स्टॅपेडोक्टॉमी - परत एकदा !

Submitted by दिनेश. on 20 October, 2016 - 23:05

पंधरा वर्षांपुर्वी माझे कानाचे छोटेसे ऑपरेशन झाले होते त्याबद्दल मी एक लेख इथेच लिहिला होता.
आपल्या कानामधे जी तीन हाडांची साखळी असते त्यापैकी एक म्हणजे स्टेप.. काही कारणाने ते काम करेनासे होते. ( त्याला नेमके असे कारण नाही, झपाट्याने वजन कमी होणे, अंगातील चरबी कमी होणे.. हि काही कारणे ) आणि
ते बदलण्यासाठी जी शस्त्रक्रिया करतात ती स्टॅपेडोक्टॉमी !

पंधरा वर्षांपुर्वी ही शस्त्रक्रिया डॉ. रविंद्र जुवेकर यांनी केली होती आणि यावेळेस ती त्यांचे सुपुत्र डॉ. मीनेश जुवेकर यांनी केली. ( डॉ. मीनेश यांच्या मातोश्री म्हणजे सुप्रसिद्ध गायिका नीलाक्षी जुवेकर )

गेल्या ३ महिन्यांपासून मला हा त्रास जाणवू लागला होता. त्रास म्हणजे आपल्या कानात आवाज घुमू लागतो.
शब्द नीट आणि स्पष्ट ऐकू येत नाहीत. एकास एक असे बोलणे असेल तर व्यवस्थित ऐकू येते पण जर समूहात
बोलणे सुरु असेल तर आवाज खुप घुमतो ( हे प्रातिनिधिक त्रास झाले. व्यक्तीगणिक ते बदलू शकतात. ऐकण्यासंबधी
किंवा कानासंबंधी काहिही तक्रार असेल तर तज्ञ डॉक्टरांना भेट देऊन त्यांचा सल्ला घेणेच योग्य )

मी नेटवर शोध घेतला त्यावेळी मला डॉ. मीनेश यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांचे हॉस्पिटल माझ्या घराजवळच
आहे, त्यामूळे मला ते सोयीचेही होते. त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी प्राथमिक तपासणी केली आणि काही टेस्ट्स
करायला सांगितल्या.
त्यात अर्थातच कानाची तपासणी मुख्य होती. ते स्वतः बॉम्बे हॉस्पिटल मधे असतात त्यामूळे ती तपासणी तिथेच
केली. यात आपल्या कानाला यंत्र लावून वेगवेगळ्या श्रेणीचे आवाज ऐकवले जातात, आणि आपल्याला ऐकू आले
कि, ज्या कानाने ऐकू आले त्या बाजूचा हात वर करायचा असतो. त्याचबरोबर दुसरी एक टेस्ट असते, त्यात
आपल्याला काही करायचे नसते तर ते मशीनच आपली श्रवणक्षमता तपासते.

ती टेस्ट झाल्यावर ऑपरेशन करायचे नक्की झाले. पण त्यापुर्वीही आणखी काही टेस्ट्स करणेचे गरजेचे होते.
गेल्या १५ वर्षात माझे वय वाढलेच होते शिवाय मधुमेह आणि रक्तदाब पण होताच. त्याच्यासाठी मी गोळ्या घेतच
आहे पण ते दोन्ही नियंत्रणात असणे गरजेचे होते. शिवाय थायरॉईड, एच.आय. व्ही., ई. सी. जी. अशाही टेस्ट करून
घेतल्या. सर्वच रिपोर्ट नॉर्मल आले. इथे मुद्दाम लिहावेसे वाटतेय, कुर्ला इथे गुरुदेव दत्त म्हणुन एक पॅथोलॉजी लॅब
आहे, तिथल्या एका मुलीचा हात इतका हळूवार आहे कि ती ब्लड सॅम्पल कधी घेते ते कळतही नाही.

तर सगळे रिपोर्ट बघून डॉक्टरांनी ऑपरेशनची तारीख नक्की केली. आदल्या दिवशी मी जेवून रात्री हॉस्पिटलमधे
दाखल झालो. मग तो ड्रेस चढवला आणि माझी तयारी सुरु झाली.

