पूर्वी दर रविवारी सकाळी दूरदर्शनवर रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका लागायची. ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच मिनिटात दाखवून संपू शकतो, त्याला एवढं लांबण लावायचे कि एक अख्खा एक तासाचा एपिसोड त्यावर खर्ची पडायचा. मला आठवतंय, सर्वांना कल्पना आली होती कि आता पुढच्या एपिसोडमध्ये रावणवध होणार. रावणवध पहायला अवघा देश लागोपाठ पाच-सहा रविवार टीव्हीपुढे नजर लाऊन बसला होता. पण सागरसाहेब प्रत्येक वेळी रावणाला पुढच्या एपिसोडचं जीवदान द्यायचे. अखेर मग प्रसारमाध्यमात सर्वांना कळवून एका रविवारी 'रावणवधाचा' दिवस मुक्रर करण्यात आला. त्या रविवारी सर्व लहानथोर मंडळी टीव्ही पुढे जागा पकडून बसले होते. एका तासाकरीता अख्ख्या देशाचा व्यवहार बंद पडला होता. जे घराबाहेर होते, त्यांनी रावणवध पहायला जवळपासच्या अनोळखी असलेल्या घराचा आसरा घेतला होता. आणि त्यांना कोणी नकोसुद्धा म्हटले नव्हते. आपण पाणी पाजण्याचं पुण्यकर्म करतो तसं लोकांनी त्यांना 'रावणवध' दाखवण्याचं पुण्य पदरात पाडून घेतले होतं.आणि असा पाच सहा एपिसोड खर्चून एकदाचा रावणवध पार पडला.
'रामायणात' लांबण कसे लावायचे ह्याचा अजून एक किस्सा सांगतो. सुग्रीव वालीला युद्धाचे आव्हान देण्याकरिता त्याच्या गुहेपुढे जाऊन त्याला लढायला बाहेर बोलावतो असा सीन होता. वास्तविक दोन तीनदा हाक ऐकल्यावर वाली बाहेर येऊन एका मिनिटात सीन संपणे अपेक्षित होते. पण येथे सुग्रीव किती वेळा आणि कसा हाका मारतो पहा. "वाली! बाहर आओ वाली! वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली! वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली! वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली! " एपिसोडचे जवळ जवळ दहा मिनिटे सुग्रीवाने वालीला नुसत्या हाका मारण्यातच खर्च केले होते.
बरं त्या हाकाही ऐकून ऐकून आमच्या डोक्यात एव्हढ्या घुमायला लागल्या होत्या कि दुसऱ्या दिवशी शाळेत आम्ही पोरं एकमेकांना "वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली!" असं बोलून बोलून एव्हढी मज्जा घेतली होती कि विचारू नका! संपूर्ण शाळेत सर्व मुले एकच डायलॉग एकमेकांना बोलत होते. "वाली! ओ वाली! बाहर आओ! बाहर आओ वाली!"
तुम्ही म्हणाल, मी सुद्धा येथे लांबण लावलीय. म्हणून आवरतं घेतो.
दूरदर्शनवरील 'रामायण' मालिकेची एक आठवण
Submitted by सचिन काळे on 16 October, 2016 - 15:30
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी अगदी, सगळ्या आठवणी
अगदी अगदी, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या, शाळेतही तोच विषय असायचा आमचा, आणि रविवारची उत्कंठतेने वाट बघणे.
रामायण काळ जणू जिवंत केला होता त्या मालिकेने
दुसरी गोष्ट आठवते म्हणजे रामायण आहे म्हणून रविवारी सुद्धा लवकर आटोपून, अगदी पोह्याची डिश हातात घेऊन मनोभावे टीव्ही पुढे बसणे
वा या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या
रामायण सकाळीही असायचे का?
