पुन्हा एकदा वारी....

Submitted by रोहित ..एक मावळा on 23 October, 2016 - 02:09

पुन्हा एकदा वारी....

अनुभवावी वारी एकदा ,सह्याद्रीच्या पंढरीची..
लागेल ओढ मनाला, मग कायमची..

रौद्र ,राकट,काळाभिन्न कातळाची...
माऊली आमची रांगड्या निसर्गाची...

कोरीव मंदिर,गुहा,टाके,पुष्करणीची...
काळ्या पाषाणातील, संस्कृती आपल्या अभिमानाची...

रोरावतो वारा जणु ,गाज सागराची...
ढगांवर होउन स्वार,पहा शान कोकणकड्याची...

उगवतीला गाठा उंची ,तारामती शिखराची..
रंगलेल्या क्षितिजावर पडेल,खोल सावली मावळतीची...

तोलार खिंड,नळीची वाट,साधले घाटाची..
अभेद्य कातळकड्याला, गरज नाही तटबंदीची..

हरिश्चंद्र राजा,तारामती,रोहिदासाची..
दडलेय महती इथे, इतिहासाच्या पानांची...

होउंदे गजर गडाचा,साद वारकरी भटक्यांची..
करावी वारी पुन्हा एकदा ,सह्याद्रीच्या पंढरीची.....

डोंगरदर्‍यात हुंदडणार्‍या आम्हा वारकरी भटक्यांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्र गड..
अशा या पंढरीची ओळख पहिल्याच सह्यभेटित झाली होती.त्याच गारुड अजुन मनावर आहे.
माझ्या पहिल्या ट्रेकची गोष्ट..... मधे सह्याद्रीने वेड लावले होते. अन हेच सह्याद्रीच वेड डोंगर दर्‍यात खेचुन घेउन जायला कारणीभुत होत.त्यामुळे सह्याद्रीची पारायणे अधुनमधुन चालु असतात.प्रत्येक वेळी सह्याद्री नव्याने उलगड असतो...उमजत असतो.

जवळजवळ आठ वर्षानंतर या सह्यपंढरीला परत वारी करण्याचा योग जुळुन आला.अट्टल भटक्यांची सोबत होती.अन पावसाच्या आगमनाआधी चातक बनुन आमची स्वारी सह्याद्रीच्या दिशेने निघाली.

सजली रात्र सोबतीला..
अष्टमीचा चंद्र होता दिमतीला..

पसरली धुक्याची दुलई...
अन झाली सुरु ढगांची लगीनघाई...

कस बदलल निसर्गाच रुपडं...
तस पडल सरड्याला कोडं..

रानफुलांचा येई मधाळ वास...
भटक्यांना फक्त रानमेव्याची आस...

पाचनईची राजेशाही वाट..
अन आम्हा भटक्यांचा वेगळाच थाट..

काळा कातळ शहारला..
अन पाखरु बसल वळचणीला.
.

दरीत झालाय सुरु लपंडाव...
ढगांच्या आड लपलाय साव..

करुया विहार ढगांचा..
खेळ खेळुया उड्यांचा..

काळ्या कातळात दडलाय कोरीव इतिहास..
पुवर्जांच्या पाऊलखुणांचा अनोखा प्रवास..

पुष्करणी.

हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर

गणेशगुहा

केदारेश्वर

रौद्र साज म्हणजे कोकणकडा..
वार्‍याची गाज म्हणजे कोकणकडा...

सुर्यास्ताचा जाहला सोहळा..
रंगला उडयांचा मेळा...

चढले मावळतीचे रंग..
तस मन झाले दंग...

लागली अंधाराची चाहुल...
रंगला गप्पांचा माहोल...

रात्र पावसात न्हाली..
अन धुक्यात पहाट जागी झाली.

ढगांच्या पडद्यावर सुर्यकिरणांची सावली .....
झाली किमया बघा इंद्रवज्ररुपी माऊली....

भास्कराच्या खोपटात करुन चहापान..
वारकरी भटक्यांनी केले प्रस्ठान...

सह्यवारीने मन झाले शांत..
प्रपंचासाठी धरला घरचा प्रांत...

ओढ सह्याद्रीची राहिल नेहमी..
वारीची देतो पुन्हा आम्ही हमी..

- रोहित ..एक मावळा
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी सुरवात नी मस्त फोटो...
पुन्हा एकदा केलेली सफर डोळ्यासमोर उभी राहिली

अप्रतिम फोटो !

अंधाराची चाहुल A1 !

तो चौघांच्या उडीचा फोटो इतका देखणा आलाय की थोडा क्रॉप करून नक्षी म्हणूनही वापरता येइल.

त्याच फोटोत यो आणि त्याच्या पुढच्याची उडी इतकी मस्त कॅप्चर झालीये की असं वाटतय यो शिखर एका पायावर उतरतोय आणि पुढचा दोन शिखरांमध्ये उडी मारतोय.

धन्यवाद... माधव,दिनेशदा,सुनटुन्या,चनस,चंबु ,संदिप ,सायु,इंद्रा, हर्पेन Happy