मनगटापासून थोड्या वर सुरुवात करून माझ्या हातावरचे केस काढण्यात आले. कानाच्या आजूबाजूचेही थोडे केस
काढले. त्यानंतर आय. व्ही, ड्रिप्स सुरु केल्या. अँटी बायोटीक्स, अँटी टीटॅनस वगैरे इंजेक्शन्स देण्यात आली.
त्यापैकीं काहींनी गार गार वाटले तर काही जबरदस्त दुखली. पण सिस्टर्स माझा हात चोळत होत्या त्यामूळे फार
दुखले नाही.

रात्री दहा नंतर पाणी सुद्धा प्यायचे नव्हते. सकाळी भूलतज्ञ मला भेटायला आली. आणि मला तपासून गेली. मी
तिला म्हणालो, मला टोटल अनास्थेशिया दे ( कारण मागच्या वेळापेक्षा हे ऑपरेशन वेगळे होते. मागच्या वेळी
नव्याने बसवलेल्या हाडाला सपोर्ट म्हणून माझ्या कानाच्या पाळीतली थोडी चरबी काढून वापरण्यात आली होती,
तर यावेळेस माझ्या हाताच्या मनगटातील एका शिरेचा लहानसा तूकडा काढून वापरणार होते. मागच्या वेळचे
ऑपरेशन मिनिमम अनास्थेशिया खाली केले होते आणि डॉ. रविन्द्र जुवेकर संपुर्ण ऑपरेशनभर माझ्याशी बोलत
होते. पण त्यावेळी त्यांनी ज्यावेळी माझ्या दोन कानांना जोडणारी नस कापली त्यावेळी माझा सेन्स ऑफ बॅलन्स
गेला होता आणि मी ऑपरेशन टेबलवरून खाली पडतो कि काय, असे मला वाटले होते. त्यावेळी भूलतज्ञांनी
माझा हात घट्ट धरून ठेवला होता.)

तर ती भूलतज्ञ हसून म्हणाली कि तूला थोडे जागे ठेवावे लागेल पण काळजी करू नकोस तूला कसलीही वेदना
होणार नाही. काही काही व्यक्तींचे हसणे आणि बोलणेच इतके मोहक असते कि त्यांच्यावर विश्वास बसतोच.

तयारी झाल्यावर मला आणखी काही इंजेक्शन्स देण्यात आली आणि मी स्वतःच्या पायाने चालत ऑपरेशन
थिएटर मधे गेलो ( मागच्या वेळेस स्ट्रेचर वरून नेले होते, त्यावेळेस माझा मोठा भाऊ शेखर सोबत होता. त्याला
मला स्ट्रेचर वर बघणे अशक्य झाले आणि मी चालत जावे असा त्याचा आग्रह होता... यावेळेस मी चालत गेलो तर
ते बघायला शेखर आता जगातच नाही. )

ओ.टी. मधे सर्व अद्यावत मशिनरी होती. माझे संपूर्ण ऑपरेशन दुर्बिणीने होणार होते आणि त्यासाठी एक मोठा
टी,व्ही. तिथे होता. मागच्या वेळेस मी कुशीवर झोपलो होतो तर यावेळेस मी पाठीवर झोपलो होतो.
माझे दोन्ही हात आर्म रेस्ट वर ठेवले होते. नंतर मला काही इंजेक्शन वगैरे दिल्याचे आठवत नाही. बहुतेक
आय. व्ही. मधून दिले असावे. पण नंतरचे मला काही आठवत नाही.

काही वेळाने अचानक मला डॉ. मीनेश बोलताना ऐकू येऊ लागले. अगदी त्या अवस्थेतही मला त्यांनी केलेल्या
विनोदावर हसू येत होते. अगदी कानाशी कूजबूज करून ते जे बोलताहेत ते मला ऐकू येतेय की नाही, ते ते बघत
होते.

त्यावेळेस मला कानाजवळ काहीतरी संवेदना आली पण वेदना अजिबात नव्हती. माझ्या हाताची नस कधी कापली
आणि तिथे टाका वगैरे कधी घातला ते मला जाणवलेच नाही.