रामायण सकाळीही असायचे का? माझ्या बालपणी रात्रीचे लागायचे. समोर रामायण चालू आहे आणि मी मस्त आईच्या कुशीत झोपलोय. हि माझी आठवण. महाभारत मात्र ईंटरेस्टींग वाटायचे कारण फुल्ल फाईट ड्रामा इमोशन एक्शन आणि सतत ती कपटनिती.. त्यामुळे रामायण म्हणजे अमोल पालेकर आणि महाभारत म्हणजे अमिताभ बच्चन हे डोक्यात फिट बसले होते. एक कुंभकर्ण या माझ्या आवडत्या कॅरेक्टरचा पार्ट सोडला तर बाकीचे काही आवर्जून जागून बघितले असे आठवत नाही. त्या दिवशी मराठी कौबक मध्ये एका आईने आठवण काढली की कृष्णाच्या भुमिकेत स्वप्निल किती क्यूट दिसायचा. लगेच तिची मुलगी म्हणाली, आताही तो तेवढाच क्यूट दिसतो. त्यामुळे बाकी काही म्हणा या बालपणातल्या पौराणिक मालिका आपल्या आठवणीतून काढणे कठीणच.
ऋन्मेऽऽष , तु बघत होतास ते
ऋन्मेऽऽष , तु बघत होतास ते 'उत्तर रामायण' ते रात्रि लागायचे, ते चालु झाले थोडे नन्तर. हे रामायण रवीवारी सकाळी १० ला लागायचे. सकाळ्चे रामायण सम्पल्यावर काही दिवसानी हे 'उत्तर रामायण' चालु झाले,लोकाआग्रहास्तव.
रावणवध पहायला अवघा देश
रावणवध पहायला अवघा देश लागोपाठ पाच-सहा रविवार टीव्हीपुढे नजर लाऊन बसला होता.
<<
तरि बरे त्याकाळात डेलीसोप चा जमाना नव्हता, नाहितर आजच्या एकता कपूर छाप सिरियल सारखे, सासू-सुनांची भांडणे, जावा-जावांची(इथे रामायणात तर एकाच घरात तीन जावा) भांडणे, दोन भावांमधील हवेदावे, नंणद-भावजयींची भांडणे असे करत-करत हजार-दोन हजार एपिसोड होऊनही रावण वध काही झाला नसता मात्र पाहणार्या प्रेक्षकांचा मानसिक वध नक्कीच झाला असता.
त्या काळी लग्नसमारंभात सुद्धा
त्या काळी लग्नसमारंभात सुद्धा टी.व्ही ची सोय (खास रामायण बुडु नये म्हणून )असायची. आणि निमंत्रण्पत्रिकेत त्याचा उल्लेख असायचा !
खूपच स्लो होती रामायण
खूपच स्लो होती रामायण मालिका.
मी खूपच कमी एपिसोड पाहिलेत. मालिका सुरु असताना रस्त्यात गर्दी खुप कमी असायची तेव्हा बाहेरची कामे यावेळात चटकन करता यायची.
पण जे एपिसोड थोडेफार पाहिलेत ते सगळे आठवतातः
एका एपिसोड मध्ये राम कुठल्याशा सांगाड्याला लाथ मारतो. राम दहापावले अंतरावरुन सांगाड्याकडे निघाला आहे, तेवढे अंतर कापून तो सांगाड्याला लाथ मारतो आणि सांगाडा दूर उडून जातो. या साठी एक अख्खा एपिसोड होता.
राम एक पाउल टाकतो. मग उजवीकडे बघतो. तिकडे लक्षण आहे. कॅमरा तिकडे. लक्ष्मण नाक फेंदारत मोठा श्वास आत घेतो. कॅमरा रामाकडे: राम मंद हसतो.अजुन हसतो. अजुन. कॅमेरा परत लक्ष्मण कडे. एव्हाना तो पूर्वस्थितीत आलेला असतो आणि कॅमेरा त्याच्या कडे वळताच नाक फेंदारत मोठा श्वास आत घेतो. कॅमेरा परत रामाकडे, तो मंद हसतो.......
मग राम डावीकडे बघतो, तिकडे सीता आहे. तिने नुकतेच रडु आवरले आहे, रडावे की हसावे असे हावभाव करत ती बंद तोंडानेच एक हुंदका देत मध्येच स्मितहास्य केल्या सारखे करते. मग कॅमेरा रामा कडे, परत सीता कडे, तेच हाव भाव.
मग राम सांगाड्याकडे पहातो. कॅमेरा सांगाड्यावर. विचित्र पार्श्व संगीत आणि सांगाड्यातून काही लहरी निघत असल्यासारखे दृष्य.
थोड्यावेळाने राम दुसरे पाउल टाकतो आणि उजवी कडे बघतो. लक्ष्मणाचे परत तेच हाव भाव.. कॅमेरा इकडून तिकडे. मग तो डावी कडे बघणार, सीतेचे तेच हाव भाव. कॅमेरा इकडून तिकडे.....
