते. २० तारखेच्या पहाटेस जेंव्हा तिच्या घरात नित्य कोलाहल करणारी ती सर्व पुरुष मंडळी गोळा झाली होती तेंव्हा तिच्या अंगाला खरे तर वास येत होता. तिच्या पायाच्या बँडेजमधून स्त्राव ओघळत होते. तिचा श्वास थांबला आणि ते सर्वजण जणू अंतर्धान पावले.....बघता बघता सकाळचे सात वाजून गेले, दुधवाल्या मुलाने तिच्या घराची डोअरबेल वाजवून दाराबाहेर अंडी आणि दुधाच्या पिशव्या ठेवल्या, इंडियन एक्सप्रेसचा अंक दारापाशी लोटला आणि तो निघून गेला. ती तशीच पडून होती, शांत चित्ताने ! कित्येक वर्षानंतर ती इतकी गाढ झोपली होती. अख्खा दिवस ती त्या बेडशीट विस्कटून गेलेल्या बेडवर पडून होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते. अगदी कोरी पाटी, निर्विकार !.. त्या रात्री त्या इमारतीच्या जिन्यातून कुणीही वर पळत आले नाही, तिच्या खोल्यातून कसलेही आवाज आले नाहीत की भिंतीतून माणूस बाहेर आला नाही ! जणू तिथले विश्व गोठले होते.....
२१ जानेवारी २००५ - दुधवाल्या मुलाने त्या दिवशी पुन्हा यांत्रिक पद्धतीने बेल दाबली अन दुध, अंडी - पेपर दारापाशी ठेवून तो गेला देखील. सगळी मुंबई आपल्या नादात होती ती मात्र निष्प्राण पडून होती. तिचे घरदेखील निचेष्ट झाले होते. तिच्यासमोर असणारया आरशात फक्त तिची धुरकट छबी दिसत होती. संपूर्ण दिवस रात्र त्या घरात एकच हालचाल सुरु होती, तो म्हणजे तिच्या डोक्यावरचा गरागरा फिरणारा सिलिंग फॅन. तिच्या अशा निर्विकार चेहऱ्याची त्याला सवय नव्हती त्यामुळे तो निर्जीव पंखा भेदरल्यासारखा वाटत होता. ही रात्र देखील भयाण शांततेत गेली...
२२ जानेवारी २००५ - दुधवाल्या मुलाने आज पुन्हा तिच्या दाराची डोअरबेल दाबली आणि दुध - पेपर दारापाशी ठेवून तो चालता झाला. दाराजवळ खाली ठेवलेलं कालचे, परवाचे दुध -पेपर अजून तिथेच कसे याचा त्याला प्रश्नदेखील पडला नाही ! मात्र तिच्या फ्लॅटसमोर राहणारया एम.एस.मल्होत्रा यांना हे खटकले. त्यांनी पुन्हा पुन्हा डोअरबेल वाजवली अन आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तेंव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ! त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती फोनवरून कळवली. काही वेळाने पोलीस आले आणि त्यांनी दार ठोठावले, धक्के देऊन पहिले मग डुप्लीकेट चावी वापरून आत प्रवेश केला. फ्लॅटच्या दर्शनी हॉलमध्ये ती पडून होती आणि पोलीस तिला बघून सुस्कारे सोडत होते. बाजूच्या काही रहिवाशांनी हळूच नाकाला रुमाल लावले. काही वेळानंतर त्या इमारतीच्या खाली सरकारी शववाहिका आली ....
२२ जानेवारीची उदासवाणी दुपार सरली होती, सूर्यकिरणे तिरपी झाली होती. त्या दिवशी काळ निशब्द होऊन घड्याळाच्या लंबकावर रेंगाळत होता. काही वेळाने अंधार पडायला सुरुवात झाली आणि जुहूच्या कुपर हॉस्पिटलमधील थंडगार शवागारातल्या एका थोड्याश्या गंजलेल्या पोलादी ट्रे मध्ये पडलेला एका स्त्रीचा मृतदेह जुनागढवरून आलेल्या मुरादखान बाबी या वृद्धाला दाखवण्यासाठी तिथल्या अटेंडंटने खस्सकन बाहेर ओढला. त्याकडे पाहताच मुरादखान बाबींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या ट्रे मध्ये पन्नाशीच्या वयाच्या एका स्त्रीचा फुगलेला मृतदेह होता ज्याला डॉक्टरांनी पॅराल्डेहाईड टोचून ठेवले होते. तिच्या डाव्या पायाच्या तळव्याला बेवारस मृतदेहाचा बक्कल होता ज्याचा क्रमांक होता ६२ ! तिच्या शेजारी लाकडी बॉक्समध्ये आणखी जवळपास पंधरा प्रेते तिथे पडून होती. त्या बेवारस स्त्री मृतदेह क्रमांक ६२ चे नाव आता रजिस्टर मध्ये लिहिले जाणार होते. मुरादखान बाबी यांनी तो मृतदेह आपल्या भाचीचा असल्याचे सांगितले आणि तिची आयडेंटी दिली. त्या सरशी तिचे नाव वारस मृत्युच्या यादीत लिहिले गेले - परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी !.... म्हणजे तिच ती, जुहूच्या पाम बीचवरील रिव्हीएरा बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावरील पश्चिमेकडील फ्लॅटमधली, डाव्या पायाला गँगरीन झालेली अन जिच्या डोक्याचा त्या आगंतुक माणसांनी भुगा पाडला होता ती !
