भाग 1 http://www.maayboli.com/node/59911
भाग २ http://www.maayboli.com/node/60016
भाग ३ http://www.maayboli.com/node/60087
भाग ४ http://www.maayboli.com/node/60268
पंधराव्या शतकात म्हणजे साधारणपणे १४८८ मधे पहिला युरोपियन दर्यावर्दी Bartolomeu Dias केपच्या किनार्यावर येऊन पोहोचला. येथील रुद्र वादळी लाटा, अत्यंत ओबडधोबड खडकांचा किनारा, बेभरवशाचे हवामान आणि सैतानी वेगाचे वारे अनुभवल्यामुळे या भागाला त्याने नाव दिले ' केप ऑफ स्टॉर्म्स'. हळूहळू मात्र केपला वळसा घालून सुदूर पूर्वेला जाणे शक्य आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात यायला लागले होते. इथून आपल्याला पूर्वेकडच्या देशांशी दळणवळणाचा आणि व्यापाराचा राजमार्ग मिळतोय हे एकदा समजल्यावर मग मात्र केप ऑफ स्टॉर्म्स हे निराशादायी नाव मागे पडून 'केप ऑफ गुड होप' हे नवीन नाव प्रचलित झाले.
केपपॉइंटला उंचावर एक लाइट हाउस आहे. तिथे जायला एकतर पायी चालत जाण्याचा पर्याय आहे आणि दुसरा म्हणजे लाइटहाउसच्या अगदी पायाशी तुम्हाला आरामात घेऊन जाणारी फूनिक्युलर आहे. हा अतिशय आरामदायी आणि सुखद पर्याय आहे.
बेस स्टेशनला तिकीट मिळतात ती तिकिटे घेऊन आम्ही गाडीत जाऊन बसलो. रांग अशी नव्हतीच आणि असती तरी त्या गाडीमधे एकावेळेस बरेच लोक मावत असल्यामुळे रांग पटापट पुढे सरकली असती. अवघ्या तीन मिनिटात आपल्याला ही झुकझुकगाडी ८७ मीटर्स उंचीवर सरसरत घेऊन जाते.
या फूनिक्युलरचे नाव आहे ' फ्लाईंग डचमन'. या नावामागे एक आख्यायिका आहे. धोकादायक हवामानामुळे या किनार्यावर जहाज दुर्घटना नेहमीच्याच होत्या. खडकाळ किनार्यावर आपटून किंवा राक्षसी लाटांमुळे जहाजे नष्ट व्हायची. अशाच एका दुर्दैवी जहाजाचे नाव होते 'फ्लाइयिंग डचमन'. अजूनही हे भूताळी जहाज अधेमधे समुद्रात दिसते अशी दंतकथा आहे.
वारा इतका भन्नाट असु शकतो हे आम्हाला वरती आल्यावर जाणवलं. पुर्वी याला केप ऑफ स्टॉर्म्स का म्हणायचे क्षणार्धात लक्षात येत होते. पंचमहाभूतांपैकी वायू आपले 'भूत' हे विशेषण त्यादिवशी अगदी सार्थ करत होता. लहान मुले आणि शरिराने किरकोळ असलेल्या व्यक्ती वार्याच्या जोराने खाली खडकांवर किंवा समुद्रात पडतात की याची मला भीती वाटायला लागली. लाइटहाउस पर्यंत जायला उत्तम बांधलेल्या पायरया आहेत. या उंचीवरुन दिसणारा नजारा केवळ अप्रतिम... शब्दात मांडता येणार नाही इतके अफाट, रुद्र-नीळे सौंदर्य!!!!!
खाली दिसतोय तो केप ऑफ गुड होप...
एव्हाना वार्याचा जोर इतका वाढला होता की मला डोळे सुद्धा उघडे ठेवणे कठीण जाउ लागले. मुलांना तर आम्ही घट्ट पकडूनच ठेवले होते. कसेबसे जीव मुठीत धरून खाली आलो आणि तडक खाली जायच्या गाडीत बसलो.
बेस स्टेशनला काही कॉफी शॉप्स, गिफ्ट शॉप आणि एक रेस्टोरेंट आहे. खरंतर रेस्टोरेंट मधे आरामात बसून खाली अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्याकडे बघत लंच करण्याचा आम्हाला खूप मोह होत होता पण मर्टलने तो बेत हाणून पाडला. तिचेही बरोबर होतं तिने सांगितलं की आपण जेवणातच दोन तास घालवले तर येतांना ट्रॅफिक मधे अडकण्याची शंभर टक्के निश्चिंती. मग काय..आम्ही एका दुकानामधून सॅण्डवीचेस, कॉफी घेतली आणि एका बेंचवर बसून जेवण आटोपले.
खाली पाचच मिनिटावर केप ऑफ गुड होप आहे. तीथे 'केप ऑफ गुड होप' लिहिलेला एक फलक आहे. या फलकाच्या पुढे उभे राहून फोटो काढण्यासाठी पब्लिकची काय ती मरमर....आजूबाजूचा अप्रतिम निसर्गाची मजा घेण्याच्या ऐवजी प्रत्येकाचे लक्ष्य जणू फक्त पाटीचा फोटो काढणे हेच होते. आधी त्या लोकांना आम्ही मनसोक्त आणि यथासांग नावे ठेवली मग लगेच त्या गर्दीत मोठ्या उत्साहाने सामील झालो....
केप टाउन मधला आमचा हा शेवटचा दिवस अतिशय सुरेख गेला होता. निसर्गाने दिलेले या शहराला दिलेले दैवी निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवून आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो...