मध्ये ब्रेक होतो.
असे दहा पावले एकदाचे पूर्ण होतात, आणि राम सांगाड्याला लाथ मारतो, आणि सांगाडा असा उडत जातो, असा उडत जातो, त्याचे कितीतरी रिटेक दिसत असताना एपीसोड संपतो.
मी पाहिलेल्या सगळ्यात पहिल्या एपिसोड मध्ये राम, लक्ष्मण सीता वनवासात पोचलेले, राम लक्ष्मण झोपडी उभारत असतात. त्या दृष्यातले गाणे होते:
पत्ता पत्ता तिनका तिनका, चुनकर लाते है
महिलोंके वासी जंगल में कुटी बनाते है||
अजुन एका एपीसोड मध्ये सुग्रीवाच्या सैन्याने तळ ठोकला असतो, प्रत्येक तंबूवर झेंडा असतो ते कागदी असतात आणि दिशा डावी, उजवी, पुढल्या, मागल्या अशा वाटेल त्या दिशेने लावलेले असतात. त्यात तो एक पक्षी कुठल्याशा तंबूच्या बाहेर हेरगिरी करत असतो, त्याला कुठल्या दांडीवर बसलेला दाखवण्या ऐवजी हवेतच अधांतरी तरंगताना दाखवलेय, केव्हा तरीच अगदी आवाज न करता पंख हलवत.
एका एपीसोड मध्ये जांबुवंत का कोणी अंगदला सांगत असतो "अंगद, तुम उत्तर दिशामे जाकर सीता माई का शोध करो." असे म्हणताना तो हात कधी समोर, कधी वर तर कधी दोन्ही बाजूंना हलवत शेवटी "शोध करो" च्या वेळेस उजव्या हाताने, प्रश्न विचारताना करतात तसे हातवारे करतो. बहुधा सुरवातीला तो काहीच हात न हलवता बोलत असावा आणि मग त्याला कुणी समज दिली बाबा रे काही तरी हातवारे कर.
बहुतेक एवढेच एपिसोड बघितलेत मी.
रामायणातले सगळे ट्रिक सीन्स
रामायणातले सगळे ट्रिक सीन्स म्हणजे दिवाळीतले फटाके होते.. तद्दन व्यावसायिक दृष्टीने व लोकांच्या श्रद्धा एनकॅश करण्यासाठी त्या मालिका बनवल्या होत्या.
लोकप्रिय रामायणात जे भाग सांगितले जात नाहीत ( उदा. रामाने केलेला लक्ष्मणाचा वध, किंवा सीतेने केलेला शताननाचा वध ) ते दाखवल्याचे आठवत नाही. नाही म्हणायला लक्ष्मणाने रावणाकडून घेतलेले राजकारणाचे धडे मात्र दाखवल्याचे आठवतेय.
रामानन्द सागरचे सिनेमे आणि
रामानन्द सागरचे सिनेमे आणि मालिका महावाह्यात.
ओह, गॉट इट...... रामायण
ओह, गॉट इट......
रामायण मालिकेच्या रटाळपणाच्या निमित्ताने नव्याने रिडल्स ऑफ रामायण मालिका लिहिणे चालू आहे तर...
चालुद्यात...
रामायण मालिका रटाळ होती आणि
रामायण मालिका रटाळ होती आणि एका सीनसाठी कित्येक एपिसोड खर्ची घालत असले हे खरे असले तरी त्याकाळी त्याला पर्याय नव्हता आणि कोट्यावधी लोकांचे श्रध्दास्थान असल्याने मालिकेला अफाट लोकप्रियताही लाभली. आता ती मालिका बघू गेल्यास शेकडो खोडी काढता येतील. पण खोडी बाजूला काढल्यास काही चांगला भागही होता. हनुमान आणि रावणाचं काम त्याकाळी खूप आवडलं होतं. त्यातली काही गाणी खूप आवडायची आणि नुसती गाणी म्हणून ऐकल्यास अजूनही आवडतात, उदा. रावणवधाच्या आदल्या रात्रीचे 'यही रात अंतिम यही रात भारी' खरंच खूप अर्थवाही आणि सुरेल होतं.