नंतर त्या टेबलवरच माझ्या कानाला आणि पुर्ण डोक्याभोवती घट्ट बँडेज बांधण्यात आले ( अगदी लगान मधल्या
भुवन सारखे ) पण मी वॉर्ड मधे कसा आलो ते आठवत नाही.

मागच्या वेळी मला वॉर्ड मधे आल्याबरोबर खुप कोरडे उमाळे आले होते, तसे काहिही यावेळेस झाले नाही.
मागच्या वेळेस मला आठवडाभर तोल संभाळणे कठीण झाले होते. पायर्‍या चढायला उतरायला खुप त्रास व्हायचा
( आपण पायरी चढतो आहोत का उतरतो आहोत, तेच कळायचे नाही. ती भावना नेमकी कशी असते, याची
कल्पनाही करणे कठींण आहे ) तसा कुठलाच त्रास यावेळेस झाला नाही. मला डॉक्टर येऊन असा त्रास होतोय
का ते विचारून गेले.

नंतर मी वहिनीने करुन आणलेली न्याहारी घेतली. माझ्या नेहमीच्या गोळ्या आणि शिवाय नव्याने सुरु केलेल्या
गोळ्या घेतल्या. थकवा अजिबात जाणवत नव्हता पण झोप येत होती. टिव्ही चालू होता ते मला समजत होते,
पण त्यावर काय चाललेय ते माझ्या डोक्यात शिरत नव्हते. मधे मला डॉ. रविंद्र जुवेकर पण बघुन गेले, पण
तेही मला कळले नाही.

संध्याकाळ पर्यंत वेळ कसा गेला तेच कळले नाही. ( अकरा, साडे अकराला मी वॉर्ड मधे आलो होतो असे नंतर
वहीनी म्हणाली ) रात्री सोबतीला माझा एक मित्र आला होता, पण तो आला कधी, मी त्याच्याशी काय बोललो आणि
तो सकाळी उठून गेला कधी ते मला आठवत नाही.

दुसर्‍या दिवशी मला सपाटून भूक लागली होती. माझी बहीण आणि भाचा मला न्यायला आले होते. थकवा, वेदना
अजिबात नव्हती. उलट फार छान वाटत होते.

घरी आल्यावर झोपून रहावे असे अजिबात वाटले नाही ( मागच्या वेळेस ऊभे राहणे कठीण झाले होते ) डोक्याला
५ दिवस बँडेज ठेवायचे होते तरी मी फिरत होतो. कुठेही गेलो तरी लोक आवर्जून चौकशी करत होते.
आणि चेंबूरमधे कुणाला कानाचे ऑपरेशन झाले कि आवर्जून सिनियर जुवेकरांनी केले कि ज्यूनियर जूवेकरांनी
केले असे विचारत होते.

त्याच दरम्यान ( तश्याच लगान गेट अप मधे ) मी काही मायबोलीकरांनाही भेटलो. डोक्याचे बॅंडेज काढल्यावर
हाताची पट्टीही काढली. टाके काढले. ती जखम भरून आली होती. कानाला बाहेरून काहीच जखम नव्हती.

डॉ. मीनेश यांनी परत तपासणी केली. आता कुठलाच श्रवणदोष नव्हता. कानात किंचीत ( जबड्याची हालचाल
केल्यावर ) क्लक क्ल्क असा आवाज येत होता, पण तोही काही दिवसांनी गेला. कानाजवळ थोडा बधीरपणा
होता, तोही गायब झाला.

डॉ. मीनेश यांनी मला भरपूर वेळ दिला आणि ऑपरेशन कसे केले ते समजावून सांगितले. आजकाल भूल देण्यासाठी जी औषधे वापरतात त्यांनी रुग्णाला वेदनेची स्मृतीही रहात नाही, असे आवर्जून सांगितले ( मी त्याचा
अनुभव घेतच होतो. )

तसेच ऑपरेशन नंतर माझ्या चेहर्‍यावरचे हास्य बघून त्यांनाही खुप बरे वाटले असेही मुद्दाम सांगितले.