म्हणजे जर ती रोज दुध घेत नसती तर आणखी पाचसहा दिवस तशीच वास मारत घरात पडून राहिली असती. तिच्या देहाची आणखी विटंबना झाली असती. तिला कुणी शोधलेच नसते कारण तिच्या शेजारी मल्होत्रा त्या दिवशी सांगत होते की, त्यांनी मागील पंधरा वर्षात फक्त पंधरा सोळा वेळाच तिला घराबाहेर पडताना पाहिले होते. ती असली काय अन नसली काय कुणाला फरक पडत नव्हता. तिच्या दाराबाहेरील दुधाच्या पिशव्यामुळे किमान तिसरया दिवशी तरी तिचा मृतदेह जगासमोर आला....
डॉक्टरांनी मुरादखानांना सांगितले की, तिचा मृत्यू तीन दिवसापूर्वीच झालेला आहे ! तिच्या मामेभावांच्या ताब्यात तिचे पोस्टमार्टेम झालेले शव देण्यात आले. तिचे मामा सांगत होते की, मागील दोन महिन्यांपासून ती एकाही नातलगाच्या संपर्कात नव्हती. एव्हाना एका मनस्वी देखण्या अन प्रेमाला आसुसलेल्या अभिनेत्रीचा भयाण मृत्यू झाल्याची मिडीयाला बातमी लागली अन सर्वत्र यावर चर्चा झडू लागल्या. परवीनच्या बेढब झालेल्या देहाला दुसऱ्या दिवशी जुहूच्या मुस्लीम कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले.... सर्वांनी कोरडी हळहळ व्यक्त केली, अशीच काही वर्षे लोटली.... मात्र परवीनचे दुदैव इथेच संपले नाही. ते तिच्या मृत्यूपरांत तिला छळत राहिले. तिला आयुष्यात हवी असणारी गोष्ट लगेच मिळाली नाही ही बाब मृत्यूपश्चातही तिला लागू होत गेली. तिला चिरनिद्रा मिळावी म्हणून जुहूच्या ज्या कब्रस्थानमध्ये तिला दफन केले गेले तिथे २००९ - १०च्या दरम्यान कब्रस्तान ट्रस्ट व पालिकेकडून तिची कबर तोडली गेली. त्यावर तीन फुट उंचीचा मातीचा नवा थर नव्या कलेवरांच्या दफनासाठी बनवला गेला. अशा रीतीने तिला तिथेही आराम नसीब झाला नाही. दुसरी एक दुर्दैवी योगायोगाची बाब म्हणजे आणखी काही कबरी या मोहिमेत तोडल्या गेल्या त्यात मधुबाला ह्या दुसऱ्या एका शापित परीचीही कबर होती........
४ एप्रिल १९४९ ला गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर चौदा वर्षांनी तिचा जन्म झाल्याने मोहम्मद बाबी यांना तेंव्हा अस्मान ठेंगणे झाले होते. ते तिथल्या नवाबाचे नातेवाईकही होते अन त्यांच्या पदरी प्रशासकीय कामात हातभार लावत होते. परवीनचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, बॉलीवूडमधील फर्डया इंग्रजी झाडणारया मोजक्या लोकांपैकी ती एक होती. तिच्या पत्रांवरून याची साक्ष पटते. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली..
८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते. झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. अल्पावधीतच परवीन बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या 'दीवार' या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. 'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये 'चरित्र' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला 'आकर्षण' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
बॉलीवूडमध्ये जितके लखलखते मायावी जग आहे तितकाच अंधारसुध्दा आहे. अल्पावधीत इंडस्ट्रीमध्ये यश मिळवणा-या परवीनचे आयुष्यसुध्दा दु:ख आणि तणावाने भरलेले होते. तिला तिच्या आयुष्यात यश, श्रीमंती, पैसा ग्लॅमर सर्वकाही मिळाले. परंतु ज्याच्यासोबत आपले संपूर्ण आयुष्य व्यतित करता येईल, असा एकही जोडीदार तिला गवसला नाही. या सर्व काळात तिने जोडीदाराचा शोधही घेतला. सर्वप्रथम अभिनेता डॅनीसोबत तिचे नाव जुळले. 'धुएं की लकीर' या परवीनच्या सिनेमाच्या सेटवर तो तासंतास येऊन बसायचा. इथून सुरु झालेले त्यांचे प्रेमप्रकरण खमंग चर्चिले गेले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. डॅनीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कबीर बेदीची तिच्या आयुष्यात एन्ट्री झाली. कबीर मुक्त विचारसरणीचा होता. सिगारेट, मद्यप्राशन करणा-या परवीनसोबत त्यांची मैत्री झाली. एकमेकांची साथ त्यांना भावली आणि त्यांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही. परवीन आपल्या करिअरमध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये सामील होती. तेव्हा ती महेश भट्ट यांच्या जवळच्या परिघात होती. १९७७ मध्ये दोघांचे प्रेम संबंध वाढले. जवळजवळ तीन वर्षे (१९७७ - ८०) हे दोघे सोबत होते. महेश भट्ट विवाहीत होते तर परवीनसुध्दा कबीर बेदीसोबतच्या ब्रेकअमधून बाहेर पडत होती. या दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी परवीन 'अमर अकबर अँथनी' आणि 'काला पत्थर' सिनेमांची शुटिंग करत होती. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले होते, की त्यांच्यामध्ये केवळ प्रेमाला स्थान होते. दोघे जेव्हा एकत्र असायचे तेव्हा सर्व कामे आणि स्टारडम मागे पडत होते. परवीन महेश यांच्यावर जिवापाड प्रेम करत होती.