रामायण मालिकेत हाईट असेल तर
रामायण मालिकेत हाईट असेल तर ती रावणाची भूमिका. अरविंद त्रिवेंदींनी रावणाची भूमिका अस्सल वठवली. राम उर्फ अरुण गोविलला शेवटपर्यंत अॅक्टिंग जमली नाही. पण त्रिवेदींनी बार उडवुन दिला. रावण सीतेला बघायला अशोक वनात गेला की सीता उर्फ दिपीका एक काडी उचलुन रावणाला घाबरवायची ते भारी होते. आणी आवडीचा प्रसंग म्हणजे रावणाचे शिवतांडव स्तोत्र म्हणणे. अरविंद त्रिवेदी स्वतः शिव भक्त असल्याने हा दुग्ध-शर्करा योग जमला.
रामायण, महाभारत ह्या मालिका
रामायण, महाभारत ह्या मालिका माझ्या आवडीच्या होत्या. धन्य ते लेखक ज्यांनी शेकडो वर्षे जनमानसाच्या मनावर राज्य करेल अशी कथा लिहली. रामायणातले आवडते पात्र रावण तर महाभारतातले नावडते पात्र द्रोणाचार्य.
रामायण सुरु असतानाच्या काळात
रामायण सुरु असतानाच्या काळात भेटायला कुणालाच फुरसत नसायची. रामायण सम्पल्यावरच भेटायला या...
क्वचित खुप काही 'जास्त' फिल्मी स्टाईलमधे दाखवले गेले असेल तर स्वत: रामानन्द सागर दुरदर्शनवर दर्शन द्यायचे आणि जनमानसातला गैरसमज दुर करायचा प्रयत्न करायचे. ते स्वत: या विषयाचा किती अभ्यास करर आहेत, किती निर-निराळे रेफरन्स वापरुन खरी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे जनतेच्या मनात ठसवायचे.
रामासाठी लोक टिव्ही समोर उदबत्ती लावायचे.
रामायण मालिकेने, राम हा
रामायण मालिकेने, राम हा अति-मवाळ गटाचा प्रतिनिधी होता आणी त्याच्या हातून चुकून रावणाचा वध झाला अशी काहीतरी त्या मर्यादापुरूषोत्तमाची ईमेज झाली होती. खूप रटाळ आणी संथ मालिका होती, पण फर्स्ट ऑफ अ काईंड होती. त्यामुळे जबरदस्त प्रसिद्धी लाभली.
महाभारत मात्र जबरदस्त होती. मोठ्या प्रोजेक्ट साठी मोठा फिल्ममेकर च हवा हे बी. आर. चोप्रा च्या महाभारताकडे पाहून पटलं. आज ही ते महाभारत बघताना खूप काही चुकल्यासारखं वाटत नाही. मुळात कास्टिंग, सर्वमान्य कथेशी साधर्म्य असणारं कथानक आणी वेग ह्या गोष्टींमुळे तांत्रिक त्रुटी (आज च्या तुलनेत) फारशा डाचत नाहीत. उद्या प्रत्यक्ष कृष्ण जरी समोर आला, तरी मी त्याला नितीश भारद्वाज सारखा दिसलास तरच स्विकारीन असं सांगीन. डॉ. राही मसूम रझांचं पटकथा लेखन खूप ताकदीचं होतं.
@ उदय, ते स्वत: या विषयाचा
@ उदय, ते स्वत: या विषयाचा किती अभ्यास करत आहेत, किती निर-निराळे रेफरन्स वापरुन खरी माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत हे जनतेच्या मनात ठसवायचे.>>> +१ हो ना! मला फार आवडायचे ते. किती प्रसन्न व्यक्तिमत्व होतं त्यांचं. आणि शेवटी निरोप घेताना 'जय श्रीराम' म्हणायचे, तेहि ऐकायला गोड वाटायचं.
ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच
ह्या मालिकेत जो सीन फक्त पाच मिनिटात दाखवून संपू शकतो, त्याला एवढं लांबण लावायचे कि एक अख्खा एक तासाचा एपिसोड त्यावर खर्ची पडायचा. >>>>>>>>>>>>>>
तुम्हाला काय वाटतं आता असं होत नाही .आठवा की मध्यंतरी होणार सून मी या घरची या मालिकेने
प्रेक्षकांना किती "वात" आणला होता एरवी जान्हविच बाळ
महिन्या दोन महिन्यात जे कथानक दाखवता आलं असते .