डॉ. मीनेश जुवेकर यांच्याबद्दल नेटवर अवश्य वाचा. जर्मनी मधे शिक्षण घेतले आहे त्यांनी आणि अगदी तरुण
वयातया क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले आहे. ते स्वतः तबलावादन करतात. माझ्याशी उत्तम मराठीतच बोलतात.
त्यांना मनापासून शूभेच्छा !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणतीही सर्जरी म्हटली कि दडपण येतंच.. तुझं सगळं व्यवस्थित पार पडल्याबद्दल अभिनंदन!!!
ज्या कारणांनी हा दोष उत्पन्न झाला ती कारणं अगदी माहीत नव्हती.. आता लक्ष ठेवावे लागेल.
अनुभव इथे शेअर करण्याबद्दल धन्यवाद!! Happy

दिनेशदा सर्व व्यवस्थित पार पडले हे वाचुन बरे वाटले.

डॉ मीनेश कडे मी सुद्धा गेलेय २-३ वेळा. खुप चांगले डॉ आहेत.

एकदा मला सायनसचा भयंकर त्रास होऊन आत पुर्ण सुज आली होती आणि नाकावाटे श्वास घेणे अशक्य झाले. काहीतरी अर्जंट कामासाठी ऑफिसात यावे लागले. पण त्रास इतका वाढला की मला गुदमरल्यासारखे होऊ लागले. तेव्हा मी लगेच बॉम्बे हॉस्पिटल गाठले. तिथे योगायोगाने डॉ मीनेश ओपीडी मध्ये होते. त्यांनी दिलेल्या औषधांमुळे संद्याकाळपासुन फरक जाणवू लागला. सर्च केल्यावर त्यांच्या चेंबुरच्या दवाखान्याचा पत्ता सापडला. मग पुढच्या व्हिजीट साठी तिथेच गेले.

नंतर एकदा महिनाभर कोरडा खोकला जात नव्हता. रात्र रात्रभर बसुन रहात असे. तेव्हा सुद्धा त्यंच्या औषधाने बरे वाटले होते.

त्यांच्या आईवर लोकसत्ता चतुरंग मध्ये लेख आला होता.

स्टॅपेडोक्टॉमी शीर्षक वाचले आणि पटकन लेख वाचायला घेतला.
3 महिन्यापूर्वी घैसास ENT हॉस्पिटल (पुणे) येथे माझ्या डाव्या कानावर स्टॅपेडोक्टॉमी शस्त्रक्रिया झाली.
शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया छान झाली असे सांगितले. पण...... 8 दिवसांनी जेंव्हा डोक्याचे बॅंडेज काढले तेंव्हा मला डाव्या कानाने काहीच ऐकू येत नव्हते. डॉक्टर म्हणाले It is Sensorineural hearing loss आणि ह्यावर काहीच उपाय नाही.

आता उरलेले आयुष्य एकाच कानावर काढावे लागणार Sad I am keeping my self positive, but still sometime feel very bad. कोणी डावीकडून आवाज दिला तरी मी पटकन उजवीकडे बघतो कारण आवाज उजव्या कानाने ऐकलेला असतो. असे बऱ्याच प्रॉब्लेम मधून जात आहे सध्या.

माझा अनुभव इथे टाकण्या मागचा उद्देश एवढाच कि स्टॅपेडोक्टॉमी चे pros and cons कळावे येवढाच.
मला आलेले बहिरेपण हे डॉक्टरांच्या चुकीमुळे आले कि आणखी कशामुळे आले हे मात्र काही कळायला मार्ग नाही :(.

मस्तं, पॉझिटीव लेख!
वाचून फार बरे वाटले.

वडिल आणि मुलगा कानाचे डॉक्टर आणि आई गायिका या योगायोगाचे जाम आश्चर्य वाटले.
Happy

आभार..
देशमुख साहेब, तुमचे operation पूर्ण भूल देऊन केले का ? भारताबाहेर तसेच करतात. भारतात मात्र दोन्ही वेळेला डॉक्टर माझ्याशी सतत बोलत होते आणि खात्री झाल्यावरच ते थांबले. तुम्ही निराश होऊ नका, काहीतरी उपाय असेलच, परत तपासणी करून घ्या. Hearing aid चा हि पर्याय आहेच.