दिवसभर खूप प्रवास झाला होता पण प्रवासाचा शीण मात्र अजिबात नव्हता. उद्या केप टाउन सोडण्याची हूरहुर लागली होती. मग जास्तीत जास्तं वेळ इथे घालवावा म्हणून टूर संपल्यावर मर्टलला हॉटेलच्या ऐवजी वॉटरफ्रंट जवळ आम्हाला सोडायला सांगितले. वॉटरफ्रंटला थोडावेळ फिरलो आणि मग तिथल्याच एका भारतीय रेस्टोरेंटमधे जेवायला गेलो. जेवण अगदी चविष्ठ होते. आम्हाला वाढणारा कर्मचारी भारतीय वंशाचाच होता. त्याचे कुटुंब चार पाच पिढ्यांपुर्वी इथे आले. हा मनुष्य कधी भारतात गेलेलाही नाहीये पण भारताविषयी त्याचा जिव्हाळा, प्रेम त्याच्या बोलण्या वागण्यातून जाणवत होता. मातीची ओढ म्हणतात ती हीच…
आम्ही दुसर्या दिवशी हॉटेलमधून चेकाउट केले आणि रेंटल कार घेतली. आजपासून पुढचे चारपाच दिवस आम्हाला हीच कार वापरायची होती.
केप टाउनच्या आजूबाजूचा परिसर केप वाइन्लॅंड्स म्हणून प्रसिद्ध आहेत. इथल्या द्राक्षांपासून निर्माण झालेल्या वाइन्स जगभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे केप टाउनची सफर ही एखाद्या वाइनरीला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते.
शहराच्या पूर्वेला स्टेलेनबोश नावाचे गाव आहे. स्टेलेनबोश हे गाव आणि सभोवतालचा मोठा परिसर द्राक्षांच्या शेतीसाठी खूप प्रसिद्ध आहे. इथली द्राक्षे खाण्यासाठी नाहीत तर वाइन बनविण्यासाठी जास्ती उपयोगी आहे. डच लोकांनी इथे सर्वप्रथम द्राक्षांच्या लागवडीची सुरूवात केली. सुपीक जमीन आणि भूमध्यसागरी हवामानामुळे हा भाग लवकरच केप वाइन्लॅंड्स म्हणून भरभराटीला आला.
केप टाउन ते स्टेलेनबोश हा रास्ताही मोठा सुंदर आहे. आम्ही निघालो तेव्हा सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाश, हवेत किंचित गारवा. रस्त्याच्या दोन्हीबाजूला आखीव रेखीव द्राक्षांचे मळे आणि दूरवर दिसणारे डोंगर.....
एका वाइनरी मधे आम्ही गाडी थांबवली. या वाइनरीचा परिसर प्रचंड मोठा आहे. अतिशय सुरेख हिरवळ, मधोमध तलाव, आजबाजूला हिरवीगार झाडे, मुलांसाठी खेळण्यासाठी जागा, वेलींचे मांडव, बसायला बेंचेस आहेत...... फारच सुंदर आणि स्वच्छ. तळ्याच्या काठी शांतपणे नुसते बसून राहावेसे वाटत होतं.
जेवण्यासाठी, वाइन टेस्टिंग आणि वाइन विकत घेण्यासाठी त्यांचे एक छान प्रशस्त रेस्टोरेंट आणि वाइन सेलर आहे. वाइन टेस्टिंगसाठी हे खूप प्रसिद्ध आहे असे म्हणतात.
मेनु मधे मोठ्यांसाठी वाइन्स आणि लहान मुलांसाठी जूस टेस्टिंग दोन्ही आहे. वाइनमधे तीन प्रकारच्या वाइन्स- एक अगदी माइल्ड, एक थोडी कमी माइल्ड आणि एक जरा स्ट्रॉंग. ग्रेपजूस मधेही तीन वेगवेगळ्या प्रकारच्या द्राक्षांचे जूस.
पुढे ड्राइविंग करायचे असल्यामुळे त्यादिवशी ड्राइव न करणार्या सदस्यासाठी वाइनसॅंपलिंगची आणि मुलांसाठी जूसच्या ऑर्डर्स आम्ही दिल्या आणि बरोबर चीज़,ऑलिव्स अँड क्रॅकर्स….
या मळ्यात खरे म्हणजे आरामात दिवस घालवता येऊ शकतो. पण आम्हाला पुढे प्रवास करायचा होता. अगदी नाइलाजाने या टुमदार गावाचा आणि केपटाउनचा निरोप घेऊन आम्ही शेवटी गार्डन रूटच्या दिशेने निघालो......
क्रमश:......
मस्त फोटो आणि वर्णन ही सुंदर.
मस्त फोटो आणि वर्णन ही सुंदर.
मस्त फोटो आणि वर्णन. अगदी
मस्त फोटो आणि वर्णन. अगदी जावेसे वाटते आहे.
मस्त माहिती आणि फोटोज !
मस्त माहिती आणि फोटोज !
मस्तच. आजपर्यंत मी केप ऑफ गुड
मस्तच.
आजपर्यंत मी केप ऑफ गुड होपला अफ्रिका खंडाचे सगळ्यात दक्षिणेचे टोक समजत होतो. तुमचा फोटो बघून शंका आली म्हणून गुगलले तेंव्हा Cape Agulhas हे सगळ्यात दक्षिणेला असल्याचे समजले.
मनीमोहोर, दिनेश, श्री आणि
मनीमोहोर, दिनेश, श्री आणि माधव मन:पूर्वक धन्यवाद.