ते बाळ बाहेर यायला तब्बल दीड वर्ष घेतलं ....
त्याकाळात पर्याय होता का दुसरा....?
ना खंडीभर वाहिन्या , इंटरनेट, फेसबुक व्हात्सअप हे काहीही नाही .
अन तेव्हा असले प्रश्नही मनात यायचे नाही .
आमची माती आमची माणसं , साप्ताहिकी हे कार्यक्रम सुद्धा टक लावून बघायचा काळ होता तो .
मग रामायण ,चित्रहार,, फुल खिले है गुलशन गुलशन हे कार्यक्रम म्हणजे मेजवानीच वाटायचे.
वाली! ओ वाली! बाहर आओ! >>>
वाली! ओ वाली! बाहर आओ! >>> अगदी अगदी! शाळेत, भावंडांत वगैरे अत्यंत पॉप्युलर झाला होत्या या हाका.
आमची माती आमची माणसं ,
आमची माती आमची माणसं , साप्ताहिकी हे कार्यक्रम सुद्धा टक लावून बघायचा काळ होता तो .
मग रामायण ,चित्रहार,, फुल खिले है गुलशन गुलशन हे कार्यक्रम म्हणजे मेजवानीच वाटायचे.>>>>>+११११११ सही ! एकदम बोले तो मनकी बात छीन ली.
आम्ही तर छायागीत मधले गुलशन
आम्ही तर छायागीत मधले गुलशन कुमारच्या भावाचे गाणेही बघायचो.
आधी शुक्रवारी रात्री सिनेमाच्य आधी "संसद समाचार " नावाचा बोअर प्रकार !
शिवाय दिल्ली दूरदर्शन वर काही क्रूर लोक होते. संसद समाचार नंतर दूरदर्शन वर पाटी असे
"कुछ तकनिकी कारणवश हम आपको 'शोले' फिल्म नही दिखा सकते. आइए देखिये प्रधान्मंत्री की नेपाल यात्रा पर रंगारंग कार्यक्रम !"
पण फर्स्ट ऑफ अ काईंड होती.
पण फर्स्ट ऑफ अ काईंड होती. त्यामुळे जबरदस्त प्रसिद्धी लाभली.
डॉ. राही मसूम रझांचं पटकथा लेखन खूप ताकदीचं होतं. >> +१
रामायणाचे कास्टींग जेव्हढे अचूक वाटले होते तेव्हढे महाभारतातले कधीच वाटले नाही. पांडव नेह॑मीच गंडलेले वाटले.
रावण वधाची स्पेशल पुरवणी
रावण वधाची स्पेशल पुरवणी काढलेली जी नावाच्या फिल्मी नियतकालीकाने.
अश्या किती आठवणी जाग्या झाल्या.
मी एका बालनाट्य शिबीरात होतो. एका मुलाला दादोजी कोंडदेवांचा रोल दिलेला पण मला रामायण पहायच असत सांगत त्याने सामन्या मावळ्याचा दोन ओळींचा रोल घेतलेला.
मस्त आहेत आठवणी व चर्चा!
मस्त आहेत आठवणी व चर्चा! आमच्या पिढीने हे रामायण अनुभवले नाही पण नंतर सोनीवर हेच रामायण पुन्हा दाखवले होते का? सैफ अली खान त्याचं प्रमोशन करायचा असं काहीतरी आठवतं आहे.
चोप्रांच्या महाभारतानंतर स्टार प्लसवर २०१३ साली जबरदस्त महाभारत सादर झालं तसं रामायणाचंही पुन्हा नवीन सादरीकरण व्हायला हवं!
@ सनव, रामायणाचंही पुन्हा
@ सनव, रामायणाचंही पुन्हा नवीन सादरीकरण व्हायला हवं!>>> +१ हो ना!!
बऱ्याच जणांनी ह्या धाग्यावर
बऱ्याच जणांनी ह्या धाग्यावर येऊन 'रामायण' मालिकेच्या आपल्या गोड आठवणी जागवल्या. ह्याला मी निमित्तमात्र ठरलो याचा मला आनंद होतोय. सर्व प्रतिसादकर्त्यांचे जाहीर आभार!!! माबोवर हे माझे पहिलेच लिखाण असूनही आपण गोड मानून घेतलेत त्याने माझा लिखाणाचा उत्साह नक्कीच दुणावलाय. आपण केलेल्या सहकार्याकरीता सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.