महेश आणि परवीन यांच्या नात्याला १९७९ मध्ये दोन वर्षे उलटून गेली होती. त्यावर्षीच्या एका बेसावध दिवशी महेश भट्टना अचानक आपल्या आयुष्यातील एका मोठ्या सत्य घटनेचा सामना करावा लागला. त्या दिवशी जेव्हा महेश घरी परतले तेव्हा त्यांनी बघितले, की सिनेमातील एक कॉस्ट्युम परिधान करून परवीन त्यांच्या घरातील एका कोप-यात हातात चाकू घेऊन बसलेली होती. महेश भट्टना बघून ती म्हणाली, 'शांत बसा काहीच बोलू नका, खोलीमध्ये कुणीतरी आहे. तो मला मारण्याचा प्रयत्न करत आहे.' या विचित्र प्रसंगामुळे महेशना मोठा धक्काच बसला. त्यांनी परवीनचे हे रुप पूर्वी कधीच बघितले नव्हते. परंतु त्यानंतर परवीन नेहमीच अशी वागायला लागली होती. डॉक्टरांना दाखवल्यानंतर समजले, की तिला 'पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया' नावाचा मानसिक आजार आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर परवीनचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याचे कारण तिच्या आयुष्यात आलेला एकटेपणा होता.
१९८० च्या काळातही एक अशीच घटना घडली होती. तेंव्हा रमेश सिप्पींच्या 'शान' या सिनेमाचे शूटिंग सुरु होते. सिनेमाच्या शीर्षक गीताचे चित्रीकरण सुरु होते. अमिताभ बच्चन, शशी कपूर, बिंदिया गोस्वामी, जॉनी वॉकर, बिंदू आणि परवीन बाबी सेटवर हजर होते. गाण्याचे शूटिंग सुरु होताच परवीनने ते अचानक थांबवले. तिने सेटवर लावण्यात आलेल्या झुंबराच्या खाली उभे राहण्यास नकार दिला. झुंबर खाली पाडून आपल्याला जीवे मारण्याचे अमिताभ बच्चन यांनी कटकारस्थान रचले असल्याचा खळबळजनक आरोप तिने केला. या षडयंत्रात रमेश सिप्पीसुद्धा सामील असल्याचे तिने म्हटले. परवीनच्या या आरोपांनंतर सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. या घटनेमुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. याकाळात परवीन आणि अमिताभ बच्चन दोघेही सुपरस्टार बनलेले होते. खरेतर आजारपणामुळे परवीनची मानसिकता स्थिती इतकी बिघडली होती, की ती अमिताभ बच्चन यांना आपला शत्रु समजायला लागली होती. बिग बींसोबत अनेक सुपरहिट सिनेमे देणा-या परवीनला वाटायचे, की अमिताभ तिला जिवे मारणार आहे.
जुहूच्या तिच्या इमारतीत जिन्यावरून तिच्या फ्लॅटकडे धावत येणारया उंच माणसाचा भास हा कदाचित अमिताभ बद्दलचाच असावा. तर तिच्या समोरील भिंत फोडून बाहेर येऊन उदास मनाने तिच्या शेजारी बसणारा माणूस हा कदाचित महेश भट्ट असावा तर बंद खोलीत दार वाजवणारा अँग्लोइंडियन म्हणजे कबीर बेदी अन किचनमधून आवाज देणारा बहुतेक डॅनीचा वाटत असावा. तर आतल्या बेडरूममध्ये बसलेली व्यक्ती म्हणजे यु.जी. कृष्णमूर्ती असावेत. हे सगळे जसे तिचे भास होते तसेच ते तिचा भूतकाळही होते अन दुर्दैवाने तिच्या आजारातले कथित वर्तमानही होते !
महेश भट्ट यांच्यासोबतचे नाते तुटल्याने परवीन पूर्णतः खचून गेली होती. तिला असलेल्या विकाराच्या अमलाखाली शेवटी ती पूर्णत: मोडून पडली. तिचा कुणावरही विश्वास राहिला नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांवरही विश्वास राहिला नाही, कुणीतरी तिला मारून टाकणार असल्याचे भ्रम वाढू लागले. ज्या पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराची ती रूग्ण होती त्या विकाराचे मूळ जनुकीय रचनेत असल्याचे मानले जाते. ज्यात रूग्णाला त्याच्या अवतीभवतीच्या कोणत्याच गोष्टीवर, कोणत्याच व्यक्तीवर विश्वास राहात नाही; सगळे लोक आपल्याला मारायला टपले आहेत अशी भावना निर्माण होते आणि असा रूग्ण स्वत:ला सतत कोंडून घेतो. हा एक अनुवांशिक आजार असल्याने तिची बरी होण्याची शक्यता नव्हतीच. परवीनच्या आजाराविषयी सखोल माहिती होताच डॉक्टरांनी सांगितले की, तिला लवकरात-लवकर बरे करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक शॉक द्यावे लागतील. ज्या सिनेमा निर्मात्यांनी परवीनला साइन केले होते त्यांना आपले सिनेमे डबाबंद होण्याच्या मार्गावर दिसून येत होता. सर्वांना परवीन ठिक होण्याची मोठी प्रतिक्षा होती. त्यावेळी परवीनला इलेक्ट्रॉ़निक शॉक देण्यास महेश यांनी विरोध केला होता. या विरोधापायी इंडस्ट्रीने त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यावेळी असेही म्हटले गेले की, 'महेश भट्टनी परवीनचा फक्त वापर केला. आपल्या फायद्यासाठी त्यांनी परवीनच्या स्टारडम आणि लोकप्रियतेचा वापर केला आहे आणि आता परवीन ठिक व्हावी अशी त्यांची इच्छा नाहीये.' वस्तुस्थिती उलट होती. या कामात तिचा एक्स बॉयफ्रेंड कबीर बेदीनेसुध्दा त्यांची मदत केली होती. अनेक उपचार घेऊनदेखील परवीनवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट तिच्या मनात भीती वाढत गेली. कुणी तरी तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे असाच भ्रम तिला वाटत राहिला. काही कालावधीनंतर परवीनला वाटू लागले की, तिच्या कारमध्ये कुणीतरी बॉम्ब ठेवला आहे. ती कोणत्याही आवाजाला घाबरायची. तिच्या अशा वागण्याने तिला नेहमी खोलीत बंद करून आणि माध्यमांपासून दूर ठेवावे लागत होते. या निर्णयास महेश भट्टनी सतत विरोध केला तेव्हा नंतर तिची प्रकृती खूप नाजूक झाली होती. पुढे तिने औषधे घेणे बंद केले होते. यातील काही काळात तर जीवाच्या भीतीपोटी ती आधी महेश भट्टना औषधे घ्यायला लावी, जेणेकरून तिची खात्री पटावी, की ती औषधे योग्य आहेत !