नेहेमीप्रमाणेच ओघवता लेख, माहितीपूर्ण.. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

>>> यावेळेस मी चालत गेलो तर ते बघायला शेखर आता जगातच नाही. <<<<
पण लेखातील सर्वात टचिंग /लक्ष वेधुन घेणारे वाक्य हे वाटले. आयुष्यातील बाकी सर्व भावभावनांपेक्षाही, "आपल्याजवळचे आता नाही" ही भावना सर्वात जास्त अस्वस्थ करुन जाते, मनात एकटेपणा/एकाकी/निराधार असे काही मिश्रण निर्माण करते. मन खूपच खंतावते.

>>वडिल आणि मुलगा कानाचे डॉक्टर आणि आई गायिका या योगायोगाचे जाम आश्चर्य वाटले.>><<

साती, डॉ मीनेश यांची बहीण बालरोगतज्ञ आहे. मुलांनी आईचे सांगितिक आणि वडीलांचे डॉक्टरी गुण व्यवस्थित उचलले आणि जोपासले आहेत.

@ दिनेश., माहितीपूर्ण लेख, आवडला. अगदी बारीक सारीक गोष्टींचेही विवरण दिलेत.

@ deshmukh_v, वाचून वाईट वाटले. आपल्या तब्येतीत लवकरात लवकर आराम पडो, हीच सदिच्छा!

दिनेशदा माझे operation पुण्यात झाले, घैसास हॉस्पिटलला. पूर्ण भूल दिली नव्हती. मला पण डॉक्टर आपापसात बोलत असलेले ऐकू येत होते. operation झाल्यावर, स्टेप बसवल्यानंतर कान बंद करण्यापूर्वी डॉक्टरांनी नंबर्स काउन्ट केले आणि मला ते नंबर्स प्रॉपर ऐकू येत आहेत का ते चेक केले. त्यावेळस सगळे नीट ऐकू आले पण 8 दिवसांनी बँडेज काढल्यानंतर ऑल गॉन.

डावा कान आता ठार बहिरा झाला आहे. so no option of hearing aid for that ear. मला उजव्या कानाने पण कमी ऐकू येते तेंव्हा आता उजव्या कामासाठी hearing aid वापरणार आहे. नोव्हेंबर/डिसेंबर मध्ये बसवून घेईन. सध्या hearing aid मध्ये जे option आहेत ते चेक करतोय Behind-The-Ear / In the Canal / In the Ear .

पहिला महिना खूप नैराश्यात गेला. आत्ता पण 4 लोकांत मिसळायचे म्हंटले कि नको वाटते. पण एक खूप चांगली गोष्ट झाली ती म्हणजे कमी ऐकू येत असल्यामुळे TV पाहणे बंद झाले Happy आणि पुस्तके वाचायचा छंद लागला. specially इंग्लिश नॉव्हेल्स वाचायला चालू केल्या तेवढीच इंग्लिश इम्प्रोव्हमेन्ट. आणि मायबोलीवर दाद/ स्वीट_talker / स्वप्ना_राज यांचे जुने/नवीन सगळे ललित आणि इतर लेख वाचले. वाचनात गुंगलो कि कानाचा विसर पडतो आणि एकदम फ्रेश वाटायला लागत.

प्रतिसाद खूपच मोठा झाला सॉरी.

आणि हो मी तुमच्या पेक्षा लहान (Age 36 ओन्ली Wink ) आहे सो नो साहेब अँड ऑल. फक्त देशमुख किंवा विनोद म्हणा.

छान ,ओघवता लेख व माहीती.
काही वर्षापुर्वी एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने मला कानाजवळ वर्मी फाईट मारली होती,तेव्हा ENT कडे जावे लागल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.

लिंबू... शेखर सतत माझ्या आजूबाजूला असतो असेच मी मानतो. त्याची आठवण आली नाही, असा दिवस जात नाही.

विनोद, कानातली नस दुखावली असेल बहुतेक. तूम्ही कधी मुंबईला आलात तर अवश्य डॉ. जुवेकरांना भेटा.
आणि तूम्ही खरेच सकारात्मक विचार करत रहा. ऑफिसमधे, परीचितांमधे हि समस्या मोकळेपणाने सांगा. बहुतांश लोक सहकार्य करतात आणि जे करणार नाहीत, त्यांची श्रवणशक्ती शाबूत राहो अशी शुभेच्छा द्या.