माझी वेगळीच गंमतीशीर आठवण.
माझी वेगळीच गंमतीशीर आठवण. टीव्हीवर रामायण येईतो मला शिंग फुटली होती. तोवर टीव्हीला रिमोट आला नव्हता. त्यामुळे टीव्ही ऑन ऑफ करायची कष्टाची कामं माझ्याकडेच होती. तसंच तोवर टीव्ही मुलांनी पाहण्यासाठीच आहे, असा समज असल्याने आईबाबा स्वतःहून कधी टीव्ही लावायचेच नाहीत. आजकालसारख्या गप्पाही टीव्ही कार्यक्रमांबद्दल होत नसत. त्यामुळे टीव्हीवर रामायण लागतंय आणि सगळं जग ते भक्तिभावाने पाहतंय, याचा पत्ता मी घरी लागू दिला नाही. त्यामुळे आमच्या घरी काही हे रामायण पाहिले गेले नाही.
महाभारताचा मात्र घरी वास लागला आणि बाबांना ते बघायचं होत. त्यामुळे ते लावलं जायचं. पण तोवर माझी शिंग आणखी वाढली होती. भरीस भर म्हणून कॉलेजच्या मवामंतर्फे या मालिकांवर चर्चा होती. त्यात मांडला गेलेला "हे सगळं सादरीकरण किती बेगडी आणि नकली वाटतंय" हाच मुद्दा माझ्या डोक्यात बसला. तेव्हा महाभारतही पॅसिव्हली पाहिलं असेल तेवढंच.
मानवनी म्हटलंय, तसं ते रामायण कितीही स्लो असलं तरी त्याकाळच्या स्लो जीवनात ते अजिबात तसं वाटत नसे. कारण फार काही चॉइस नव्हता. टीव्हीवरची व्यत्ययची पाटीही लोक तितकीच आसुसून पाहायचे. आणि स्पेशल प्रोग्रामसाठी तर त्या काळ्यापांढर्या पट्ट्या दिसायच्या तेव्हापासून टीव्हीसमोर बसायचे.
त्या काळात गेलोच आहोत, तर मराठीत श्वेतांबरा ही मालिका अशाच भक्तिभावाने पाहिली गेली होती. आणि डोंगर पोखरून उंदीरसुद्धा नाही अशी भावना झाली. त्यात काम करणार्या वसुधा देशपांडे बोरिवली स्टेशनवरून अमुक एक गाडी पकडतात म्हणून त्यांना बघायला त्यावेळी गर्दी व्हायची. काय ते दिवस होते.
हम लोग आणि बुनियाद मात्र अगदी आवडीने पाहिल्या.
@ भरत., पण तोवर माझी शिंग
@ भरत., पण तोवर माझी शिंग आणखी वाढली होती.>>>
"त्या काळी लग्नसमारंभात
"त्या काळी लग्नसमारंभात सुद्धा टी.व्ही ची सोय (खास रामायण बुडु नये म्हणून )असायची. आणि निमंत्रण्पत्रिकेत त्याचा उल्लेख असायचा !" अगदी अगदी!
स्वीटर टॉकरच्या थोरल्या भावाचं लग्न होतं. टीव्ही ठेवलेला होता. लग्नाचा मुहूर्त रामायणाच्याच वेळेत होता. तेव्हां मुलगा मुलगी, भटजी आणि अगदी जवळचे आम्ही आठदहा जणच अंतर्पाटाभोवती हजर होतो. सगळे टीव्हीमध्ये. फोटोग्राफरदेखील हॉलच्या भाड्यामध्येच असल्यामुळे आमचा त्याच्यावर कंट्रोल नव्हता. त्याला ओढूनच आणावं लागत होतं!
माझ्या मुंजीचा मुहूर्त अर्धा
माझ्या मुंजीचा मुहूर्त अर्धा तास पुढे ढकलला होता, रामायण पाहून लोकांना येता यावं म्हणून.
तेव्हापासून माझा जो मुहूर्त वगैरे गोष्टींवरून विश्वास उडाला, तो उडालाच.
तेव्हापासून माझा जो मुहूर्त
तेव्हापासून माझा जो मुहूर्त वगैरे गोष्टींवरून विश्वास उडाला, तो उडालाच >>