तिच्यात मानसिक आजाराची लक्षणे दिसत असतानाच ती जे. कृष्णमूर्तींच्या वाङमयाकडे आकर्षित झालेली होती, त्यांची अनुयायी बनलेली होती. कबीर बेदीच्या प्रेमात पडलेली असताना, मुंबईमध्येच परवीन बाबी आणि तत्ववेत्ते समुपदेशक यु.जी.कृष्णमूर्तींची भेट झाली. या भेटीत परवीनने युजींसमोर जे. कृष्णमूर्तींचा(जे.के.) उल्लेख करताच युजी त्यांच्या नेहमीच्या ब्रॅण्डेड शैलीत गरजले - " फक्त पोकळ शब्द आणि वाक्यप्रचारांशिवाय त्यात काहीही नाही." पुढे युजींनी जे.के. "बनावट" असल्याचेही ठासून सांगितले. युजी कितीही कठोरपणे जेकेंबद्दल प्रत्येक गोष्ट खोडून काढत असताना, युजींच्या बोलण्यातील ठामपणा आणि लोकांसोबत वागण्यातील युजींची अकृत्रिम सहजता, आनंददायकता याकडे परवीन बाबी आकर्षित झाली; युजींनी पॅरानॉईड स्किझोफ्रिनीयाने गांजलेल्या परवीन बाबीला आधार दिला. युजींनी तिचे तळवे हातात घेऊन त्यांची "एनर्जी" दिल्याने ती बरी झाल्याची नोंद परवीन बाबीने केलेल्या कन्फेशनमध्ये आढळते. हा विकार टाळायचा असेल तर चित्रपट क्षेत्रच सोडण्याचाही सल्ला दिला. त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणे सोडून दिले. ती, युजी आणि व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान, महेश भट यांच्यासोबत दक्षिण भारताचे पर्यटन करीत हिंडू लागली. राहाण्याच्या ठिकाणात बदल झाल्याने किंवा कामाचे ताणतणाव कमी झाल्याने म्हणा पण परवीन बाबीला युजींसोबत पूर्णत: बरे वाटू लागले. पुढे ती युजींसोबत अमेरिकेला गेली आणि एकांतात आयुष्य जगायला लागली. तिथे तिने दवापाणी देखील केले. दरम्यानच्या काळात आपल्यावरील ह्या आरोपांनी महेश भट्ट यांचा आत्मविश्वास पूर्ण खचून गेला होता. परवीनची ठिक होण्याची शक्यता सुध्दा आता त्यांना कमीच वाटत होती. शेवटी त्यांनी तिला अमेरिकेहून मायदेशी आणायचे ठरवले. पण ती दाद देत नव्हती मात्र १० वर्षांच्या गॅपनंतर ती अचानक मुंबईला परतली.....
मुंबईला परतण्यामागे एक कारण होते कारण प्रोड्यूसर्सशी झालेले तिचे करार ! हे करार पूर्ण करण्यासाठी ते तगादा लावत होते. ती पुन्हा एकदा तिच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रीत करू लागली, याच काळात परवीनने जुहूतील एका बंगल्यात युजींना जागा शोधून दिली; व्हॅलेण्टाईन आणि युजी तिथे राहू लागले. या काळात परवीनचे दूर झालेले आजारपण पुन्हा एकदा उचल खाणार असल्याबद्दल, चित्रपटाच्या जीवनशैलीला रामराम ठोकण्याबद्दल युजी सतत तिला बजावत होते मात्र ती तसे करू शकत नव्हती कारण प्रसिध्दी, पैसा आणि वलय देणारे जग सोडणे सोपे नव्हते. शिवाय लोकांसोबत नवीन चित्रपटाचे करारही झालेले होते. तरीही तिला पुन्हा पुन्हा अस्वस्थ वाटू लागले...
त्यामुळे महेश भट्ट परवीनला मुंबईहून दूर बंगळूरला घेऊन गेले. त्यांनी परवीनला तणावापासून दूर ठेवायचे होते. त्यांना वाटले, की नवीन वातावरण तिला ठीक करेल. ती जून्या गोष्टी विसरून जाईल. परंतु परवीनवर उपचार करणा-या डॉक्टरांच्या मते, महेश भट्टच्या उपस्थितीने तिची प्रकृती जास्त खालावत होती. त्यामुळे त्यांनीच महेशभट्टना तिच्यापासून दूर राहण्यास सांगितले. त्यामुळे काही दिवसांनी महेश परवीनला तिथेच सोडून आपली पत्नी लॉरेनकडे परतले. या दरम्यानच महेश भट्टनी 'अर्थ'ची कथा लिहीण्यास सुरूवात केली होती. हा चित्रपट त्या दोघांच्या आयुष्यावरच आधारित होता.
महेश भट्ट पाठोपाठ काही दिवसांनंतर परवीनसुध्दा अपूर्ण उपचार करून मुंबईला परतली. तसेच, आपल्या पत्नीकडे परतलेले महेश भट्टसुध्दा स्वत:ला परवीनपासून दूर ठेऊ शकले नाही. एकेरात्री जेव्हा परवीनने महेश भट्ट यांच्याकडे प्रस्ताव ठेवला, की त्यांनी तिची आणि फिलॉसॉफर (यु.जी.) यांपैकी एकाची निवड करावी. खरे तर हा धक्कादायक प्रस्ताव होता ! महेश भट्ट या प्रसंगाबद्दल म्हणतात की 'परवीनची ही परिस्थिती बघून मला जाणवले, की आमच्या नात्याचा अंत जवळ आला आहे असे मला वाटले.' त्या मध्यरात्रीस महेश भट्ट परवीनच्या घरातून निघून गेले. त्यांना थांबवण्यासाठी परवीन विवस्त्र होऊन त्यांच्या मागे धावत गेली. परंतु महेश भट्ट थांबले नाहीत. तिला झिडकारून ते पुढे निघून गेले. या प्रसंगी तिच्या कोमेजून गेलेल्या मनावर काय आघात झाले असतील याची कल्पना करवत नाही.