मला ही समस्या जाणवल्यापासून ऑफिसमधे मी सर्वांना सांगितले. प्रत्येक जण माझ्याशी बोलताना सावकाश बोलत असे, कुणाचाही चेष्टेचा सूर नव्हता.

आणि हो, इथे सर्वांनी जी आस्था दाखवली, त्याबद्दल काय लिहू ?

आता माझी तब्येत उत्तम आहे. ऑपरेशन नंतर दुसर्‍या दिवसापासूनच मी फिरायला सुरवात केली होती. आणि तशीही माझ्यावर काही बंधने नव्हतीच.

पहिला महिना खूप नैराश्यात गेला. आत्ता पण 4 लोकांत मिसळायचे म्हंटले कि नको वाटते. पण एक खूप चांगली गोष्ट झाली ती म्हणजे कमी ऐकू येत असल्यामुळे TV पाहणे बंद झाले स्मित आणि पुस्तके वाचायचा छंद लागला. specially इंग्लिश नॉव्हेल्स वाचायला चालू केल्या तेवढीच इंग्लिश इम्प्रोव्हमेन्ट. आणि मायबोलीवर दाद/ स्वीट_talker / स्वप्ना_राज यांचे जुने/नवीन सगळे ललित आणि इतर लेख वाचले. वाचनात गुंगलो कि कानाचा विसर पडतो आणि एकदम फ्रेश वाटायला लागत. >>> विनोद देशमुख हॅट्स ऑफ तुमच्या स्पिरिटला !!!

दिनेशदा सर्व व्यवस्थित पार पडले हे वाचुन बरे वाटले. >>>> +११११११११११११११११११११११११११११११११११११

काळजी घ्या....

देशमुख, कीप होप्स, अजुनही सगळे ठीक होऊ शकेल. दिनेशभाऊंनी सांगितले तसे त्या कानाकरता डॉ. जुवेकरांकडेही तपासुन घ्या.
तुम्ही लिहिलेले वाचल्यानंतर मग त्यातले "गांभिर्य" कळू लागले,
पण तोवर "हॅऽऽ, ऐकु येत नाही/कमी ऐकु येते" तर त्यात काय विशेष? याला काय आजार म्हणायचे का? अन आपल्याला तर बोवा असे काही होणारच नाही कधी" असे विचार असतात.
जोवर ते ते इंद्रिय काम करत असते बिनबोभाट, तोवर ते ते इंद्रिय आपल्याला आहे याचाही आपल्याला विसर पडलेला असतो. दुर्दैवाने स्वतःच्या इंद्रियांबाबत जे, तेच धोरण माणसांबाबतही असते. असो.
तुम्हाला लौकर ऐकु येउद्यात दोनही कानांनी हीच प्रार्थना. Happy

कोणतीही सर्जरी म्हटली कि दडपण येतंच.. तुझं सगळं व्यवस्थित पार पडल्याबद्दल अभिनंदन!!!
ज्या कारणांनी हा दोष उत्पन्न झाला ती कारणं अगदी माहीत नव्हती.. .........+१
तुमच्या भावाचे ऐकून वाईट वाटले.गेलेल्या माणसांबरोबर आपल्या आयुष्याचा हिस्सापण त्याच्याबरोबर जातो.

लिम्बूटीम्बू

प्रतिसाद मस्तच.

देशमुख
सेकंड ओपिनियन जरूर घ्या.

लिंबू, अगदी खरेय.
आपले अवयव जोपर्यंत सुरळीत चालताहेत तोपर्यंत आपल्याला त्यांची कदर नसते.
मला घरात असताना, मंद आवाजात शास्त्रीय संगीत लावून वावरायची सवय आहे. त्या लयीत नेहमीची कामे कशी
हातावेगळी होत असत, ते कळतही नसे. त्या आनंदाला मी गेले ३ महिने मुकलो होतो. आता तो आनंद परत उपभोगतोय.

Pages