पुढच्या काळात परवीन युजींसोबत बाली बेटांच्या पर्यटनासाठी निघुन गेली. 'यु जी कृष्णमूर्ती आणि परवीन बाबी यांनी लग्न केले असून हनिमूनसाठी ते बाली बेटांवर गेले आहेत' अशी बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने छापली. परवीनचे मानसिक आजारपण वाढले असताना बंगलोर आणि मुंबईमध्ये युजींनी तिच्याकडे दिलेले लक्ष, तिला घ्यायला एअरपोर्टवर जाणे, तिचा फोन येताच तिच्याकडे जाणे यातून खुद्द परवीन बाबीलाच युजी हे तिच्या प्रेमात पडले असल्याचा, व्हॅलेण्टाईन डि कार्व्हान ही युजींची आश्रयदाती आणि त्यांच्या देशविदेशाच्या प्रवासात त्यांना सतत सोबत करणारी सोबतीण आता वयोवृध्द झाल्याने "परवीन बाबी" ही आर्थिकदृष्ट्या सबल, तरूण असामी तिची जागा घ्यायला सुयोग्य असल्याचा भ्रम निर्माण झाला होता आणि तिने ही गोष्ट खासगीमध्ये मित्रमैत्रिणींना बोलूनही दाखवली होती. युजी आणि परवीन बाबीचे लग्न झाल्याच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीमुळे खळबळ माजली. युजी बालीहुन परत आल्यानंतर विमानतळावर पत्रकारांनी युजींना त्या बातमीच्या सत्यतेबद्दल खुलासा करायला सांगितला. युजी म्हणाले, "ती बातमी खरी असायला हवी होती असे मला वाटते. परवीन ही श्रीमंत, सुप्रसिध्द, सुंदर अभिनेत्री आहे. त्यापेक्षा जास्त मला काय मिळू शकते?" टाईम्स ऑफ इंडियाने ही खोटी बातमी दिल्याबद्दल त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा युजींच्या मित्रांनी त्यांना सल्ला दिला. यावर हसतहसत युजी उत्तरले होते, " ती बातमी खरी असली तर त्यामुळे मला वाईट वाटायला नको, खोटी असली तरीही वाईट वाटायला नको - कोणत्याही बाबतीत त्यामुळे मला कसलीच इजा झालेली नाही !"
बालीहून आल्यावर परवीन पुन्हा एकदा कामाकडे लक्ष देऊ लागली. पण तिला पुन्हा एकदा तिचा वेडेपणा उचल खाणार अशी भीती वाटत असे. तिचे प्रोड्यूसर्सदेखील आता जास्त आक्रामक झाले होते आणि काहींनी तिच्यावर दावेही दाखल केले होते. परवीनकडे लोकांना ती त्या काळात जात असलेल्या परिस्थितीबद्दल पटवून देण्याचा कोणताच मार्ग नव्हता. युजींनी पुन्हा एकदा परवीनला मदतीचा हात दिला - तिला स्वित्झरलँडला जाऊन तिथे एक नवे जीवन सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. गोंधळात सापडलेली परवीन बाबी युजींसोबत स्वित्झरलँडला गेली. तिथे गेल्यानंतर करायला काहीच काम नसल्याने परवीन बाबी दिवसभर झोपून राही. तिच्या मनात नवीन जीवन सुरू होण्याचे विचार असत. पण पुढे काहीही घडेना. पण तिच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत पूर्वी कधीही झाली नव्हती एवढी सुधारणा झाली. तिने युजींना भारतात परत जायचे तिकीट देण्याबद्दल विचारणा केली. युजींनी तिला परत जाण्यापासून थांबवण्याचा शेवटचा निकराचा प्रयत्न करून पाहिला आणि यावेळी मात्र आजाराने उचल खाल्ल्यास ते घातक ठरेल हे बजावले. पण परवीनने ते ऐकले नाही. शेवटी एके रात्री फक्त पासपोर्ट आणि अंगावरचे कपडे यांसह परवीन लंडनला जाणार्या फ्लाईटमध्ये जाऊन बसली. प्रवासादरम्यान दुबई विमानतळावरून आपण स्वित्झरलॅण्डच्या मार्गावर असल्याचे तिने युजींना फोन करून सांगितले. यावेळी मात्र युजींचा मोहरा तिला संरक्षण देणाराही वाटला नाही किंवा आधार देणाराही वाटला नाही. ती ठीकठाक असून स्वतचे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, आपण तिच्याबद्दल कोणताही सल्ला देऊ शकत नसल्याबद्दल युजींनी तिच्याकडे स्पष्ट केले. मागच्या वेळी परवीन बाबी असल्याच विचित्र मानसिक स्थितीत सापडली होती तेव्हा युजींनी तिच्याबद्दल दाखवलेली काळजी, तिला स्वत:सोबत पर्यटनाला घेऊन जाणे, प्रामाणिकपणे आधार देणे या गोष्टींचा खुद्द परवीन बाबी, प्रसार माध्यमे वगैरे सगळ्यांनी गैर अर्थ काढला होता. यावेळीही तिला आधार द्यावा तर पुन्हा एकदा वृत्तपत्रे, गॉसिप मॅगझिन्स, तिचे प्रोड्यूसर्स, मित्र आणि तिची आई सगळेच पुन्हा एकदा युजींना दोष देणार होते. त्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, कुठल्याच प्रकारे त्यांना भारतीय चित्रपट क्षेत्रासोबत गुंता निर्माण करायचा नाहीय हे युजींनी तिला स्पष्ट केले. अखेर ती पुनश्च भारतात परतली.
भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा अभिनयाचे काम सुरू करायला परवीनला अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. प्रोड्यूसर्स आता तिला काम द्यायला कचरू लागले. पण परवीनने पुन्हा एकदा कामात दाखवलेले सातत्य आणि तिच्या व्यक्तीगत भेटींमुळी काही प्रोड्यूसर्सनी तिला काम दिले. असा काही काळ गेल्यानंतर पुन्हा परवीनचे मानसिक आजारपण बळावू लागले. जागेत बदल म्हणून ती मित्राकडे राहायला गेली. डॉक्टरांनी सांगितलेली औषधेही आता तिच्यावर काही परिणाम करेनाशी झाली. नेमक्या याच स्थितीबद्दल युजी तिला बजावत होते. यावेळी आणखी एक बाब तिला स्पष्ट झाल्याचे परवीन तिच्या कन्फेशनमध्ये सांगते: "गेल्यावेळी मी औषधांमुळे बरी झाले नव्हते, आताही औषधांमुळे मला बरे वाटणार नाही. माझे आरोग्य परत यायला युजींची ऊर्जा कारणीभूत होती. ते नेहमीच माझे जीवन, माझे आरोग्य, माझ्या भविष्याबद्दल मनातून चिंतीत होते." आता सर्व गोष्टी स्पष्ट झाल्याने पुन्हा एकदा परवीनला युजींना भेटायचे होते, धन्यवाद देण्यासाठी नाही किंवा मदत मागण्यासाठीही नाही. फक्त त्यांना बोलायचे होते. लवकर बरे वाटू लागावे म्हणून ती स्वत:ला कोंडून घेऊ लागली. पण त्यामुळे ती आणखीच अस्वस्थ झाली. पण तिची परिस्थिती पाहाता तिचे कुटूंबीय किंवा मित्र-मैत्रिणीदेखील परवीनला त्यांच्यापासून एकट्याने दूर जाऊ द्यायला तयार झाले नसते. एके रात्री तिने तिची आई आणि सेक्रेटरीसमोर सगळी परिस्थिती स्पष्ट केली. तिचा कुणावरच विश्वास नव्हता - युजी वगळता ! पण आता ते देखील तिच्या जवळ नव्हते...
२००२ मध्ये आईच्या निधनानंतर परवीनचे मानसिक संतुलन अधिकच बिघडले. तिची मानसिक अवस्था इतकी बिघडली की तिला मिडीयाने काही चर्चमध्ये पॉइंट आउट केले. तिच्या खिश्चनिटीच्या चर्चा नव्याने सुरु झाल्या. याच वेळी तिची शारीरिक अवस्था खालावत गेली. एकटेपणा, नैराश्य यांच्या खोल गर्तेत ती फेकली गेली. जुहूच्या फ्लॅटमध्ये ती एकटीच राहू लागली होती. भरीस भर म्हणून परवीनला मधुमेह उद्भवला होता. त्यातून पुढे पायाला आधी सेप्टिक झाले मग पुढे त्याचे रुपांतर गँगरीनमध्ये झाले. त्यामुळे तिच्या किडनी आणि शरीराच्या काही अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यातच पुढे तिचा दारुण अन भयाण मृत्यू ओढवला होता. तिचा मृत्यू आजारपणामुळे झाला असला तरी काहींच्या मते तिने आत्महत्या केली होती. पण तिच्या पोस्टमार्टेम अहवालानुसार 'तिचा मृत्यू नैसर्गिक होता, तिच्या आतड्यात काही मिलीग्राम अन्न अन काही मिली अल्कोहोल आढळले होते. तिचा उजवा पाय निकामी होण्याच्या मार्गावर होता.' परवीनच्या मृत्यूनंतर कित्येक तास तिच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य तिचा मृतदेह घेण्यास वेळेत आले नाही तेव्हा महेश भट्टनी स्वत: तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले होते. मात्र तिचे मामा मुरादखान आले आणि सगळे प्रश्न निकाली निघाले. 'अर्थ'नंतर 'फिर तेरी कहानी याद आयी', 'वो लम्हे' हे सिनेमेही महेश भट्टनी परवीनचे आभार व्यक्त करण्यासाठीच काढले असल्याचे आजही बोलले जाते.
परवीनला जाऊन आता अकरा वर्षे झालीत. तिच्या रूहला जन्नत नसीब झाली की नाही ते माहित नाही पण तिने बनवलेल्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी व्हायला अकरा वर्षे लागली हे खरे. तिच्या मृत्यूपत्रानुसार तिच्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा मार्ग काल मोकळा झाला. अत्यंत विपन्नावस्थेत मृत्यूमुखी पडलेल्या या देखण्या अभिनेत्रीची अंतिम इच्छा आता पूर्ण होईल...
तिच्या मृत्यूपत्रातील अटी तिची सुसंस्कारित जडणघडण दर्शवण्यास पुरेशा आहेत...तिच्या मृत्यूपश्चात तिच्या मामांना (मुरादखान बाबी यांना) आता २० टक्के संपत्ती मिळणार आहे अन उरलेली ८० टक्के संपत्ती तिच्या नावाचा चेरीटेबल ट्रस्ट काढून त्यामार्फत गरजूंना, गोर गरिबांना मदत केली जाईल.... अहमदाबादच्या ज्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून तिने इंग्रजी साहित्याची पदवी घेतली त्या महाविदयालयाला देखील यातून १० टक्के रक्कम दिली जाणार आहे...
बॉलीवूडच्या ग्लॅमरचा दारुण आणि भयाण चेहरा म्हणून ओळखली जाणारया परवीनची एक बाजू किती सुजाण आणि सुसंस्कृत होती याचा हा बोलका पुरावा म्हणावा लागेल...
"प्यार करनेवाले प्यार करते है शानसे, जिते है शान से, मरते है शानसे.. !' हे गाणं पडदयावर गाणारया परवीनला प्रत्यक्षात कुठेच खरी शान मिळाली नाही. ना तिच्या आयुष्यात न तिच्या मृत्यूत !
'शान'मधले हे देखणं गाणं पाहताना परवीनचा मधाळ चेहरा डोळ्यापुढे आला की काही वेळ पडदा धूसर दिसू लागतो अन नकळत रुमालाकडे हात जातो ....
- समीर गायकवाड.
https://sameerbapu.blogspot.in/2016/10/blog-post_22.html
लेखन संदर्भ - "For Me, She Died Twice... | Mahesh Bhatt". Outlookindia, "Parveen Babi: A life interrupted". The Times of India. 10 August 2002., Snehal Fernandes - "She said we were her only family". Express India, "The Myth & Madness of Parveen Babi". iDiva या सगळ्यातून एक्सट्रॅक्ट करून लेखन केलेले आहे ... यु.जी.कृष्णमूर्तीवर श्री.गुरुनाथ कुलकर्णी यांनी अभ्यासपूर्वक लिहिले आहे तीही माहिती यात कामाला आली आहे ...
वाईट
वाईट
अतिशय वेदनादायी कहाणी असे
अतिशय वेदनादायी कहाणी असे व्हायला नको होते इतकेच आपण म्हणू शकतो !
अतिशय वेदनादायी कहाणी अरेरे
अतिशय वेदनादायी कहाणी अरेरे असे व्हायला नको होते इतकेच आपण म्हणू शकतो !
<<
सहमत !
काही गोष्टी तुमच्या लेखातून
काही गोष्टी तुमच्या लेखातून नव्याने समजतात. बाकी एका अभिनेत्रीशिवाय एवढी खोल ओळख नव्हतीच .
.......
:(.......
तुम्ही नेहमी चटका लावणारे
तुम्ही नेहमी चटका लावणारे लिहीता,परवीन बाबीला पॅरेनॉईड स्कीझोफ्रेनीया झाला होता हे माहीत होते व तेच तिच्या मृत्युचे कारण होते असे वाटते.
खुप दुर्दैवी ! मला ती मच गया
खुप दुर्दैवी ! मला ती मच गया शोर सारी नगरी गाण्यातल्या गेट अप मधे फार आवडली होती.... लिखनेवाले ने लिख डाले.. या लताच्या गाण्यातही फार आवडली होती ती.
>>>> पॅरेनॉईड स्कीझोफ्रेनीया
>>>> पॅरेनॉईड स्कीझोफ्रेनीया << याला अॅलोपॅथीमधे काहीच उपाय नाही? का औषधे घेण्याची चालढकलही कारणीभूत असेल?
बापरे यातले काहीच माहिती
बापरे यातले काहीच माहिती नव्हते
निशब्द
निशब्द
फार वाईट. दुर्दैवी.
फार वाईट. दुर्दैवी.
करुण अन दुर्दैवी अंत..
करुण अन दुर्दैवी अंत..
परवीन मला जाम आवडते. अमर
परवीन मला जाम आवडते. अमर अकबर एंथनी मधे ती त्याला यस नाव व्हॉट म्हण ते ते , तिचे कपडे व केस म्हणजे अल्टिमेट. त्या काळात अश्या साइट्स असत्या तर तिने बाफ काढला असता व सल्ले घेतले असते तर पुढची परवड वाचली असती कदाचित.
तुम्ही सकारात्मक स्त्रियांबद्दल रिसर्च करत नाही का? जीवनाचे चीज केलेल्या, उत्तम आया, संशोधक, कलाकार किती तरी आहेत. मेरील स्ट्रीप, बियोन्से, आमच्या फील्ड मध्ये पण ग्रेट स्त्रिया आहेत.
अमा ,ते नेहमी करुण
अमा ,ते नेहमी करुण लिहीतात.त्यांनी काहीतरी सकारात्मक लीहीले पाहिजे असे वाटते.
Mai wohich bol Rahi
Mai wohich bol Rahi sinjibhai. It is such a beauty and privilege to be a woman and achieve ones full potential. Every person goes through good and bad times. End toh har ek ka sad hi hona hai. BTW watching partner movie.
हरकत काय आहे, सगळ्यांनीच
हरकत काय आहे, सगळ्यांनीच चांगलं चुंगल लिहिलं पाहिजे असे थोडीच आहे
No issue.
No issue.
अमाना समर्थन, वहिदा रेहमान,
अमाना समर्थन,
वहिदा रेहमान, हेमा मालिनी, शर्मिला टॅगोर अश्या काही अभिनेत्रींनी दीर्घ कारकिर्द यशस्वी करुन दाखवली आहे. त्यांच्य्याबद्दलही वाचायला आवडेल.
हुरहुर...छान लिहिलतं...
हुरहुर...छान लिहिलतं...
(No subject)
फारच उदास वाटते असे काही
फारच उदास वाटते असे काही वाचले की
'अमर अकबर एंथोनी', 'दीवार',
'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. >>>>
काला पत्थर मधे अमिताभ बरोबर राखी होती. सुहाग मधे रेखा आणि नमक हलाल मधे स्मिता पाटिल.
फारच दुर्दैवी अंत. असे
फारच दुर्दैवी अंत.
असे व्हायला नको होते इतकेच आपण म्हणू शकतो !
अतिशय वेदनादायी कहाणी अरेरे
अतिशय वेदनादायी कहाणी अरेरे असे व्हायला नको होते इतकेच आपण म्हणू शकतो !
>>>> +१
felt very bad
felt very bad
अतिशय वेदनादायी कहाणी अरेरे
अतिशय वेदनादायी कहाणी अरेरे असे व्हायला नको होते इतकेच आपण म्हणू शकतो ! >>>> +१
परवीन बाबीचे केस फार सुरेख!
परवीन बाबीचे केस फार सुरेख! तिची शेखर सुमन ने घेतलेली एक मुलाखत पाहिली होती. त्यात तिने `मोस्ट हँड्सम मॅन' म्हणून अमिताभ चं डिक्लेअर होणं ' हा मोठा विनोद असल्याचं म्हणलं होत. (त्यात तो उत्तम अभिनेता आहे पण देखणा नाही असं काहीस ती म्हणाली होती. भविष्यात लोकंन्ना हसवणारा कार्यक्रम करायचा प्लॅन आहे अस ही सांगितल्याच आठवतय)
परवीन बाबी च्या म्रुत्यू ची
परवीन बाबी च्या म्रुत्यू ची बातमी मिळाली तेव्हा मी ज्या कम्पनी मध्ये काम करत होते, त्यातील एकाने हसत म्हटले
होते "मुझे भी उसके प्रोपेर्टी मे हिस्सा चाहिये, मै भी उसका बडा चाहता हुआ करता था" ..तिच्या प्रोपर्टी वर हक्क सान्गणारे बरेच जण पुढे आले होते त्या वे ळेस...
मन बधीर करणारी हकीकत. चित्त
मन बधीर करणारी हकीकत. चित्त खिळवून ठेवणारी प्रभावी मांडणी आणि परिणामकारक शब्दरचना. लिखाणातले बारीकसारीक तपशील लेख किती अभ्यास करून लिहिला आहे याची जाणीव करून देतात. काही गोष्टी माहित होत्या. पण अनेक गोष्टी माहित नव्हत्या त्या या लेखामुळे माहित झाल्या.
>> तिचे श्वास मंद होऊ लागले. डोळ्याची बुब्बुळे वर जाऊ लागली. काही क्षणात तिचे श्वास थांबायला अन २० तारखेचा दिवस उजाडायला एकच गाठ पडली ....
"सारे सपने टूट गये है... मै मर तो बहुत पहले गयी थी, विजय...": https://www.youtube.com/v/uA3pFG01nmc?start=38&end=92
>> कुणीतरी तिला मारून टाकणार असल्याचे भ्रम वाढू लागले. ज्या पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराची ती रूग्ण होती त्या विकाराचे मूळ जनुकीय रचनेत असल्याचे मानले जाते..... हा एक अनुवांशिक आजार असल्याने तिची बरी होण्याची शक्यता नव्हतीच.
साठीच्या दशकात अहमदाबादमध्ये एकदा धार्मिक दंगल उसळली होती. प्रचंड जाळपोळ आणि अत्याचार सुरु होते. त्यात एका घटनेत धर्मांध जमावाची एक झुंड चालून आली होती. परिस्थिती अतिशय भीषण होती. तेंव्हा शाळेतल्या नन्सनी शाळकरी मुलगी असलेल्या परवीनला अनेक गाद्यांच्या मध्ये घालून एका ट्रक मध्ये लपवले. जीवाच्या आकांताने श्वास गुदमरलेल्या अवस्थेत परवीन कितीतरी काळ तिथे जीव मुठीत धरून निपचित पडून होती. बाहेर थोडी जरी चाहूल लागली असती तरी त्या नराधमांनी तिला तिथून बाहेर खेचून तिचे लचके तोडले असते. जगाच्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या या प्रसंगाचा परवीनच्या कोवळ्या मनावर तेंव्हा जो खोल परिणाम झाला तो कायमचाच. पुढे तिच्या स्किझोफ्रेनियामध्ये यामुळे अधिकच भर पडत गेली. महेश भट यांनी याचा अनेक मुलाखतीत उल्लेख केला आहे.
>> तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. लग्नानंतर चौदा वर्षांनी तिचा जन्म झाल्याने मोहम्मद बाबी यांना तेंव्हा अस्मान ठेंगणे झाले होते.
लग्नानंतर खूप उशिरा (अनेक वर्षांनी वगैरे) जन्माला आलेली अपत्ये हि अनेकदा पुढे मोठेपणी मानसिक आजारांना (विशेषकरून स्किझोफ्रेनिया) बळी पडतात असे आढळून आले आहे. पण अर्थात हे अजून वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेले नाही.
>> कबीर मुक्त विचारसरणीचा होता. सिगारेट, मद्यप्राशन करणा-या परवीनसोबत त्यांची मैत्री झाली. एकमेकांची साथ त्यांना भावली आणि त्यांनी लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. मात्र हे नातेही फार काळ टिकले नाही.
आज याला अनेक वर्षे होऊन गेलीत. त्यानंतर अनेक स्थित्यंतरे झाली. बऱ्याच उलथापालथी झाल्या. दुनिया इकडची तिकडे झाली. आणि आतातर परवीन बाबीच्या मृत्युलाही तब्बल दहा वर्षे होऊन गेली. पण कबीर बेदी मात्र आजही सुरूच आहेत. यावर्षीच्या जानेवारीतच त्यांनी नवीन लग्न केलंय. योगायोगाने तिचेही नाव परवीनच आहे. फक्त ती वयाने बेदींच्या मुलीहून (हो, पूजा बेदीहून) लहान आहे इतकेच काय ते.
कालाय तस्मै नम:
नवीन महिती अतुल. कबीर बेदी
नवीन महिती अतुल. कबीर बेदी काय, महेश भट काय, सगळे संधीसाधु. आताच्या नयिका (दिपिका, अनुश्का, प्रियांका, वगैरे) बर्याच कणखर आहेत.